सोमवार, ९ जानेवारी, २०१७

वेचताना... : मितवा

या आधी विद्याधर पुंडलिकांच्या 'शाश्वताचे रंग' मधील वेचा दिला तो वाचक आणि लेखनाचे अनुबंध दर्शवणारा म्हणून. पुंडलिकांखेरीज अशाच प्रकारे अन्य लेखकांच्या लेखनाशी तद्रूप होणारे दुसरे लेखक म्हणजे जीए. पण या दोघांपलिकडे जाऊन थेट तादात्म्य पावताना त्या लेखनातून निर्माण झालेले जग, त्यातील पात्रे यांच्याशी समरस होणारा, जणू ते आपल्या जगण्याचा भाग असल्याचा समज करून घेणारा आणि आपले सारे लेखनच त्या जगात घेऊन जाणारा आणि म्हणून ते जग अपरिचित असलेल्यांकडून दुर्बोधतेचा शेरा मिळवणारा लेखक म्हणजे ग्रेस.

मितवा

ग्रेस यांची सर्वसाधारण ओळख कवी म्हणूनच आहे. त्यांनी स्वतःच म्हटल्याप्रमाणे कोणत्याही परंपरेचा नसलेला आणि कदाचित कोणत्याही परंपरेचा उद्गाता नसलेला कवी. त्यांच्या कवितांमधील प्रतिमा, संदर्भ अनेकदा या भूमीशी नाते सांगणारे नसल्याने बहुसंख्य वाचकांना अनाकलनीय.

परंतु बहुसंख्येला अनाकलनीय आहे म्हणूनच ते श्रेष्ठ आहे असे समजून त्याला उचलून धरणारी एक साहित्यिक कलाकारांची जमात असते त्यांनी ग्रेस यांच्या कवितांना श्रेष्ठत्वाची पावती देऊन टाकली. 'आपल्याला ग्रेस आवडतात' हे सांगणेच मुळी 'आपली आवड चारचौघांसारखी नाही, अधिक उच्च आहे' हे अप्रत्यक्ष सांगण्यासाठी असते हे अनेकदा सहजपणे दिसून येते.

पण अनेकदा हे 'अडाण्याचे गाणे' देखील उपयुक्त ठरते कारण केवळ पारंपरिक जाणीवा आणि विचारांच्या पलीकडे जाऊन एखादा विचार करतो नि त्यांना ग्रेस उलगडू लागतो. मराठी साहित्यात आज कवी म्हणून ग्रेस यांचे स्थान अनन्यसाधारण असे मानले जाते.

जेव्हा ग्रेस यांच्या कविता वाचल्या तेव्हा 'हे आपले काम नोहे' याची खूण मनोमन पटली. त्याबाबतीत आज माझी थोडीफार प्रगती झाली असेल, नसेल. परंतु माझ्या दृष्टीने हा आत्ममग्न कवी एक श्रेष्ठ विचारवंत-लेखक आहे आणि तीच त्यांची प्रमुख ओळख असायला हवी असे मी मानतो. त्या अर्थी मी त्यांना जीएंच्या जातकुळीचा मानत आलो आहे.

त्यांचे 'मितवा' प्रथम हाती घेतले तेव्हा 'ग्रेस वाचायचा कारण आपल्याला ग्रेट रसिक म्हणून मिरवायचे आहे' हा उद्देश होता हे सांगायला काहीच लाज वाटत नाही. पण ते पुस्तक उघडले आणि एक झंझावात रोरावत आला नि त्याने माझ्या जाणिवांच्या, विचारांच्या, दृष्टीकोनांच्या चिंध्या चिंध्या केल्या. आजवर आपण जगाकडे पाहात होतो ते केवळ साक्षीभावाने; त्याला थेट भिडणार्‍या, त्यात आपले जगणे मुरवलेल्या माणसाला जग कसे दिसते याची चुणूकच या पुस्तकाने दाखवली.

एमिली डिकिन्सन, टॉलस्टॉयचा 'फादर सर्जियस', 'बॉदलेअर'चा अल्बेट्रॉस या परदेशी लेखनातील किंवा उर्मिला, सिद्धार्थ आदी देशी मातीतील पात्रांना कवेत घेऊन ग्रेस त्यांच्याशी बोलू लागतात. ते तटस्थ भावाने लिहीत बोलत नाहीत, जणू त्या जगाचे ते भागच होऊन राहिल्यासारखे दिसते. पण हे करत असतानाही त्यातून त्यांचे स्वतःचे विचारमंथन विलक्षण वेगाने आणि तेजाने प्रकट होताना दिसते. 

परंतु भरजरी वाक्यांची पखरण म्हणजे जीएशैली ही समज जेवढी अडाणीपणाची आहे तितकीच लेखनातील दुर्बोधता म्हणजे ग्रेस ही देखील. कारण परपुष्ट वाटणारी प्रतिमासृष्टी त्यांची स्वतःची जाणीव, दृष्टीकोन आणि विचार घेऊन उभी राहते. त्याशिवाय निव्वळ दुर्बोधता म्हणजे ग्रेसशैली म्हणणे हे विस्कळित वाक्यांच्या गद्यलेखनाला मुक्तच्छंदातील कविता म्हणून मान्यता देण्यासारखे आहे.

प्रतिबिंबाचे कोडे हा जीएंना सतत भेटणारा विषय. अगदी 'प्रवासी' पासून 'बखर बिम्म'ची पर्यंत सर्वत्र त्यांनी त्या कोड्याचा वेध घेतला आहे. त्यांच्या प्रवासी'मधला आंधळा शिकारी आरशांच्या व्यूह रचतो नि दृष्टीला देणगी समजणार्‍या डोळसांची शिकार करतो. आरसा हे प्रतिबिंब पाहण्याचे मानवनिर्मित साधन. प्रतिबिंब हे जड व्यक्ती अथवा वस्तूचे असते तसेच ते जाणीवेतून उमटलेलेही असू शकते. संथ तळ्याच्या पृष्ठभागावर माणूस आपले प्रतिबिंब पाहतो तसेच अन्य व्यक्तींच्या जाणिवेतही.

या प्रतिबिंबांच्या अन्वयार्थाच्या आधारे जीए पुढे जातात तर ग्रेस यांना या आरशात भुलीचा स्रोत दिसतो. त्यात बंदिवान होण्याची सांगड जगण्यातील अस्तित्वाच्या प्रश्नांशी पडलेली दिसते. एका साध्या प्रतिबिंबातून निर्माण झालेला प्रवास अस्तित्वाचे प्रश्नांचा वेध घेत पुढे जातो.

- oOo -

या पुस्तकातील एक वेचा: प्रतिमाविभ्रम आणि आरसा


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा