गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

ठुमरीचा ’उठाव’

संगीतातल्या बामणांनी ठुमरीला नेहमीच वेशीबाहेर ठेवलं. खयाल गायकीला दरबारी शिरपेच मिळाला अन् ठुमरी चुपचाप गावकुसा बाहेर कोठ्यावर विराजमान झाली. ठुमरीचा अहिल्योद्धार तवायफांनी केला हे विशेष.

शुभ्र काही जीवघेणे

गेल्या शतकाच्या उत्तरार्धात मोगलाई आमदनीचे ताणेबाणे उसवत गेले अन् कंपनी सरकारचा हुकूम सर्वत्र रुजू झाला. तो उत्तर हिंदुस्थानचा अत्यंत धकाधकीचा काळ होता. याच काळात ग़ज़ल-ठुमरी दादराचा डौल झळाळून निघाला. महमदशाह रंगीलेचा रसीला कित्ता होताच. त्यात मिर्झा गालिब, दाग़, मोमीन, ज़ौकने तर कहर केला. बहादुरशाह ज़फरने ग़ज़लच्याच दोन ओळीत त्या काळाचा आकांत शब्दबद्ध केला. तवायफांनी तो गाऊन अमर केला.

ठुमरी, दादराच्या असंख्य चीजा कोठ्याकोठ्यावर झंकारत होत्या. 'छोटासा बालमुवा मोरा', 'नजर लागी राजा' सारख्या सुरेल ठुमर्‍यांनी रसिकांना पागल करून टाकलं होतं. ठुमरी-दादरा गायकीचा बगीचा असंख्य तवायफांनी समृद्ध केला. आज त्यापैकी कित्येक जणी विस्मृतीच्या गर्तेत विरून गेल्या आहेत.

विसाव्या शतकाचे घट बसले अन् थोड्याच वर्षात ग्रामोफोनची दिग्विजयी पताका सर्वत्र फडकली. ग़ज़ल ठुमरी गायकीला सुगीचे दिवस आले.

मायक्रोफोनमध्ये गायल्याने आवाज खराब होतो किंवा नाही याचा शास्त्रीय काथ्याकूट एकीकडे होत असताना दुसरीकडे ठुमर्‍यांच्या तबकड्यांवर असंख्य घरंदाज गायिकांच्या नावाची मोहोर झळकली. बाई सुंदराबाई, बाई प्यारीबाई, बाई मलकाजान यांच्या रेकॉर्डसचा बोलबाला झाला.

पुढे गोव्यातल्या कित्येक घरंदाज गायिकांनी मुंबईची वाट धरली. इथे जागोजागी प्रसन्न मैफलीच्या राहुट्या उभ्या राहिल्या. ठुमरी-दादरा- गायकीला नवीन झळाळी लाभली. ठुमरी-ग़ज़ल गायकीचा दीपोत्सव निरंतर ठेवणार्‍यांत या गायिकांचा मोठा वाटा आहे.

तीसच्या आसपास भावगीतांचा जमाना सुरू झाला. जी.एन. जोशी, लीला लिमये फॉर्मात होते. हलक्या फुलक्या गाण्याचा चस्का पब्लिकला लागला होता. बरकत अली खाँ'च्या 'बाग़ोमें पडे झूले' ची जादुगिरी काही औरच होती. वत्सला कुमठेकर, कुमुद पेडणेकर आघाडीवर होत्या. वत्सलाबाईंची 'रुसला कान्हा ग बाई बाई जा ना' सरळ काळजातच स्पर्शून जात होती.

घम्मनखाँसाहेबांकडे जयश्री कामुलकर, वासंती घोरपडे आणि मेनका शिरोडकर संथा घेत होत्या. अख्तरीबाई फैज़ाबादी नावाचं एक घननीळ काहूर आस्ते आस्ते उमलून येत होतं. 'दीवाना बनाना है तो दीवाना बना दे'चे दिवस होते. बडे ग़ुलाम अली खाँ आपल्या लफ्फेदार आवाजात नाजूक ठुमर्‍या छेडत होते.

ठुमरी-दादरा-ग़जलचा हा वारसा रसूलनबाई, अख्तरीबाईंनी पुढे चालवला. आज पारंपरिक ग़ज़ल ठुमरीचा दिवा घेऊन शोभाबाई पुढे निघाल्या आहेत.

- oOo -

पुस्तकः 'शुभ्र काही जीवघेणे'
लेखकः अंबरीश मिश्र
प्रकाशकः राजहंस प्रकाशन
आवृत्ती दुसरी (१९९८)
पृ. ५-६.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : शुभ्र काही जीवघेणे >>
---


संबंधित लेखन

२ टिप्पण्या: