शनिवार, २८ जानेवारी, २०१७

इतिहास-वेध

महाभारतीय समाज बर्‍याच अर्थांनी संकुचितच होता. त्याच्या जीवनाचे चित्र दाखवते की, आधिभौतिक दृष्टीने - द्रव्याच्या दृष्टीने - तो कृषि-गोरक्षकांचाच होता. वैदिक आर्य येथल्या लोकांत मिसळू लागले होते. पण त्यांचे सांस्कृतिक जीवन बहुतांशी गोरक्षक आर्यांच्याच मर्यादेत राहिले होते. घोडे हे त्यांचे आवडते जनावर. घोड्यांच्या संख्येवर, रूपावर व गुणांवर क्षत्रियांचा मोठेपणा अवलंबून असे. बर्‍याचशा राजांची नावेही घोड्याच्या मालकीची वा गुणांची निदर्शक होती. उदा. 'हर्यश्व' (तांबडा घोडा असलेला), 'अश्वपति' (घोड्यांचा स्वामी), 'श्वेतवाहन' (अर्जुनाचे एक नाव), 'युवनाश्व' (एका प्रसिद्ध पूर्वकालीन राजाचे नाव). सारथी असणे, रथातून लढणे (महारथी, रथी, अतिरथी) हा मोठेपणा समजला जाई. रथ लहान-मोठे असत. पण महाभारतकाली कोणाला घोड्यावर बसता येत नसे. ती कला ख्रिस्तोत्तरकाली, म्हणजे भारतीय युद्धानंतर हजार वर्षांनी हिंदुस्थानात आली.

युगान्त

गोरक्षण व कृषि हा जीवनाचा पाया होता. 'गोमांस खात असत का?' असत, असाही पुरावा नाही. नसत, असाही पुरावा नाही. वेद-ब्राह्मण-काली खात होते. सणासुदीला, विद्वान ब्राह्मणासारखा मोठा पाहुणा आला, तर खाण्याचा तो जिन्नस होता. तसा उल्लेख महाभारतात नाही. खात नसतीलच, असेही नक्की सांगता येत नाही. जागोजाग व्याधांचे उल्लेख आहेत. भीमाला मांस आवडे, ते ते मृगया करून आणीत, असाही उल्लेख आहे. पांडव मृगयेवर राहत. त्यांनी आणिलेली मृगया त्यांचे ब्राह्मण आश्रितही खात असणार. मृगयेच्या आणि व्याधांच्या उल्लेखांवरून वाटते की, गोमांस खायचा प्रघात अजिबात नाहीसा तरी झाला होता, किंवा फारसा अस्तित्वात नव्हता. सर्व क्षत्रिय गाईंचे मोठे कळप पाळीत. ते का? क्षत्रिय दूध विकीतसे दिसत नाही. मग गुरे कुटुंबाला दूधदुभत्यासाठी व नित्य होणार्‍या यागाला लागणार्‍या तुपासाठीच होती, का क्वचित खाण्यासाठीही, असा प्रश्न मनात येतो. कर्णपर्वातील उघड-उघड प्रक्षिप्त भाग कर्णाचे मद्र-बाल्हिक व गांधार या देशांतील माणसांबद्दलचे निर्देश हा वाटतो. कुरु-पांचाल धार्मिक, इतर राष्ट्रे अधार्मिक, असा समज झाल्यानंतरचा असावा. त्यात म्हटले आहे की, वरील तिन्ही राष्ट्रांचे लोक गोमांस खात व दारु पीत. (८.२७-७७) दारु पिणे महाभारतकाली क्षत्रियांना संमत होते, हे उघड आहे. तसेच गोमांस खाणेही संमत असेल. पुढे त्यावर धार्मिक बंधन पडल्यावर पश्चिमेकडील लोक जुने रीती-रिवाज पाळीत असल्यामुळे ते नव्या समजुतीप्रमाणे धर्मबाह्य ठरले असतील.

दूध, सायान्न व घृत ही हविर्द्रव्ये होती. 'सायान्न' म्हणजे दूध फाडून फडक्यात बांधून केलेला छाना. ही सर्व खाद्येही असणारच. मनुष्य स्वतःसाठी जे उत्पन्न करतो व खातो, तेच आपल्या देवांना वाहतो. 'घृत' म्हणजे काय? 'तक्र' व 'नवनीत' हे दोन्ही शब्द महाभारतात नाहीत. लोणी तापवून केलेले ते घृत, की गोचर्ममांस तापवून युरोपात काढतात तशी चरबी? तोच प्रश्न 'आज्य' ह्या शब्दाविषयी. 'आज्य' म्हणजे अजापासून झाले ते. 'आज्य' हे बोकडाचे किंवा शेळीचे मांसही असू शकेल. 'आज्य' शब्द 'अञ्ज्' (=माखणे) ह्या धातूपासूनही होतो. आज्य म्हणजे या अर्थाने 'अंगाला माखायचे ते'. तिबेटी लोक व मध्य आशियातील पशुपालक भटके लोक आजही सर्व तर्‍हेची चरबी व लोणी अंगाला फासायलाही वापरतात. घोडा अश्वमेधात बळी देत. अजा क्षुद्र यागात उपयोगी पडत असेल. इतरही जनावरे मेध्य होती. मेध्य जनावरे खाद्यही होती. गो ही मेध्य आणि खाद्य दोन्ही होती का?

महाभारतकालीन लोकांचे मुख्य धान्य काय होते. ते पुस्तकावरून कळत नाही. बहुधा जव असावे. क्षत्रिय भरपूर दारु पीत असत. धान्य जसे खाद्य होते, तसे देवाला पुरोडाशाच्या रूपाने अर्पण करावयाचे द्रव्यही असे. यागप्रधान धर्मात पत्र, पुष्प व फल ह्या तिहींनाही स्थान नव्हते. अशा प्रकारची पूजा महाभारतात नाही. गीतेत जरी ह्या तिन्हींचा ['पत्रं पुष्पं फलं तोयं यो मां भक्त्या' इत्यादि] उल्लेख असला, तरी तो नंतरचा समजला पाहिजे. महाभारतकाली जे आपले व आपल्या देवांचे खाद्य होते, ते मागाहून राहिले नाही. माणसे व देव दोन्ही बदलली.

ज्याचा निर्णय करता येत नाही, अशी आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे: ती म्हणजे लिपी व लेखन. महाभारतकाली लोकांना लिहिता येत होते का? महाभारतात लेखनाचा उल्लेख नाही. लिपी असती, तर उल्लेख आलाच असता, अशी ठिकाणे असूनही उल्लेख येत नाही. म्हणून लिहिणे माहीत नसावेसे वाटते. सगळी तोंडी निरोपानिरोपी. दूत पाठवायचे, ते ही लिहिलेली चिठी न देता तोंडी निरोप देऊन. विदुराने वारणावताला धर्माकडे आपला जो एक विश्वासू 'खनक' (= खणणारा) पाठविला, तो तोंडी निरोप देऊन. निरोप फार गुप्त स्वरूपाचा म्हणून तोंडी दिला असे म्हटले, तरी इतर प्रकरणे मुळीच गुप्त नव्हती. प्रत्येक सांगावा चार माणसे जमवून बोलण्याचा होता. विराटपर्वात शमीवृक्षाखाली उभे राहून अर्जुन उत्तराला कोणची शस्त्रे कोणाची, हे जेव्हा सांगतो, त्या वेळी एका तरी शस्त्रावर नाव असावे, अशी अपेक्षा असते. पण नाव नसून खुणा मात्र होत्या. सोन्याचे ठिपके [ जातरूपस्य बिन्दवः ] असलेले धनुष्य गांडीव, ज्याच्यावर सोन्याचे हत्ती ते भीमाचे, ज्याच्यावर इन्द्रगोप ते धर्माचे, ज्याच्यावर सोन्याचे सूर्य ते नकुलाचे व टोळ असलेले ते सहदेवाचे. त्याप्रमाणे बाण कुणाकुणाचे, तलवारी व म्याने कुणाकुणाची, ह्याचे वर्णन आहे. एकाही आयुधावर नाव मात्र नाही. तसेच, राजाचे गोधन मुद्रांकित असे. पण मुद्रेवर नाव असे, असे दिसत नाही. ही गोष्ट क्षत्रियांची. क्षत्रियांना लिहिणे-वाचणे आले नाही, तरी अगदी परवा-परवापर्यंत चालतच असे. पण इतरांच्याही बाबतीत लेखाचे नाव नाही. कृषि व गोरक्षण लेखनाशिवाय चालू शकते. आर्यांच्या आधी भारतात वसलेल्या सिंधुकाठच्या लोकांना लिपी होती, लिहिणे होते. आर्यांची लिपी पहिल्याने ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात सापडते. त्याआधी दोन शतके लेखन आले असल्यास बुद्धाच्या वेळी लेखन होतेसे दिसते. बुद्धयुगाला वणिग् युग म्हटले तर ते अपेक्षितच आहे. कारण द्रव्याच्या उलाढाली लेखनाशिवाय होऊ शकत नाहीत. महाभारतात लेखनाचा व लेखनसाहित्याचा, - शाई, पत्र व लेखणी यांतल्या कशाचाच उल्लेख नाही. लेखन असेल पण असलेच तर, अपवादात्मक असावे. कदाचित सभा बांधणार्‍या मयाला ती विद्या अवगत असली, तर कोण जाणे!

रुक्मिणीची कथा ही महाभारताचा भाग नसली , तरी त्या कालातीलच! कृष्ण कितीही श्रेष्ठ असला, तरी तो ही त्या काळातील क्षत्रियच होता. तेव्हा रुक्मिणीने स्वयंवरापूर्वी प्रेमपत्रिका लिहिणे व कृष्णाला ती वाचता येणे दोन्ही गोष्टी असंभाव्य.

जसे लेखन नव्हते, तशी विटांची वा दगडांची घरेही नव्हती. आर्य बहुधा लाकडी घरे बांधीत. पहिली बौद्ध लेणी ही लाकडी बांधणीच्या अनुकरणाची आहेत, असे जाणकारांचे मत आहे. यज्ञांत निरनिराळ्या चिती सांगितल्या आहेत. त्यांसाठी इष्टका म्हणजे वीट लागत असे. वीट करणे एकदा माहीत झाले, म्हणजे विटा घरांसाठी वापरणे शक्य आहे. पण तसा उल्लेख नाही. गरीब लोक आज बांधतात, तशी मातीची घरे बांधीत असतील.

धर्म, तत्त्वज्ञान, सामाजिक मूल्ये याबाबतींत खूप पुढे गेलेले हे लोक ऐहिक गोष्टींत फार पुढारलेले नव्हते. इतर आर्यभाषिकांप्रमाणेच मिसर व बावेरु येथल्या सेमिटिक-हामिटिक लोकांच्या मानाने ते मागासलेलेच होते. त्यांची शस्त्रे उत्तम होती, व वाहनांमुळे त्यांना जलद गती होती. घोडा हे जनावर त्यांनीच मिसर व बावेरु (इजिप्त व बाबिलॉन) देशांत नेले व त्याच्याच साहाय्याने ते देश जिंकून काही काळ त्यांवर पगडा बसविला. ह्याच भाषिक समूहातील लोक ग्रीसमध्ये गेले. ग्रीसमधील समाजव्यवस्था, दैवते व महाभारतातील चित्र ह्यांत विलक्षण साम्न्य आहे, व विचार करायला लावतील, असे फरकही आहेत. त्यांनीही अशाच एका जुन्या लढाईचा 'इलियड' नावाच्या अमर-काव्यात वृत्तान्त दिला आहे. त्यात जी समाजस्थिती दिसते, ती आपल्या महाभारतकालीन समाजस्थितीशी जुळती आहे. तेथेही लहान-लहान राज्ये होती. सगळे राज्यकर्ते एकमेकांच्या बरोबरीचे होते; व ट्रॉयच्या युद्धात या राजांचे मानापमान करता-करता बिचार्‍या आगामेम्नॉनची दुर्योधनाप्रमाणेच अवस्था झाली होती. ग्रीक कथेत देवादिकांची ढवळाढवळ महाभारतकथेपेक्षा जास्त आहे. ग्रीक देव एकमेकांशी भांडतात. ग्रीक कथांतून देवींचे स्थान स्वतंत्र , (उदा. पालासअथीनी) - देवांइतकेच महत्त्वाचे आहे. महाभारतकाळापर्यंत आपल्याकडे देवींना वा देवांच्या बायकांना स्थान नाही. दोन्ही समाज पितृप्रधान असूनही ग्रीकांच्या कथांत स्त्रियांची चरित्रे ठळक, वैशिष्ट्यपूर्ण व विविध आहेत. मानवी समाजात काय, किंवा स्वर्गात काय, ग्रीकांमध्ये स्त्रीला भारतातल्यापेक्षा जास्त महत्त्व होते, ह्यात शंका नाही.

ग्रीकांच्या मानाने आपल्याकडील स्त्रिया उदात्त असल्या तरी एकाच ठशाच्या व कंटाळवाण्या वाटतात. माता व पत्नी ह्या दोन भूमिकांतच त्या दिसतात. नवर्‍याने पोटच्या पोरीला देवीला बळी दिली, हे निमित्त पुढे करून नवर्‍याला मारणारी क्लिटेमनेस्ट्रा, आपला मुलगा मेलिआगर ह्याने आपला भाऊ थेस्टिआडीस ह्याला भांडणात मारले म्हणून रागाच्या भरात मेलिआगरला मारणारी त्याची आई आलथिआ, आपला शापित भाऊ ओरेस्टेसबरोबर वणवण हिंडणारी इलेक्ट्रा*, पापाचे प्रायश्चित्त म्हणून म्हातारपणी इडिपसने आपले डोळे फोडून घेतले तेव्हा ठरलेले लग्न मोडून ह्या निराधार अपंग बापाची काठी होणारी इफिजेनिया, अशी कितीतरी अविस्मरणीय विविध चरित्रे ग्रीक कथांतून आहेत. ग्रीकांचे देव व देवताही आपल्याकडील देवांच्या मानाने भारी रागीट, उतावळ्या व स्वभावाने दुष्ट वाटतात, ग्रीक कथेत बहीण-भाऊ ह्यांचे नाते अतिशय प्रेमाचे व जवळिकीचे दाखवले आहे. लग्न झाले, म्हणून स्त्री आपल्या माहेराला विसरत नव्हती. मूळ एक पण मागाहून निरनिराळ्या प्रदेशांत गेलेल्या दोन पितृप्रधान संस्कृतीत हा फरक का असावा, असा प्रश्न साहजिकच उभा राहतो. मिसर देशात राजा जरी पुरुष असला, तरी संस्कृती मातृप्रधान होती, व स्त्रियांचा दर्जा फार मोठा होता. त्याचा हा परिणाम होता ग्रीकांमध्येही राजकुले, पूजा-अर्चा करणारा वर्ग व इतर समाज होता. त्याशिवाय परिचर्या करणारा दासवर्गही होता. राजकुले जाऊन लोकसत्ताक प्रस्थापित झाले, तेव्हा मताधिकार फक्त वरचा तीन लोकांना होता. दासांना नव्हता. तोच प्रकार आजपर्यंत अमेरिकेत होता. इतर पाश्चात्त्य देशही एकाच वेळी घरी लोकसत्ताक व बाहेर साम्राज्यवादी होते व आहेत. आपले व परकीय, आपले देव व परकीयांचे देव, आपले हक्क घेण्याची व परकीयांना हक्क न देण्याची प्रवृत्ती - हे सर्व तेव्हा होते, आताही आहे. तेव्हाचे मानवसमाज लहान-लहान होते. ह्या तर्‍हेची समाजव्यवस्था हीच स्वाभाविक समजली जाई. तीत लपवण्यासारखे काही वाटत नसे. हल्ली पूर्वीच्या गोष्टींपैकी खूपच गोष्टी शिल्लक आहेत. पण त्या जणू नाहीतच, अशा भावनेने लोक लिहीत असतात. जुने नुसते त्याज्यच नाही, तर हल्लीच्या काळाला गैरलागू , अशी बर्‍याच लोकांची समजूत असते. तसे ते नाही. जुने कधीही सर्वस्वी टाकाऊ व सर्वस्वी गैरलागू होत नाही; नवे ते इतके नवे कधीही नसते की, त्यात जुन्याचा अंशच नाही. अशी मानवशास्त्राची बैठक आहे. जुने, नवे, जवळ-जळचे तसेच लांब-लांबचे, अप्रगत व प्रगत, सगळेच मानवसमाज अभ्यासास योग्य आहेत. अभ्यास व्हावा तो पूर्वी काय होते व आज काय आहे, त्याची तुलना करता येईल, ह्या दृष्टीने व्हावा. अभ्यासाआधीच ठाम मते ठरवून मूर्तिपूजकाप्रमाणे भक्तिभावानेही होऊ नये व मूर्तिभंजकाच्या आवेशाने द्वेषभावनेनेही होऊ नये, इतकीच प्रार्थना
---

हे सर्व लिहीत असताना एका मित्राने विचार मांडला. वेद, उपनिषदे, महाभारत अशी सुरुवात झाल्यावर आपल्या सबंध समाजाने पलटी का खाल्ली? इतक्या कणखरपणे आयुष्याचा विचार केल्यावर भक्तिमार्गाचा स्वप्नाळूपणा व विभूतीपूजा त्याने कशी स्वीकारली? गोमांसासुद्धा सर्व तर्‍हेचे मांस खाणारे शेवटी गाईचे शेण खाऊन व मूत पिऊन, एका चार पायाच्या जनावराला आपली माता कशी समजू लागले?

ह्या प्रश्नांची उत्तरे देणे - निदान एकट्या माणसाने देणे - अशक्य आहे. विचार व्हावा, म्हणून माझे व इतरांचे प्रश्न पुढे टाकले आहेत. दुसर्‍या एका मित्राने मांडलेला विचार मात्र काहीसा सुखकारक आहे. तो म्हणाला, "अहो, दुसरे काही टिकले नाही, पण भाषा टिकली आहे, हे नशीब समजा. आज तुम्हाला महाभारत वाचता येऊन त्याचा अर्थ समजतो आहे, हे भाग्य नाही का? नाहीतर मोहेंजोदारोप्रमाणे झाले असते. चित्रे आहेत, वस्तू आहेत, काहीतरी लिहिले आहे, पण काय ते मात्र भाषेच्या ज्ञानाअभावी कळत नाही." खरेच केवढे माझे भाग्य की, आज मला तीन हजार वर्षांपूर्वीची 'जय' नावाची कथा वाचता येते आहे, व तीत माझे प्रतिबिंब पाहता येत आहे!
वर्षप्रतिपदा, शके १८८९
१० एप्रिल, १९६७

- oOo -

पुस्तकः युगान्त
लेखिका: इरावती कर्वे
प्रकाशकः देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि.
आवृत्ती नववी (१९९४)
पृष्ठे २७३ - २८०.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : युगान्त >>
---


संबंधित लेखन

५ टिप्पण्या:

  1. पांडवांकडची बरीचशी शस्त्रं ही वेगवेगळ्या प्रसंगी त्यांना इतरांकडून मिळालेली होती. उदा. मय दानव, देव इत्यादी. त्यामुळे त्या शस्त्रांवर त्यांची नावं असण्याचा प्रश्नच येत नाही.
    मग महाभारतकाली लोकांना लिहिता येत होते का?
    आंतरजालावर महाभारताची जी प्रत उपलब्ध आहे, त्याच्या पानांचे इथे दुवे देत आहे, त्यावरुन तरी त्याकाळी लोक लेखन करत असावेत, असे म्हणता येते.

    लोकपालसभाख्यानपर्वातल्या नारद युधिष्ठिर संवादाचे हे काही दुवे, त्यात लिखाणाचा, लेखकांचा, ग्रंथांचा स्पष्ट उल्लेख आहे.
    पहिला दुवा -
    https://archive.org/stream/Mahabharat_201411/02_Sabhaa_Parva#page/n24/mode/1up
    इथे नारद युधिष्ठिराला सांगतो आहे, "शत्रूचा व आपला १ देश, २ दुर्ग, ३ रथ, ४ हत्ती, ५ अश्व, ६ शूर योद्धे, ७ देशपाल, ८ दुर्गपाल, व ९ सेनापती असे तीन अधिकारी १० अन्तःपुर, ११ अन्न, अश्व, रथ, व धनादी यांची संख्या, १२ जमा व खर्च, यांच्या निर्णयासाठी त्यांचे लेखन, १३ धन पुरेसे आहे कि अपुरे आहे, याचा विचार व मद्याप्रमाणे अपकार करणारे गुप्त शत्रु, यांचा नित्य विचार करावा."

    दुसरा दुवा -
    https://archive.org/stream/Mahabharat_201411/02_Sabhaa_Parva#page/n32/mode/1up
    इथे नारद युधिष्ठिराला विचारतो, "हे भूपते, आय व व्यय लिहिण्यासाठी नेमलेले तुझे सर्व गणक व लेखक प्रतीदिवशी पूर्वान्ही तुझा जमा-खर्च तुला निवेदन करितात ना?"

    तिसरा दुवा -
    https://archive.org/stream/Mahabharat_201411/02_Sabhaa_Parva#page/n33/mode/1up
    इथे नारद उपदेश करतो, "हे राजा, प्रत्येक गावामध्ये सत्कर्मे करणारे पाच पाच अधिकारी नेमावे. त्यातील १ सर्व ग्रामाचा प्रशास्ता, २ प्रजांपासून राजांशभूत द्रव्य वसूल करून ते सर्व राजाला पोचते करणारा समाहर्ता, ३ प्रजा व समहर्ता यांची एकवाक्यता घडवून आणणारा संविधाता, ४ लेखक ५ साक्षी."

    चौथा दुवा -
    https://archive.org/stream/Mahabharat_201411/02_Sabhaa_Parva#page/n37/mode/1up
    इथे नारद विचारतो, "हे प्रभो, तू हत्ती, घोडे, रथ इत्यादिकांचे लक्षण, परीक्षा, चिकित्सा, औषध, उद्दीपन, मादन, इत्यादिकांचे प्रतिपादन करणाऱ्या ग्रंथांतील सिद्धांतभूत सूत्राख्य संक्षिप्त वाक्यांचा त्या त्या शास्त्रज्ञ आचार्यांपासून संग्रह करितोस ना?"

    'घृत' म्हणजे काय?
    या प्रश्नाचेही उत्तर लोकपालसभाख्यानपर्वातल्या नारद युधिष्ठिर संवादात दिलेले आहे, त्याचा हा दुवा-
    https://archive.org/stream/Mahabharat_201411/02_Sabhaa_Parva#page/n36/mode/1up
    इथे नारद विचारतो, "कृषीपासून उत्पन्न झालेले आर्द्र व शुष्क धान्य, त्याचप्रमाणे गायीपासून उत्पन्न झालेले दुग्ध व घृत तू ब्राह्मणांना धर्मार्थ देतोस ना? कारण अन्न व घृत यालाच मधु व सर्पी असे म्हणतात. ते ब्राह्मणांचे प्रधान अन्न आहे."

    तसंच त्याकाळी अन्न म्हणून काय काय खाल्ले जात असे याचे उल्लेख ठिकठिकाणी केलेले आहेत. घरांचेही उल्लेख ठिकठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे मूळ महाभारत वाचणं अधिक रोचक ठरेल.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. प्रतिसादाबद्दल धन्यवाद. इरावतीबाईंचे लेखन हे बरेच जुने आहे. आणि इतिहासातील कोणतेच विधान तथ्य म्हणून करणे हे एकांगीपणाचे आणि अशा अभ्यासास आपण लायक नसल्याचेच सिद्ध करणारे असते. इतिहासातील प्रत्येक गोष्ट ही तपासणीच्या असो.

      तथ्यांबाबत बोलणे हा हेतूच नाही. शीर्षकात म्हटल्याप्रमाणे इतिहासाचा वेध कसा घ्यावा याचा वस्तुपाठ म्हणजे हा उतारा आहे. मुद्दा माझे बरोबर की तुझे बरोबर हा नसून ते ठरवण्यासाठी वापरलेल्या अप्रोचचा आहे, प्रसंगी 'याला पुरेसा पुरावा नाही' असं प्रामाणिकपणे प्रश्न अनुत्तरित ठेवण्याचा आहे. गल्लोगल्ली इतिहासतज्ज्ञ निर्माण होऊन शेंडाबुडखा नसलेली विधाने तथ्ये म्हणून खपवत आपले नि आपल्या समाजगटांचे हितसंबंध जोपासू पाहात असताना इतिहासाकडे कसे पहायला हवे हे दर्शविणारा आहे. काही जणांच्या धारणांना इरावतीबाईंच्या निष्कर्षांनी धक्का बसून त्याचा हिरिरीने प्रतिवाद होणार हे अपेक्षित आहेच. पण निष्कर्षापेक्षा मूल्यमापन पद्धती समोर आणणे हा हेतू आहे, तशी प्रस्तावना याच ब्लॉगच्या फेसबुक पेजवर विस्ताराने लिहिली आहे. शक्य झाल्यास वाचून पहा. इतके नोंदवून थांबतो.

      हटवा
    2. मी इतिहास-संशोधक नाही, व्हायची इच्छाही नाही आणि शक्य झाल्यास इतिहासात रुतलेल्या या देशाला - विशेषतः त्यातून क्रियाशून्य होत जाणार्‍या तरुण पिढीला - त्यातून बाहेर काढावे यासाठी या देशात इतिहास हा विषय शालेय पातळीवर शिकवूच नये असे माझे मत आहे. इतक्या लहान वयात त्यांना आपले आदर्श इतिहासात शोधायला शिकवून त्यांची जिज्ञासा नि विजिगिषा आपण मारतो. अमक्या श्रेष्ठीचे वंशज म्हणून मिरवता आले की आत्मसंतुष्ट होत क्रियाशून्य अथवा क्षुद्र मुद्द्यांवर नको इतके क्रियाशील होत जातात. इतिहासातून माणसे काही प्रेरणा वगैरे घेतात असे मला वाटत नाही. क्षुद्रांना श्रेष्ठ असल्याचा भास मात्र होत राहतो आणि वास्तवात श्रेष्ठ होण्याची त्यांची जिद्द जिरून, मरून जाते.असो.

      हटवा
    3. @ रमताराम - माझा हा प्रतिसाद प्रतिवाद करावा म्हणून दिलेला नाही. महाभारताची ती प्रत चाळतांना अगदी सहज इरावती कर्वेंच्या विधानाला छेद देणारे ते दुवे सापडले, म्हणून त्याबद्दलचं माझं निरीक्षण मी इथे नोंदवलं इतकंच! ज्या वाचकांना इरावती कर्वेंच्या लिखाणासोबत महाभारताची चिकित्सा करायची असेल, त्यांच्यासाठी ते दुवे आणि महाभारताची उपलब्ध प्रत पुस्तकाइतकेच रोचक ठरतील.

      इरावती कर्वे यांच्या युगान्त या पुस्तकाची ओळख करून देणाऱ्या ह्या वेच्याची निवड अगदी योग्य आहे. मला या वेच्यातली त्यांची काही निरीक्षणं पटतात, मात्र इतर काही निरीक्षणांना छेद देणारे महाभारतातले उतारेही आढळतात, म्हणूनच हा वेचा मला त्या दृष्टीने अधिक रोचक वाटतो. युगान्त हे पुस्तकही मी वाचलेलं आहे, म्हणूनच ज्यांना याबाबतीत अधिक रस असेल, त्यांनी महाभारत अवश्य वाचावे, असे मला वाटते. असो.

      इतिहासाबद्दलची तुमची मतं तुम्ही मांडली आहेत, पण कुतूहल ही माणसाची नैसर्गिक प्रेरणा आहे, त्यामुळे इतिहासाबद्दल कुतूहल वाटणे, भूतकाळात नेमके काय घडले असेल याचा वेध घेत राहणे, ह्या गोष्टी घडतच राहणार आणि जोपर्यंत ही नैसर्गिक प्रेरणा अबाधित आहे, तोपर्यंत माणसं इतिहासाबद्दल त्यांची स्वतःची अशी मतं बनवतच राहणार. असो.

      हटवा
    4. नक्कीच. मी ही प्रतिवाद म्हणून घेतलेला नाही, गैरसमज नसावा. प्रस्तावना फेसबुक पेजवर दिल्याने इथे ती भूमिका मांडली गेलेली नाही. म्हणून खुलासा केला आहे इतकेच. इरावतीबाईंच्या बर्‍याच दाव्यांचा प्रतिवाद झालेला आहेच. अर्थात त्या क्षेत्रातले तज्ज्ञच त्यावर अधिकाराने बोलू शकतील. माझा तो अधिकार नाही. या ब्लॉगचा उद्देश मुद्दे मांडणे नसून विविध प्रकारच्या लेखनाच्या वेच्यांमार्फत वाचकांना त्या त्या पुस्तकाच्या वाचनास उद्युक्त करावे इतका माफक आहे.

      हटवा