आरशावर चिमण्या फार गोंधळ घालतात. सुचू देत नाहीत अजिबात. घटकाभर डोळा लागला तरी त्यांच्या धिंगाण्याने जाग येते. पुन्हा खाली जमिनीवर हा एवढा कचरा सांडून ठेवतात तो वेगळाच!
मुलींनाही आरशाचे वेड फार. एकदाही इकडून तिकडे जाताना आरशात डोकावल्याशिवाय जाणार नाहीत. काही कारण नसताना. उगीचच! अभ्यास करायलाही आरशासमोर बसायलाच स्पर्धा.
मी या चिमण्यांच्या अन् पोरींच्या अनावर छंदामुळे वैतागून आरशावर एक जाडसर कापडाचा पडदा बांधून टाकला. काम असले की तेवढ्यापुरता कपडा बाजूला करायचा. एरवी पडद्याने आरसा झाकून टाकायचा, असा नियम करून टाकला. मी जातीने आरशावर नजर ठेवू लागलो. जरा उघडा दिसला की आठवणीने उठून स्वतः पडदा टाकू लागलो.
लहानपणापासून मला आरशाची चीड येते. त्याच्यामागे माणसे नादावू लागली की त्यांना खडबडून जागे करावेसे वाटते. पण अनुभव असा आहे की हीच येता जाता आरशात डोकावणारी माणसे मला उलट घाव घालतात. म्हणतात, मीच सत्याला भितो. मीच सत्यापासून पळतो आणि म्हणून आरसा टाळतो. म्हणणारांची तोंडे शिवणे शक्य नाही. पण मला मनातल्या मनात लोकांच्या या भूमिकेची गंमत वाटते. आरसा म्हणे सत्य दाखवतो, वा रे वा! आणि सत्य म्हणजे काय? तर जे आरशात दिसते ते, असा विधानव्यतिक्रम मी केला तर हे लोक पुन्हा मलाच वेड्यात काढणार! म्हणजे आरशात दिसते ते सत्य नव्हे पण आरसा मात्र सत्य दाखवितो- असा एखादा विलक्षण गडबडगुंडा नाही का तयार होत? महानुभावाध्ये होता तसा? पण आरशावर भरवसा ठेवणार्यांना हे कळत नाही. आरशासमोर उभे राहताच मला स्पष्ट दिसते की, माझे प्रतिबिंब म्हणून दिसणारा माणूस चक्क डाव्या हाताने केस विंचरतो. चमकून स्वतःकडे बघावे तर आपला उजवाच हात असतो. म्हणून मुद्दाम डावा डोळा मिचकावला तर आरशातल्याचा उजवा डोळा मिचकावला जातो. इतक्या धादांत खोटेपणाला सत्य म्हणतात? मला कळत नाही. प्रकाशाच्या नियमाप्रमाणे इकडचे प्रकाशकिरण तिकडे आणि तिकडचे इकडे जाणारे फुल्याफुल्यांचे आराखडे मी ही लहानपणी काढले आहेत. टेबलावर टाचण्या टोचून प्रतिमांचे परस्परसंबंध पडताळूनही बघितले आहेत. पण मग मला माझ्या डोळ्यांनी डोळ्यांनी जी प्रतिमा दिसते ती खोटी आणि विज्ञानाने सिद्ध करता येते ती खरी- ही आत्मवंचना नाही का होणार? मला आरशातील प्रतिमा चुकीची दिसते. मग मी नजरेवर मेंदूचे लगाम घालून खोट्याचे खरे का म्हणून मानावे? त्यापेक्षा माझ्या अंतर्विश्वातच दिसणारी प्रतिमा मला खरीखुरी वाटली तर त्यात बिघडले काय? कुणाला बुद्धीचे पंख आवडतात, कुणाला कल्पनेचे- एवढाच फरक नाही का? शेवटी जी समोर असते त्या प्रतिमेला काहीतरी आकलन लागतेच- बुद्धीचे म्हणा, कल्पनेचे म्हणा! मग बुद्धीचे भास तेवढे खरे आणि कल्पकतेचे भास तेवढे खोटे असा पंक्तिप्रपंच का? सत्याबाबात दुराग्रह निर्माण करणे बरे नव्हे. आरशात बघितल्यामुळे खोट्या गोष्टींवर विश्वास बसून दुराग्रह वाढीस लागतात. आणि अशी दुराग्रही माणसे इतरांना सत्याचे धडे देऊ लागली की मग अभावितपणे- Reality is the greatest fantasy of life - असे म्हणावेसे वाटते मला.
आरशाशी असा पूर्वापारचा दावा आहेच माझा. पण अलीकडे भोवताली सगळ्यांचे आरशाचे वेड मला इतके वाढीला लागलेले दिसते की, ही गोष्ट सहजासहजी झटकून मोकळे होता येत नाही. खरेच, माणसाला स्वतःची प्रतिमा वारंवार का बघावीशी वाटत असेल? या प्रश्नामागे मी पाठलाग करत जाऊ लागलो. कुठून हे वेड आले असावे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागलो. बुटाला चकचकीत पॉलिश करून त्यात डोकावून पाहणारी पोरे, भांडी व्हिमने घासून पालथी घालता घालता त्याच स्वतःचे प्रतिबिंब बघणार्या बायका, घडा बुडवण्यापूर्वी संथ तळ्याच्या पाण्यात डोकावून बघणार्या पोरीबाळी, मोटारीच्या खिडकीच्या काचेत मुद्दाम मान वळवून बघणारी माणसे, बुबुळातल्या प्रतिबिंबाचा ठाव घेणारे प्रेयसीचे डोळे- चोळीला, परकराला आरसे शिवण्याची पद्धत तर आहेच! पण परवा तर एका खट्याळ पोरीने नाकात खड्याच्या ऐवजी लहानशा आरशाचा तुकडा सोन्यात मढवून घेण्याची इच्छा बेधडक बोलून दाखविली मात्र; आणि मी तळामुळापासून हादरून निघालो. दुसर्याचे प्रतिबिंब आपल्यात शोधण्याची ही अनावर ओढ सृजनाच्या आदिम इच्छेचीच तर द्योतक नसेल ना, या विचाराने पिसाळून गेलो.
लहानपणी आमच्या घरासमोर एक कुंभारवाडा होता. अगदी समोर जे घर- म्हणजे लहानसे झोपडेच - होते, त्यात एक म्हातारा कुंभार आणि तितकीच जख्ख म्हातारी कुंभारीण राहायची. म्हातारीच्या अंगात देवी येत असे दर अमावास्या-पौर्णिमेला. म्हातारा दिवसभर गरगरत्या चाकावर लहानमोठी गाडगी, मडकी, पणत्या वगैरे करत असायचा. हातात मातीचा गोळा आला अन् चाक गरगरू लागले की म्हातार्याची तंद्री लागायची. म्हातारी एकटक त्याच्याकडे बघत राहायची. घरात तिसरे माणूस नव्हते. दोन पोरे होती ती मजुरी करायला शहरात निघून गेली. त्यांना या धंद्यात गोडी नव्हती. पण या वृद्ध जोडप्याला मात्र पोटापाण्यासाठी धंदा करीत राहणे भाग होते. म्हातार्याचे हात अजून समर्थ होते. अनुभव दांडगा होता. अख्ख्या कुंभारवाड्याचा आवा म्हातारा एकटा लावायचा. बाकीचे कुंभार झिलप्या, गोवर्या वगैरे वस्तू आणून द्यायचे. म्हातार्याचा आवा अगदी दृष्ट लागण्यासारखा असे. धुमसू लागला की अगदी एखादे देऊळ जळते आहे असे वाटे. आणि शांत झाला की आतली सगळी मडकी अगदी हवी तितकी खरपूस भाजून निघायची. एकही तडकायचे नाही की फुटायचे नाही. पण म्हातारी आता पुरती थकली होती. चिखल तुडवून माती तयार करण्याचे काम तिच्याने अजिबात होत नव्हते. फक्त अंगात देवी आली की दणादण नाचायची, बेभान व्हायची. मग दोन दिवस अंथरुणातून उठण्याची ताकद राहात नसे तिच्या अंगात. माती तयार नसली की म्हातार्याचा धंदा मार खाई. उपासमारीचा राक्षस डोळ्यांसमोर थैमान घालू लागे. अशा परिस्थिस्तीत म्हातारीला एकदा देवीने दृष्टांत दिला म्हणे! अन् त्या झटक्यात म्हातारीने नवर्याचे दुसरे लग्न लावून दिले. शेजारच्या खेड्यातली, पैशाने नडलेल्या बापाची कोवळी पोर नगद पैसे मोजून घरात आणली. लोक थक्क झाले. म्हातारीचे मन मोठे म्हणू लागले. म्हातारीच्या मनात गणित पक्के झाले होते, ते वेगळेच.
चवदा-पंधरा वर्षांची ती नवी नवरी लग्नाच्या तिसर्या दिवसापासून खड्ड्यात उतरून चिखल तुडवू लागली. पण त्या कामात तिचे मन रमेना. आठदहा दिवस तिने कसेतरी काढले आणि एक दिवस ती पहाटेच घरातून पळून गेली. म्हातारी चिडली. पण तिला माहीत होते- पोरगी पळून जाणार कुठे? तिच्या माहेराला जाऊन झिंज्या धरून म्हातारी तिला परत घेऊन आली, आणि मग हेच चक्र सुरु झाले. नवरी पळून जायची, म्हातारी तिला धरून आणायची. एक दिवस अधीच धरून आणायला सवतीच्या माहेरला जात असताना, रस्त्याच्या कडेला म्हातारीला आरशाचा एक फुटका तुकडा सापडला. चांगला मोठा, पण वाकडातिकडा. म्हातारी मग त्या दिवशी सवतीच्या माहेराला गेलीच नाही. घरी परत आली. शेणामातीचे गरगट करून तिने झोपडीच्या भिंतीत तो तुकडा नीट लिंपून टाकला. खड्ड्यात उतरली, तिथून बरोब्बर आरशात तोंड दिसते की नाही त्याची खात्री करून घेतली. पुन्हा वर येऊन आरसा जरा सरकवून योग्य जागी बसवला. दिवसभर उन्हात वाळून मातीत पक्का बसू दिला. दुसर्या दिवशी लहानग्या सवतीला घेऊन आली. म्हातारीचा होरा अगदी बरोबर होता. पोरगी आरशात बघण्याचा नादाने तासन् तास चिखल तुडवू लागली. कुंभाराचे चाक वेगाने गरगरु लागले. म्हातारी अवसे-पौर्णिमेला तुफान होऊन नाचू लागली. भरभरून खणा-नारळाच्या ओट्या घेऊ लागली. आठवडी बाजाराला गाडग्या-मडक्यांची चळत गाड्यांवर चढू लागली.
सवतीमत्सराचा तो अभिनव प्रकार पाहून मी तेव्हाही अस्वस्थ झालो होतो. पण त्यावेळी सगळे संदर्भ लागले नव्हते. आज आरशाच्या वेडाचा शोध घेता घेता अचानक संदर्भसूत्र हाती आले. अजाण जीव दर्पणमोहात इतके का हरवून जातात ते एकाएकी गवसल्यासारखे वाटते आहे आता. प्रतिमा अशाच तयार होतात, आरशातल्या आणि मनातल्याही. त्यांचे खरेखोटेपण खरेतर संपूर्णपणे सापेक्ष असते.
माणसांचे सर्वांत जास्त प्रेम स्वत:वरच असते. त्याला स्वतःची प्रतिमा बघावीशी वाटते ती ही स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्यासाठी आणि आपली प्रतिमा बघण्याचा सर्वांत सोपा मार्ग सापडतो आरशात. जे दिसते ते खरे की खोटे हा विचारही सुचू नये इतकी जबरदस्त असते ही आभासाची भूल... माणूस त्यात गुंततो. अस्तित्वाचा अर्थ शोधण्याचा वेध बाजूला पडतो आणि या माध्यमातच सर्वस्व अडकून पडते. फसून जाते. मुख्य म्हणजे आत्मवंचनेची जाणीवही मनाला शिवत नाही. फसवणुकीचा एवढासा संशयही येत नाही. पण काळ मात्र सर्व आभासांना कधीतरी चूड लावतोच. हाच आरसा आपली बदलती, अप्रिय परिवर्तने दाखवू लागला की वैरी वाटू लागतो. मग आपल्यापेक्षा वयाने लहान असणार्यांचे वेड पूर्णपणे लक्षात येते. अस्तित्वाच्या अर्थासाठी आपणास आरशाचा नाद लागतो; पण तो नाद सुटल्यानंतरच स्वतःची खरी प्रतिमा दिसू शकते. हे एकदा समजले की मग प्रतिमा-विभ्रमांच्या भूलभुलैय्याचे जगड्व्याळ खेळ प्रत्यक्षात दिसू लागतात- आरशात नव्हे. इथूनच सुरू होते मृगजळाचे बांधकाम...
पण हा सगळा प्रवास शेवटी स्वानुभवाचाच. आरशावर मीच लावलेला पडदा आता मीच कधीतरी काढून टाकणार आहे. कारण या भूलभुलैय्यातून गेल्याशिवाय मागे वळून त्याचे खरे स्वरूप पाहणे कुणालाच शक्य नाही. त्या भूलभुलैय्यातच कायमची अडकून पडणारीही काही माणसे असतात. पण कोणी एखादा त्यातून बाहेर पडलाच तर तो ही या आवर्तातून पिळवटून निघालेला असतो. भूलभुलैय्या हा अस्तित्व शोधाच्या मार्गावरचा अटळ टप्पा आहे. माणसाला तर सगळ्याच गोष्टींचा अर्थ हवा असतो. या अर्थवेडापायी कधी खरे, कधी खोटे, कधी भ्रामक, कधी फसवे अर्थ उरीपोटी जपले जातात. पण हे सारे अपरिहार्यपणे असेच व्हावे लागते. अर्थातीत प्रतिमेच्या दर्शनातून कधीतरी आत्मशोध होणारच असेल तर अगोदरचे सर्व टप्पे ओलांडणे भाग असते. भासचक्राची गती त्रयस्थपणे न्याहाळायची असेल तर, एकतर चक्राच्या बाहेर जावे लागते किंवा केंद्रबिंदूशी यावे लागते. तिथूनच दिसू शकते प्रतिमेची अर्थातीतता- अर्थाच्या अनर्थकारी वेडाला चूड लावणारी! काव्यभाषेच्या संदर्भात बोलावयाचे झाल्यास- It discards the poverty of language...
अनेकदा वाचूनही काही शब्द, काही प्रतिमा आपल्यापर्यंत पोहोचलेलेच नसतात, अर्थवेधाचा शाप उरावर असूनही या क्षणी- फक्त घटकाभरच- मला अखेर अल्बेर कामूच्या शब्दांची प्रचीती येते. आणि त्याच्या गळ्यात गळा घालून म्हणावेसे वाटते-
I still think that this world has no higher meaning. But I am also sure that something in it has meaning. This is man, for man alone in the universe insists upon having meaning.
- oOo -
पुस्तकः मितवा
लेखकः ग्रेस
प्रकाशकः पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती दुसरी, पुनर्मुद्रण (२०००)
पृ. ६२-६६.
---
संबंधित लेखन:
वेचताना... : मितवा >>
---
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा