रविवार, १७ जानेवारी, २०२१

वेचताना... : आर्त

जगभरातील संस्कृतींमध्ये कितीही वैविध्य असले, तरी त्यात पुरुषप्रधानता हा समान दोष आहे. तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि निसर्गापासून दुरावत गेलेल्या, तथाकथित प्रगत समाजांमध्ये ती अधिकच घट्ट झालेली दिसते. स्त्रीने जन्मत: बापाचे कुलनाम स्वीकारायचे आणि लग्नानंतर पतीचे हा प्रघात खूप प्राचीन आहे. अमेरिकेसारख्या तरुण आणि सर्वथा प्रगत राष्ट्रातही निदान जोडनाव लावण्याची पद्धत रूढ आहे.

हा पुरुषी वर्चस्वाचा संस्कार घरातील मुलांनाही वारशाने मिळावा, हे ओघाने आलेच. त्यातच घरच्या पुरुषाचे असलेले स्थान वारशाने मिळवण्याची पुढच्या पिढीची धडपड, घरच्या स्त्रीला अर्थातच मागे सारून घरच्या पुरुषाशी नाळ जोडू पाहात असते. ’मूल आईचे की बापाचे?’ या प्रश्नाला ’फळ बीजाचे की क्षेत्राचे?’ या पर्यायी प्रश्नाशी समानार्थी मानत मूळ प्रश्नाचे निर्णायक उत्तर या समाजव्यवस्थांनी देऊन, तो प्रश्न आता रद्दबातल ठरवला आहे.

श्री. ना. पेंडसेंच्या ’रथचक्र’मध्ये कर्तृत्वशून्य नवर्‍यामुळे मोठ्या कुटुंबात सदैव अवहेलना आणि दुय्यम स्थान सहन करत, अनेक पातळ्यांवरचा संघर्ष करत, लक्षुंबाई आपल्या दोनही मुलांच्या प्रगतीची वाट सुकर करत जाते. परंतु घरची जबाबदारी सोडून संन्यासी होण्यासाठी परागंदा झालेला नवरा जेव्हा भगवी छाटी घालून परत येतो, तेव्हा त्याचे सामाजिक स्थान आणि अर्थात बीज-बांधिलकी यातून मुले आईपेक्षाही बापालाच अधिक धार्जिणी होताना दिसतात. बापाच्या आध्यात्मिक स्थानातून मिळणार्‍या सामाजिक मानाचा वारस म्हणून आपला वाटा घेणे मातृऋणांहून अधिक श्रेयस्कर मानतात.

महेश मांजरेकरांच्या ’अस्तित्व’मध्येही अदिती पंडितचा मुलगा, आपले जन्मरहस्य जाणूनही, जैविक नसलेल्या आपल्या पित्यालाच धार्जिणा होत आईचा अधिक्षेप करतो. कारण या नामधारी बापाचे सामाजिक-आर्थिक स्थान त्याला अधिक सुरक्षित आयुष्य देऊ करते आहे. त्या तुलनेत त्याची आर्थिकदृष्ट्या परावलंबी असलेली आई, तिचे स्वत्व जाणून त्याला मान देणारा आणि तिला समजून घेणारा, पण सामाजिक-आर्थिक ताकद नसलेला त्याचा जैविक बाप, हे दोघे अजिबातच उपयुक्त ठरणारे नाहीत...

आई म्हणून, गुरू म्हणून आयुष्याची पहिली वीस वर्षे ज्या आईने घडवले तिला दूर सारत, बापाचा सांगीतिक वारसा मिळवण्याची धडपड करणारा, मोनिका गजेंद्रगडकर यांच्या ’जन्म’ या कथेमधला सत्यजित बापाचे आध्यात्मिक मान, सामाजिक-आर्थिक स्थान वारशाने मिळवू पाहणार्‍या या पुढच्या पिढीचाच एक भाग दिसतो.

आर्त

पण वरील दोन उदाहरणांतील पुढच्या पिढीसमोर असलेल्या परिस्थितीपेक्षा थोड्या अधिक व्यामिश्र परिस्थितीचा तो सामना करतो आहे. याचे कारण वरील दोन उदाहरणांमध्ये आई-वडिलांची कार्यक्षेत्रे म्हणा अथवा मुलांच्या जीवनातील स्थान म्हणा, हे सर्वस्वी वेगळे आहे. त्यांत सामायिकता नाही. पण सत्यजितची अम्मा ही आई आहे तशीच एक प्रथितयश वादक आहे, त्याला घडवणारी गुरु आहे. जाणकार रसिकांच्या मनात अव्वल स्थान असले, तरीही प्रसिद्धी पराङ्मुख आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावर जाहीर कार्यक्रमांना तिलांजली देत केवळ गुरु हे स्थान स्वीकारून व्रतस्थ झालेली आहे.

त्याउलट वडील श्रोत्यांमधला प्रेक्षकही ओळखून आहेत. प्रसंगी कलेची बांधिलकी दुय्यम मानत ’प्लेईंग टु द गॅलरी’चे तत्त्व वापरत प्रसिद्धीचा झोत चोखपणे आपल्यावर राखणारे आहेत. कलेचे संस्कार अम्माकडून घेतलेल्या सत्यजितला वडिलांचे हे सामाजिक स्थान खुणावते आहे. ते वारशाने आपल्याला मिळावे अशी त्याची इच्छा आहे., ’नाथांचा मुलगाही त्यांच्याइतकाच उत्तम वादक आहे.’ असे उद्गार त्याला ऐकायचे आहेत.

व्रतस्थ कलासाधना आणि कलेचा बाजार मांडून मिळवलेले मान-सन्मान व आर्थिक स्थैर्य यात त्याला निवड करायची आहे. ही निवड केवळ कलेच्या दोन दृष्टिकोनांतली तर आहेच, पण जगात माणसाच्या सर्वात जिवाभावाच्या असणार्‍या दोन व्यक्तींमध्येही - आई नि वडील - करायची आहे. या निवडीचा ताण त्याच्यावर येतो आहे. नकार आणि स्वीकाराच्या या ताणांमध्ये खेचला जाऊन तो विरत विरत जातो आहे.

ही कथा वाचत असताना मला राहून राहून प्रसिद्ध सूरबहारवादक विदुषी अन्नपूर्णा देवी आणि आणि त्यांचे पती, प्रसिद्ध सतारवादक पं. रविशंकर यांची आठवण होत होती. आणि ही कथा त्यांच्याच जीवनावर बेतलेली असावी असं वाटत होतं. थोडा शोध घेता तो तर्क खरा आहे असे दिसून आले.

अन्नपूर्णादेवी यांनी सूरबहार हे घुमारेदार आवाज असलेले आणि गतीपेक्षा ठहराव/विस्तार याला अनुकूल असलेले वाद्य निवडले. पण त्यांचे वडील बाबा अल्लाऊद्दिन खाँ हे मैहर घराण्याचे प्रसिद्ध सरोदिये. गजेंद्रगडकर यांनी त्यांचे हे वाद्य अन्नपूर्णादेवी ऊर्फ अम्मा यांच्या हाती दिले आहे. (जे प्रत्यक्षात त्यांचे बंधू अली अकबर खान यांनी स्वीकारले.) सूरबहार या वाद्याच्या प्रकृतीबरोबरच वारशाने मिळालेली धृपद अंगाची शैली अन्नपूर्णादेवींनी स्वीकारली. तर बाबांचे शिष्य असलेले पं. रविशंकर यांनी ख्यालगायकीची बढत करण्यास अधिक उपयुक्त अशी सतार स्वीकारली.

रविशंकर यांच्यापासून दूर झाल्यानंतर अन्नपूर्णादेवींनी सार्वजनिक कार्यक्रमातून निवृत्ती घेतली आणि केवळ गुरुचीच भूमिका स्वीकारली. पं. निखिल बॅनर्जी, कार्तिककुमार, इन्द्रनील भट्टाचार्य यांच्यासारखे सतारवादक, भाचा आशिष खान (अली अकबर खाँ यांचा मुलगा) सारखा सरोदवादक आणि पं. हरिप्रसाद चौरासिया तसंच नित्यानंद हळदीपूर यांच्यासारखे प्रख्यात बासरीवादक यांसारखे शिष्य घडवले.

जाताजाता एक रोचक नोंद करुन ठेवायला हवी. धृपद ही पारंपरिक हिंदुस्तानी गायकी, प्रामुख्याने देवळांतून, ईशस्तुतीच्या स्वरुपात गायली जाणारी. याउलट याच गायकीच्या चार अंगांपैकी दोनच अंगे स्वीकारून मुस्लिम गायक-नायकांनी अधिक लवचिक अशा ख्यालगायकीचा विकास केला. एक मुस्लिम स्त्री धृपदाशी बांधिलकी राखून प्रसिद्धीच्या बाजारापासून दूर राहते आहे, तर मुस्लिम गायकांनी रूढ केलेली गायकी रविशंकरांसारखा एक हिंदू स्वीकारून पुढे जातो आहे. इथे दारव्हेकरांच्या ’कट्यार काळजात घुसली’ची आठवण होते. त्यातील अल्ताफ हुसेन खाँ बरेलीवाले आणि पं. भानुशंकर यांच्यातील स्पर्धा खरेतर या दोन गायकींमधलीच आहे. (पुढे त्याच नावाच्या चित्रपटात त्याला सद्यस्थितीत बोकाळलेल्या बटबटीत हिंदू-मुस्लिम संघर्ष स्वरुपात सादर करुन त्याची पुरी माती केली गेली.)

’जन्म’ या कथेमधील सत्यजित हे पात्र या दांपत्याचा मुलगा शुभेंद्र -शुभो- शंकर याच्यावर बेतलेले आहे. आयुष्याचा सुरुवातीचा काही काळ आईकडूनच गुरु म्हणून तालीम घेतल्यानंतर त्याला वडिलांची कीर्ती नि वारसा खुणावू लागला. रविशंकरांच्या आमंत्रणावरुन तो तडकाफडकी अमेरिकेला त्यांच्याकडे निघून गेला. पुढे त्यांच्यासोबत काही कार्यक्रमही केले. पण सतत वडिलांच्या छायेत राहिल्याने त्याचे स्वतंत्र असे स्थान निर्माणच होऊ शकले नाही. या दरम्यान तब्बल वीस वर्षे त्याने आईशी संपर्क ठेवला नव्हता असे म्हटले जाते.

पुढे वीस वर्षांनी भारतात परतल्यानंतर इथे आपले स्थान निर्माण करण्यात त्याला अपयश आले. पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात पं. रविशंकर यांच्यासोबत वादन करत असताना त्याचे वादन अनेकदा बेसूर झाल्याची टीका झाली. त्यानंतर त्याने कलेपासून संन्यास घेतला. पुढे अल्पशा आजाराने वयाच्या पन्नाशीतच त्याचा मृत्यू झाला. मोठ्या झाडाच्या सावलीत खुरटलेले झाड अखेरीस वठून गेले.

कथेतील इथे निवडलेला उतारा हा या पार्श्वभूमीला तर समोर ठेवतोच, पण त्याचबरोबर सत्यजितची दुभंग मानसिकता उलगडत जातो. जिथे असतो ते नकोसे होते, आणि जे प्राप्य ते साध्य झाल्यावर जे सोडून आलो त्यातील गमावलेल्या संचिताची खंत उफाळून येणे हे दोनही टोकांवर सत्यजित अनुभवत राहातो. वारशाने मिळालेल्या दोन तेजांमधले कोणते स्वीकारावे हा अत्यंत अवघड निर्णय घेत असताना, ती जबाबदारी न पेलून काळवंडत जातो.

- oOo -

‘आर्त’ या पुस्तकातील एक वेचा: प्रत्यय


अन्नपूर्णादेवींबद्द्ल अधिक वाचनासाठी:
१. https://en.wikipedia.org/wiki/Annapurna_Devi
२. https://thewire.in/the-arts/annapurna-devi-the-timeless-legendary-guru
३. https://www.thehindu.com/entertainment/music/remembering-guru-ma-annapurna-devi/article32803151.ece
४. https://scroll.in/article/898174/how-annapurna-devi-withdrew-from-public-performances-because-of-a-jealous-ravi-shankar


संबंधित लेखन

1 टिप्पणी:

  1. ‘आर्त’ बद्दल बोलताना इतर लेखकांच्या लेखनाचे, सिनेमाचे धागे येणं, घट्ट परंपरांचा त्यामागचा अर्थ लावून थोडं गहिर्‍या रंगात वाचकाला बघायला सांगणं या तुझ्या शैलीमुळं हा लेख खूप आवडला. तुझं सगळंच लेखन ‘तेवढ्यापुरतं’ करून थांबत नाही.

    उत्तर द्याहटवा