( काही दिवसांपूर्वी अनिल बर्वेंच्या ’थँक यू, मिस्टर ग्लाड’वर लिहित होतो. दोन व्यक्तिंमधील मनोबलाच्या संघर्षाबद्दल लिहित असताना पुलंच्या ’एक झुंज वार्याशी’ची आठवण झाली. डॉ. देशमुख आणि माणूस यांच्यात अशाच स्वरूपाचा संघर्ष त्यात रंगवला गेला आहे.
परंतु ’...ग्लाड’च्या तुलनेत तो अधिक महत्वाचा आहे, कारण त्याला केवळ दोन व्यक्तींमधील संघर्ष एवढेच महत्व नाही, त्यामागे असलेला नैतिकतेचा पेच आणि त्याकडे दोन दृष्टीकोनातून पाहणारे दोघे असा तो संघर्ष आहे. त्यामुळे ’...ग्लाड’बद्दल लिहिताना संदर्भापुरते उघडलेल्या त्या पुस्तकाने ’...ग्लाड’ला मागे सारून ’वेचित...’ वर आधी स्थान मिळवले आहे. )
’हशिवनारा बाबा’ असा शिक्का मारून उच्चनासिकान्यायाने अर्वाचीन स्वयंघोषित श्रेष्ठ साहित्यिकांनी बाद केलेल्या पुलंच्या नाटकांबद्दल फारसे बोलले जात नसले, तरी नाट्यस्पर्धांमधून ’सदू आणि दादू’, ’एक झुंज वार्याशी’ सारखी त्यांची नाटके वारंवार सादर केली जातात. मागे कुण्या दिग्दर्शकाने - बहुधा चंद्रकांत कुलकर्णी - त्यांच्या अतिरेकाबद्दल वैतागही व्यक्त केला होता. त्यातले ’तुझे आहे तुजपाशी’ वगळता बहुतेक सारी परदेशी रूपांतरित नाटके आहेत, किंवा कथाबीज तिकडून उसने आणलेले आहे हे कदाचित त्याचे कारण असावे.
’एक झुंज वार्याशी’ या नाटकाची ओळख झाली ती पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक राज्य नाट्य स्पर्धा वा किंवा तत्सम नाट्यस्पर्धेत. त्या काळात त्यातील ’माणूस’ या व्यवस्थेविरोधात उभ्या राहिलेल्या माणसाच्या व्यक्तिमत्वामुळे प्रभावित झालो होतो. पुढे महाविद्यालयीन वयातला आदर्शवाद आणि प्रमाथी प्रवृत्तीची जागा हळूहळू विचारांनी घेतल्यावर मंत्री म्हणजे भ्रष्ट, माणूस म्हणजे चांगला, चित्रा ही शोषित, डॉ. चौधरी म्हणजे लबाड माणूस ही विभागणी मला पटेनाशी झाली. आणि मी त्याकडे अधिक चिकित्सकपणे पाहायला सुरुवात केली.
या नाटकाकडे दोन प्रकारे पाहू शकतो. पहिले म्हणजे तो एक प्रकारचा कोर्टरूम ड्रामा आहे. खरोखरीचे कोर्ट नसले तरी एक घटना आहे, तिचा निवाडा करणे चालू आहे. कुणी एक आरोपी आहे, कुणी एक त्याच्यावर आरोप करतो आहे. पुरावे आणि तर्कांचे वाग्बाण भिरकावले जात आहेत. आणि त्या आरोप-प्रत्यारोपांच्या, पेच-डावपेचांच्या साठमारीतून मूळ मुद्द्याची आपल्या सोयीने तड लावण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
दुसरा दृष्टीकोन माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि तो म्हणजे या नाटकातील मुख्य पात्र म्हणजे ’माणूस’ ही आरोपीची- म्हणजे उपमंत्री डॉ. देशमुखांची सदसद्विवेकबुद्धीच आहे ! याला पुष्टी देणारा नाटकातील भाग म्हणजे त्याने उपमंत्र्यांकडे राजीनामा देण्याची केलेली मागणी.
जी घटना घडली आहे, ज्या आधारे ’माणूस’ देशमुखांवर आरोपांच्या फैरी झाडतो आहे, ते आरोप खरेतर ’मंत्री’ देशमुखांवर नव्हे, तर ’डॉ. देशमुखांवर’ आहेत. त्यामुळे ’माणूस’ हा जर स्वतंत्र व्यक्ती असता, तर त्याने कायदेशीर शिक्षेची मागणी करायला हवी. पण तो ’आजच्या’ देशमुखांची सदसद्विवेकबुद्धी आहे, म्हणूनच त्याच्या दृष्टीने सर्वात मोठे प्रायश्चित्त म्हणजे काय तर आजच्या स्थानापासून- मंत्रिपदावरून पायउतार होणे.
दुसर्या अंकाच्या अखेरीस ’माणूस’ जेव्हा देशमुखांना नैतिक पातळीवरुन आव्हान देतो, जाब विचारतो तेव्हा तो प्रसंग जणू देशमुखांनी स्वत:ची झाडाझडती घेतल्यासारखा, स्वत:च स्वत:ला confront केल्यासारखा भासतो. माझ्या या तर्काला थोडा आधार नाटकाच्या शेवटाकडे सापडतो.
डॉ. देशमुख माणसाला म्हणतात, ’घटकेत तुम्ही तपासणी करणार्याची भूमिका घेता, लगेच न्यायाधीश होता; एकदम बदनामीची धमकी देता आणि आता एकाएकी माझ्या सदसद्विवेकबुद्धीशी एकरूप होता... तुम्ही काय स्वत:ला प्रत्येकाची सदसद्विवेकबुद्धी मानता की स्वत:ला सगळ्यांच्या वरचा न्यायाधीश समजता ?’ डॉ. देशमुख स्वत:च आत्मपरीक्षणाच्या मानसिक स्थितीमध्ये आहेत असे मानले, तर बदनामीची धमकी ही वास्तविक त्यांच्या मनातील भीतीचेच रूप आहे.
हे उपमंत्री डॉ. देशमुख लोकशाही व्यवस्थेतील प्रगतीची शिडी सापडलेलं, व्यवहारी, पण तरीही संवेदनशील... किंवा संवेदना न हरवलेलं, अस्सल मध्यमवर्गीय जाणिवेचे व्यक्तिमत्व आहे. काही व्यक्ती यशाच्या मागे धावत असतानाही त्याची धुंदी त्यांना पुरी वेढत नाही. आपण जे मागे सोडून आलो त्याची बोच त्यांच्यासोबत असते. त्यांना प्रगती करायची आहे, पण त्यासाठी विधिनिषेध खुंटीला टांगणारा ’फास्ट ट्रॅक’ निवडतानाही नैतिकतेचे पेच अथवा वेढे त्यांच्याभोवती कायम असतात. नियमबाह्य वर्तन करताना ते कच खातात. मग त्यासाठी ते इतरांना - प्रामुख्याने स्वीय सहाय्यक डॉ. चौधरी यांना- मध्ये घालतात. हे साधारणपणे राजकारणी धोरणच झाले. अगदी ढोबळ निवाडा करायचा म्हटले तर ’तोबर्याला पुढं नि लगामाला मागं’ अशी वृत्ती असलेलं. सारे नाट्य उभे आहे ते त्याच्यामधील प्रगतीचा वारु आणि नैतिकतेच्या लगामातील संघर्षामुळे.
त्यांना आव्हान द्यायला आलेल्या ’माणसा’लाही हे पक्के ठाऊक आहे. नियमाच्या चौकटीत राहून वा कायदेशीररित्या डॉ. देशमुखांना काही धक्का लावू शकत नाही हे उमगले आहे. म्हणून तो सतत त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीला, संवेदनेला आव्हान देतो आहे. त्यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यापेक्षाही त्यांच्याकडून कबुलीजबाब मिळवण्याच्या दृष्टीने त्याची पावले पडत आहेत. त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीची टोचणी त्यांच्या व्यवहारीपणाच्या दबावाला झुगारून बाहेर यावी असा त्याचा प्रयत्न आहे.
हा 'माणूस' कितीही निस्वार्थी असला, तरी सर्वथा बरोबर वा बिनचूक आहेच असे म्हणता येणार नाही. शांतपणे बोलत असला, तरी याचा अर्थ तो विचारी आहे असे नाही. अनेकदा तो तर्कसंगती सोडून उसळून येतो, आरोप करतो. डॉक्टर आपण आरोग्यकेंद्राची आपण केलेली भरभराट वर्णन करुन सांगतात, खात्री करुन घेण्यासाठी तेथील कर्मचार्यांशी बोला म्हणतात, तेव्हा तो त्यांच्यावर ’तडजोड करण्याचे सुचवत असल्याचा’ आरोप करतो. वास्तविक ’तुम्ही आरोग्यकेंद्राची कितीही भरभराट केलीत तरी त्या यामुळे तुमच्या शस्त्रक्रिया न करण्याने जे जीव गेले ते परत येत नाहीत.’ असे काहीसे तर्कसंगत प्रत्युत्तर देणे त्याला शक्य होते. पण तो प्रत्युत्तराऐवजी प्रत्यारोप करतो.
पुढे डॉक्टर त्याला 'एकाच व्यक्तीमध्ये गुण-दोष दोन्ही असतात, केवळ दोषच पाहात राहिलं तर आपणच काय ते निर्दोष आहोत असा भास होतो' असा सांगताच, ’मला काय करायचंय त्याच्याशी, मी काही उपमंत्री नाही.’ असे ताडकन बोलून तो तोडून टाकतो. वास्तविक डॉक्टरांचा मुद्दा वाजवी असतो. ज्याला निर्णय घ्यावा लागतो त्यालाच तो चुकल्याचे प्रायश्चित्तही स्वीकारावे लागते. निवाड्यास बसणार्या कृतिशून्य व्यक्तीस तो धोका कधीच नसतो१. या ठिकाणी माणूस उणा पडतो.
डॉक्टर हा ही माणूस असतो, तो त्याच्या बुद्धीच्या मर्यादेत निर्णय घेत असतो. तो निर्णय इतर कुणाच्या कृतीने चूकही ठरू शकतो, तसा तो बरोबरही ठरू शकतो. केवळ चुकीच्या ठरलेल्या निर्णयाकडेच बोट दाखवून त्याला खोडून करुन टाकणे योग्य नव्हे. त्याच्या निर्णयावर त्याच्या कुवतीचा, स्वार्थाचा, दृष्टीकोनाचा व आजवरच्या अनुभवाचा प्रभाव पडत असतोच. त्यात निर्णय आणि परिणाम यात कार्यकारणभावाची साखळी दाखवता येत असेल, तरच त्याबाबत निवाडा शक्य आहे. आणि निवाडाही त्या एका निर्णयापुरता असायला हवा.
एखाद्याचा अवघड क्षणीचा एक निर्णय योग्य ठरला म्हणजे त्याला बावनकशी ठरवणे आणि एक निर्णय चुकला की त्याला बेजबाबदार वा नालायक म्हणून त्याला खोडून टाकणे, हे दोनही टोकाचे निवाडे आहेत. निष्कर्षाची व्याप्ती अनाठायी वाढवणारे, आणि म्हणून सर्वस्वी चुकीचे आहेत.
डॉ. देशमुखांनी पेंडसेंवर शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय स्वार्थी आहेच. परंतु त्यातून गुन्हा घडल्याची कार्यकारणभावाची साखळी दाखवता येत नाही. त्यांचा मृत्यू झाला असता, तरीदेखील डॉ. देशमुखांना त्याबद्दल जबाबदार धरणे सोपे नव्हते. कारण मुळात ती शस्त्रक्रिया झाली असती, तर त्यांचा जीव वाचण्याची शक्यता किती टक्के होती हे, वस्तुनिष्ठपणे नाही, तरी पर्यायी वैद्यकीय तज्ज्ञांच्या हवाल्याने सिद्ध मांडणे आवश्यक होते. त्यात पेंडसेंचा जीव डॉ. कृष्णमूर्तींमुळे वाचल्यावर (किंवा त्यांचे मरण थोडे लांबल्यावर म्हणू) डॉ. देशमुखांच्या संदर्भात प्रत्यक्ष गुन्हा म्हणावे असे काहीच शिल्लक राहात नाही.
राहता राहिला प्रश्न वाठारकरच्या लेखाचा. तर तो लेख प्रसिद्ध होऊ न दिल्याचे पाप नि:संशयपणे डॉक्टरद्वयींचे आहेच. पण ते ही गुन्हा म्हणावा असे नाही. केवळ तेवढ्याच कारणाने वाठारकरसारखा एखादा माणूस- कितीही संवेदनशील वा हळवा असला तरी, दारूच्या आहारी जातो हे तर्कसंगत वाटत नाही. एखादा सार्वजनिक हिताचा विरोधात जाणारा मोठा भ्रष्टाचार किंवा एखाद्या मोठ्या अधिकारी व्यक्तीने केलेला एखादा गुन्हा असता, तर त्या गुन्हे-उकलीला खूप महत्व होते. आणि त्यानंतर लेख प्रसिद्ध होऊ न शकल्याने ते सारे कष्ट वाया जाऊन वैफल्य आले, तर येणारी व्यसनाधीनता समजण्याजोगी आहे.
कदाचित ’डॉक्टरांच्या त्या निर्णयांमुळे इतके जीव गेले’ असा टोकाचा समज करुन घेऊन तो वैफल्याच्या आहारी गेला असेल. असा समज करुन घेण्यामध्ये माणसे ’वाचू शकली असती’ आणि ’वाचली असती’ यातला फरक न समजण्याची चूक त्याने केली आहे. 'जगण्याची धूसर शक्यता असणारी माणसे दगावली' आणि 'जगू शकली असती अशी माणसे दगावली' या दोन गृहितकांमध्ये फरक आहे. (आणि महत्वाचे म्हणजे ही दोनही केवळ गृहितकेच आहेत.)
डॉ. देशमुखांचे वैद्यकीय ज्ञान पाहता पहिली शक्यता त्यांनी वर्तवली आहे. वाठारकर तिच्या ऐवजी दुसरी शक्यता गृहित धरत असेल, तरच त्याचे वैफल्य समजण्याजोगे आहे. पण डॉक्टरांचे वैद्यकीय ज्ञान आणि वाठारकरचे वैद्यकीय ज्ञान(?) तसंच पर्यायी मताची अनुपलब्धता याचा विचार करता यात समजुतीचा दोष त्याच्यावर येतो हे विसरता कामा नये.
केवळ एका व्यक्तीच्या तथाकथित गुन्ह्याचा- खरंतर स्वार्थी, फारफार तर अनैतिक वर्तनाचा भांडाफोड करणारा लेख वाठारकरने इतका महत्वाचा मानावा, यातच त्याचा अतिआदर्शवादी, अव्यवहारी दृष्टीकोन दिसतो. कदाचित उलट दिशेने डॉ. चौधरी सूचित करतात तसे त्यातून डॉ. देशमुखांना ब्लॅकमेल करण्याचा हेतूही असू शकतो. 'डॉक्टरांनी न केलेल्या शस्त्रक्रिया केल्या असत्या, तर काही प्राण वाचले असते' हा तर्क, ही शक्यता आपण गृहित धरणार असू, तर ही दुसरी शक्यताही आपण का गृहित धरु नये?
डॉ. देशमुख हे राजकारणी असल्याने त्यांच्याबद्दलची नकारात्मक शक्यता जमेस धरायची नि वाठारकर मात्र पवित्र पत्रकार असल्याचे गृहित धरुन त्याच्यावरचे डॉ. चौधरींचे आरोप मात्र बिनबुडाचे मानायचे, असा एकतर्फी निवाडा निदान आपल्याला करता येणार नाही. वाठारकर सहृदयी, सज्जन वगैरे आहे हे आपल्याला आणि माणसालाही फक्त चित्राच्या मार्फतच समजते आहे, आणि ती त्याची पत्नी आहे हे विसरुन चालणार नाही.
एका डॉक्टरने केवळ केलेली पेशंट- निवड हा वरकरणी मोठा गुन्हा नाही. परंतु त्यातून एक शक्यता उभी राहते, ती म्हणजे त्याने शस्त्रक्रिया करण्याचे नाकारल्यानंतर मृत झालेले रुग्ण शस्त्रक्रिया केली असती तर वाचले असते का? आणि हाच कळीचा प्रश्न आहे.
या प्रश्नाचे नेमके उत्तर देणे कठीण आहे. कारण मुळात वैद्यकीय व्यवसाय करणारे आपल्या ज्ञान नि अनुभवाच्या आधारे रुग्णांचे आरोग्य-निदान करत असतात. त्यात अनेकदा ’फार दिवस उरले नाहीत. यांना घरी न्या आणि सर्व नातेवाईकांची आणि प्रिय व्यक्तींची भेट घडू द्या.’ असे डॉक्टर सांगतो, तेव्हा तो त्याचा निवाडा असतो. रुग्णाला, त्याच्या नातेवाईकांना ’सेकंड ओपिनियन' घेण्याचा अधिकार वापरता येतोच.
अन्य डॉक्टरने वा अन्य उपचारपद्धतीने कदाचित त्या रुग्णाचे आजार बरे होतील/त्याचे आयुष्य लांबेलही. पण तसेच घडेल असे ठामपणे सांगणेही शक्य नसते. याच डॉक्टरने सांगितले तसेच वागले पाहिजे असे बंधन कुणी घातलेले नसते. अनेक रुग्णांना हा पर्याय नसतो हे खरे, विशेषत: सरकारी रुग्णालयात उपचार घेणार्या गरीबांना. परंतु जगण्यातील ही अनिश्चितता कायम राहतेच.
पेंडसेंचा जीव कृष्णमूर्तींनी वाचवला म्हणजे त्यांनी अन्य नाकारलेल्या रुग्णांचेही जीव वाचवले असतेच, आणि त्यांची वाचवले असते म्हणजे ती शस्त्रक्रिया करणार्या डॉ. देशमुखांनीही वाचवलेच असते असे तर्क देता येत नसतात. हां, त्यांचे जीव वाचण्याची शक्यता सद्यस्थितीतील शून्य शक्यतेहून किंचित अधिक राहिली असती हे मान्य करावे लागेल.
पण शस्त्रक्रिया करणे याचा रुग्ण आणि रुग्ण नातेवाईकांसाठी आर्थिक बाजूचा भुर्दंड विसरता येत नाही. 'माणसाच्या जिवाची किंमत करता येत नाही' हे कितीही आकर्षक वाक्य असले तरी उपचाराचा खर्च न परवडणार्याला हा आदर्शवाद कामी येत नाही. निदानाची गंभीरता लक्षात घेता शस्त्रक्रियेदरम्यान किंवा त्यानंतर अल्पकाळात मृत्यू ही शक्यताही जमेस धरायला हवी. आणि ती प्रत्यक्षात उतरली असता रुग्ण गमावण्यासोबतच मागे राहिल्यांची आर्थिक स्थिती रुग्णाईत होण्याचा धोका उद्भवतो...
अर्थात हे सारे तर्क डॉ. देशमुखांचे नसले, त्यांची भूमिका त्यांच्या लक्ष्याला अनुसरून असली तरी त्यांना गुन्हेगार घोषित करण्यापूर्वी ध्यानात घ्यावेत लागतात. त्यांचे वर्तन अनैतिक होते असा एकतर्फी निवाडा देता येईल, तो केवळ नैतिकतेच्या नि वैय्यक्तिक पातळीवरचा राहील. जर मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, एक ठोस कृती करावी अशी अपेक्षा 'माणूस’ करत असेल तर त्यामागे ठोस गुन्हाही सिद्ध करावा लागेल. आणि वरील शक्यतांची सरमिसळ पाहता ते अवघड काम दिसते. आणि बहुधा हेच हेरून माणूस निवाड्यापेक्षाही कबुलीजबाब घेण्यावर अधिक भर देतो आहे.
शेवटी डॉक्टरही उपलब्ध वैद्यकीय ज्ञान आणि वैयक्तिक कुवत याच्याआधारेच निदान करत असतो. काहीतरी एक निश्चित सत्य आहे नि डॉक्टर ते शोधून काढतो असे नसतेच. निदान आणि उकल यात हा महत्वाचा फरक असतो. आजाराचे निदान हे लक्षणांच्या नि उपकरणांच्या आधारे केलेले असते. विशिष्ट शारीरिक स्थितीला आजाराचे नावही माणसांनीच दिलेले असते. सहा दिवसांच्या विश्वनिर्मितीनंतर देवबाप्पाने रविवारी सुटी घेतली आणि पुढच्या सोमवारी ताजेतवाने होऊन कामाला लागत विषमज्वर नावाचा आजार करेक्टं नि परफेक्टं लक्षणांसह जन्माला घातला... असे नसते.
विविध लक्षणांचे मोजमाप करत डॉक्टरला निदान नि निवाडा करावा लागतो. आणि मोजमापातले फरक नि निष्कर्षातील आक्रमकता वा मवाळपणा या भूमिकांतून निदान नि उपचार ठरत जातात. हे खरे नि ते खोटे, हा डॉक्टर देवदूत नि बाकीचे सगळे पैशाच्या मागे लागलेले सैतान, आम्ही स्वीकारलेली उपचारपद्धती देवदत्त नि इतर सर्व चुकीच्या... या कल्पना बाळबोधच नव्हे तर अज्ञानमूलक नि खोट्या असतात. जग काळ्या-गोर्याने विभागलेले नसते. या दोन रंगांच्या मधल्या अनेक छटांचा तो पुरा वर्णपट असतो. त्या सर्वच छटांसह माणसाला जगावे लागत असते. हेच विधान डॉक्टरांच्या निदानालाही लागू पडत असते.
डॉ. कृष्णमूर्तीच्या मते ’अखेरचा उपाय म्हणून शस्त्रक्रिया करुन पाहावीच’ असे असेल आणि डॉ. देशमुखांचे मत ’रुग्ण वाचण्याची संभाव्यता नगण्य असल्यामुळे शस्त्रक्रिया करु नये’ असे धोरण असेल तर तो दृष्टीकोनातला फरक आहे. दोन्ही निर्णयांच्या आधारे केलेली कृती योग्य वा अयोग्य ठरू शकतेच.
पहिल्या दृष्टिकोनात जीव वाचण्याबरोबरच विफल शस्त्रक्रियेची (आणि त्यातून त्या पेशंटच्या वारसांची आर्थिक स्थिती विनाकारण घसरण्याची) शक्यता राहते; तर दुसर्यामध्ये वारसांवर पडणारा संभाव्य आर्थिक भार टळतो, पण त्याचबरोबर जीव वाचण्याची शक्यता नगण्य होऊन जाते.
शक्यताविज्ञानामध्ये (Statistics) या दोन प्रकारच्या संभाव्य चुकांच्या अदमासाला महत्व आहे. या दोनही चुका एकाच वेळी शून्य करता येत नसतात. 'एकीला कमी करायला जावे तर, दुसरी वाढते' असे त्यांचे परस्परविरोधी नाते असते. बहुसंख्य माणसे यातील स्वत:ला सोयीची शक्यता हे सत्य नि दुसरी शक्यता ही चूक म्हणून गृहित धरुन वागत असतात, नि त्या चुकीला कुणाला तरी जबाबदार धरण्याचा प्रयत्न करत असतात.
डॉक्टरांसमोरच नव्हे तर बहुतेक तुम्हा-आम्हां सर्वांसमोरच निर्णयांच्या क्षणी अशा परस्परविरोधी शक्यता उभ्या असतात. आपली सारासारविवेकबुद्धी, बाह्य माहिती, विश्लेषण या आधारे त्या विशिष्ट निर्णयाप्रसंगी त्यातील एकीला कमी गंभीर ठरवतो नि तिच्याशी निगडित निर्णय घेत असतो. आणि तो निर्णय पुढे बरोबर ठरला, तरी तिची पर्यायी शक्यता अस्तित्वातच नव्हती असे म्हणता येत नसते. शक्यता अनेक असतात, वास्तव त्यापैकी काही शक्यता सोडून उभे राहात असते. पण समस्या ही की वास्तवाचा जन्मच मुळी एक सोडून सर्व शक्यतांचे विसर्जन झाल्यावर होत असतो. त्यामुळे विचारशून्य साक्षीदार असलेले त्याला एकमेव सत्य समजण्याची चूक करत असतात.
पंचाईत ही की आपण शक्यतांच्या भाषेत विचार करत नाही, केला तरी तो तसा करतो आहोत हे आपल्या ध्यानात येत नाही. ’कोणती शक्यता कमी धोक्याची?’ याचा विचार करत असताना, ’कोणता निर्णय बरोबर नि कोणता चूक?’ याचा विचार आपण करत आहोत असा आपला समज असतो. या दोन प्रश्नांना एकच समजण्याची गफलत आपण सारेच करत असतो. स्वत:बाबत ही अवस्था असताना डॉक्टरसारख्या समोरील व्यक्तीबाबत आपण शक्यतांचा विचार करु हे अजिबातच संभवत नसते.
एक मुद्दा मात्र नि:संशयपणे डॉ. देशमुखांच्या विरोधात जातो आणि तो म्हणजे त्यांचे हे धोरण स्वार्थानुकूल म्हणून स्वीकारलेले आहे,. आपल्या यशाची टक्केवारी वाढण्याच्या दृष्टीने आखलेले आहे. प्रसिद्ध महाविद्यालये वा कोचिंग क्लासेस आधीच भरपूर गुण असलेल्यांना प्रवेश देतात नि पुढच्या परीक्षेतील त्यांच्या यशाला आपले यश म्हणून मिरवतात तसे. एका बाजूने हा व्यवहार आहे म्हणता येऊ शकते, पण जिथे माणसाच्या जिवाचा प्रश्न येतो तेव्हा इतके वस्तुनिष्ठ राहणे शक्य होत नसते.
पण तरीही डॉ. देशमुख वा डॉ. चौधरी यांच्या व्यावहारिक भूमिकेलाही सर्वस्वी नाकारता येत नाही. औषधे, साधनसामुग्रीची वानवा असलेले, रडतखडत चालू असलेले रुग्णालय भरभराटीला आणण्यासाठी त्यांनी एक मार्ग निवडला. ज्यात संख्याबळाच्या आधारे डॉ. देशमुखांचे डॉक्टर म्हणून श्रेष्ठत्व सिद्ध करुन शासनाचे लक्ष वेधून घेणे, आणि एकदा ते साध्य झाले की त्या प्रसिद्धीच्या आधारे रुग्णालयाला आवश्यक आर्थिक बळ मिळवणे.
या दोघांनी निवडलेला हा मार्ग यशस्वी ठरला आहे. आणि त्यातून अद्ययावत झालेल्या रुग्णालयाने आणखी काही रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. त्यासाठी त्यांनी शस्त्रक्रिया नाकारलेल्या रुग्णांचे बळी गेले आहेत, जे कदाचित- कदाचितच! - वाचू शकले असते. पण याचबरोबर रुग्णालयाच्या तुटवड्याच्या स्थितीत जे वाचले नसते, असे अनेकांचे प्राण अद्ययावत झालेल्या रुग्णालयाने वाचवले आहेत. थोडक्यात व्यावहारिक पातळीवर हिशोब जमा-खर्चाचा आहे. आणि पुढे डॉ. देशमुखांची झालेली प्रगती पाहता तो ताळेबंद शिलकीचा असावा असा तर्क करता येतो.
यात मेल्या माणसांना केवळ एक एकक म्हणून मानण्याचे निर्मम, हिशोबी धोरण आहे. किंबहुना माणसाच्या जिवाबाबत नैतिकता आणि संख्याबळ यांच्यात निवड करणे हा अतिशय सनातन प्रश्न आहे. आणि त्यात कोणत्याही एका बाजूने कौल दिला तरी तो चुकीचाच भासत राहतो. (या नैतिकतेच्या प्रश्नाभोवती डॉ फिलिपा फूट या ब्रिटिश तत्वज्ञाने ट्रॉली प्रॉब्लेमची आखणी केली आहे. त्याचा उहापोह इथे ’ट्रॉली प्रॉब्लेम, गेम, द गुड प्लेस आणि नैतिकतेचे प्रश्न’ या लेखामध्ये केलेला आहे.)
या नाटकात निवाड्यापेक्षाही परस्परांवर केलेले डावपेच, त्यात प्रसंगी bluff म्हणजे बतावणीचा केलेला वापर अधिक रोचक आहेत. डॉ. चौधरी हा महत्त्वाकांक्षी, बेरकी माणूस आहे. नाटक मी जेव्हा जेव्हा वाचले तेव्हा मला तो जाळ्यात अडकलेल्या माशीभोवती धूर्तपणे जाळे विणणार्या कोळ्यासारखा दिसला होता. वास्तव ठाऊक असूनही ’थांबा मी पेंडसेला फोन करतो.’ म्हणत केलेली बतावणी असो की ’माणूस’ अखेर निघून गेल्यावर, या सार्या नाट्याचा कणभरही परिणाम मनावर शिल्लक राहू न देता, ताबडतोब उद्याच्या शेड्युलची चर्चा मंत्र्यांशी करु लागणे असो. ही दोन त्याच्या निर्लिप्त धूर्तपणाची उत्तम उदाहरणे आहेत.
त्याला आपण वृत्तीने डॉक्टर नाही तर मॅनेजर, व्यवस्थापक प्रवृत्तीचे आहोत हे पक्के ठाऊक आहे. त्याने स्वत:ला जसे अचूक ओळखले आहे, तसेच डॉ. देशमुखांच्या कचखाऊ महत्वाकांक्षेलाही. त्यामुळे त्याने एक प्रकारे त्यांना खांद्यावर घेऊन वाटचाल केली आहे. एका अर्थी देशमुखांना त्याने ’गुळाचा गणपती’ करुन ठेवले आहेत. त्यांच्या प्रगतीचा मार्ग त्यानेच आखला आहे. त्या मार्गावर आवश्यक त्या तडजोडी निर्ममपणे, प्रसंगी निष्ठुरपणेही केल्या आहेत आणि देशमुखांनाही करण्यास भाग पाडले आहे. देशमुख हे त्याचा मुखवटा आहेत किंवा प्रगतीची शिडी. देशमुखांच्या त्या शिडीवर एक पायरी मागे असला, तरी त्यांच्या सोबत तो ही वर वर चढत जातोच आहे.
'माणूस' कितीही निस्वार्थी असला, तत्वनिष्ठ असला तरी ती तत्वनिष्ठाच त्याच्या कार्यास अखेरीस मारक ठरते. आपण समुदायाच्या हितासाठी एका व्यक्तीच्या हिताकडे दुर्लक्ष केले असा दावा करणार्या डॉ. चौधरींना माणूस ’जोवर तुम्ही माणसाचे हित पाहात नाही, तोवर समुदायाच्या हिताची भाषा गैरलागू आहे’ असे बजावतो... आणि तिथेच त्याची माघार निश्चित होते.
कारण नेमक्या याच कारणासाठी- पेंडसेंचा जीव वाचावा म्हणून, वाठारकरने माघार घेतली होती, आणि त्याच कारणासाठी माणूसही माघार घेतो, त्याला घ्यावीच लागते. त्याच्याच तर्काचा फास त्याच्या गळ्यात अडकवून डॉ. चौधरी आपली सुटका करून घेतात.
माणसे जीवितहानीबाबत आपली संवेदनशीलता कित्ती कित्ती तीव्र आहे हे दाखवण्याचा आटापिटा करत असतात.(अपवाद फक्त ’त्यांच्या’ गटातील जिवांचा. तिथे बालके मारली तरी समर्थनीय असते. कारण ती मोठी होऊन दहशतवादीच होणार असतात, किंवा झोपडपट्टीत राहून घाण करुण पवित्र देशाच्या प्रगतीला खीळ घालणार असतात, किंवा लायकी नसताना सरकारी पैसा वा नोकरी लाटणार असतात... म्हणे.) त्यामुळे डॉक्टर हा पैसा ओढण्यासाठीच बसलेला असतो, बेफिकीर असतो, त्यांच्या चुकीनेच माणसांचे जीव जातात या घट्ट गृहितकावर जगणार्या बहुसंख्येचा समाज या लेखातील डॉक्टरांची भूमिका समजून घेण्याच्या प्रयत्नाला भयंकर पाप वगैरे समजण्याची शक्यताच अधिक आहे. शक्यतांच्या जगात केवळ बरोबर-चूक या समजुतींवर जगणार्यांकडून याहून वेगळी अपेक्षाही ठेवता येत नाही.
- oOo -
१. नेमका हाच मुद्दा नैतिक राजकारणाच्या मृगजळाचे पेगच्या पेग रिचवत सत्ताकारणाला नाके मुरडणार्यांबद्दल मी मांडत आलो आहे. सत्ता राबवताना येणार्या मर्यादा नि बंधने बाहेर बसून नैतिकतेच्या जपमाळा ओढणार्यांना नसतात. चूक न करण्याची खात्री फक्त कृती न करणारेच देऊ शकतात. गंमत म्हणजे कृती न करणे हीच अनेकदा मोठी चूक असू शकते हे त्यांच्या ध्यानात येत नसते.
ता.क. : नाटकाचे पुस्तक हाती असेल तर त्याला लेखक-दिग्दर्शक वामन केंद्रे यांनी लिहिलेली प्रस्तावना आवर्जून वाचावी.
---
’एक झुंज वार्याशी’ या नाटकातील एक वेचा: ओळख