शनिवार, १० एप्रिल, २०२१

एक शेंडीवाल्या पोरीची गोष्ट

काही काळापूर्वी गंमत म्हणून ’द बिग बँग थिअरी’मधील एक मजेशीर प्रसंगाचा व्हिडिओ मी शेअर केला होता. आणि ती गंमत उलगडून पाहता पाहता शेल्डनच्या त्यातील सपशेल पराभवाची मीमांसा करण्याकडे झुकलो. ते वाचून एक मैत्रिण म्हणाली, ’तुला हसून सोडून देता येत नाही का? इतका कशाला विचार करायचा.’ थोडा विचार केल्यावर(!) लक्षात आले की यात तथ्य आहे. वेचित...’ वर काहीही शेअर करताना मूल्यमापन हे नेहमीच आस्वादावर स्वार होते आहे.

'स्वधर्मे निधनं श्रेय:’ वगैरे खरे असले तर स्वधर्म नक्की कुठला हे ठरायचे असल्याने ’जे भावेल ते वेचेन’ असा बाणा ठेवला आहे. त्यामुळे मग अगदी टॉम अ‍ॅंड जेरी यांच्या लुटुपुटूच्या लढायांपासून रॅटटुईमधल्या रेमीच्या जिद्दीपर्यंत, बिग बॅंग थिअरीमध्ये कालप्रवासातून निर्माण झालेल्या व्याकरणविषयक समस्येपासून ’द गुड प्लेस’मधे त्याच कालप्रवाहाच्या केलेल्या गंमतीशीर विडंबनापर्यंत काहीही डोक्यात रुजत जात असते. काही वेळा ते विचारात पाडणारे असते, काही वेळा ते खळखळून हसवणारे असते तर काहीवेळा त्यातील निरागसता आश्वस्त करुन जाते.

लहान मुलांच्या आसपास वावरणे हे तणावमुक्त (काही पोट्ट्यांच्या आईवडिलांचा अपवाद) राहण्याचा रामबाण उपाय आहे. एखादं पिल्लू ऐटीत स्टाईलने चाललेलं पाहून हसू फुटतं, दोन पोनीटेल घालून आपल्या इटुकल्या फ्रॉकमध्ये गिरक्या घेणारी एखादी छोटी पाहून एक छानसा गालगुच्चा घ्यायची इच्छा होते, जेमतेम बसू लागलेलं एखादं पोट्टं आपल्या तळहातावरच्या रेषा कुतूहलाने न्याहाळत असताना काय विचार करत असेल असा प्रश्न डोक्यात येतो. एखाद्या सामान्य घरातलं चार-पाच वर्षांचं पोरगं इवलिशी छाती फुगवून ’शीवाजी म्हाराजांची गोष्टं’ सांगताना पाहून हे बाळ असंच लहान राहावं नि मोठं होऊन महाराजांच्या नावावर चाललेल्या राजकारणाचा नि अस्मितेच्या बाजाराचा भाग होऊ नये अशी तीव्र इच्छा निर्माण होते. 

पण या पलिकडे मला सर्वात लक्षवेधी वाटते एक पोनीटेल, तीही पाठीमागे नाही तर डोक्याच्या वर बांधलेली छोटुकली पिल्ली. अशीच एक पिल्ली मला नुकतीच एका चलच्चित्रपटात सापडली. स्क्रीनवरुनच तिचा छानपैकी गालगुच्चा घेऊन टाकला.

हा व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला एक आगाऊ मूल आणि उद्धट मूल यातील फरक पाहता येईल. ही जी वेनेलोपी आहे ती अत्यंत आगाऊ मुलगी आहे. बिचार्‍या राल्फला प्रश्न विचारून ती भंडावून सोडते आहे. पण यात कुठेही त्याचा अपमान करण्याचा तिचा हेतू नाही की निर्हेतुकपणेही तसे तिच्याकडून घडत नाही. तिच्या त्या आगाऊपणाच्याच मी प्रेमात पडलो... आणि अर्थातच ती ’एक शेंडीवाली’ मुलगी असल्यामुळेही.

हा जो राल्फ आहे तो त्याच्या गेममधला विध्वंसक, आणि म्हणून खलनायक आहे. इमारती पाडणे, उध्वस्त करणे, निदान त्यांची मोडतोड करणे हे त्याचे काम. फीलिक्स हा त्यातील गुड बॉय. त्याच्या मदतीने या पाडलेल्या, मोडलेल्या इमारती खेळाडूंनी पुन्हा बांधून काढायच्या असा हा खेळ. प्रत्येक टप्पा यशस्वीपणे पार केला की या ’फिक्स-इट’ फीलिक्सला (आणि पर्यायाने तो खेळ खेळणार्‍याला) एक मेडल मिळते. असे टप्पे पार करत खेळ पुढे सरकत राहतो. (यावरुन कुठल्याशा विनोदी लेखनात वाचलेले वाक्य आठवते- ’आणि लेखक-दिग्दर्शक त्याच्या बाजूला असल्याने हीरोने व्हिलनचा पाडाव केला.’)

पण राल्फलाही आता मेडल हवे आहे. त्याला एकट्यालाच उकिरड्यावर राहावे लागते हे त्याला पटत नाही. त्यालाही इतर पात्रांबरोबर इमारतीमधील घरात राहायचे आहे. यातून तो ते मेडल मिळवण्याच्या मागे लागतो नि त्या खटपटीत आपला गेम (खेळ) सोडून भलत्याच गेममध्ये प्रवेश करतो. आणि तिथे ही Vanellope von Schweetz अर्थात ’साखरगावची पोरगी’ त्याला भेटते.

तिची स्वत:चीही एक समस्या आहे. ही छोटी ’शुगर रश’ या सर्वस्वी साखरेच्या बनलेल्या जगातील कार रेसमध्ये भाग घेऊन ती जिंकायची जिद्द बाळगून आहे. पण तिच्या प्रोग्राममध्ये काही बिघाड झाल्याने अधूनमधून तिच्याबाबतीत काही अनपेक्षित घडत असते. या बिघाडामुळे सारा गेमच बिघडल्याची समजूत झाली, तर तो कायमचा बंद केला जाईल नि त्यातील सर्वच पात्रे ’बेरोजगार’ होतील अशी भीती तिथल्या राजाला आहे. आणि म्हणून वेनेलोपीला तो ’ग्लिच’ म्हणजे बिघाड असेच म्हणतो नि तिला शर्यतीमध्ये भाग घेण्यास मनाई करत असतो.

त्यामुळे स्वत:साठी एक उत्तम रेस कार- अर्थात साखरेपासून, तयार करुन ती शर्यत जिंकायचीच असा तिने निर्धार केला आहे. आणि आपल्या मेडलच्या शोधात तिच्या त्या गेममध्ये येऊन धडकलेल्या राल्फशी ती ’युती’ (किंवा ’आघाडी’ म्हणा, काय फरक पडतो. :) ) करते आहे.

आता हे दोघे उत्साहाने कामाला लागतात. दोघे मिळून तिच्या शर्यतीसाठी एक फर्स्टक्लास मोटार बनवतात. वेनेलोपी खुश होते. आणि एक छानसे मेडल बनवून एखाद्या राणीच्या थाटात राल्फला प्रदान करते.

पण साखरगावचा राजा फार सावध आहे. ग्लिच ऊर्फ वेनेलोपीने रेसमध्ये भाग घेणे म्हणजे त्या बिघाडाला खेळाडूसमोर ठेवण्यासारखे आहे. यातून पुरा गेमच बंद केला जाऊ शकतो नि यातून इतर पात्रांबरोबरच खुद्द वेनेलोपीचा अवतारही संपुष्टात येईल हे तो राल्फला पटवून देतो. त्याचबरोबर राल्फचे हरवलेले मेडलही तो सदिच्छेखातर त्याला देऊन टाकतो. 

एकवेळ तिने शर्यत जिंकली नाही तरी चालेल पण तिचे अस्तित्व संपुष्टात यायला नको, अशा साधकबाधक विचाराने राल्फ तिला स्पर्धेत भाग घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो. ती ऐकत नाही असे दिसताच आपल्या विध्वंसकाच्या भूमिकेला जागून स्वत:च्या हाताने तिची मोटार नष्ट करतो.

आयुष्यभराचे(!) स्वप्न हातातोंडाशी येऊन हिरावून घेतले गेलेली वेनेलोपीचे आक्रंदन पाहणार्‍याला अंतर्बाह्य हादरवून जाते. काही सेकंदापूर्वी पटलेली राल्फची कारणमीमांसा आता फोल वाटू लागते. कदाचित ती शर्यत जिंकणे हीच तिच्या आयुष्याची इतिकर्तव्यता असेल. मग मूर्तिमंत बिघाड म्हणून आपल्या गुहेत राहणार्‍यापुरतेच अस्तित्व उरलेल्या वेनेलोपीपेक्षा शर्यत जिंकून नष्ट झालेली वेनेलोपीच अधिक आपली भासू लागते...

उरलेली गोष्ट मी सांगणार नाही, तसा या पोस्टचा उद्देशही नाही. एक शेंडीवाल्या पोरीला समोर ठेवणे एवढाच माझा हेतू आहे. तिची जिद्द समजली, धडपड उमगली, आपले स्वप्न डोळ्यासमोर उध्वस्त होताना पाहण्यातले वैफल्य जाणवले तरी खूप झाले.

'रेक इट राल्फ’ या चित्रपटाचे पोस्टर पाहिले तेव्हा त्यातील खांद्यापेक्षा मोठ्या मुठी असलेला राल्फ पाहून हे प्रकरण त्या ’बिग ६’ सारख्या कंटाळवाण्या सुपरहीरोंच्या रांगेतलं असणार असा समज करुन घेऊन सोडून दिले होते. पण एकदा मी पाहात असलेली विचारप्रधान मालिका संपली आणि आंतरपीक म्हणून कार्टुनकडे वळलो. तेव्हा हा चित्रपट पाहिला. आणि एक सुखद धक्का बसला. राल्फ हा आपण समजलो तसा सुपरहीरोही नाही आणि सुपरविलनही नाही हे लक्षात आले. रॅटटुईमध्ये डिस्ने स्टुडिओजनी एक अर्वाचीन पंचतंत्रकथा सांगितली होती तशीच राल्फ आणि त्याची ही छोटी मैत्रिण वेनेलोपी यांच्या संदर्भात सांगितलेली आहे.

वर म्हटल्याप्रमाणे त्यातील तात्विक बाजूबद्दल मी इथे बोलणार नाही. फक्त अंगुलिनिर्देश करुन ठेवतो. राल्फ हे एका व्हिडिओ गेममधील पात्र. त्याचे काम त्याला गेमकर्त्याने नेमून दिले आहे. त्याहून वेगळे त्याला काही करता येत नाही. मानवी नियतीवादावरचे हे भाष्य आहे. पुढची कथा एकप्रकारे समाजव्यवस्थेने दाबून ठेवलेल्या, दुय्यम नागरिक म्हणून ठेचलेल्या व्यक्तिची संघर्षकथा आहे, तर वेनेलोपी ही न्याय्य हक्क डावलल्या गेलेल्या व्यक्तिचे प्रतिरूप आहे. राल्फ वरचा अन्याय हा व्यवस्थांतर्गत आहे तर वेनेलोपीचा व्यवस्था वेठीस धरणार्‍या व्यक्तींकडून, नियमांची चौकट धुडकावून केला गेलेला. पण इतके पुरे.

- oOo -

१. मला पेनेलोपी हे नाव माहित होते. पण वेनेलोपी हे नाव माझ्या कधी कानावर पडलेले नाही. थोडा शोध घेता ते पेनेलोपीचे अपभ्रंश (ग्लिच?) रूप आहे असे वाचण्यात आले. एका ठिकाणी अमेरिकेन बोलीभाषेत वेनेलोपीचा अर्थच कॅंडी (चॉकलेट्स किंवा एकुणच चघण्याळजोगे साखरपदार्थ) असा आहे, असा उल्लेख सापडला. परंतु तो कार्यकारणभाव नेमका उलट असावा असं मला वाटतं. या साखरगावच्या मुलीमुळेच तो आता रूढ झाला असावा.

२. Schwitz या मूळ जर्मन शब्दाचा अर्थ आहे 'घाम'. पण इथे Schweetz स्पेलिंगमध्ये 'i' ऐवजी ee आहे. त्यामुळे तो शब्द Sweat ऐवजी Sweetशी नाते सांगतो आहे. von या जर्मन शब्दाचा अर्थही इंग्रजीच्या from किंवा of सारखा आहे. त्यामुळे तिचे नाव Penellope von Schweetz म्हणजे ’साखरगावची वेनेलोपी’ असे आहे.

---

जाताजाता:

वर शेअर केलेल्या पहिल्या व्हिडिओत त्या छोटीचे हावभाव आणि तिचा आवाज याचे कमालीचे एकरुपत्व पाहून मी प्रभावित झालो होतो. त्यामुळॆ या पोरीचा आवाज कुणाचा आहे याचे कुतूहल होते. यू-ट्यूब अशा प्रश्नांची उत्तरे फार चटकन देते. सारा सिल्वरमनचा वेनेलोपीसाठी डबिंग करतानाचा एक व्हिडिओच सापडला. प्रत्यक्ष स्टुडिओतले डबिंग आणि चित्रपटातील तो प्रसंग असे दोन व्हिडिओ पाठोपाठ पाहण्यासाठी इथे शेअर करतो आहे.




संबंधित लेखन

1 टिप्पणी: