मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

ओळख

माणूस : ठीक आहे. मी तुम्हांला आता प्रामाणिकपणानं सांगतो. इथे येताना मी वाईटातल्या वाईट परिणामाला तयार होतो. पण आपल्या चर्चेमुळं मला खूप समाधान वाटलं. मी तुम्हांला बोलायला भाग पाडलं, एवढंच नव्हे तर सौदाही करायला लावला. आता मला केव्हाही इथून निघून जाता येईल. मला कोण दोष देणार ? मी ? वाठारकर ? चित्रा ? तुम्ही ? डॉक्टर चौधरी तर आनंदाने उड्या मारतील. पण माझ्या हिशेबी ते नसल्यासारखेच आहेत. एखाद्या मेलेल्या माणसासारखे आहेत ते मला—

डॉ० चौधरी: (हसतो. ) होय ! ठार मेलेला !

माणूस : ( तिथे लक्ष न देता) पण डॉक्टरसाहेब, तुम्ही तुम्ही निराळे आहात. आता फक्त तुम्ही आणि मीच. मी इथून गेल्यावर तुम्ही गाडी नाही बोलावणार. तुमच्या ह्या स्वीय सहकाऱ्यांना घरी जायला सांगणार आणि एकटेच इथे राहणार.

डॉ० चौधरी : मला कंटाळा आलाय ह्या बडबडीचा !

[ बाथरूमच्या दिशेने जातो. ]

एक झुंज वार्‍याशी

माणूस : (चौधरींच्या बोलण्याकडे लक्ष न देता ) आणि मग तुम्हांला मनःशांती लाभणार नाही. तुम्ही उदास व्हाल. स्वतःवरच चिडाल— तोंडात एक विचित्र चव आल्यासारखं वाटेल तुम्हांला. तुम्ही स्वतःलाच विचाराल, हे काय झालं ? हा कोण होता ? मला गुन्हेगार ठरवायला आला होता ? माझा आत्मा हिरावून न्यायला आला होता ? तो म्हणजे ज्या काळात मी एक उपाशीपोटी शिकणारा पण अत्यंत निर्मळ मनाचा कॉलेजविद्यार्थी होतो तो मी तर नव्हता तो ? पण मग मी त्याला लाथ मारून बाहेर कां हाकलला ? मी त्याला असं कां नाही म्हटलं, 'मिनिटभर थांब. तुझ्याशी मला बोलायचं आहे. न जाणो, तू योग्य वेळीही आला असशील...

डॉ० चौधरी : मी मेलेला असेन; पण मी वेडा नाही.

डॉ० देशमुख : ( कपाळावरच्या उंचवट्यावर बोटांनी रगडीत) एखादा पसरत जाणारा पुरळ एकदम उठावा तसं काहीतरी घटकेत इथे होतं. घटकेत इथे सरकतंय... सगळं काही चुकलंय असंच मला वाटायला लागलंय... सगळं काही चुकलंय... एकदम टेंपरेचर वाढतंय, एकदम उतरतंय... पण माझं मलाच त्याचं निदान करता येईनासं झालंय.

[ स्तब्धता. ]

तुमची ओळखच पटत नाही आहे मला— तुमची.

माणूस : माझी ?

डॉ० देशमुख : होय, तुमची! घटकेत तुम्ही तपासणी करणाऱ्याची भूमिका घेता, लगेच न्यायाधीश होता; एकदम बदनामीची धमकी देता आणि आता एकाएकी माझ्या सदसद्विवेकबुद्धीशी एकरूप होता. आहे काय हे ? आता माझ्या आत्म्याचीच काळजी वाटायला लागलीय तुम्हाला तुम्हाला ह्या गोष्टी करायला लावण्यामागली प्रेरकशक्ती कुठली ? प्लीज, सांगाल का मला ? दुसऱ्याच्या भानगडीत कशासाठी म्हणून तुम्ही पडता ? तो वाठारकर, आमचं केंद्र, माझं स्थान, माझा आत्मा— ह्यात तुम्हाला पडायचं काय कारण ? तुम्ही काय स्वतःला प्रत्येकाची सदसद्विवेकबुद्धी मानता, की स्वतःला सगळ्यांच्या वरचा न्यायाधीश समजता ?

माणूस : समजा, तुमच्याकडे चौकशीखात्याचा खराखुरा अधिकारी आला तर हाच प्रश्न त्याला विचाराल ? तुम्ही त्याच्या हेतूबद्दलसुद्धा शंका घेणार नाही. का ? केवळ त्याला ते काम करण्याबद्दल पगार मिळतो म्हणून ? पण मी हाच कायदा उचलून धरतोय... तीच मूल्यं...

डॉ० देशमुख : पण कुणीही अधिकार दिला नसताना तुम्ही कशासाठी ह्यात पडता ? तुम्हांला ही विकतची श्राद्धं घ्यायला कोणी सांगितलंय ? सरकार आहे. सार्वजनिक संस्था आहेत. तुम्ही त्यांच्यापाशी गेला असता तर मी समजू शकलो असतो. पुष्कळ लोक लेखी तक्रारी नोंदवतात. पण यापूर्वी कधी कोणी असा एखाद्या वेड्याच्या चिकाटीने एकट्याने उभा राहिलेला— जणू काय आपला दुसरा धंदा असल्यासारखा राबताना पाहिला नव्हता !

डॉ० चौधरी: एखाद्या अर्धवेळ दलालासारखा...

[ स्तब्धता. ]

माणूस : (निर्धाराने ) ठीक आहे. आता त्याचं काय म्हणा ! दलाल म्हणे ! मला दुसरा व्यवसाय नाही. एकच व्यवसाय आहे. मी मोडल्यातोडल्या वस्तू पुन्हा जशाच्या तशा करून द्यायच्या व्यवसायात आहे. मी म्यूझियमच्या अडगळ ठेवायच्या खोलीत माझा वेळ घालवतो. काजळी चढलेल्या मूर्तीचे चेहरे पुन्हा स्वच्छ करून देतो. कधी कधी एखादी बाई येते. मला चित्र दाखवते. म्हणते, अहो, हे किती जुनं असेल ? काय किंमत येईल ? तिला वाटतं, ते गेल्या शतकाबितकातलं आहे. पण ते त्या बाईच्याच वयाचं असतं. त्याला फारशी किंमत येण्यासारखी नसते. डोळे भरून येतात बिचारीचे. (दरवाजाकडे बोट दाखवीत ) तिला पाहिलंत तुम्ही. डोक सुन्न झालंय तिचं.

डॉ० देशमुख : पण हे सगळं प्रकरण आपल्या अंगावर घ्यायची काय गरज होती तुम्हाला ?

माणूस : मी का नाही घ्यायचं ? ह्या जगात आपण काय दुसरे लोक जे पिकवतात तेच खायला आलोय का ? आपण स्वतः झाडं लावून त्यांची फळं का नाही खायची ? माझ्या कानावर सतत एकच पडत असतं : प्रयत्नान्ती परमेश्वर. यश हे प्रत्येक माणसाच्या प्रयत्नावर अवलंबून असतं. दुष्ट प्रवृत्तीशी झगडा करा. आपलं सामर्थ्य कशात आहे ते पाहत जा. आपली सारी शक्ती दुसऱ्यासाठी अर्पण करा. प्रत्येकाने हे केलंच पाहिजे. प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे. हे सारखं ऐकू येत असतं मला— रेडियोवरून, वर्तमानपत्रांतून, टेलिव्हिजनवरून... कदाचित मी स्वप्नात वावरत असेन... पण तुमचं काय ? तुम्ही नाही हे वाचलंत ? तुम्ही नाही ऐकलंत ? तुम्ही स्वतः नाही हे कधी सांगितलंत ?

डॉ० देशमुख : (आश्चर्याने ) तुम्ही हे सगळं गंभीरपणाने बोलताय...

माणूस : म्हणजे ? ह्या शब्दांनी तुम्हांला हसू फुटलं का ?

डॉ० देशमुख : तुम्ही कृपा करून माझ्या बोलण्यातल्या शब्दाशब्दाची आणि वागण्याची अशी चिरफाड करायचं आधी बंद करा बघू. मी तुम्हांला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय.

माणूस : त्या शब्दांवर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही ह्या खुर्चीवर बसलातच कसे ?

डॉ० देशमुख : हे पहा, तुम्ही एक बुद्धिमान गृहस्थ आहात. मग तुम्ही... मग तुम्ही प्रत्येक गोष्ट अशी शब्दशः खरी मानून का वागता ?

माणूस : मग कशी मानून वागायला पाहिजे ? तुम्हीच सांगा.

डॉ० देशमुख : हे पहा... मला नाही ठाऊक. पण प्रत्येक माणूस घोषणा खऱ्या करण्यासाठी धावत सुटलाय अस वाटतंय तुम्हाला? प्रत्येक माणूस— (पुढले बोलणे सुचत नाही. )

माणूस : बोला, बोला ना. तुम्ही स्वतःचा एकदेखील विचार कधी पुरा करीत नाही. जणू विसंगती दिसायला लागेल म्हणून घाबरता तुम्ही. आयुष्यात कधी तुम्हाला जे म्हणायचं आहे ते मोकळ्या मनाने, संपूर्णपणाने व्यक्त करायचा प्रयत्न केलाय तुम्ही ? हे सगळं सहन कसं करता तुम्ही, डॉक्टरसाहेब ? तुमच्या अंत:करणातली ती अंधाधुंदी... ते बावळट प्रश्न... त्यांची ती चालचलाऊ उत्तरं— मधेच अडवल्यासारखी... शेवटापर्यंत कधी जायचंच नाही... काहीही स्वच्छ स्पष्ट करायचं नाही. पंचावन्नावं वर्ष चालू आहे तुमचं...(स्वतच्या बोलण्यातच रंगून जाऊन) पंचावन्न झालीसुद्धा... फार तर आणखी दहा किंवा पंधरा वर्ष काम करता येईल तुम्हांला. भीती नाही वाटत तुम्हांला ? तुमचं हे मोठेपण, हे स्थान, ही खुर्ची... हे जाऊन सर्वसामान्य माणूस झाल्यावर काय होणार तुमचं ? काही नाही. कुणाशी संबंध नाही. गाडी नाही... 'जी हुजूर' करणारे अधिकारी नाहीत. काही नाही. फक्त एका दुबळ्या शरीरात राहणारा एक माणूस— अशा अवस्थेत त्यानंतर स्वतःशी खोटंही बोलता येत नाही. मोठ्या धैर्यानं स्वत:च्याच प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं द्यावी लागतात. टाळाटाळी नाही चालंत तिथं. हे असं होतं माझं आयुष्य ? त्या वेळी कोण देणार तुम्हांला सामर्थ्य ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला ? तुमच्या खात्यातले लोक ? हे तुमचे डॉक्टर चौधरी ? तुम्ही— फक्त तुम्ही. (आजुबाजूला पाहत ) सार्थ ठरलं का माझं आयुष्य ? हा शेवटला प्रश्न असेल. मी खूप विचार केलाय ह्या प्रश्नाचा. शेवटी मी ह्या निष्कर्षाला येऊन पोहोचलो: माणसाच्या जीवनाला काही रीतसर सूत्र हवं. नुसता सावळागोंधळ उपयोगाचा नाही. असं असलं तरच त्या जगण्याला काही अर्थ आहे. (खुर्च्या हलवायला लागतो. ) आयुष्य म्हणजे केवळ एक अपघातानं घडून आलेली योगायोगांची साखळी असण्यात अर्थ नाही. तुमच्या इच्छाशक्तीच्या बळावर आणि विश्वासावर तुम्ही स्वतः ते जीवन नीटपणानं रचलेलं आणि घडवलेलं असायला हवं. मला हे जेव्हा लख्ख उमजलं, तेव्हा चक्रावल्यासारखा होऊन गेलो मी. ह्या असल्या स्पष्टपणाची, बरं का साहेब, एक धुंदी असते. सगळं काही इतकं विशाल होतं की तुम्हाला कशाचं भय म्हणून राहत नाही. मला कशाचंही भय का वाटत नाही ? कारण मला कसं जगायचं आहे हे मला पक्कं माहिती आहे. कसं ? माझ्या अंतरंगातच मला एक शिस्त हवी आहे. तुमच्या कधी हे लक्षात आलंय ? निसर्ग माणसाहून अधिक श्रेष्ठ असं कधीही काही निर्माण करणार नाही. निसर्गाच्या संग्रहात आता देण्यासारखं आणखी काहीही उरलेलं नाही. फक्त तुम्ही. (टेबलही असं हलवतो की डॉ० देशमुख एखाद्या अपरिचित जागेवर उभे राहिल्यासारखे दिसतात. ) फक्त तुमचं जीवन. तुम्ही एवढंसं का होईना, पण सुसूत्र असं काहीतरी निसर्गाला देऊन थोडीफार परतफेड करू शकता. सावळ्यागोंधळांनी नव्हे. निसर्गाला सावळागोंधळ मान्यच नाही. सतत निवड चालू असते. निसर्गाला मान्य असलेली एकच गोष्ट आहे : माणसाला परिपूर्ण करणं.

- oOo -

पुस्तक: ’एक झुंज वार्‍याशी’
लेखक: पु. ल. देशपांडे
प्रकाशक: मौज प्रकाशन गृह
आवृत्ती तिसरी (१९९८)
पृ. ५४-५९.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : एक झुंज वार्‍याशी >>
---


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा