शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

नो थॅंक्यू, मिस्टर ग्लाड

ग्लाडसाहेबाला पाहताच तुरुंगातली वडा-पिंपळाची झाडे चोरून उभी राहिली आणि फाशी गेटला कापरे भरले!

साहेब फाशी गेटच्या दरवाजाशी क्षणभर थबकला. आणि बऱ्याच विचाराअंती आपल्या रुंद जबड्यावर त्याने उसने हास्य आणले. नवख्या नटाने स्टेजवर यावे तसे कावरेबावरे होत हसू साहेबाच्या गालावर बिचकत थबकत येऊन उभे ठाकले. मग साहेबाने आपल्या जाडजूड भुवया इकडे तिकडे उडवत घसा खाकरून आवाजात थोडे मार्दव आणायचा प्रयत्न केला. नि साहेब नक्षलवाद्याच्या कोठडीसमोर येऊन उभा ठाकला.

थँक यू, मिस्टर ग्लाड

“हॅलो यंग बॉय, हाउ आर यू?"

साहेबाने विचारपूर्वक ठरवलेला पहिला प्रश्न दिमाखात फेकला. नक्षलवाद्याला ग्लाडसाहेबाचा कावा कळला. नि साहेबाला झटकत नक्षलवादी म्हणाला, “आय अ‍ॅम कैदी नंबर आठसो बयालीस, ए ट्रेटर, नक्षलाइट अँड नॉट ए यंग बॉय, मिस्टर ग्लाड ! "

नक्षलवाद्याच्या या तोडून टाकणाऱ्या उत्तराने सीनियर जेलरच्या उरात धडकी भरली. फाशी गेटच्या जेलरला कापरे भरले. ग्लाडसाहेब पिसाळणार असे त्यांना वाटले. पण ग्लाडसाहेब भडकला नाही. संतापला नाही. चिडला नाही. त्याने फक्त जमादाराला दरवाजा खोलण्याची खूण केली. वेंधळ्या जमादाराने धांदरटपणे पुढे येत जुडग्यातल्या किल्ल्या चार वेळा आलटत पालटत दरवाजा उघडला. मग साहेबाने जमादाराचे स्टूल स्वत:च उचलले नि नक्षलवाद्याच्या पुढ्यात फेंगड्या पायाने स्टुलावर बैठक मारली.

कोठडीत एक संशयी शांतता भरून राहिली. मग शिरस्त्याप्रमाणे साहेबानेच तिचा भंग कला. साहेबाने आधी आपला डावा डोळा जरा बारीक केला. उजव्या हातातली छडी डाव्या तळव्यावर आपटली आणि साहेब गडगडला... मोकळेपणाने गडगडला. मनापासून गडगडला. आणि खर्जात बोलला,

“बच्चा फौलाद का है फौलाद का!”

मग साहेब क्षणभर थांबला आणि नक्षलवाद्याच्या नजरेत नजर घालून डावा डोळा अधिकच बारीक करीत विचारता झाला,

"क्यों बे कैदी नंबर आठसो बयालीस, माझं काय वय असेल? अंदाज कर जरा!”

नक्षलवाद्याने एकवार ग्लाडसाहेबाला आपादमस्तक न्याहाळले नि पांढऱ्या होत चाललेल्या त्याच्या झुपकेदार मिशांना पाहात सांगितले...

"असेल बावन त्रेपन्न!”

नक्षलवाद्याच्या या उत्तरावर साहेब कडाडला...

“बेवकूफ गद्धा आहेस. माझं वय तुझ्या बापाएवढं आहे समजलास!”

स्वत:च्या वयाचा फायदा घेऊन वडिलकीचा अधिकार गाजवायचा प्रयत्न ग्लाडसाहेबाने केला खरा, पण त्याने नक्षलवाद्याच्या चेहऱ्यावरील सुरकुतीही हालली नाही. मग साहेब एकदम अजीजीने बोलू लागला.

"हे बघ पोरा, ज्याची मस्ती आमच्या अंगात आहे ती ही खाकी झूल देखील माणसाच्याच अंगावर चढवलीय बरं. आणि एक वडीलधारा माणूस म्हणून तुला सांगतो मर्सी-पिटिशनवर सही कर."

साहेबाने हातातला कागद नि पेन नक्षलवाद्यासमोर केले. पण नक्षलवाद्याने त्याकडे ढुंकूनसुद्धा पाहिले नाही आणि साहेबाने पण आपला प्रयत्न सोडला नाही.

"यू सी बॉय, तू एकदम सही करणार नाहीस. मला माहितीय. तुला त्यात अपमान वाटतो. वाटणं साहजिक आहे. पण मूर्खपणाचं आहे, चुकीचं आहे.”

“असं? कसं काय बुवा?" -तोंडाचा चंबू करीत टवाळीच्या सुरात नक्षलवाद्याने ग्लाडसाहेबाला विचारले.

साहेबाने त्या टवाळीकडे सरळ डोळेझाक केली आणि युक्तिवाद चालूच ठेवला.

"यू सी... क्लास वॉर... वर्गयुद्धावर तुझा विश्वास नाही का?” साहेबाने विचारले.

"ऑफ कोर्स आहे!" नक्षलवाद्याने उत्तर दिले.

"मग लढाईत चार वार, चार जखमा व्हायच्याच. आणि होणारा वार नेहमी शारीरिकच असतो असं नाही. तो मानसिकही असतो. खरा योद्धा हेही वार झेलतो, आणि अंतिम विजयासाठी माघारी फिरतो. तसा तूही आता माघारी फीर. माघार... अगदी तात्पुरती माघार. जीव वाचवण्यापुरती माघार. तुझा जीव लाखमोलाचा आहे हे विसरू नकोस. तुझ्यासारखी माणसंच क्रांती करतात."

“हे कोणी सांगितलं तुम्हांला?” साहेबाचे बोलणे मध्येच तोडत नक्षलवादी म्हणाला. “मिस्टर ग्लाड, क्रांती जनता करते. एखादा दुसरा माणूस नाही. माझ्या फाशी जाण्याने काही क्रांती दूर लोटली जाणार नाही.”

“हो, पण तुझ्या फाशी जाण्यानं काही ती जवळही येणार नाही. मग इतका हटवादी कशाला होतोस? मर्सी-पिटिशनमध्ये स्वत:चा अपमान कशाला समजतोस?” ग्लाडसाहेबाने प्रतिप्रश्न केला.

“स्वत:चे सारे मान अपमान गुंडाळूनच मी घराबाहेर पडलोय मिस्टर ग्लाड. मर्सी-पिटिशनमध्ये मी माझा अपमान समजत नाही, क्रांतिकारी चळवळीचा अपमान समजतो. या जुलमी सत्तेकडे स्वत:च्या प्राणांसाठी याचना करणे म्हणजे जनतेच्या क्रांतिकारी शक्तीवर अविश्वास दाखवणे आहे. एक क्रांतिकारक असून क्रांतिकारक चळवळीला कमीपणा आणणे आहे!” नक्षलवाद्याने उत्तर दिले.

नक्षलवाद्याच्या या उत्तराने ग्लाडसाहेब निरुत्तर झाला. राजकारण हा काही आपला प्रांत नाही हे ग्लाडसाहेबाला पुन्हा एकदा जाणवले. आणि मग त्याने सरळ त्याच्या भावनेलाच हात घालायचा प्रयत्न केला.

"तुझी क्रांती राहू दे बाजूला, त्यातलं मला काही समजत नाही. मला फक्त एवढंच समजतं की, तुझी बायको-मुलं निराधार आहेत. एकटी आहेत. तुला भेटायला लहानग्या पोराला कडेवर घेऊन शंभर मैल उन्हातान्हाची अनवाणी चालत आली होती ती!” ग्लाडसाहेब बोलला.

"मला माहितीय, मिस्टर ग्लाड. माझ्याशी लग्न केलं तेव्हापासूनच ती निखाऱ्यावरून चालतीय. शंभर मैलांची अनवाणी चाल तिला जड नाही!" नक्षलवाद्याने थंडपणे उत्तर दिले. पण नक्षलवाद्याच्या भावनेला हात घालता घालता खुद्द ग्लाडसाहेबच भावनेच्या आहारी जात होता.

“शब्दांचं सामर्थ्य फक्त स्पष्टीकरणापुरतं मोठं असतं पोरा, वस्तुस्थिती त्यानं बदलत नाही. तू मेलास तर तुझ्या बायकोचं आयुष्य वैराण होईल... उद्ध्वस्त होईल. ही वैराणता काय असते ती तुला काय माहीत? मला विचार. मला माहितीय आयुष्य वैराण होणं म्हणजे काय, उद्ध्वस्त होणं म्हणजे काय."

बोलता बोलता ग्लाडसाहेब हालला... गलबलला. आपल्या बोलण्याचा नक्षलवाद्यावर काहीच परिणाम होत नाहीय हे पाहून कातावला... चिडला आणि एकदम नक्षलवाद्याचे खंदे गदागदा हालवीत ओरडला,

"माणूस आहेस का जनावर? तू खोटारडा, लुच्चा, ढोंगी आहेस. रस्त्यावरच्या उपाशी पोराला पाहून तुझ्या आतडयाला पीळ पडतो पण स्वतःच्या बायकापोरांची तुला कणवही येत नाही होय रे? स्वत:च्या अहंकारासाठी त्यांचा बळी देतोयस तू?"... ग्लाडसाहेबाने विचारले.

“माझ्या बायकापोरांची तुम्हांला का एवढी कणव येतीय?” नक्षलवाद्याने चिडून विचारले.

“साध्या माणुसकीच्या नात्यानं”, ग्लाडसाहेबाने उत्तर दिले. तशी नक्षलवादी ताडकन् म्हणाला,

“तुमचा नि माणुसकीचा काय संबंध मिस्टर ग्लाड? माणुसकीशी नातं सांगायला छाताडात माणसाचं काळीज असावं लागतं. तुमच्यासारख्या नरपशूचा माणुसकीशी काय संबंध?”

ग्लाडसाहेबांचा हा अपमान वेंधळ्या जमादारालाही सहन झाला नाही आणि दंडा उगारत तो नक्षलवाद्यावर धावला. पण ग्लाडसाहेबाने त्याला हातानेच मागे लोटले. नक्षलवादी मात्र कडवट शब्दांत ग्लाडसाहेबाला सुनावत होता,

“आय नो. मला माहितीय. मी मर्सी-पिटिशन केला नाही हे सरकारच्या नाकाला झोंबलंय. मी सरकारची दखलही घेत नाही हे पाहून होम डिपार्टमेंटला अपमान वाटतोय, आणि म्हणून तुम्हांला सांगितलं गेलंय... माझी मर्सी-पिटिशनवर सही घ्यायला. तरीच परवापासून एवढी बडदास्त ठेवताय तुम्ही... गोडीगुलाबीने वागताय..." नक्षलवाद्याच्या या आरोपांनी ग्लाडसाहेब नुसता सुन्न झाला आणि बसून राहिला. अर्ध्या तासाने साहेब जायला उठला. क्षणभर कोठडीच्या दरवाजात थांबला आणि नक्षलवाद्याला म्हणाला,

“पोरा, अजून रांगतं पोर आहेस तू रांगतं पोर! तुला राजकारणही कळत नाही नि माणूसही कळत नाही. तुला कळणार नाही, मी तुझ्या दाराशी का येतो ते. कारण अजून तुझं आयुष्य कधी उद्ध्वस्त झालं नाही, वैराण झालं नाही. माणसाला ओळखणं इतकं सोपं नसतं पोरा. आणि राजकारण?... ते तुला समजत असतं तर सरकार तुझ्या मर्सी-पिटिशनची वाट पाहतंय असं तुला वाटलंच नसतं. ओ. के.! मी पुन्हा पुन्हा येईन. अखेरच्या क्षणापर्यंत येईन. मी तुला हकनाक फासावर चढू देणार नाही. बाय!”

साहेब फाशी गेटमधून चालता झाला तो तडक बंगल्यावर आला. मग त्याने क्षितिजाकडे नजर टाकली... सूर्य अस्ताला चालला होता. नक्षलवाद्याला कन्व्हिन्स करण्यात अख्खा दिवस गेला होता.

*

रात्र जसजशी गर्द होऊ लागली तसतसा साहेब अधिकाधिक तर्रर्र होऊ लागला. रोजचा रिवाजच होता त्याचा तो. साहेबाला खूप चढली की वैराण, उद्ध्वस्त माळावरही शेतेभाते डोलताना... फुलताना दिसत... पण आजची साहेबाची सारी नशाच वांझोटी होत होती. पेगच्या पेग घशाखाली उतरूनही साहेब स्वत:ला हरवून जाऊ शकत नव्हता... नक्षलवाद्याचे डसलेले शब्द तो काट्यासारखे काढून फेकून देऊ शकत नव्हता...

साहेब झुकांड्या खात डोलत उठला. अंधारातच बागेत आला. त्याने रातराणीचा मंद मत्त वास दीर्घ श्वासाबरोबर छाताडात घेतला. त्याने तो मोहरून गेला, तशी आपल्या छाताडात माणसांचे काळीज आहे याची त्याला पुन्हा बालंबाल खात्री पटली... मग लाडाने त्याने रातराणीला कुरवाळले.

ग्लाडसाहेबाचे रातराणीवर फार फार प्रेम होते. त्याला सूर्यप्रकाशात नखरे करणारी लडिवाळ फुलझाडे आवडत नसत. क्षुद्र माणसांप्रमाणेच त्याला ती वाटत, फक्त सुखात वाटेकरी होणारी. पण 'रातराणी' ?

... ग्लाडसाहेबाने रातराणीला पुन्हा एकदा कुरवाळले. जेव्हा सूर्य अस्ताला जातो नि निबिड रात्र साऱ्यांना घेरून टाकते तेव्हा नाजूक रातराणीच ताठ्यात उभी राहते. अंधाराला नाक मुरडीत आपल्या मंद सुवासाने वातावरण दरवळून टाकते.

साहेबाने डोळे फाडफाडून अंधाराकडे पाहिले. ठणा ठणा पडणाऱ्या बाराच्या ठोक्यांबरोबर तो काळरात्रीचा निबिड अंधार सारी सृष्टी बकाबका खात चालला होता. आधी मोठमोठ्या झाडांना, नंतर तुरुंगाच्या दगडी भिंतींना आणि आता ग्लाडसाहेबाच्या बंगल्यालाही. घाबरून साहेब रातराणीच्या कुशीत शिरला.

इवलीशी नाजूक रातराणी मात्र टेचात उभी होती. निबिड अंधाराला वाकुल्या दाखवीत प्रसन्न हसत होती. गेस्टापोंच्या तावडीतल्या माराप्रमाणे माराच्या आठवणीने साहेब पंख तुटलेल्या पाखराप्रमाणे तडफडू लागला. रातराणीला छातीशी धरून गदागदा हलवू लागला. नि साहेबाने आतल्या आत टाहो फोडला...

“मारा ऽऽ मारा ऽऽ"

रातराणीने साहेबाला छातीशी लावून पाठीवरून मायेचा हात फिरवीत समजूत काढली. मग थोड्या वेळाने साहेब भानावर आला. आणि पुन्हा त्याला नक्षलवाद्याचे शब्द डसले. मग साहेब संतापला, चिडला आणि दातओठ खात पुटपुटला,

“भांचोद, चार पुस्तकं वाचली म्हणून स्वत:ला फार विद्वान समजतो काय? मला माणसाचं काळीज नाही म्हणतो? भडवा साला..."

साहेब रागाच्या सपाट्यातच रातराणीच्या कुशीतून उठला आणि दिवाणखान्यात गेला. नाइट गाऊन फेकून कशीबशी अधिकाराची वर्दी त्याने अंगावर चढवली. कमरेला लेदर बेल्ट अडकवून त्याने खिशात मर्सी-पिटिशन कोंबला आणि तुरुंगाकडे तो चालू लागला...

काळ्याशार डांबरी रस्त्यावर पावले खाड् खाड् वाजू लागली. रस्ता निर्मनुष्य झाला. आसपासच्या झाडावरल्या रातकिड्यांची किरकिरही शांत झाली...

गार्ड-ड्यूटीवरल्या हवालदारांनी सलामी दिली. मेन गेटच्या पहारेकऱ्यांनी गडबडीने मेन गेटचे दरवाजे उघडले. ग्लाडसाहेबाने तुरुंगात पाऊल टाकले. ग्लाडसाहेबाचे पाऊल तुरुंगात पडले नि साखर झोपेत असलेले कैदी घाबरून बिस्तर्यात उठून बसले. मध्यरात्रीचा साहेब तुरुंगात आलेला पाहून नाईट ड्यूटीचा वॉचमन, वॉर्डर, शिपाई, जेलरांची एकच धावपळ उडाली.

ग्लाडसाहेबाने फाशी गेटमध्ये शिरता शिरताच डरकाळी फोडली,

“ए कैदी नंबर आठसो बयालीस."

साहेबाच्या डरकाळीने वेडा कैदीही उठून जागा झाला!

ताड् ताड् पावले फेकीत ग्लाडसाहेब नक्षलवाद्याच्या कोठडीसमोर येऊन उभा ठाकला. त्याला पाहताच नक्षलवाद्याने नेहमीचे मंद स्मित करीत विचारले,

“हॅलो, मिस्टर ग्लाड, हाउ आर यू?"

पण नक्षलवाद्याच्या त्या मोहिनी हास्याचा आज ग्लाडसाहेबावर काहीच परिणाम झाला नाही. तो फाशी गेटच्या वेंधळ्या जमादारावर खेकसला.

“बुबुळांच्या खाचा झाल्या काय तुझ्या? दरवाजा खोल.”

वेंधळ्या जमादाराची त्रेधातिरपीट उडाली. कसेबसे कुलूप उघडून त्याने सुटकेचा श्वास सोडला.

वेंधळ्या जमादाराने कुलूप उघडताच साहेबाने एक कचकचीत लाथ दरवाजावर घातली. कोठडीचा लोखंडी दरवाजा थाड्कन दगडी भिंतीवर आपटला आणि त्या आवाजाने सारा तुरुंग दुमदुमला.

साहेब कोठडीत शिरला आणि दुसऱ्या लाथेसरशी त्याने सर्व कवितांची पुस्तके कोठडीभर विखरून टाकली. मग दोन-चार पुस्तकांवर थयाथया नाचत तो नक्षलवाद्यावर ओरडला.

“कविता वाचतोस होय रे भडव्या, कविता वाचतोस?”

मग कवितांची पुस्तके पुरेशी पायदळी तुडवल्यावर त्याने नक्षलवाद्याची गचांडी धरली अन् त्याला गदागदा हालवीत विचारले, “बोल, मर्सी पिटिशनवर सही करतोस की नाही?"

नक्षलवाद्याने निर्धाराने नकारार्थी मान हालविली. त्याच्या ठाम नकाराने साहेब अधिकच खवळला आणि दोन्ही हातांनी त्याने नक्षलवाद्याला हवेतल्या हवेतच उचलले नि एकदा या व एकदा त्या अशा चारी भिंतींवर दणादणा आपटायला सुरुवात केली. रिटायर व्हायला आलेल्या ग्लाडसाहेबाच्या अंगातली ती मस्ती, ती रंग, आणि अचाट ताकद पाहून फाशी गेटचा वेंधळा जमादार नुसत्या भीतीनेच थरथर कापू लागला.

भिंतीवर आपटून आपटून नक्षलवाद्याची हाडे खिळखिळी करून झाल्यावर ग्लाडसाहेबाने त्याला दाणकन फरशीवर पटकले. इतका मार बसूनही नक्षलवादी धडपडत उठला आणि ताठ मानेने छाती काढून ग्लाडसाहेबासमोर उभा राहिला. आपल्या राठ पंजात नक्षलवाद्याचे तोंड पकडन ग्लाडसाहेब ओरडला.

“कुत्रा समजतोस काय मला? सरकारच्या हुकमानं तुझा मर्सी-पिटिशन मागतो असं वाटतंय काय तुला? हरामखोर, मला काय काळीज नाही?... भडव्या तुला काळीज नाही, तुला मन नाही. हलकट, लुच्चा, ढोंगी आहेस तू..."

ग्लाडसाहेबाने एकावर एक कचकचीत थोबाडात भडकावत सरबत्ती चालू केली...

“साला, कविता वाचतो कविता. त्या बिचारीला विधवा करणार. इवल्याशा लेकराला तू अनाथ करणार. आणि भडव्या, कविता वाचतोस काय?”

ग्लाडसाहेबाने रेड्याच्या ताकदीने दोन ठोसे नक्षलवाद्याच्या छाताडावर लगावले. इतका बळकट आणि जवान नक्षलवादी, पण तोही कोकरासारखा हेलपाटला, खाली पडला. मग साहेबाने त्याच्या छातीवर आपले गुडघे रोवले नि त्याच्या झिंज्या पकडून त्याचे डोके उचलीत विचारले,

“हरामखोर, त्या बिचारीच्या पायाला भेगा पडल्या अनवाणी चालून तुझ्यासाठी. गूखाऊ आता स्वतःला फासावर चढवून घेऊन तिच्या काळजाला चिरा पाडणार काय तू? माझ्यासारखं तिचंही आयुष्य तू वैराण करणार... उद्ध्वस्त करणार?”

एका झटक्यात ग्लाडसाहेबाने नक्षलवाद्याला उभे केले आणि उरल्यासुरल्या चार थोबाडांत पुन्हा भडकावीत ओरडला, “नीच, हलकट तू क्रांतिकारक नाहीस. गेस्टापो आहेस गेस्टापो. हिटलर... नाझी.... फॅसिस्ट आहेस तू !”

बसलेल्या असह्य माराने नक्षलवादी जमिनीवर कोसळला. ग्लाडसाहेबही आता थकला होता, दमला होता. त्याचे सारे अंग घामाने थबथबले होते... अत्याचाराच्या आणि दारूच्या धुंद नशेतही त्याला नक्षलवाद्याच्या बायकोच्या पायाला पडलेल्या भेगा आठवल्या... गॅस चेंबरमध्ये जळणारी मारा आठवली आणि डोळे घट्ट मिटून घेत ग्लाडसाहेबाने आतल्या आत टाहो फोडला…

"माराऽऽ माराऽऽ"

- oOo -

पुस्तक: ’थॅंक यू, मिस्टर ग्लाड’
लेखक: अनिल बर्वे
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती सहावी, दुसरे पुनर्मुद्रण (२०२०)
आवृत्ती पहिली: १९७५
पृ. ३२-३८.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : थँक यू, मिस्टर ग्लाड >>
वीरभूषण, ग्लाड आणि आपण >>
शरीरम् धनसंपदा >>
---


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा