आता अंधारू लागले होते, पण खरी रात्र पडली नव्हती. कोठे काही तरी खावे असे तीव्रपणे वाटण्याइतकी भूक त्याला अद्याप लागली नव्हती. तेव्हा आणखी थोडा वेळ कोठे घालवावा याचा त्याला विचार पडला. पण मद्यागारांच्या बाजूलाच सुर्या-कट्यारींचे एक दुकान पाहताच त्याला बरे वाटले. तो सहजपणे तिथे गेला व बाहेर रुंद, मोठ्या खिडकीत टांगलेल्या कट्यारींकडे पाहू लागला.
“तुला कट्यार हवी का ? मग आत ये. आत पुष्कळ नमुने आहेत.” कोणीतरी त्याला जाड भरदार स्वरात म्हणाले. दारात एक धिप्पाड माणूस उभा होता. त्याने उघड्या अंगावर अरुंद पाळ्यांचे नुसते एक कातडी जाकीट अडकवल्याने त्यांची रुंद केसाळ छाती पूर्णपणे उघडी होती व तिच्यावर पावशेराएवढा अजस्र ताईत होता.
“छे, खरे म्हणजे मला काहीच विकत घ्यायचे नाही.” तो किंचित विरमून म्हणाला. “ मी पुष्कळ भटकलो आहे. प्रत्येक देशाचे अन्न निराळे, त्याप्रमाणे त्याची हत्यारे देखील निराळी असतात. म्हणून मी पाहत होतो इतकेच.”
माणूस मोठ्याने हसला व आत येण्याची खूण करून दारातून बाजूला झाला. “ आमचे खरे शौकीन गिर्हाईक असेच असते. आमची हत्यारे ही दररोजच्या उपयोगाची नाहीतच. घरी काकडी चिरायची अडचण पडली म्हणून सुरी घेण्यासाठी कोणी माझ्या दुकानात येणार नाही. "
यांचा पडदा बाजूला करून तो आत आला तेव्हा ती विस्तार पाहून तो भांबावून गेला. उजव्या व डाव्या बाजूंना विस्तृत दालने होती व तेथे जमिनीवर बसून कारागीर सोन्याचांदीची कोरीव काम करीत होते. या माणसाने पलीकडे हात दाखवला व म्हटले, “आज सुट्टी आहे. म्हणून तुला येथे गर्दी दिसणार नाही. पलीकडे भट्ट्या आहेत. तलवारी खर्या तिथे जन्माला येतात. पण तुला तिथे उभे राहवले नसते. आपण उजवीकडे जाऊ. त्या ठिकाणी अमीर-उमराव, राजपुत्र यांच्यासाठी घडवलेल्या सोन्याचांदीच्या मुठीच्या रत्नखचित तलवारी आहेत. निदान पाहून तरी घे त्या.”
तो नाखुषीने रेंगाळला व म्हणाला, “मला तलवारी पाहायला आवडेल; दागदागिने नाही ! रत्नखचित, जडावाच्या तलवारी करायच्या काय घेऊन ? खरे म्हणजे जेथे मूठ संपते, तेथेच खरी तलवार सुरू होते!”
तो धिप्पाड माणूस, खाण्याचे पदार्थ ठेवण्यासाठी जमिनीवर लाल वस्त्र झटक्याने पसरावे त्याप्रमाणे हसला व त्याने जबरदस्त हातोड्याप्रमाणे वाटणारा हात त्याच्या खांद्यावर ठेवला. तो म्हणाला, “हे मात्र तू लाखातले बोललास, खरे म्हणजे जर तू तिकडे जाऊ या असे उत्साहाने म्हणाला असतास, तर मी तुला पाचदहा मिनिटांतच बाहेर घालवले असते. मखमली, जरतारी म्यान, झगमगणारी मूठ हेच त्यांना मुख्य पाहिजे असते, कारण कोठे तलवार गाजवायला बसली आहेत ती फोपशी बाळे? त्यांना तलवारीचे पाते शेणाचे असले तरी चालते.”
“थूः !” त्याच्यामागेच कोणीतरी तिरस्काराने आवाज करताच तो दचकला व त्याने वळून पाहिले. तेथेच एका बाजूला गालिच्यावर एक वृद्ध बसला आहे हे त्याला दिसलेच नव्हते. उभ्या गुडघ्यात डोके खाली करीत पाठ वाकवून तो टिकल्या-टिकल्या डोळ्यांनी त्यांच्याकडेच पाहत होता. माणसाचा चेहरा सुकून इतका मांसहीन झालेला त्याने कधी पाहिलाच नव्हता.
“हा माझा बाप. आणि हो, माझे नाव याकीर. ” तो माणूस म्हणाला. “तो दहाव्या वर्षापासून तलवारी करीत असे. त्याचा आग्रह निराळाच आहे. आता आम्ही जे काम करून येथे मांडतो, ते एखाद्या कुंटिणीच्या कामासारखे बेशरम, बाजारी आहे, असे तो मला वरचेवर म्हणतो. त्याच्या पद्धतीने काम करायला लागले की बघायलाच नको. वर्षात एक तलवार होणार आणि तिला गिर्हाईक मिळायचे नाही. टीचभर सोन्याच्या तुकड्यावर दहा वर्षे राबत बसायचे दिवस गेले, आता कुलवंत काम टिकत नाही, हे त्याला कधी उमगलेच नाही. गेली वीस वर्षे तो असा बसून आहे, आणि दररोज पाचदा तरी मला म्हणतो, 'थू :’ ”
याकीर सांगत होता, पण त्याच्या आवाजात त्याच्या देहाशी पूर्ण विसंगत वाटावे असे कोवळे कौतुक होते.
याकीरने त्याला मुद्दाम शेजारीच असलेल्या आपल्या दालनात आणले व आग्रहाने बसवून लाल द्राक्षांची बशी त्याच्यापुढे सरकवली. तेथील भिंतीवर सर्वत्र उघड्या तलवारी टांगलेल्या होत्या. त्यांपैकी काही जरी पुराण्या दिसत होत्या तरी त्यांच्या स्वच्छ पात्यांवर मात्र कसलीच मरगळ दिसत नव्हती.
“पिढ्यान् पिढ्या आम्ही हा धंदा करतो. फक्त तलवारी आणि कट्यारी. चिलखत, शिरस्त्राण, अंगजाळी काही नाही. ती कामे लोहारांची!” याकीर अभिमानाने म्हणाला. “आम्ही तयार केलेल्या काही तलवारी आम्ही मुद्दाम जतन केल्या आहेत.” त्याने भितीवरील एक तलवार उचलली व त्याच्यापुढे धरली.
“ही पाहिलीस ? या तलवारीला फारशी धार नसते. कारण ती खुपसण्यासाठी असते. स्नीड लोकांची ही तलवार. ती माणसे लढताना कुस्ती खेळत असल्याप्रमाणे अंगावर उड्या घेतात व पोटात तलवार खुपसतात. ही अर्धचंद्राकार तलवार सिथियनांची. शिरच्छेद करणारी. हिच्या बाहेरच्या धारेवरचा प्रकाश जरी पाहिलास तरी डोळ्यांवर ओरखडे पडतील. ”
याकीरने मखमली कापडाचा एक तुकडा हवेत फेकला व तो खाली येत असता त्यातून ती तलवार हलकेच फिरवली. तेव्हा पाकळ्या उमलल्याप्रमाणे तुकड्याचे दोन भाग झाले व सावकाश खाली उतरले. त्यांतील एक उचलून त्याला दाखवत याकीर म्हणाला, कडा पाहून घे. एक सूत बोंदरे दिसणार नाही तुला !"
“थूः !” वृद्ध चिडून म्हणाला, “बाजारबसवीचे काम !”
याकीर किंचित हसला व पुढे म्हणाला, “एका बाजूने दाते असलेली ही तलवार मनरशाह वापरत असे. पोटातून बाहेर येताना सारा कोथळा बाहेर घेऊन येते. पण तू अॅटिकसची तलवार पाहायला हवी. त्याची म्हणजे खरोखर त्याची नव्हे, तर तशीच घडवलेली. त्याची खरी तलवार तो मेल्यावर त्याच्याबरोबर थडग्यात गेली. एका नदीचे पात्र मुद्दाम वळवून कोरड्या जागी त्याचे थडगे बांधले आणि मग पुन्हा नदी वर सोडून दिली. म्हणजे अॅटिकसचे थडगे देखील कोठे आहे याचा आम्हाला पत्ता नाही. अशी होती त्याची तलवार.”
याकीरने जवळजवळ पुरुषभर उंच अशी अजस्र तलवार उचलली व त्याच्यापुढे आणली. त्याच्या दोन्ही हातांना देखील ती अवजड वाटली.
“अरे, अॅटिकस होताच तसा जबरदस्त ! तो दोन्ही हातात धरून तलवार फिरवू लागला की कलिंगडी पडल्याप्रमाणे डोकी जमिनीवर पडत. एका प्रहाराने घोड्याची मान तोडणारा स्पिरॅकस काय, आज या नगरात आहे. पण हत्तीचे मुंडके एका घावाने वेगळे करणारा अॅटिकस हा एकटाच.” याकीरने तलवार उचलून भिंतीवर अडकवली व म्हटले, “पण गड्या, असल्या लढण्यात कौशल्य नाही. ते खाटीककाम झाले. पण तुला त्याच्या भावाची– अँटोनिकसची तलवार दाखवतो.” पण यावर याकीर भिंतीवर टांगलेल्या तलवारीकडे न जाता भिंतीत तिजोरीप्रमाणे बसवलेल्या एका कपाटाकडे गेला. ते उघडून त्याने एक गोलाकार पेटी काढली व म्हटले, “ही आहे अँटोनिकसची तलवार !”
याकीर आपली थट्टा करीत आहे असे त्याला वाटले व तो थोडा अस्वस्थ झाला. “आणि ही तलवार घेऊन तो शत्रुसैनिकांबरोबर चक्रीदगड खेळत होता वाटते ?” त्याने उपरोधाने विचारले.
याकीर हसून म्हणाला, “मी तुझी थट्टा करीत नाही. त्या एकट्याचीच तलवार अशी पेटीत गुंडाळून ठेवता येत असे. पाहिलेस ?” त्याने पेटीचे झाकण उघडताच आतील पाते सळसळून झगझगीत झाले व अधीर झाल्याप्रमाणे लवलवू लागले. “अँटोनिकसचे कौशल्य पाहायला मी त्या वेळी जन्मायला हवे होते.” याकीर म्हणाला, “त्याने आपल्या गीतांनी जास्त स्त्रिया जिंकल्या की तलवारीने, हे सांगता येते कठीण आहे. या तलवारीने तो शत्रूच्या चेहऱ्यावर ओरखडा न काढता त्याची दाढी छाटत असे. एकदा त्याने एका हूण सरदाराच्या कानांतील कुंडलेच तेवढी सफाईने तोडली होती. ही तलवार नाही. तलवार जास्त शुद्ध होत जात शेवटी निखळ, केवळ धार उरावी तशी आहे ती. अधीर, अतृप्त, उसळती धार !”
“त्याला आता माझे काम दाखव.” वृद्ध घोगरेपणाने म्हणाला व त्याने निव्वळ हाडे उरलेला हात लांब करून आकड्यासारखे झालेले बोट कपाटाकडे दाखवले.
याकीरने एक निःश्वास सोडला. तो हसत म्हणाला, “अखेर ते येणारच हे मला माहीत होते.” त्याने अँटोनिकसची तलवार पेटीत गुंडाळून ठेवली व आत हात घालून एक कट्यार बाहेर काढली. तिच्यावर फुला-फुलांची कातडी पिशवी होती, पण तिच्यावर ठिकठिकाणी पापुद्रे उलटले होते. तिला सांबाराच्या शिंगाची साधी मूठ होती. आणि तिचा देखील एके ठिकाणी टवका उडाला होता. याकीरने एका कापडाने पिशवी पुसली व काही न बोलता त्याच्याकडे दिली. कोणत्याही बाजारात मूठभर पितळी नाण्यांना मिळणारी असली गावठी कट्यार तो मुद्दाम आपणाला का दाखवत आहे हे त्याला समजेना. काही न बोलता त्याने याकीरकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले.
“स्त्रीची किंमत तिच्या मिठीवरून करू नको; तलवारीची किंमत तिच्या मुठीवरून करू नको, अशी आमच्यात एक म्हण आहे. जरा उघडून तरी पाहा.” याकीर म्हणाला.
त्याने कट्यार बाहेर काढली आणि त्या तेजस्वी, वजनदार, गडदनिळ्या पात्याकडे पाहताच त्याचे भानच हरपले व विस्मयाने त्याने आवंढा गिळला. त्याने कट्यारीची मूठ पकडली व हात सरळ ताठ करून तिच्याकडे पाहिले. जातिवंत शस्त्र पाहताच एखाद्या योद्धयाला किंवा शिकाऱ्यालाच जाणवणाऱ्या धुंद आनंदाने त्याचे अंग मोहोरले, आणि एखादा नाहीसा झालेला अवयव परत येऊन पुन्हा शरीराशी एकजीव होऊन गेला असे वाटून त्याचे डोळे चमकले.
“हे पाते इतके नितळ, निळे आहे, ते फक्त लोखंडाचे आहे ?” त्याने बावरून विचारले. एखाद्या चिरतरुण देवकन्येने समुद्रस्नानासाठी पूर्ण विवस्त्र होऊन पाण्यात उतरावे त्याप्रमाणे ते पाते दिसत होते व त्यातील देदीप्यमान ज्योत जाणवत होती.
“लोखंडाचे नव्हे, अस्सल पोलादाचे आहे.” कमरेवर हात ठेवत याकीर म्हणाला, “माझ्या बापाने आयुष्यातले काम थांबवले, त्या वेळी त्याने केलेली ही शेवटची कट्यार आहे. निव्वळ स्वतःच्या आनंदासाठी केलेली. एखादा मूर्तिकार संगमरवरी मूर्ती घडवतो, शिल्पी मंदिर रचतो, तशी केलेली ही माझ्या बापाची शेवटची कट्यार. त्यानंतर त्याने हातोड्याला हात लावला नाही की भट्टीचा जाळ अंगावर घेतला नाही. आम्ही दूर दऱ्याखोऱ्यांतील माणसे ! माझा बाप येथे येईपर्यंत त्याने मेणा पाहिला नव्हता, समुद्र पाहिला नव्हता, आणि रेशमी वस्त्र म्हणजे काय हे त्याला माहीत नव्हते. पण पिढ्यान् पिढ्या आम्ही शस्त्रे करत होतो, शस्त्रे जमवत होतो. पोलादाला आकार देण्यासाठीच आमच्यात पुरुष जन्माला येत, आणि अशा पुरुषाशी लग्न करण्यासाठीच मुली जन्म घेत.
“ हे शस्त्रकाम म्हणजे एक धार्मिक व्रत असे, विधी असे. कारागिराने आधी महिनाभर गहू व दूध याखेरीज काही आहार घ्यायचा नसे. पोलाद प्रथम सात दिवस मोराच्या रक्तात भिजत ठेवायचे. मग भट्टीत तापवून त्यास दिवसभर ठोके द्यायचे. तो तुकडा पसरून लांब झाला की तो दुमडून पुन्हा एक करावा लागे. त्यानंतर चौदा दिवस तो हरणाच्या रक्तात भिजत ठेवून मग पुन्हा एक दिवस भट्टीकाम. शेवटच्या तीन दिवसांसाठी चित्त्याचे रक्त लागे, पण शेवटच्या दिवशी जे काम करावे लागे, त्याच्या ताणाने पोलादी हात असलेली माणसे देखील चिरडून जात. आमच्या गावाशेजारी एक लहान नदी खडकावरून उडी घेते व खाली लहानसा डोह आहे. हिवाळ्यात या ठिकाणी इतकी थंडी असते की अंगातली हाडे आतल्या आत पिचू लागतात. कडेच्या दिवशी पोलाद त्या डोहाशेजारीच तापवावे लागे. मग ते थंड बर्फाळ वाऱ्यात फिरवून थंड करायचे, मग पुन्हा तापवून डोहाच्या पाण्यात थंड करायचे. असे हे सूर्यास्त होईपर्यंत चाले. त्याच रात्री मग पात्याला सहाण लावली की सकाळी पात्याकडे पाहताना धुराने काळ्या केलेल्या काचेतून पाहावे लागे. नाहीतर डोळे जळून जातील. आता बोल, असल्या तलवारी, कट्यारी मी आज करत बसू ? रक्ताने भरलेल्या बुधल्यांचा वास अद्याप माझ्या नाकातून जात नाही, पण मी आता मोरा-हरणांचे रक्त शोधत हिंडू ? आणि शेवट काय, तर असल्या कट्यारीला आज बाजारात एक दिनार किंमत यायची नाही !”
“थू:!” वृद्ध चिडून म्हणाला. “एडक्या ! तिला कट्यार, कट्यार म्हणू नको! तू उद्या वाघाला देखील पट्ट्यापट्टयाचे मोठे गावठी मांजर म्हणशील ! तिला सेरिपी म्हण.”
“सेरिपी ?” तो गांधळून म्हणाला व अकस्मात भयाने त्याचे सर्वांग थरथरले. सापाचे डोके अचानक पकडल्याप्रमाणे त्याचा हात थरथरला व नकळत पुन्हा त्याच्या तोंडून उच्चार झाला, “सेरिपी!”
“होय, आमच्या जमातीतील तो एक जुना शब्द आहे.” याकीर म्हणाला.
“म्हातार्याला चिडवण्यासाठी मी मुद्दामच वरचेवर कट्यार, कट्यार म्हणतो. ” त्याने डोळे मिचकावले.
पण त्याचे याकीरकडे लक्ष नव्हते. त्या पात्याच्या निळ्या मोहिनीने तो खिळल्यासारखा होऊन तिच्याकडे पाहत राहिला होता. ते एकदा हाताला चिकटल्यावर त्याला आता विभक्त करणे केवळ अशक्य आहे असे त्याला वाटले. त्याने एकदम विचारले, “तू ही विकत देतोस ? काय किंमत आहे त्याची?”
“थूः !” वृद्ध संतापाने म्हणाला. “म्हणे, विकत देतोस ? ती आता माझ्याबरोबर माझ्या शेजारी मातीत जाईल. विक तुझी आई !”
वारुळाप्रमाणे त्याच्या मनावर चढलेला बधिरपणा एकदम खाडकन उतरला व रक्त उसळून तो संतापाने वृद्धाकडे वळला. पण याकीरने त्याचा दंड पकडला व हळूच म्हटले, “म्हाताऱ्याचा आता जिभेवर ताबा नाही. त्याला माफ कर.” त्याने त्याला वळवले व बाहेर चलण्याविषयी खूण केली. त्या दालनाच्या मागच्या दाराने बाहेर आल्यावर तेथे थोडी मोकळी जागा होती व तेथील कुंपणाचे फाटक ओलांडले की रस्त्यावर जाता येत होते. लगेच दारात जमिनीत पुरलेला एक लाकडी खांब होता व त्याला पिवळी चोच व काळे अंग असलेला एक अगदी लहान सुबक पक्षी असलेला पिंजरा अडकवला होता. जाताना याकीर तेथे थांबला व त्याने एक बोट पिंजयाला धरताच पक्षी दांडीवरून उतरला व आपली सोन्याची चोच त्यावर हलकेच घासू लागला.
मोकळ्या हवेत आल्यावर त्याला बरे वाटले, पण पिशवीत ठेवलेली कट्यार परत करण्यास मात्र त्याची बोटे तयार होईनात. तेव्हा त्याने उतावीळपणे विचारले, “विकतोस ही कट्यार ? मी वीस दिनार देईन.”
त्याचा हात सोडून याकीर भितीला टेकून उभा राहिला. “विकायला माझी ना नाही. गेली वीस वर्षे ती तशीच पडून आहे. आणि तिच्या खऱ्या किंमतीला आता गिर्हाईक देखील मिळणार नाही. पण मी ती विकेन ते तुझ्या दिनारांसाठी नव्हे. नाण्यांची किमत कोणाला ? ज्यांच्याजवळ तितकी नाणी नाहीत त्यांना ! नाहीतर सोन्यासारख्या बडेजावी धातूचा काहीसुद्धा उपयोग नाही. मला जर विचारशील तर पोलादाचे एक पाते सोन्याच्या डोंगरापेक्षा अब्रूदार असते. मी ज्याप्रमाणे शस्त्रे गोळा करतो, त्याप्रमाणे अंगठ्याही गोळा करतो. तुझ्याकडे माझे प्रथम लक्ष गेले ते तरी तुझ्या बोटात ती अंगठी आहे म्हणून. तसली अंगठी मी पूर्वी एकदाच पाहिली होती, पण ती त्यावेळी समुद्रातून बाहून आलेल्या एका प्रेताच्या हातावर होती. ती अंगठी तू मला देशील तर कट्यार तुझीच आहे. ”
त्या शब्दांनी तो जागच्या जागी स्तंभित झाला व त्याची जीभ निर्जीव झाली. हातातील अंगठीकडे पाहताच त्याला सगळ्याचा विसर पडला. ही अंगठी अशा परक्या मुलखात परक्याला देऊन टाकायची? मग त्या नारिंगाच्या बागेतील भेटीचे काय ? तसल्या सुगंधी आठवणी सहजासहजी आयुष्यावरून उतरवता येतात का ?
तिला बागेत भेटायला बोलावून आपला निर्णय सांगण्यापूर्वी त्याने सतत विचार केला होता, बेचैन मनाने समुद्रकाठ अवेळी तुडवला होता, आणि आता माघार घेणे केवळ अशक्य आहे याची पूर्ण जाणीव झाल्यावरच त्याने निर्णय घेतला होता. आपण मुलख सोडून जाणार हे सांगताच ती संतापली नाही की चिरडून गेल्याप्रमाणे ती हुंदकेही देऊ लागली नाही.
“हे असे होणार हे मी एक महिन्यापूर्वीच जाणले होते.” ती म्हणाली होती. “तुझ्या मनाची असह्य वेदना माझ्यापासून लपवून ठेवण्यासाठी तू फार प्रयत्न केलेस, तरी मी मात्र ती केव्हाच ओळखली होती. ठीक आहे. त्या बाबतीतील निर्णय अखेर तुझा तुलाच घेतला पाहिजे, कारण असला क्षण इतका एकाकी असतो, की तेथे आता मला देखील कसले स्थान नाही हे मला माहीत आहे. पण नंतर कधीतरी, भविष्यकाळात, तुझ्या मनातील वादळ शांत झाल्यावर, तुझी पावले इकडे वळव.” तिने मग आपली अंगठी काढून त्याच्या बोटात घातली होती. “ही अंगठी मी तुला आठवणीसाठी देत नाही. असल्या गोष्टींनीच ज्याची आठवण राहू शकते ते आठवण ठेवण्याच्या किमतीचे नसतेच. ही तुझ्याजवळ असली की तू कधीतरी इकडे परत येशील असे मला वाटते इतकेच.मी आता जाते.”
मागे एकदाही न पाहता ती निघून गेली होती. तिने एकदाही, देठ वळवून कमळ इकडे फिरावे त्याप्रमाणे हात उंचावून बोटे हलवली नव्हती. तिच्या टाचा हिवाळ्यात पिसे लालसर होऊ लागलेल्या लहान मधपक्ष्याच्या छातीसारख्या होत्या. तिच्या अनवाणी टाचा आता असले दोन पक्षी अदबीने लवत मागच्या मागे सरकून निघून गेल्याप्रमाणे गर्द झाडीत निघून गेल्या, आणि चंद्राचा प्रकाश झाडांमधून पाझरताच त्याला जमिनीच्या स्पर्शामुळेच वास मिळाल्याप्रमाणे आता राईत नारिंगाच्या फुलांचा गंध असलेले चांदणे मात्र उरले. काही वेळा लहान मुलीप्रमाणे हट्टी व लहरी, हरणाप्रमाणे लाघवी, तर अनेकदा वार्याप्रमाणे लाडिकपणे सतावणारी अशी ती नाटकी– पण आता ती एकदम बदलून आडोशातील ज्योतीप्रमाणे शांत होऊन निघून गेली.
तिची ही अंगठी देऊन टाकायची ? आत मृत्यूच्या जिभेसारखी भीषण शस्त्रे, स्वतःची इतकी सुखदुःखे घेऊन जाणारी माणसे घोळक्यात एकाकी हिंडत असता पूर्ण निर्विकार राहिलेला हा परक्या देशातला परका हमरस्ता— येथे, या ठिकाणी ही चांदण्याचे शिंपण झालेली, नारिंगाच्या फुलांच्या वासाची अंगठी देऊन टाकायची ?
कस पाहण्यासाठी दगड पुढे यावा त्याप्रमाणे आयुष्यात असा एक क्षण समोर येऊन रोखठोक उभा राहतो. अशा वेळी कोण निर्णय घेत असते ? मग काही माणसे सुरक्षित सुखी घरदार टाकून, खेळण्यासारखी लहान गलबते अमर्याद सागरात टाकून अनावर ओढीने कोठेतरी वेड्याप्रमाणे निघून जातात. आभाळाला भिडलेल्या पर्वतशिखरांवर जाण्याची ईर्ष्या स्वीकारतात. कधी आपल्या गावाची वेस न ओलांडलेला माणूस दोन मदारीच्या उंटांचा मोर, हस्तिदंत, खडीसाखर, केशर आणि दालवीन लावून चाललेला कारवा पाहताच आपल्या माणसांचा निरोप देखील न घेता त्याच्याबरोबर चालू लागतो, आणि बगदाद, समर्कंद, इस्पहान, तास्कंद, सिकियांग, पेकीन असल्या जादूच्या रस्त्याने भटकत कोठेतरी दिक्कालापलीकडे विरून जातो. किंवा एखादा माणूस जगाकडे पाठ वळवून अंधार्या प्रयोगशाळेत, निरनिराळे हजार द्रव उकळत, जे अद्याप माहीत नाही ते माहीत करून घेण्यासाठी प्रचंड थडग्यातील जिवंत प्रेताचे एकाकी, हिणवलेले, वाळीत टाकलेले आयुष्य खुषीने जगतो. असल्या क्षणी निर्णय घेणारा कोण असतो ? आणि तो कशाच्या आधारे निर्णय घेतो ?
असल्या हकीकती ऐकल्या की मागे त्याला वाटे, कसली ही वेडी माणसे ! अंगणातल्या झाडाची सावली सोडून परमुलखात रखरखीत ऊन पीत हिंडणारी ही माणसे ! पण त्याच्या स्वतःच्याच आयुष्यात अंगावरील कवच फोडणारा असा क्षण आला होता तेव्हा त्याला त्यांचे वेड उमगले होते व तो स्वतःशी म्हणाला होता— त्यात आणखी मी एक ! त्याने कोणाचाही निरोप घेतला नाही, आपली म्हणून एक वस्तू उचलली नाही, आणि हिवाळ्याचा प्रवास सुरू करणाऱ्या पाखराप्रमाणे तो निघाला होता. नारिंगांच्या राईमधून वळताना त्याला वेदना झाल्या नाहीत असे नाही. पण आता त्याला वाटले, आपण मुद्दाम सन्मुख झालो तेव्हा हा क्षण अटळच होता. आणि एकदा तिकडे पाठ वळवल्यानंतर तिच्या अंगठीकडे पाठ वळवणे इतक्या यातनेचे का व्हावे बरे ?
त्याच्या मनातील खळबळ थांबली. त्याने झटदिशी अंगठी काढली व याकीरला दिली. याकीरने ती हातात घेऊन तिच्यावरील माणकाचे झाकण उघडले. त्या खाली किंचित पोकळी होती व त्यात अत्तराचा वाळलेला फाया होता. याकीरने त्याचा किंचित वास घेतला व तांबड्या भिंतीसारखा त्याचा चेहरा सुगंधी वार्यात हरवल्यासारखा झाला.
“ यास्मिनचा वास !” कोवळ्या आवाजात तो म्हणाला. “ माझ्या धर्मात चार गोष्टी सांगितल्या आहेत, तुला माहीत आहे ? मेहेंदी वापरावी, दात स्वच्छ ठेवावेत, बायको आणावी, आणि अत्तरांचा शौक करावा. यांतील एक मला या जन्मी जमणार नाही. बायकोकडून कधी लगाम घेणार नाही हा याकीर. मित्रा, सराईमध्ये थोडा वेळ राहून निघून जायचे असते; तेथे घरटे करायचे नसते ! ”
“तू मला कट्यार दिलीस खरी.” तो म्हणाला, " पण तुझा बाप– त्याला काय सांगणार तू?”
याकीर थोडा पुढे झाला व हलक्या आवाजात म्हणाला. “खरे सांगू ! केव्हा एकदा ही कट्यार घरातून जाते असे मला झाले होते. ती तुझ्याजवळ आहे तोपर्यंत घरात पैसा यायचा नाही, असे आई मला सतत म्हणे. ते थोडे खरे होते की काय असे मला अलीकडे वाटू लागले होते. आणि आता बापाचे काय‘– अगदी थोड्या दिवसांचे राहणे उरले आहे त्याचे. मी तुला दुसरी पिशवी देईन. या पिशवीत एखादी गावठी कट्यार घालून त्याला दाखवले तरी चालेल. तू ते पाहिलेस की नाही कुणास ठाऊक ! तो पूर्णपणे आंधळा आहे.
“आणखी एक सांगतो. ही कट्यारच काय, मला हे सगळेच एकदा फुंकून टाकायचे आहे. बापाच्या धाग्यामुळे मी इतके दिवस येथे गुलाम होऊन पडलो, पण नंतर मात्र माझा पाय तेथे राहायचा नाही. इतके दिवस मी तलवारी केल्या; आता मला तलवार वापरायची आहे. हातात तलवार व खाली परीच्या दातासारखा शुभ्र अरबी घोडा– यासारखे आयुष्य नाही. ज्या ठिकाणी गुराखी हिरे घेऊन खेळत असत ते अर्शियासारखे साम्राज्य गेले. नव्या, रुंद, विलक्षण नावाच्या नद्या ओलांडून आम्ही हूण लोकांना चिरडले– आणि त्या वेळी मी कोठे होतो ? तर या ठिकाणी तलवारी बडवत होतो ! पण अद्यापही साम्राज्ये आहेत. अर्शियाच्या पलीकडे अनॉलियम आहे. वानिशिया आहे. हाताला मनगट असले की तलवारीला क्षितिज नाही. हे सारे माझ्या देशासाठी, माझ्या लोकांसाठी, असे मात्र समजू नको. तसले ओझे घेऊन युद्ध भूमीवर हा याकीर जाणार नाही. तसले वेड असते ते माणसाच्या मनात; तलवारीच्या नव्हे. आणि युद्ध लढले जाते ते मनाने नव्हे तर तलवारीने. तलवारीला कसली आली आहे सदसद्विवेकबुद्धी ! निव्वळ सज्जन, सद्गुणी आहे म्हणून यशस्वी झालेला एक तरी दिग्विजयी तू मला दाखवू शकतोस ? आणि पराभूत झालेले का सगळे एकजात भेकड, दरोडेखोर होते ? पण गुणगान कोणाचे, जयजयकार कोणाचा तर विजयी झालेल्यांचा ! एक लक्षात ठेव. तलवार विजयी झाली तर सारे सद्गुण बटिकांच्या घोळक्याप्रमाणे मागे लागून येतात.
“युद्ध म्हणजे पंचवीस हजारांनी दहा माणसांना चिरडणे नव्हे किंवा कपटाने पाठीत खंजीर खुपसणे नव्हे. हत्ती ढकलून उंदीर चिरडण्याला मी युद्ध म्हणत नाही. तर समोरासमोर आपल्या तोलाचा प्रतिस्पर्धी असावा. त्याला मारण्याची तुला जेवढी संधी आहे, तेवढीच तुला मारण्याची संधी त्याला असली पाहिजे. आणि मुख्य म्हणजे त्यात एकाचा मृत्यू अटळ असला पाहिजे. तो किंवा मी ! मृत्यू परीक्षक असल्याखेरीज लढणे म्हणजे जनानखान्यातील गुलामांनी एकमेकांशी केलेले आचरट चाळेच होत. कदाचित शिकारीत मी फार सुखी झालो असतो. शिकार म्हणजे सशासांबरांची नव्हे– तर वाघ-सिंहांची, उन्मत्त झालेल्या हत्तींची शिकार ! मृत्यू त्यांच्या विक्राळ डोळ्यांत हजर असतो. मग तो तेथून उतरून आपल्याकडे येतो, की मागे सरून आपल्या करवी त्या प्राण्याचाच नाश करतो, हे नंतर ठरवले जाते. पण मला येथे वाघसिंह मिळणार कोठे ? हां, तर सांगत होतो, तोलामोलाचा सावध शत्रू समोर असावा आणि मग संग्रामही अशा दिलदारपणे करावा की आपली तलवार त्याच्या गळ्यात रुतली असतानाही अगदी कडव्या दुष्मनाने सुद्धा म्हणावे, ‘अरे, हा माझा वैरी जर माझा दोस्त असता तर माझ्या भाग्याचा स्वर्गाला हेवा वाटला असता. पण मला त्याच्या खालोखाल भाग्य मिळाले आहे. माझ्या वाट्याला असा नेकीचा वैरी आला !’
“हे सगळे माझ्या चालत आलेल्या धर्माप्रमाणे पाप आहे. पण गड्या, प्रत्येक मनुष्य स्वतःच एक धर्मसंस्थापक असतो. तोच संस्थापक आणि तोच अनुयायी, आणि पहिली निष्ठा या स्वतःच्या धर्माशी असते. शत्रूच्या रक्तातून पांढरा घोडा धावत असता त्याचे पाय गुडघ्यापर्यंत लाल व्हावेत— बस्स, हा माझा स्वर्ग आहे ! हां, कधीतरी दुसऱ्या एखाद्या याकीरचा घोडा माझ्या रक्तात नाचूनही लाल होईल– आणि तो देखील माझ्या स्वर्गाचाच एक भाग आहे. कोणाचे मांस काय, रक्त काय, कधी वर जात नाही. ते खाली जमिनीकडेच जाते. ते कसे खाली टाकायचे, एवढेच फार तर आपणास ठरवता येते. म्हणजे एकंदरीने काय, जर तू पुन्हा कधी भटकत इकडे आलास तर याकीर तुला येथे दिसणार नाही. तो कदाचित जिवंतही असणार नाही. तो, त्याची तलवार, आणि आता ही अंगठी असतील परक्या आभाळाखाली, परक्या मातीवर, किंवा कोण जाणे, परक्या मातीत ! ”
-oOo-
पुस्तक: रमलखुणा
लेखक: जी. ए. कुलकर्णी
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती चौथी, दुसरे पुनर्मुद्रण
वर्ष: १९९५.
पृ. ९६-१०७.
या वेच्यामधील शेवटच्या परिच्छेदामध्ये मी लहानसा बदल केला आहे. हा परिच्छेद म्हणजे दीर्घ असे भाषण होते. मोबाईलसारख्या लहान स्क्रीनवर हा सलगपणे वाचणे जिकीरीचे ठरते.त्यामुळे या परिच्छेदाचे मी चार लहान परिच्छेद केले आहेत. मूळ मजकुरात वा वाक्यांच्या क्रमवारीमध्ये काही बदल केलेला नाही वा भरही घातलेली नाही.
---