<< या सदराच्या निमित्ताने...
<< मागील भाग: चिमण्या - १ : सहजीवन
---
यावेळी मी इरेला पेटलो होतो. वेड लागले तरी बेहत्तर पण एकाही चिमणीला मी घरात येऊ देणार नव्हतो. वेड लागणार नाही तर आणखी काय होईल ? चिमण्यांवर पाळत ठेवण्याचे काम म्हणजे साधे प्रकरण नाही. आतापर्यंत मी त्यांच्याकडे कानाडोळा केला होता. कारण स्पष्ट आहे– त्यांच्यासंबंधीच्या मला बिलगून असलेल्या काव्यमय कल्पनांमुळे. परंतु या खेपेला त्यांनी आपला मोर्चा वळविला तो थेट माझ्या ऑईलपेन्टवाल्या फोटोकडेच.
मुख्य म्हणजे हा माझा फोटो मला अती प्रिय आहे. क्षणाक्षणाला चिमणा-चिमणीचा जोडीने प्रवेश, सोबत प्रतिसाद देणाऱ्या चार-दोन सोबतिणी, शिवाय जिवाला पिसाळून टाकणारा त्यांचा चिवचिवाट तो वेगळाच ! गवताच्या काड्या, कापसाचे लहान-मोठे तंतू, कागदाचे कपटे आदींचा नाजुक प्रपंच त्यांनी माझ्या डोक्यावर थाटायला सुरुवात केली होती. आतापावेतो माझी पुस्तके, बाहुल्या, फ्लॉवरपॉट्स आदींचाच त्यांनी उपयोग केला होता. म्हणून त्यांचा उपद्रव मी लक्षातच घेतला नव्हता. पण आत्ताचा त्यांचा पवित्रा मला माझ्याविरुद्ध कट केल्याप्रमाणे वाटत होता! ऑईलपेन्टवाल्या फोटोच्या संदर्भात मला तटस्थ राहणे अशक्य होते.
प्रथम मी दारे, खिडक्या बंद करून बसलो. फक्त तावदानांवर त्यांच्या चोचींचे आवाज उमटू लागले. त्यानेही मी अस्वस्थ झालो. शिवाय दारे-खिडक्या बंद केल्याने गुदमरल्यासारखे वाटू लागले, मग मी व्हेन्टिलेटर्स उघडले. आमच्या घराचे व्हेन्टिलेटर्स थेट व्हिक्टोरियन एजमधील आहेत. लँडलॉर्ड लंडनला वगैरे जाऊन आले म्हणून घराची ही शोभा ! थोड्याच वेळात अगदी माझ्या नाकासमोरून एक चिमणी सुर्रदिशी उडून गेली. पंखांच्या फडफडीतून गळलेले धुळीचे कण माझ्या सर्वांगावर, आणि नाकाला झोंबलेली दुर्गंधी यामुळे मी कासावीस झालो. एक निळ्या रंगाचा कापडाचा तुकडा तिने आपल्या नवीन घरट्यात– म्हणजेच माझ्या डोक्यावर ठेवून दिला. आता काय करावे ?
पुन्हा दारे- खिडक्या उघडल्या आणि हातात काठी घेऊन त्यांच्या पाळतीवर बसलो. त्या येताना दिसल्या की, मी काठी फिरवून त्यांना पिटाळून लावीत असे. कंटाळा आला. असे किती वेळ करणार ? मग फोटोवरील त्यांचे घरकुलच निपटून काढले. बाहेर चिमण्यांचा आक्रोश ऐकू येत होता. त्या दिवशी पुन्हा मात्र त्या माझ्या फोटोकडे फिरकल्या नाहीत. मीही निश्चिंत झालो.
संध्याकाळी बाळू वैद्य आला. त्याचे आयुष्य लष्करात संपलेले. चिमण्यांच्या उपद्रवाची कथा मी त्याला निवेदन केली. ‘अगदी मी सुद्धा त्यांच्या त्रासाने हैराण झालो होतो !’ बाळू म्हणाला. ‘मग काय केले म्हणतोस ?’ ‘एअर गन वेऊन दारात बसलो. दहा-पाच चिमण्या खलास केल्या. पुढच्यांची आवक थांबली.’ बाळूच्या पराक्रमाने मी शहारलो. हे म्हणजे, चिमण्यांचा खून वगैरे फारच होते!
दुसर्या दिवशी पहाटेपासूनच चिमण्यांनी मोडलेले घरकुल बांधण्याचा परिपाठ सुरू केला. आता यांची कशी सोय लावावी या विवंचनेत मला चटकन एक गोष्ट आठवली. चिमण्यांची घरटी उपटून अंगणात जाळली म्हणजे पुन्हा त्या वास्तूत त्या येतच नाहीत. एवढा साधा उपाय आपल्याला ठाऊक असूनही नेमक्या वेळी आठवला नाही, म्हणून मी स्वतःवरच चरफडलो. ऐन दुपारी त्यांनी अर्धवट रचलेले घरटे मी उपटून काढले आणि खुशाल अंगणात आणून पेटवून दिले; ओंजळभर वाळलेले गवत जळायला कितीसा वेळ लागणार ?
दुसऱ्या दिवशी एकही चिमणी घरात नाही. एका जीवघेण्या कटकटीतून मुक्त झाल्याचा आनंद मला झाला. थोड्या वेळाने मात्र मीच परत अस्वस्थ होत असल्याची मला जाणीव होऊ लागली. चिमण्या अंगणात नाहीत ? घरात नाहीत ? म्हणजे काय ? तेवढ्यात कुत्र्याच्या रडण्याचा आवाज माझ्या कानावर आला. मी चरकलो. त्यांचे घरकुल आपण पेटवून दिले म्हणून आपल्यावर त्यांनी बहिष्कार तर टाकला नाही ना ? माणसांनी टाकलेले बहिष्कार मी समजू शकतो. मी ते पचविलेही आहेत. परंतु चिमण्यांनी टाकलेला बहिष्कार पान खाऊन तोंडावर थुंकण्यासारखा मला वाटला ! माणसांच्या संस्कृतीत निर्दयतेचेही पश्चात्तापाने, नव्हे क्षमा केल्याने परिमार्जन होऊ शकते. प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या जीवनक्रमात अशी एखादी सोय नसेल काय ? संतापाच्या भरात गवताच्या निर्जीव काड्या पेटविताना मला काहीच वाटले नाही. घर उद्ध्वस्त केल्याची, जाळल्याची कल्पना मात्र आता माझा पाठलाग करू लागली. काडीकाडीने रचलेले घरटे जाळून टाकणे आणि एअरगनने चिमण्यांचे खून पाडणे यातल्या क्रौर्यातील भेदाची सीमारेषाच मला दिसेना !
अजूनही झोपेच्या वेळी छोट्या मंडळींना चिऊ-काऊची गोष्ट सांगताना माझे शब्द निसरडे होतात. माझ्यातल्यां विसंगतीने मला कुरतडायला सुरुवात केली.
माझ्या अंगणात
चिमण्यांची किलबिल
हळू पाय टाका
भुर्रऽ उडुनी जातील
इथे माझ्या गळ्याला कोरड पडली. पायाच्या आवाजाने उडून जाणारे पक्षी; नव्हे बालगोपालांच्या किलबिलाटाने उसळणाऱ्या एका घराचे प्रतिबिंब माझ्या डोळ्यांवर तरंगू लागले; आणि मी चिमण्यांच्या घराला आग लावली होती !!
‘धानाइसाशी कवडा’ खेळणाऱ्या चक्रधरांची कथुली मला आठवली. त्याच वंशातील एका घरकुलाची मी वाताहत लावली होती! समोर औदुंबर दिसत होता. त्याच्या कानात वाऱ्याने गुणगुणलेल्या ओळी मला इथे मोठ्याने ऐक येऊ लागल्या–
तृण कोटरात
चिमण्यांची शाळा
घेउनि निजला
औदुंबर...
चिमण्यांनी आपल्या अंगणात, आपल्या घरात यायलाच पाहिजे ! त्यांचा बहिष्कार ? कल्पनाच असह्य होती. मी हातात मूठभर तांदूळ घेऊन अंगणात टाकले; पण शुकशुकाट; एकही चिमणी नाही. कमालीचा अस्वस्थ झालो. त्यांना घरटी बांधायला सुलभ जावे म्हणून माझ्या फोटोवर खर्ड्याचा एक डबाही ठेवून पाहिला. चिमण्या नाहीत! याच महापुरुषाने आपले घरटे उद्ध्वस्त केले हे कदाचित त्या विसरल्या नसतील म्हणून माझा फोटोच मी तिथून हलविला. कुठून तरी चिवचिव आवाज आला. साऱ्या शक्ती एकवटून मी उभा राहिलो. एक अनोळखी चिमणी माझ्या दारात उभी होती. क्षणभरच– आणि चिमण्यांचा एक कळप झंझावातासारखा आला व तिलाही आपल्यात गुंडाळून माझ्या– हो, माझ्याच दारावरून उडून गेला.
-oOo -
पुस्तक: चर्चबेल.
लेखक: ग्रेस.
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन.
आवृत्ती दुसरी (पुनर्मुद्रण).
वर्ष: २०००.
पृ. ५-८.
---
पुढील भाग >> चिमण्या - ३ : निरोप
हा प्रसंग धडा म्हणून होता कुमारभारती की युवाभारती मध्ये.
उत्तर द्याहटवाओह. कुणाला ग्रेसचा ललित निबंध अभ्यासक्रमात घ्यावासा वाटला हे विशेषच म्हणायचे.
हटवा