सोमवार, ८ जानेवारी, २०२४

वेचताना... : चिमण्या

आँधी आई ज़ोर शोर से,
डालें टूटी हैं झकोर से।
उड़ा घोंसला अंडे फूटे,
किससे दुख की बात कहेगी!
अब यह चिड़िया कहाँ रहेगी?

हमने खोला अलमारी को,
बुला रहे हैं बेचारी को।
पर वो चीं-चीं कर्राती है
घर में तो वो नहीं रहेगी!

घर में पेड़ कहाँ से लाएँ,
कैसे यह घोंसला बनाएँ!
कैसे फूटे अंडे जोड़ें,
किससे यह सब बात कहेगी!
अब यह चिड़िया कहाँ रहेगी?

- महादेवी वर्मा

दीड-एक वर्षांपूर्वी आरे वनक्षेत्रातील झाडे रातोरात कापल्यावर होऊ लागलेल्या टीकेचा प्रतिवाद करताना एक मित्र म्हणाला, ‘एकशेचाळीस कोटींच्या जनतेला जगवण्यासाठी विकास हवा. त्यासाठी आवश्यक ते सारे केले पाहिजे.’ हे म्हणत असताना गरजेपेक्षा कैकपट कमवून बसलेला हा मित्र विकासाच्या प्रत्येक पेटीतला अतिशय मोठा हिस्सा हा गरजा आधीच भागलेल्यांनी बळकावलेला असतो, हे सोयीस्कररित्या विसरला. स्वत:च्या गरजा भागल्यानंतरही विकासाचा अधिकाधिक वाटा आपल्याकडे वळवून घेणार्‍या त्याच्यासारख्यांमुळेच एकशेचाळीस कोटींमधील बहुसंख्येच्या गरजा दुर्लक्षितच राहात असतात, हे समजून घेण्याची त्याची तयारी नव्हती.

एवढेच नव्हे, तर त्याच्यासारखे विकासाचे हे लाभधारक याच असंतुष्ट गरीबांचे सैन्य अग्रदल (vanguards) म्हणून पुढे करत आणखी विध्वंसक विकासाची मागणी रेटत असतात. आणि त्याआधारे विकासाची नवी पेटी तयार होते तेव्हा त्यातीलही मोठा भाग पुन्हा आपल्या पदरी पाडून घेत असतात. यातून एकशेचाळीस कोटींतील बहुसंख्येच्या गरजा अपुर्‍याच ठेवून, आणखी वाढवून, आणखी महाग करून, त्यांच्यामध्ये नव्या असंतोषाची पेरणी करतात– जेणेकरुन विध्वंसक विकासाची मागणी शांत होणार नाही याची खातरजमाच करून घेत असतात.

खरे तर एकशेचाळीस कोटींना पुरेल इतकी साधनसामुग्री निसर्गातून घेतली जाते, मानवाकडून कृत्रिमरित्या निर्माणही केली जाते आहे. या मित्रासारख्यांनी आपल्या गरजाच नव्हे तर पुरेशी चैन करूनही उरणार्‍या पैसा व साधनसामुग्रीबाबत असणार्‍या ‘आणखी हवे, आणखी हवे’ या आपल्या हपापलेपणाला आवर घातला तर सर्वांच्या गरजा सहज भागू शकतात हे वास्तव आहे. त्यासाठी ‘गरजांच्या प्रमाणात वाजवी वितरण’ करणार्‍या धोरणाची नि आपल्या अनिर्बंध लालसेला, स्वार्थाला लगाम घालण्याची गरज आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि याची जाणीव प्रशासन, धोरणकर्त्यांनी रुजवणे गरजेचे आहे. पण सर्व उत्पादनासह वितरणच नव्हे तर सामाजिक, न्यायिक जबाबदार्‍याही खासगी क्षेत्राच्या खांद्यावर देण्याची धोरणे राबवणारी सरकारी इतकी किचकट जबाबदारी अंगावर घेऊ इच्छित नाहीत ही भारतासह बहुतेक देशांची शोकांतिका आहे.

आरेमधील झाडे तोडणे याचा अर्थ केवळ काही सुटी झाडे तोडण्याइतका नसतो. वनक्षेत्रातील जमिनीचा एक तुकडा म्हणजे एक परिसंस्था असते. ती परस्परांवर आधारित असे जीवन जगणार्‍या असंख्य सजीवांचा जीवनाधार असते. ती झाडे तोडणे याचा अर्थ झाडांसोबतच त्या सार्‍या जीवांची हत्या करणे असाच असतो. अर्थात ‘विकासफिरू’ माणसाला याचे काही सोयरसुतक नसते. काही वर्षांपूर्वी या मुद्द्याबाबत बोलणे चालू असताना स्वत:ला अ‍ॅन रँडवादी म्हणवणारा कट्टर भांडवलशाही समर्थक एक मित्र म्हणाला होता, ‘बट ह्यूमन फर्स्ट, राईट? आपण बलवान प्राणी आहोत तर आपण प्राणिसृष्टीवर राज्य करणारच. सृष्टीचा हाच नियम नाही का?’

या व्यक्ती अजूनही प्राचीन टोळी मानसिकतेमध्येच जगत असतात. भौतिक प्रगतीसोबतच माणसाने सामाजिक, सांस्कृतिक, भावनिक प्रगती केल्याचे त्यांच्या खिजगणतीतही नसते. हे लोक हर्बर्ट स्पेन्सरच्या ‘सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट’ या तत्त्वाचा आधार घेत असतात. स्पेन्सरच्या या अर्धवट विधानाचा आधार घेत असताना ‘बलाचा संघर्ष’ हे उत्क्रांतीचे एकमेव आधारतत्त्व नसून परस्पर-सहकाराचे तत्त्वही तिचा मूलाधार असते हे ते विसरतात... बहुतेक भांडवलशाही समर्थक विसरत असतात. क्वार्टरली रिपोर्ट्स आणि त्यात दाखवावे लागणारे नफ्याचे वाढते आकडे हा एकमेव निकष ठेवून विकासाचे आराखडे आखले जात असताना, गुणवत्तेसह पर्यावरण, नातेसंबंध, सामाजिक सौहार्द वगैरे बाबी वेगाने दुय्यम होऊन जात आहेत.

पण ही मानसिकता केवळ भांडवलशाही समर्थकांमध्येच आहे असे नव्हे. स्वत:ला सर्वसमावेशक कल्याणकारी मार्गाचे अध्वर्यू समजणारे कम्युनिस्टही यात मागे नाहीत. डाव्या राजवटी या नेहमीच एकाधिकारशाही राबवत असल्याने सत्ताधार्‍यांच्या आकलनाच्या कुवतीनुसार वा लहरीनुसार त्यांची धोरणे आखली जाताना दिसतात. निसर्गाविरोधातील सर्वात नृशंस म्हणता येईल अशी मोहिम चीनमध्ये माओ राजवटीमध्ये राबवली गेली. त्याच्या ’ग्रेट लीप फॉरवर्ड’ या संकल्पनेअंतर्गत माणसाचे शत्रू ठरवलेल्या उंदीर, डास, माश्या आणि चिमणी यांचे निर्दालन करण्याची मोहिम (four pests campaign) राबवली.

‘चिमण्या धान्य खातात आणि दुष्काळाच्या काळात शेतातील प्रत्येक दाणा माणसासाठीच असला पाहिजे’ अशी गर्जना माओने केली होती. या ‘ह्युमन फर्स्ट’ धोरणाला अनुसरून चिमण्या, त्यांची अंडी, पिले यांना हरप्रयत्नाने नष्ट केले गेले. या प्रयत्नात अडाणी नागरिकांनी इतर पक्ष्यांचाही संहार केला. त्याचा परिणाम म्हणून अनेक किडींचा प्रादुर्भाव वेगाने वाढला. पाठोपाठ आलेल्या टोळधाडीने पक्षी खातील त्याहून कैकपट अधिक धान्य स्वाहा केले. टोळांवर ताव मारणारे पक्षी दुर्मीळ झाल्याने त्यांच्या झुंडींना मोकळे रान मिळाले होते. आता त्यांचे निर्दालन करण्याची जास्तीची जबाबदारी माणसावर येऊन पडली. आणि ही मोहिम चिमण्या निर्दालन मोहीमेहून कैकपट किचकट ठरली. निसर्गचक्राचे, पर्यावरणाचे, विज्ञानाचे पुरेसे ज्ञान नसलेले आणि स्वत:च्या समजुतीबाबत फाजील आत्मविश्वास असणारे नेते असले की काय घडते याचे उत्तर उदाहरण म्हणून या मोहिमेकडे बोट दाखवले जाते.

माओच्या चार पावले पुढे टाकत ‘ज्यातून पैसा निर्माण होतो ते सारे समर्थनीय’ असा बाणा घेऊन आपले धोरण-प्रमुख आणि नागरी, सुखवस्तू मंडळी वाटचाल करत आहेत. यातून निसर्ग, जीवनशैली, आरोग्य या जगण्याच्या महत्त्वाच्या पैलूंच्या संदर्भात आपण काय किंमत मोजतो याची फिकीर त्यांना राहिलेली नाही. एकोणीसाव्या शतकाच्या अंतापर्यंत माणसाने पुनर्भरण न करता ओरबाडलेला निसर्ग आणि केवळ गेल्या एका शतकात ओरबाडलेला निसर्ग याचे प्रमाण भयानकरित्या व्यस्त आहे. हे जसे प्रगतीचे लक्षण आहे तसेच आपण भावी पिढ्यांच्या वाट्याचे बरेच काही स्वाहा करत असल्याचे लक्षणही. परंतु बहुसंख्य मनुष्यप्राणी याबाबत अनभिज्ञ आहेत. ज्यांना त्याचे थोडेफार भान आहे त्यांनी ‘पुढच्या पिढ्यांची चिंता आपण करण्याचे कारण नाही’ असे समजून त्यांनी तिकडे डोळेझाक करण्याचा सोपा मार्ग अवलंबला आहे. त्यांच्या कर्माने वाढलेल्या गरजा, महागाई यांच्या पूर्तीसाठी अल्प-उत्पन्न गटातील लोक, अनागरी लोकही नाईलाजाने त्यांच्या मागोमाग फरफटत जात आहेत.

शहरीकरण आणि तंत्रज्ञान हे नव्या जगाचे मूलमंत्र होऊ लागले आहेत. त्यांचे फायदे नाकारता येत नाहीत हे खरे असले, तर सुरुवातीला दिलेल्या उदाहरणात म्हटल्याप्रमाणे ‘विकासासाठी आवश्यक ते सर्व करावे लागेल’ असे विकासाचे मोकाट मॉडेल वापरणे नक्कीच धोकादायक आहे. त्याचे निसर्ग, पर्यावरण आणि पर्यायाने भविष्यातील मानव-पिढ्यांवर यांचे काय परिणाम होतील याचे दाखले आताच मिळू लागले आहेत. कुठे अतिवृष्टी, कुठे अकाली वृष्टी, कॅलिफोर्नियासारख्या सुजलाम्‌ सुफलाम्‌ प्रदेशात निर्माण झालेली पाणीटंचाई, भारतासारख्या मोसमी पावसाच्या प्रदेशात आता जवळजवळ बारमाही पडणारा पाऊस, दिल्लीमध्ये प्रत्येक हिवाळ्यामध्ये निर्माण होणारी प्रदूषणजन्य आणिबाणी... अशी अनेक उदाहरणे डोळ्यासमोर आहेत. परंतु निसर्गाशी शून्य संबंध येणार्‍या आणि देशातील धोरणात्मक व्यवस्था बव्हंशी ज्यांच्या ताब्यात आहे अशा नागरी माणसाला त्याबाबत फारसे काही करावे असे वाटत नाही. किंबहुना भांडवलशाही प्रसारमाध्यमांतून होणारा ‘पर्यावरण-हानी ही दंतकथा आहे’ हा भाडोत्री प्रचार सोयीस्कर ढाल म्हणून वापरणे आता त्याच्या अंगवळणी पडले आहे.

भरपूर शेती-उत्पादन नि पिकांची नासाडी करणारी पाखरे असतात तशीच तिच्यावरील किडींचे निर्दालन करणारी पाखरेही असतात याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होते. रासायनिक कीडनाशकांनी किडीबरोबर त्यांचा वंशविच्छेदही होत जातो. त्यातून त्यांनी नियंत्रणात ठेवलेल्या काही किडींचा प्रादुर्भाव वेगाने होतो. पण त्यातून नव्या कीटकनाशकांसाठी बाजारपेठही उपलध होते असे हे भांडवलशाही समर्थक तत्परतेने सांगतील. ‘निसर्गाचे देणे असलेल्या अनेक वनस्पतीजन्य पदार्थांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या परागीभवनाच्या प्रक्रियेसाठी मधमाशांसारखे कीटक मुख्य भूमिकेत असतात' हे विसरून आपल्या परिसरातून त्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा चंग माणसाने बांधलेला दिसतो.

गेल्या तीन-चार दशकांत तंत्रज्ञानाने नागरी जीवन आमूलाग्र बदलले. इंटरनेट आणि मोबाईल यांनी जगाचा वेग कल्पनातीत वाढवला. त्यातून येऊ लागलेल्या संपत्तीला काँक्रीटच्या घरट्यांची आवश्यकता वेगाने वाढू लागली. त्यातून नागरी जगामध्ये झाडांसह सर्व अन्य सजीवांची पीछेहाट सुरू झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कृपेने काँक्रीटच्या गृहप्रकल्पांमध्ये एखाद-दोन झाडांना राखीव जागा देण्यात आली. तेवढ्यावर संतुष्ट राहावे असे त्यांना बजावण्यात आले. अवाढव्य व्याप्तीच्या गृहप्रकल्पांमध्ये शोभिवंत हरळीचे पट्टे ऊर्फ लॉन राखले जाऊ लागले. परंतु त्यावरही कीटकनाशके फवारून कीटकांना ‘प्रवेश बंद’ करण्यात आला. त्यावर जगणारे पक्षी अन्न नि निवारा या दोनही गोष्टींचा तुटवडा निर्माण झाल्याने माघार घेऊ लागले.

आपल्या भवतालाकडे डोळसपणे पाहिले तर अनेक बदल दिसून येतात. नागरी मध्यमवर्गीय ते उच्चवर्गीय वसत्यांकडे पाहिले तर केवळ घराचीच नव्हे तर आसपासची जमीनही काँक्रीट, इंटरलॉकिंग ब्लॉक्स, सिमेंटचा कोबा आदी मार्गाने सारवून निर्जीव करून टाकलेली असते. गेल्या दशकभरात सिमेंट कंपन्यांच्या रेट्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी रस्त्यांचे भयानक वेगाने काँक्रीटीकरण सुरु केलेले आहे. या प्रचंड काँक्रीटच्या थरामुळे शहरांचे सरासरी तपमानही वाढू लागले आहे. या दोहोंचा एकत्रित परिणाम म्हणून जमिनीवरील कीटकांच्या परिसंस्था नाहीशा झाल्या आहे. त्यांतून त्यांच्यावर जगणार्‍या पक्ष्यांना अन्नाचा तुटवडा पडू लागला आहे.

त्यातच अर्धवट डोक्याच्या– स्वत:ला जीवप्रेमी समजणार्‍यांच्या जमातींच्या कृपेने आयते अन्न खाणारे कबुतरांसारखे पक्षी शिरजोर होऊन त्यांचा दादागिरीपुढे उरल्यासुरल्या छोट्या पक्ष्यांना माघार घ्यावी लागली आहे. जिचे नावच House-Sparrow अर्थात घर-चिमणी असे ठेवण्यात आले– इतक्या मुबलक प्रमाणात नि सहज आढळणारा पक्षी भारतातील शहरांतून दिसेनासा झाल्याचे एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला ध्यानात आले आणि पर्यावरणवादी मंडळींनी त्यावर आवाज उठवण्यास सुरुवात केली.

पण अर्वाचीन मानव हा टोळीमानवापेक्षाही अधिक कर्मकांड-प्रधान आयुष्य जगणारा प्राणी आहे. केवळ धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रातच नव्हे तर अन्य क्षेत्रातही तो आपल्या भावना व्यक्त करण्याचे कर्मकांड निर्माण करतो आणि तेवढे उरकले की आपण आपली जबाबदारी पार पाडली असे समजून पुन्हा आपल्या विध्वंसक, स्वार्थी जगण्याकडे परतून जात असतो.

एक दिवस ‘मिच्छामि दुक्कडम्‌’ म्हणून पापक्षालनाचे कर्मकांड उरकले की उरलेले दिवस त्याच चुका नव्याने करण्यास तो मोकळा होतो; होळीच्या दिवशी मनातील सारे क्लेष, वैषम्य, द्वेष जाळून टाकताना केलेला गालीप्रदान कार्यक्रम संपला की द्वेषाचे, ईर्षेचे नवे अंकुर रुजवायला सुरुवात करतो; ‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करा, तिचा वापर करा’ म्हणत एक दिवसाचा ‘बस डे’ साजरा करून झाला– आणि वृत्तपत्रांत व समाजमाध्यमांवर फोटो प्रसिद्ध करून झाले– की दुसर्‍या दिवशी पुन्हा कारमधून एकेकटे प्रवास करायला सुरुवात होते; नुकत्याच घडलेल्या कुठल्याशा गुन्ह्याबद्दल समाजमाध्यमांवर जोरदार निषेध, आगपाखड करून झाली की अन्य प्रसंगी आपल्या जातीच्या, धर्माच्या, संघटनेच्या, राजकीय पक्षाच्या एखाद्या नेत्याच्या त्याच गुन्ह्याबद्दल ‘हा आमच्याविरोधात कट आहे’ म्हणत कोडगे समर्थन सुरू होते... अशा वेळी पर्यावरण या सर्वांच्या सामूहिक अज्ञानाचा विषय असलेल्या क्षेत्राबाबत तसेच घडते यात नवल नाही.

चिमणीबद्दलच्या जागरुकतेचे जवळजवळ असेच झालेले दिसते. २०१० या वर्षापासून २० मार्च हा दिवस ‘चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला जाऊ लागला. तो अक्षरश: साजराच केला जाताना दिसतो. गेल्या आठ-दहा वर्षांत मी पाहिले तर यादिवशी काय होते? चिमण्यांना घरटे बांधण्यासाठी खोके, बॉक्स ठेवा वगैरे अवैज्ञानिक सल्ले दिले जातात. पक्ष्यांसाठी गॅलरीमध्ये, खिडकीमध्ये पाणी ठेवण्याचा तांत्रिकदृष्ट्या उपयुक्त पण त्यापूर्वी पक्षी पुरेशा संख्येने आहेत हे गृहित धरणारा, नि म्हणून एक प्रकारे मर्यादित उपयुक्त असा सल्ला पुन्हा पुन्हा दिला जातो. चिऊ-काऊच्या कविता हाताशी धरून वृत्तपत्रीय लेख पाडले जातात. समाजमाध्यमी जगात डीपीवर चिमणीचे चित्र ठेवले जाते...

एक वर्षी आलेल्या बातमीमध्ये ‘...स्पॅरो पार्टीज, स्पॅरो पिकनिक, स्पॅरो प्रोसेशन, बर्ड वॉक्स, स्पॅरो वॉक्स हे कार्यक्रम सोशल मीडियावर घेतले जातील. आयोजनकर्त्यांनी त्यांचा कार्यक्रम संकेतस्थळावर टाकल्यानंतर तो गुगल मॅप व सोशल मीडियावर दिसू लागेल. कार्यक्रमाच्या यजमानांना प्रशस्तिपत्रही दिले जाणार आहे...’ हे वाचून माणसाची एकुण कर्मकांडप्रधान आणि ‘वेचावी बहुतांची लाईके’ प्रवृत्ती पुन्हा दिसून येते.

प्रदूषणावर नियंत्रण राखण्यासाठी मोजमाप म्हणून निर्माण केलेल्या ‘कार्बन फूटप्रिंट’ संकल्पनेचे क्रयवस्तूमध्ये रूपांतर करून ‘कार्बन क्रेडिट्स’ची उत्पादन(?) आणि विक्री करण्याची भन्नाट संकल्पना व भांडवलशाही आणि तिच्या समर्थकांचीच. यातून मन:पूत प्रदूषण करून चार पैसे फेकून इतर कुणाकडून क्रेडिट्स जमा करून आपला प्रदूषण ताळेबंद समतोल करण्याची सोय, प्रदूषणकारी उद्योगांना उपलब्ध झाली. त्यासाठी प्रामुख्याने कार्बन क्रेडिट्सचे उत्पादन उद्योग चालवण्याची सुपीक कल्पनाही यातूनच निर्माण झाली. मूळ हेतूला हरताळ फासून नवे कर्मकांड, नवी क्रयवस्तू शोधत भोगाची नवनवी दालने उघडण्याचे अर्वाचीन मानवाचे कौशल्य वादातीत आहे.

त्यातून पीछेहाटीचा, अस्तंगत होण्याचा धोका समोर असणार्‍या चिमण्या किंवा एकुणात विरत चाललेल्या प्राणिजीवनाने पुन्हा उभारी घ्यायची असेल तर त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन नि राजकीय इच्छाशक्ती (विशेषत: निसर्ग-शत्रू असलेल्या उद्योगांच्या व्यावसायिकांसमोर गुडघे न टेकण्याइतपत ताठ कणा) असण्याची गरज आहे. आजवर याबाबत एकच उदाहरण दिसते आहे. चिमण्यांच्या (आणि एकुणच पक्ष्यांच्या) घटत्या संख्येसाठी दोन महत्त्वाचे घटक कारणीभूत होतात असे निश्चित करण्यात आले. (अर्थात तज्ज्ञांमध्ये मतभेद असतात तसे त्याबाबतही आहेत, यात विकासफिरू तज्ज्ञांचा समावेश असणे ओघाने आलेच.)

पहिले म्हणजे शेतात फवारली जाणारी रासायनिक कीटकनाशके आणि दुसरे मोबाईल टॉवर्समधून होणारा किरणोत्सार. या दोहोंमुळे पक्ष्यांच्या अंड्याचे कवच पातळ राहणे. त्यात पिलू विकसित होण्यास पुरेसे जीवद्रव्य समाविष्ट नसणे वगैरे गोष्टींचा उहापोह करण्यात येत असतो. त्याआधारे केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने ‘मोबाइल टॉवर्समधून निघणाऱ्या विद्युत चुंबकीय उत्सर्जना’चा प्रदूषणकारी गोष्टींच्या सूचीमध्ये समावेश केला.

२०१० मध्येच सरकारने मोबाइल हँडसेट व टॉवर्ससाठी नवे नियम जाहीर केले. २०१० मध्येच सरकारने मोबाइल हँडसेट व टॉवर्ससाठी नवे नियम जाहीर केले. त्यानुसार टॉवर्समधून होणार्‍या विद्युत चुंबकीय उत्सर्जनाची मर्यादा २ वॉट‌्‍स प्रति कि.ग्रा. वरून १.६ वॉट‌्‍स प्रति कि.ग्रा. इतकी कमी करण्यात आली. एक किलोमीटर अंतराच्या आत नव्या टॉवर्सना मनाई करण्यात आली. परंतु शेती हा दिवसेंदिवस आतबट्ट्याचा होत चाललेला व्यवसाय असल्याने त्या क्षेत्रात रासायनिक कीटकनाशकांच्या संदर्भात कडक निर्णय करणे सरकारला शक्य होत नाही. सेंद्रिय कीटकनाशकांची परिणामकारकता रासायनिक कीटकनाशकांच्या तुलनेत बरीच उणी असल्याने शेतकरीही त्याबाबत हतबल झालेला दिसतो.

काही दशकांपूर्वी वनक्षेत्रातील पर्यावरण व जीवसाखळी पुनरुज्जीवित करण्यासाठी, राखण्यासाठी एक सर्वंकष धोरण ‘प्रोजेक्ट टायगर’ नावाने आखले गेले त्याच धर्तीवर चिमणीबाबत किंवा पक्ष्यांच्या घटत्या संख्येबाबत करावे लागेल. वनक्षेत्राबाबत बदल करणे तुलनेने सोपे होते कारण तिथे सर्वभक्षी नि विकासफिरू मानवाचा स्वार्थ फार अडकलेला नव्हता. पक्ष्यांबाबत नि एकुण पर्यावरणाबाबत आज काही आमूलाग्र बदल करायचे तर सुरुवातीला दिलेल्या दोन विकासफिरु उदाहरणांप्रमाणे बहुसंख्येची ढाल पुढे करून विरोध केला जातो. त्याला उद्योग-व्यावसायिकांची, बिल्डर्सची आणि त्यांच्या भाट संशोधक-तज्ज्ञांची साथ लाभत असते. त्यामुळे चिमणी दूर गेल्याचे दु:ख करण्यापलिकडे – आणि ‘चिमणी डे’ साजरे करण्यापलिकडे – फारसे काही करणे आपल्या हाती उरलेले नाही.

- oOo -

रानमेवा_चर्चबेल

चिमणीसंदर्भातील आपल्या या प्रवासाचे प्रतिबिंब उमटलेले दोन ललित-लेख माझ्या वाचण्यात आले. चतुरस्र लेखक व्यंकटेश माडगूळकर बालपण खेड्यात व्यतीत करून पुण्यासारख्या शहरात स्थायिक झालेले. त्यामुळे त्यांनी दोन्ही ठिकाणच्या अनुभवांच्या आधारे ‘रानमेवा’ या संग्रहामध्ये एक लेख लिहिला आहे आहे. दुसरा लेख ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’ मधील आहे. या दोनही लेखांचे शीर्षक लेख ‘चिमण्या’ असेच आहे . या दोहोंमध्ये मिळून मानव-चिमणी संबंधातील सहजीवन, दुरावा आणि निरोप असे तीन टप्पे मला दिसले. हे तीन वेचे ‘चिमण्या’ या एका सदरामध्ये इथे प्रसिद्ध करतो आहे. यातील पहिला नि तिसरा वेचा माडगूळकरांच्या लेखातील आहे तर दुसरा ग्रेस यांचा. हे तीनही लेख एक-एका आठवड्याच्या अंतराने प्रकाशित केले जातील.

चिमण्या - १ : सहजीवन
चिमण्या - २ : दुरावा
चिमण्या - ३ : निरोप

---

टीप:
कवितांच्या जगातील चिमणीचा वेध घेणारा प्रा. नीला कोर्डे यांचा दैनिक लोकसत्ता मध्ये प्रकाशित झालेला लेख:  'या चिमण्यांनो, या गं या '


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा