कथा महाभारतातली आहे. उद्योगपर्वाच्या एकशे सहाव्या अध्यायात आलेली आहे. ती प्रक्षिप्त आहे का, हे मला माहीत नाही. त्याची जरुरीही मला वाटत नाही. महाभारत म्हणून या ग्रंथात जेवढे आणि जसे उपलब्ध आहे तेवढे आणि तसे निर्माण करणाऱ्या सर्जनशीलतेला मी व्यास असे नाव देते, इतकेच. ती कथा कुणा एका व्यासाने लिहिली असेल किंवा वेगळ्याच कुणी मागाहून ती महाभारतात मिसळून दिली असेल. त्या कथेतले सामाजिक वास्तव कदाचित् महाभारतकालीन असेल, कदाचित् पूर्वकालीन असेल आणि ते महाभारत-काळात किंवा भारतोत्तर काळात कुणी तरी कथाबद्ध करून भारतात घातले असेल किंवा कदाचित् ती उत्तरकालीन भरही असेल. ज्या कुणी ती कथा लिहिली त्याने एका सामाजिक वास्तवाची ठिणगी तिच्यात पकडली आहे, असे मात्र मला वाटते.
कथा आहे श्रीकृष्ण-शिष्टाईच्या वेळी कौरवसभेत सांगितली गेलेली. पांडवांना राज्य न देण्याचा आपला दुराग्रह दुर्योधन सोडीत नाही, असे पाहिल्यावर अनेक ज्येष्ठांनी त्याला नाना प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी महर्षी नारदांनी त्याला वेड्या हट्टाचा परिणाम कसा भयंकर होतो, हे समजावण्यासाठी विश्वामित्रशिष्य गालवाची एक गोष्ट सांगितली. महाभारतकारांच्या लेखी ती माधवीची नव्हे, तर गालवाची गोष्ट आहे. नारदांच्या लेखीही ती गालवाचीच गोष्ट आहे. अर्थातच कथेचा गाभा गालवाने केलेल्या वेड्या हट्टाचा आहे, अतिरेकी आग्रहाचा आहे. माधवी तर कथालेखक आणि कथानिवेदक दोघांच्याही दृष्टीने नगण्य आहे.
गालव विश्वामित्राचा एकनिष्ठ शिष्य. गुरूच्या कठीण काळात त्याने गुरूची सेवा न कंटाळता, एकाग्रपणे केली. प्रसन्न होऊन विश्वामित्राने त्याला स्वगृही परतण्याची अनुज्ञा दिली; पण गुरुदक्षिणा दिल्यावाचून जाणे गालवाला बरे वाटेना. त्याने पुन्हा पुन्हा विश्वामित्राला आग्रह केला. प्रथम सौम्यपणे त्याला समजावणारा विश्वामित्र अखेर गालवाच्या अतिरेकी हट्टाने रागावला आणि त्याने मोठी विचित्र गुरुदक्षिणा मागितली : ज्यांचा एक कान काळा आहे, असे पांढरेशुभ्र आठशे घोडे !
गालव पडला गरीब ऋषिकुमार. असे दुर्मिळ प्रकारचे आठशे घोडे तो कुठून आणणार ? त्याला आपल्या हट्टाची शिक्षा फार महागात पडली. अगदी हतबल होऊन तो शोक करू लागला. एवढ्यात पक्षिराज गरुड तिथे आला. तो गालवाचा मित्र होता. त्याने गालवाची व्यथा ऐकली आणि घोडे किंवा ते मिळवण्याइतके द्रव्य कुणाकडून तरी मिळवून आणण्याचा उपाय त्याने गालवाला सुचवला. इतकेच नव्हे, तर तो स्वतः गालवाला घेऊन द्रव्यसंपादनासाठी निघाला.
इथे या कथेत गरुडाबरोबरच एका चिमुकल्या उपकथेचाही प्रवेश झाला, पण तिच्याबद्दलचे सारे नंतर ! गालवाला घेऊन गरुड निघाला तो नहुषपुत्र ययातीकडे आला. ययाती मोठा दानशूर आणि उदारचरित राजा. पण त्याच्याजवळ त्या प्रकारचे घोडे नव्हते अन् ते दुसरीकडून विकत घेण्यासाठी गालवाला धन द्यावे म्हटले, तर तेवढे धन त्याच्या कोषात नव्हते.
वस्तुस्थिती अशी होती, पण गालवासारख्या ब्राह्मणाला तसेच रिकाम्या हाती परत पाठवणे ययातीला पटेना. कारण अतिथीला विन्मुख पाठवणे हे शास्त्राने सर्वांत मोठे पाप मानलेले. तसे केले, तर वंशच्छेदाचे भय ! राजाने विचार करून गालवाला म्हटले, ‘माझ्याजवळ प्रत्यक्ष द्रव्य नाही, पण जिच्यामुळे तुला हवी ती गोष्ट मिळू शकेल अशी वस्तू मी तुला देतो.’
तत्तु दास्यामि यत्कार्यमिदं सम्पादयिष्यति |
अभिगम्य हताशो हि निवृत्तो दहते कुलम् ||
ती वस्तू खरोखरच इष्टफळ देणारी होती. तिचे नाव होते माधवी. ही माधवी म्हणजे ययातीची स्वतःचीच मुलगी होती. त्यामुळे तिच्यावर ययातीचाच पूर्ण अधिकार होता. शिवाय ती अल्पवयीन होती. तेव्हा ययातीला तिचे भाग्य ठरवण्याचा हक्कही होता आणि ते त्याचे कर्तव्यही होते. आणि पुन्हा माधवी ही अशी वस्तू होती की, जी बापाच्या कीर्तीत भरच घालील. वय लहान, तरी गुणी. स्वतःच्या आईबापांचे आणि नवऱ्याच्या आईबापांचे असे चार वंश कायम राखणारे मायपोट तिच्याजवळ होते. देवांनाही हेवा वाटावा असे सुलक्षणी वागणे होते अन् मनुष्यमात्रांना मोह घालणारे रूपही होते. हे सारे ज्या वस्तूत एकवटले आहे, तिच्या बदल्यात आठशे घोडेच काय, आख्खी साम्राज्ये सुद्धा गालवाला मिळू शकणार होती. नव्हे ययातीची– माधवीच्या बापाची तशी खात्रीच होती.
अस्याः शुल्कं प्रदास्यन्ति नृपा राज्यमपि ध्रुवम् |
किं पुनः श्यामकर्णानां हयानां द्वे चतुश्शते ||
ययातीने गालवाला आपली मुलगी दिली. फक्त त्याने एक लहानशी अट घातली. त्याने म्हटले की, माधवीच्या ठायी होणाऱ्या पुत्रावर तो माझा वंशवर्धन, माझा नातू म्हणून माझा हक्क असावा. अन् ययातीचे हे मागणे अगदी योग्य होते. कारण पुत्र हाच तर वंशाचा दिवा. मुलगी झाली तरी वंश चालवण्यासाठी पुत्रच हवा. मुलीचे काम पुत्रोत्पत्तीचे. तिला खाऊपिऊ घातले, तिला वाढवली ती कशासाठी ? अतिथी विन्मुख गेला असता, तर वंशच्छेद झाला असता, पण रूपगुणसंपन्न माधवी होती म्हणून गालवाची सोय झाली. आता अतिथीने माझीही सोय पहावी, असे राजाला वाटले, तर गैर नव्हते. शिवाय त्यात गालवाचा काहीच तोटा नव्हता. माधवीच्या बदल्यात त्याला इष्ट वस्तू मिळाली, तर राजालाही इष्ट ते द्यायला त्याची हरकत ती काय असायची ?
अशा प्रकारे विनिमयाची योजना निश्चित करून ययाती आणि गालव दोघेही संतुष्ट झाले. अन् मग गालव माधवीला घेऊन निघाला. तो प्रथम गेला हर्यश्व राजाकडे. अयोध्येचा हा राजा मोठा संपन्न आणि समृद्ध राजा होता. त्याला मूलबाळ नव्हते, एवढीच एक उणीव. गालवाने माधवीचा प्रस्ताव राजापुढे मांडला. माधवीला पाहून राजा अक्षरशः काममोहित झाला. ती होतीच तशी. जे अवयव उन्नत हवेत ते उन्नत, जे बारीक हवेत ते बारीक, जे आरक्त हवेत ते आरक्त अशी ती अप्रतिम देहसौंदर्याची खाण ! तिला भोगावे आणि तिच्या ठायी पुत्रोत्पत्ती करावी, म्हणून हर्यश्व उत्सुक बनला.
पण त्याच्याजवळ गालवाला पाहिजेत तसले घोडे मात्र दोनशेच होते. मग त्याने तोड काढली. माधवी त्याला पाहिजेच होती. त्याने म्हटले की, ‘निदान एक पुत्र जन्माला येईपर्यंत हिला माझ्याकडे ठेव आणि नंतर दुसऱ्याकडे घेऊन जा. उरलेले घोडे दुसऱ्याकडून मिळव !’
माधवीला स्वतःलाही ही योजना पटली, किंबहुना तिनेच ती स्पष्ट मांडली. तिचे लहान वय आणि तिला लाभलेले देहलावण्य पाहता हर्यश्वाकडे तिला ज्या गोष्टीसाठी आणले होते, त्या गोष्टीचे तीव्र आकर्षण कदाचित् तिच्या मनात जागे झाले असेल. कदाचित् कथेच्या निर्मात्याला माधवीचा रुकार आवश्यक वाटला असेल. ते काहीही असो, तिने रुकार दिला खरा. शिवाय प्रत्येक प्रसूतीनंतर पुन्हा कुमारी होण्याचा वरही तिला असल्याचे तिने सांगितले. हा वर केवढा उपयुक्त होता ! गालवाला त्यामुळे केवढा दिलासा मिळाला असेल ! कारण एकदा हर्यश्वाने वापरल्यानंतर इतर वस्तूंप्रमाणे माधवीचे मूल्य यत्किंचितही कमी होणार नव्हते ! अक्षत कुमारी भोगण्याची इतर राजांची स्वाभाविक इच्छा माधवीच्या बाबतीत नेहमीच पुरी होऊ शकणार होती !
माधवी हर्यश्वाजवळ राहिली. तिला वसू नावाचा एक मुलगाही झाला. ठरलेली मुदत पुरी होताच गालव तिथे आला आणि हर्यश्वाच्या संपत्तीचा किंवा आपल्या संततीचाही मुळीच लोभ न धरता, पुन्हा कुमारी बनून माधवी गालवाबरोबर निघाली. मग गालव तिला घेऊन दिवोदास राजाकडे आला. माधवीची बहुधा जरा काळजीच वाटत होती त्याला. तिच्या नाजुक शरीराला हे सारे कसे झेपणार, असे त्याला वाटत असेल आणि ती हर्यश्वात मनाने गुंतली असेल की काय, असेही पुसटसे वाटून गेले असेल. म्हणून त्याने माधवीला मोठ्या स्नेहाने म्हटले,
महावीर्यो महीपालः काशीनामीश्वरः प्रभुः |
दिवोदास इति ख्यातो भैमसेनिर्नराधिपः ||
शनैरागच्छ, मा शुचः |
धार्मिकः संयमे युक्तः सत्ये चैव जनेश्वरः ||
तत्र गच्छावहे भद्रे |
‘तू फार कोवळी आहेस. ये. हळूहळू जाऊ. अणि मी तुला भलत्या पुरुषाकडे नेत नाहीये. दिवोदास फार धार्मिक आणि संयमी म्हणून प्रसिद्ध आहे.’
दिवोदासाने माधवीची हकिकत पूर्वीच ऐकली होती. त्यामुळे त्याने गालवाचा प्रस्ताव लगेच स्वीकारला. पण तोही हर्यश्वाप्रमाणे. दोनशे घोड्यांच्या बदल्यात आणि एका पुत्रोत्पत्तीपर्यंत. माधवीला प्रतर्दन नावाचा मुलगा झाला. तोवर ती दिवोदासाजवळ राहिली आणि पुन्हा एकदा त्याच्या वैभवाचा लोभ सोडून गालवाबरोबर निघाली.
भोजनगरीचा राजा उशीनर हा तिचा तिसरा मालक बनला. गालवाला आता अधिक ठिकाणी फिरण्याचा आणि अधिक काळ घालवण्याचा बहुधा कंटाळा आला. त्याने उशीनराला चारशे घोड्यांच्या बदल्यात, दोन पुत्रांच्या जन्मासाठी माधवी देऊ केली, पण उशीनराचा नाइलाज होता. त्याच्याजवळही तसले दोनशेच घोडे होते. मग उशीनरापासून माधवी शिबी नावाचा मुलगा (पुढे जो शिबी राजा म्हणून प्रख्यात झाला) प्रसवली आणि नंतर गालव सहाशे घोडे आणि माधवीला घेऊन पुढे निघाला. एवढ्यात त्याला गरुड भेटला अन् त्याने पृथ्वीच्या पाठीवर एक कान काळा असलेले शुभ्र घोडे फक्त सहाशेच आहेत, अशी माहिती गालवाला दिली. पण आता गालवाला फार चिंता करण्याचे कारण नव्हते. उरलेल्या दोनशे घोड्यांच्या बदल्यात माधवी काही काळ विश्वामित्राकडे राहू शकत होती. तोच उपाय गरुडाने गालवाला सुचवला. गालवाने तसेच केले.
विश्वामित्राने माधवीला पाहिले अन् तो चकित झाला.‘अरे, त्या सहाशे अश्वांसाठी एवढी वणवण कशाला केलीस ?’ तो गालवाला म्हणाला, ‘हिला जर पहिल्याने माझ्याकडेच आणले असतेस, तर मीच चार पुत्र होईपर्यंत हिला ठेवून घेतली असती. मलाही चार वंशवर्धक मुलगे मिळाले असते !’
पण गालवाच्या हातून गोष्ट तर घडून गेली होती. मग विश्वामित्राकडे माधवी राहिली. अष्टक नावाचा एक मुलगा तिला झाला आणि घोड्यांची किंमत ज्याची त्याने वसूल करून पुरी झाली. आता सर्वांची तृप्ती झाली होती. ज्यांनी ज्यांनी घोडे दिले, त्या तीनही राजांना काही काळ माधवीचा भोग मिळाला, शिवाय एकेक पुत्र मिळाला. विश्वामित्राला घोडे तर मिळालेच, शिवाय माधवीच्या उपभोगासह एक पुत्रही मिळाला.
मग गालवाने माधवी पुन्हा आणून तिच्या बापाच्या म्हणजे ययातीच्या स्वाधीन केली. त्याने माधवीची स्तुतीही केली. चार मुलग्यांना जन्म देऊन तिने आपल्या पित्याचे, तिच्या ठिकाणी पुत्र उत्पन्न करणाऱ्या चार पुरुषांचे आणि गालवाचेही तारण केले, असे त्याला वाटले, तर नवल नाही.
भलता हट्ट धरणाऱ्या गालवाला त्या एका हट्टापायी किती काळ, किती श्रम पडले, हे सांगण्यासाठी नारदांनी दुर्योधनाला ही गोष्ट सभेत सांगितली आणि तिचा उत्तरार्ध ‘रमणीय’ आणि ‘बोधप्रद’ असा होता, म्हणून तो पुढचा कथाभागही सहज ओघात सांगून टाकला.
पुढे काय झाले की, माधवीचे लग्न करायचे ययातीने ठरवले. चार जणांपासून तिला मुले झाली म्हणून काय झाले ? तिला पुन्हा अक्षत कुमारी होण्याचा वर नव्हता का ? मग माधवीला तिच्या भावांनी सजवलेल्या रथात बसवले अन् सारीकडे हिंडवले. पण माधवीला एकही राजपुरुष पती म्हणून नको होता. तिने ‘वन’ हाच आपला पती निवडला अन् वनवास स्वीकारला.
माधवी आनंदाने वनात तपश्चर्या करीत राहिली. पुढे तिचा बाप ययाती स्वर्गात गेला आणि तिथे अभिमानापायी आपला पुण्यक्षय करून बसला. त्याला स्वर्गातून पृथ्वीवर परतण्याची वेळ आली. तो खाली आला तो थेट माधवीपासून जन्मलेल्या त्याच्या चार नातवांच्या यज्ञधूमाच्या वाटेनेच. त्याची ओळख पटली, तेव्हा त्याच्या नातवांनी त्याला पुन्हा स्वर्गारूढ होण्यासाठी आपले पुण्य देऊ केले. सहज म्हणून तिथे आलेल्या माधवीनेही आपले पुण्य दिले. गालवाने थोडासा हिस्सा दिला अन् ययाती पुनश्च स्वर्गात जाऊन सुखाने राहू शकला.
अशी ही माधवीची संपूर्ण गोष्ट. खरे म्हणजे माधवीकरिता ती सांगितली गेलेलीच नाही, हे जाणवले, तेव्हा मी प्रथम थोडी दुखले. मला वाटले की, कुंतीची जीवनकथा शेवटी तिचीच जीवनकथा आहे; द्रौपदीची आयुष्यकहाणी तिची म्हणूनच सांगितली गेली आहे; पण इथे या माधवीचा स्वतःच्या आयुष्यावर निदान गोष्टीपुरता देखील अधिकार नाही. ती गोष्ट शेवटी गालवाचीच आहे. स्त्रीला सहज साधेपणाने वस्तू म्हणून वापरणाऱ्या पुरुषजातीच्या प्रतिनिधीची आहे.
पण नंतर जसजशी कथा वाचत पुढे आले, तेव्हा ते पहिले दुखलेपण किती तरी क्षुल्लक ठरले. कथेतल्या माधवीचा श्वास हळूहळू माझ्या छातीत भरून येऊ लागला. तिचे गरम रक्त माझ्या धमनीतून वाहायला लागले आणि त्या सगळ्या घटना-प्रसंगांचा एक प्रचंड दाबच माझ्यावर आला. माधवीचे शरीर उपभोग्य वस्तू म्हणून वापरण्याच्या त्या सगळ्या व्यापारी उद्योगातला ओंगळपणा ज्या धर्माच्या आणि शास्त्राच्या नावाखाली चालला होता, त्या धर्मशास्त्राने तर मला अक्षरशः भिंतीशी दाबून, कोंडून धरावे तसे गुदमरून टाकले.
सुरुवातीला माझ्यात दाटून आला तो प्रचंड भावनिक क्षोभ ! तो माधवीच्या व्यक्तिगत दुःखाचा होता. अगदी अल्पवयीन अशी ती कोवळी सुंदर मुलगी ! तिला नुकते नुकते शरीराचे धर्म समजू लागले असतील. वासनांचे सुरेख ऐंद्रिय उमाळे तिच्यात नव्याने जन्मू लागले असतील. ती तशीच बापाच्या आज्ञेवरून कुणा अनोळखी ब्राह्मणामागून चालत एका राजपुरुषाच्या पुढ्यात उभी राहिली असणार. तिच्या इच्छा, तिच्या गरजा पुरत्या समजायच्या आतच तिच्या बापाने तिला खरेदी-विक्रीच्या व्यवहारातले चलन बनवले. तिला लग्न होईपर्यंत बापाचेच नशीब होते. बापाने ज्याच्या हाती दिले, त्याच्याबरोबर ती हर्यश्वाकडे आली. तिने हर्यश्वाकडे रहायला अनुकूलताही दर्शविली.
का बरं ? का नाही तिने त्या सौद्याला नाही म्हटले ? हे एरवी मी तीव्रपणे स्वतःशी उद्गारले असते; पण आता माझ्यातला माधवीभाव जेव्हा पुरेसा जागा झालेला होता, तेव्हा मला सहज जाणवू लागल्या कोवळ्या, नैसर्गिक आकर्षणाच्या छटा ! माधवीजवळ, त्या अनाघ्रात कुमारीजवळ असेल थोडे कुतूहल, थोडी उत्सुकता, थोडे आकर्षण ! किंवा नसेलही तसे काही. ती मुकी आणि अनभिज्ञही असेल, पण तिची संमती कथानिवेदकाला किंवा कथेच्या निर्मात्यालाच आवश्यक वाटली असेल. जशी प्रत्येक पुरुषाला त्याला हव्याशा असलेल्या शरीरभोगाच्या वेळी स्त्रीची अनुकूलता सदैव असायला हवी असते, तशी माधवीची अनुकूलता त्याने निर्माणही केली असेल.
किंवा मुळातली माधवी असेलही कुणी वनकन्या, एखाद्या भटक्या आदिवासी टोळीप्रमुखाची मुलगी, जिच्या जमातीत एका बाईला अनेकांनी वापरणे हे गैर मानले नसेल पुरुषांनी आणि सवयीने स्त्रियांनीही. कोण जाणे काय असेल, पण माधवी हर्यश्वाकडे राहिली. नंतर आणखी दोघांकडे आणि मग विश्वामित्राकडेही. तिच्या मनाच्या आणि शरीराच्या अवस्थेचा पुसट देखील उच्चार कथेने केलेला नाही. विश्वामित्राने विचित्र गुरुदक्षिणा मागितल्यावर खचून गेलेल्या गालवाचा शोक कथेत विस्ताराने वर्णन केला आहे, पण माधवीचे दुःख किंवा सुख सांगणारी एकही ओळ नाही. एकही शब्द नाही.
कदाचित् हर्यश्वाकडून निघालेली माधवी शरीराने थकली असेल. तिच्या अल्पवयीन शरीराला, प्रौढ राजाचा शृंगार सोसलाही नसेल. तिच्या मनात एक उदास दुःख भरून राहिले असेल. गालव तिला म्हणाला, ‘तू फार कोवळी आहेस. आपण हळूहळू चालू. तू दुःख करू नको. हा दुसरा दिवोदास फार चांगला आणि इंद्रियदमन करणारा आहे.’ म्हणजे काय ? माधवी समागमाच्या त्या पहिल्या अनुभवातून खचली असेल, चुरमडली असेल, असे मानायला मला इथे जागा सापडली आणि गालव-ययातीच्या जातीबद्दलचा तीव्र संताप मनात जन्मण्याआधीच माझ्यातली माधवी स्वतःविषयीच्या करुणेने भरून गेली.
ज्या ज्या राजांनी तिला वापरले, त्यांतल्या एकाही महाभागाचे मन तिच्यात गुंतले नाही आणि तिच्या शरीराचा लोभ स्पष्टपणे व्यक्त केल्यावाचून एकही जण राहिला नाही. अगदी विश्वामित्रासारखा ब्रह्मर्षीही ह्या गोष्टीला अपवाद नाही.
तिचा बाप ययाती. त्याची थोरवी काय सांगावी ? त्याने आपल्या वंशच्छेदाच्या भीतीने, अतिथि-सत्काराच्या गरजेने सरळ माधवी दुसऱ्याला देऊन टाकली. तिचे मूल्य सांगून देऊन टाकली. शिवाय तिच्या वंशावर आपला हक्क सांगितला आणि पुढे त्याचा पुण्यक्षय झाल्यावर पुन्हा स्वर्गारूढ होण्यासाठी तो हक्क त्याला उपयोगीही पडला.
माधवीच्या आयुष्याचे मात्र काय झाले ? गालवाचे काम झाल्यावर ती चार मुलांची आई पुन्हा आपल्या बापाकडे परत आली. कुमारी म्हणून पुन्हा बापाने आणि भावांनी तिचे लग्न करून द्यायचा घाट घातला. पण तिच्याशी कोण लग्न करणार ? मला वाटते की, तिला शोधूनही नवरा मिळाला नसेल आणि तिला भावांनी वनात सोडून दिले असेल. किंवा तिलाच पुरुषजातीचा एवढा वीट आला असेल की, तिने स्वतःच वनवासाचा आग्रह धरला असेल किंवा ती वनकन्याच असेल अन् आपल्या जमातीत परतली असेल.
कोण जाणे काय असेल ! उदास आणि विरक्त होऊन जाण्याइतके भयानक तिने भोगलेच होते, हे तर नक्की. माधवीचे हे व्यक्तिगत दुःख माझ्या मनात माझे होऊनच जिवंत झाले, तेव्हा मला माझ्या स्त्रीत्वाची लाजच बाजारात उघड्यावर मांडली गेल्यासारखे वाटले. मला वाटले की, काळाच्या ओघात बाईमाणूस कितीही पुढे जगत आले, तरी हे दुःख जराही कमी व्हायचे नाही. तसेच जळते राहील. संस्कृतीच्या हृदयात ठिणगीसारखे राहूनच जाईल. माझी करुणा अशी स्वतःविषयीची होती. ज्या सामाजिक वास्तवाने बाईला वस्तूपण दिले, त्या पुरुष- प्रभावी वास्तवाविषयीही होती.
- oOo -
पुस्तक: काळोख आणि पाणी.
लेखक: अरुणा ढेरे.
प्रकाशक: सुरेश एजन्सी.
आवृत्ती पहिली.
वर्ष: नोव्हेंबर १९९१.
पृ. १२६-१३३.
---
पोस्टकर्त्याची टीप:
खुद्द वडिलांनी, एका ब्राह्मणकुमाराने, क्षत्रिय राजांनी, एवढेच नव्हे तर विश्वामित्रासारख्या सृष्टिनिर्मात्या ऋषीनेही जिच्याकडे एक क्रयवस्तू, एक भोगवस्तू म्हणूनच पाहिले त्या माधवीच्या विदीर्ण आयुष्याने, तिच्या वेदनेने प्रसिद्ध हिन्दी कवी चन्द्रप्रकाश गोयल यांना विलक्षण व्यथित केले. त्या असंवेदनशील, शोषक पुरुषांच्या जातीत जन्मल्याची अपराधभावना घेऊन त्यांनी माधवीप्रती आपली क्षमायाचना ‘बोलो माधवी’ या दीर्घकाव्यातून रुजू केली आहे. इतके विलक्षण संवेदनशील काव्य अर्वाचीन काळात रचले गेले नसावे. माझ्या मते त्याला अर्वाचीन महाकाव्याचा दर्जा द्यायला हवा. आपल्या सुदैवाने प्रसिद्ध मराठी कवयित्री आसावरी काकडे यांनी ‘बोल माधवी’ या शीर्षकाखाली ते मराठीमध्ये आणले आहे. तो अनुवादही अतिशय तरल नि यथातथ्य उतरलेला आहे. त्या अनुवादाला साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला आहे.
संबंधित लेखन: आपलं आपलं दु:ख
वि का राजवाडे यांचे भारतीय विवाह संस्थेचा इतिहास नावाचे एक छोटेखानी पुस्तक वाचले. त्यातही अतिथीला स्वस्त्री दान करण्याची पद्धत होती असे लिहिले आहे. स्त्रीला क्रयवस्तू समजणे आणि त्या परंपरेचे अनुसरण करणारा समाज आजही आहे. त्यामुळेच परंपरेचा गौरव करणाऱ्या लोकांबद्दल चीड निर्माण होते.
उत्तर द्याहटवा