सोमवार, १५ जानेवारी, २०२४

बेकी म्हणे...

मला माझ्यासारख्याच विक्षिप्तांबद्दल नेहमीच कुतूहल असते. मग ‘बिग बँग थिअरी’ बघताना मी स्वत:ला शेल्डन कूपरशी रिलेट करुन मी ही त्याच्यासारखाच बुद्धिमान असल्याचा समज करुन घेतो. किंवा ‘डॉक मार्टिन’मधल्या डॉ. मार्टिन इलिंगहॅमसारखा मी ही ‘ill mannered’ असलो तरी ‘well meaning' माणूस असल्याचा ग्रह करून घेतो. आपल्यासारखी काही गुणवैशिष्ट्ये दाखवणार्‍या व्यक्तींचे इतर गुणही आपल्यात आहेत हा –सोयीचा– भ्रम फारच सार्वत्रिक आहे. एखाद्या गटाशी जोडून घेत त्या गटाच्या गुणांचे क्रेडिट अनायासे पदरी पाडून घेणारेच बहुसंख्य असतात. पण ते जाऊ दे.

चित्रपट, मालिका वगैरे पाहताना विषय, मांडणी, आकलनाला वाव आणि अखेर पदरी काय पडेल (What will I take home?) या विचाराने मी निवड करत असतो. एकाच धाटणीचे– गणिती भाषेत मांडून पाहिले तर काही पूर्वसुरींचे अवतार, पुनर्मांडणी सदृश दिसत असतील अशांवर मी फुली मारत असतो. शेक्स्पीअरच्या कुठल्याशा नाटकातील पात्रांची नावे घेत पुन्हा अंडरवर्ल्डमधील सत्तासंघर्ष मांडून पैसा वसूल करणार्‍यांची चलाखी मी साफ उधळून लावतो, तसंच केवळ तेच ते कंबरेखालचे विनोद विकून पैसे कमवू पाहणार्‍या इंग्रजी मालिकांनाही मी झटकून टाकतो. ‘करमणूक म्हणून जर काही पाहात असू तर त्यात पुन्हा डोक्याला ताप का करा’ म्हणत थ्रिलर हा प्रकारही मी बाजूला ठेवतो. करमणूक म्हणूनच काही पाहायचे असेल तर, त्यांनी मेंदूत काही जागा व्यापू नये, बाकी शून्यच राहावी म्हणून काही वेळा ज्यांना ‘फील गुड’ म्हणतात अशा काही मालिका वा चित्रपटांची निवड करतो. मेंदूत असलेल्या गुंत्यामध्ये भर पडून आपल्या विचारांचे विषय भरकटू नयेत असा हेतू यामागे असतो. पण गंमत अशी की अशा केवळ करमणुकीतूनही काही तरी डोक्यात रुजून जाते... पण सजगपणे पाहिले तरच.

सुरुवातीलाच उल्लेख केलेली ‘डॉक मार्टिन’ ही तशीच एक मालिका. डॉ. मार्टिन इलिंगहॅम हा एक निष्णात हृदयरोग तज्ज्ञ आहे. लंडनसारख्या महानगरामध्ये एका प्रथितयश रुग्णालयाचा तो आधारस्तंभ आहे. आपल्या विषयाशी केवळ प्रामाणिकच नव्हे तर त्यातील अक्षरश: किडा म्हणावा असा हा डॉक्टर. अगदी लहान-लहान लक्षणांवरून बिनचूक निदान– अनेकदा तर आजाराचा त्रास होण्यापूर्वी, आगाऊच (आणि अनेकदा आगाऊपणेही) करताना दिसतो. सारे आयुष्य त्याचसाठी समर्पित राखलेले असल्याने मार्टिन इतरांशी जेवढ्यास तेवढा संपर्क राखणारा आहे. त्यातच आडपडदा न ठेवता, आडवळणे न घेता, समोरच्या व्यक्तीच्या संभाव्य प्रतिक्रियेचा, मान-अपमानाचा विचारही न करता रोकठोक आणि मोजके बोलणारा हा डॉक्टर साहजिकच माणूसघाणा म्हणून प्रसिद्ध असतो.

एका उपचारादरम्यान आलेल्या अनुभवातून या प्रथितयश सर्जनला चक्क ‘रक्तगंड’ (hemophobia) होतो– रक्त पाहिले की त्याला उलटी होऊ लागते. असे विपरीत घडल्याने त्याचे सर्जन म्हणून स्थान अर्थातच धोक्यात येते. त्या मनोगंडावर उपचार असा नाहीच. त्याला सामोरे जात, हळू-हळू पुन्हा एकवार रक्ताशी जुळवून घेणे हाच एक मार्ग आहे. परंतु हा दीर्घकालीन उपाय आहे. आणि तो यशस्वी होत नाही तोवर त्याला पर्यायी व्यवसायाची निवड करण्याशिवाय गत्यंतर नाही.

आता ज्याला वैद्यकीय ज्ञानापलिकडे काही फारसे ज्ञात नाही, इतर कशांतही त्याला रस नाही, अशा व्यक्तीला पर्यायी व्यवसाय करणे जवळजवळ अशक्यच. मग वैद्यकीय क्षेत्रातच पण रक्ताचा थेट संपर्क येणार नाही म्हणून साधा बाह्योपचार तज्ज्ञ (physician) म्हणून काम करण्याचा निर्णय तो घेतो. आता ‘जिथे फुले वेचली तिथे गोवर्‍या वेचणे’ अवघड असल्याने तो तूर्त लंडनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतो. यात आपली ही समस्या आपले कार्यक्षेत्र असलेल्या लंडनमध्ये याची फारशी प्रसिद्ध होऊ नये– जेणेकरून या मानसिक आजारातून बाहेर आल्यानंतर परतून येण्यास सोपे जावे, हा हेतूही असतो. लंडनसारख्या अफाट विस्ताराच्या महानगरातून तो थेट ज्या गावातील संपूर्ण वैद्यकीय जबाबदारी एकच डॉक्टर शिरी वाहातो अशा एका लहानशा गावात येऊन पोहोचतो.

पोर्ट वेन (Port Wenn) हे समुद्रकिनार्‍याजवळ डोंगरउतारावर वसलेले लहानसे निसर्गरम्य गाव. मार्टिनच्या आत्येचा तिथे लहानसा मळा आहे. त्या निसर्गरम्य परिसरात त्याच्या चित्तवृत्ती उल्हसित होतील आणि आत्येची सोबत असल्याने अगदीच अपरिचित वाटणार नाही असा त्याचा होरा असतो. विशेष म्हणजे तेथील औषधोपचार केंद्राचा उल्लेख ‘सर्जरी’(१) असाच होत राहतो. मार्टिन हा ‘माजी सर्जन’ ते केंद्र सांभाळू लागतो. महानगरी व्यवस्थेच्या तुलनेत सर्वस्वी भिन्न, अधिक घट्ट अशा त्या समाजव्यवस्थेमध्ये सामावण्यास त्याला नि तेथील लोकांना येणार्‍या अडचणींतून मार्ग काढत, कोणतेही भावनिक बंध न जोडता (अपवाद एकच– पण तो ही तुम्हा-आम्हा बॉलिवुडी संस्कारात वाढलेल्यांच्या दृष्टीने अगदीच अन-रोमँटिकच म्हणावा असा) हा डॉक्टर हळूहळू त्या समाजाचा अविभाज्य भाग होऊन जातो. त्याचे वादातीत निदान-कौशल्य, तसंच व्यवसाय व सामाजिक बांधिलकीचे विविध प्रसंग मांडत ही मालिका पुढे सरकत जाते.

या मालिकेतील एक भाग– खरंतर त्यातील एक पात्र नि तिच्या संदर्भातील घटनाक्रम मात्र नको नको म्हणता माझ्या डोक्यात बस्तान बसवून आहे. माझ्या अंदाजाने याला आपल्याकडील सद्यस्थिती नि त्यातून मलाही आलेले काही अनुभवही कारणीभूत असावेत.

बेकी वीड(२) ही दहा-एक वर्षांची शाळकरी मुलगी. तिचे पोट बिघडले आहे. म्हणून तिची आई मार्टिनकडे घेऊन आली आहे. डॉक्टर प्राथमिक चौकशी करू लागतो. पोटदुखी सुरु होण्याच्या आदल्या रात्री तेथील एका छोट्या रेस्तरांमध्ये आपण चिकन खाल्ल्याचे सांगून ती विचारते, ‘त्या अन्नातून विषबाधा झाल्यामुळे तर पोट दुखत नसेल?’ ‘ती शक्यता आहेच.’ मितभाषी असलेला मार्टिन उत्तर देतो. आपल्या अनारोग्याचे आपणच अचूक निदान केल्याच्या समाधानात बेकी त्यापुढे मार्टिन काय सांगतो वा विचारतो आहे याकडे फारसे लक्ष देत नाही. तिच्या दृष्टीने निवाडा झालेला आहे.

ही बेकी तिच्या शाळेतर्फे प्रकाशित केल्या जाणार्‍या शाला-पत्रकाची संपादिका आहे. मुलांना लेखनासाठी उद्युक्त करावे, त्यांच्या त्या कौशल्याला वळण लावावे या हेतूने हे छोटेखानी वृत्तपत्र प्रसिद्ध केले जात असते. यात मुलांनी आपल्या भवतालाच्या, अनुभवाच्या, आकलनाच्या आधारे लिहावे आणि त्यांच्या त्या लेखनावर एखाद्या शिक्षकाने, मुख्याध्यापकाने सूचना करून ते अधिकाधिक चांगले होईल या दृष्टीने मुलांना प्रोत्साहन दिले जात असते. नुकत्याच आलेल्या अनुभवाच्या आधारे आणि तिने स्वत:च केलेले– आणि तिच्या मते मार्टिनने मान्य केलेले – निदान जमेस धरून ती त्या रेस्तरांच्या दर्जाबद्दल कडाडून टीका करणारा एक लेख झोकात लिहून टाकते.

पण ज्यांनी बेकीचा लेख वाचून त्याबाबत सूचना कराव्यात नि नंतर त्याच्या छपाईला परवानगी देणे अपेक्षित असते त्या मुख्याध्यापिकाबाईंना त्या दिवशी वृत्तपत्राचा तो अंक तपासून पाहायला वेळ मिळत नाही. इतका जोरदार लेख लिहिल्याने केव्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचवू म्हणून उतावीळ झालेल्या बेकीबाई त्वेषाने स्वत:च तो अंक छापून गांवभर वाटूनही टाकतात. त्या लेखामुळे आपली बदनामी झाल्याचा आरोप करत तो रेस्तरांवाला मुख्याध्यापिकेचे डोके खाऊ लागतो.

गावात डॉक्टर एकच असला तरी रेस्तरां अथवा खाद्यगृहांचे एकाहुन अधिक पर्याय उपलब्ध होते. विषबाधा हा शब्द वाचून शब्दश: ‘विषाची परीक्षा का घ्या’ असा विचार करून गावकरी तिकडे फिरकेनासे झाले, तर रेस्तरांच्या व्यवसायावर तिच्या त्या तथाकथित विषबाधेच्या बातमीचा अनिष्ट परिणाम होणार होता. मुळातच मूठभर लोकसंख्या असलेल्या गावातील ते रेस्तरां बंद पडण्याची शक्यता होती. याची जाणीव बेकीची मुख्याध्यापिका तिला करून देते, तेव्हा उद्धटपणे ‘मग बरंच होईल की.’ म्हणून ती चालती होते. पुढे मार्टिनवर तिने केलेला उद्धटपणाचा आरोप ऐवजी तिलाच अधिक लागू पडताना दिसतो.

दरम्यान इकडे बेकीच्या स्टूल-टेस्टचा रिपोर्ट येतो. ज्यातून अन्नातून विषबाधा नव्हे तर तिला अल्सरचा त्रास असल्याने निष्पन्न होते. हे ऐकल्यावर बेकी उखडून ‘पण तूच म्हणालास की मला विषबाधा झाल्याने पोट दुखते आहे.’ त्यावर आपल्या मितभाषी नि रोकठोक भाषेत मार्टिन म्हणतो, “मी ‘शक्य आहे’ म्हणालो होतो. शक्यता(possibility) म्हणजे निदान(diagnosis) सोडा, संभाव्यताही (probability) नव्हे.” यानंतर तिच्या आईकडे वळून तो म्हणतो, “या तीन मधील फरक (निदान) तुम्हाला समजत असावा.” दुसर्‍या दिवशी बेकी ‘मार्टिन हा अत्यंत उद्धट असून डॉक्टर म्हणून त्याची निदाने बहुतेक वेळा अर्धवट माहितीवर केलेली असतात.’ वगैरे जोरदार टीका करणारा लेख लिहून टाकते.

मार्टिनचा वैयक्तिक स्वभाव कसाही असला तरी त्याचे निदानकौशल्य वादातीत असल्याचा अनुभव एव्हाना बहुतेक गावकर्‍यांना आलेला असल्याने या टीकेने मार्टिनचे फार काही बिघडण्याजोगे नाही. एरवीही इतक्या महत्त्वपूर्ण विषयावर दहा वर्षांच्या मुलीचे मत मोठ्यांकडून फारसे गांभीर्याने घेतले जाणारही नसते. त्यामुळे मार्टिनच्या दृष्टीने तो लेख वा टीका अदखलपात्र असते. त्याबाबत त्याच्या स्वभावानुसार तो एका शद्बात प्रतिक्रिया देऊन मोकळा होतो. त्याच्या बाजूने विचार केला तर हाच लेख एखाद्या प्रतिष्ठित बातमीदार/पत्रकाराने लिहिला असता तरी आपल्या स्वभावानुसार त्याने त्याला फारशी किंमत दिली नसती.

या घटनाक्रमाला अनेक कंगोरे आहेत. त्यात लहान लहान आरसे दिसतात ज्यामध्ये मला माझ्या आसपासच्या परिस्थितीचे, व्यक्तींचे, समाजघटकांचे प्रतिबिंब दिसते. या सार्‍या घटनाक्रमाचे केंद्र असणारी बेकी माझ्या आसपासच्या ‘गुगलपंडित’ जनतेचे प्रतिनिधित्व करते असे मला वाटते. लक्षणांच्या आधारे गुगल करून आपल्या आरोग्याच्या समस्येचे निदान स्वत:च करणार्‍या, त्या आधारे तज्ज्ञांच्या आकलन/निदानाला आव्हान देणार्‍या, भवतालच्या परिस्थितीच्या आकलनासाठी तज्ज्ञांच्या कुवतीपेक्षा ‘चार लोक काय म्हणतात’ याला अधिक महत्त्व देणार्‍या, तज्ज्ञांच्या कुवतीवर बेदरकारपणे प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍या, नव्हे त्यांचा थेट निवाडाच करून टाकणार्‍या समाजगटाचे.

मार्टिन हा स्वत:मध्ये गुरफटलेला तज्ज्ञ आहे. त्याचे ज्ञान नि निदान बहुतेक वेळा बिनचूक ठरत असले, तरी त्याचा अहंगंड त्याच्यामध्ये नाही. परंतु तो नम्रही नाही. ‘आपण डॉक्टर आहोत, तेव्हा निदान नि उपचार हे आपले काम नि जबाबदारी आहे; तर रुग्णांनी आपण सांगू त्यानुसार कृती करणे नि त्यामार्फतच आपल्या अनारोग्यातून बाहेर येणे अपेक्षित आहे.’ हे गृहित धरून त्यानुसार तो रोकठोक वागतो आहे. लंडनसारख्या प्रचंड लोकसंख्येच्या शहरात एक प्रथितयश सर्जन म्हणून काम करत असताना, त्याच्या भवतालचा वेगवान आयुष्य जगणारा महानगरी समाज, त्याचे स्वत:चे सामाजिक स्थान आणि त्याचे कार्यबाहुल्य या तीनही गोष्टींचा विचार करता ही त्याची प्रवृत्ती त्या परिसंस्थेमध्ये उपयुक्तच ठरत होती.

परंतु समुद्रकिनार्‍यावरचे, डोंगर उतारावरचे ते लहानसे गाव नि लंडनसारखे महानगर यांतील समाजजीवन सर्वस्वी वेगळे आहे. मोजक्या लोकसंख्येच्या त्या गावात नवीन व्यक्ती अवतीर्ण झाली आली आहे याचे अप्रूप असते. मग तिच्याशी संवाद साधणे, तिला समजून घेणे, जमल्यास आपलेसे करणे हा तेथील लोकांसाठी अंगवळणी पडलेला भाग आहे. साहजिकच ‘नवा डॉक्टर आहे तरी कसा’ याची उत्सुकता त्यांच्या मनात आहे. पण हा डॉक्टर काम सोडून चार लोकांत मिसळत नाही हे लगेचच ध्यानात येते. मग त्याला भेटण्यासाठी कोणताही आजार नसूनही आजारपणाची बतावणी करत त्याच्या आरोग्यकेंद्रावर हजेरी लावण्याची चढाओढ सुरू होते. तपासणीच्या निमित्ताने शिरकाव करून घेत हळूहळू त्याच्याशी संवाद वाढवता येईल असा लोकांचा समज असतो. पण रोकठोक स्वभावाचा हा डॉक्टर सरळ, ‘तुला काही धाड भरलेली नाही. उगाच माझा वेळ वाया घालवू नकोस.’ म्हणून त्यांना बाहेर काढतो.

पण अशा रोकठोकपणाला अहंकार समजण्याची प्रवृत्ती बहुसंख्य सामान्य समजुतीच्या माणसांची असते हे मार्टिनच्या गावीच नाही. रुग्णांच्या आरोग्याबाबत त्यांना विश्वासात घेऊन त्याबाबत विस्ताराने त्यांना समजावावे, गैरसमजांपासून परावृत्त करण्यावर थोडा वेळ खर्च करायला हवा हे त्याला ठाऊक नाही. त्याच्याबाबतचा गैरसमज नि लंडन नि ते गाव यांतील समाजरचनेतील फरकाबाबत त्याचे अज्ञान वा बेफिकीरी यांतून बेकीसारख्या स्वत:च्या आकलनाबद्दल फाजील आत्मविश्वास असणार्‍यांना त्याच्यावर टीका करण्यास वाव मिळत जातो.

नुकतेच व्यवस्थित बोलू लागलेले, स्वत:च्या हाताने खाणे खाऊ लागलेले मूल त्या नि त्यासारख्या इतर स्वावलंबी कृतींबाबत पालकांकडून, मोठ्यांकडून कौतुक मिळवू लागले, की त्याला आपण आपल्या पालकांप्रमाणेच सर्वस्वी स्वावलंबी झाल्याचे– हल्लीच्या पिल्लांच्या भाषेत ‘बिग’ झाल्यासारखे वाटू लागते. मग त्याच्या शारीर वा कौशल्याधारित कुवतीला न झेपणारे कामही त्याला स्वत: करून आई-वडिलांकडून प्रशंसा पदरी पाडून घ्यायची असते. ‘मी करतो/करते’ असे म्हणून मदत करू पाहणार्‍या आई-वडिलांना ते धुडकावून लावू लागते.

असाच एक टप्पा असतो तो पौगंडावस्थेचा. या वयात मुलांना आता ‘आपल्याला जगण्यातले आवश्यक ते बहुतेक सारे समजू लागले आहे’ असा गंड निर्माण होऊ लागतो. मग दुराग्रहाने मोठ्यांच्या सल्ल्याच्या विपरीत कृती करण्याची ऊर्मी निर्माण होते. मनुष्यप्राण्याच्या जीवनातील बंडखोर प्रवृत्ती विकसित होण्याचा हा काळ असतो. बेकी या पौगंडावस्थेच्या उंबरठ्यावर उभी आहे. त्यामुळे तिच्या ठायी ती बंडखोरी उमलून येऊ लागलेली आहे.

त्या इटुकल्या शालापत्रकाची पत्रकार/लेखिका म्हणून मिळालेली ती लहानशी सत्ता तिच्या त्या वयातील बेदरकार वृत्तीला खतपाणी घालते आहे. आपली समज चूक असू शकेल अशी शंकाही न घेता ती दणादण निवाडे लिहून मोकळी होते आहे. यातून रेस्तरांची, डॉक्टरची चार जणांतील पत घसरेल का? त्यातून गावांतील एकमेव डॉक्टरबाबत अविश्वास निर्माण होऊन लोक त्याच्याकडे जाणे टाळू लागतील का? त्यातून आरोग्याचे प्रश्न बळावतील का? असा विचारही तिला करावासा वाटत नाही. आपल्याला चार वाक्ये लिहिता येतात नि ती छापण्याचे माध्यम आपल्या हाती आहे म्हणजे कुणाचेही मूल्यमापन करण्याची कुवतही आपल्याकडे आहे असा तिचा भ्रम आहे.

मी बेकीकडे पाहतो तेव्हा मला समाजमाध्यमांवर बेदरकारपणे व्यक्त होणारी माणसांची आठवण होते; तसंच हाती इंटरनेट आहे म्हणजे निव्वळ लक्षणांवरून आपण आपल्या अनारोग्याची कारणमीमांसा वा निदान स्वत:च करू शकतो असे समजणार्‍या ‘गुगलवैद्यां’ची. इतकेच नव्हे, तर केवळ एखादे माध्यम हाती आहे म्हणजे त्यामार्फत ‘आपण म्हणू तेच वास्तव’ हे सिद्ध करण्याचा मुजोरपणा करणारी भारतीय माध्यमे - प्रामुख्याने चॅनेलमाध्यमे - आठवतात. फार कशाला, बेकीच्या शाळेतील त्या शालापत्रकाइतक्याच इटुकल्या स्वयं-संचालित संस्थळ-माध्यमांवर दणादण लेख लिहून आपल्या पूर्वग्रह, आकस, ईर्षा यांचा प्रसार करणारे स्वयंघोषित गल्ली-पत्रकारही आठवतात.

बेकी अपरिपक्व वयातील असल्याने आपल्याकडे असलेल्या माहितीमध्ये तिला ज्ञानाचा, आकलनाचा भास होतो आहे. भारतीय माध्यमांमध्ये मात्र परिपक्व बुद्धीची माणसे असूनही, वास्तवाचे नेमके आकलन होण्यासाठी पुरेशी यंत्रणा सोबत असूनही, ते हेतुत: छद्मवास्तवाचा प्रचार-प्रसार करताना दिसतात. रेस्तरांबद्दल अथवा मार्टिनवर टीका करताना वैयक्तिक अनुभवातून आलेला निखळ राग एवढी एकच प्रेरणा बेकीकडे आहे. माध्यमे मात्र चोख स्वार्थ, आर्थिक-राजकीय बलवंतांसमोरील लाचारी अशा विविध प्रेरणांमुळे विशिष्टांच्या चारित्र्यहननाच्या सुपार्‍या घेताना दिसतात.

बेकी दहा वर्षांची आहे. साहजिकच वय वाढेल तशी अनुभव नि वैचारिक प्रगतीच्या वाटे जात तिची समज सुधारण्याची शक्यता आहे. मी शक्यता आहे म्हणतो आहे! पण पुन्हा... संभाव्यतेचे काय? ती संभाव्यता तिचे वास्तविक अनुभव, इतरांमार्फत झालेले संस्कार, तिची आकलनक्षमता आणि या सार्‍याला मिळणारा वाव अशा अनेक घटकांवर अवलंबून असेल. शक्यता ते संभाव्यता या प्रवासाची वाट ही नेहमी अनुभवाच्या(data) मार्गे जात. बेकीला हे अद्याप ठाऊक नसेल, मात्र बेकीच्या आईने पक्के ध्यानात ठेवायला हवे.

पण वय उतरणीला लागूनही तिच्याच मानसिकतेचे राहिलेल्या माध्यमी बेकी वा बेकहॅम(३) यांचे काय?

- oOo -

(१). मालिका ब्रिटिश पार्श्वभूमीवरील आहे. ब्रिटिश इंग्रजी भाषेमध्ये सर्जरी याचा अर्थ शस्त्रक्रियाशास्त्र– म्हणजे वैद्यकशास्त्राची एक शाखा असा आहे, त्याचप्रमाणे एखाद्या डॉक्टरच्या अथवा चिकित्सालयाच्या रुग्ण-तपासणीसाठी वापरल्या जाणार्‍या खोलीला अथवा स्थानालाही– विशेषत: लहान गावांमध्ये– सर्जरी असेच म्हटले जाते.

(२). तिच्या आडनावाचे स्पेलिंग Wead आहे हं, Weed नाही. पण इतक्या लहानशा सत्ताकेंद्राची नशा ज्या तीव्रतेने तिला चढते ते पाहता त्या वीडकडे पटकथालेखकाला अंगुलिनिर्देश करावासा वाटला असावा असा माझा होरा आहे.

(३). डेविड बेकहॅम हा प्रसिद्ध ब्रिटिश फुटबॉलपटू. त्याच्यासारखा फुटबॉल खेळता यावा या ध्येयाने झपाटलेल्या एका ब्रिटिश-इंडियन मुलीची कथा सांगणारा `Bend It Like Beckham' नावाचा चित्रपट २००२ मध्ये येऊन गेला. समाजमाध्यमी बेकहॅमही मुद्द्याचा चेंडू मन मानेल तसा ‘वळवून’ आपला ‘गोल’ साध्य करण्यात पटाईत असतात


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा