शुक्रवार, १२ जानेवारी, २०२४

चिमण्या - १ : सहजीवन

<< या सदराच्या निमित्ताने...
---

जवळजवळ दहा वर्षांपूर्वी मी माझे खेडे सोडले आणि अनेक माणसांचा, वास्तूंचा, पशुपक्ष्यांचा संबंध तुटला. प्रत्यक्ष सहवास राहिला नाही, तरी आठवणी राहिल्या. जसाजसा काळ जातो आहे, तशातशा या आठवणीही पुसट होत जात आहेत. आणखी काही वर्षांनी त्यापैकी काही आठवणी राहणारही नाहीत, कुणी सांगावे?

मी खेडं सोडलं आणि घर-चिमण्यांशी असलेला माझा संबंधही तुटला. शहरात चिमण्या नाहीत असे नाही. माणसांची जिथे जिथे वस्ती आहे, तिथे चिमण्या असतातच, पण शहरात चिमण्या-कावळ्यांकडे ध्यान कुठे जाते? सदैव कलकल करणाऱ्या, वेगडे-बागडे रूप असलेल्या चिमण्यांपेक्षा ध्यान वेधणाऱ्या कितीतरी अन्य गोष्टी शहरात असतात. चिमण्यांकडे पाहतो कोण? आणि पाहण्याइतपत फुरसत तरी आहे कुणाला?

माडगूळला आमच्या जुन्या घरी चिमण्या फार होत्या. इतक्या की, सारे घर चिमण्यांचे आहे आणि आम्ही आपले त्यात पाहुणे म्हणून राहत आहो असे वाटावे. माझ्या लहान भावंडांना दूधभात चाखताना, माझ्या आईला कधी ‘ये गं चिऊ, ये गं चिऊ’, अशा हाका मारून कल्पनेतल्या चिमण्यांना बोलवावे लागत नसे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक चिमण्या घरात वावरत असत.

रानमेवा

फाल्गुन महिन्यात खळी होत ज्वारीच्या पोत्यांनी घरे भरत. त्या सुगीला आमचा वाटेकरी गुडदी कणसांचा एक भला थोरला झुंबडा आणून सोप्याच्या दर्शनी भागावर टांगीत असे. पाणी ठेवण्यासाठी मातीचा एक परळही या कणसांच्या शेजारी टांगलेला असे. सुगीला आलेले धान्य आम्ही वर्षभर पुरवीत असू, पण या दंगेखोर चिमण्या ज्वारीच्या दाण्यांनी भरलेला हा झुंबडा महिन्याभरात संपवून टाकीत. हा खाऊ घरचाच आहे, तो पुरवून-पुरवून असा नडीअडीला खावा, एरवी बाहेर हिडूनच पोटे भरावी असा विचार काही या बायांना सुचत नसे. महिन्याभरातच कणसांचा झुंबडा त्या ओरबाडीत, दाणान्‌दाणा त्या टिपून खात आणि श्रावणात व्हंडीची खळी होईपर्यंत, चिमण्यांनी दाणा झोडपून नेलेल्या त्या पिशा वाऱ्याने हेलकावे खात राहत.

जुन्या घराच्या आतील चौकात बाजीनानांनी लावलेले कडुलिंबाचे झाड होते. त्यावर चिमण्यांची वस्ती असे. पहाटे माझे वडील जागे होऊन अंथरुणावर बसत. अंगावर धाबळी घेऊन, ‘उठा-उठा हो सकळिक, वाचे वदा गजमुख,’ भूपाळी म्हणत. या वेळी कोंबडे, कावळे जागे होऊन बोलत असत, साळुंक्या कुलकुलत असत, व्हले हुंकारत असत. पण चिमण्या अद्याप गुडूप झोपून असत. आम्हा मुलांप्रमाणेच चिमण्यांनाही लवकर उठण्याचा कंटाळा येई. वडिलांच्या भूपाळ्या होत. आईचे शेर-पायली दळून होई. अंगणात सडा-सम्मार्जन होई. दिवस उगवे आणि मग चिमण्या हळूहळू जाग्या होत. जाग आली तरी आम्ही अंथरुणात लोळत असू. चिमण्याही अंग फुगवून डहाळ्यातून बसून राहत. आळस झाडून लगेच उठावे आणि पोटापाण्याच्या उद्योगाला लागावे, हे त्यांच्या हातून होत नसे.

दिवस थोडासा वर आला आणि पूर्वेकडे ताड असलेल्या नव्या सोप्याच्या भितीवर कोवळी उन्हे पडली की, चिमण्या झाड सोडून खाली येत. पाडव्या दिवशी गुढी उभारण्यासाठी म्हणून ठेवलेली एक भली मोठी आणि उंच अशी काठी आमच्या घरी होती. पाडवा झाला की, ती काठी नव्या सोप्यात पानपट्टीला लागून आडवी टांगलेली असे. धुणी वाळत घालण्यासाठी तिचा उपयोग होई. निंबावरून खाली उतरलेल्या चिमण्या या काठीवर येऊन बसत. गळ्यापाशी काळ्या रंगाचा छान ठिपका असलेले आणि विटकरी रंगाचा कोट घातलेले चिमणे सकाळी-सकाळीच मोठ्या रंगाला येत. शेजारी बसलेल्या चिमण्यांना धक्के मारीत. चिमण्या बापड्या संकोचाने बाजूला सरत. हळू आवाजात नापसंती बोलून दाखवीत, पण चिमणे दांडगावा करीत. जास्तच धक्के मारीत आणि कानडी भाषेत मोठमोठ्याने काही-काही बोलत. चिमण्यांना सारे सोसून घ्यावे लागे. त्या काठीवरून इकडे-तिकडे सरत, कुरकुरत, आपसात कुलुकुलु बोलत पिसे चोची साफ करीत.

चिमण्यांचा हा खेळ चाललेला असे, तेव्हा काठीची सावली सोप्याच्या भितीवर पडलेली असे. शाडूने सारवलेल्या भिंतीवर सावल्यांचा सिनेमा दिसे. लांबलचक काठी आणि तिच्यावर बसलेल्या पाच-पन्नास चिमण्या, त्यांचे हलणे, धक्के मारणे आणि चोचीत चोची घालणे, सगळे पाहताना मोठी गंमत वाटे. सिनेमातल्या चिमण्या धरून ठेवाव्या असे वाटे. आपली पांढरी पोटे उन्हाला देऊन चिमण्या काठीवर बसत. उन्हें खाऊन झाली की, त्यांना भूक लागे. याच सुमारास आम्हालाही लागे. शिळी भाकरी, कांदा आणि ताजे ताक घेऊन आम्ही भावंडे सोप्याच्या उन्हाला न्याहरी करायला बसलो म्हणजे काही चिमण्या दोन पायांवर उड्या मारीत ताटासमोर येत, माना वाकड्या करून ताटाकडे, आमच्या तोंडाकडे बघत. मग त्यांना भाकरीचा चुरा द्यायला नको का?

जुन्या सोप्यात धान्याची पोते रचून ठेवलेली असत. पाच-पंचवीस चिमण्या त्यांच्यावर गर्दी करत. चोचीने टोचून-टोचून गोणपाटाला भोके पाडीत आणि धान्य खात. खाताना बोलणेही चालूच असे. काही चिमण्या माजघरात शिरत. तांदळाची रोळी उघडी दिसली की, तोल संभाळीत रोळीच्या काठावर बसून तांदूळ चोरीत. करंडीत, सुपात भाजी दिसली की, तिचे कोवळे शेंडे खुडत. कुठेही तोल संभाळीत बसावे, सारखे बडाबडा बोलावे, दिसेल ते चुटूपुटू टिपावे असा त्यांचा सपाटा चाले. अंगणात, सोप्यात, माजघरात, स्वयंपाकघरात, परसात सगळीकडे त्यांचा दंगा चालू राही. जसे काही पेंढार सुटले आहे!

जेवणे होऊन तिसरा प्रहर होत आला तरी त्यांचा दंगा काही बंद होत नसे. मग त्यांची पांढरी पोटे भरत. आडावरच्या डोणेवर बसून पाणी पिणे होई. चिमण्या फिरून सोप्यात येत. धान्य खाल्ले, पाणी प्यायल्यावर मग थोडे निवांत बसावे की नाही? पण नाही! मग भर्रऽ भर्रऽ इकडे-तिकडे भरारी घे असा खेळ सुरू होई. ज्या जागी एक बसे त्याच जागी दुसरीला बसायला हवे असे आणि एका जागी आल्या की दोघींचे जमत नसे. पंखांचा फडफडाट आणि चोचींची वटवट अखंड चालू राही. शिवाशिवीला, मारामारीला, भांडणाला ऊत येई. जेवणे झाल्यावर घोंगडी जेने अंथरूण मोठी माणसे थोडी लवंडत. आम्हालाही धाकदपटशा दाखवून झोपवीत. सगळीकडे कसे शांत असे, पण चिमण्यांचा दंगा काही थांबत नसे. त्यांच्या वटवटीने, मुलांच्यावर सहसा न ओरडणारे माझे वडीलसुद्धा त्रासून जात. धोतराचा सोगा हवेत उडवीत चिमण्यांना तंबी देत– “शुकऽऽ शुकऽऽ काय गलका मांडलाय ? जरा स्वस्थ पडू द्या!”

पण एवढे बोलून चिमण्या कुठे ऐकायला ! टाळ्या वाजवाव्या, काठ्या वाजवाव्या तेव्हा कुठे खुंट्या, कोनाडे, भानवटी सोडून या बाहेर पळत. पण घटकाभरच. बोलल्याची काही लाज नसे. पुनः एकीपाठीमागे एक अशा भरारत गोंधळ करत पाच-पंचवीस जणी आत येत. पुन्हा पहिल्यापेक्षा दुप्पट दंगा सुरू होई.

संध्याकाळी चार-साडेचार झाले की, पुन्हा खाण्यासाठी शोधाशोध सुरू होई. काही बाप्ये, बाया बाहेर पडत. गावातली घरे, लोकांची अंगणे, गावाशेजारी राने धुंडून संध्याकाळी सहा-साडेसहा झाले की, गुरांच्या आधी या घरी परत येत. लिंबावर झुंबड उडे. जणू काही चंपाषष्ठीची खंडोबाची यात्रा भरली आहे, असा आवाज होत राही. निंबाची डहाळीन्‌ डहाळी हलून निघे. ‘मी इथे बसणार, तू तिथे बैस, ही माझी जागा आहे. ती तुझी जागा आहे,’ अशी तू-मीची भाषा चांगलीच घंटा-अर्धा घंटा चाले आणि मग कसे शांत होई. गलग्याला, भांडणाला कंटाळून काही चिमण्या घरात येत. खुंटीवर किंवा कडापाटाच्या हलकड्यांतून डोळे मिटून बसून राहत. याचवेळी आमची निजानीज होई. अंथरुणावर पडल्या पडल्या आमच्यापैकी एखाद्याची नजर खुंटीवर फुगून बसलेल्या चिमण्याकडे जाई. अंथरुणे सोडून आम्ही त्या उद्योगालाही लागत असू. बहुतेक वेळा हा उद्योग फळाला येत नसे. कधी चिमणा गुंगारा देई तर कधी आई ओरडे– ‘नका रे चांडाळांनो, मुक्या पाखराला त्रास देऊ. रात्री त्यांचे डोळे जातात.’

आई आमच्यावर ओरडे, पण मांजरावर ओरडत नसे. आमचे मांजर दिवसभर चिमण्यांवर टिपून असे. दोन्ही वेळचा दूध-भात खाऊनही त्याची चिमण्यांवरची वासना उडत नसे. पण चिमण्याही त्याला ओळखून असत. सोप्यात, अंगणात नाचताना आपण खाण्यात गर्क आहोत, कोपऱ्यात दबून असलेल्या मांजरांकडे आपले काही ध्यान नाही असा बहाणा त्या करत. पण खरे तर, त्यांचे पक्के ध्यान असे. तिन्ही त्रिकाळ त्या सावध राहत. त्यामुळे मांजराचा बेत सारखा फसे. दिवसाउजेडी तर चिमण्या मांजराचे काही जमूच देत नसत. रात्री अंधारात मात्र कधीमधी मांजराला संधी सापडे. जमिनीवरून कोनाड्यात आणि कोनाड्यातून खुंटीवरच्या चिमणीवर हा कठीण बेत कधी एखाद्या रात्री पार पडे आणि दुसरे दिवशी नको त्या ठिकाणी माझ्या आईला चिमण्यांची पिसे दृष्टीला पडत. कधी रात्रीच्या वेळी एकदम ध्यानीमनी नसताना लिंबावर झोपी गेलेल्या चिमण्या फर्रकन उडत आणि दुसऱ्या दिवशी मनीची दूध भातावरची वासना उडे!

आमची पासोडी आणि मनीची उडी चुकवावी या बुद्धीने काही चिमण्यांनी परसातल्या आडात घरे केली होती, पण पाण्याचा तरी विश्वास धरावा का? दर दोन-तीन महिन्यांनी पाण्याला वास येई आणि उपसा करावा लागे. काही वेळा आडाच्या जुन्या बांधकामात साप शिरून चिमण्यांवर संकट येई. चार-दोन चिमण्या कामी येत.

परसात आम्ही अंघोळी करून वाहणारे सांडपाणी पाहून चिमण्यांनाही अंघोळ करण्याची लहर येई, ओढ्यात पाण्याची धार कमी असली की, माणसे जशी खाली वाकून ओंजळीने पाणी पाठीवर उडवतात, तशा या चिमण्या धारेला बसत आणि पंखाने पाणी उडवून अंगावर घेत. रोजच्या रोज त्या काही अंघोळ करत नसत, पण जेव्हा करत तेव्हा मात्र अगदी आनंदाने करत. पाऊस अंगावर घेत. लहान मुले जशी काळ्यामाळ्या करतात, हसतात, ओरडतात तशी त्यांची सांडपाण्यात अंघोळ चाललेली असे. मुलांप्रमाणे चिमण्यांना मातीत खेळणेही आवडे. घर सारवण्यासाठी पांढरीच्या मातीचा ढीग अंगणात पडला की, चिमण्या खुशाल त्या ढिगावर खेळत. सारे अंग मातीने भरवून घेत. डोक्यात पसापसा माती घालून घेत. सांडपाण्यात अंघोळ करताना जितका होई, तितकाच आनंद त्यांना माती घालून घेताना होई.

कोठी करणे आणि पोरे घालणे या बाबतीत चिमण्यांचा काही ठरावीक काळ आहे की नाही, हे मला माहीत नाही. पण वर्षभर हा उद्योग चालत असावा. माझ्या आठवणीप्रमाणे एप्रिल-मे महिन्यात चिमण्या घरे बांधण्याची धांदल करीत. पुष्कळशी इतर पाखरे आपली घरे बांधण्याची धांदल करीत. पुष्कळशी इतर पाखरे आपली घरे झाडावर बांधतात, पण चिमण्यांचा माणसाशी घरोबा जास्त. माणसांनी बांधलेल्या घरातच जागा पाहून त्या आपलीही घरे उठवतात. योग्य जागा पाहून बांधलेल्या माणसांच्या घरातसुद्धा चिमण्यांना काही लवकर चांगलीशी जागा सापडत नाही. भानवटी, तुळ्यातील मोक्याच्या जागा हेरण्यातच त्यांचा फार वेळ जातो.

काही- काही जोडपी घर बांधण्यासाठी अशी चमत्कारिक जागा पसंत करतात की, बोलून सोय नाही. या जागी घर होणार नाही, हे त्या बापड्यांच्या ध्यानीच येत नाही. गावभर हिंडून सुतळ्यांचे तुकडे, वाखाच्या बटा, कोंबड्यांची पिसे, कापूस असले काहीबाही चोचीत आणून ते त्या अयोग्य जागी हवे तसे ठेवण्याचा त्यांचा वेडा प्रयत्न चालू राहतो आणि इमला काही उठत नाही. पुष्कळसे घरबांधणीचे साहित्य वाया जाते. चिमण्यांची घरबांधणी सुरू झाली की, नवा सोपा झाडताना असे कितीतरी घरबांधणीचे सामान माझ्या आईच्या केरसुणीवरून बाहेर जाई आणि उकिरड्यावर पडे!

पुष्कळशी इतर पाखरे घरबांधणीच्या शास्त्रांत पारंगत असतात. सुगरणीचा हात तर याबाबतीत कुणीच धरू शकणार नाही. आपले घर त्या असे देखणे आणि डौलदार बांधतात की, भल्या भल्या गवंड्यांनी तोंडात बोटे घालावीत. या चिमण्या म्हणजे सुगरणीच्याच जातभाई, पण यांना घरे कशी बांधावीत हे मुळीच कळत नाही. 'एक होती चिमणी, एक होता कावळा,' या प्रसिद्ध शिशुकथेतील चिमणीने मेणाचे घर बांधून पावसाळ्यात निर्वासित झालेल्या कावळ्याला जागा दिली, हे काही खरे वाटत नाही. घरबांधणीचे शास्त्र चिमण्यांना माहीतच नाही! त्यांनी ते सुगरणीकडून शिकले पाहिजे.

एप्रिल-मेमध्ये घरे बांधण्याचा सपाटा सुरू होई. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ही घरे वरचेवर ढासळत. चिमणा चिमणी अतोनात कष्ट करत आणि मग कधीतरी गुपचूप चिमणी आपल्या लहान घरट्यात तीन चिमणी अंडी घाली. ऐसपैस घरातील अंडी नीट राहत, पण अडचणीत अपुऱ्या जागेत बांधलेल्या घरातील अंडी आपल्या आई-बापांच्या धक्क्याने वरून खाली पडत आणि फुटून जात. लवकरच तुळ्यातून बारीक चिवचिव ऐकायला येई. मुलांना खाण्याजोगे अन्न शोधण्यात चिमणा चिमणी दिवसभर गर्क राहत. लहान आळ्या चोचीत पकडून आणाव्या, घराबाहेर बसून डोकेच तेवढे आत घालावे, पोरांनी 'मला-मला' म्हणून दंगा करावा, कुणीतरी एकानेच सगळे मटकवावे आणि इतरांनी चिमण्या चोची वासून रडत राहावे. मग चिमणीने पुन्हा बाहेर जाऊन काही घेऊन यावे. असा प्रकार चालू राही. चिमण्यांची बाळे हळूहळू वाढू लागत.

कधीमधी एखादे चळवळे पोरही अंड्याप्रमाणे टपकन खाली पडे आणि मरून जाई. एखादे टणक पोर वरून पडूनही जिवंत राही. पंख न फुटलेला तो लालभडक मांसाचा गोळा चोच वासून आमच्याकडे बघे. चिमणा चिमणी वारंवार आमच्या डोक्यावरून घिरट्या घालत. त्या पोराला पाणी पाजून पुन्हा घरट्यात ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करीत असू आणि त्या प्रयत्नात ते बापडे पोर मरून जाई. काही पोरे मोठी होऊन घरातून खाली उतरत. आई-बाप त्यांना उडावे कसे हे शिकवत. पोरे भीत आणि बदाबद खाली पडत. बऱ्याच प्रयत्नाने त्यांना उडायला येई. उडायला येऊ लागले आणि पंखात चांगले बळ आले की, ती मुले आई-बापांना विसरत आणि दाही दिशांना उडून जात. आपापला संसार थाटीत. आपापली पोटे भरीत. मग पुन्हा त्यांना आपल्या आईवडिलांची आठवण काही होत नसे.

जोपर्यंत मी माझ्या जुन्या घरात होतो, माझ्या पंखांत बळ आले नव्हते, तोपर्यंत हा प्रकार मी पाहत होतो. पुढे ते जुने घरही गेले, तो निंबही गेला आणि माझा चिमण्यांशी असलेला संबंधही तुटला!

- oOo -

पुस्तक: रानमेवा.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती दुसरी, चवथे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२२.
पृ. ३६-४१.

(पहिली आवृत्ती: २०१०. अन्य प्रकाशन)

---

पुढील भाग >> चिमण्या - २ : दुरावा    


संबंधित लेखन

२ टिप्पण्या:

  1. मला किती काय आठवलं हे वाचून...आणि हो, खूप सैल, निवांत झालं आहे मन.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मी शहरात राहात असलो तरी वाड्यामध्ये बालपण गेले. तिथे लाकडी धाब्याचे स्लॅब होते. त्यात चिमण्या आरामात घरटी करत. त्यामुळे पिलांचा जन्मसोहळा आम्हीही बरेचदा अनुभवला आहे.

      हटवा