RamataramMarquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

शुक्रवार, २९ मे, २०२६

... परतुनि ये घरा

  • प्रास्ताविक: ‘आषाढातील एक दिवस’ या नाटकातील हे दोन प्रवेश कालिदासाच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या टप्प्यांभोवती रचलेले आहेत. ‘पाखरा जा, त्यजुनिया...’ या शीर्षकाच्या पहिल्या भागात प्रिय मल्लिकेला सोडून कालिदास कीर्ती, ऐश्वर्य, सत्ता यांच्या दिशेने चालला आहे. या भागात हे सारे गमावलेला कालिदास मल्लिकेकडे परतून आला आहे. दोन्ही भागांची शीर्षके मो. ग. रांगणेकर यांच्या ‘वहिनी’ या नाटकातील ‘पाखरा जा’ या पदातील अनुक्रमे पहिली नि अखेरची ओळ आहे.
    ---

    (परत वीज कोसळते, मेघगर्जना होते, देवडीकडील दार हळू हळू उघडते. दारात कालिदास उभा. खचलेला मोडलेला. मल्लिका एकदम उभी राहून तिकडे पाहू लागते. बाबरलेली. गोंधळलेली, तो पुढे येतो. मल्लिका अवाक् होऊन त्याच्याकडे पाहात राहाते.)

    आषाढातील एक दिवस

    कालिदास : बहुधा ओळखलं नसावंस. (मल्लिका तशीच पाहात राहाते. कालिदास सर्वत्र दृष्टी फिरवतो. मग तिच्याकडे येऊन तिला आपादमस्तक न्याहाळतो व आसनाकडे जातो.) आणि न ओळखणंही अगदी स्वाभाविक आहे. कारण मी तो नाहीच– ज्याला तू आधी ओळखत होतीस. मी कुणी वेगळाच आहे. (आसनावर बसतो.) आणि खरं सांगायचं तर मी पण त्याला ओळखत नाही. अरे, तू अशी पुतळ्यासारखी का उभी आहेस ? मला पाहून फार आश्चर्य वाटलं ? (मल्लिका जाऊन दार लावते. मग हरवल्यासारखी एकदोन पावले त्याच्या दिशेने टाकते.)

    मल्लिका : आश्चर्य ? माझा तर विश्वासच नाही बसत की तो तू आहेस आणि तुला पाहणारी मी मीच आहे.

    कालिदास : तू पण पूर्वींची मल्लिका दिसत नाहीएस. सगळं काही बदलून गेलंय. किंवा कदाचित बदल फक्त माझ्या दृष्टीतच झाला असेल.

    मल्लिका : काय करू रे, अजूनही मला स्वप्नात असल्यासारखंच वाटतंय.

    कालिदास : नाही, हे स्वप्न नाहीए मल्लिका ! मी इथं आलोय ही वस्तुस्थिती आहे. एका दीर्घ प्रवासांत थकून भागून, भग्न होऊन, पराभूत झालेला मी इथल्या वास्तवाचा अनुभव घ्यायला परत इथं आलोय.

    मल्लिका : फार भिजलायस तू ! माझ्याकडे कोरडी वस्त्रं तर नाहीत, पण...

    कालिदास : माझ्या भिजण्याची काही काळजी करू नकोस ? तुला माहीत आहे, अशा प्रकारे भिजून जाणं ही सुद्धा जीवनात एक महत्त्वाकांक्षा असू शकते. (निःश्वास टाकून) फार वर्षांनी भिजलोय आज. आता हे ओलेपण सोडायची इच्छाच नाही. चालून चालून फाऽऽर थकलोय. खूप दिवस आजारी होतो. पण या पावसाने सगळा थकवा पाऽर निघून गेलाय.

    मल्लिका : (त्याच्याजवळ जाऊन) तू खरं म्हणजे ओळखूच येत नाहीएस. (काही क्षण कालिदास तिला न्याहाळतो. मग क्षीण हसून गवाक्षाकडे जातो...)

    कालिदास : आणि तू तरी कुठे ओळखू येतेस ? हे घर सुद्धा किती बदललंय आणि मी... मी अपेक्षा करत होतो की सगळं काही तसंच असेल. अगदी जसंच्या तसं. आपापल्या जागी. (एक दीर्घ उसासा) काहीच पहिल्यासारखं राहिलं नाहीए. (सर्वत्र पाहात ) तू सगळं काही बदलून टाकलंयस ! सारं साऽऽरं काही. (येरझारा घालू लागतो.)

    मल्लिका : अं... मी...मी नाही बदललं.

    कालिदास : (थांबून तिच्याकडे पाहतो.) अं... हो, तू नाही बदललंस ! माहीत आहे मला. पण मल्लिका, हे घर कधी काळी मला परकं वाटेल अशी मी कल्पनाही केली नव्हती. इथल्या प्रत्येक वस्तूचे स्थान आणि रचना कशी निश्चित होती. पण आज... आज सारं काही अनोळखी वाटतंय. (तिच्या डोळ्यांत पाहात...) अगदी तू सुद्धा ! तू सुद्धा परकी वाटते आहेस आज. म्हणूनच वाटतंय्... परिस्थिती फारशी बदललंली नसावी, जितकी माझी दृष्टी बदलली आहे.

    मल्लिका : दमलाय्‌स खूप ! बसून बोल ना ! अजूनही तू बरा झालेला दिसत नाहीस. डोळेच सांगतायत तुझे.

    कालिदास : फार दिवसांच्या भ्रमंतीनंतर इथं आलोय. काश्मीरला जाताना ज्या कारणासाठी इथं आलो नाही त्याच कारणासाठी आज मुद्दाम आलोय्.

    मल्लिका : तू काश्मीर सोडल्याचं आत्ताच मामांनी सांगितलं.

    कालिदास : होय ! कारण सत्ता आणि ऐश्वर्याचा मोह आज सुटलाय. आज मी मुक्त आहे. वर्षानुवर्ष काचणाऱ्या साखळ्या आज तुटल्यायत ! काश्मीरचे लोक समजताय्‌त मी संन्यास घेतलाय. पण मी फक्त मातृगुप्ताच्या कलेवरापासून स्वतःची सुटका करून घेतली आहे. परत कालिदासाचं कलेवर होऊन जगण्यासाठी. इथल्या वातावरणाचं सूत्र तोडून मी गेलो तरी एक आकर्षण मला सतत त्या सूत्राकडे खेचत होतं. इथल्या एकेका वस्तूबद्दल जी आत्मीयता वाटायची, ती इथून गेल्यावर मला कुठल्याच वस्तूबद्दल वाटली नाही. इथल्या प्रत्येक वस्तूच्या रूपाचं, तिच्या आकाराचं मला पूर्ण स्मरण आहे. इथले कुंभ, व्याघ्राजिन, गवताच्या पेंढ्या, हे दिवे, भिंतीवरील शुभ-चिन्हं, आणि... तुझे डोळे ! जाताना तुझ्या डोळ्यांचं जे रूप मी पाहिलं होतं ते आजपर्यंत माझ्या स्मृतीत जपून ठेवलंय मी. मी माझ्या मनाला दिलासा देत आलोय् की जेव्हा कधी मी इथे परत येईन तेव्हा सर्व काही तसंच असेल. अगदी पहिल्यासारखं ! ( दारावर थाप मारल्याचा आवाज. मल्लिका कपाळाला आठ्या घालून तिकडे पाहाते. कालिदास दाराकडे जाऊ लागतो. ती त्याला थांबवते.)

    मल्लिका : दार बंदच असू दे ! तू असाच बोलत राहा !

    कालिदास : बघ तर कोण आलंय.

    मल्लिका : पावसाचे दिवस आहेत. कुणीतरी आलं असेल निवाऱ्याला. तू बोलत राहा. जाईल निघून. (बाहेरून मदिरोन्मत्त शब्द येतात- “ जेव्हा यावं तेव्हा दार बंद अं ? दर वेळेस दार बंद ! ”)

    कालिदास : कोण होता हा ?

    मल्लिका : सांगितलं ना असेल कुणीतरी...

    कालिदास : पण मला याचा आवाज ओळखीचा वाटला. किंवा इथल्या ओळखीच्या इतर वस्तूंप्रमाणे हेही कुठल्याशा परिचित आवाजाचंच बदललेले रूप असावं.

    मल्लिका : तू दमून आलायस. बसून बोल ना. (कालिदास एक दीर्घ निःश्वास टाकून आसनावर बसतो. मल्लिका गुडघ्यावर हात ठेवून त्याच्या जवळच आसनाखाली बसते.)

    कालिदास : मी बऱ्याच वेळा आपल्या संबंधांबद्दल विचार केलाय मल्लिका. आणि आज मला जाणवतंय की अंबिका एक व्यावहारिक सत्यच सांगत होती. (हात मागे टेकवून दृष्टी छताकडे स्थिरावत) इथून जाण्याची माझी इच्छा नव्हती. याचं एक कारण म्हणजे माझाच माझ्यावर विश्वास नव्हता. इथल्या दरिद्री आणि उपेक्षित वातावरणात इतके दिवस काढल्यानंतर त्या प्रतिष्ठेच्या आणि वैभवाच्या वातावरणात राहणं मला कितपत जमेल याचीच शंका होती. वाटायचं की ते नवीन वातावरण मला भारून टाकील, माझ्या जीवनाचा मार्गच बदलवून टाकील. आणि... आणि झालंही तसंच.

    (मल्लिकेकडे पाहात) मी काश्मीरचा कारभार पाहायला गेलो याचं तुला खूप आश्चर्य वाटलं असेल ना ? पण त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नव्हतंच. एका भणंग, दरिद्री जीवनाची ती एक स्वाभाविक प्रतिक्रिया होती. ज्यांनी माझी सदैव उपेक्षा केली, उपहास केला त्यांच्यावर सूड घेण्याचीही भावना कदाचित त्यात असेल. (गवाक्षाकडे जात) पण मला हेही ठाऊक होतं की त्यातून मी सुखी होऊ शकणार नाही. मी वारंवार स्वतःला बजावीत होतो. दोष त्या वातावरणाचा नाही. माझा आहे. मी स्वतःला बदललं तरच सुखी होऊ शकेन. पण तसं झालं नाही. सत्ता मिळाली, मानमान्यता मिळाली. माझ्या साहित्यकृतीचं सर्वत्र अमाप कौतुक झालं. पण... पण मी मात्र सुखी होऊ शकलो नाही. खरं म्हणजे एखाद्याला तेच जीवन किती सुखावह वाटलं असतं.

    पण राज्यकर्त्याचं ते क्षेत्र माझ्या मूळ स्वभावाच्या अगदी विरुद्ध होतं. सत्ता आणि वैभवाच्या मोहाने मी आगंतुकपणे त्या क्षेत्रात प्रवेश केल्याचं मला सतत जाणवायचं. आणि ज्या भव्य दिव्य क्षेत्रात मी असायला हवं होतं, तेथून परागंदा झाल्याचं दुःख मला जाळायचं. लांबवर दिसणाऱ्या क्षितिजरेखांवर जेव्हा जेव्हा माझी दृष्टी जायची तेव्हा तेव्हा एकच गोष्ट माझ्या मनात सलायची की त्या उदात्त सौदर्य-विश्वापासून मी फाऽऽर दूर गेलोय. वाटायचं की आज ना उद्या मी परिस्थितीवर मात करीन आणि दोन्ही क्षेत्रांत अलौकिक यश मिळवीन. पण मी ... मी स्वतःच नियतीच्या हातातलं खेळणं बनलो होतो. ज्या उद्याची भी प्रतीक्षा करत होतो तो दिवस कधी उगवलाच नाही.

    मी मात्र अधिकाधिक पिचत गेलो. आणि एक दिवस... एक दिवस माझ्या लक्षात आलं की मी पार उद्ध्वस्त झालोय. माझ्या जीवनातील एक चिरसुंदर अध्याय केव्हाच संपलाय ! त्या विशाल निळ्या आकाशातून एखाद्या उल्केप्रमाणे मी दूर फेकला गेलोय.

    (काही क्षण स्तब्ध ! मग येरझारा घालू लागतो.) काश्मीरला जाताना इथे यायला माझं मन कचरत होतं ! वाटायचे की इथले पर्वत, दऱ्याखोरी, माझ्या पुढे प्रश्नचिह्न होऊन उभ्या राहातील. पण इथे येण्याचा मोह मी टाळू शकलो नाही. आणि इथं येऊनही माझी निराशाच झाली. मला माझाच तिरस्कार वाटू लागला. माझ्या आगमनाचा दिवस ज्यांनी उत्सवाप्रमाणे साजरा केला त्यांचीही चीड आली. त्या दिवशी पहिल्यांदा माझं मन मुक्ततेसाठी व्याकुळ झालं.

    पण त्यावेळी मुक्त होणं शक्यच नव्हतं मला. त्यावेळी मी तुला भेटायलाही आलो नाही कारण... माझ्या अस्थिर मनाला तुझ्या डोळ्यांची भीतीं वाटायची. त्यांच्यापासून स्वतःला लपवीत होतो मी. तुला काय वाटेल, बाकीचे लोक तुला काय म्हणतील, याची कल्पना होती मला. पण तुझ्या मनात काही विकल्प येणार नाही, याचीही खात्री होती. एक दिवस हे सगळं तुला सांगेन, माझ्या मनातलं द्वंद्व तुला समजावून देईन या आशेवर मी इथून गेलो. पण द्वंद्व एकाच व्यक्तीपुरतं मर्यादित राहात नाही. परिवर्तन एकाच दिशेने होत नसतं हे माझ्या लक्षातच नाही आलं. म्हणून आज इथं आल्यावर सगळं कसं शून्यवत वाटतंय.

    (गवाक्षाकडे जात) लोकांना वाटतं त्या वैभवात राहून मी खूप साहित्यनिर्मिती केली. पण त्या वातावरणात मी काहीच लिहिलेलं नाही. जे काही लिहिलंय ते इथं मिळवलेल्या अनुभूतीतूनच. कुमारसंभवातली पार्श्वभूमी या हिमालय पर्वताची आहे. आणि त्यातली उमा आहेस तू! मेघदूतातली त्या यक्षाची वेदना-पीडा ही माझी स्वतःची वेदना। आहे आणि त्यातली विरहाने व्याकुळ झालेली यक्षिणी आहेस तू ! अभिज्ञान-शाकुंतल लिहिताना शकुंतलेच्या रूपात तूच माझ्या डोळ्यांपुढे होतीस. रघुवंशातला अजाचा विलाप म्हणजे माझ्याच वेदनेची अभिव्यक्ती होती. जे काही मी लिहिलं त्यात तुझ्या-माझ्या गतकालीन स्मृतींचाच इतिहास मी रेखाटला. आणि जेव्हा त्यापेक्षा वेगळं काही लिहायला गेलो तेव्हा ती रचनाच निर्जीव ठरली. आणि... (मल्लिका तळव्यात तोंड झाकते. कालिदास बोलता बोलता थांबतो व तिच्याकडे पाहातो.) मी लिहिलेलं सगळं तू वाचावंस अशी फार इच्छा होती माझी. पण परिस्थितीची साखळी अशी काही विचित्रपणे तुटली आहे...की...

    मल्लिका : नाही नाही, ती साखळी आजही अखंडच आहे. (कोपऱ्यातले भूर्जपत्रांचे गठ्ठे आणून त्याच्या हातात देते. तो काही पाने चाळतो. मग आश्चर्याने...)

    कालिदास : मेघदूत ? तुझ्याकडे मेघदूताची प्रत कशी आली ?

    मल्लिका : तुझ्या सगळ्या रचना माझ्याकडे आहेत.

    कालिदास : काय? माझ्या सगळ्या रचना तुझ्याकडे आहेत ? पण, त्या इथं कशा मिळाल्या ?

    मल्लिका : उज्जैनीचे व्यापारी कधी कधी या मार्गाने जातात त्यांना मी मुद्दाम आणायला सांगायची.

    कालिदास : आणि त्यासाठी लागणारं द्रव्य ?

    मल्लिका : वर्षा दोन वर्षांनी एखादी प्रत मिळायची त्यामुळे पैसे साठवायला खूप वेळ मिळायचा.

    कालिदास : (आसनावर बसत) ज्या उणिवा मला वर्षानुवर्षे सलताय्‌त- छळताय्‌त, त्या आज फार फाऽऽर मोठ्या वाटताय्‌त मल्लिका ! मला फार पूर्वीच इथं यायला हवं होतं. इथल्या पावसात मनसोक्त भिजलो असतो. धुंद झालो असतो. त्या धुंदीत खूप काही लिहिलं असतं. जे मी आजपर्यंत लिहू शकलो नाही, पण आषाढ मेघांसारखं आतल्या आत गरजतंय् (निःश्वास टाकून आसनावरील ग्रंथ हातात घेतो व त्याची पृष्ठे चाळू लागतो.) योग्य ऋतुमानाची वाट पाहातंय्. ते सारं काही !... हा कसला ग्रंथ आहे मल्लिका ? ही तर सगळी कोरी पृष्ठं आहेत !

    मल्लिका : ही पृष्ठं मी माझ्या हातांनी शिवून त्यांचा हा ग्रंथ तयार केलाय्. तू राजधानीहून इथे येशील तेव्हा हा ग्रंथ तुला भेट देऊन सांगणार होते या ग्रंथावर तुझ्या सर्वश्रेष्ठ महाकाव्याची रचना कर. पण... पण त्यावेळेस तू गावात येऊनही इथे आला नाहीस आणि माझी ही भेट तशीच राहून गेली. आता ही पाने फाटायला लागलीएत आणि ही तुझ्या काव्यरचनेसाठी आहेत हे सांगायलाही मला लाज वाटत आहे.

    कालिदास : (पाने चाळता चाळता एका पानावर थांबून) माझ्या सर्वश्रेष्ठ महाकाव्यासाठी हा ग्रंथ तू स्वतः तयार केलास अं? जागोजाग या पृष्ठांवर पाण्याचे थेंब सुकून गेलेले दिसतायत. हे पावसाचे थेंब नक्कीच नाहीत. वाटतंय की तुझ्या डोळ्यांनी या पृष्ठांवर बरंच काही लिहिलंय. जागोजागी घर्मबिंदूंनी ही पृष्ठं मलिन झाली आहेत. ठिकठिकाणी फुलांच्या सुकलेल्या पाकळ्यांनी आपले रंग यांच्यावर शिंपडलेत. तुझ्या नखांनी आणि दातांनी केलेल्या व्रणांची इथं विरामचिन्हं झाली आहेत. त्याखेरीज हे ग्रीष्माच्या उन्हाचे गहिरे रंग, हेमंताची धूळ, आणि या घरातली या पृष्ठांना बिलगलेली ओल. ही पृष्ठं आता कोरी कुठं आहेत मल्लिका ? यांच्यावर एका महाकाव्याची रचना आधीच होऊन गेली आहे. अनंत सर्गांचं एक महाकाव्य ! (ग्रंथ ठेवतो.) या पृष्ठांवर आता नव्याने आणखी काय लिहिणार ? (काही वेळ गवाक्षांतून बाहेर पाहातो. मग मल्लिकेकडे वळून) पण याच्याही पुढे जीवन शिल्लक आहे. आपण पुन्हा अथपासून सुरुवात करू या ! (आतल्या खोलीतून मुलीच्या रडण्याचा आवाज येतो. मल्लिका तिकडे जाऊ लागते. कालिदास स्तंभित होऊन तिच्याकडे पाहात राहातो.) मल्लिका, (मल्लिका थांबते) कुणाच्या रडण्याचा आवाज हा ?

    मल्लिका : हा...हा माझा वर्तमानकाळ आहे. (आत जाते. कालिदास अवाक्‌ होऊन तिच्याकडे पाहात राहातो.)

    कालिदास : तुझा वर्तमानकाळ ?

    (बाहेर दारावर थापा. मग लाथा मारल्याचा आवाज व दार उघडते. दारात विलोम उभा. कपडे व अंग चिखलाने भरलेले. झोकांड्या खात येतो.)

    विलोम : एक तर या पावसाच्या दिवसांत असा घसरून पडलो. आणि पडलो ते नेमके खड्डयात ! अरे बाबा विलोम, कितीदा सांगितलं, की फार उंचावर चढत जाऊ नकोस ! पण विलोम ऐकतायत कशाला ! आधी आलो तर दार बंद ! म्हणून परत गेलो. आणि... घसरून पडलो. आत्ता परत आलो तर पुन्हा दार बंदच ! आता परत मागे गेलो असतो तर काय झालं असतं अं ? आजचा दिवसच असा एऽ... (कालिदासाकडे लक्ष जाताच एकदम बोलता बोलता थांबतो. एखाद्या सूक्ष्म वस्तूचे निरीक्षण करावं तसा पाहात राहातो...) या डोळ्यांना काय झालंय् कुणास ठाऊक ! कधी कधी अनोळखी माणसंही खूप ओळखीची वाटतात. आणि काही वेळा खूप ओळखीची माणसंही नीट ओळखू येत नाहीत. आता हा इतका ओळखीचा चेहरा माझ्या समोर दिसतोय आणि मी... मला मात्र ओळख पटत नाही. चेहरा माहितीतला आहे. पण माणूस मात्र कुणी नवीनच वाटतोय्. हे बन्धो,... तू मला ओळखतोस ?

    (मल्लिका, आतून येते. विलोमला पाहून दारातच खिळून उभी राहाते.)

    कलिदास : चेहरा मोहोरा पार बदललाय पण माणूस आजही तोच आहेस.

    विलोम : अरे... हा आवाज... हे असेच शब्द... ( त्याला निरखून पाहण्याचा प्रयत्न करतो. मग एकदम हसत सुटतो) अस्सं म्हणजे तो... तू आहेस तर ! तू ! पडल्याचं आणि लागल्याचं सगळं दुःख पाऽर नाहीसं झालं ! तुला भेटण्यासाठी किती दिवस तळमळत होतो आतल्या आत ! (हसत)...ये... भेट... कडकडून भेट मला. (दोन्ही हात पसरून कालिदासाकडे जातो. कालिदास बाजूला सरकतो.) अं... भेटणार पण नाहीस ? मी असा घाणीने बरबटलोय म्हणून की माझाच तिरस्कार वाटतोय तुला ? पण तुझा माझा संबंध, असाच संपणारा नाहीए. आपण एकमेकांच्या बरेच जवळपास आहोत... असं एकदा तूच तर म्हणाला होतास ना ? मी तरी त्या आपलेपणात काही अंतर पडू दिलेलं नाही आणि आता तर आपण एकमेकांच्या आणखीनच जवळ आलो आहोत. काय मल्लिका, बरोबर आहे ना? अं. अग! तू अशी पुतळ्यासारखी का उभी आहेस ? (तिच्या जवळ जाऊन) आता तर मी या घरात या क्षणी आगंतुकपणे आलो नाही ना ? आता तर मी हक्कानं इथं उभा आहे ना ? आज तरी मी या घरात कालिदासाचं हक्काने स्वागत करू शकतो आहे ना ? (कालिदासाकडे वळून) काय योगायोग आहे नाही ? त्यावेळीही याच घरात आपली भेट झाली होती आणि आजही पुन्हा इथेच ! पण खरं सांगू तुला, तू कधीही आला असतास ना, तरीही आपली भेट याच घरात झाली असती. मल्लिका, तू अजून कालिदासाच्या पाहुणचाराची काहीच व्यवस्था केली नाहीस ? इतक्या वर्षानी तो आपल्या घरी येतोय आणि ... त्याचा पाहुणचार नाही ? इथल्या हरिणशावकांबद्दल त्याला किती प्रेम आहे, ठाऊक आहे ना तुला ? (कालिदासाला) एक हरिणशावक या घरातही आहे. तू अजून मल्लिकेच्या मुलीला पाहिलं नाहीस ? तिचेही डोळे एखाद्या हरिणशावकापेक्षा जास्त सुंदर आहेत आणि अष्टावक्र काय म्हणतो... माहीत आहे ? म्हणतो...

    मल्लिका : आर्य विलोम...

    विलोम : अष्टावक्र काय म्हणतो हे कालिदासाला कळू नये असं तुला वाटणारच ! अष्टावक्राच्या बोलण्यावर माझा मुळीच विश्वास नाही. पण कालिदासाला काय वाटतं ते तरी पाहू ! कळेल तरी एकदा आपल्याला, की मुलीचा चेहरा माझ्यासारखा दिसतो की अष्टावक्र म्हणतो त्याप्रमाणे... चल पाहू या तर ... (मल्लिका हातात तोंड झाकून आसनावर बसते.)

    कालिदास : (असह्य झाल्याप्रमाणे...) तू आत्ता इथून चालता हो पाहू !

    विलोम : चालता होऊ ? (हसतो) या घरातून की या प्रदेशातूनच ? राज्यकर्ते फार बलवान असतात म्हणे !

    कलिदास : तू आधी इथून चालता हो म्हणून सांगतोय मी तुला.

    विलोम : (कालिदासाकडे रोखून पाहातो.) का ? तू परत आलायस म्हणून ? अनेक वर्षापूवीं सोडलेली भूमी तुला परत आपलीशी वाटायला लागली आहे म्हणून ? तुझे अधिकार शाश्वत आहेत म्हणून ? (हसतो.) तुला वाटतंय तुझ्याबाहेर जीवनाला गतीच नाही. तू आणि फक्त तूच आहेस. पण काळ इतका कठोर नाहीए कालिदास. त्यानं इतरांना पण सत्ता दिली आहे. अधिकार दिलेत. धूप आणि नैवेद्य घेत तो नुसता उंबऱ्यावर नाही बसून राहिला. त्याने इतरांनाही निर्माण केलंय ! संधी दिली आहे. (थांबून) तुला त्याच्या निर्मितीबद्दलही तिरस्कार वाटतो. कारण. कारण तू स्वतःला जिथं पाहू इच्छितोयस तिथं तू नाहीएस ! (काही क्षण त्याच्याकडे पाहातो. मग हसतो.) मी आत्ता इथून निघून जावं अशी तुझी इच्छा आहे ना ? ठीक आहे. जातो मी ! पण तू आज्ञा करतोयस म्हणून नाही. आज तू आमच्या घरचा अतिथी आहेस. आणि अतिथीच्या इच्छेचा आदर करणं ही आपली परंपरा आहे. जातो मी. (दाराकडे जातो. थांबून मल्लिकेला...) मल्लिका, आपल्याकडून पाहुणचारात काही कमी पडू देऊ नकोस. इतक्या वर्षानी आलेला पाहुणा, न जाणो परत कधी येईल की नाही. (कालिदासाकडे बघत हसत जातो. मल्लिका तोंडावरचे हात काढून कालिदासाकडे पाहाते.)

    - oOo -

    पुस्तक: आषाढातील एक दिवस
    लेखक: मोहन राकेश/ विश्वनाथ राजपाठक
    प्रकाशक: कॉन्टिनेन्टल प्रकाशन
    आवृत्ती पहिली (१९७७)
    पृ.: ४९-५७.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा