RamataramMarquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

बुधवार, १० जून, २०२६

भाषण देण्याचा प्रकार

  • परमेश्वर दयाळू आहे आणि श्रेष्ठ उपकारकर्ता आहे, यात तिळमात्र शंका नाही. मानवजातीला त्याने मोठ्यांत मोठे असे काही दिले असेल, तर ती म्हणजे वाणी.

    आता बोलता आल्यावर माणूस ही कला आत्मसात करणारच. पूर्वी मनुष्यप्राण्याच्या वैभवकाळी वक्तृत्वकला ही तत्त्वज्ञ, कवी, नट आणि शास्त्रज्ञ यांच्यापुरतीच मर्यादित होती. पण पुढे मनुष्यजातीचा ऱ्हास होऊ लागला आणि वक्तृत्वकला ही भाषण करणे, या दशेप्रत येऊन पोहोचली. त्यातच अनेक राष्ट्रांच्या घटनांनी भाषणस्वातंत्र्याचा उद्घोष केला आणि 'भाषण देणे' हा प्रत्येक माणूसप्राण्याचा हक्क ठरला. जेवणाच्या टेबलापासून कोपऱ्यावरच्या सभेपर्यंत कोणीही उभे राहून भाषण करावे : बंधू-भगिनींनो!...

    आता तर लोक निवडून येण्यासाठी भाषणे करतात, का भाषणे करण्यासाठी निवडून येतात, असा प्रश्न आपल्यापुढे उभा राहतो. बरे, ज्या कोणाला विनोदबुद्धी आहे, त्याने हे सारे गंमत म्हणून सहन केले असते. पण कोणा शहाण्या शास्त्रज्ञाने लाऊडस्पीकरचा शोध लावून अक्षम्य अपराध केला आणि हे एक नवे हत्यार भाषण देणाऱ्याच्या हातात आले. दूरवर मारामारी करता येणे शक्य झाल्यामुळे या शस्त्राच्या साह्याने वक्ता आता प्रचंड लांबी-रुंदीच्या श्रोतृसमुदायाला हैराण करू शकतो. वर्तमानपत्रांत प्रतिदिनी प्रसिद्ध होणारे फोटो पाहिले, तर त्यात मायक्रोफोनचा गळा पकडून लोकांना हैराण करणारे कित्येक वक्ते आपल्याला आढळतात.

    घटनेने दिलेल्या भाषणस्वातंत्र्याचा उपयोग असा समाजाला उपद्रव देण्यासाठी सर्रास होऊ लागलेला आहे. कोणा तरी राजकीय पक्षाने आता या भाषणस्वातंत्र्यापासून श्रोत्यांना संरक्षण देणारा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीत हा पक्ष निश्चितच प्रचंड बहुमताने निवडून येईल, यात मला शंका नाही. माझ्यापुरते बोलायचे, तर याच पक्षाला मी मत देईन!

    परदेशात 'आफ्टर डिनर स्पीच' हा एक तापदायक प्रकार आहे. जेवणाच्या टेबलाशी उभा राहून वक्ता बोलतो. तिथे असे बोलावेच लागते. ऑस्ट्रेलियात हे संकट मी किती तरी वेळा चुकविले. पण जेवणे सारखी होत. आम्हा आठ-नऊ आशियाई लोकांना कुठे-कुठे जावे लागे. कधी लॉर्ड मेयर ऑफ सिडनी याचे डिनर, तर कधी जनरल मॅनेजर ऑफ ए.बी.सी. याचे जेवण, कधी एक्स्टर्नल अफेअर्स या खात्यातर्फे, तर कधी रोटरी क्लब ऑफ मेलबोर्नतर्फे.

    एकदा जेवणानंतर बोलण्याची वेळ माझ्यावर आली. शेजारी ऑस्ट्रेलियन रेडिओचे ग्रॅहॅम व्हाइट होते. त्यांना मी हळूच विचारले, “काय बोलू मी?”

    ते म्हणाले, “तू कथालेखक आहेस ना, मग भाषण कशाला करतोस? एक फक्कड गोष्ट सांग...”

    मी सगळे धैर्य एकवटून उभा राहिलो आणि गोष्ट सांगू लागलो...

    पांढर्‍यावर काळे

    एक गृहस्थ हौशी शिकारी होते. पण त्यांना समज चांगली होती. वाघाच्या शिकारीला जाताना सहसा ते आपल्यासोबत कुणाला नेत नसत. का?– तर, आपल्याबरोबर त्याचा जीव धोक्यात येऊ नये. कधी वाघाचा हल्ला झालाच, तर आपले आपण संरक्षण करू; फार तर एकटेच मरू. दुसऱ्याला बरोबर न्यायचे, म्हणजे त्याच्या प्राणाची जबाबदारी घ्यायची. ती नको.

    या गृहस्थाचे दोन-तीन मित्र होते. त्यांना शिकार बघण्याची फार आवड, ते पुनःपुन्हा म्हणत की, “आम्हाला एकवार बरोबर घेऊन चला.”

    हा म्हणे, “नाही.”

    “का?”

    “तुमचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर पडते.”

    “आम्ही आमचं बघून घेऊ. तुम्ही जिथं बसणार, तिथून आम्ही थोडं दूर बसू मचाणावर आणि वाघ कसा येतो, तुम्ही बांधलेलं बकरं तो कसं धरतो, कसं खातो; मग तुम्ही त्याला कशी गोळी घालता आणि तो कसा मरतो... हे सगळं आम्हाला बघायचं आहे.”

    ही त्यांची भुणभुण बरेच दिवस चालू राहिली आणि एके दिवशी वैतागानं हे गृहस्थ कबूल झाले.

    वाघाची बातमी आली होती. जीपमध्ये बसून सर्व लोक जंगलाकडे गेले. आता आपल्याला काही तरी विलक्षण बघायला मिळणार, म्हणून सर्व जण उत्सुक होते. सर्व प्रवासात हे तीन मित्र आनंदात होते आणि हा शिकारी मात्र गप्प, अंतर्मुख बसून होता. अखेर प्रवास संपला. जंगल आलं. अडचणीच्या जागी रेडा बांधलेला होता. आदल्या रात्री तो वाघानं अर्धवट खाल्ला होता. म्हणजे, आज तो इथं नक्कीच येणार.

    दोन झाडांवर मचाणं बांधून तयार होती. एकावर शिकारी बसले. त्यांच्यापासून वीस-एक यार्डावर दुसरं झाड होतं. त्याच्या वरच्या मचाणावर हे तिघे मित्र बसले. हळूहळू संध्याकाळ झाली. जंगलातले आवाज शांत झाले. संधिप्रकाशही मावळला, परंतु अंधार नव्हता. छान चांदणं होतं. मित्रांना रेडा आणि आसपासची जागा स्वच्छ दिसत होती. शिकारीचा सर्वच प्रसंग त्यांना नीट दिसणार होता.

    रात्रीचे साडे-आठ झाले न झाले, तोच बाजूच्या जंगलातून एक प्रचंड वाघ सावलीसारखा आला. तो अगदी स्पष्ट दिसत होता. सावधपणे चालत चालत तो आपल्या भक्ष्याच्या जवळ आला. थोडा वेळ थांबून त्याने अंदाज घेतला. इकडे-तिकडे पाहून घेतले आणि काही धोका नाही, याची खात्री होताच तो रेडा खाऊ लागला. काड्‌ऽ काड्‌ऽ आवाज होऊ लागला.

    तिघे मित्र शिकाऱ्याच्या मचाणाकडे अपेक्षेने पाहत होते. आता रायफलचा दाण्‌कन बार होणार आणि हा प्रचंड वाघ लोळणार याची त्यांना खात्रीच होती. कानात जीव गोळा करून ते ऐकत होते. एकटक बघत होते.

    पण एवढ्यात काय घडलं, कोण जाणे; थोडाफार आवाज झाला आणि पिकलं फळ पडावं, तसं ते शिकारी गृहस्थ झाडाच्या बुडात बदकन पडले.

    खाण्यात गुंतलेला वाघ एकदम चार पायांवर उडाला आणि चकित होऊन हे काय घडलं, म्हणून बघू लागला. मित्रांच्या काळजाचं पाणी-पाणी झालं. मचाण सोडून खाली पडलेल्या शिकाऱ्याच्या हातात काही शस्त्र नव्हतं. त्याची रायफल वरच अडकून राहिली होती. हे बघे मित्रही निःशस्त्रच होते.

    शिकारी पडल्या जागी सावरून नीट बसले होते आणि समोर काळासारखा उभा असलेला वाघ बघत होते. खाकी कपड्यांतला माणूस बघताच वाघानं गुरगुर केली. शेपटीचा आकडा वळवळला. वाघ दबला आणि एका झेपेत शिकाऱ्यापुढे आला. बघणाऱ्या मित्रांनी डोळे मिटले आणि छातीवर हात ठेवले.

    पाच-दहा सेकंद काही आवाज ऐकू आला नाही, तेव्हा धारिष्ट्यानं त्यांनी डोळे उघडून पाहिलं, तर शिकारी झाडाबुडी सुखरूप बसून होते आणि तो प्रचंड वाघ कान पाडून पायांत शेपूट घालून आल्या वाटेनं मुकाट परत जात होता! त्यानं शिकाऱ्यावर हल्ला केला नव्हता. मित्र प्रथम चकित झाले आणि मग त्यांनी आनंदानं झाडाखाली उड्या घेतल्या. वाघ निघून गेला होता. शिकारी गृहस्थ सुखरूप होते.

    अर्ध्या-एक तासानं सर्व पार्टी जीपमधून परत घरी निघाली. संकट टळलं, देवानं चमत्कार केला. कथापुराणांतून ऐकत होतो, ते आज प्रत्यक्ष पाहिलं, असं मित्रांना वाटत होतं. शिकारी गंभीरपणे बसून होते. शेवटी हिय्या करून एका मित्रानं विचारलं, “तुम्ही काय केलंत? वाघ निमूट परत कसा गेला?”

    यावर शिकारी मिश्यांतल्या मिश्यांत हसले आणि म्हणाले, “मी त्याला स्पष्टच सांगितलं. म्हणालो, मी तुझ्या तावडीत सापडलो आहे खरा. तू मला खाशील, पण ध्यानात घे– समोर माझे तीन मित्र आहेत. तुझं भोजन झाल्यावर त्यांना उद्देशून तुला आफ्टर डिनर स्पीच – जेवणानंतरचे चार शब्द बोलावे लागतील.”

    एवढे बोलून मी भाषण संपविले आणि खाली बसलो, तेव्हा एकच हशा उसळला आणि बराच वेळ टाळ्या वाजत राहिल्या.

    - oOo -

    पुस्तक: पांढर्‍यावर काळे.
    लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
    प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
    पाचवी आवृत्ती, पुनर्मुद्रण.
    वर्ष: २०२२.
    पृ. ११४-११७.

    (पहिली आवृत्ती: १९७१. अन्य प्रकाशन)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा