रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

अंधेरनगरी

निपाणी सारख्या शहरात राजरोसपणे एवढे आर्थिक शोषण, शारीरिक व्यभिचार चालू असतात, याचे कारण कारखानदारवर्गाची तिथली अमर्याद शक्ती. निपाणीवर विडी, जर्दा यांच्या कारखानदारांचे, तंबाखू-व्यापाऱ्यांचे राज्य आहे. त्यांना विरोध करण्याचे सामर्थ्य कामगारांत आज तरी दिसत नाही.

विडी-धंद्यात युनियनची परंपरा खूप पूर्वीपासून आहे. १९४६ सालापूर्वी निपाणीत विडी-कारखान्याच्या शेड्स होत्या. तिथे घरून कामगार येऊन विड्या वळण्याचे काम करीत. त्यामुळे कामाच्या तासांची, सुट्यांची निश्चिती होती. इतर बाबतींतही आताच्यापेक्षा खूप बरे चित्र होते. तेव्हा दोन रुपये रोज मिळायचा. तिथे एकत्रित असल्याने कामगारांची संघटना होती. तिने ही मजुरी वाढवून मिळण्यासाठी बैठा संप केला.

त्याचा परिणाम उलटाच झाला. या फॅक्टरी अ‍ॅक्टचे लफडे नको म्हणून मालकांनी शेड्समध्ये काम करून घेणे बंद करून, सध्याच्या पद्धतीने तंबाखू घरी घेऊन, अंगावर काम देणे सुरू केले. त्यामुळे कामाचे तास, सुट्ट्या, बोनस इ० हक्कांच्याबाबत मालकांना काहीच मर्यादा उरली नाही. घरी तंबाखू देण्याच्या या पद्धतीविरुद्ध ५२ साली निपाणीतल्या विडीकामगारांनी दोन महिने संप केला. त्यात त्यांना अपयश आले.

माणसं

पूर्वी कोल्हापूर, जयसिंगपूर, मिरज येथे अनेक विडीकारखाने होते. महाराष्ट्र सरकारचे कामगारविषयक कायदे जरा 'पुरोगामी'; म्हणून त्यांतले बरेचसे कारखाने कर्नाटकात निपाणीला हलले. निपाणीला कामगारांची संख्या खूप वाढल्याने तिथल्या युनियनने हक्कांविषयी मागणी करताच त्याच कारखानदारांनी आपल्या शाखा निपाणी-जवळच्या ग्रामीण भागात उघडल्या. खेड्यापाड्यातून अधिक बेकारी. रोख पैसा पाहायला मिळत नाही. तिथे निपाणीपेक्षा कमी दराने (३ रु० २० पैसे हजारी) काम करायला माणसे मिळतात. निपाणीतले कारखाने बंद करायला गेल्यास सरकार, कामगारांचे दडपण येण्याचा संभव. म्हणून निपाणीतले काम कमी करून ग्रामीण भागातल्या शाखांचे वाढवले आहे.

मधल्या काळात विडीकामगारांची परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक कमिट्या नेमल्या गेल्या. त्या प्रत्येक कमिटीला कारखानदारांनी विरोध केला. शेवटी १९७०-७१ साली विडीकामगार कायदा आला. त्याच्यावर मालकांनी दोन वर्षे स्टे मिळवला. आता त्याची अंमलबजावणी चालू झाली तरी त्यातूनही मालक लोक पळवाटा काढतातच.

कामगाराला घरी काम करायला देत असलात तरी ज्यांनी तीन महिने एका मालकाकडे तसे काम केले त्यास कायम कामगार समजून बोनस इत्यादी हक्क द्यावेत असे कायदा सांगतो. मालक लोक रजिस्टर ठेवतात. पण दर तीन महिन्यांनी कामगारांची नावे बदलत राहतात. या वेळी कामगाराचे नाव असल तर पुढच्या वेळी त्याच्या बायकोचे, त्याच्या पुढच्या वेळी मुलाचे.

मालकांच्या या युक्त्यांमुळे, विशेषतः ग्रामीण शाखांच्यामुळे, कामगारांची संख्या या धंद्यातल्या गरजेपेक्षा भरमसाट वाढून बसली आहे. काम वाढले नाही; वाटले गेले आहे. त्यावर कोणाचेच भागत नाही आणि कोणी कामही सोडू शकत नाही. ग्रामीण शाखा बंद करा अशी निपाणीतल्या कामगारांनी मागणी करावी तर ग्रामीण भागातल्या कामगारांशी तो द्रोह ठरतो. ही गोंधळाची परिस्थिती मालकांच्या फायद्याची आहे.

सध्या युनियनची अवस्था वाईट आहे. त्यांच्या वस्तीत एक वर छत नसलेली, पडकी झोपडी म्हणजे युनियनचे ऑफिस. तिथल्या गचपणात एक मोडकी ट्रंक आहे. त्या ट्रंकेतल्या चारसहा फायली हे त्यांचे रेकॉर्ड.

मालक लोक युनियनकडे कुणाला झुकून देत नाहीत. युनियनच्या माणसांबरोबर कामगार नुसता दिसला तरी त्याचे काम कमी करतात. हजार विड्यांचा तंबाखू देण्याऐवजी पाचशे विड्यांचा तंबाखू देतात, की दुसऱ्या दिवशीच्या त्याच्या घरच्या जेवणावरच परिणाम झाला पाहिजे. मग कामगार चीं-चीं करीत मालकाला शरण जातो.

एक म्हातारा कामगार सांगत होता, "या निपाणीत आम्हांला कोणी मालक शिवीगाळ करीत नाही की अंगावर गुंड घालीत नाही. ते फक्त आमचं काम कमी करतात, की माणूस वठणीवर आलाच पाहिजे. "

या परिस्थितीत निपाणी च्या कॉलेज मधील भूगोलाचे प्राध्यापक सुभाष जोशी हे विडीकामगारांची युनियन चालवतात. ते ज्या देवचंद शहा कॉलेजात काम करतात, त्या कॉलेजच्या कमिटीवर हे सर्व कारखानदार, व्यापारी आहेत. त्यांनी सुभाष जोशींना युनियन करतो या अपराधासाठी कॉलेजमधून काढून टाकले. पण जोशी हे मुलांमध्ये लोकप्रिय असल्याने त्यांनी उग्र आंदोलन करून त्यांना कॉलेजला परत घ्यायला भाग पाडले. सुभाष जोशीबरोबर जे कामगार आहेत त्यांना कामावरून काढून टाकले आहे. त्यांच्यावर व सुभाष जोशीवर मारामारी, दंगल केल्याचे खोटे खटले भरून त्यांना मालकांनी कोर्टबाजीत अडकले आहे. या विरुद्ध उपोषण, सत्याग्रह आदी मार्गाने तोंड दिले जातेय.

विडीकामगार हे भारतभर पसरलेले संख्येने त्यांच्या बाबतीत कायदेकानू तरी होऊ शकले. जर्दाकामगारांची केंद्रे कमी असल्याने त्यांचा विचारच झालेला नाही. स्त्रियांच्या रात्रपाळीची बंदी तर राजरोस धुडकावतात. एका पाळीच्या कामगारास लगेच दुसऱ्या पाळीवर काम करू देणे, हाही कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे. पण सकाळी आठ ते दुपारी चार आणि तिथपासून ते रात्री १२-१ तर कधी १॥-२॥ पर्यंत एकाच बाईकडून सतत कामे सर्रासपणे करून घेतात. कधीकधी तंबाखूवर पाणी मारून मिसळामिसळी करायची असल्यास देळ दवडणे फायद्याचे नसल्याने रात्री १॥ - २लाही न सोडता पहाटे ५ पर्यंत सलग काम करून घेऊन मग सोडतात. नंतर सकाळी ती घरी जाऊन दुपारी ४ च्या पाळीला परत कामावर येते.

सरकारने ठरून दिलेला रोजगार आधी श्रमाच्या मानाने कितीतरी कमी. पण त्यातही काटछाट करून कमी पैसे देणे ही तिथली पद्धतच आहे. अण्णा कुरबेट्टी या तिथल्या बड्या कारखानदारांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, " तशी पद्धतच आहे इथली"

"पण पद्धत असली तरी ती चुकीची असेल तर बदलायला नको का?"

"तशी पद्धतच आहे म्हटल्यावर बदलायचा प्रश्न येतोच कुठं? कोण बदलणार ? तुम्ही इतर मालकांना बदलायला सांगा. मग आम्ही बदलू."

या पद्धतीवर अण्णा कुरबेट्टींच्या विरुद्ध आणि विशेषतः त्यांच्या निजाम नावाच्या चेकरविरुद्ध स्त्री विडीकामगारांच्या तक्रारी आहेत. निपाणीत त्यांच्या पेट्रोलपंपामागे त्यांच्या मालकीचे एकामागोमाग एक असे सहा मोठे बंगले आहेत.

कायदे धुडकावणे हे या मंडळींना सहज शक्य होते. कारण कर्नाटक सरकारात भ्रष्टाचाराचा बुजबुजाट झालेला आहे. आणि यांच्याजवळ तर पैसा भरपूर. सरकारचे सर्व मजूरखाते यांनी खिशात टाकले आहे. कामगारसंख्या निपाणीत एवढी मोठी, तरी तिथे लेबर ऑफिस न ठेवता चिकोडी या तालक्याच्या गावी ठेवले आहे. त्यामुळे कामगाराला आयत्या वेळी या ऑफिसची काहीच मदत मिळत नाही. अनेक तक्रारअर्ज करावेत, तरी हे खाते दखल घेत नाही. कधीतरी यांचा अधिकारी येतो. तो भेटणार म्हणजे मालकालाच. त्याच्या सांगण्याप्रमाणे उत्तर नोंदून घेतो आणि प्रकरण बंद करून टाकतो.

आधीच कामगार दुबळा. त्याला कोर्टकचेऱ्या लढण्याची ताकद नाही. संघटनेचा मार्ग खुंटवला जातो. सरकारतर्फेही न्याय मिळायची शक्यता नसते. मग आहे ते कितीही कमी असले तरी कशाला तक्रार करा, मिळतेय तेवढ्यात जगायला शिकावे अशी प्रवृत्ती सर्वसाधारण कामगारांमध्ये रूढ आहे.

मालक मंडळी कामगारांची सर्व बाजूंनी कोंडी करू शकतात याचे कारण पैसा. निपाणी च्या परिसरातील अमर्याद आर्थिक सत्ता काही थोड्या कमिशन एजंटांच्या, तंबाखू-व्यापाऱ्यांच्या, जर्दाकारखानदारांच्या व विडीकारखानदारांच्या हातांत एकवटली आहे. त्यांतलेही प्रमुख शेट आहेत ते हे तिन्ही व्यवसाय करतात. ते कामगारांचे शोषण व हाल करतातच, पण तंबाखू पिकवणाऱ्या शेतकऱ्याचीही भरपूर आर्थिक पिळवणूक करतात.

हे प्रमुख व्यापारी शेतक-याकडून तंबाखू विकत घेऊन, त्याचा जर्दा करून, हे प्रमुख व्यापारी शेतकऱ्याकडून तंबाखू विकत घेऊन, त्याचा जा करून, शहरो-शहरीच्या विडीकारखानदारांना निकतात. हे से कमिशन एजंट असले तरी त्याचे प्राबल्य एवढे वाढले आहे की, तंबाखूचे सर्व अर्थव्यवहार त्यांच्या लहरीनुसार चालतो. निपाणी भागातल्या शेतकर्‍यांना या व्यापायांनी बांधून घेतले आहे. त्या त्या गावच्या सरपंचास किंवा पाटलास आपला त्या गावातला एजंट नेमून त्याला प्राप्तीतला थोडा वाटा देतात. म्हणजे त्याच्या मार्फत शेतकऱ्यांवर आपल्याशिवाय दुसऱ्या कोणाला त्याने तंबाखू विकू नये यासाठी दडपण आणायला सहज जमते.

तंबाखू व्यापार्‍यांमध्ये देवचंद शहा नावाचे 'टोबॅको किंग' म्हणून ओळखले जाणारे प्रमुख व्यापारी आहेत. त्यांची खरेदी एवढी मोठी असते की, ते जो भाव फोडतील तो पाहून इतर व्यापारी आपले भाव ठरवतात. गेली काही वर्षे तंबाखूचे भाव सतत खाली येत आहेत. दरवर्षी भाव खाली आणायला काहीतरी निमित्त सांगतात. कधी दुष्काळ, कधी बांगला देशचे युद्ध, तर कधी आणीबाणी. २५ रु० किलोचा १७/१८ रु० किलो भाव झाला. तो उतरत उतरत गेल्या वर्षी ४ रु. किलो इतका कमी आला. (काही ठिकाणी तर साठ पैसे किलोही झाला होता.) त्यामुळे त्या वर्षी तर शेतकऱ्यांना फायदा होणे किंवा केलेला खर्च भरून येणे राहोच, पण या भावात त्यांनी तंबाखूवर मारलेल्या औषधांचा खर्च भरून आला नाही.

वास्तविक तंबाखू पिकवणे फार जिकिरीचे काम. मजुरी, औषध मारणे, मशागत यावर बराच खर्च येतो. ही सर्व मेहनत या व्यापायांच्या लहरीसरशी कोसळून पडते. शेतकरी व्यापार्‍यांना बांधलेला असल्याने तो कोल्हापूरच्या खुल्या बाजारात तंबाखू नेऊ शकत नाही. आणि निपाणीमध्ये योग्य भाव मिळत नाही.

जसा भाव ठरवायला काही नियम नाही तशीच परिस्थिती या व्यापाऱ्यांच्या सर्व अंगांच्या बाबतीत दिसते. कोट्यवधी रुपयांच्या या व्यापारात मण म्हणजे किती शेर हे पक्के ठरलेले नाही. मणाचे किती शेर ते व्यापारी ठरवणार. काही भागात १७ किलोंचा मण तर काही भागात २८ किलोंचा मण. त्यामुळे बाहेरच्या माणसांना यांचे व्यवहार कळत नाहीत. यांना काही सार्वत्रिक नियमही लावता येत नाहीत. आश्चर्य असे की तिथल्या चिकोडी तालुका मार्केट कमिटी ने या भागातले सर्वात मोठे पीक तंबाखू हेच व्यापार्‍यांच्या सोयीसाठी निपाणी विभागात आपल्या कक्षाबाहेर ठेवले आहे!

शेतकर्‍यांची लूटमार करायची व्यापाऱ्यांची आणखी एक युक्ती म्हणजे निरनिराळ्या नावाखाली 'सूट' घ्यायची. बारदानसूट, गाडीसूट, काडीसूट, मातीसूट अशा बऱ्याच सुटा असतात. तंबाखू बारदानात भरताना सांडते म्हणून १०० किलो मागे ५ किलो सूट घेतात. तंबाखूत काड्या असतात या नावाखाली शेकडा दोन किलो काडीसूट काढतात, तर तंबाखूबरोबर माती जाते ही सबब सांगून शेकडा दोन किलो मातीसूट घेतात. सहा बोजा एका गाडीतून नेतात, गाडीत तंबाखू सांडते, या कारणास्तव १ किलो गाडीसूट काढतात. अशा निरनिराळ्या नावाखाली क्विंटलमागे दहापंधरा किलो सूट मारतात. म्हणजे शेतकर्‍याच्या वजन केलेल्या तंबाखूतून ही सूट बजा करून उरलेल्या मालाचे पैसे देतात ( म्हणजे देऊ असे म्हणतात) शिवाय एकूण व्यवहारावर दहा टक्के कमिशन असते ते वेगळेच, (विडीधंद्यातही यासारखा एक अजब प्रकार निपाणीत चालू होता तो आंध्रात आजही चालू आहे. कामगाराने हजार विडी वळून दिल्यावर त्याने मालकाला २०-२५ विडी ’खुशाली’ म्हणून फुकट वळून द्यायची)

निपाणी भागातले एक व्यापारी ’दानशूर' म्हणू प्रसिद्ध आदेत. निरनिराळ्या देवस्थानांना ते सढळ हाताने मदत करून पुण्य मिळवतात. ही पुण्याची प्राप्ती परस्पर असते. कारण ते शेतकऱ्यांच्या तंबाखूतून ’धर्मादाय सूट’ कापून घेतात.

भाव पाडून किंवा सूट मारून काढलेले पैसेही ते चटकन, सुखासुखी शेतकर्‍याच्या पदरात टाकत नाहीत. वर्षभर थोडेथोडे करून देतात. शेतकर्‍याला पैशासाठी सतत व्यापार्‍याच्या दारात उभे राहावे लागले की तो व्यापाऱ्याच्या दाबातही राहतो. शिवाय शेतक-याचे पैसे व्यापार्‍याला वर्षभर बिनव्याजी वापरता येतात हा तर मोठाच फायदा.

शेतकर्‍याचे व्याज बुडवून, वर त्याच्या मालावर बॅंकांकडून प्रचंड कर्ज मिळवून व्यापारी वापरतो. हा माल बॅंककडे गहाण ठेवतो. गहाण ठेवताना बॅंक मालाचा दर्जा ठरवते. हा दर्जा ठरवायला बॅंकेने 'टेस्टर' नियुक्त केलेले असतात. ते त्या तंबाखूची विडी करून ओढून बघतात आणि सांगतात की हा माल चाळीस रूपये किलोचा आहे. त्या प्रमाणात व्यापार्‍याला कर्ज मिळते. हे 'टेस्टर्स' कोण असावेत? तर गावातले बड़े व्यापारी. हे १० रु० किलो माल ४० रुपये किलो सांगतात आणि त्यावर बॅंकांकडून कोट्यवधी रुपये उचलतात, ते व्याजी लावून त्यावर भरपूर सावकारी चालते. या शहरात वीस बॅंकांच्या शाखा आहेत. त्यातील खाजगी व को ऑपरेटिव्ह बॅंकांच्या बोर्डवर व्यापारी मंडळीच बसलेली असतात. त्यामुळे तिथे तर व्यवहार आणखीच सुलभ.

-oOo-

पुस्तक: ’माणसं’
लेखक: अनिल अवचट
प्रकाशक: मौज प्रकाशन गृह
आवृत्ती आठवी (२००१)
आवृत्ती पहिली: १९८०
पृ. १६८-१७३.


हे वाचले का?

मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१९

चितळे मास्तर

एके काळी आमच्या गावात पोराला एकदा बिगरीत नेऊन बसवले की ते पोर मॅट्रिक पास किंवा नापास होईपर्यंत आईबाप त्याच्याविषयी फारसा विचार करीत नसत. " कार्ट चितळे मास्तरांच्या हवाली केलं आहे. ते त्यांच्या हाती सुखरूप आहे." अशी ठाम समजूत असे. "एके काळी असे" असेच म्हणणे योग्य ठरेल. कारण आता गाव बदलले. वास्तविक गोपाळ कृष्ण गोखल्यांचे स्मारक म्हणून गावकर्‍यांनी शाळा काढली. पण पाळण्यातले नाव सदानंद किंवा असेच काहीतरी असावे आणि व्यवहारात मुलाला बंडू किंवा बापू म्हणून ओळखले जावे तशी आमच्या शाळेची स्थिती आहे. तिला कोणी गोखले हायस्कूल म्हणत नाही. चितळे मास्तरांची शाळा हेच तिचे लौकिक नाव. वास्तविक चितळे मास्तर शाळेचे संस्थापक नव्हेत, किंवा शाळेच्या बोर्डारदेखील नाहीत. इतकेच काय, पण मी इंग्रजी तिसरीत असताना त्यांना दैववशात म्हणतात तसे प्रिन्सिपॉल व्हावे लागले होते, पण पंधरा दिवसांतच मास्तर त्या खुर्चीला वैतागून पुन्हा आपले 'चितळे मास्तर' झाले. त्यांच्यापेक्षा वयाने बरेच लहान असलेले काळे मास्तर हे प्रिन्सिपॉल झाले आणि अजूनही आहेत.

व्यक्ती आणि वल्ली

डाव्या हातात धोतर, एके काळी निळ्या रंगाचा असावा अशी शंका उत्पन्न करणारा खादीचा डगला, डोक्याला ईशान्य-नैऋत्य दाखवणारी काळी टोपी, टोपी बाहेर टकलाच्या आसपास टिकून राहिलेले केस आले आहेत, नाक आणि मिश्यांची ठेवण राम गणेश गडकऱ्यांसारखी, पायांतल्या वहाणा आदल्या दिवशी शाळेत विसरून गेले नसले तर पायांत आहेत, डावा हात धोतराचा सोगा पकडण्यात गुंतलेला असल्यामुळे उजव्या हातात ली पुस्तके उजव्या खांद्यावर धरलेली आणि हातात पुस्तके नसल्यास उजव्या हाताची तर्जनी खांद्याच्या बाजूला आपण एक हा आकडा दाखवताना नाचवतो तशी नाचवीत चितळे मास्तरांनी स्वतःच्या घरापासून शाळेपर्येतचा तो लांबसडक रस्ता गेली तीस वर्षे तुडवला.

त्यांनी मला शिकवले, माझ्या काकांना शिकवले, आणि आता माझ्या पुतण्यांना शिकवताहेत. आमच्या गावातल्या शंकराच्या देवळातला धर्मलिंग गुरव आणि चितळे मास्तर यांना एकच वर्णन लागू- नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ! त्यांनी पहिले महायुद्ध पाहिले, दुसरे पाहिले आणि आता कदाचित तिसरेही पाहतील.अजूनही गावी गेलो तर मी शंकराच्या देवळात जातो आणि तिथला धर्मलिंग गुरव "पुर्ष्या, शिंच्या राहणार आहेस चार दिवस की परत पळायची घाई?" असेच माझे स्वागत करतो. मला " पुर्ष्या" म्हणणारे दुसरे गृहस्थ म्हणजे चितळे मास्तर! धर्मलिंगाला नुसते पुर्ष्या म्हणून परवडत नाही. "पुर्ष्या शिंच्या " म्हटल्याखेरीज तो मलाच उद्देशून बोलतो आहे हे कदाचित मला कळणार नाही अशी त्याची समजूत असावी. काही वर्षांपूर्वी गावकरी मंडळींनी मी परदेशात जाऊन आलो म्हणून माझा सत्कार केला होता. समारंभ संपल्यावर धर्मलिंग गुरव कंदील वर करीत माझ्यापर्यंत आला आणि म्हणाला, “पुर्ष्या, शिंच्या इंग्लंडात काय हवाबिवा भरून घेतली काय अंगात ? फुगलायस काय!" धर्मलिंगाच्या या सलगीने गावातली नवी पिढी जरा बिचकली होती. आणि चितळे मास्तर माझी पाठ थोपटून म्हणाले होते, "पुर्ष्या, नाव राखलंस हो शाळेचं! वेस्टमिन्स्टर ब्रिज पहाटेच्या वेळी जाऊन पाह्यलास का रे? वर्डस्वर्थ कविता आठवतेय ना? अर्थ इज नॉट एनीथिंग टु शो मोअर फेअर- डल वुड ही बी ऑफ सोल हू कुछ पास बाय- ए साइट सो टचिंग इन इट्स ...?"

"मॅजेस्टी!" मी शाळेतल्या जुन्या सवयीला स्मरून म्हणालो.

"मॅजेस्टीऽऽ! बरोबर!" चितळे मास्तरांची ही सवय अजून टिकून होती. ते वाक्यातला शेवटला शब्द मुलांकडून वदवीत. मला त्यांचा इंग्रजीचा वर्ग आठवला.
"...टेक हर अप टेंडर्ली, लिफ्ट हर विथ केअर- फॅशन्ड् सो स्लेंडर्ली यंग अँड सो...?"
"फेअर !" सगळी मुले कोरसात ओरडायची.

इंग्रजी पहिलीत आल्यापासून मॅट्रिकपर्यंत सात वर्षे चितळे मास्तरांनी मला अनेक विषय शिकविले. त्यांचा मुख्य विषय इंग्रजी. पण ड्रॉइंग आणि ड्रिल सोडून ते कुठलाही विषय शिकवीत. फक्त तासाची घंटा आणि वेळापत्रक या दोन गोष्टींशी त्यांचे कधीच जमले नाही. प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक ही चैन त्या काळात आमच्या हायस्कूलला परवडण्यासारखी नव्हती. आठदहा शिक्षक सारी शाळा सांभाळायचे. आता शाळा पावसात नदी फुगते तशी फुगली आहे. भली मोठी इमारत, एकेका वर्गाच्या आठआठ तुमच्या, सकाळची शिफ्ट, दुपारची शिफ्ट, दोन-दोन हजार मुले वगैरे प्रकार माझ्या लहानपणी नव्हते. हल्ली मुलांना मास्तरांची नावे ठाऊक नसतात. माझ्या मास्तरांना शाळेतल्या सगळ्या मुलांची संपूर्ण नावे पाठ! पायात चपला घालून येणारा मुलगा हा फक्त गावातल्या मामलेदाराचा किंवा डॉक्टरांचा असे ! एरवी मॅट्रिक पर्यंत पोरांनी आणि चितळे मास्तरांसारख्या मास्तरांनी देखील शाळेचा रस्ता अनवाणीच तुडवला. शाळेतल्या अधिक हुषार आणि अधिक 'ढ' मुलंना मास्तर घरी बोलावून फुकट शिकवायचे. “कुमार अशोक हा गणितात योग्य प्रगती दाखवीत नाही, त्याला स्पेशल शिकवणी ठेवावी लागेल." असल्या चिठया पालकांना येत नसत. पोर नापास होणे हा मास्तरांच्या 'माथा आळ लागे' अशी शिक्षकांची भावना होती. 'छडी' ही शाळेत फळा आणि खडू यांच्याइतकीच आवश्यक वस्तू होती.

चितळे मास्तरांनी मात्र आपल्या तीस-बत्तीस वर्षाच्या कारकिर्दीत छडी कधीच वापरली नसावी. त्यांच्या जिभेने वळणच इतके तिरके होते की, तो मार पुष्कळ होई, फार रागावले की आंगठ्याने पोरांचे खंदे दाबत.

संध्याकाळी शाळा सुटल्यावर चितळे मास्तरांचा अवतार पाहण्यासारखा असे. फव्यावरच्या खडूची धूळ उडून उडून पिठाच्या गिरणीत नोकरीला असल्यासारखे दिसत. तरीही शिक्षणकार्य संपलेले नसे. संध्याकाळी त्यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे 'मागासलेल्या जमातीचे' वर्ग चालायचे.

चितळे मास्तरांचा वर्गात वापरण्याचा शब्दकोश अगदी स्वतंत्र होता. पहिला तास इंग्रजीचा म्हणून आग्रह नेल्सन साहेबाचे अगर तर्खडकरांचे पुस्तक उडून तयारीत राहावे तर मास्तर हातात जगाचा नकाशा बंदुकीसारखा खांद्यावर घेऊन शिरत. मग वर्गात खसखस पिके. मास्तर "अभ्यंकर, आपटे, बागवे, चित्रे" करीत हजेरी घेऊ लागायचे. तेवढ्यात शाळेच्या घंटेइतकाच जुना असलेला घंटा बडवणारा दामू शिपाई पृथ्वीचा गोल आणून टेबलावर ठेवी. चितळे मास्तर त्याला तो सगळी पृथ्वी हातावर उचलतो म्हणून 'हर्क्यूलस' म्हणत. हजेरी संपली की पुढल्या बाकावरच्या एखाद्या स्कॉलर मुलाला उद्देशून मास्तर विचारीत, "हं बृहस्पती, गेल्या तासाला कुठे आलो होतो?"
"सर, इंग्लिशचा तास आहे."
"ऑं? मग भूगोलाचा तास केव्हा आहे?"
“तिसरा."
"मग तिसऱ्या तासाला तर्खडकराचं श्राद्ध करू या. भूगोलाची पुस्तकं काढा !"

ही पुस्तके काढण्यात काही अर्थ नसे. कारण चितळे मास्तरांनी पुस्तकाला धरून कधीच काही शिकवले नाही. भूगोल असो, इतिहास असो, इंग्रजी असो वा गणित असो, “कसला तास आहे?" ह्या प्रश्नाला "चितळे मास्तरांचा !" हेच उत्तर योग्य होते. सर्वानमते एखादा विषय ठरायचा आणि मग मास्तर रंगात यायला लागायचे. आयुष्यभर त्यांनी अनेक विषय शिकवले, पण काही काही गोष्टी मात्र त्यांना अजिबात कधी जमल्या नाहीत. उदाहरणार्थ, हिंदुस्थानचा नकाशा. पाचदहा मिनिटे फळ्यावर खडू इकडून तिकडून ओढल्यानंतर अगदी ओढगस्तीला लागलेला हिंदुस्थानचा नकाशा तयार व्हायचा!

"हिंदुस्तान देश जरासा दक्षिण अमेरिकेसारखा आलाय का रे बुवा ? आपणच मिष्किलपणाने विचारायचे. खांद्यावरून आणलेली नकाशाची गुंडाळी खचितच सोडीत असत. "हां, पांडू, जरा नीट काढ बघू तुझ्या मातृभूमीचा नकाशा-

मग आमच्या वर्गात ड्रॉईंग मध्ये पटाईत असलेला पांडू घरत चितळे मास्तरांनी काढलेली मातृभूमी पुसून झकास नकाशा काढायचा.

"देव बाकी कुणाच्या बोटांत काय ठेवतो पाहा हं. पांडुअण्णा, सांगा आता. मान्सून वारे कुठून येतात?"

पांडुअण्णांची विकेट उडालेली असायची.

- oOo -

पुस्तक: ’व्यक्ती आणि वल्ली’
लेखक: पु. ल. देशपांडे
प्रकाशक: मौज प्रकाशन गृह
आवृत्ती बावीसावी (२००३)
पृ. ११७-१२०.


हे वाचले का?

घटत्या बेरजेचा सिद्धांत

नेपोलियनने एकदा रणांगणातला एक हिशेब सांगितला होता. फ्रेंच सेना घेऊन तो इजिप्तमध्ये गेला होता. तेथील अरबांच्या एका जमातीचे नाव ‘मामेलुक’ असे होते. हे लोक अंगापिंडाने कणखर व शरीराने धिप्पाड होते. फ्रेंच लोक त्या मानाने बारीक दिसत. तेव्हा या धिप्पाड लोकांशी लढताना फ्रेंचांचा धीर खचू नये म्हणून त्याने फ्रेंचांना मानवी गणिताचा हिशेब सांगितला. तो म्हणाला, एक फ्रेंच व एक मामेलुक यांचा सामना झाला तर मामेलुक निश्चित भारी आहे. शंभर फ्रेंच व शंभर मामेलुक असा सामना झाला तर बरोबरी होईल आणि दहा हजार फ्रेंच व एक लक्ष मामेलुक अशी लढाई झाली तर फ्रेंच मामेलुकांचा सपशेल पराभव करतील! याचा अर्थ असा की फ्रेंचांची संख्या वाढत जाते तसतसे त्यांचे बळ संख्येपेक्षा जास्त होत जाते आणि मामेलुकांची संख्या वाढू लागली की ते कमजोर होत जातात! हे मानवी गणित आहे; जड वस्तूंच्या गणितापेक्षा ते फार निराळे आहे.

माझे चिंतन

आपण भारतीय लोक मामेलुकांच्या गणितात बसतो, फ्रेंचांच्या नाही. वैय्यक्तिक हिशेब केला तर आपण खरोखरच जगात अद्वितीय ठरू; पण आपण संघ करू लागलो, चार माणसे एकत्र आली की आपले सामर्थ्य तितक्या पटीने न वाढता उलट कमी होते. असे का व्हावे याची मीमांसा करावयाची आहे. पण तसे करण्यापूर्वी आपण वैय्यक्तिक दृष्टीने खरोखरच कसे गुणसंपन्न आहो हे दिग्दर्शित करतो. म्हणजे याच गुणांची संघटना केली तर जगात आपण पराक्रमाच्या कोणत्या कोटी करू शकू याची कल्पना येईल.

त्यांचे सामुदायिक जीवनातील सामर्थ्य

यासाठी जपानशी तुलना करणे उद्बोधक होईल. आपली अर्वाचीन काळातील सर्व प्रगती ब्रिटिश विद्येच्या प्रसारानंतरची म्हणजे शंभर सव्वाशे वर्षांतली आहे. अर्वाचीन जपानचा उत्कर्ष त्याच काळातला आहे. मेजी युगापासून जवळजवळ गेली पाउणशे वर्षे जपान प्रगतीच्या मार्गाने अत्यंत वेगाने अंतर कापीत चालला आहे. समाजाची पुनर्घटना, औद्योगीकरण, राष्ट्रनिष्ठा, विज्ञान-अभ्यास, लष्करी सामर्थ्य या बाबतींत जगाला थक्क करून सोडील अशा गतीने जपान चालला आहे. पण असे असूनही जपानच्या या सर्व वैभवातील एक वैगुण्य जाणवल्याखेरीज राहात नाही. आम्ही भारतीय वैय्यक्तिक कर्तृत्व निर्माण करू शकतो, सामुदायिक जीवनाचा उत्कर्ष आम्हास साधत नाही. जपान दुसर्‍या टोकाला आहे. सामुदायिक जीवनातील सामर्थ्याची त्याने अगदी तड गाठली आहे; पण वैय्यक्तिक वैभवात जपान फार खुजा आहे. गेल्या शंभर वर्षांत किंवा त्याच्या मागच्या काळातही जगाचे डोळे आपल्या गुणवैभवाने, व्यक्तित्वाने दिपवील असा एकाही महापुरुष जपानमध्ये झाला नाही. अब्राहम लिंकन, रूझवेल्ट, लेनिन, एडिसन, मेरी क्युरी, डार्विन, पाव्हलॉव्ह, शॉ, इब्सेन, गॉर्की, टॉलस्टॉय, नेपोलियन, नेल्सन, आयसेनहोवर, नॉर्मा शेअरर, ग्रेटा गार्बो, पॉल मुनी यांसारखे एकही नाव जपानच्या इतिहासातून ऐकू येत नाही.

उलट हिंदुस्थानच्या गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासातच अशी कितीतरी नावे आढळतात. टिळक, सावरकर, महात्माजी, नेहरू, सुभाषचंद्र, जगदीशचन्द्र, चंद्रशेखर रमण, सुब्बाराव, (अमेरिकेतील) शंकरराव गोखले, भाभा, राममोहन रॉय, विवेकानंद, रवीन्द्रनाथ, शरदचन्द्र, राधाकृष्णन, उदयशंकर या व्यक्तींची कीर्ती जगात दुमदुमली आहे. त्यांच्या तोडीचा एकही पुरुष जपानमध्ये निर्माण झाला नाही. आपल्या भूमीचे हे वैभव स्पृहणीय आहे यात शंका नाही; पण असे असूनही गेल्या पन्नास वर्षांत जपानने सामुदायिक जीवनात जे अलौकिक सामर्थ्य निर्माण केले आहे, त्याच्या शतांशानेही आपल्याला निर्माण करता आले नाही. या गोष्टीचा आपण अगदी जिवाला लावून विचार केला पाहिजे.

अपयश: वैय्यक्तिक व राष्ट्रीय 

मला याची जी काही मीमांसा सांगावीशी वाटते, ती स्पष्ट करण्यासाठी दोन उदाहरणे सांगतो. १७६१ साली पानपतची लढाई झाली. तीत दोन प्रहरपर्यंत विजयश्री मराठ्यांची होती. पुढे विश्वासराव पडले आणि सैन्य एकदम कच खाऊन सैरावैरा धावू लागले. अशावेळी भाऊसाहेब वीराच्या आवेशाने एकदम सैन्यात घुसले व त्यांनी धारातीर्थी आत्मार्पण केले. हे दिव्य करताना त्यांच्या मनात असे आले की आपण पुण्याला एवढ्या प्रतिज्ञा करून आलो, आता हे अपयशी तोंड पुण्याला कसे दाखवावे? या स्थितीत जगणे असह्य आहे असे म्हणून त्या वीर पुरुषाने मृत्यूस कवटाळले. वैय्यक्तिक जीवनाच्या दृष्टीने भाऊसाहेबांचे हे कृत्य भूषणावह असेच आहे. जो आत्मार्पणाला सिद्ध झाला, त्याच्यापुढे आपले मस्तक नम्र झालेच पाहिजे.

पण ते तसे नम्र करून, सामाजिक जीवनाच्या दृष्टीने भाऊसाहेबांच्या या कृत्याचे मूल्यमापन करण्यास हरकत नाही. मराठी सत्तेच्या उत्कर्षाच्या दृष्टीने, हिंदवी स्वराज्याच्या दृष्टीने भाऊसाहेबांनी असे करावयास नको होते, असे वाटते. त्यावेळी शांत मनाने रणातून माघार घेऊन, जितके सैन्य वाचविणे शक्य होते तितके वाचवून, अपयश पत्करून, पुण्याला अपयशी तोंड दाखविण्याची आपत्ती त्यांनी स्वीकारावयास हवी होती. त्यात वैय्यक्तिक मानहानी झाली असती हे खरे आहे; पण राष्ट्राचे मोठे सैन्य आणि मग राष्ट्राचे मोठे धन सुरक्षित राहून त्या पराभवाचा काळिमा धुवून काढता आला असता. वैय्यक्तिक अपयश व राष्ट्राचे अपयश यांत भाऊसाहेबांनी पहिल्याची पर्वा न करता दुसर्‍याची चिंता वाहणे अवश्य होते.

पण आपल्याकडे शौर्यधैर्याच्या, वीरपरंपरेच्या, क्षात्रधर्माच्या कसोट्या अशा पाहात नाहीत. रजपूत लोक रणातून परत फिरावयाचे नाही, अशा प्रतिज्ञेने निघत व धारातीर्थी देह ठेवीत. वैय्यक्तिक शौर्याची व त्यागाची ती परमसीमा होय हे खरे आहे; पण थोडा वैय्यक्तिक कमीपणा पत्करून, हे वैभव सोडून देऊन रजपूत वीरांनी त्या त्या वेळी माघार घेऊन, पुन्हा तयारी करून शिवछत्रपतींच्या प्रमाणे पुन्हा चढाई केली असती तर मुसलमानांचे आक्रमण कायमचे मोडून काढण्यात पुढे मराठ्यांना जे यश आले, ते आधीच रजपुतांना आले असते आणि राजस्थानची व मग अखिल भारताची राष्ट्रीय हानी टळली असती. वैय्यक्तिक क्षात्रधर्माच्या अतिरेकी कल्पनेमुळे इतके रजपूत वीर रणात पडले, मारले गेले की राजस्थान या राष्ट्राचा त्यामुळे कणाच मोडून गेला.

हा विवेक फार मोलाचा!

भाऊसाहेब किंवा हे रजपूत वीर यांचे हे काहीसे मनोदौर्बल्य होय, असे म्हटले तर वाचकांना ते अत्यंत विपरीत वाटेल. म्हणून इंग्रज या बाबतीत कसा विचार करतात ते सांगून पाहतो; पटले तर पटेलही. ट्राफल्गारच्या लढाईत नेल्सन हा इंग्लिशांचा अत्यंत मोठा सेनापती कामास आला. आरमारी लढाई चालू होती; नेल्सन हा अगदी वरच्या बाजूला डेकवर उभा राहून आज्ञा देत होता. त्याने त्यावेळी क्राऊन, इपॉलेट इत्यादी त्याच्या थोर सेनापतिपदाची सर्व बिरुदे अंगावर धारण केली होती. त्यामुळे तो सहज ओळखू येऊन फ्रेंच गोलंदाज नेल्सन याच्यावर गोळा टाकतील अशी भीती वाटून त्याचे सरदार त्याला विनवू लागले, “महाराज, आपण एक तर ही बिरुदे उतरून ठेवा किंवा लढाई आम्ही सांभाळतो, तिच्यावर लक्ष ठेवून, आपण केबिनमध्ये बसून नुसत्या आज्ञा द्या.” पण नेल्सनने यातले काहीच मान्य केले नाही. “ही बिरुदे मी भूषण म्हणून मिळविली आहेत आणि भूषण म्हणूनच मी ती छातीवर धारण करीन”, असे त्याने उत्तर दिले. दुर्दैवाने त्याच्या अधिकार्‍यांची भीती खरी ठरली. फ्रेंचांनी त्याला त्या बिरुदांवरून ओळखून त्याच्यावर नेमका गोळा टाकला आणि त्यामुळे भयंकर जखमी होऊन शेवटी नेल्सन मृत्यू पावला. या घटनेचे वर्णन करून तिच्यावर भाष्य करताना नेल्सांचा चरित्रकार साउदे याने म्हटले आहे, “थोर पुरुषांच्या मनाला हा मोह शेवटी वश करतोच; हे दौर्बल्य त्याच्या ठायी शेवटी दिसतेच.”

नेल्सनवर साउदेने ही जी टीका केली आहे ती अतिशय वरच्या मूल्यमापनातून केली आहे. आपल्या राष्ट्रासाठी प्राणांचे बलिदान करणार्‍या थोर पुरुषाच्या मनाचे हे फार सूक्ष्मपणे केलेले विश्लेषण आहे आणि त्यातून दिसून आलेले हे वैगुण्य आहे. आघाडीवर जाऊन निर्भयतेने प्राणत्याग करणे जेथे अवश्य असेल, त्यावरच सैन्याचे चैतन्य व अंतिम यश अवलंबून असेल, तेथे ते करणे अवश्यच आहे. तेथे माघार घ्यावी असे कोणीच म्हणणार नाही. पण काही प्रसंग असे येतात की याच्या उलट धोरण ठेवणे विजयाच्या दृष्टीने अवश्य असते. पण कित्येक थोर पुरुषांच्या प्रकृतीला ते मानवत नाही; त्यांना त्यात कमीपणा वाटतो. पण राष्ट्रासाठी, अंतिम यशासाठी तो पत्करणे अवश्य असते. तेथे आत्मार्पण हे व्यक्तीच्या यशाला पोषक, पण राष्ट्राच्या हिताला मारक असते. तरीही जे थोर पुरुष हा विवेक न करता आत्मबलिदान करतात, ते प्राणाचा त्याग करतात; पण स्वयशाचा, स्वकीर्तीचा करीत नाहीत. एरवी हे युक्तच आहे. पण त्या यशाचा त्याग करून राष्ट्राचे यश वाढविले पाहिजे अशी वेळ आली असतानाही तसे न करणे ही मोहवशता आहे, ते दौर्बल्य आहे, असा साउदेचा अभिप्राय आहे. नेल्सन ती बिरुदे उतरविण्यास तयार नव्हता, खाली केबिनमध्ये जाण्यास तयार नव्हता; कारण त्याला त्यात स्वत:च्या कीर्तीला कलंक लागेल ही भीती वाटत होती. पण त्याच्या या कृत्यामुळेच लढाई फसण्याचा संभाव होता. मग त्यामुळे इंग्लिश राष्ट्राच्या कीर्तीला कलंक लागला असता. हा विवेक न सांभाळणे हीच मोहवशता, असे साउदे म्हणतो.

वैय्यक्तिक कीर्ती व राष्ट्राची कीर्ती यांत राष्ट्राच्या कीर्तीला वरचे स्थान देणे अवश्य होते, असे त्याचे म्हणणे आहे. त्याच अर्थाने मी भाऊसाहेबांविषयी लिहिले आहे. १६६५ साली जयसिंगापुढे शरणागती पत्करताना शिवछत्रपतींनी हा विवेक सांभाळला होता. वैय्यक्तिक मानापमानाच्या भावनेच्या आहारी जाऊन त्यांनी त्यावेळी धारातीर्थी आत्मबलिदान केले असते तर राजस्थानचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात घडून येऊन हिंदवी स्वराज्याची भाषाच संपली असती! भाऊसाहेबांनी तोच विवेक सांभाळून, त्यावेळी माघार घेऊन, वर्ष दोन वर्षे जरूर तर थांबून पुन्हा चढाई केली असती, तर महाराष्ट्राची एक पिढी गारद होण्याऐवजी त्याचे आसन त्यावेळीच दिल्लीला स्थिर झाले असते. पण भाऊसाहेबांच्या त्या मनोवृत्तीमुळे हे साधले नाही.

पण ही वृत्ती हीच भारताची प्रकृती आहे! शिवछत्रपती हे अपवाद आहेत !!

- oOo -

मूळ लेख: भारतीय जीवनातील क्रिकेट आणि हॉकी

पुस्तक: ’माझे चिंतन’
लेखक: पु. ग. सहस्रबुद्धे
प्रकाशक: कॉन्टिनेन्टल प्रकाशन
आवृत्ती दुसरी, चौथे पुनर्मुद्रण (२००१)
पहिली आवृत्ती (१९५५)
पृ. २९-३४.

(टीप: पु. ग. सहस्रबुद्धे यांचे समग्र वाङ्मय https://sites.google.com/site/drpgsahasrabudhevicharmanch/ इथे उपलब्ध आहे.)


हे वाचले का?

दोन बुटके

'द प्रिन्सेस' ही स्वत:ला मानवतावादी, निसर्गप्रेमी समजणाऱ्या पण प्रत्यक्षात अत्यंत स्वार्थी व व्यवहारी असणाऱ्या एका श्रीमंत जहागीरदारीणबाईची कथा आहे असे वरकरणी वाटते. माणसाची स्वत:विषयीची समज किती खोटी असू शकते आणि माणसाचे विचार व त्याची कृती यांत केवढी तफावत असू शकते याचे ही कथा उत्तम उदाहरण आहे. आपण फार दयाळू आहो, कनवाळू आहो, परमेश्वराने गरीबांची मदत करण्यासाठी आपली निवड केली आहे, असे प्रिन्सेसला प्रामाणिकपणे वाटते. दर दोनतीन महिन्यांनी ती चर्चच्या मठाला भेट देते. तेथे भेटवस्तू वाटते. ती येणार असे कळल्यापासून ती जाईपर्यंत चर्चचे सारेजण तिच्या तैनातीत असतात. तिला उत्तम जेवण दिले जाते. राहण्याची उत्तम सोय केली जाते. येथले पवित्र वातावरण, येथील शांतता, परमेश्वरी कृपेचे सान्निध्य हे आपल्या मनावर केवढे ठसलेले आहे हे ती वारंवार सांगत राहते. अशीच यावेळी ती चर्चच्या भेटीला आली आहे. तिच्यासाठी एक स्वतंत्र खोली दिली जाते. खोलीत प्रवेश केल्याबरोबर-'तिचे मन एका अनिर्वचनीय आनंदाने भरून जाते. येथल्या वातावरणात सायप्रसच्या झाडांचा मन मोहवणारा गंध आहे हे तिला जाणवते. ती आपला भूतकाळ विसरते, आपण फक्त एकोणतीस वर्षांचे आहोत हे विसरते. तिला वाटते की युगायुगापासून आपले या जगाशी नाते आहे. आपले खरे जग तर हेच आहे. ती संपत्ती, ते वैभव सारे खोटे, भ्रामक आहे. सत्य काही असेल तर हे पवित्र शांत आयुष्य...'

कवडसे पकडणारा कलावंत

सायंकाळच्या वेळी प्रिन्सेस बागेत जाऊन बसते. तिचे मन आनंदाने इतके तरी भरलेले असते की तिच्या डोळ्यातून अथू येतात. अशावेळी तिची एका डॉक्टरशी भेट होते. हा डॉक्टर पूर्वी तिच्या इस्टेटीवर तिचा एक कर्मचारी म्हणून राहत होता. आता तो दर शनिवारी येथील लोकांना तपासण्यास येतो. प्रिन्सेसला आठवते की ह्या डॉक्टरवर तिने खूप उपकार केलेले होते. डॉक्टरच का, इस्टेटीवरच्या साऱ्याच माणसांना तिने किती प्रेमाने वागविले ते देवच जाणतो. त्यांच्याविषयी किती माया होती तिच्या मनात! ती जुन्या आठवणी काढते. पण डॉक्टरला त्या आठवाव्या वाटत नाहीत याचे तिला आचर्य वाटते. ती त्या काळाविषयी खोदून खोदून त्याला विचारते.

डॉक्टरच्या आठवणीत भूतकाळाचे चित्र मात्र फार निराळे आहे. त्याच्या मनात तिच्याविषयी संताप आहे. तिच्या पुन्हा पुन्हा विचारण्याने तो चिडतो. म्हणतो की ती जे करीत होती ते सारे ढोंग होते. माणसाविषयी तिला प्रेम नव्हतेच. तिला फक्त आपल्या श्रेष्ठपणाची (आणि इतरांच्या कनिष्ठपणाची) जाणीव होती. तिची दयाळू कृत्ये निरपेक्ष नव्हती. त्यात उपकार करीत असल्याचा मोठा अहंकार होता. माणसांच्या समोर चार तुकडे फेकायचे आणि त्याबदल्यात त्यांना कायमचे उपकृत करून ठेवायचे हे तिचे तंत्र होते.

म्हाताऱ्या स्त्रियांसाठी प्रिन्सेसने एक आश्रम काढला होता, त्या आश्रमातले त्यांचे जिणे जनावरासारखे होते. शाळा काढल्या त्यांची स्थिती तशीच. डॉक्टर तिला सांगतो की जे जे समाजकार्य केल्याचा तिला गर्व आहे त्यात प्रेम आणि आपुलकीचा लवलेश नसल्यामुळे ते एक ढोंगच आहे. शिवाय तिच्या इस्टेटीवर काम करणाऱ्यांना ती किती दुष्टपणे वागवायची. डॉक्टरचे उदाहरण घ्या. दहा वर्षे तो तिच्याजवळ राहिला, तिची शुश्रूषा केली आणि अचानक एके दिवशी तिने त्याला कसलेही कारण नसताना कामावरून काढून टाकले. त्याचे साधे स्पष्टीकरणही द्यावेसे तिला वाटले नाही. डॉक्टरची बायको तीनदा तिची विनवणी करण्यासाठी गेली: पण प्रिन्सेस तिला भेटलीही नाही...

आणि आता धर्मकर्तव्याच्या नावाखाली ती येथे येते. का येते? आपल्या अहंकाराला खाद्य मिळावे म्हणून. येथे येऊन ह्या बिचाऱ्या माणसांना किती त्रास होतो याची तिला जाणीव नाही. चर्चच्या प्रमुखापासून सेवकापर्यंत साऱ्यांना हिच्या तैनातीत नाचावे लागते. त्यांची कामे सोडून तिच्या पुढेपुढेच करावे लागते. हे तिचे परमेश्वराविषयीचे प्रेम नाही. इतरांना त्रास देण्याचा आपल्याला हक्क आहे हे तिने गृहीत धरले आहे. कारण ती इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे...

डॉक्टरच्या मनात इतक्या वर्षापासून साचलेले तो ओकून टाकतो. आता त्याला तिची भीती नाही. पण प्रिन्सेस प्रचंड अस्वस्थ होते. किती कृतघ्न माणूस आहे हा. आपण आयुष्यभर लोकांचाच तर विचार करीत गेलो. त्यांचे भले व्हावे असे आपल्याला किती मनापासून वाटते! आणि हा क्षुद्र माणूस! आपल्यालाच स्वार्थी म्हणतो, मतलबी, खोटारडी म्हणतो. आपल्या पवित्र भावनांचा अपमान तिला सहन होत नाही. तिला रडू कोसळते. खरेच. दु:ख सहन करण्यात, रडण्यात किती सुख असते. ती वर आकाशात पाहते. तारे उगवलेले असतात. तिला वाटते आपल्या डोळ्यातले अश्रू पाहण्यासाठीच हे तारे उगवले आहेत...

ती आपल्या खोलीत येते. तोंड स्वच्छ धुऊन चेहऱ्यावर पावडर मारते. तिच्यासाठी स्वादिष्ट जेवण आणलेले असते. जेवताना तिचे मन शांत होते. तिला वाटते, डॉक्टरने आपल्याला दूषणे दिली तर काय झाले? सारे जग आपल्याला दूषणे देवो. आपण त्यांना क्षमा केली पाहिजे. शत्रूवरही प्रेम करा असे धर्म सांगत नाही काय! सारे वैभव सोडून आपण येथे येऊन राहू. मग मात्र सारेजण आपले पाय धरण्यासाठी येतील. पण आपण म्हणू की आता फार उशीर झाला आहे... त्या सुखद विचारात तिला कधीतरी झोप लागली.

सकाळी तिला परतायचे होते. तिची घोडागाडी तयार करून ठेवलेली होती. चर्चचे प्रमुख तेथील जोगिणी, सेवक सेविका सारे तिला निरोप द्यायला आलेले असतात. आश्चर्य म्हणजे तो कालचा डॉक्टरही हजर झालेला असतो. तो तिला पाहताच वाकून अभिवादन करून म्हणतो-
'प्रिन्सेस, मला माफ करा...काल मी मूर्खासारखे काहीतरीच बोललो...मला क्षमा करा.’

आणि ती क्षमाशीलवृत्तीने आपला हात पुढे करते. तो वाकून त्याचे हलकेच चुंबन घेतो.

एखाद्या मुक्त पक्ष्यासारखी ती घोडागाडीत येऊन बसते. साऱ्याकडे मोठ्या प्रेमाने पाहत ती आपला हात हलविते. पुन्हा एकदा अननुभूत अशा आनंदाने तिचे हृदय भरून गेले होते. खरेच, क्षमा करण्यात किती आनंद असतो! बगी वेगाने धावत असते, आजूबाजूचे शेतकरी वाकून तिला नमस्कार करीत असतात आणि प्रिन्सेसला वाटते की आपण जण ढगातूनच प्रवास करतो आहो.

"किती सुखात आहे मी!' ती मनाशी पुटपुटते. 'किती आनंदात!'

चेकाव्हची ही एक विलक्षण परिणामकारक कथा आहे. तीव्र उपहास आणि तरल काव्यात्मता यांचा असा एकत्रित उपयोग सहसा आढळत नाही. 'प्रिन्सेस' चे चित्रण उभे करताना तिच्या मनातील काव्यात्म भाववृत्ती अत्यंत ठळकपणे लेखक शब्दबद्ध करतो. पण त्याहीपलीकडे अवघड असे काम हे आहे की ही काव्यात्मता, हा तरलता, ही भावुकता खोटा आहे, दिखाऊ आहे, भ्रामक आहे हेही दाखवून देणे. आणि ते कामही चेकॉव्हने फार कौशल्याने केले आहे त्याचा उपहास येथे अगदी शिगेला पोहोचलेला आहे. या दृष्टीने चर्चमधे आल्यावरची 'प्रिन्सेस’ची चिंतने, तिचे निसर्गाविषयीचे काव्यमय विचार, तिची भावावस्था चेकॉव्ह कशी व्यक्त करतो हे पाहण्यासारखे आहे. अतिशय हळुवार शब्द वापरून तो ती सायंकाळ उभी करतो; पण त्याबरोबरच ह्या विचारामागचे मन हे सामान्य आहे याची जाणीव वाचकाला होत जाते. एकीकडे केवळ शब्दांत म्हणजे कलेत- कसा खोटेपणा लपून बसू शकतो हे दाखविता दाखविता जीवनातही तो कसा लपलेला असतो हेही चेकॉव्ह उघड करतो. मोहक शब्द म्हणजे कविता नव्हे. त्या रचनेमागची कवीची मनोवृत्ती महत्त्वाची असते. शब्द फसवे असू शकतात. अशी माणसाची कृत्येही!

आयुष्यभर इतरांवर उपकार करण्यात धन्यता मानणाऱ्या प्रिन्सेसला अनपेक्षितपणे आपल्याविषयीचे इतरांचे कठोर, कटू मत कळते. पण तिचा भ्रमनिरास होत नाही. तिच्या भोवतीचा भ्रमाचा पडदा एवढा घट्ट आहे की डॉक्टरचे तीक्ष्ण शब्दही तो पाहू शकत नाहीत. या भ्रमामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाला एक आगळाच ताठरपणा येतो. सामर्थ्य येते. ह्या भ्रमाच्या घट्ट आवरणामुळेच ती बालिश वाटते पण खोटारडी वाटत नाहीत. क्रूर व नीच वाटत नाही. ती जे करते ते चांगलेच आहे असा तिचा ठाम विश्वास आहे. आत एक बाहेर एक असा कुटिलपणा तिच्याजवळ नाही. डॉक्टरची भेट होऊन गेल्यावर ती रडते. पण हे रडणे आपली चूक ध्यानात येऊन नव्हे तर आपल्याविषयी वाईट मत मनात ठेवून डॉक्टरने जी चूक केली आहे त्याबद्दल,डॉक्टरबद्दल. परमेश्वरा, पाप्यांना क्षमा कर....

व्यक्तीच्या मनातले विचार आणि त्याचे वर्तन यांच्यातील हे साम्य आहे की विरोध अशी एक गुंतागुंत चेकॉव्हने निर्माण करून ठेवली आहे. प्रिन्सेसच्या मनातील विचार चांगले आहेत आणि तिचे वर्तनही तिच्या दृष्टीने 'चांगलेच' आहे. पण डॉक्टरच्या दृष्टीने?

आता आपण सत्य आणि भ्रम यांच्या व्यक्तिनिष्ठ रूपांकडून, त्यांच्या वस्तुनिष्ठ रूपांकडे येऊ लागतो. जीवन व्यवहाराच्या दृष्टीने एखादे कृत्य फक्त करणाऱ्याला चांगले वाटून चालत नाही. ते समाजाच्या दृष्टीने, नैतिक दृष्टीनेही चांगले असावे लागते. (म्हणजे शेवटी चांगलेपणा हा देखील त्याच्या उपयोगावर अवलंबून असतो का? असा एक प्रश्न आपल्या मनात उभा राहतो आणि हेही ध्यानात येते की अशा प्रश्नाचे वस्तुनिष्ठ उत्तर असू शकत नाही.) डॉक्टरचे व्यक्तिचित्र रेखाटताना चेकॉव्हने त्यातही कशी गुंतागुंत करून ठेवली आहे हे पाहिले म्हणजे अगदी छोट्या अवकाशात केवढे विश्व चेकॉव्ह गोठवून ठेवू शकतो याची कल्पना येते. चेकॉव्ह हा स्वत: एक डॉक्टर आहे. पण म्हणून आपल्या सहानुभूतीचा पूर तो या पात्रावर लोटत नाही. त्याला डॉक्टरबद्दल सहानुभूती वाटते; पण त्यामुळे तो त्याला झुकते माप द्यायला मुळीच तयार नाही.

प्रिन्सेसच्या खानदानी व्यक्तिमत्वासमोर उभा केलेला डॉक्टर हा एक सामान्य आहे. त्याची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. कारण तो पूर्वी तिच्या नोकरीत होता, आज चर्चमधे नोकरी करतोय. त्याच्या मनात प्रिन्सेसविषयीया राग दडलेला आहे. पाच वर्षापूर्वी तिने त्याला विनाकारण नोकरीतून काढून टाकले म्हणून हा राग आहे. आणि मनात एखाद्याविषयी राग ठेवल्याने स्वत:चे मनच दूषित होतो असते. आत तो कुठेतरी व्यथित असतो आणि कुढत असतो. आज त्याला त्या अपमानाचा 'बदला' घेण्याची संधी मिळते आणि तो ताडताड तिला सुनावतो. तिच्यावर आरोप करतो. ही सारी सामान्यपणाचीच लक्षणे आहेत. त्याच्याजवळ तर काही भव्य विचारही नाहीत किंवा कृत्यातून ते दाखविण्याची इच्छाही नाही. तो एक साधा पोटार्थी माणूस आहे.

डॉक्टर प्रिन्सेसला तिच्या कृत्याबद्दल सुनावताना चेकॉव्हने त्याचे वर्णन केले आहे. तिचे एकेक दुष्कृत्य आठवून तो छद्मीपणाने हसतो. चेकॉव्ह लिहितो- 'त्याचे हास्य एखाद्या दुष्ट माणसासारखे वाईट आणि कठोर होते. तो दातओठ खात होता. त्याचा आवाज. त्याचा चेहरा, त्याचे हावभाव सारे दर्शवीत होते की त्याच्या मनात प्रिन्सेसबद्दल केवढी घृणा आहे. तो जे सांगत होता त्यात हसण्यासारखे काही नव्हते तरी सांगताना तो हसत होता. जणू त्याला आनंद झाला आहे.'

या ठिकाणी आपल्या (पुन्हा एकदा) लक्षात येते की चेकॉव्हला गरीब विरुद्ध श्रीमंत असा संघर्ष दाखविण्यात रस नाही. आपल्या गरीब पात्रालाही त्याने अनेक दोषांचा धनी केले आहे ते यासाठीच. चांगले आणि वाईट यातलाही हा संघर्ष नाही. कारण दोघांपैकी कुणीच पूर्णपणे चांगले किंवा वाईट नाही. आता विचार केल्यावर बाह्य तपशील बाजूला सारल्यावर आपण शेवटी खऱ्या 'चेकॉव्हिअन थीम' पाशी येऊन पोहोचतो.

हे सारे घडल्यावर देखील, दुसऱ्या दिवशी प्रिन्सेसला निरोप देताना डॉक्टर तेथे येतो. नुसता येत नाही तर तिची क्षमा देखील मागतो. सामान्य माणसाचे दुबळेपण हे कृतीतून अधोरेखित होते. आपल्या मनाला भिडते. खोलवर रुतते. डॉक्टरला ठाऊक असते की प्रिन्सेसचे चर्चच्या बिशपशीही फार चांगले संबंध आहेत आणि त्याला भीती वाटते की तिने जर आपली तक्रार केली तर ही नोकरीही आपल्याला सोडावी लागेल. म्हणून तो तिची क्षमा मागतो. या ठिकाणी डॉक्टरचे व्यक्तिमत्व ’ट्रॅजिक’ बनून जाते. भरडल्या जाणाऱ्या आणि त्या अन्यायाविरुद्ध बोलूही न शकणाऱ्या असंख्य सामान्य माणसांचा तो प्रतिनिधी बनून जातो.

आणि आता चेकॉव्हच्या कथेतले पात्र बनण्याचे भाग्य त्याला लाभते!

- oOo -

पुस्तक: ’कवडसे पकडणारा कलावंत’
लेखक: विजय पाडळकर
प्रकाशक: मॅजेस्टिक प्रकाशन
आवृत्ती पहिली (२००४)
पृ. ८५-८९.


हे वाचले का?

सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१९

सामना

कर्नल थॉमस पेरी जवळजवळ धावतच रॉजर गिलीलँडच्या खोलीत दार ठोठावायलाही त्याला उसंत नव्हती. आत आल्या आल्या तो ओरडला,
"रॉजर..."
रॉजरव्यवसायानं संख्याशास्त्रज्ञ होता. संगणकाच्या साहाय्यानं सोडवली जाणारी समीकरणं हे त्याच्या विशेष अभ्यासाचं क्षेत्र होतं. काही वर्षांपूर्वी सोडवण्यात आलेल्या, चार रंगांच्या नकाशाच्या कूटप्रश्नाची उकल करण्यात ज्या दोन-चार जणांचा वाटा होता, त्यात गिलीलंड होता. आज तो एकटाच बुद्धिबळाचा डाव लावून बसला होता.

वामनाचे चौथे पाऊल

"ये टॉम. बैस. आपण ब्रिटिशांइतके शिष्टाचाराला महत्त्व देत नाही, ही गोष्ट चांगली आहे यात शंकाच नाही. पण दार न ठोठावता आत शिरणं म्हणजे जरा जास्तच झालं. आत्ता माझ्या खोलीत माझी मैत्रीण असती म्हणजे?"
"छोडो यार. तुझी मैत्रीण राहिली तिकडे फिलाडेल्फियात. ती इकडे कशाला येईल?"
"व्हॉट डू यू मीन? माणसाला काय एकच मैत्रीण असते?"
"बस कर! माहीत आहे मला, तुझा तुझ्या ख्रिसवर केवढा जीव आहे ते. खरं सांग. ख्रिसची आठवण व्हिस्कीच्या घोटात बुडवायला बघतोयस. हो ना?"
"ते जाऊ दे." रॉजर विषय बदलत म्हणाला, "तू असा घाईघाईनं काय सांगायला आलास?"

"रॉजर, या सामन्यातली एक विचित्र गोष्ट माझ्या आत्ताच लक्षात आली. सामना कसा चाललाय हे कळायची काही सोय नाही, पण प्रत्येक खेळीला किती वेळ लागतोय, तेवढ्यावरनं काही अंदाज बांधता येतात."
"सांग ना."

टॉमनं जवळची एक घडीची खुर्ची ओढून घेतली व तिच्या पाठीवरून पाय टाकून तिच्यावर उलटी बैठक मारली.

रॉजरच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे पाहत तो म्हणाला, “पहिल्या महिन्यात प्रत्येक खेळीला किती वेळ लागत होता, तुला ठाऊक आहे?
"सरासरी बावीस मिनिटं चौदा सेकंद. प्लस और मायनस, सात मिनिटं अडतीस सेकंद."
"आणि दुसऱ्या महिन्यात?"
"सरासरी पंचावन्न मिनिटं चाळीस सेकंद. प्लस ऑर मायनस..."
"पुरे पुरे. तीन सिग्माचा व्हेरीअन्स सांगायची गरज नाही. तिसऱ्या महिन्यात तर प्रत्येक खेळीला तासापेक्षा जास्त वेळ लाग लागला."
"एक तास सोळा मिनिटं अठरा सेकंद." रॉजरमधला गणिततज्ज्ञ बोलला.

"बरोबर. आठवतं तुला? तेव्हा आपल्याला काळजी वाटत होती की, असाच वेळ जास्त जास्त लागू लागला, तर दोन तासांची कमाल मर्यादा ओलांडली जाते की काय? पण तसं काही झालं नाही आणि पुढच्याच महिन्यापासून तर प्रत्येक खेळीला वेळ कमी कमी लागू लागला आणि आज जेव्हा मी सहाव्या महिन्यातला सरासरी वेळ काढला, तेव्हा मला धक्काच बसला. तुला कल्पना आहे, सध्या प्रत्येक खेळीला किती वेळ लागतोय तो?'
"एक दशांश सेकंद." रॉजर शांतपणे शेजारी पडलेलं सिगारेटचं पाकीट उघडून टॉमपुढं धरत म्हणाला.
"आं? तुला माहीत आहे? तला केव्हा कळलं?"
"काल. सिगारेट घे."
"यू सनॉफेगन! मग कालच आम्हाला का सांगितलं नाहीस?"
"मला वाटलं तुम्हाला माहीत असेल."
"आणि असं का होतंय, हेही तुला कळलं होतं ?"
"मी ते तर्कानं जाणलं."
"केव्हा?"
केव्हाच."

टॉम रागानं लाल झाला. ताडकन उठून रॉजरच्या अंगावर धावून जाण्याच्या आविर्भावात तो म्हणाला, "आता सांगतोस लवकर, की दाबू तुझा गळा?"

"अरे, अरे! मी जरा गंमत केली. हे असं का होतंय याची अस्पष्ट कल्पना आत्ता आत्ताच माझ्या डोक्यात आली. आत्ता बुद्धिबळाचा डाव लावून बसलो होतो ना तेव्हा. तुम्हा सर्वांना माझी थिअरी सांगणारच होतो मी."
"मग सांग ना लवकर. का असा अंत पाहतोयस?"
"हे बघ, तुला बुद्धिबळ खेळता येत असतं, तर तुला समजावून सांगणं सोपं गेलं असतं."
"रॉजर, तू मला काय समजलास? तुझ्याइतका नसेन, पण कॉलेजमधे असताना मी चांगल्यापैकी बुद्धिबळ खेळत असे. पुढं मला तो खेळ फार एकसुरी वाटायला लागला, म्हणून मी खेळणं सोडून दिलं. तेव्हा सांगा महाशय आता कृपा करून!"

"हे बघ, बुद्धिबळात कधीकधी अशी परिस्थिती येते, की आपल्यावर एका खेळीत मात होणार असते. ती टाळायचा फक्त एकच उपाय असतो, तो म्हणजे प्रतिस्पर्ध्याला शह देणं. प्रतिस्पर्धी राजा हलवून शहातून बाहेर पडतो. पुन्हा तुम्ही शह देता. तुम्हाला दुसरा पर्यायच नसतो. तो राजा पुन्हा पहिल्या घरात नेतो. तुमच्यावर एका खेळीत मात होण्याची धमकी कायम असल्यामुळं तुम्हाला सारखे शह देतच बसावं लागतं. पण प्रत्येक वेळी प्रतिस्पर्धी शहातून सुटू शकत असल्यामुळं जशी त्याच्यावर मात होऊ शकत नाही तशीच तुमच्यावरही मात होऊ शकत नाही. दोघांपैकी कुणालाच ठरलेल्या खेळ्या सोडून इतर काही करता येत नाही. कारण दोघांपैकी कुणीही दुसरी काही खेळी केली, की डाव गेलाच म्हणून समजा. आलं लक्षात?"

"हो. बुद्धिबळात असं होतं कधीकधी. पण त्याचा इथं काय संबंध?"
रॉजरनं ओठांतल्या सिगारेटचा एक खोल झरका घेतला आणि म्हणाला, "तूच विचार करून बघ."
"ओ! आय सी! तुझं म्हणणं, आपले संगणक अशा अवस्थेत आलेले आहेत की त्यांना त्याच त्याच खेळ्या पुन:पुन्हा कराव्या लागताहेत?"
"माझी तशी खात्री झाली आहे."
"पण कशावरून? याला पुरावा काय?"
"पुरावा तूच नाही का आत्ता दिलास? सध्या प्रत्येक संगणक एक दशांश सेकंदात आपली खेळी पुरी करतोय. म्हणज त्याच त्याच खेळ्या पुन:पुन्हा कराव्या लागत असणार. ठरलेल्या मार्गापासून जरा जरी ढळलं, तरी पराभव होणार या निष्कर्षाप्रत ते आले असणार."
"हे तू कशाच्या आधारावर म्हणतोस?"
"म्हणून तर प्रत्येक खेळीला इतका कमी वेळ लागतोय. कोणतीही खेळी करायला लागणारा हा कमीत कमी वेळ एक दशांश सेकंद आहे, हे मला माहीत आहे. याचा अर्थ संगणकांचा विचार आता थांबलाय. ते यांत्रिकपणे खेळ्या करताहेत हे उघड आहे."

"बाप रे! आता काय करायचं?
“नथिंग! प्रिसाइजली नथिंग!"
रॉजर समोरच्या पेल्यातला एक घोट घेऊन म्हणाला, "आपल्याला काही करता येणारही नाही. आपण कोणतीही हालचाल केली, संगणकाला आहे त्या अवस्थेतून बाहेर काढायचा प्रयत्न केला, तर तो मानवी हस्तक्षेप ठरेल आणि तसं झाल्यास काय होईल, ते तुला माहीत आहे."
"ज्याच्या संगणकात हस्तक्षेप होईल, त्याची हार मानली जाईल. तशी मुळी व्यवस्थाच केली आहे, हो ना? पण ही व्यवस्था एकतर्फी हस्तक्षेपाबाबत आहे. रशियाबरोबर विचारविनिमय करून यातून काही मार्ग नाही का काढता येणार?"
"नाही. असं काही झालं, तर काय करायचं, याचा विचार आधीच करायला हवा होता. म्हणजे तशी व्यवस्था आज्ञावलीत करून ठेवता आली असती. आता रशियाच्या सहकार्यानंसुद्धा काही करता येणार नाही. नाउ इट इज टू लेट!"

"म्हणजे हा सामना आता असाच चालायचा?'
"हो."
"किती दिवस?"
"दिवस? वर्षानुवर्ष! युगानुयुगं!"
"यावर काही उपायच नाही?"

रॉजरनं पुन्हा एकदा हातातला पेला तोंडाला लावला आणि एक घोट घेत म्हणाला, “टोनी, तू विचारात इतका गर्क होतास की तुझ्या लक्षात आलेलं दिसत नाहीये, मी व्हिस्की पीत नाहीये."
"मग काय पितोहेस?"
"शॅम्पेन!"
"शैम्पेन?"
"हो. शॅम्पेन. विजयोत्सव साजरा करतोय. तू विचारत होतास ना? यावर काही उपाय नाही का? अरे वेड्या, हाच खरं म्हणजे आपल्या समस्येवर उपाय आहे. कुणाचा अपमान न होता, कुणाला हार मानायची न लागता युद्ध आता कायमचं दूर गेलं आहे. कारण सामना चालू असेपर्यंत युद्ध करता येणार नाही आणि सामना तर संपणार नाही, की थांबवता येणार नाही."

रॉजरनं हातातला पेला खाली ठेवला.
गोंधळलेल्या चेहऱ्यानं त्याच्यासमोर उभ्या असलेल्या टोनीकडे रोखून पाहत तो म्हणाला. “आपण साऱ्या जगाला युद्धाच्या खाईत लोटायला निघालो होतो. युद्ध म्हणजे सर्वनाश, हे कळूनसुद्धा या जगाची राखरांगोळी करायचं आपल्याला हक्क आहे? पृथ्वीवर माणूस जन्माला यायला चार अब्ज वर्ष लागली. इतक्या वर्षांतली ही निसर्गाची वाटचाल आपण चार मिनिटांत उद्ध्वस्त करायला निघालो होतो. का? कुणी दिला आपल्याला हा अधिकार?"
"आपल्यापेक्षा संगणकांनाच जास्त अक्कल आहे, असं दिसतंय! कदाचित त्यांनाच मानवजातीबद्दल कळवळा वाटला असेल!'
रॉजर स्वत:शीच हसला.

"का हसलास?'
"युद्धानं जगाचा अंत होऊ नये, म्हणून आपण हा सामना सुरू केला. त्याची परिणती खरोखरच जगाचा विनाश टळण्यात झाली आहे. अर्थात आपण ठरवलं होतं, तसं झालं नाही. पण म्हणून काय बिघडलं? उद्दिष्ट तर साध्य झालं ना? मग झालं. तरीही तू तक्रार करतोयस, म्हणून हसलो."

"नाही, रॉजर. खरं सांग. म्हणून तू हसला नाहीस. मी तुला चांगला ओळखतो. तुला या सगळ्याची आधीच कल्पना आली होती. हो ना? खोटं बोलू नकोस.तुझ्या चेहऱ्यावर मला सगळं स्पष्ट वाचता येतंय. बोल, होती ना तुला पूर्वकल्पना?"

रॉजर काहीच बोलला नाही.

गालातल्या गालांत हसत त्यानं टोनीसाठी दुसऱ्या पेल्यात शॅम्पेन ओतली.

- oOo -

पुस्तक: ’वामनाचे चौथे पाऊल’
लेखक: सुबोध जावडेकर
प्रकाशक: वॉटरमार्क पब्लिकेशन
तिसरी सुधारित आवृत्ती
पृ. १७१-१७५.


हे वाचले का?

नातं

नैसर आता अधिक झपझप पावले टाकीत होता. आपल्या आणि नैसरमधे अधिक अंतर राहणार नाही याची दक्षता अनीशाची पावले घेत होती. नगर संपले आणि अनीशाने नैसर आणि आपल्यातले अंतर नष्ट केले. थोड्याच अंतरावर अंधुकसा प्रकाश. जवळ गेल्यावर झोपडी दिसली. नैसर झोपडीजवळ गेला आणि दरवाज्याला विचारावे त्याप्रमाणे विचारले,

'आत कोण आहे का? '

थोड्या वेळाने दरवाजा अर्धवट उघडला आणि आतून रस्त्याला विचारावे तसे उलट विचारले,

'कोण पाहिजे?'

'आम्ही वाक्प्रसकडून आलोय, आम्हाला नेमिताजला भेटायचंय'

नैसरने वाक्प्रसचा उल्लेख करताच पटकन दरवाजा पूर्णपणे उघडला गेला आणि

'या, आत या.'

दरवाज्यालाच शब्द फुटले.

परिव्राजक

'या झोपडीत नगरापासून दूर हा नेमिताज एकटाच का राहात असावा?' असा एक प्रश्न नैसरच्या मनात उगवू पाहात होता, पण नैसरने तो प्रश्न मुळासकट उखडून दूर फेकून दिला.

खाणं होताच अनीशा पटकन झोपली.

नैसर आणि नेमिताज झोपडीबाहेर अंगणात झोपेची वाट पाहात पडलेले. दोघेही गप्प, शांत आणि तरीही जागे, म्हणून दोघेही एकमेकांच्या दृष्टीने झोपलेले. उद्या आपण नदी ओलांडणार, दंडगिरीवर पाऊल ठेवणार... नैसर उद्याला आज बनविण्यात गुंग झालेला. त्यामुळे नैसर जागा.

नेमिताजही जागा. नेमिताजच्या जागेपणाचं कारण होतं अनीशा. झोपडीत झोपलेली. सौंदर्याचं अप्रतिम रूप. मात्र अनीशाविषयी वासना नाही जागी झाली नेमिताजच्या मनात. जागा झाला तो एक प्रश्न की ज्याच्यामुळे त्याला झोप येईना. 'नैसरची अनीशा कोण?' हा प्रश्न जोवर जागा आहे तोपर्यंत नेमिताजला झोप येणं शक्य नव्हतं. शेवटी नेमिताज उठून बसला. थोडा वेळ तसाच बसून राहिला आणि मग त्याने हाक मारली.

'नैसर.'

नैसर तर जागाच. उद्यामध्ये गुंग झालेला. त्यानं फक्त 'हं' म्हटलं. नंतर बराच वेळ शांतता. नैसरला वाटले की, आपण दंडगिरीला जाऊ नये म्हणून नेमिताज शेवटचा प्रयत्न करीत असावा.

'तू जागाच आहेस?'

'हं' नैसर.

'एक विचारू का?' नेमिताजचा प्रश्ना अगोदरचा अस्वस्थ प्रश्न.

'हं' नैसरची संमती.

'आत झोपलेली अनीशा तुझी कोण?... म्हणजे तुम्हा दोघांचं नातं काय?'

नैसरला वाटले, कोणत्याही दोन माणसांच्या नात्यांसबंधीची तिसर्‍या माणसाला लागलेली चिंता ही म्हणजे सनातन समस्याच होय. नैसर काहीच बोलत नाही म्हटल्यावर नेमिताजच पुन्हा म्हणाला.

'माझा प्रश्न आवडला नसेल तर उत्तर देऊ नकोस.'

असे म्हणून नेमिताज आडवा झाला. तसा नैसर उठून बसला आणि नेमिताजकडे अंधारात उगीचच पाहू लागला. पण हे ही नेमिताजला जाणवले की काय कोणास ठाऊक म्हणून नेमिताज झोपूनच म्हणाला.

'मी हा प्रश्न विचारला म्हणून कदाचित रागावला असशील पण आज तुम्ही नगरात प्रवेश केल्यापासून ज्यांनी ज्यांनी तुम्हाला पाहिले असेल त्या सर्वांच्या पुढ्यात आता या वेळी, मी तुला विचारलेला प्रश्न आणि त्यांनीच जन्माला घातलेली एक किंवा अनेक उत्तरे शांतपणे झोपली असतील. पण प्रत्यक्ष तूच माझ्याजवळ असल्याने मी स्वतःहून कोणत्याही उत्तराला जन्माला घातलं नाही.'

यावर हसत नैसर म्हणाला.

'एखादा प्रश्न किती लोकांच्या मनात निर्माण झाला याला तसे फारसे महत्त्व नाही. उलट एकाच वेळी अनेकांच्या मनात जर एखादा प्रश्न निर्माण झाला तर तो तितकासा महत्त्वाचा नसण्याची शक्यता अधिक. कारण मोलाचा प्रश्न एखाद्याच्याच मनात निर्माण होऊ शकतो. आता तू म्हणतोस त्याप्रमाणे हा प्रश्नही अनेकांच्या मनात निर्माण होऊनही त्यांनी त्याचा उच्चार केला नाही, याचा अर्थ असा की त्या प्रश्नाचं उत्तर जन्माला घालण्याचं स्वातंत्र्यही त्यांनी स्वतःजवळ सुरक्षित ठेवलं आहे. आता फक्त तुझ्या प्रश्नासाठी, जर मी तुला सांगितलं की ती माझी बहीण आहे तर ती म्हणेल मी तिचा बाप आहे, आणि मी जर म्हटलं की ती माझी मुलगी आहे तर ती म्हणेल मी तिचा भाऊ आहे... मी म्हणालो की ती माझी मैत्रीण आहे तर ती म्हणेल मी तिचा जन्मभर न संपणारा वैरी आहे, आणि मी म्हटलं की ती माझी पत्नी आहे तर ती म्हणेल ती मला अद्याप ओळखतही नाही. कारण कोणत्याही दोन माणसांमध्ये एखादं नातं निर्माण व्हायचं असेल तर त्या नात्याला त्या दोघांचीही संमती असायला हवी. आणि असं तुला सांगण्यासारखं कोणतंच नातं आमच्यात अजून जन्माला आलेलं नाही.'

नेमिताजची प्रतिक्रिया काय होते यासाठी नैसरने थोडा वेळ कान जागे ठेवले आणि थोड्या वेळानंतर ते ही मिटले.

- oOo -

पुस्तकः 'परिव्राजक'
लेखकः गौतमीपुत्र कांबळे
प्रकाशकः सेक्युलर पब्लिकेशन
दुसरी आवृत्ती (२००९) (पहिली आवृत्ती: एक्स्प्रेस पब्लिशिंग हाऊस, २००४)
पृ. ४४ - ४६.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : परिव्राजक >>
राजपुत्र >>
---


हे वाचले का?

रविवार, २० ऑक्टोबर, २०१९

प्रश्नसूक्तांचा यात्रिक

डॉन पाय ओढत उपदेशकाकडे आला व त्याच्यासमोर काही अंतरावर बसला, उपदेशकाचा चेहरा जुन्या मधाप्रमाणे होता. त्यावर दिसत असलेले स्मित डॉनला पाहताच जास्तच उमलले.

"मी आपणस तसदी देत नाही ना !" डॉनने अवघडलेल्या संकोची आवाजात विचारले. ’बिलकूल नाही, उलट तुला जर माझ्याशी बोलण्यात आनंद वाटत असेल तर मला धन्य वाटेल. मी येथे चिंतनासाठीच आलो होतो, आणि माणूस समोर असता तर माझे चिंतन जास्तच सहज होते. सुदैवाने मला परमज्ञान प्राप्त साले आहे. त्यापैकी एक अंश जरी मला इतरांना देता आला तर मला बरेच वाटेल, " उपदेशक म्हणाला.

पिंगळावेळ

डॉन थोडा वेळ स्तब्ध राहिला. सारे आयुष्य ज्यासाठी फेकून दिले ते सारे थोड्या शब्दात कसे सांगायचे हे त्याला समजेना, त्याने प्रयत्न करत न्हटले, " मी अगदी आडगावचा माणूस आहे. मला तलवार कधी कौशल्याने वापरता आली नाही. मग शब्द काय वापरता देणार? आणि आता तर माझ्यासारखा मूर्ख माणूस सार्‍या जगात असणार नाही, असेही वाटू सागले आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारू का? माझे प्रश्न वेडगळ असतील, त्यांची उत्तरे द्यावीत असे तुम्हांला वाटणार नाही, कदाचित उत्तरे देताही येणार नाहीत. यात तुमच्या ज्ञानाचा मी अवमान करत नाही, कारण अत्यंत ज्ञानी माणसाला देखील उत्तरे देता येणार नाहीत, असे प्रश्न विचारणे एखाया मूर्खालादेखील अगदी सहज शक्य असते."

उपदेशक समजूतदारपणे हसला व म्हणाला, " पण असल्या प्रश्नांच्या सतत घर्षणाने तर ज्ञानी माणूस ज्ञानी राहू शकतो. मला उत्तरे देता आली तर मी देईन; नाहीतर तुझ्या प्रमाणे तेच प्रश्न विचारत, त्यांच्या उत्तरांचा शोध घेत मी भटकत राहीन.

"माझे आयुष्य म्हणजे जे आहे की नाही याचाच इतरांना विश्वास वाटत नाही, त्याच्या शोधात वायफळ झालेले आयुष्य आहे. निराळीच भाषा वापरत असलेल्या लोकांत मी वावरत असल्याप्रमाणे सगळीकडे माझ्या वाटल्या कुचेष्टाच आली. मी आता परत जात आहे. तेव्हा तुम्हांला काही विचारावे असे मला वाटते-"

उपदेशक शांतपणे म्हणाला, "त्या बाबतीत मी जास्त भाग्यवान ठरलो एवढेच म्हणता येईल. सुरुवातीला माझी स्थितीदेखील तुझ्यासारखीच होतो. रिती, गंजून गेलेली परंतु आता मात्र मला सदैव अविनाशी शीतल चांदण्यात असल्यासारखे वाटते. अनेक यातनातून मला सत्यज्ञानाचा साक्षात्कार झाला आणि डोळ्यांवरील सगळा सारा पुसून गेला."

"मी एकेकाळी अत्यंत मोठे वैभव भोगले आहे, पण नंतर सार्‍याच विलासाकडे पाठ वळवली. मी हे मोठ्या इच्छासामर्थ्याने केले असे नाही. एखादे चुकार जनावर बडवत योग्य मार्गावर आणावे त्याप्रमाणे माझ्या आयुष्यात घडले. माझी सारी गलबते नष्ट झाल्याने माझा व्यापार गेला, मी निष्कांचन झालो. मी झोपलो असता माझ्या पत्नीने होती नव्हती चीजवस्तू गोळा करून प्रयाण केले व आमचा एकुलता एक अतिअशक्त मुलगा मात्र मागे टाकला, त्याही अवस्थेत मी त्याला पाठीवर घेऊन भटकलो. पण एक दिवस तोदेखील मेला. सारी बंधने तुटलो व आयुष्य भरकटू लागले. मी जगात असतील तेवढी व्यसने केली, थोडे गुन्हे केले, थोडे उपकार केले. अंगातून हाडे बाहेर पडेपर्यन तपश्चर्या केली. एका पायावर आठ दिवस खडा राहिलो, खिळ्यांवर झोपलो; ज्यांच्या दुर्गंधाने रेड्याला वांती झाली असती असल्या रोग्यांची मी सेवा केली. पण काही केल्या आतील अंगार विझेना, उलट इतकी निरनिराळी माणसे व त्यांचे आचरण अगदी जवळून पाहिल्यावर तर आम्हा सगळ्यांचे दुःख म्हणजे भयाण शाप नसून अतिशय सैलपणेच दिलेली किरकोळ शिक्षा आहे असे मला वाटू लागले. वाटेत अनेक मोह आले, पण शेवटी सारे पडदे बाजूला सारत मी अंतिम क्षणी आलो."

"त्या क्षणी विशेष काय घडले ? " डॉनने उत्सुकतेने विचारले.

"खरे तर तो क्षण इतर क्षणांसारखाच होता. पण मी नैराश्याच्या अगदी तळाशी पोहोचलो होतो. मी एका प्रपाताशेजारी मन पिंजत बसलो होतो. तेथे एक प्रचंड खडक खाली कोसळला. हजार मेघगर्जनांसारखा आवाज सर्वत्र घुमला, आणि त्या क्षणी माझ्यात वीज कडाडून आतील सर्व अंधार स्वच्छ धुऊन टाकल्यासारखा झाला. कधी अस्त न पावणार्‍या सूर्याचा आत उदय झाला. रखरखलेल्या मातीत पाझर सुटून जमीन तृप्त व्हावी व हवेत गंध पसारावा तसे वाटून मी मुक्त झालो."

डॉन सारा वेळ विस्मित होऊन ऐकत होता, पण आता तो थोडा निराशच झाला. तो म्हणाला, "तुम्ही जे सांगितले ते मी पूर्वी अनेकदा ऐकले आहे. पण आपणाला जे झाले ते ज्ञान अंतिम सत्यच आहे, हे तुम्हाला कसे समजले ?"

"कशावरून म्हणजे? त्या अनुभवानंतर मनाला अतिशय सुख झाले. अंगातील सारे ताण विरून गेले."

"मग असला अनुभव कितीही तात्पुरता असला तरी मादक पेयांनीदेखील येऊ शकेल. ही शांती, हे समाधान जवळ असले की आपणापाशी सत्यज्ञान आहे हे ओळखावे अशी तुमची शिकवण. मी ज्या वेळी माझ्या शौर्याने दलितांचे रक्षण, सौदर्याचे पूजन व सदाचाराचे आचरण करण्यासाठी माझ्या खेड्यातून बाहेर पडलो, त्या वेळी माझ्यात हीच मनःशांती होती आणि मी तर ठिकठिकाणी वेडा ठरलो! आणखी एक गोष्ट मला सांगा, तुम्हाला पूर्वी कधी या सत्यज्ञानाचा अनुभव होता का?"

उपदेशक मोठ्याने हसला. "अरे, हा दिव्य अनुभव काही फळाच्या घोसाप्रमागे येत नाही. तो आयुष्यात एकदाच एकटा आला तरी माणसाने स्वतःला धन्य समजावे."

"मग माझी अडचण अशी," डॉन म्हणाला, " काही वेळा दगडात सोन्यासारखा दिसणारा एक क्षुद्र धातू सापडतो. त्याला खुळे सोने म्हणतात. लहान मुले तसले तुकडे आनंदाने जमा करतात, पण मोठी माणसे तिकडे ढुंकुनही पाहत नाहीत. कारण खरे सोने काय आहे हे त्यांना माहीत असते. पण समजा, खरे सोने अमुकच हे पूर्वी माहीत नसेल तर ते कसे ओळखायचे? तुम्हांला पूर्वी तसला अनुभव नसता हेच अंतिम ज्ञान तुम्हाला कसे जाणवले ?"

"ते समजणे तर अगदी सोपे आहे, " उपदेशक तात्त्विक हसून म्हणाला, "हा अनुभव आला की वरवर दिसणारे सगळे अनुभव गारगोटीप्रमाणे वाटू लागतात."

आता डॉन हसला व थोडे पुढे सरकत म्हणाला, "मग आताचा अनुभवदेखील क्षुद्र गारगोटी ठरणार असा नवा अनुभव तुम्हाला येणारच नाही, याची तुम्हाला खात्री आहे का? आणि तसा तुमचा विश्वास असल्यास त्याला कसला आधार आहे?"

उपदेशक चमकला, पण लगेच त्याने स्वत:ला सावरले. "तुझे म्हणणे बरोबर आहे. हेच ज्ञान अंतिम आहे हे सिद्ध करायला माझ्याजवळ पुरावा नाही. पण अत्यंत निर्विवाद पुरावा येथे असतो- आपल्या हृदयात!" उपदेशकाने नाटकी तर्‍हेने छातीवर हात ठेवला नि डोळे मिटून घेतले.

डॉनने एक दीर्घ निः-श्वास सोडला. तो म्हणाला, " मला वाटले होते, निदान तुमच्याजवळ तरी स्वत:च्या विकारापलीकडचा असा निर्विवाद निकष असू शकेल. समजा तुमची अंत:प्रेरणा आणि माझी अंत:प्रेरणा तितक्याच दृढ, पण विरुद्ध असतील, तर तुमची माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे ठरवायला तुमच्या स्वत:च्या शब्दापेक्षा निराळा, व्यक्तिनिरपेक्ष असा कोणता निकष आहे का? असल्यास तो मला सांगा, मी कृतज्ञ होईन. तो जर नसेल तर प्रत्येकाचे ज्ञान त्याच्यापुरते अंतिमच, असा गोंधळ उडेल आणि शेवटी अंतिम व ज्ञान या दोन्ही शब्दांनाही जळजळीत जखमांवर बांधलेल्या घाणेरड्या चिंध्यांपेक्षा जास्त अर्थ राहणार नाही."

"तसा अगदीच पुरावा नाही असे नाही," उपदेशक तुटकपणे म्हणाला. अत्यंत मूर्ख प्रश्न विचारणार्‍या माणसांशी बोलण्याची सवय नसल्याने त्याच्या कपाळावर आठी दिसू लागली. त्याने हात मागे करून हवेत फिरवला. तेव्हा त्या ठिकाणी सागरकाठी नारळांच्या झाडांच्या मागे वर आभाळात रेखीवपणे गेलेल्या मनोर्‍यांच्या इमारती दिसू लागल्या. त्या नगराचा विस्तार दूरवर पसरत जाऊन विरळ होत क्षितिजात मिळून गेला होता.

"हे भव्य नगर पाहिलेस?"तो म्हणाला. "ते एका विशाल साम्राज्याची राजधानी आहे. आणि त्या साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट माझा अनुयायी आहे. मी प्रवचन करीत असता हजारो स्त्री-पुरुष मुग्ध होऊन ऐकतात व आनंद पावतात. माझे ज्ञान खुळ्याचे सोने असते तर मोठमोठे महापंडित मासे शब्द लीनपणे ऐकत असते का? इतक्या लोकांनी माझी शिकवण स्वीकारली असती का?"

डॉनचा सारा उत्साह मावळला. तो आकसल्यासारखा झाला. अगदी असले शब्द आपण पूर्वी सॅन्कोकडून ऐकले आहेत हे त्याला आठवले. आता त्याच्या ध्यानात आणखी एक गोष्ट आली. उपदेशकाचा चेहराही सॅन्कोसारखाच होता. सॅन्कोचा जरा जास्त जाड व चिकट होता; भाजण्यापूर्वी कच्चे मडके दिसते तसा होता इतकेच. डॉनला एका गोष्टीचे नवल वाटले. पूर्ण ज्ञान झालेल्या व काहीच ज्ञान नसलेल्या दोघांवरही तसलीच कळा येते की काय? एकमेकांवर सहज बसतील अशा या चेहर्‍यांवर तीच नि:शंकता, आत्मतुष्टी कशी? की जेथे पाऊलवाटदेखील दिसत नाही त्या ठिकाणी सारेच चाचपडत असता एकजण दोन पावले पुढे, दुसरा दोन पावले मागे, एकाचे तत्त्वज्ञान पोटात, दुसर्‍याचे हृदयात असल्या गोष्टींनी फारसा फरक पडतच नाही? अंधारात आपण सगळे सारखेच; अंधारात सगळीच मांजरे काळी ?

"मी आणखी विचारतो, ते कुत्सितपणाचे समजू नका. मला खरोखरच शोध घ्यायचा आहे. त्यासाठी मी घरदार सोडले. माझ्याही वाट्याला दुःख आले व कुचेष्टा तर कपाळावरील व्रणाप्रमाणे आयुष्यभर जवळ राहिली. एवढे करून जर माझ्या प्रश्नाला उत्तर मिळाले असते तरी माझे आयुष्य सफळ झाले असते.

आता पाहा, तुमचा धर्म सत्ता व सैनिकाच्या रांगा यामुळे पसरला, तुम्हाला अनुयायी मिळाले. इतक्या लोकांनी धर्म स्वीकारला तर तो खरा, नाहीतर खोटा, हे कसले तर्कशास्त्र आहे? एके काळी नरबळीला अनुयायी होते. जिवंत माणसातून तोडून काढलेले अद्याप उष्ण असलेले हृदय सुरीच्या टोकावर खोचून ते सूर्याला अर्पण करण्याचा एक धर्म होता व त्यावर एक सामर्थ्यशाली संस्कृती आधारलेली होती. धातूच्या तप्त पुतळ्यांत दहा दिवसांची कोवळी मुले जाळणाऱ्या एका धर्माने अर्धे खंड व्यापिले होते. ते सारे धर्म गेले, नवे आले, ते बदलले आणि हत्तीच्या प्रेताप्रमाणे अजस्र निर्जीव पडून राहिले. मला अनुयायी नाहीत, माझा सेवकदेखील माझा शिष्य नाही. मला साम्राज्याचा आधार नाही, म्हणून मी मूर्ख ठरलो आणि आपण महान ज्ञानी ठरलात ! यशापलीकडे ज्ञानाला आणखी काही निकष नाहीच का?

आणखी एक गोष्ट. या अनुयायांवर फारसा भरवसा टाकू नका. अनुयायी मिळणे हा इतिहासातील केवळ एक योगायोग आहे. बहुतेक धर्मसंस्थापकांचे विचार पाहा. त्यातील अनेक विचार त्याच्याआधी कुणी ना कुणी सांगितलेच होते. पण ते सगळे सामान्य ठरले व काळाने त्यातील एकट्याचीच संस्थापक म्हणून निवड केली. ठिणगी दगडावर पडली तर विझते, ती गवतात पडली तर वणवा भडकतो. पण दोन्ही ठिकाणी ठिणगी तीच ! कुणास ठाऊक, एक हजार वर्षापूर्वी तुम्ही आपला धर्म मांडला असता तर जगाने तुम्हाला दगड मारले असते. आणखी एक हजार वर्षानी सांगता, तर गारुड्यापुढे लोकांची गर्दी जमेल पण तुमच्यासमोर क्षणभर राहायला त्यांना फुरसत मिळणार नाही. पहिल्या काही अनुयायांची गोष्ट सोडा. प्रत्येक प्रवाह उगमाजवळ स्वच्छ पारदर्शक असतोच. पण नंतरचे अनुयायी तुमच्या शिकवणीने मोहित होऊन धर्माला निकटून राहतात असे का तुम्हाला वाटते? कारण तो धर्म भेसळून क्षुद्र, अर्थहीन झाला तरी अनुयायी मात्र तसेच त्याला बिलगून राहतात. याचे एकच कारण आहे. अशा वेळी एखाद्या धर्माचे अनुयायी असणे ही डोळसपणे स्वीकारलेली कृती नसून ती एक अंगवळणी पडलेली केवळ सवय झालेली असते. आणि अशांच्या संख्येच्या आधारे तुम्ही तुमच्या ज्ञानाची पारख करता, हे सगळे विचित्रच नाही का?"

आता मात्र उपदेशक संतप्त झाला. तो कर्कशपणे म्हणाला, "तू अद्याप तर्काच्या कृष्णसर्पाने वेटोळला आहेस, त्याचेच फूत्कार तुझ्या शब्दांतून बाहेर पडत आहेत! ज्ञानप्राप्ती पाहिजे असेल तर बुद्धीचा गर्व, तर्काचा ताठरपणा आणि अहंपणाचा मद सोडायला हवा. तोपर्यंत तुझ्याशी बोलणे म्हणजे केवळ कालापव्यय आहे. तू झुंजण्यासाठी आला आहेस, जाणण्यासाठी नाहीस!"

डॉन उठता उठता म्हणाला, "आपणाला अंतिम सत्य समजले असे म्हणालात म्हणून मी फार आशेने प्रश्न विचारले. रोष मानू नका. मी कधी बुद्धीचा गर्व धरला नाही, कारण मला बुद्धीच नाही. तर्काचा ताठरपणा माझ्यात असता तर मी माझे गाव सोडून कधी बाहेर पडलो असतो का? अहंपणा असता तर जन्मभर कुचेष्टा सहन केली नसती. कधी असलेच तर माझ्या अहंपणा नसून स्वत्व होते. मी भिकार्‍यांच्या शेजारी बसून बोललो आहे, धनगरांच्या सान्निध्यात टेकड्यांवर रात्री काढल्या आहेत. शेवटी मला एकच गोष्ट कळून चुकली की, मी अगदी पूर्ण, असाध्य वेडा आहे. पण इतर माणसे कोणत्या बाबतीत शहाणी आहेत हे मात्र मला कधी उमगले नाही."

- oOo -

पुस्तक: पिंगळावेळ
लेखक: जी.ए. कुलकर्णी
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती तिसरी, पुनर्मुद्रण (१९९९)
पृ. २२४-२२९.


हे वाचले का?

देहसूक्त

...खाली गर्दी वाढल्याने होणारा आवाज त्याला अस्पष्टपणे ऐकू येऊ लागला व तो उठून खाली येण्यासाठी निघाला. काही अंतरावर सारा वेळ उभे असलेले सेवक तत्परतेने त्याच्या समोर निघाले. लाल गरुड खाली आला व त्याच्यासाठी अंथरलेल्या चादरीवर बसताना आपला बेडौलपणा इतरांच्या ध्यानात येणार नाही, अशा त-हेने अंग उतरवून तो प्रशस्तपणे बसला.

काजळमाया

जेथे खडकातील घरांचे थर सुरू होत होते, तेथे पायथ्याशी सपाट पटांगणावर वर्तुळाकार आग पेटवली होती, तिच्यापासून काही अंतरावर, सर्वांग काळे रंगवलेल्या आणि अस्वलांची केसाळ कातडी पायाभोषती गुंडाळलेल्या पुरुषांचे आणखी एक वर्तुळ तयार झाले होते. जाळाच्या वर्तुळाच्या मध्यभागी गवताच्या उशीवर आरशाचा एक तुकडा ठेवला होता. कोणत्याही पवित्र नृत्यात स्त्रियांना स्थान नव्हते, त्यामुळे त्या गर्दीगर्दीने घरांच्या पसरट छपरांवर बसल्या होत्या. सारी तयारी आहे की नाही हे पाहाण्यासाठी लाल गरुडाने सर्वत्र नजर फिरवली. सूर्य आता तिरपा झाला होता व त्याच्या प्रकाशाचा एक किरण आरशामधून निघून समोरच्या कोरीव गोत्रस्तंभावर पडला होता. लाल गरुडाने समाधानाने मान हलवली व लांब डोणीप्रमाणे वाटणार्‍या नगार्‍याजवळ जय्यत तयार असलेल्या तिघांना खूण केली.

त्याबरोबर त्यांच्या हातातील टिपर्‍या संथपणे ताणलेल्या कातड्यावर नाचू लागल्या व त्या घुमणार्‍या आवाजाला मध्येच कातड्यावर पडणार्‍या पालथ्या हाताच्या थापेने वजन मिळू लागले. काळ्या वर्तुळात उभे असलेले माणसांचे कडे हळूहळू जाळाभोवती फिरू लागले. काही वेळाने नगाऱ्याच्या ददम-ददम-ददमची लय वाढू लागताच काळी माणसे हळूहळू ओणवी झाली व त्यांच्यामधील अंतर कमी होऊन, ती एकाच सापाचे मणके असल्याप्रमाणे दिसू लागली. त्यांचे पाय विलक्षण जलद गतीने हलू लागले व मध्येच निघणार्‍या दीर्घ आरोळ्यांमुळे, आरशातील सूर्यावर अदृश्य भाले फेकले जात आहेत असा भास होऊ लागला. आता त्यांचे वर्तुळ आकसून अगदी जाळाच्या जवळ आाले होते आणि अग्निच्या हावर्‍या जिभांना संधी मिळताच अस्वलांच्या कातडीवरील केस होरपळू लागले होते. आता नगार्‍याचे बोल बदलले. एक वादक टिपरी आदळण्याऐवजी ती कातड्यावर खरडू लागला व त्यामुळे ते पटांगण कंपित झाल्याप्रमाणे होऊ लागले. आता मुख्य नर्तकाने एक भीषण कर्कश आवाज केला व जाळाच्या रेषेवरून उडी मारून तो आत आरशाजवळ आला. परंतु त्याचे सहकारी त्याच वेगाने जास्त जवळ आले व पाहातापाहाता त्यांच्या बेभान पायांनी जाळ विसकटून त्यातून ठिणग्यांची लहान लहान कारंजी उडू लागली. त्यांची कृष्णरेषा विलक्षण वेगवान गतीने जाळामधून फिरत असता त्याच्या लवलवत्या' जिभा ग्रहबिंबाभोवतालच्या अग्निकंकणाप्रमाणे दिसू लागल्या. दूर छपरावर बसलेल्या स्त्रिया आता जागच्या जागीच डोलू लागल्या व शोकगीतासारखा दीर्घ आवाज करू लागल्या. आरशाजवळ आलेल्या मुख्य नर्तकाचे डोळे आता पेटल्यासारखे झाले आणि त्याचे सर्वांग ओल्या काळ्या संगमरवराप्रमाणे चकाकू लागले. तो जागच्या जागी फिरत झपाटलेल्या उड्या घेऊ लागला. त्याने मग एकदम आरशात पाहिले, नृत्याच्या धुंदीने आधीच परके झालेले डोळे सूर्याच्या तेजाने झक्कन दिपले. त्याच्यातून तलवारीच्या धारेप्रमाणे वाटणारी आवेशपूर्ण गर्जना ऐकू आली व दुसऱ्याच क्षणी त्याची उडी आरशावर पडून त्याची पावले फुटलेल्या आरशाचे तुकडे चिरडू लागली. त्याच्या पायांतून रक्त वाहू लागले व तेथे ठेवलेले वाळलेले गवत जखमी झाल्यासारखे दिसू लागले. गोत्र स्तंभावरील कवडसा नाहीसा झाला, आरशात बंदिवान करून ठेवलेला सूर्य भग्न झाला आणि मग विसकटून विझवल्यामुळे त्याचा तापदेखील नष्ट झाला. नगार्‍याची लय कमी झाली व थोड्याच वेळात तो श्रांत झाल्याप्रमाणे संथपणे घुमू लागला. वर्तुळात नाचलेले नर्तक पिळून टाकल्याप्रमाणे जागीच अवजड सावल्यांसारखे पसरले. स्तब्धपणे सारे पाहात असलेल्या भोवतालच्या गर्दीतून काही माणसे पुढे धावली व त्यांनी त्या निश्चल काळ्या आकृती उचलून नेल्या. इतरांनी अस्ताव्यस्त उधळलेल्या जाळाच्या खुणा गोळा केल्या, आणि फुंकर मारल्याप्रमाणे नाहीशी होऊन ती पुन्हा भोवतालच्या गर्दीत एक झाली.

तापदायक सूर्याचा भंग केल्यावर आता पावसाला आळवण्यासाठी पर्जन्यनृत्याची तयारी झाली होती.

इतका वेळ ताणलेल्या अंगाने उभे असलेले, लाल रंग अंग रंगवून घेतलेले डौलदार बांध्याचे दहा पुरुष आता पुढे झाले. त्यांच्या मागोमाग त्यांच्याच छाया असल्याप्रमाणे वाटणारे, अर्धे काळे, अर्धे लाल असे अंग रंगवलेले आणखी दहा नर्तक आले व एकेका लाल आकृतीशेजारी उमे राहिले. त्याच्या हातात एकेक कुंचला होता आणि पायांत किसलेल्या आवाजासारखा सुरेख बारीक नाद करणारे घुंगूर होते.  पर्जन्यनृत्याचा नायक इतका वेळ जोडलेल्या दोन बैल-कातड्यांनी अंग झाकून उभा होता. त्याने आता अंग हलवून ते सैल आवरण मागे टाकले व तो धावत येऊन मध्यभागी उभा राहिला. तेथे जमलेल्या पैकी प्रत्येकाने पूर्वी एकदा तरी पर्जन्यनृत्य पाहिले होते, पण त्या दृश्याची सुरुवात पुन्हा पाहाताच त्यांच्यात एक तार एकदन खेचली गेल्याप्रमाणे झाले व त्यांची मने मोहरून गेली.

नृत्यनायकावर त्यांच्या नजरा विशेष खिळल्या, कारण कधीतरी नृत्यनायक म्हणून आपली निवड व्हावी, हे तेथील प्रत्येक तरुणाचे एक स्वप्न होते. तो एक दुर्मिळ मान होता. समोरासमोर दोन वैर्‍यांना कंठस्नान घातले असल्याखेरीज या नृत्यात कोणालाही भागच घेता येत नसे. विशेष म्हणजे नृत्यानंतर नायकाला एक रात्र प्रमुखाचा मुकुट प्राप्त होत असे. आता समोर उभा असलेला नृत्यनायक इतरांपेक्षा हातभर उंच होता, आणि सहा वैर्‍यांचा नाश केल्याच्या खुणा म्हणून त्याच्या डाव्या दंडावर आडव्या डागलेल्या सहा रेषा होत्या. त्याची छाती लाल मैदानाप्रमाणे विस्तीर्ण होती व त्याने नुसता हात हलवताच दंडातील स्नायू उतावीळ रानघोड्याप्रमाणे उसळी घेत होते. त्याने अंगावर वळत वळत जाणारे पट्टे ओढले होते व त्याच्या डोक्यावर गरुडाची पूर्णाकृती होती. त्याच्या भव्य रूपाकडे पाहाताच सगळ्यांचा ऊर अभिमानाने भरून आला व त्यांनी मोठ्याने जयजयकार केला- "पश्चिम वारा! पश्चिम वारा !!"

तो अर्धवर्तुळात येऊन उभा राहाताच, इतका वेळ छपरावर खिळून बसलेल्या सगळ्या स्त्रिया झाडून टाकल्याप्रमाणे आत गेल्या, आणि घरांच्या चौकोनांवर पडद्याप्रमाणे कातडी टांगली गेली. स्त्रीची नुसती नजर पडली तरी पर्जन्यनृत्य विटाळले जाते, आणि मग तीन वर्षे पाऊस येत नाही, हा तेथील अत्यंत प्राचीन विश्वास होता.

आता पुन्हा आडवा नगारा घुमु लागला व नायकामागील अर्धवर्तुळातील नर्तकांचे पाय हळू हळू हलू लागले. मग सेवकांनी वेताचे दहा पेटारे आणले आणि ते त्यांनी उघडताच तिथल्या मऊ मातीवर दहा घुंगरे नाग वळशावळशांनी बाहेर पडले, ते बाहेर पडताच दहा लाल नर्तकांनी पटकन वाकून त्यांच्या तोंडाजवळ बोटे दाबून त्यांना उचलले व रिकामा हात वर करून त्यांनी फुटक्या आरशाभोवती फेर धरला. नागांच्या शेपट्या त्यांच्या हाताभोवती गुंडाळत, पुन्हा उलगडून दुसऱ्या बाजूने पुन्हा वेटाळत आणि त्यांच्या शेपटीतील हाडांच्या घंटा भीषण, विचित्र घुंगराप्रमाणे वाजत. वर्तुळाची एक फेरी झाली की त्यांची बोटे आणखी सरकत व नाग जास्त लांबीने तोंड फिरवत. त्यांनी दंश करण्यासाठी त्वेषाने तोंड मागे वळवताच कुंचले घेतलेले नर्तक कुंचला हलवून त्यांना बुजवून मागे वळवत. पण या सार्‍यात लाल नर्तकांचे नृत्य थांबले नाही की त्यांच्या सहकार्‍यांचा समतोल चुकला नाही.

मग आणखी एक पेटारा आला. हा काळ्या रंगाने रंगवला असून जास्त मजबूत होता. सेवकाने तो खाली ठेवला, पण न उघडताच तो बाजूला सरला. नायक धीमेपणाने पुढे आला व त्याने गुडघे टेकले. त्याक्षणी सगळ्यांचे डोळे ताणल्यासारखे झाले व श्वासदेखील रोखले गेले. फक्त नगाऱ्याचा घुमार आवाज अविरतपणे चालू होता. पर्नन्यनृत्यातील हा अत्यंत जोखमीचा क्षण होता व तो दुरून पाहाणाऱ्यांच्या अंगावरसुद्धा शहारे येत. या पेटाऱ्यातील नाग दोन दिवस उपाशी ठेवलेला असून नृत्याआधी तासभर त्याला काडीने सतत डिवचण्यात येत असे. आणि नृत्यासाठी या नागास नायकाने आत हात घालून बाहेर काढावे लागे. पहिल्याच प्रयत्नात जर नागाचे तोंड बोटात सापडले नाही, तर आपणास एक बोट तरी कोयत्याने तात्काळ तोडावे लागेल किंवा तासाभराच्या आत्यंतिक वेदनेनंतर आयुष्य तरी संपवावे लागेल, याची प्रत्येक नायकाला पूर्ण जाणीव असे.

नायकाने हात बाहेर काढताच त्याच्या हातात जवळजवळ त्याच्याच उंचीची, त्याच्या दंडाएवढ्या जाडीचा नाग होता, हे पाहून पुन्हा पुन्हा गर्जना झाली, "पश्चिम वारा! पश्चिम वारा !!" नायकाच्या चेहऱ्यावरील ही ताण कमी झाला. कपाळावर ताठलेली रेषा निवाल्यासारखी झाली. नागाला सतत डिवचत गेल्यामुळे त्याची शेपटी चाबकाप्रमाणे भिरभिरत होती आणि भोवर्‍याच्या नादाप्रमाणे तिचा आवाज होत होता. इतर नर्तक नाग तोंडाजवळ पकडून मग उतरत खाली सरकले, पण नायकाने आपला नाग शेपटीजवळ उचलला. एकदम अधांतरी होताच नागाने अंग वळवले व तोंड वासून अर्धचंद्राकार सुळे घेऊन तो त्वेषाने नायकाकडे वळला. पण नायकाने डाव्या हातातील छडीने त्याला सहज बाजूला केले व चटकन नागाची शेपटी दातात धरली. नृत्याची गती वाढत चालली. लालकाळ्या आकृती जोडीजोडीने भिरभिरू लागल्या व त्यांची बोटे सरकत शेपटीकडे येऊ लागताच, नागांच्या झेपा जास्त विस्तृत व संतप्त होऊ लागल्या. नायकाच्या तोंडातील साप सरकत गेला व त्याचे दात नागाच्या डोक्याजवळ येताच, त्याच्या धुंद डोळ्यांना सापाचे डोळे झगझगीत जिवंत मण्यांसारखे दिसू लागले. नगार्‍याचा आवाज असा जलद होऊ लागला की, वादकांच्या हातातील टिपर्‍या स्पष्ट न दिसता ओलसर थेंब सारवल्याप्रमाणे दिसू लागल्या. नायकाच्या नागाने संतापाने तोंड उघडले व त्याच्या गळ्याभोवती वेटोळे टाकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने चलाखीने शेपटीचे टोक हातात पकडले व दोनतीन वेटोळी हाताभोवती गुंडाळून त्याने नागाची एक रेषा केली, आणि एक जिवंत विषारी बासरी वाजवत असल्याप्रमाणे तो जागच्या जागी गोल फिरू लागला. नगार्‍याचे बोल बदलले. इतर टिपर्‍या संथ झाल्या, पण एक झगझगीत सुरी म्यानातून निघाल्याप्रमाणे त्यांच्या दबलेल्या आवाजातून उरलेल्या एकाच टिपरीचा खडा बोल स्पष्टपणे ऐक येऊ लागला, आणि तोही काही काळाने अखेरचा उग्र आघात देऊन स्तब्ध झाला.

त्या क्षणी नायकाच्या चेहऱ्याचे स्नायू आवळले गेले व त्याचे दात नागाच्या मानेत रुतताच तेथून उरलेले अंग एकदम मोडल्याप्रमाणे निर्जीव दुबळे झाले. नायकाने मृत नाग आरशाच्या तुकड्यांवर टाकला, तेव्हा एका सेवकाने मातीच्या परातीतून निखारे आणले आणि गवतावर टाकले. थोड्याच वेळात तेथून काळसर धूर पसरला व गवताच्या काड्या झळाळू लागल्या. आता बोटांत नुसती शेपटी धरून नाचत असलेल्या नर्तकांनी आपापले नाग जमिनीवर टाकले. भोवतालच्या लोकांपैकी काहीजण पुढे धावले व त्यांनी त्या सगळ्या नागांवर मक्याचे पीठ उधळले व पाहाता पाहाता त्यांना चटकन उचलून ते दरीकडे धावले. तेथे त्यांनी अगदी कडेला उभे राहून सारे नाग एकामागोमाग दरीत फेकून दिले. ते अंग वळवत खालच्या गर्द दरीत नाहीसे होत असता, एखाद्या भीषण राक्षसिणीने केस झाडताच त्यांतील गुंतवळ एकेक केसाने वार्‍यावर उडावी, त्याप्रमाणे वाटले. शेवटचा नाग खालच्या गडद हिरव्या अंधारात बुडाल्यावर त्यांनी प्रार्थना केली :

"हे पर्जन्या आम्ही सूर्य भग्न केला आहे आणि त्याचा दाह आम्ही पायांनी विसकटला आहे.
"आता तुझे आगमन होवो.
"हे पर्जन्या ! आम्ही पृथ्वीतील विष नाहीसे केले आहे, हे तुला आम्ही पाठवलेले बंदी आक्रंदून सांगतील. आता वृक्षांच्या मुळांना विषरहित पाणी प्राप्त होऊ दे, सर्वत्र गवत उगवू दे, आणि त्यात जनावरे मुक्तपणे हिंडू देत.
"हे पर्जन्या ! आता तुझे आगमन होवो ।

- oOo -

पुस्तक: काजळमाया
लेखक: जी. ए. कुलकर्णी
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती सहावी, दुसरे पुनर्मुद्रण (२००७)
१९१-१९५.


हे वाचले का?

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

नरोटीची उपासना

धर्मभ्रष्ट म्हणजे काय?

पन्नास पाउणशे वर्षांपूर्वी इंग्रजी विद्येचा आपल्या देशात प्रसार होऊ लागला आणि त्यामुळे नवे आचारविचार सुरू झाले. त्यावेळी धर्म बुडाला, आता कलियुग आले, विनाशकाल जवळ आला असे उद्गार सर्वत्र सनातनी लोकांच्या तोंडून ऐकू येऊ लागले. घरोघरी आईबाप आपली मुले धर्मभ्रष्ट झाली - त्यावेळच्या भाषेत सुधारक झाली, असे म्हणू लागले होते. त्यावेळी मुले धर्मभ्रष्ट झाली म्हणजे काय झाले, असे जर त्यांना कोणी विचारले असते तर त्यांनी काय उत्तर दिले असते? विश्वनाथ नारायण मंडलिक, दादोबा पांडुरंग यांच्या चरित्रांत ही उत्तरे सापडतात. अमक्या दिवशी हजामत करणे निषिद्ध असताना ती केली, अमक्या वारी अमुक खायचे नसताना खाल्ले, घेर्‍याचा आकार कमी केला, एकादशीला बटाटे, रताळी हे खाण्याऐवजी मुळे, गवारी, गहू हे खाल्ले, अशा प्रकारच्या या तक्रारी होत्या. धर्म म्हणजे मानसिक उन्नती आहे, धर्म म्हणजे हृदयाचा, सद्गुणांचा विकास आहे, असे कोणाच्याही मनात आले नाही. धर्म म्हणजे संयम, निग्रह, भूतदया, परमेश्वरावरील श्रद्धा, सत्यनिष्ठा, दया, क्षमा, शांती, विद्येचा अभिलाष, स्वत्वाचा अभिमान असे अर्थच त्यावेळी कोणी केले नाहीत. जडदेहाच्या संस्कारापलीकडे धर्म म्हणजे काही आहे अशी या जनांची समजूत असती तर त्यांनी आपला मुलगा निग्रही नाही, दयाशून्य आहे, स्वत्वशून्य झाला आहे अशा तक्रारी केल्या असत्या. पण त्या काळच्या वाङमयात अशा तक्रारी सापडत नाहीत. धर्म म्हणजे केवळ जड आचार, त्याचा मनाशी, संस्कृतीशी काही एक संबंध नाही, इतक्या विपरीत टोकाला काही जनांची बुद्धी गेल्याची साक्ष संस्कृतात आहे. एकादशीचे महत्त्व सांगताना –

वरं हि मातृगमनं वरं गोमांसभक्षणम्
ब्रह्महत्त्या, सुरापानं, एकादश्यां न भोजनम्|

असे कालतरंगिणीकाराने म्हटले आहे. जगातील अत्यंत भयानक व किळसवाणी अशी पापे केली तरी चालतील, पण एकादशीला जेवलेले चालणार नाही, असा त्याचा अभिप्राय आहे. आणि जेवणे याचा अर्थ भातभाकरी खाणे! बटाटे, साबुदाणे इत्यादी पदार्थ खाणे हे भोजन नव्हे. जड, शारीर आचाराला, धर्माच्या बाह्य स्वरूपाला माणसे किती महत्त्व देऊ लागली होती आणि तसे करताना त्यांची बुद्धी किती बहकली होती, किती पतित झाली होती ते यावरून कळून येईल.

कोणत्याही समाजाच्या र्‍हासकाळाचे हे प्रधान लक्षण आहे. या काळी तो समाज मूलतत्त्वांपासून लांब जाऊन जडाचा उपासक बनतो. बहुतेक सर्व तत्त्वे, संस्था, निष्ठा या प्रथम मानवाच्या कल्याणासाठी निर्माण झालेल्या असतात. सर्व मानवांना इहलोकीची व परलोकीची सुखे मिळावीत, त्यांच्यात प्रेमभाव नांदावा, समाजाचे रक्षण व्हावे, त्यात समता, बंधुता, स्वातंत्र्य ही नांदावीत, प्रत्येकाला उन्नतीला अवसर मिळावा इत्यादी अनेक हेतू प्रवर्तकाच्या मनात असतात. त्यासाठी तो काही सिद्धांत सांगतो, एखादी संस्था किंवा मठ स्थापन करतो, काही आचार आवश्यक म्हणून सांगतो आणि प्रारंभीच्या काळात तो अंतिम हेतू लोकांच्या मनात असेपर्यंत त्या संस्थेचा कारभार व लोकांचे आचार यांना अर्थ असतो. पण पुढे पुढे मूळ हेतू हा जो आत्मा तो नाहीसा होऊन केवळ कलेवर शिल्लक राहते. ते कुजू लागले तरी लोक त्यालाच लोभावलेले असतात. आणि मग त्याच्या दुर्गंधीने, त्यातील जंतूंमुळे समाजपुरुषाचा नाश होतो.

माझे चिंतन

तत्त्वांना जडरूप

पण माणसाच्या मनाची ही ठेवणच होऊन बसली आहे. आपल्या कृती व त्यामागील प्रेरक हेतू यांच्यांत विसंगती निर्माण होत नाही ना, हे पाहणे त्याला नको असते. त्याची दगदग त्याला झेपत नाही. नित्य जागरूक राहणे ही फिकीर त्याला सोसत नाही. सामान्य जणांना ही नाहीच सोसत, पण समाजधुरीणही तिचा कंटाळा करतात. किंवा ती सोसण्याची ऐपत त्यांच्या ठायीही नसते. म्हणून ते थोर तत्त्वांना जडरूप देतात आणि तोच खरा धर्म असे स्वत:च्या मनाचे समाधान करतात. अकबराच्या स्वार्‍यांमुळे राणा प्रतापसिंहजी यांना चितोड सोडून रानोमाळ भटकावे लागत होते आणि अखेर चितोड परत घेण्याची त्यांची आकांक्षा तृप्त न होताच त्यांना कालवश व्हावे लागले. त्यावेळी त्यांचे अनुयायी, त्यांचे वारस, वंशज यांनी प्रतिज्ञा केली की चितोड परत मिळेपर्यंत आम्ही गवतावर निजू, गादीवर निजणार नाही; पानावर जेवू, चांदीच्या ताटात जेवणार नाही. पुढे ही घोर प्रतिज्ञा पार पाडण्याचे सामर्थ्य त्यांच्या वंशजांत राहिले नाही आणि प्रतिज्ञा पार पाडीपर्यंत ते बिकट व्रत सांभाळण्याचा कणखरपणा, ती तीव्र निष्ठा त्यांच्या ठायी नव्हती. तेव्हा त्यांनी त्या निष्ठेला जडरूप दिले. ते मांडलिक म्हणून चितोडला परत आले, सुखासीन झाले, गादीवर निजू लागले, चांदीच्या, सोन्याच्या ताटात जेवू लागले; पण त्यांनी व्रतही चालविले. म्हणजे काय केले? मऊ परांच्या गादीखाली ते थोडेसे गवतघालून ठेवीत व मग निजत आणि सोन्याच्या ताटाखाली एक वडाचे पान ठेवून मग जेवीत. अशा तर्‍हेने गवतावर निजू व पानावर जेवू ही व्रते त्यांनी अखंड आचरिली. नरोटीची उपासना ती हीच. त्या व्रतांतला स्वाभिमान, त्याग, तेज हा आत्मा नष्ट झाला होता. ते श्रीफल राणाजींच्या प्राणज्योतीबरोबरच अंतर्धान पावले होते. फक्त शब्द राहिले होते. व्रताची यांत्रिक कृती उरली होती. कलेवर शिल्लक होते. पण आपण प्रतिज्ञेचे पालन करीत आहोत, आपण तिच्याशी द्रोह केलेला नाही, ही त्या वंशजांची श्रद्धा तरीसुद्धा कायम होती.

मनुष्याच्या मनाचे हे जे दौर्बल्य, सत्त्वापासून, स्वधर्मापासून च्युत होऊन जडाची उपासना करीत असतानाही आपण धर्माचीच उपासना करीत आहोत असे समाधान मानण्याची ही वृत्ती अर्वाचीन काळी कमी झाली आहे असे मुळीच नाही. मार्क्सवाद, लोकसत्ता हे जे नवे युगधर्म त्याने स्वीकारले आहेत, त्यांचे प्रतिपालनही तो याच सनातन पद्धतीने करीत आहे.

मार्क्सवादाचे जडरूप

भांडवलशाही नको असे मार्क्स का म्हणाला? अल्पसंख्यांच्या हाती सर्व धन एकवटते आणि मग ते त्याच्या जोरावर सत्ता काबीज करून इतरांना छळतात, नागवितात म्हणून. रशियाने मार्क्सवाद स्वीकारला. भांडवलदार, जमीनदार नष्ट केले. पण सर्व धन पुन्हा सत्ताधारी अल्पसंख्यांच्या हातीच आणून ठेविले. पूर्वी भांडवलदारांचे राजसत्तेवर वर्चस्व असे, पण ते दूरत: अप्रत्यक्षपणे असे, आता सत्ता व धन एकाच अल्पसंख्य गटाच्या हाती देऊन रशियाने जास्तच भयानक परिस्थिती निर्माण केली आहे. भांडवलदार नष्ट केल्यानंतर सैन्य, पोलीस, तुरुंग ही चोवीस तासांच्या आत नाहीशी केली पाहिजेत, कारण यांच्याच बळावर सत्ताधारी लोक नागरिकांना छळत असतात, ही मार्क्सची पहिली अट रशियाच्या धुरीणांनी दृष्टीआड केली आहे. मार्क्स म्हणाला की भांडवलशाही नष्ट केल्यावर कामगारांचे राज्य झाले पाहिजे. सर्व दलितांच्या व्यक्तिमत्वविकासाला अवसर मिळावा, जीवनाची, उत्कर्षाची किमान साधने सर्वांना सुलभ व्हावी, हा त्याचा तसे सांगण्याचा हेतू होता. रशियात ‘कामगारांचे राज्य’ या घोषणा चालू आहेत; कामगारांना मतदानाचा अधिकार दिला आहे. पण कारखाने व एकंदर कारभार यांचे नियंत्रण सरकारने नेमलेल्या अधिकार्‍यांकडे देऊन, सर्व सुलतानी अधिकार त्यांच्याकडे सुपूर्त करून या कामगारराज्याचा हेतू विफल करून टाकला आहे. राजसत्तेचे अधिकार राहोच, साधा संप करण्याचा अधिकारही कामगारांना नाही. त्यांना फक्त स्टॅलिनचा जयजयकार करण्याचा व परदेशी प्रवाशांच्या पुढे आपल्या सुखाचे प्रदर्शन मांडण्याचा अधिकार आहे. मार्क्सवादाचे पालन ते हेच.

मार्क्सवादात क्रांती, उत्पात, स्फोट, विध्वंस यांना फार महत्त्व आहे. विरोधविकासवाद हे या धर्मातील आदितत्त्व आहे. जगाची प्रगती साध्या विकासपद्धतीने न होता दर वेळी संघर्ष, द्वन्द्व, उत्पात होऊन त्यातून प्रगती होते, असे मार्क्सधर्म सांगतो. यातील जगाची प्रगती हा आत्मा काढून टाकून विध्वंस, अत्याचार, दंगेखोरी, बेदिली, फूट एवढ्याचा मात्र कम्युनिस्ट लोक दर ठिकाणी, जुन्या काळच्या शाक्तपंथीयांप्रमाणे आश्रय करतात. गेल्या २५ वर्षांत फ्रान्स, जर्मनी, इटली, झेकोस्लोव्हाकिया, पोलंड या देशांत दुही माजविणे, फूट पाडणे, अत्याचार करणे, दंगल माजविणे हा उद्योग त्यांनी चालविला आहे. त्यामुळे त्या देशांची कसलीही प्रगती न होता ते देश दुबळे होऊन बसले आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत. या अत्याचारांनी आपण मार्क्सवादाचेच प्रतिपालन करीत आहो, अशी मार्क्सवाद्यांची श्रद्धा आहे.

धर्म ही अफू आहे, असे कार्ल मार्क्सने सांगून टाकले होते. परलोक, पुनर्जन्म, स्वर्ग या कल्पनांच्या नादी लोकांना लावून त्यांच्यावर होणार्‍या जुलुमाचा त्यांना विसर पाडणे, प्रतिकाराची त्यांची बुद्धी बधिर करून टाकणे, ही कामे धर्माने केल्यामुळे त्याने तसे उद्गार काढले होते. काल्पनिक सुखाच्या विलोभनाने लोकांची मने बेहोश करून टाकून त्यांना वस्तुस्थितीचा विसर पाडणे, हे पातक आहे, असा मार्क्सच्या विधानाचा आशय आहे. तो आशय सोव्हियेट नेते विसरले आहेत, एवढेच नव्हे तर त्यांनी मार्क्सधर्मालाच अफूचे स्वरूप दिले आहे. स्टॅलिनचे ते परमेश्वराप्रमाणे गुणगान करतात. तो पृथ्वीवरच स्वर्ग आणून देणार आहे, कामगारांचे नंदनवन निर्माण करणार आहे, अशी आश्वासने ते देतात. काही वर्षांनी रशियात विपुल, अतिविपुल समृद्धी निर्माण होणार आहे, प्रत्येकाला त्याच्या सगळ्या गरजा पुरविता येतील इतके धन आम्ही लवकरच देऊ, अशी ते अभिवचने देतात. या कल्पनासृष्टीत रशियन कामगार गुंग आहे. या सध्याच्या जगात सारखे विषप्रयोग व अन्यायी खटले चालू आहेत. कोटी दीडकोटी कामगारांना मजूरवाड्यात, सैबेरियात गुलामापेक्षाही हीन जिणे जगावे लागत आहे. या घोर परिस्थितीचा त्यांना विसर पडावा यासाठीच ही योजना आहे.

शासनसंस्थेचा विलय, कामगारांचे नेतृत्व, जगातील कामगारांची संघटना, स्त्रीचे दास्यविमोचन, व्यक्तीचे आर्थिक स्वातंत्र्य, आंतरराष्ट्रीयता या प्रत्येक तत्त्वाच्या बाबतीत सोव्हियेट रशियाने नरोटीची उपासना चालविली आहे. त्यातील श्रीफल नष्ट झाले आहे; त्यानेच ते नष्ट केले आहे. आणि मुसलमानांच्या राज्यविस्तारासाठी, हिंदुराज्यांच्या विनाशासाठी तनमनधन अर्पण केले तरी तो हिंदुधर्माशी द्रोह होत नाही, ही ज्याप्रमाणे येथील समाजधुरीणांची श्रद्धा होती, त्याचप्रमाणे मानवाचे व्यक्तित्व, त्याचे सुख, त्याची उन्नती, त्याचे सर्व क्षेत्रांतील स्वातंत्र्य यांना पदोपदी हरताळ फासूनही आपण मार्क्सधर्माशी द्रोह करीत नाही, अशी सोव्हियेट धुरीणांची अचल श्रद्धा आहे. मार्क्सवादाचा सांगाडा, त्याचे जडस्वरूप याला ते बिलगून बसले आहेत. आज त्यांनी जाणूनबुजूनच हे चालविले आहे. कालांतराने लोकांच्या ते अंगवळणी पडेल आणि खरा मार्क्सधर्म तो हाच, असे त्यांना वाटू लागेल. गादीवर निजायचे व थोडे गवत गादीखाली ठेवायचे, ताटात जेवायचे पण एक पान खाली ठेवायचे, एवढे केले की राणाजींच्या मृत्युसमयी केलेल्या प्रतिज्ञांचे पालन केल्याचे पुण्य मिळते ही जशी रजपूत राजांची श्रद्धा होती, त्याप्रमाणे शासनयंत्र पूर्ण जोरात चालवायचे, पण त्याच्या खाली एखादा कामगार उभा करायचा, म्हणजे शासनसंस्थेचा नाश केल्याचे पुण्य मिळते, अशी कार्ल मार्क्सच्या अनुयायांची दृढ, अढळ श्रद्धा आहे.

जिवंत तत्त्वाला जडरूप देऊन त्याचीच उपासना करीत बसायचे आणि अशा रीतीने त्याचा मूलहेतू विफल करून टाकायचा, या मानवाच्या वृत्तीमुळेच जगात आजपर्यंत अनेक थोर महात्मे जगदुद्धाराच्या प्रयत्नात खर्ची पडूनही जग आहे तेथेच आहे. बुद्धाची अहिंसा, जीझसची दया, महात्माजींचे सत्य या प्रत्येकाची मानवाने अशी दशा करून टाकली आहे. आज जेथे मार्क्सवाद नाही तेथे लोकशाहीची उपासना चालू आहे. पण तेथेही पद्धत हीच आहे. बाह्यरूपाविषयी माणसे पराकाष्ठेची दक्षता दाखवितात, अंतरात्म्याची त्यांना काळजी नसते; इतकेच नव्हे तर त्यांना त्याची दखलही नसते. जड सांगाडा म्हणजे लोकशाही अशी त्यांची श्रद्धा असते. निवडणुका, मतदान, लोकसभा, अध्यक्ष, उपाध्यक्ष, पॉइंट ऑफ ऑर्डर, कोरम, सभासदांचे हक्क, मतमोजणी यांविषयी लोक जसे दक्ष असतात, तसे सर्व राष्ट्राची जबाबदारी प्रत्येकाने घेणे, समाजहितासाठी अंग झिजविणे, आपणच केलेल्या कायद्याचे पालन करणे, सार्वजनिक कारभार निर्मळ राखणे, बुद्धिवादाची जोपासना करणे, प्रत्येकाच्या कर्तृत्वाचा विकास करण्याचा प्रयत्न करणे - इत्यादींविषयी मुळीच नसतात. लोकशाहीच्या धर्माच्या उपासनेत यांचा अंतर्भाव होतो हे त्यांना पटतच नसते. म्युनिसिपालिटीच्या खताच्या गाड्या आपल्या शेतात नेणे, जकात न देता गावात माल आणणे, प्राप्तीवरील कर चुकविणे, आपल्या घराच्या सोयीने रस्ते करणे, पब्लिक सर्व्हिस कमिशनचे आदेश धुडकावून आपल्याच पित्त्यांची वर्णी लावणे, जातीयवादाला चिथावून निवडणुका लढविणे हे आचार करणार्‍यांना ‘तुम्ही लोकशाहीशी द्रोह करीत आहात’, असे जर कोणी म्हटले, तर ते मिर्झा राजांप्रमाणेच चकित होतील. आपण मतदान केले आहे, निवडणुका लढविल्या आहेत, लोकसभेत भाषणे केली आहेत इत्यादी आपल्या आचारांकडे बोट दाखवून आपली लोकशाहीवरील श्रद्धा ते क्षणार्धात सिद्ध करतील.

- oOo -

पुस्तक: ’माझे चिंतन’
लेखक: पु. ग. सहस्रबुद्धे
प्रकाशक: कॉन्टिनेन्टल प्रकाशन
आवृत्ती दुसरी, चौथे पुनर्मुद्रण (२००१)
पृ. १८-२४.

(टीप: पु. ग. सहस्रबुद्धे यांचे समग्र वाङ्मय https://sites.google.com/site/drpgsahasrabudhevicharmanch/ इथे उपलब्ध आहे.)


हे वाचले का?

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१९

मलिका-ए-गझल

कॉलेजात पाऊल ठेवल्यावर कितीतरी वर्षांनी बेगम अख्तरचा आवाज अचानक ऐकायला आला तेव्हा ती नवी गझल एका बकाल वस्तीतल्या खरखरणाऱ्या रेडियोवर कानांत प्राण आणून ऐकली होती. स्तब्ध झालेल्या कोकिळेला पुन्हा कंठ फुटला होता. वसंत ऋतू पुन्हा बहरला होता. मग बेगम अख्तरचं गाणं रेडियोवर आणि रेकॉर्डवर पुष्कळ ऐकलं. पण प्रत्यक्ष तिची मैफल ऐकायला मिळाली ती कॉलेजजीवन संपून गेल्यावर चारपाच वर्षांनी. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रानं धनवटे रंगमंदिरात आयोजित केलेला कार्यक्रम होता तो. पडद्यावर पाहिलेली अख्तरी आणि समोर बसलेली पंचेचाळीस वर्षांची प्रौढा बेगम अख्तर यांच्यात जमीनअस्मानाचा फरक होता. तसं पाहिलं तर तिचा विशीतला अवखळ, चंचल आवाजही आता स्थिरावला होता. त्यात एकप्रकारची आकर्षक धीरगंभीरता आली होती. तिच्या तोंडून 'ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया' ही ओळ बाहेर पडली अन् चटकन डोळ्यांत पाणी आलं. साक्षात बेगम अख्तर आपल्या डोळ्यासमोर स्वत: गात आहे : जाने क्यों आज तेरे नाम पे रोना आया....तिचा तो दर्दभरा बुलंद स्वर वर चढत चढत किंचित फाटला की दु:खाची पराकाष्ठा होऊन काळीज फाटल्यासारखं वाटायचं. एक गझल तर अजून विसरायला झाली नाही :

ऐ मसीहा, कुछ तो बोलो क्या तुम्हारी राय है
छा गई काली घटा जिया मेरा लहराय है...
गीतयात्री

गालिब, दाग, मोमिन, जिगर, फैज, शकील, शमीम यांसारख्या अनेक उर्दू कवींच्या अनेकविध भावच्छटांना बोलकं करणारा तिचा तो स्वर मग पुढं अनेक मैफलीतून मनात खोल खोल उतरत गेला. 'तुम गा दो मेरा गान अमर हो जाये' या कवी बच्चनच्या ओळीतील भावना खरं म्हणजे अनेक हयात उर्दू कवीच्या मनात बेगम अख्तरच्या बाबतीत निर्माण झाली होती- कारण तिनं एखाद्या कवीची गझल गायली की त्याचं सगळीकडं नाव व्हायचं. 'दीवाना बनाना है' अख्तर गाय च्या अगोदर बहजाद लखनवी तरी कुणाला माहीत होता? गझलगायनाच्या एका नव्या स्वतंत्र शैलीलाच बेगम अख्तर जन्म दिला. त्यामुळं ती हिंदुस्तानची 'मलिका-ए-गझल' बनली. कवीच्या भावनेशी एकरूप होऊन शब्द, वाक्य आणि वाक्यांशातून दडलेले नवनवीन भाव व अर्थ श्रोत्यांना जाणवून देण्याचं विलक्षण सामर्थ्य होतं तिच्या गझलगायकीत. उर्दू शब्दांचे सुस्पष्ट, सुयोग्य उच्चार. त्यांच्याशी झोंबाझोंबी नाही, त्यांची कुठं मोडतोड नाही. "गझल जशी गायला हवी तशी बेगम अख्तरच गाते," असं तलतनं एकदा मला म्हटलं होतं.

बेगम अख्तर आपल्या मैफलीत आपल्या शिष्यांना तानपुरे घेऊन आपल्या पाठीमागं बसवायची. त्याही मधूनमधून तिच्याबरोबर सूर लावायच्या. बेगम अख्तरचा स्वत:चा पेटीवरून हात फिरायचा तो किती सफाईदारपणे. तबलेवाल्यानं लय वाढवली की ऐकणारा डोलायला लागायचा. बेगम अख्तरचा ख्यालगायकीचा पाया मजबूत असल्यामुळे ती स्वर-तालाला पक्की असावी. मन मोहून टाकणारी तिची ती गझल अजून मनात घोळते : इन होंठोंका आलम गुलाबी-गुलाबी... एका मैफलीत गायलेली गझल दुसऱ्या मैफलीत ती पुन्हा तशीच कधी गायची नाही. दरवेळी नवीन जागा, नव्या हरकती. गझलच्या बाबतीत तिच्यातील सर्जनशीलतेला तोड नव्हती. आकाशवाणीच्या राष्ट्रीय कार्यक्रमात पूर्वी गझल गायला मनाई होती. बेगम अख्तर राष्ट्रीय कार्यक्रमासाठी आकाशवाणीवर गेली तेव्हा तिला हे माहीत नव्हतं. गझल गायची नसेल तर आपण राष्ट्रीय कार्यक्रमात कधीच भाग घेणार नाही असं तिनं स्पष्टपणे सांगून टाकलं. त्या वेळच्या सूचना-प्रसारण खात्याच्या मंत्र्यांनी मनाई काढून टाकली तेव्हाच बेगम अख्तर राष्ट्रीय कार्यक्रमात गायली.

खरं म्हणजे केवळ गझलच नाही, तर ठुमरी, दादरा, चैती, कजरी वगैरे अर्धशास्त्रीय ललित गायनप्रकारांना बेगम अख्तरनंच सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. तिच्या तोंडून मैफिलीत ठुमरी ऐकण्याचा आनंद काही आगळाच असायचा. लखनौच्या नबाब वाजिदअली शाहनं शोधलेला हा गायन प्रकार त्यावरही आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवला बेगम अख्तरनं. परंपरा आणि नवता दोन्हींचा समावेश असायचा तिच्या गाण्यात. ठुमरी गाताना ती ऐकणाऱ्याचं बोट धरून स्वर आणि भावना यांच्या वळणावळणांच्या अनोळखी रस्त्यांवर दूरपर्यंत फिरवून पुन्हा सहजपणे पहिल्या ठिकाणी आणून सोडायची गझल असो की ठुमरी, दादरा असो की चैती, तिच्या गायनशैलीचा उगम तिच्या मूळच्या ख्यालगायकीतूनच झालेला असायचा. पूर्वी- अंगाच्या ठुमरीवर पंजाबी-अंगाची डूब देऊन एक नवी लखनवी शैली निर्माण केली होती बेगम अख्तरनं. ’अब के सावन घर आ' किंवा 'ननदिया काहे मारे नैना बान' यांसारख्या अतिअभिजात ठुमर्‍या विसरता आल्या नाहीत यात नवल नाही. पण ख्यालगायकोत पक्क्या असलेल्या बेगमनं मुळात अंतराच नसलेल्या ठुमर्‍यांतून असा काही भावनाविष्कार केला की त्यांनी मनाला कायमची हुरहूर लावली. चैन पडत नाही, राहून राहून जीव घाबरायला होतो : ’कल नाहीं आये, रह-रह जिया घबराये’ ही एकच ओळ तिनं अशी काही जीव ओतून म्हटली होती, को त्या सार्‍या मन.स्थितीची न सांगितलेली कहाणी तिच्या स्वरातून ऐकणार्‍यांना व्याकूळ करून गेली होती. अशीच एक विनाअंतऱ्याची ठुमरी काय गायली होती तो एकदा : "तेरे बिन बालम काटे ना कटे मोसो रतियॉं...’ एक विलक्षण वातावरण निर्माण केल होत तिनं. बेगम अख्तरचे दादरेही मैफिल रंगवायचे. 'सौतन के लेबे लंबे बाल, उलझमत जाना ओ राजाजी' यासारख्या ओळी इतक्या ढंगदारपणे म्हणायची ती की ऐकणार्‍यांना वेड लागायची पाळी यायची. वास्तविक दादरा, चैती, कजरी, होरी हे सारे लोकसंगीताचे प्रकार. गीते परंपरेनं चालत आलेली, तशाच त्यांच्या चालीही. पण त्यांना ही अभिजात संगीताचा हलकासा रंग देऊन बेगम रंगतदार करून टाकायची. मिश्र पिलुतला आपला प्रसिद्ध दादरा ती गायची तेव्हा अंगण झाडणाऱ्या ग्रामीण नवयुवतीचं सहजसुंदर चित्र डोळ्यापुढं उभं राहायचं:

निहुरे निहुरे बहारें अंगनवा
कंगना पहन गोरिया अंगना बुहारे
कि झुकि देखें नयनको...

मन मोहून टाकणारे सारं सारं विसरायला लावणार्‍या बेगम अख्तरचं गाणं ऐकता ऐकता काळ किती पुढे गेला, भोवतालचं जग किती बदलल याची आठवणच राहिली नाही. पण आपल्याला आठवण राहिली नाही तरी व्हायच्या गोष्टी कळतनकळत होतच असतात. बेगम अख्तरची अखेरची मैफल ऐकली ती छबिलदासमधे, त्या वेळी कतिल शिफाईची एक गझल दाद घेऊन गेली होती" तुम पूछो, मै न बताऊँ, ऐसे तो हालात नहीं...’ कार्यक्रम संपल्यावर सहज कुमुद मेहतांना विचारलं, "कसं काय वाटलं?" त्यांनी विलक्षण उत्तर दिलं, "या बाईबरोबर सती जावंसं वाटलं!"

३० ऑक्टोबर १९७४ रोजी अहमदाबादला बेगम आजार अचानक हृदयविकारानं गेली! तिथल्या मैफलीत ’जमुनाके तीर' ही तिनं म्हटलेली अखेरची भैरवी. खरं म्हणजे अलीकडं तिची प्रकृती बरो नसायची. गाण्याचे कार्यक्रम करू नयेत असा सला दिला होता सगळ्यांनी. त्यावर ती खूप हसली होती. म्हणालो होतो, "ये भी कोई मशवरा है? अगर गाते-गाते ही मेरी मौत हो जाय, तो इससे बढ़कर मेरी खुशकिस्मती और क्या होगी!"

हार्ट-अटॅक आल्यावर तिला अहमदाबादच्या हॉस्पिटलमधे नेण्यात आलं. पण तिला लखनौला जायचे होते. "मला लखनौला घेऊन जा." असे तो सारखं सांगत होती. पण ती लखनौला परतली नाही, तिचा आवाजही लखनौला परतला नाही. परतलं ते नश्वर शरीर. तेही इतमामाने नाही तर विटंबना सहन करून. अनेक सन्मान मिळवलेल्या गझल सम्राज्ञीच्या शवाचा प्रवास टॅक्सीच्या टपावरून का झाला? कशाला, कोण, का जबाबदार असतं याची चिकित्सा अखेर व्यर्थच ठरते. कशासाठी तरी, कुणासाठी तरी वेडं होण्याचा आणि त्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याचा काळच आता खूप मागे पडला आहे. उरले आहेत फक्त हिशेब. आणि मैफलीतल्या प्रत्येक जड वस्तूलासुद्धा आपला परवाना बनवणारी ती गझलची शमाही आता मालवली आहे:

मैं ढूँढ रहा हूँ मेरी वो शमा कहाँ है
जो बज़्म की हर चीज़ को परवाना बना दे
दीवाना बनाना है तो दीवाना बना दे

- oOo -

पुस्तक: गीतयात्री
लेखक: माधव मोहोळकर
प्रकाशक: मौज प्रकाशन
आवृत्ती दुसरी (२००४)
पृ. १८-२१.


हे वाचले का?

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९

पातकांची परिमिती

“मला वाटले होते, एखादे अत्यंत सडलेले प्रेत आभाळात टांगून ठेवावे त्याप्रमाणे माझे पातक सगळ्यांना माहीत असेल. मी माझ्या पवित्र नेत्याचा घात केला. त्याच्या वस्त्राचे आदराने चुंबन घेत आहे असे दाखवून मी द्रोह केला आणि त्याला शत्रुसैनिकांच्या आधीन केले. शेवटी त्याला स्वतःचा अवजड क्रूस खांद्यावर घेऊन ओढत जात, त्याच क्रूसावर आपले आयुष्य अत्यंत वेदनेने संपवावे लागले. त्याचे पवित्र रक्तच माझ्या डोक्यावर थापले आहे. तू मला ओळखत नाहीस ? अरे, मी ज्यूडास आहे."

पिंगळावेळ

समोर जमिनीतून एकदम एक विषारी सर्प उभा राहिल्याप्रमाणे डॉन दचकला आणि मागे सरला. क्षणभर त्याची वाचाच गेली व तो थिजलेल्या डोळ्यांनी पाहतच राहिला. नंतर त्याने स्वतःला सावरले व म्हटले, " तू! पण तू ते का केलेस?"

ज्यूडासने अविश्वासाने त्याच्याकडे पाहिले. तो म्हणाला, "मला असे कोणी सुद्धा विचारले नव्हते. सगळ्यांचा पूर्ण विश्वासच की, मी ते पातक चांदीच्या तीस नाण्यांसाठी केले. तुलादेखील तसेच वाटते का? अरे जन्माचे दारिद्र्य जाईल एवढी संपत्ती मिळण्याजोगी असती तर कदाचित मनाची चलबिचल झाली असती, मोह प्रबळ ठरला असता. तीस नाण्यांनी काय होणार? तेवढ्यावर वर्षाचीदेखील भूक भागली नसती. त्या मोबदल्यात जमिनीचा एक वीतभर तुकडा तरी विकत घेता येईल की नाही कुणास ठाऊक! शिवाय मला स्वतःला तीस नाणी एवढी अप्रूप असण्याची गरज काय? आम्हाला ज्या देणग्या मिळत त्या सगळ्या माझ्याच ताब्यात, या कमरपट्ट्यात असत. त्यातून मला काय तीस नाणी सहज उचलता आली नसती का ? सैनिकांनी विश्वासघात करून त्या राजेश्वराला देहान्ताची शिक्षा देण्याचे ठरवले तेव्हा मी ती नाणी फेकून दिलीच की नाहीत? "

ज्यूडास मध्येच थांबला. आता त्याचा आवाज थोडा स्थिर झाला होता. " साऱ्याचे खरे कारण निराळेच होते. माझ्या लहानपणी मी वेड लागलेला एक माणूस पाहिला होता. तो स्वतःला असाच उद्धारक समजत असे व हातवारे करीत मोठमोठी प्रवचने करीत असे. एक दिवस संतापलेल्या लोकांनी भर बाजारात त्याला दगडांनी ठेचून मारले. माझ्या येशूच्या वाट्याला तसला शेवट येऊ नये अशी माझी इच्छा होती. अलीकडे त्याचे बोलणे असेच अमर्याद होऊ लागले होते. देवळात आपला धंदा करणाऱ्या सराफांना त्याने हाकलून लावले तेव्हा जमाव किती संतापला होता, हे मी प्रत्यक्ष पाहिले होते. जर त्या सैनिकांनी त्याला ताब्यात घेतले तर त्याचे जीवित सुरक्षित राहील, अशी मला आशा होती. पण त्यांच्याकडूनच विश्वासघात होईल याची मला आधी कशी कल्पना येणार?"

"दुसरेदेखील एक कारण होते. एका गालावर प्रहार झाला तर दुसरा गाल पुढे कर असली नेभळट शिकवण त्याने सुरू केली होती. आमच्या लोकांना लढायचे होते ते बलाढ्य अशा रोमन साम्राज्याशी. असे एकामागोमाग गाल पुढे करून जगातले सीझर कधी नष्ट झाले आहेत का? ज्या वेळी आमचा प्रत्येक माणूस बलदंड होण्याची गरज होती, त्या वेळी असले भळभळीत, अवेळ तत्त्वज्ञान ऐकवणे म्हणजे आमची खच्ची करून टाकण्यासारखेच होते. तेव्हा त्याच्याविषयी कितीही आतडे तुटले तरी तो नाहीसा होणेच न्याय्य आहे, असा माझा निश्चय झाला होता."

"पण तू प्रश्न विचारलासच म्हणून तुला अगदी काळजातले खरे कारण सांगतो. कोणत्याही धर्माला बलिदानाची जोड मिळाली नाही तर त्याला झळाळी येतच नाही. केवळ शब्द आज आहेत तर उद्या नाहीत. शब्द म्हणजे निव्वळ तोंडचा वारा; त्यांना रक्त नाही की मांस नाही. पण एखाद्या प्रेषिताचे आत्मसमर्पण मनावर सतत आदळत राहिले तर त्याच्या रक्ताची अमर नक्षत्रे होतात, त्याच्या शब्दांत विश्वाचे हुंकार ऐकू येतात. अशा बलिदानासाठी यापेक्षा जास्त योग्य क्षण शोधून तरी मिळाला असता? येथे परकीयांचे राज्य होते, त्याच परकीयांकडून परस्पर बलिदान करवण्याची दुर्मिळ संधी होती. तुला माझ्या बोलण्यात आढ्यता दिसेल, पण या सार्‍यासाठी मला स्वतःला केवढा त्याग करावा लागला आहे हे ध्यानात घे. मी माझे सारे आयुष्य त्यासाठी उधळून लावले व महापातक आपण होऊन स्वीकारले. पुण्यपुरूष म्हणून येशूचे नाव ज्या ठिकाणी घेतले जाते, त्या ठिकाणी पापाचा राक्षस म्हणून माझे नाव येते. पण ध्यानात घे, मी त्या भीषण वणव्यात स्वतःला जाळून घेतले म्हणूनच येशूचा ख्रिस्तपणा सूर्याप्रमाणे तळपणार आहे !"

स्वतःच्याच शब्दांचा कैफ चढत गेल्याप्रमाणे ज्यूडासचे डोळे झळझळीत झाले व चेहरा उद्धट आणि ताठर दिसू लागला. तो म्हणाला, "आणखी असे एक पाहा. या पातकाला मीच एकटा सर्वस्वी जबाबदार धरला जातो. परंतु दरोडेखोराला जीवदान देऊ की येशूला, असा सवाल पायलेटने केला असता हजारो लोकानी येशूला सोडून दरोडेखोराला वाचवण्याची विनंती केली. ती माणसे येशूच्या हत्येला माझ्याइतकीच जबाबदार नाहीत का ? नेहमी त्याच्या पुढे पुढे करणारे त्याचे निष्ठावंत अनुयायी- ते सारे या वेळी कुठे होते ? त्यांच्यापैकी एकाने तरी आवाज मोठा करून येशूवर निष्ठा दाखवली का? व्यभिचारी म्हणून दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा मिळालेल्या त्या स्त्रीला येशूने वाचवले, लाझारसला मृत्यूनंतर पुन्हा जिवंत केले. ही दोघे त्या वेळी कुठे होती? येशूने एकदा पाच हजार भुकेल्यांना जेवण दिले. ही सगळीच माणसे त्याच नेमक्या वेळी कुठे नाहीशी झाली? पाच हजारांचा आवाज का कमी मोठा झाला असता? जर त्यांनी येशूला वाचवले असते आणि नंतर माझ्या अंगात आकडे रुतवून मांस तोडून टाकण्याची जरी मला शिक्षा दिली असती, तरी मी ती आनंदाने भोगली असती. ही माणसे माझ्याइतकीच पापी नाहीत का? त्या प्रत्येकावर त्या रक्ताचे शिंतोडे उडालेले आहेत. पण अखेर या हत्येला जबाबदार म्हणून नाव घेतले जाईल ते या एकटया ज्यूडासचे ! या सार्‍यापेक्षाही विशेष म्हणजे-"

ज्यूडास बोलताना मध्ये थांबला. आपल्या आवेशपूर्ण बोलण्याचा डॉनवर काहीही परिणाम होत नाही, उलट उपरोधाने त्याच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे हे पाहून त्याला फार राग आला. त्याने कपाळाला आठ्या घालून विचारले, "का, तुझा माझ्यावर विश्वास बसत नाही ?"

डॉनने धीटपणे मान हलवली व स्पष्ट सांगितले, "माझा तुझ्या शब्दांवर काडीचाही विश्वास बसत नाही! ज्या वेळी कुणी एकाच कृत्याबद्दल अनेक आणि विसंगत कारणे सांगू लागतो, त्या वेळी तो जास्तीत जास्त सत्य सांगण्याचा प्रयत्न करत नसतो, तर काहीतरी लपवण्याचीच त्याची धडपड असते. म्हणजे या ठिकाणीदेखील माझ्या पदरात निराशाच पडली म्हणायची. ज्ञान, पापपुण्य यांत अगदी शेवटच्या दगडापर्यंत जाऊन आलेल्याला भेटण्याचा योग माझ्या आयुष्यात नाही हेच खरे. तुझा जो प्रक्षोभ आहे तो तुझ्या महान पातकाबद्दल फारसा दिसत नाही. तो निर्माण झाला आहे याचे कारण म्हणजे ते पातक आपल्या हातून घडले न जाता केवळ घडवले गेले आहे हे तुला आता जाणवू लागले आहे, एखाद्या अजस्र जनावराच्या पायाला बांधून त्याला चिखलातून फरफटत नेल्याप्रमाणे तू त्या पापातून ओढला गेलास. ते थांबवण्याचे तुझ्यात सामर्थ्य नव्हते, की ते आपणाला कुठे नेत आहे हे जाणण्याची दृष्टी नव्हती. म्हणून तू आता निरनिराळी कारणे शोधत आपल्या कुत्याला काहीतरी अर्थ देण्याचा खुळचट प्रयत्न करत आहेस. जर एखाद्याने पूर्ण विचार करून अनेक पर्यायांमधून एक निवडला, तर ते पाप कितीही भयाण असो, त्यात देखील तो भाल्याप्रमाणे ताठ राहतो, पापणी न हलवता तो त्या काळ्या धगधगीत सूर्याकडे पाहू शकतो. तुझ्या पापात हे स्वत्वदेखील तुला लाभले नाही. एवढे महान पातक, पण त्यामागील हेतू तुला माहीत नाही आणि त्यामुळेच तू पापातदेखील अगदी किनाऱ्यापर्यंत गेला नाहीस! "

ज्यूडासने त्याच्याकडे पाहत तळ्यावर मूठ आपटत म्हटले, "यापलीकडे पातक असणार तरी कसले? जन्म देणार्‍या आईची हत्या हे महापातक खरे, पण ते मुलापर्यतच मर्यादित असते. इतरांना ती फक्त एका स्त्रीची हत्या यापलीकडे त्या घटनेचे महत्त्व नसते. पण येथे पाहा, हा पवित्र पुरुष काही केवळ आईबापांचा मुलगा नव्हता, काही एकदोन जणांचाच बंधू नव्हता. माझ्या हातून साऱ्या पृथ्वीचा प्रकाशदीप विझवला गेला. यापेक्षा जास्त मोठे पातक जर असेल तर हे महापंडिता, तू सांग आणि मला शहाणा कर!" ज्यूडास ने बाजूला तोंड वळवले व तो तिरस्काराने थुंकला.

डॉनने त्याला शांत होण्यासाठी थोडा वेळ जाऊ दिला. मग तो म्हणाला, "पातक म्हटले की ते नेहमी रक्ताने न्हालेल्या उग्र दैत्यासारखे थयथयत येते, असली एक खुळी समजूत झालेली आहे, म्हणून तुला तसे वाटते. मला वाटते याहीपेक्षा मोठे पातक तुझ्या हातून घडू शकले असते; यापुढेही घडू शकेल. त्या उद्धारकाचे पवित्र शब्द घेऊन त्यांचा तू स्वार्थी बाजार करू शकला असतास आणि ज्यांच्या उद्धारासाठी त्याने जन्म घेतला व मृत्यू स्वीकारला, त्याच लोकांना तू शब्दांचे गुलाम करण्यात रमून जाऊ शकला असतास. किंवा आपण त्याला फार जवळून पाहिले एवढ्याच आधारावर तू अघटित खुळचट चमत्कार आणि भारूड लीला यांनी बजबजलेले त्याचे चरित्र तू लिहू शकला असतास आणि त्यामुळे तो कायमचाच सामान्य माणसांपासून दुरावला असता. मग तू त्याला त्या सोनेरी पिंजऱ्यात बंदिस्त करून त्याचे प्रदर्शन करत जरतारी महंत अथवा धर्मप्रमुख होऊन वैभवात लोक शकला असतास. छातीत प्रत्यक्ष सुरी खुपसण्यापेक्षा ही पातके तुला कमी जहरी वाटतात की काय?"

"आणि आता तर ही देखील ज्यापुढे काहीच नाही अशी ठरतील असे एक कृत्य तुझ्याकडून घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धर्माबद्दल एक गोष्ट मोठी विलक्षण आहे. तेथे सरळ साध्या भाबड्या अनुयायापेक्षा पश्चात्तापदग्ध दिसणाऱ्या, सर्वांसमोर स्वत:ला हीनदीन करणार्‍या माणसाला जास्त महत्व असते. जेवढे पाप मोठे तेवढे त्याच्या पश्चात्तापाचे नाटक मोठे. आता असले पाप केल्यावर तुला पश्चात्तापाचे ढोंग करता येईल; डोळे ओलसर, गळा घोगरा करीत तुला सगळ्यांपुढे नम्र होता येईल आणि त्याच वेळी तू ज्याची हत्या केलीस त्याच्याच उपदेशाचा प्रसार करता येईल. तुझे पातक महान म्हणून तुझा पश्चात्ताप महान आणि म्हणूनच तुझ्या शब्दाचे सामर्थ्यदेखील अमर्याद! या बाबतीत तुला कोणी प्रतिस्पर्धीदेखील राहणार नाही. कारण अशी हत्या पुन्हा होणार नाही. स्वतः पाप केल्यानंतरही तसल्या पापासून मुक्तीचा मार्गदखील तूच दाखवावा, हे नाटक किती मनोरंजक होईल याची कल्पना तरी करून पाहा. मग सहस्रावधी लोक तुझ्यामागून येतील, तुझ्याखाली सोन्याचे सिंहासन येईल आणि अनेक जण ते खांद्यावर घेऊन मिरवण्यात स्वतःला धन्य समजतील. मग फार तर वर्षातून एकदा कधीतरी बारा जणांचे पाय धुण्याचे प्रहसन मात्र या नाटकात करावे लागेल, कधीतरी अनवाणी चालत जाऊन रोगपीडितांना भेट देऊन गुळमट शब्द बोलण्याची तसदी घ्यावी लागेल, इतकेच. म्हणजे बघ, महान पातक करण्याचे आणि त्याच वेळी महान विलास भोगण्याचे दुहेरी कर्तृत्व तुझ्या वाट्याला येईल, होय की नाही?"

ज्यूडास ताडकन उभा राहिला व डॉन जवळ येऊन त्याच्यावर वाकून म्हणाला, "तू माणूस आहेस की सैतान आहेस? असली पापे तुझ्या मनात येतात म्हणजे तूच माझ्या पलीकडे गेला आहेस. पण तू भेटलास हे एका दृष्टीने माझे नशीबच म्हणायचे, अजूनही माझे आयुष्य जास्त भीषण कसे होऊ शकेल हे तू मला दाखवलेस. म्हणजे आता मी काय करावे हेच तू मला सांगितलेस."

ज्यूडास वळला व आवेगाने जवळच्या एका झाडावर चढला. त्याने कमरेच्या कातडी पट्ट्याचा गळफास केला व तो गळ्यात अडकवून त्याने खाली उडी घेतली. गोठून गेल्याप्रमाणे होऊन डॉन तिकडे पाहतच राहिला.

- oOo -

पुस्तक: पिंगळावेळ
लेखक: जी.ए. कुलकर्णी
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती तिसरी, पुनर्मुद्रण(१९९९)
पृ. २३०-२३४.


हे वाचले का?