मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१९

घटत्या बेरजेचा सिद्धांत

नेपोलियनने एकदा रणांगणातला एक हिशेब सांगितला होता. फ्रेंच सेना घेऊन तो इजिप्तमध्ये गेला होता. तेथील अरबांच्या एका जमातीचे नाव ‘मामेलुक’ असे होते. हे लोक अंगापिंडाने कणखर व शरीराने धिप्पाड होते. फ्रेंच लोक त्या मानाने बारीक दिसत. तेव्हा या धिप्पाड लोकांशी लढताना फ्रेंचांचा धीर खचू नये म्हणून त्याने फ्रेंचांना मानवी गणिताचा हिशेब सांगितला. तो म्हणाला, एक फ्रेंच व एक मामेलुक यांचा सामना झाला तर मामेलुक निश्चित भारी आहे. शंभर फ्रेंच व शंभर मामेलुक असा सामना झाला तर बरोबरी होईल आणि दहा हजार फ्रेंच व एक लक्ष मामेलुक अशी लढाई झाली तर फ्रेंच मामेलुकांचा सपशेल पराभव करतील! याचा अर्थ असा की फ्रेंचांची संख्या वाढत जाते तसतसे त्यांचे बळ संख्येपेक्षा जास्त होत जाते आणि मामेलुकांची संख्या वाढू लागली की ते कमजोर होत जातात! हे मानवी गणित आहे; जड वस्तूंच्या गणितापेक्षा ते फार निराळे आहे.

माझे चिंतन

आपण भारतीय लोक मामेलुकांच्या गणितात बसतो, फ्रेंचांच्या नाही. वैय्यक्तिक हिशेब केला तर आपण खरोखरच जगात अद्वितीय ठरू; पण आपण संघ करू लागलो, चार माणसे एकत्र आली की आपले सामर्थ्य तितक्या पटीने न वाढता उलट कमी होते. असे का व्हावे याची मीमांसा करावयाची आहे. पण तसे करण्यापूर्वी आपण वैय्यक्तिक दृष्टीने खरोखरच कसे गुणसंपन्न आहो हे दिग्दर्शित करतो. म्हणजे याच गुणांची संघटना केली तर जगात आपण पराक्रमाच्या कोणत्या कोटी करू शकू याची कल्पना येईल.

त्यांचे सामुदायिक जीवनातील सामर्थ्य

यासाठी जपानशी तुलना करणे उद्बोधक होईल. आपली अर्वाचीन काळातील सर्व प्रगती ब्रिटिश विद्येच्या प्रसारानंतरची म्हणजे शंभर सव्वाशे वर्षांतली आहे. अर्वाचीन जपानचा उत्कर्ष त्याच काळातला आहे. मेजी युगापासून जवळजवळ गेली पाउणशे वर्षे जपान प्रगतीच्या मार्गाने अत्यंत वेगाने अंतर कापीत चालला आहे. समाजाची पुनर्घटना, औद्योगीकरण, राष्ट्रनिष्ठा, विज्ञान-अभ्यास, लष्करी सामर्थ्य या बाबतींत जगाला थक्क करून सोडील अशा गतीने जपान चालला आहे. पण असे असूनही जपानच्या या सर्व वैभवातील एक वैगुण्य जाणवल्याखेरीज राहात नाही. आम्ही भारतीय वैय्यक्तिक कर्तृत्व निर्माण करू शकतो, सामुदायिक जीवनाचा उत्कर्ष आम्हास साधत नाही. जपान दुसर्‍या टोकाला आहे. सामुदायिक जीवनातील सामर्थ्याची त्याने अगदी तड गाठली आहे; पण वैय्यक्तिक वैभवात जपान फार खुजा आहे. गेल्या शंभर वर्षांत किंवा त्याच्या मागच्या काळातही जगाचे डोळे आपल्या गुणवैभवाने, व्यक्तित्वाने दिपवील असा एकाही महापुरुष जपानमध्ये झाला नाही. अब्राहम लिंकन, रूझवेल्ट, लेनिन, एडिसन, मेरी क्युरी, डार्विन, पाव्हलॉव्ह, शॉ, इब्सेन, गॉर्की, टॉलस्टॉय, नेपोलियन, नेल्सन, आयसेनहोवर, नॉर्मा शेअरर, ग्रेटा गार्बो, पॉल मुनी यांसारखे एकही नाव जपानच्या इतिहासातून ऐकू येत नाही.

उलट हिंदुस्थानच्या गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासातच अशी कितीतरी नावे आढळतात. टिळक, सावरकर, महात्माजी, नेहरू, सुभाषचंद्र, जगदीशचन्द्र, चंद्रशेखर रमण, सुब्बाराव, (अमेरिकेतील) शंकरराव गोखले, भाभा, राममोहन रॉय, विवेकानंद, रवीन्द्रनाथ, शरदचन्द्र, राधाकृष्णन, उदयशंकर या व्यक्तींची कीर्ती जगात दुमदुमली आहे. त्यांच्या तोडीचा एकही पुरुष जपानमध्ये निर्माण झाला नाही. आपल्या भूमीचे हे वैभव स्पृहणीय आहे यात शंका नाही; पण असे असूनही गेल्या पन्नास वर्षांत जपानने सामुदायिक जीवनात जे अलौकिक सामर्थ्य निर्माण केले आहे, त्याच्या शतांशानेही आपल्याला निर्माण करता आले नाही. या गोष्टीचा आपण अगदी जिवाला लावून विचार केला पाहिजे.

अपयश: वैय्यक्तिक व राष्ट्रीय 

मला याची जी काही मीमांसा सांगावीशी वाटते, ती स्पष्ट करण्यासाठी दोन उदाहरणे सांगतो. १७६१ साली पानपतची लढाई झाली. तीत दोन प्रहरपर्यंत विजयश्री मराठ्यांची होती. पुढे विश्वासराव पडले आणि सैन्य एकदम कच खाऊन सैरावैरा धावू लागले. अशावेळी भाऊसाहेब वीराच्या आवेशाने एकदम सैन्यात घुसले व त्यांनी धारातीर्थी आत्मार्पण केले. हे दिव्य करताना त्यांच्या मनात असे आले की आपण पुण्याला एवढ्या प्रतिज्ञा करून आलो, आता हे अपयशी तोंड पुण्याला कसे दाखवावे? या स्थितीत जगणे असह्य आहे असे म्हणून त्या वीर पुरुषाने मृत्यूस कवटाळले. वैय्यक्तिक जीवनाच्या दृष्टीने भाऊसाहेबांचे हे कृत्य भूषणावह असेच आहे. जो आत्मार्पणाला सिद्ध झाला, त्याच्यापुढे आपले मस्तक नम्र झालेच पाहिजे.

पण ते तसे नम्र करून, सामाजिक जीवनाच्या दृष्टीने भाऊसाहेबांच्या या कृत्याचे मूल्यमापन करण्यास हरकत नाही. मराठी सत्तेच्या उत्कर्षाच्या दृष्टीने, हिंदवी स्वराज्याच्या दृष्टीने भाऊसाहेबांनी असे करावयास नको होते, असे वाटते. त्यावेळी शांत मनाने रणातून माघार घेऊन, जितके सैन्य वाचविणे शक्य होते तितके वाचवून, अपयश पत्करून, पुण्याला अपयशी तोंड दाखविण्याची आपत्ती त्यांनी स्वीकारावयास हवी होती. त्यात वैय्यक्तिक मानहानी झाली असती हे खरे आहे; पण राष्ट्राचे मोठे सैन्य आणि मग राष्ट्राचे मोठे धन सुरक्षित राहून त्या पराभवाचा काळिमा धुवून काढता आला असता. वैय्यक्तिक अपयश व राष्ट्राचे अपयश यांत भाऊसाहेबांनी पहिल्याची पर्वा न करता दुसर्‍याची चिंता वाहणे अवश्य होते.

पण आपल्याकडे शौर्यधैर्याच्या, वीरपरंपरेच्या, क्षात्रधर्माच्या कसोट्या अशा पाहात नाहीत. रजपूत लोक रणातून परत फिरावयाचे नाही, अशा प्रतिज्ञेने निघत व धारातीर्थी देह ठेवीत. वैय्यक्तिक शौर्याची व त्यागाची ती परमसीमा होय हे खरे आहे; पण थोडा वैय्यक्तिक कमीपणा पत्करून, हे वैभव सोडून देऊन रजपूत वीरांनी त्या त्या वेळी माघार घेऊन, पुन्हा तयारी करून शिवछत्रपतींच्या प्रमाणे पुन्हा चढाई केली असती तर मुसलमानांचे आक्रमण कायमचे मोडून काढण्यात पुढे मराठ्यांना जे यश आले, ते आधीच रजपुतांना आले असते आणि राजस्थानची व मग अखिल भारताची राष्ट्रीय हानी टळली असती. वैय्यक्तिक क्षात्रधर्माच्या अतिरेकी कल्पनेमुळे इतके रजपूत वीर रणात पडले, मारले गेले की राजस्थान या राष्ट्राचा त्यामुळे कणाच मोडून गेला.

हा विवेक फार मोलाचा!

भाऊसाहेब किंवा हे रजपूत वीर यांचे हे काहीसे मनोदौर्बल्य होय, असे म्हटले तर वाचकांना ते अत्यंत विपरीत वाटेल. म्हणून इंग्रज या बाबतीत कसा विचार करतात ते सांगून पाहतो; पटले तर पटेलही. ट्राफल्गारच्या लढाईत नेल्सन हा इंग्लिशांचा अत्यंत मोठा सेनापती कामास आला. आरमारी लढाई चालू होती; नेल्सन हा अगदी वरच्या बाजूला डेकवर उभा राहून आज्ञा देत होता. त्याने त्यावेळी क्राऊन, इपॉलेट इत्यादी त्याच्या थोर सेनापतिपदाची सर्व बिरुदे अंगावर धारण केली होती. त्यामुळे तो सहज ओळखू येऊन फ्रेंच गोलंदाज नेल्सन याच्यावर गोळा टाकतील अशी भीती वाटून त्याचे सरदार त्याला विनवू लागले, “महाराज, आपण एक तर ही बिरुदे उतरून ठेवा किंवा लढाई आम्ही सांभाळतो, तिच्यावर लक्ष ठेवून, आपण केबिनमध्ये बसून नुसत्या आज्ञा द्या.” पण नेल्सनने यातले काहीच मान्य केले नाही. “ही बिरुदे मी भूषण म्हणून मिळविली आहेत आणि भूषण म्हणूनच मी ती छातीवर धारण करीन”, असे त्याने उत्तर दिले. दुर्दैवाने त्याच्या अधिकार्‍यांची भीती खरी ठरली. फ्रेंचांनी त्याला त्या बिरुदांवरून ओळखून त्याच्यावर नेमका गोळा टाकला आणि त्यामुळे भयंकर जखमी होऊन शेवटी नेल्सन मृत्यू पावला. या घटनेचे वर्णन करून तिच्यावर भाष्य करताना नेल्सांचा चरित्रकार साउदे याने म्हटले आहे, “थोर पुरुषांच्या मनाला हा मोह शेवटी वश करतोच; हे दौर्बल्य त्याच्या ठायी शेवटी दिसतेच.”

नेल्सनवर साउदेने ही जी टीका केली आहे ती अतिशय वरच्या मूल्यमापनातून केली आहे. आपल्या राष्ट्रासाठी प्राणांचे बलिदान करणार्‍या थोर पुरुषाच्या मनाचे हे फार सूक्ष्मपणे केलेले विश्लेषण आहे आणि त्यातून दिसून आलेले हे वैगुण्य आहे. आघाडीवर जाऊन निर्भयतेने प्राणत्याग करणे जेथे अवश्य असेल, त्यावरच सैन्याचे चैतन्य व अंतिम यश अवलंबून असेल, तेथे ते करणे अवश्यच आहे. तेथे माघार घ्यावी असे कोणीच म्हणणार नाही. पण काही प्रसंग असे येतात की याच्या उलट धोरण ठेवणे विजयाच्या दृष्टीने अवश्य असते. पण कित्येक थोर पुरुषांच्या प्रकृतीला ते मानवत नाही; त्यांना त्यात कमीपणा वाटतो. पण राष्ट्रासाठी, अंतिम यशासाठी तो पत्करणे अवश्य असते. तेथे आत्मार्पण हे व्यक्तीच्या यशाला पोषक, पण राष्ट्राच्या हिताला मारक असते. तरीही जे थोर पुरुष हा विवेक न करता आत्मबलिदान करतात, ते प्राणाचा त्याग करतात; पण स्वयशाचा, स्वकीर्तीचा करीत नाहीत. एरवी हे युक्तच आहे. पण त्या यशाचा त्याग करून राष्ट्राचे यश वाढविले पाहिजे अशी वेळ आली असतानाही तसे न करणे ही मोहवशता आहे, ते दौर्बल्य आहे, असा साउदेचा अभिप्राय आहे. नेल्सन ती बिरुदे उतरविण्यास तयार नव्हता, खाली केबिनमध्ये जाण्यास तयार नव्हता; कारण त्याला त्यात स्वत:च्या कीर्तीला कलंक लागेल ही भीती वाटत होती. पण त्याच्या या कृत्यामुळेच लढाई फसण्याचा संभाव होता. मग त्यामुळे इंग्लिश राष्ट्राच्या कीर्तीला कलंक लागला असता. हा विवेक न सांभाळणे हीच मोहवशता, असे साउदे म्हणतो.

वैय्यक्तिक कीर्ती व राष्ट्राची कीर्ती यांत राष्ट्राच्या कीर्तीला वरचे स्थान देणे अवश्य होते, असे त्याचे म्हणणे आहे. त्याच अर्थाने मी भाऊसाहेबांविषयी लिहिले आहे. १६६५ साली जयसिंगापुढे शरणागती पत्करताना शिवछत्रपतींनी हा विवेक सांभाळला होता. वैय्यक्तिक मानापमानाच्या भावनेच्या आहारी जाऊन त्यांनी त्यावेळी धारातीर्थी आत्मबलिदान केले असते तर राजस्थानचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात घडून येऊन हिंदवी स्वराज्याची भाषाच संपली असती! भाऊसाहेबांनी तोच विवेक सांभाळून, त्यावेळी माघार घेऊन, वर्ष दोन वर्षे जरूर तर थांबून पुन्हा चढाई केली असती, तर महाराष्ट्राची एक पिढी गारद होण्याऐवजी त्याचे आसन त्यावेळीच दिल्लीला स्थिर झाले असते. पण भाऊसाहेबांच्या त्या मनोवृत्तीमुळे हे साधले नाही.

पण ही वृत्ती हीच भारताची प्रकृती आहे! शिवछत्रपती हे अपवाद आहेत !!

- oOo -

मूळ लेख: भारतीय जीवनातील क्रिकेट आणि हॉकी

पुस्तक: ’माझे चिंतन’
लेखक: पु. ग. सहस्रबुद्धे
प्रकाशक: कॉन्टिनेन्टल प्रकाशन
आवृत्ती दुसरी, चौथे पुनर्मुद्रण (२००१)
पहिली आवृत्ती (१९५५)
पृ. २९-३४.

(टीप: पु. ग. सहस्रबुद्धे यांचे समग्र वाङ्मय https://sites.google.com/site/drpgsahasrabudhevicharmanch/ इथे उपलब्ध आहे.)


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा