शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

नरोटीची उपासना

धर्मभ्रष्ट म्हणजे काय?

पन्नास पाउणशे वर्षांपूर्वी इंग्रजी विद्येचा आपल्या देशात प्रसार होऊ लागला आणि त्यामुळे नवे आचारविचार सुरू झाले. त्यावेळी धर्म बुडाला, आता कलियुग आले, विनाशकाल जवळ आला असे उद्गार सर्वत्र सनातनी लोकांच्या तोंडून ऐकू येऊ लागले. घरोघरी आईबाप आपली मुले धर्मभ्रष्ट झाली - त्यावेळच्या भाषेत सुधारक झाली, असे म्हणू लागले होते. त्यावेळी मुले धर्मभ्रष्ट झाली म्हणजे काय झाले, असे जर त्यांना कोणी विचारले असते तर त्यांनी काय उत्तर दिले असते? विश्वनाथ नारायण मंडलिक, दादोबा पांडुरंग यांच्या चरित्रांत ही उत्तरे सापडतात. अमक्या दिवशी हजामत करणे निषिद्ध असताना ती केली, अमक्या वारी अमुक खायचे नसताना खाल्ले, घेर्‍याचा आकार कमी केला, एकादशीला बटाटे, रताळी हे खाण्याऐवजी मुळे, गवारी, गहू हे खाल्ले, अशा प्रकारच्या या तक्रारी होत्या. धर्म म्हणजे मानसिक उन्नती आहे, धर्म म्हणजे हृदयाचा, सद्गुणांचा विकास आहे, असे कोणाच्याही मनात आले नाही. धर्म म्हणजे संयम, निग्रह, भूतदया, परमेश्वरावरील श्रद्धा, सत्यनिष्ठा, दया, क्षमा, शांती, विद्येचा अभिलाष, स्वत्वाचा अभिमान असे अर्थच त्यावेळी कोणी केले नाहीत. जडदेहाच्या संस्कारापलीकडे धर्म म्हणजे काही आहे अशी या जनांची समजूत असती तर त्यांनी आपला मुलगा निग्रही नाही, दयाशून्य आहे, स्वत्वशून्य झाला आहे अशा तक्रारी केल्या असत्या. पण त्या काळच्या वाङमयात अशा तक्रारी सापडत नाहीत. धर्म म्हणजे केवळ जड आचार, त्याचा मनाशी, संस्कृतीशी काही एक संबंध नाही, इतक्या विपरीत टोकाला काही जनांची बुद्धी गेल्याची साक्ष संस्कृतात आहे. एकादशीचे महत्त्व सांगताना –

वरं हि मातृगमनं वरं गोमांसभक्षणम्
ब्रह्महत्त्या, सुरापानं, एकादश्यां न भोजनम्|

असे कालतरंगिणीकाराने म्हटले आहे. जगातील अत्यंत भयानक व किळसवाणी अशी पापे केली तरी चालतील, पण एकादशीला जेवलेले चालणार नाही, असा त्याचा अभिप्राय आहे. आणि जेवणे याचा अर्थ भातभाकरी खाणे! बटाटे, साबुदाणे इत्यादी पदार्थ खाणे हे भोजन नव्हे. जड, शारीर आचाराला, धर्माच्या बाह्य स्वरूपाला माणसे किती महत्त्व देऊ लागली होती आणि तसे करताना त्यांची बुद्धी किती बहकली होती, किती पतित झाली होती ते यावरून कळून येईल.

कोणत्याही समाजाच्या र्‍हासकाळाचे हे प्रधान लक्षण आहे. या काळी तो समाज मूलतत्त्वांपासून लांब जाऊन जडाचा उपासक बनतो. बहुतेक सर्व तत्त्वे, संस्था, निष्ठा या प्रथम मानवाच्या कल्याणासाठी निर्माण झालेल्या असतात. सर्व मानवांना इहलोकीची व परलोकीची सुखे मिळावीत, त्यांच्यात प्रेमभाव नांदावा, समाजाचे रक्षण व्हावे, त्यात समता, बंधुता, स्वातंत्र्य ही नांदावीत, प्रत्येकाला उन्नतीला अवसर मिळावा इत्यादी अनेक हेतू प्रवर्तकाच्या मनात असतात. त्यासाठी तो काही सिद्धांत सांगतो, एखादी संस्था किंवा मठ स्थापन करतो, काही आचार आवश्यक म्हणून सांगतो आणि प्रारंभीच्या काळात तो अंतिम हेतू लोकांच्या मनात असेपर्यंत त्या संस्थेचा कारभार व लोकांचे आचार यांना अर्थ असतो. पण पुढे पुढे मूळ हेतू हा जो आत्मा तो नाहीसा होऊन केवळ कलेवर शिल्लक राहते. ते कुजू लागले तरी लोक त्यालाच लोभावलेले असतात. आणि मग त्याच्या दुर्गंधीने, त्यातील जंतूंमुळे समाजपुरुषाचा नाश होतो.

माझे चिंतन

तत्त्वांना जडरूप

पण माणसाच्या मनाची ही ठेवणच होऊन बसली आहे. आपल्या कृती व त्यामागील प्रेरक हेतू यांच्यांत विसंगती निर्माण होत नाही ना, हे पाहणे त्याला नको असते. त्याची दगदग त्याला झेपत नाही. नित्य जागरूक राहणे ही फिकीर त्याला सोसत नाही. सामान्य जणांना ही नाहीच सोसत, पण समाजधुरीणही तिचा कंटाळा करतात. किंवा ती सोसण्याची ऐपत त्यांच्या ठायीही नसते. म्हणून ते थोर तत्त्वांना जडरूप देतात आणि तोच खरा धर्म असे स्वत:च्या मनाचे समाधान करतात. अकबराच्या स्वार्‍यांमुळे राणा प्रतापसिंहजी यांना चितोड सोडून रानोमाळ भटकावे लागत होते आणि अखेर चितोड परत घेण्याची त्यांची आकांक्षा तृप्त न होताच त्यांना कालवश व्हावे लागले. त्यावेळी त्यांचे अनुयायी, त्यांचे वारस, वंशज यांनी प्रतिज्ञा केली की चितोड परत मिळेपर्यंत आम्ही गवतावर निजू, गादीवर निजणार नाही; पानावर जेवू, चांदीच्या ताटात जेवणार नाही. पुढे ही घोर प्रतिज्ञा पार पाडण्याचे सामर्थ्य त्यांच्या वंशजांत राहिले नाही आणि प्रतिज्ञा पार पाडीपर्यंत ते बिकट व्रत सांभाळण्याचा कणखरपणा, ती तीव्र निष्ठा त्यांच्या ठायी नव्हती. तेव्हा त्यांनी त्या निष्ठेला जडरूप दिले. ते मांडलिक म्हणून चितोडला परत आले, सुखासीन झाले, गादीवर निजू लागले, चांदीच्या, सोन्याच्या ताटात जेवू लागले; पण त्यांनी व्रतही चालविले. म्हणजे काय केले? मऊ परांच्या गादीखाली ते थोडेसे गवतघालून ठेवीत व मग निजत आणि सोन्याच्या ताटाखाली एक वडाचे पान ठेवून मग जेवीत. अशा तर्‍हेने गवतावर निजू व पानावर जेवू ही व्रते त्यांनी अखंड आचरिली. नरोटीची उपासना ती हीच. त्या व्रतांतला स्वाभिमान, त्याग, तेज हा आत्मा नष्ट झाला होता. ते श्रीफल राणाजींच्या प्राणज्योतीबरोबरच अंतर्धान पावले होते. फक्त शब्द राहिले होते. व्रताची यांत्रिक कृती उरली होती. कलेवर शिल्लक होते. पण आपण प्रतिज्ञेचे पालन करीत आहोत, आपण तिच्याशी द्रोह केलेला नाही, ही त्या वंशजांची श्रद्धा तरीसुद्धा कायम होती.

मनुष्याच्या मनाचे हे जे दौर्बल्य, सत्त्वापासून, स्वधर्मापासून च्युत होऊन जडाची उपासना करीत असतानाही आपण धर्माचीच उपासना करीत आहोत असे समाधान मानण्याची ही वृत्ती अर्वाचीन काळी कमी झाली आहे असे मुळीच नाही. मार्क्सवाद, लोकसत्ता हे जे नवे युगधर्म त्याने स्वीकारले आहेत, त्यांचे प्रतिपालनही तो याच सनातन पद्धतीने करीत आहे.

मार्क्सवादाचे जडरूप

भांडवलशाही नको असे मार्क्स का म्हणाला? अल्पसंख्यांच्या हाती सर्व धन एकवटते आणि मग ते त्याच्या जोरावर सत्ता काबीज करून इतरांना छळतात, नागवितात म्हणून. रशियाने मार्क्सवाद स्वीकारला. भांडवलदार, जमीनदार नष्ट केले. पण सर्व धन पुन्हा सत्ताधारी अल्पसंख्यांच्या हातीच आणून ठेविले. पूर्वी भांडवलदारांचे राजसत्तेवर वर्चस्व असे, पण ते दूरत: अप्रत्यक्षपणे असे, आता सत्ता व धन एकाच अल्पसंख्य गटाच्या हाती देऊन रशियाने जास्तच भयानक परिस्थिती निर्माण केली आहे. भांडवलदार नष्ट केल्यानंतर सैन्य, पोलीस, तुरुंग ही चोवीस तासांच्या आत नाहीशी केली पाहिजेत, कारण यांच्याच बळावर सत्ताधारी लोक नागरिकांना छळत असतात, ही मार्क्सची पहिली अट रशियाच्या धुरीणांनी दृष्टीआड केली आहे. मार्क्स म्हणाला की भांडवलशाही नष्ट केल्यावर कामगारांचे राज्य झाले पाहिजे. सर्व दलितांच्या व्यक्तिमत्वविकासाला अवसर मिळावा, जीवनाची, उत्कर्षाची किमान साधने सर्वांना सुलभ व्हावी, हा त्याचा तसे सांगण्याचा हेतू होता. रशियात ‘कामगारांचे राज्य’ या घोषणा चालू आहेत; कामगारांना मतदानाचा अधिकार दिला आहे. पण कारखाने व एकंदर कारभार यांचे नियंत्रण सरकारने नेमलेल्या अधिकार्‍यांकडे देऊन, सर्व सुलतानी अधिकार त्यांच्याकडे सुपूर्त करून या कामगारराज्याचा हेतू विफल करून टाकला आहे. राजसत्तेचे अधिकार राहोच, साधा संप करण्याचा अधिकारही कामगारांना नाही. त्यांना फक्त स्टॅलिनचा जयजयकार करण्याचा व परदेशी प्रवाशांच्या पुढे आपल्या सुखाचे प्रदर्शन मांडण्याचा अधिकार आहे. मार्क्सवादाचे पालन ते हेच.

मार्क्सवादात क्रांती, उत्पात, स्फोट, विध्वंस यांना फार महत्त्व आहे. विरोधविकासवाद हे या धर्मातील आदितत्त्व आहे. जगाची प्रगती साध्या विकासपद्धतीने न होता दर वेळी संघर्ष, द्वन्द्व, उत्पात होऊन त्यातून प्रगती होते, असे मार्क्सधर्म सांगतो. यातील जगाची प्रगती हा आत्मा काढून टाकून विध्वंस, अत्याचार, दंगेखोरी, बेदिली, फूट एवढ्याचा मात्र कम्युनिस्ट लोक दर ठिकाणी, जुन्या काळच्या शाक्तपंथीयांप्रमाणे आश्रय करतात. गेल्या २५ वर्षांत फ्रान्स, जर्मनी, इटली, झेकोस्लोव्हाकिया, पोलंड या देशांत दुही माजविणे, फूट पाडणे, अत्याचार करणे, दंगल माजविणे हा उद्योग त्यांनी चालविला आहे. त्यामुळे त्या देशांची कसलीही प्रगती न होता ते देश दुबळे होऊन बसले आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत. या अत्याचारांनी आपण मार्क्सवादाचेच प्रतिपालन करीत आहो, अशी मार्क्सवाद्यांची श्रद्धा आहे.

धर्म ही अफू आहे, असे कार्ल मार्क्सने सांगून टाकले होते. परलोक, पुनर्जन्म, स्वर्ग या कल्पनांच्या नादी लोकांना लावून त्यांच्यावर होणार्‍या जुलुमाचा त्यांना विसर पाडणे, प्रतिकाराची त्यांची बुद्धी बधिर करून टाकणे, ही कामे धर्माने केल्यामुळे त्याने तसे उद्गार काढले होते. काल्पनिक सुखाच्या विलोभनाने लोकांची मने बेहोश करून टाकून त्यांना वस्तुस्थितीचा विसर पाडणे, हे पातक आहे, असा मार्क्सच्या विधानाचा आशय आहे. तो आशय सोव्हियेट नेते विसरले आहेत, एवढेच नव्हे तर त्यांनी मार्क्सधर्मालाच अफूचे स्वरूप दिले आहे. स्टॅलिनचे ते परमेश्वराप्रमाणे गुणगान करतात. तो पृथ्वीवरच स्वर्ग आणून देणार आहे, कामगारांचे नंदनवन निर्माण करणार आहे, अशी आश्वासने ते देतात. काही वर्षांनी रशियात विपुल, अतिविपुल समृद्धी निर्माण होणार आहे, प्रत्येकाला त्याच्या सगळ्या गरजा पुरविता येतील इतके धन आम्ही लवकरच देऊ, अशी ते अभिवचने देतात. या कल्पनासृष्टीत रशियन कामगार गुंग आहे. या सध्याच्या जगात सारखे विषप्रयोग व अन्यायी खटले चालू आहेत. कोटी दीडकोटी कामगारांना मजूरवाड्यात, सैबेरियात गुलामापेक्षाही हीन जिणे जगावे लागत आहे. या घोर परिस्थितीचा त्यांना विसर पडावा यासाठीच ही योजना आहे.

शासनसंस्थेचा विलय, कामगारांचे नेतृत्व, जगातील कामगारांची संघटना, स्त्रीचे दास्यविमोचन, व्यक्तीचे आर्थिक स्वातंत्र्य, आंतरराष्ट्रीयता या प्रत्येक तत्त्वाच्या बाबतीत सोव्हियेट रशियाने नरोटीची उपासना चालविली आहे. त्यातील श्रीफल नष्ट झाले आहे; त्यानेच ते नष्ट केले आहे. आणि मुसलमानांच्या राज्यविस्तारासाठी, हिंदुराज्यांच्या विनाशासाठी तनमनधन अर्पण केले तरी तो हिंदुधर्माशी द्रोह होत नाही, ही ज्याप्रमाणे येथील समाजधुरीणांची श्रद्धा होती, त्याचप्रमाणे मानवाचे व्यक्तित्व, त्याचे सुख, त्याची उन्नती, त्याचे सर्व क्षेत्रांतील स्वातंत्र्य यांना पदोपदी हरताळ फासूनही आपण मार्क्सधर्माशी द्रोह करीत नाही, अशी सोव्हियेट धुरीणांची अचल श्रद्धा आहे. मार्क्सवादाचा सांगाडा, त्याचे जडस्वरूप याला ते बिलगून बसले आहेत. आज त्यांनी जाणूनबुजूनच हे चालविले आहे. कालांतराने लोकांच्या ते अंगवळणी पडेल आणि खरा मार्क्सधर्म तो हाच, असे त्यांना वाटू लागेल. गादीवर निजायचे व थोडे गवत गादीखाली ठेवायचे, ताटात जेवायचे पण एक पान खाली ठेवायचे, एवढे केले की राणाजींच्या मृत्युसमयी केलेल्या प्रतिज्ञांचे पालन केल्याचे पुण्य मिळते ही जशी रजपूत राजांची श्रद्धा होती, त्याप्रमाणे शासनयंत्र पूर्ण जोरात चालवायचे, पण त्याच्या खाली एखादा कामगार उभा करायचा, म्हणजे शासनसंस्थेचा नाश केल्याचे पुण्य मिळते, अशी कार्ल मार्क्सच्या अनुयायांची दृढ, अढळ श्रद्धा आहे.

जिवंत तत्त्वाला जडरूप देऊन त्याचीच उपासना करीत बसायचे आणि अशा रीतीने त्याचा मूलहेतू विफल करून टाकायचा, या मानवाच्या वृत्तीमुळेच जगात आजपर्यंत अनेक थोर महात्मे जगदुद्धाराच्या प्रयत्नात खर्ची पडूनही जग आहे तेथेच आहे. बुद्धाची अहिंसा, जीझसची दया, महात्माजींचे सत्य या प्रत्येकाची मानवाने अशी दशा करून टाकली आहे. आज जेथे मार्क्सवाद नाही तेथे लोकशाहीची उपासना चालू आहे. पण तेथेही पद्धत हीच आहे. बाह्यरूपाविषयी माणसे पराकाष्ठेची दक्षता दाखवितात, अंतरात्म्याची त्यांना काळजी नसते; इतकेच नव्हे तर त्यांना त्याची दखलही नसते. जड सांगाडा म्हणजे लोकशाही अशी त्यांची श्रद्धा असते. निवडणुका, मतदान, लोकसभा, अध्यक्ष, उपाध्यक्ष, पॉइंट ऑफ ऑर्डर, कोरम, सभासदांचे हक्क, मतमोजणी यांविषयी लोक जसे दक्ष असतात, तसे सर्व राष्ट्राची जबाबदारी प्रत्येकाने घेणे, समाजहितासाठी अंग झिजविणे, आपणच केलेल्या कायद्याचे पालन करणे, सार्वजनिक कारभार निर्मळ राखणे, बुद्धिवादाची जोपासना करणे, प्रत्येकाच्या कर्तृत्वाचा विकास करण्याचा प्रयत्न करणे - इत्यादींविषयी मुळीच नसतात. लोकशाहीच्या धर्माच्या उपासनेत यांचा अंतर्भाव होतो हे त्यांना पटतच नसते. म्युनिसिपालिटीच्या खताच्या गाड्या आपल्या शेतात नेणे, जकात न देता गावात माल आणणे, प्राप्तीवरील कर चुकविणे, आपल्या घराच्या सोयीने रस्ते करणे, पब्लिक सर्व्हिस कमिशनचे आदेश धुडकावून आपल्याच पित्त्यांची वर्णी लावणे, जातीयवादाला चिथावून निवडणुका लढविणे हे आचार करणार्‍यांना ‘तुम्ही लोकशाहीशी द्रोह करीत आहात’, असे जर कोणी म्हटले, तर ते मिर्झा राजांप्रमाणेच चकित होतील. आपण मतदान केले आहे, निवडणुका लढविल्या आहेत, लोकसभेत भाषणे केली आहेत इत्यादी आपल्या आचारांकडे बोट दाखवून आपली लोकशाहीवरील श्रद्धा ते क्षणार्धात सिद्ध करतील.

- oOo -

पुस्तक: ’माझे चिंतन’
लेखक: पु. ग. सहस्रबुद्धे
प्रकाशक: कॉन्टिनेन्टल प्रकाशन
आवृत्ती दुसरी, चौथे पुनर्मुद्रण (२००१)
पृ. १८-२४.

(टीप: पु. ग. सहस्रबुद्धे यांचे समग्र वाङ्मय https://sites.google.com/site/drpgsahasrabudhevicharmanch/ इथे उपलब्ध आहे.)


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा