रविवार, २० ऑक्टोबर, २०१९

देहसूक्त

...खाली गर्दी वाढल्याने होणारा आवाज त्याला अस्पष्टपणे ऐकू येऊ लागला व तो उठून खाली येण्यासाठी निघाला. काही अंतरावर सारा वेळ उभे असलेले सेवक तत्परतेने त्याच्या समोर निघाले. लाल गरुड खाली आला व त्याच्यासाठी अंथरलेल्या चादरीवर बसताना आपला बेडौलपणा इतरांच्या ध्यानात येणार नाही, अशा त-हेने अंग उतरवून तो प्रशस्तपणे बसला.

काजळमाया

जेथे खडकातील घरांचे थर सुरू होत होते, तेथे पायथ्याशी सपाट पटांगणावर वर्तुळाकार आग पेटवली होती, तिच्यापासून काही अंतरावर, सर्वांग काळे रंगवलेल्या आणि अस्वलांची केसाळ कातडी पायाभोषती गुंडाळलेल्या पुरुषांचे आणखी एक वर्तुळ तयार झाले होते. जाळाच्या वर्तुळाच्या मध्यभागी गवताच्या उशीवर आरशाचा एक तुकडा ठेवला होता. कोणत्याही पवित्र नृत्यात स्त्रियांना स्थान नव्हते, त्यामुळे त्या गर्दीगर्दीने घरांच्या पसरट छपरांवर बसल्या होत्या. सारी तयारी आहे की नाही हे पाहाण्यासाठी लाल गरुडाने सर्वत्र नजर फिरवली. सूर्य आता तिरपा झाला होता व त्याच्या प्रकाशाचा एक किरण आरशामधून निघून समोरच्या कोरीव गोत्रस्तंभावर पडला होता. लाल गरुडाने समाधानाने मान हलवली व लांब डोणीप्रमाणे वाटणार्‍या नगार्‍याजवळ जय्यत तयार असलेल्या तिघांना खूण केली.

त्याबरोबर त्यांच्या हातातील टिपर्‍या संथपणे ताणलेल्या कातड्यावर नाचू लागल्या व त्या घुमणार्‍या आवाजाला मध्येच कातड्यावर पडणार्‍या पालथ्या हाताच्या थापेने वजन मिळू लागले. काळ्या वर्तुळात उभे असलेले माणसांचे कडे हळूहळू जाळाभोवती फिरू लागले. काही वेळाने नगाऱ्याच्या ददम-ददम-ददमची लय वाढू लागताच काळी माणसे हळूहळू ओणवी झाली व त्यांच्यामधील अंतर कमी होऊन, ती एकाच सापाचे मणके असल्याप्रमाणे दिसू लागली. त्यांचे पाय विलक्षण जलद गतीने हलू लागले व मध्येच निघणार्‍या दीर्घ आरोळ्यांमुळे, आरशातील सूर्यावर अदृश्य भाले फेकले जात आहेत असा भास होऊ लागला. आता त्यांचे वर्तुळ आकसून अगदी जाळाच्या जवळ आाले होते आणि अग्निच्या हावर्‍या जिभांना संधी मिळताच अस्वलांच्या कातडीवरील केस होरपळू लागले होते. आता नगार्‍याचे बोल बदलले. एक वादक टिपरी आदळण्याऐवजी ती कातड्यावर खरडू लागला व त्यामुळे ते पटांगण कंपित झाल्याप्रमाणे होऊ लागले. आता मुख्य नर्तकाने एक भीषण कर्कश आवाज केला व जाळाच्या रेषेवरून उडी मारून तो आत आरशाजवळ आला. परंतु त्याचे सहकारी त्याच वेगाने जास्त जवळ आले व पाहातापाहाता त्यांच्या बेभान पायांनी जाळ विसकटून त्यातून ठिणग्यांची लहान लहान कारंजी उडू लागली. त्यांची कृष्णरेषा विलक्षण वेगवान गतीने जाळामधून फिरत असता त्याच्या लवलवत्या' जिभा ग्रहबिंबाभोवतालच्या अग्निकंकणाप्रमाणे दिसू लागल्या. दूर छपरावर बसलेल्या स्त्रिया आता जागच्या जागीच डोलू लागल्या व शोकगीतासारखा दीर्घ आवाज करू लागल्या. आरशाजवळ आलेल्या मुख्य नर्तकाचे डोळे आता पेटल्यासारखे झाले आणि त्याचे सर्वांग ओल्या काळ्या संगमरवराप्रमाणे चकाकू लागले. तो जागच्या जागी फिरत झपाटलेल्या उड्या घेऊ लागला. त्याने मग एकदम आरशात पाहिले, नृत्याच्या धुंदीने आधीच परके झालेले डोळे सूर्याच्या तेजाने झक्कन दिपले. त्याच्यातून तलवारीच्या धारेप्रमाणे वाटणारी आवेशपूर्ण गर्जना ऐकू आली व दुसऱ्याच क्षणी त्याची उडी आरशावर पडून त्याची पावले फुटलेल्या आरशाचे तुकडे चिरडू लागली. त्याच्या पायांतून रक्त वाहू लागले व तेथे ठेवलेले वाळलेले गवत जखमी झाल्यासारखे दिसू लागले. गोत्र स्तंभावरील कवडसा नाहीसा झाला, आरशात बंदिवान करून ठेवलेला सूर्य भग्न झाला आणि मग विसकटून विझवल्यामुळे त्याचा तापदेखील नष्ट झाला. नगार्‍याची लय कमी झाली व थोड्याच वेळात तो श्रांत झाल्याप्रमाणे संथपणे घुमू लागला. वर्तुळात नाचलेले नर्तक पिळून टाकल्याप्रमाणे जागीच अवजड सावल्यांसारखे पसरले. स्तब्धपणे सारे पाहात असलेल्या भोवतालच्या गर्दीतून काही माणसे पुढे धावली व त्यांनी त्या निश्चल काळ्या आकृती उचलून नेल्या. इतरांनी अस्ताव्यस्त उधळलेल्या जाळाच्या खुणा गोळा केल्या, आणि फुंकर मारल्याप्रमाणे नाहीशी होऊन ती पुन्हा भोवतालच्या गर्दीत एक झाली.

तापदायक सूर्याचा भंग केल्यावर आता पावसाला आळवण्यासाठी पर्जन्यनृत्याची तयारी झाली होती.

इतका वेळ ताणलेल्या अंगाने उभे असलेले, लाल रंग अंग रंगवून घेतलेले डौलदार बांध्याचे दहा पुरुष आता पुढे झाले. त्यांच्या मागोमाग त्यांच्याच छाया असल्याप्रमाणे वाटणारे, अर्धे काळे, अर्धे लाल असे अंग रंगवलेले आणखी दहा नर्तक आले व एकेका लाल आकृतीशेजारी उमे राहिले. त्याच्या हातात एकेक कुंचला होता आणि पायांत किसलेल्या आवाजासारखा सुरेख बारीक नाद करणारे घुंगूर होते.  पर्जन्यनृत्याचा नायक इतका वेळ जोडलेल्या दोन बैल-कातड्यांनी अंग झाकून उभा होता. त्याने आता अंग हलवून ते सैल आवरण मागे टाकले व तो धावत येऊन मध्यभागी उभा राहिला. तेथे जमलेल्या पैकी प्रत्येकाने पूर्वी एकदा तरी पर्जन्यनृत्य पाहिले होते, पण त्या दृश्याची सुरुवात पुन्हा पाहाताच त्यांच्यात एक तार एकदन खेचली गेल्याप्रमाणे झाले व त्यांची मने मोहरून गेली.

नृत्यनायकावर त्यांच्या नजरा विशेष खिळल्या, कारण कधीतरी नृत्यनायक म्हणून आपली निवड व्हावी, हे तेथील प्रत्येक तरुणाचे एक स्वप्न होते. तो एक दुर्मिळ मान होता. समोरासमोर दोन वैर्‍यांना कंठस्नान घातले असल्याखेरीज या नृत्यात कोणालाही भागच घेता येत नसे. विशेष म्हणजे नृत्यानंतर नायकाला एक रात्र प्रमुखाचा मुकुट प्राप्त होत असे. आता समोर उभा असलेला नृत्यनायक इतरांपेक्षा हातभर उंच होता, आणि सहा वैर्‍यांचा नाश केल्याच्या खुणा म्हणून त्याच्या डाव्या दंडावर आडव्या डागलेल्या सहा रेषा होत्या. त्याची छाती लाल मैदानाप्रमाणे विस्तीर्ण होती व त्याने नुसता हात हलवताच दंडातील स्नायू उतावीळ रानघोड्याप्रमाणे उसळी घेत होते. त्याने अंगावर वळत वळत जाणारे पट्टे ओढले होते व त्याच्या डोक्यावर गरुडाची पूर्णाकृती होती. त्याच्या भव्य रूपाकडे पाहाताच सगळ्यांचा ऊर अभिमानाने भरून आला व त्यांनी मोठ्याने जयजयकार केला- "पश्चिम वारा! पश्चिम वारा !!"

तो अर्धवर्तुळात येऊन उभा राहाताच, इतका वेळ छपरावर खिळून बसलेल्या सगळ्या स्त्रिया झाडून टाकल्याप्रमाणे आत गेल्या, आणि घरांच्या चौकोनांवर पडद्याप्रमाणे कातडी टांगली गेली. स्त्रीची नुसती नजर पडली तरी पर्जन्यनृत्य विटाळले जाते, आणि मग तीन वर्षे पाऊस येत नाही, हा तेथील अत्यंत प्राचीन विश्वास होता.

आता पुन्हा आडवा नगारा घुमु लागला व नायकामागील अर्धवर्तुळातील नर्तकांचे पाय हळू हळू हलू लागले. मग सेवकांनी वेताचे दहा पेटारे आणले आणि ते त्यांनी उघडताच तिथल्या मऊ मातीवर दहा घुंगरे नाग वळशावळशांनी बाहेर पडले, ते बाहेर पडताच दहा लाल नर्तकांनी पटकन वाकून त्यांच्या तोंडाजवळ बोटे दाबून त्यांना उचलले व रिकामा हात वर करून त्यांनी फुटक्या आरशाभोवती फेर धरला. नागांच्या शेपट्या त्यांच्या हाताभोवती गुंडाळत, पुन्हा उलगडून दुसऱ्या बाजूने पुन्हा वेटाळत आणि त्यांच्या शेपटीतील हाडांच्या घंटा भीषण, विचित्र घुंगराप्रमाणे वाजत. वर्तुळाची एक फेरी झाली की त्यांची बोटे आणखी सरकत व नाग जास्त लांबीने तोंड फिरवत. त्यांनी दंश करण्यासाठी त्वेषाने तोंड मागे वळवताच कुंचले घेतलेले नर्तक कुंचला हलवून त्यांना बुजवून मागे वळवत. पण या सार्‍यात लाल नर्तकांचे नृत्य थांबले नाही की त्यांच्या सहकार्‍यांचा समतोल चुकला नाही.

मग आणखी एक पेटारा आला. हा काळ्या रंगाने रंगवला असून जास्त मजबूत होता. सेवकाने तो खाली ठेवला, पण न उघडताच तो बाजूला सरला. नायक धीमेपणाने पुढे आला व त्याने गुडघे टेकले. त्याक्षणी सगळ्यांचे डोळे ताणल्यासारखे झाले व श्वासदेखील रोखले गेले. फक्त नगाऱ्याचा घुमार आवाज अविरतपणे चालू होता. पर्नन्यनृत्यातील हा अत्यंत जोखमीचा क्षण होता व तो दुरून पाहाणाऱ्यांच्या अंगावरसुद्धा शहारे येत. या पेटाऱ्यातील नाग दोन दिवस उपाशी ठेवलेला असून नृत्याआधी तासभर त्याला काडीने सतत डिवचण्यात येत असे. आणि नृत्यासाठी या नागास नायकाने आत हात घालून बाहेर काढावे लागे. पहिल्याच प्रयत्नात जर नागाचे तोंड बोटात सापडले नाही, तर आपणास एक बोट तरी कोयत्याने तात्काळ तोडावे लागेल किंवा तासाभराच्या आत्यंतिक वेदनेनंतर आयुष्य तरी संपवावे लागेल, याची प्रत्येक नायकाला पूर्ण जाणीव असे.

नायकाने हात बाहेर काढताच त्याच्या हातात जवळजवळ त्याच्याच उंचीची, त्याच्या दंडाएवढ्या जाडीचा नाग होता, हे पाहून पुन्हा पुन्हा गर्जना झाली, "पश्चिम वारा! पश्चिम वारा !!" नायकाच्या चेहऱ्यावरील ही ताण कमी झाला. कपाळावर ताठलेली रेषा निवाल्यासारखी झाली. नागाला सतत डिवचत गेल्यामुळे त्याची शेपटी चाबकाप्रमाणे भिरभिरत होती आणि भोवर्‍याच्या नादाप्रमाणे तिचा आवाज होत होता. इतर नर्तक नाग तोंडाजवळ पकडून मग उतरत खाली सरकले, पण नायकाने आपला नाग शेपटीजवळ उचलला. एकदम अधांतरी होताच नागाने अंग वळवले व तोंड वासून अर्धचंद्राकार सुळे घेऊन तो त्वेषाने नायकाकडे वळला. पण नायकाने डाव्या हातातील छडीने त्याला सहज बाजूला केले व चटकन नागाची शेपटी दातात धरली. नृत्याची गती वाढत चालली. लालकाळ्या आकृती जोडीजोडीने भिरभिरू लागल्या व त्यांची बोटे सरकत शेपटीकडे येऊ लागताच, नागांच्या झेपा जास्त विस्तृत व संतप्त होऊ लागल्या. नायकाच्या तोंडातील साप सरकत गेला व त्याचे दात नागाच्या डोक्याजवळ येताच, त्याच्या धुंद डोळ्यांना सापाचे डोळे झगझगीत जिवंत मण्यांसारखे दिसू लागले. नगार्‍याचा आवाज असा जलद होऊ लागला की, वादकांच्या हातातील टिपर्‍या स्पष्ट न दिसता ओलसर थेंब सारवल्याप्रमाणे दिसू लागल्या. नायकाच्या नागाने संतापाने तोंड उघडले व त्याच्या गळ्याभोवती वेटोळे टाकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने चलाखीने शेपटीचे टोक हातात पकडले व दोनतीन वेटोळी हाताभोवती गुंडाळून त्याने नागाची एक रेषा केली, आणि एक जिवंत विषारी बासरी वाजवत असल्याप्रमाणे तो जागच्या जागी गोल फिरू लागला. नगार्‍याचे बोल बदलले. इतर टिपर्‍या संथ झाल्या, पण एक झगझगीत सुरी म्यानातून निघाल्याप्रमाणे त्यांच्या दबलेल्या आवाजातून उरलेल्या एकाच टिपरीचा खडा बोल स्पष्टपणे ऐक येऊ लागला, आणि तोही काही काळाने अखेरचा उग्र आघात देऊन स्तब्ध झाला.

त्या क्षणी नायकाच्या चेहऱ्याचे स्नायू आवळले गेले व त्याचे दात नागाच्या मानेत रुतताच तेथून उरलेले अंग एकदम मोडल्याप्रमाणे निर्जीव दुबळे झाले. नायकाने मृत नाग आरशाच्या तुकड्यांवर टाकला, तेव्हा एका सेवकाने मातीच्या परातीतून निखारे आणले आणि गवतावर टाकले. थोड्याच वेळात तेथून काळसर धूर पसरला व गवताच्या काड्या झळाळू लागल्या. आता बोटांत नुसती शेपटी धरून नाचत असलेल्या नर्तकांनी आपापले नाग जमिनीवर टाकले. भोवतालच्या लोकांपैकी काहीजण पुढे धावले व त्यांनी त्या सगळ्या नागांवर मक्याचे पीठ उधळले व पाहाता पाहाता त्यांना चटकन उचलून ते दरीकडे धावले. तेथे त्यांनी अगदी कडेला उभे राहून सारे नाग एकामागोमाग दरीत फेकून दिले. ते अंग वळवत खालच्या गर्द दरीत नाहीसे होत असता, एखाद्या भीषण राक्षसिणीने केस झाडताच त्यांतील गुंतवळ एकेक केसाने वार्‍यावर उडावी, त्याप्रमाणे वाटले. शेवटचा नाग खालच्या गडद हिरव्या अंधारात बुडाल्यावर त्यांनी प्रार्थना केली :

"हे पर्जन्या आम्ही सूर्य भग्न केला आहे आणि त्याचा दाह आम्ही पायांनी विसकटला आहे.
"आता तुझे आगमन होवो.
"हे पर्जन्या ! आम्ही पृथ्वीतील विष नाहीसे केले आहे, हे तुला आम्ही पाठवलेले बंदी आक्रंदून सांगतील. आता वृक्षांच्या मुळांना विषरहित पाणी प्राप्त होऊ दे, सर्वत्र गवत उगवू दे, आणि त्यात जनावरे मुक्तपणे हिंडू देत.
"हे पर्जन्या ! आता तुझे आगमन होवो ।

- oOo -

पुस्तक: काजळमाया
लेखक: जी. ए. कुलकर्णी
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती सहावी, दुसरे पुनर्मुद्रण (२००७)
१९१-१९५.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा