डॉन पाय ओढत उपदेशकाकडे आला व त्याच्यासमोर काही अंतरावर बसला, उपदेशकाचा चेहरा जुन्या मधाप्रमाणे होता. त्यावर दिसत असलेले स्मित डॉनला पाहताच जास्तच उमलले.
"मी आपणस तसदी देत नाही ना !" डॉनने अवघडलेल्या संकोची आवाजात विचारले. ’बिलकूल नाही, उलट तुला जर माझ्याशी बोलण्यात आनंद वाटत असेल तर मला धन्य वाटेल. मी येथे चिंतनासाठीच आलो होतो, आणि माणूस समोर असता तर माझे चिंतन जास्तच सहज होते. सुदैवाने मला परमज्ञान प्राप्त साले आहे. त्यापैकी एक अंश जरी मला इतरांना देता आला तर मला बरेच वाटेल, " उपदेशक म्हणाला.
डॉन थोडा वेळ स्तब्ध राहिला. सारे आयुष्य ज्यासाठी फेकून दिले ते सारे थोड्या शब्दात कसे सांगायचे हे त्याला समजेना, त्याने प्रयत्न करत न्हटले, " मी अगदी आडगावचा माणूस आहे. मला तलवार कधी कौशल्याने वापरता आली नाही. मग शब्द काय वापरता देणार? आणि आता तर माझ्यासारखा मूर्ख माणूस सार्या जगात असणार नाही, असेही वाटू सागले आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारू का? माझे प्रश्न वेडगळ असतील, त्यांची उत्तरे द्यावीत असे तुम्हांला वाटणार नाही, कदाचित उत्तरे देताही येणार नाहीत. यात तुमच्या ज्ञानाचा मी अवमान करत नाही, कारण अत्यंत ज्ञानी माणसाला देखील उत्तरे देता येणार नाहीत, असे प्रश्न विचारणे एखाया मूर्खालादेखील अगदी सहज शक्य असते."
उपदेशक समजूतदारपणे हसला व म्हणाला, " पण असल्या प्रश्नांच्या सतत घर्षणाने तर ज्ञानी माणूस ज्ञानी राहू शकतो. मला उत्तरे देता आली तर मी देईन; नाहीतर तुझ्या प्रमाणे तेच प्रश्न विचारत, त्यांच्या उत्तरांचा शोध घेत मी भटकत राहीन.
"माझे आयुष्य म्हणजे जे आहे की नाही याचाच इतरांना विश्वास वाटत नाही, त्याच्या शोधात वायफळ झालेले आयुष्य आहे. निराळीच भाषा वापरत असलेल्या लोकांत मी वावरत असल्याप्रमाणे सगळीकडे माझ्या वाटल्या कुचेष्टाच आली. मी आता परत जात आहे. तेव्हा तुम्हांला काही विचारावे असे मला वाटते-"
उपदेशक शांतपणे म्हणाला, "त्या बाबतीत मी जास्त भाग्यवान ठरलो एवढेच म्हणता येईल. सुरुवातीला माझी स्थितीदेखील तुझ्यासारखीच होतो. रिती, गंजून गेलेली परंतु आता मात्र मला सदैव अविनाशी शीतल चांदण्यात असल्यासारखे वाटते. अनेक यातनातून मला सत्यज्ञानाचा साक्षात्कार झाला आणि डोळ्यांवरील सगळा सारा पुसून गेला."
"मी एकेकाळी अत्यंत मोठे वैभव भोगले आहे, पण नंतर सार्याच विलासाकडे पाठ वळवली. मी हे मोठ्या इच्छासामर्थ्याने केले असे नाही. एखादे चुकार जनावर बडवत योग्य मार्गावर आणावे त्याप्रमाणे माझ्या आयुष्यात घडले. माझी सारी गलबते नष्ट झाल्याने माझा व्यापार गेला, मी निष्कांचन झालो. मी झोपलो असता माझ्या पत्नीने होती नव्हती चीजवस्तू गोळा करून प्रयाण केले व आमचा एकुलता एक अतिअशक्त मुलगा मात्र मागे टाकला, त्याही अवस्थेत मी त्याला पाठीवर घेऊन भटकलो. पण एक दिवस तोदेखील मेला. सारी बंधने तुटलो व आयुष्य भरकटू लागले. मी जगात असतील तेवढी व्यसने केली, थोडे गुन्हे केले, थोडे उपकार केले. अंगातून हाडे बाहेर पडेपर्यन तपश्चर्या केली. एका पायावर आठ दिवस खडा राहिलो, खिळ्यांवर झोपलो; ज्यांच्या दुर्गंधाने रेड्याला वांती झाली असती असल्या रोग्यांची मी सेवा केली. पण काही केल्या आतील अंगार विझेना, उलट इतकी निरनिराळी माणसे व त्यांचे आचरण अगदी जवळून पाहिल्यावर तर आम्हा सगळ्यांचे दुःख म्हणजे भयाण शाप नसून अतिशय सैलपणेच दिलेली किरकोळ शिक्षा आहे असे मला वाटू लागले. वाटेत अनेक मोह आले, पण शेवटी सारे पडदे बाजूला सारत मी अंतिम क्षणी आलो."
"त्या क्षणी विशेष काय घडले ? " डॉनने उत्सुकतेने विचारले.
"खरे तर तो क्षण इतर क्षणांसारखाच होता. पण मी नैराश्याच्या अगदी तळाशी पोहोचलो होतो. मी एका प्रपाताशेजारी मन पिंजत बसलो होतो. तेथे एक प्रचंड खडक खाली कोसळला. हजार मेघगर्जनांसारखा आवाज सर्वत्र घुमला, आणि त्या क्षणी माझ्यात वीज कडाडून आतील सर्व अंधार स्वच्छ धुऊन टाकल्यासारखा झाला. कधी अस्त न पावणार्या सूर्याचा आत उदय झाला. रखरखलेल्या मातीत पाझर सुटून जमीन तृप्त व्हावी व हवेत गंध पसारावा तसे वाटून मी मुक्त झालो."
डॉन सारा वेळ विस्मित होऊन ऐकत होता, पण आता तो थोडा निराशच झाला. तो म्हणाला, "तुम्ही जे सांगितले ते मी पूर्वी अनेकदा ऐकले आहे. पण आपणाला जे झाले ते ज्ञान अंतिम सत्यच आहे, हे तुम्हाला कसे समजले ?"
"कशावरून म्हणजे? त्या अनुभवानंतर मनाला अतिशय सुख झाले. अंगातील सारे ताण विरून गेले."
"मग असला अनुभव कितीही तात्पुरता असला तरी मादक पेयांनीदेखील येऊ शकेल. ही शांती, हे समाधान जवळ असले की आपणापाशी सत्यज्ञान आहे हे ओळखावे अशी तुमची शिकवण. मी ज्या वेळी माझ्या शौर्याने दलितांचे रक्षण, सौदर्याचे पूजन व सदाचाराचे आचरण करण्यासाठी माझ्या खेड्यातून बाहेर पडलो, त्या वेळी माझ्यात हीच मनःशांती होती आणि मी तर ठिकठिकाणी वेडा ठरलो! आणखी एक गोष्ट मला सांगा, तुम्हाला पूर्वी कधी या सत्यज्ञानाचा अनुभव होता का?"
उपदेशक मोठ्याने हसला. "अरे, हा दिव्य अनुभव काही फळाच्या घोसाप्रमागे येत नाही. तो आयुष्यात एकदाच एकटा आला तरी माणसाने स्वतःला धन्य समजावे."
"मग माझी अडचण अशी," डॉन म्हणाला, " काही वेळा दगडात सोन्यासारखा दिसणारा एक क्षुद्र धातू सापडतो. त्याला खुळे सोने म्हणतात. लहान मुले तसले तुकडे आनंदाने जमा करतात, पण मोठी माणसे तिकडे ढुंकुनही पाहत नाहीत. कारण खरे सोने काय आहे हे त्यांना माहीत असते. पण समजा, खरे सोने अमुकच हे पूर्वी माहीत नसेल तर ते कसे ओळखायचे? तुम्हांला पूर्वी तसला अनुभव नसता हेच अंतिम ज्ञान तुम्हाला कसे जाणवले ?"
"ते समजणे तर अगदी सोपे आहे, " उपदेशक तात्त्विक हसून म्हणाला, "हा अनुभव आला की वरवर दिसणारे सगळे अनुभव गारगोटीप्रमाणे वाटू लागतात."
आता डॉन हसला व थोडे पुढे सरकत म्हणाला, "मग आताचा अनुभवदेखील क्षुद्र गारगोटी ठरणार असा नवा अनुभव तुम्हाला येणारच नाही, याची तुम्हाला खात्री आहे का? आणि तसा तुमचा विश्वास असल्यास त्याला कसला आधार आहे?"
उपदेशक चमकला, पण लगेच त्याने स्वत:ला सावरले. "तुझे म्हणणे बरोबर आहे. हेच ज्ञान अंतिम आहे हे सिद्ध करायला माझ्याजवळ पुरावा नाही. पण अत्यंत निर्विवाद पुरावा येथे असतो- आपल्या हृदयात!" उपदेशकाने नाटकी तर्हेने छातीवर हात ठेवला नि डोळे मिटून घेतले.
डॉनने एक दीर्घ निः-श्वास सोडला. तो म्हणाला, " मला वाटले होते, निदान तुमच्याजवळ तरी स्वत:च्या विकारापलीकडचा असा निर्विवाद निकष असू शकेल. समजा तुमची अंत:प्रेरणा आणि माझी अंत:प्रेरणा तितक्याच दृढ, पण विरुद्ध असतील, तर तुमची माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे ठरवायला तुमच्या स्वत:च्या शब्दापेक्षा निराळा, व्यक्तिनिरपेक्ष असा कोणता निकष आहे का? असल्यास तो मला सांगा, मी कृतज्ञ होईन. तो जर नसेल तर प्रत्येकाचे ज्ञान त्याच्यापुरते अंतिमच, असा गोंधळ उडेल आणि शेवटी अंतिम व ज्ञान या दोन्ही शब्दांनाही जळजळीत जखमांवर बांधलेल्या घाणेरड्या चिंध्यांपेक्षा जास्त अर्थ राहणार नाही."
"तसा अगदीच पुरावा नाही असे नाही," उपदेशक तुटकपणे म्हणाला. अत्यंत मूर्ख प्रश्न विचारणार्या माणसांशी बोलण्याची सवय नसल्याने त्याच्या कपाळावर आठी दिसू लागली. त्याने हात मागे करून हवेत फिरवला. तेव्हा त्या ठिकाणी सागरकाठी नारळांच्या झाडांच्या मागे वर आभाळात रेखीवपणे गेलेल्या मनोर्यांच्या इमारती दिसू लागल्या. त्या नगराचा विस्तार दूरवर पसरत जाऊन विरळ होत क्षितिजात मिळून गेला होता.
"हे भव्य नगर पाहिलेस?"तो म्हणाला. "ते एका विशाल साम्राज्याची राजधानी आहे. आणि त्या साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट माझा अनुयायी आहे. मी प्रवचन करीत असता हजारो स्त्री-पुरुष मुग्ध होऊन ऐकतात व आनंद पावतात. माझे ज्ञान खुळ्याचे सोने असते तर मोठमोठे महापंडित मासे शब्द लीनपणे ऐकत असते का? इतक्या लोकांनी माझी शिकवण स्वीकारली असती का?"
डॉनचा सारा उत्साह मावळला. तो आकसल्यासारखा झाला. अगदी असले शब्द आपण पूर्वी सॅन्कोकडून ऐकले आहेत हे त्याला आठवले. आता त्याच्या ध्यानात आणखी एक गोष्ट आली. उपदेशकाचा चेहराही सॅन्कोसारखाच होता. सॅन्कोचा जरा जास्त जाड व चिकट होता; भाजण्यापूर्वी कच्चे मडके दिसते तसा होता इतकेच. डॉनला एका गोष्टीचे नवल वाटले. पूर्ण ज्ञान झालेल्या व काहीच ज्ञान नसलेल्या दोघांवरही तसलीच कळा येते की काय? एकमेकांवर सहज बसतील अशा या चेहर्यांवर तीच नि:शंकता, आत्मतुष्टी कशी? की जेथे पाऊलवाटदेखील दिसत नाही त्या ठिकाणी सारेच चाचपडत असता एकजण दोन पावले पुढे, दुसरा दोन पावले मागे, एकाचे तत्त्वज्ञान पोटात, दुसर्याचे हृदयात असल्या गोष्टींनी फारसा फरक पडतच नाही? अंधारात आपण सगळे सारखेच; अंधारात सगळीच मांजरे काळी ?
"मी आणखी विचारतो, ते कुत्सितपणाचे समजू नका. मला खरोखरच शोध घ्यायचा आहे. त्यासाठी मी घरदार सोडले. माझ्याही वाट्याला दुःख आले व कुचेष्टा तर कपाळावरील व्रणाप्रमाणे आयुष्यभर जवळ राहिली. एवढे करून जर माझ्या प्रश्नाला उत्तर मिळाले असते तरी माझे आयुष्य सफळ झाले असते.
आता पाहा, तुमचा धर्म सत्ता व सैनिकाच्या रांगा यामुळे पसरला, तुम्हाला अनुयायी मिळाले. इतक्या लोकांनी धर्म स्वीकारला तर तो खरा, नाहीतर खोटा, हे कसले तर्कशास्त्र आहे? एके काळी नरबळीला अनुयायी होते. जिवंत माणसातून तोडून काढलेले अद्याप उष्ण असलेले हृदय सुरीच्या टोकावर खोचून ते सूर्याला अर्पण करण्याचा एक धर्म होता व त्यावर एक सामर्थ्यशाली संस्कृती आधारलेली होती. धातूच्या तप्त पुतळ्यांत दहा दिवसांची कोवळी मुले जाळणाऱ्या एका धर्माने अर्धे खंड व्यापिले होते. ते सारे धर्म गेले, नवे आले, ते बदलले आणि हत्तीच्या प्रेताप्रमाणे अजस्र निर्जीव पडून राहिले. मला अनुयायी नाहीत, माझा सेवकदेखील माझा शिष्य नाही. मला साम्राज्याचा आधार नाही, म्हणून मी मूर्ख ठरलो आणि आपण महान ज्ञानी ठरलात ! यशापलीकडे ज्ञानाला आणखी काही निकष नाहीच का?
आणखी एक गोष्ट. या अनुयायांवर फारसा भरवसा टाकू नका. अनुयायी मिळणे हा इतिहासातील केवळ एक योगायोग आहे. बहुतेक धर्मसंस्थापकांचे विचार पाहा. त्यातील अनेक विचार त्याच्याआधी कुणी ना कुणी सांगितलेच होते. पण ते सगळे सामान्य ठरले व काळाने त्यातील एकट्याचीच संस्थापक म्हणून निवड केली. ठिणगी दगडावर पडली तर विझते, ती गवतात पडली तर वणवा भडकतो. पण दोन्ही ठिकाणी ठिणगी तीच ! कुणास ठाऊक, एक हजार वर्षापूर्वी तुम्ही आपला धर्म मांडला असता तर जगाने तुम्हाला दगड मारले असते. आणखी एक हजार वर्षानी सांगता, तर गारुड्यापुढे लोकांची गर्दी जमेल पण तुमच्यासमोर क्षणभर राहायला त्यांना फुरसत मिळणार नाही. पहिल्या काही अनुयायांची गोष्ट सोडा. प्रत्येक प्रवाह उगमाजवळ स्वच्छ पारदर्शक असतोच. पण नंतरचे अनुयायी तुमच्या शिकवणीने मोहित होऊन धर्माला निकटून राहतात असे का तुम्हाला वाटते? कारण तो धर्म भेसळून क्षुद्र, अर्थहीन झाला तरी अनुयायी मात्र तसेच त्याला बिलगून राहतात. याचे एकच कारण आहे. अशा वेळी एखाद्या धर्माचे अनुयायी असणे ही डोळसपणे स्वीकारलेली कृती नसून ती एक अंगवळणी पडलेली केवळ सवय झालेली असते. आणि अशांच्या संख्येच्या आधारे तुम्ही तुमच्या ज्ञानाची पारख करता, हे सगळे विचित्रच नाही का?"
आता मात्र उपदेशक संतप्त झाला. तो कर्कशपणे म्हणाला, "तू अद्याप तर्काच्या कृष्णसर्पाने वेटोळला आहेस, त्याचेच फूत्कार तुझ्या शब्दांतून बाहेर पडत आहेत! ज्ञानप्राप्ती पाहिजे असेल तर बुद्धीचा गर्व, तर्काचा ताठरपणा आणि अहंपणाचा मद सोडायला हवा. तोपर्यंत तुझ्याशी बोलणे म्हणजे केवळ कालापव्यय आहे. तू झुंजण्यासाठी आला आहेस, जाणण्यासाठी नाहीस!"
डॉन उठता उठता म्हणाला, "आपणाला अंतिम सत्य समजले असे म्हणालात म्हणून मी फार आशेने प्रश्न विचारले. रोष मानू नका. मी कधी बुद्धीचा गर्व धरला नाही, कारण मला बुद्धीच नाही. तर्काचा ताठरपणा माझ्यात असता तर मी माझे गाव सोडून कधी बाहेर पडलो असतो का? अहंपणा असता तर जन्मभर कुचेष्टा सहन केली नसती. कधी असलेच तर माझ्या अहंपणा नसून स्वत्व होते. मी भिकार्यांच्या शेजारी बसून बोललो आहे, धनगरांच्या सान्निध्यात टेकड्यांवर रात्री काढल्या आहेत. शेवटी मला एकच गोष्ट कळून चुकली की, मी अगदी पूर्ण, असाध्य वेडा आहे. पण इतर माणसे कोणत्या बाबतीत शहाणी आहेत हे मात्र मला कधी उमगले नाही."
- oOo -
पुस्तक: पिंगळावेळ
लेखक: जी.ए. कुलकर्णी
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती तिसरी, पुनर्मुद्रण (१९९९)
पृ. २२४-२२९.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा