“मला वाटले होते, एखादे अत्यंत सडलेले प्रेत आभाळात टांगून ठेवावे त्याप्रमाणे माझे पातक सगळ्यांना माहीत असेल. मी माझ्या पवित्र नेत्याचा घात केला. त्याच्या वस्त्राचे आदराने चुंबन घेत आहे असे दाखवून मी द्रोह केला आणि त्याला शत्रुसैनिकांच्या आधीन केले. शेवटी त्याला स्वतःचा अवजड क्रूस खांद्यावर घेऊन ओढत जात, त्याच क्रूसावर आपले आयुष्य अत्यंत वेदनेने संपवावे लागले. त्याचे पवित्र रक्तच माझ्या डोक्यावर थापले आहे. तू मला ओळखत नाहीस ? अरे, मी ज्यूडास आहे."
समोर जमिनीतून एकदम एक विषारी सर्प उभा राहिल्याप्रमाणे डॉन दचकला आणि मागे सरला. क्षणभर त्याची वाचाच गेली व तो थिजलेल्या डोळ्यांनी पाहतच राहिला. नंतर त्याने स्वतःला सावरले व म्हटले, " तू! पण तू ते का केलेस?"
ज्यूडासने अविश्वासाने त्याच्याकडे पाहिले. तो म्हणाला, "मला असे कोणी सुद्धा विचारले नव्हते. सगळ्यांचा पूर्ण विश्वासच की, मी ते पातक चांदीच्या तीस नाण्यांसाठी केले. तुलादेखील तसेच वाटते का? अरे जन्माचे दारिद्र्य जाईल एवढी संपत्ती मिळण्याजोगी असती तर कदाचित मनाची चलबिचल झाली असती, मोह प्रबळ ठरला असता. तीस नाण्यांनी काय होणार? तेवढ्यावर वर्षाचीदेखील भूक भागली नसती. त्या मोबदल्यात जमिनीचा एक वीतभर तुकडा तरी विकत घेता येईल की नाही कुणास ठाऊक! शिवाय मला स्वतःला तीस नाणी एवढी अप्रूप असण्याची गरज काय? आम्हाला ज्या देणग्या मिळत त्या सगळ्या माझ्याच ताब्यात, या कमरपट्ट्यात असत. त्यातून मला काय तीस नाणी सहज उचलता आली नसती का ? सैनिकांनी विश्वासघात करून त्या राजेश्वराला देहान्ताची शिक्षा देण्याचे ठरवले तेव्हा मी ती नाणी फेकून दिलीच की नाहीत? "
ज्यूडास मध्येच थांबला. आता त्याचा आवाज थोडा स्थिर झाला होता. " साऱ्याचे खरे कारण निराळेच होते. माझ्या लहानपणी मी वेड लागलेला एक माणूस पाहिला होता. तो स्वतःला असाच उद्धारक समजत असे व हातवारे करीत मोठमोठी प्रवचने करीत असे. एक दिवस संतापलेल्या लोकांनी भर बाजारात त्याला दगडांनी ठेचून मारले. माझ्या येशूच्या वाट्याला तसला शेवट येऊ नये अशी माझी इच्छा होती. अलीकडे त्याचे बोलणे असेच अमर्याद होऊ लागले होते. देवळात आपला धंदा करणाऱ्या सराफांना त्याने हाकलून लावले तेव्हा जमाव किती संतापला होता, हे मी प्रत्यक्ष पाहिले होते. जर त्या सैनिकांनी त्याला ताब्यात घेतले तर त्याचे जीवित सुरक्षित राहील, अशी मला आशा होती. पण त्यांच्याकडूनच विश्वासघात होईल याची मला आधी कशी कल्पना येणार?"
"दुसरेदेखील एक कारण होते. एका गालावर प्रहार झाला तर दुसरा गाल पुढे कर असली नेभळट शिकवण त्याने सुरू केली होती. आमच्या लोकांना लढायचे होते ते बलाढ्य अशा रोमन साम्राज्याशी. असे एकामागोमाग गाल पुढे करून जगातले सीझर कधी नष्ट झाले आहेत का? ज्या वेळी आमचा प्रत्येक माणूस बलदंड होण्याची गरज होती, त्या वेळी असले भळभळीत, अवेळ तत्त्वज्ञान ऐकवणे म्हणजे आमची खच्ची करून टाकण्यासारखेच होते. तेव्हा त्याच्याविषयी कितीही आतडे तुटले तरी तो नाहीसा होणेच न्याय्य आहे, असा माझा निश्चय झाला होता."
"पण तू प्रश्न विचारलासच म्हणून तुला अगदी काळजातले खरे कारण सांगतो. कोणत्याही धर्माला बलिदानाची जोड मिळाली नाही तर त्याला झळाळी येतच नाही. केवळ शब्द आज आहेत तर उद्या नाहीत. शब्द म्हणजे निव्वळ तोंडचा वारा; त्यांना रक्त नाही की मांस नाही. पण एखाद्या प्रेषिताचे आत्मसमर्पण मनावर सतत आदळत राहिले तर त्याच्या रक्ताची अमर नक्षत्रे होतात, त्याच्या शब्दांत विश्वाचे हुंकार ऐकू येतात. अशा बलिदानासाठी यापेक्षा जास्त योग्य क्षण शोधून तरी मिळाला असता? येथे परकीयांचे राज्य होते, त्याच परकीयांकडून परस्पर बलिदान करवण्याची दुर्मिळ संधी होती. तुला माझ्या बोलण्यात आढ्यता दिसेल, पण या सार्यासाठी मला स्वतःला केवढा त्याग करावा लागला आहे हे ध्यानात घे. मी माझे सारे आयुष्य त्यासाठी उधळून लावले व महापातक आपण होऊन स्वीकारले. पुण्यपुरूष म्हणून येशूचे नाव ज्या ठिकाणी घेतले जाते, त्या ठिकाणी पापाचा राक्षस म्हणून माझे नाव येते. पण ध्यानात घे, मी त्या भीषण वणव्यात स्वतःला जाळून घेतले म्हणूनच येशूचा ख्रिस्तपणा सूर्याप्रमाणे तळपणार आहे !"
स्वतःच्याच शब्दांचा कैफ चढत गेल्याप्रमाणे ज्यूडासचे डोळे झळझळीत झाले व चेहरा उद्धट आणि ताठर दिसू लागला. तो म्हणाला, "आणखी असे एक पाहा. या पातकाला मीच एकटा सर्वस्वी जबाबदार धरला जातो. परंतु दरोडेखोराला जीवदान देऊ की येशूला, असा सवाल पायलेटने केला असता हजारो लोकानी येशूला सोडून दरोडेखोराला वाचवण्याची विनंती केली. ती माणसे येशूच्या हत्येला माझ्याइतकीच जबाबदार नाहीत का ? नेहमी त्याच्या पुढे पुढे करणारे त्याचे निष्ठावंत अनुयायी- ते सारे या वेळी कुठे होते ? त्यांच्यापैकी एकाने तरी आवाज मोठा करून येशूवर निष्ठा दाखवली का? व्यभिचारी म्हणून दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा मिळालेल्या त्या स्त्रीला येशूने वाचवले, लाझारसला मृत्यूनंतर पुन्हा जिवंत केले. ही दोघे त्या वेळी कुठे होती? येशूने एकदा पाच हजार भुकेल्यांना जेवण दिले. ही सगळीच माणसे त्याच नेमक्या वेळी कुठे नाहीशी झाली? पाच हजारांचा आवाज का कमी मोठा झाला असता? जर त्यांनी येशूला वाचवले असते आणि नंतर माझ्या अंगात आकडे रुतवून मांस तोडून टाकण्याची जरी मला शिक्षा दिली असती, तरी मी ती आनंदाने भोगली असती. ही माणसे माझ्याइतकीच पापी नाहीत का? त्या प्रत्येकावर त्या रक्ताचे शिंतोडे उडालेले आहेत. पण अखेर या हत्येला जबाबदार म्हणून नाव घेतले जाईल ते या एकटया ज्यूडासचे ! या सार्यापेक्षाही विशेष म्हणजे-"
ज्यूडास बोलताना मध्ये थांबला. आपल्या आवेशपूर्ण बोलण्याचा डॉनवर काहीही परिणाम होत नाही, उलट उपरोधाने त्याच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे हे पाहून त्याला फार राग आला. त्याने कपाळाला आठ्या घालून विचारले, "का, तुझा माझ्यावर विश्वास बसत नाही ?"
डॉनने धीटपणे मान हलवली व स्पष्ट सांगितले, "माझा तुझ्या शब्दांवर काडीचाही विश्वास बसत नाही! ज्या वेळी कुणी एकाच कृत्याबद्दल अनेक आणि विसंगत कारणे सांगू लागतो, त्या वेळी तो जास्तीत जास्त सत्य सांगण्याचा प्रयत्न करत नसतो, तर काहीतरी लपवण्याचीच त्याची धडपड असते. म्हणजे या ठिकाणीदेखील माझ्या पदरात निराशाच पडली म्हणायची. ज्ञान, पापपुण्य यांत अगदी शेवटच्या दगडापर्यंत जाऊन आलेल्याला भेटण्याचा योग माझ्या आयुष्यात नाही हेच खरे. तुझा जो प्रक्षोभ आहे तो तुझ्या महान पातकाबद्दल फारसा दिसत नाही. तो निर्माण झाला आहे याचे कारण म्हणजे ते पातक आपल्या हातून घडले न जाता केवळ घडवले गेले आहे हे तुला आता जाणवू लागले आहे, एखाद्या अजस्र जनावराच्या पायाला बांधून त्याला चिखलातून फरफटत नेल्याप्रमाणे तू त्या पापातून ओढला गेलास. ते थांबवण्याचे तुझ्यात सामर्थ्य नव्हते, की ते आपणाला कुठे नेत आहे हे जाणण्याची दृष्टी नव्हती. म्हणून तू आता निरनिराळी कारणे शोधत आपल्या कुत्याला काहीतरी अर्थ देण्याचा खुळचट प्रयत्न करत आहेस. जर एखाद्याने पूर्ण विचार करून अनेक पर्यायांमधून एक निवडला, तर ते पाप कितीही भयाण असो, त्यात देखील तो भाल्याप्रमाणे ताठ राहतो, पापणी न हलवता तो त्या काळ्या धगधगीत सूर्याकडे पाहू शकतो. तुझ्या पापात हे स्वत्वदेखील तुला लाभले नाही. एवढे महान पातक, पण त्यामागील हेतू तुला माहीत नाही आणि त्यामुळेच तू पापातदेखील अगदी किनाऱ्यापर्यंत गेला नाहीस! "
ज्यूडासने त्याच्याकडे पाहत तळ्यावर मूठ आपटत म्हटले, "यापलीकडे पातक असणार तरी कसले? जन्म देणार्या आईची हत्या हे महापातक खरे, पण ते मुलापर्यतच मर्यादित असते. इतरांना ती फक्त एका स्त्रीची हत्या यापलीकडे त्या घटनेचे महत्त्व नसते. पण येथे पाहा, हा पवित्र पुरुष काही केवळ आईबापांचा मुलगा नव्हता, काही एकदोन जणांचाच बंधू नव्हता. माझ्या हातून साऱ्या पृथ्वीचा प्रकाशदीप विझवला गेला. यापेक्षा जास्त मोठे पातक जर असेल तर हे महापंडिता, तू सांग आणि मला शहाणा कर!" ज्यूडास ने बाजूला तोंड वळवले व तो तिरस्काराने थुंकला.
डॉनने त्याला शांत होण्यासाठी थोडा वेळ जाऊ दिला. मग तो म्हणाला, "पातक म्हटले की ते नेहमी रक्ताने न्हालेल्या उग्र दैत्यासारखे थयथयत येते, असली एक खुळी समजूत झालेली आहे, म्हणून तुला तसे वाटते. मला वाटते याहीपेक्षा मोठे पातक तुझ्या हातून घडू शकले असते; यापुढेही घडू शकेल. त्या उद्धारकाचे पवित्र शब्द घेऊन त्यांचा तू स्वार्थी बाजार करू शकला असतास आणि ज्यांच्या उद्धारासाठी त्याने जन्म घेतला व मृत्यू स्वीकारला, त्याच लोकांना तू शब्दांचे गुलाम करण्यात रमून जाऊ शकला असतास. किंवा आपण त्याला फार जवळून पाहिले एवढ्याच आधारावर तू अघटित खुळचट चमत्कार आणि भारूड लीला यांनी बजबजलेले त्याचे चरित्र तू लिहू शकला असतास आणि त्यामुळे तो कायमचाच सामान्य माणसांपासून दुरावला असता. मग तू त्याला त्या सोनेरी पिंजऱ्यात बंदिस्त करून त्याचे प्रदर्शन करत जरतारी महंत अथवा धर्मप्रमुख होऊन वैभवात लोक शकला असतास. छातीत प्रत्यक्ष सुरी खुपसण्यापेक्षा ही पातके तुला कमी जहरी वाटतात की काय?"
"आणि आता तर ही देखील ज्यापुढे काहीच नाही अशी ठरतील असे एक कृत्य तुझ्याकडून घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धर्माबद्दल एक गोष्ट मोठी विलक्षण आहे. तेथे सरळ साध्या भाबड्या अनुयायापेक्षा पश्चात्तापदग्ध दिसणाऱ्या, सर्वांसमोर स्वत:ला हीनदीन करणार्या माणसाला जास्त महत्व असते. जेवढे पाप मोठे तेवढे त्याच्या पश्चात्तापाचे नाटक मोठे. आता असले पाप केल्यावर तुला पश्चात्तापाचे ढोंग करता येईल; डोळे ओलसर, गळा घोगरा करीत तुला सगळ्यांपुढे नम्र होता येईल आणि त्याच वेळी तू ज्याची हत्या केलीस त्याच्याच उपदेशाचा प्रसार करता येईल. तुझे पातक महान म्हणून तुझा पश्चात्ताप महान आणि म्हणूनच तुझ्या शब्दाचे सामर्थ्यदेखील अमर्याद! या बाबतीत तुला कोणी प्रतिस्पर्धीदेखील राहणार नाही. कारण अशी हत्या पुन्हा होणार नाही. स्वतः पाप केल्यानंतरही तसल्या पापासून मुक्तीचा मार्गदखील तूच दाखवावा, हे नाटक किती मनोरंजक होईल याची कल्पना तरी करून पाहा. मग सहस्रावधी लोक तुझ्यामागून येतील, तुझ्याखाली सोन्याचे सिंहासन येईल आणि अनेक जण ते खांद्यावर घेऊन मिरवण्यात स्वतःला धन्य समजतील. मग फार तर वर्षातून एकदा कधीतरी बारा जणांचे पाय धुण्याचे प्रहसन मात्र या नाटकात करावे लागेल, कधीतरी अनवाणी चालत जाऊन रोगपीडितांना भेट देऊन गुळमट शब्द बोलण्याची तसदी घ्यावी लागेल, इतकेच. म्हणजे बघ, महान पातक करण्याचे आणि त्याच वेळी महान विलास भोगण्याचे दुहेरी कर्तृत्व तुझ्या वाट्याला येईल, होय की नाही?"
ज्यूडास ताडकन उभा राहिला व डॉन जवळ येऊन त्याच्यावर वाकून म्हणाला, "तू माणूस आहेस की सैतान आहेस? असली पापे तुझ्या मनात येतात म्हणजे तूच माझ्या पलीकडे गेला आहेस. पण तू भेटलास हे एका दृष्टीने माझे नशीबच म्हणायचे, अजूनही माझे आयुष्य जास्त भीषण कसे होऊ शकेल हे तू मला दाखवलेस. म्हणजे आता मी काय करावे हेच तू मला सांगितलेस."
ज्यूडास वळला व आवेगाने जवळच्या एका झाडावर चढला. त्याने कमरेच्या कातडी पट्ट्याचा गळफास केला व तो गळ्यात अडकवून त्याने खाली उडी घेतली. गोठून गेल्याप्रमाणे होऊन डॉन तिकडे पाहतच राहिला.
- oOo -
पुस्तक: पिंगळावेळ
लेखक: जी.ए. कुलकर्णी
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती तिसरी, पुनर्मुद्रण(१९९९)
पृ. २३०-२३४.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा