शनिवार, १ मे, २०२१

शरीरम् धनसंपदा

सीनियरची चाहूल लागून ग्लाडसाहेबाने डोके वर उचलले. “सर, कैदी नंबर आठसो बयालीस, वीरभूषण पटनाईक, फाशी जाण्यापूर्वी मृत्युपत्र लिहून देऊ मागतो!” सीनियरने साहेबाला इन्फॉर्म केले.

“जा... त्या दळभद्र्याला विचारा, म्हणावं तुला विलची काय गरज? तुला टांगल्यावर तुझा थाली पॉट भट्टीखान्यातच जमा होणार आहे. घरी नाही पाठवता येणार म्हणावं..." ग्लाडसाहेबाने तिरसट तुच्छतेने उत्तर दिले.

सीनियर सॅल्यूट ठोकून माघारी वळला आणि नक्षलवाद्याकडे अधिक चौकशी करायला फाशी गेटकडे चालू लागला...

सीनियर निघून गेला नि ग्लाडसाहेबाचे मन त्याचे त्यालाच खाऊ लागले. साहेबाला नक्षलवाद्याच्या बायकोच्या पायाच्या भेगा आठवल्या, आणि मग स्वत:चे वाईट दिवस आठवले. आपण नक्षलवाद्याच्या दारिद्र्यावर बोट ठेवायला नको होते असे साहेबाला मनोमन वाटले. पण अविचारीपणे साहेबाच्या तोंडून शब्द निघून गेले होते. आता तेच शब्द वाहणे साहेबाला भाग होते. आपल्याच शब्दांचे ते ओझे साहेबाला फार जडू वाटू लागले. साहेब मनोमन अस्वस्थ झाला. त्याचे कामावरचे लक्ष उडाले.

तासभर लोटला नि सीनियर परतला. एक चिंतातुर सॅल्यूट ठोकून साहेबाला म्हणाला, “सर, नक्षलवादी प्रेसिडेन्टला उद्देशून मृत्युपत्र लिहीन म्हणतो !” 

“काय?” खुर्चीवरून ताड्कन उठत ग्लाडसाहेबाने विचारले.

“येस सर..." सीनियरने पुन्हा माहिती दिली. “नक्षलवादी म्हणतोय, त्याला फासावर चढवून मारू नये. त्याच्या शरीराचे एकेक अवयव काढून घेऊन गोरगरीब रुग्णांना गरजेप्रमाणे द्यावेत. त्यासाठी राष्ट्रपतीला उद्देशून त्याने विलचा मसुदा करून ठेवला आहे !”

ग्लाडसाहेब स्तंभित झाला! मग बराच वेळ उलट-सुलट विचार करून त्याने हुकूम केला, “ऑफिस टाइमिंग संपताच टायपिस्टला घेऊन फाशी गेटमध्ये चला. माझ्यासमोरच डिक्टेट कर म्हणावं विल. साला काही उलटं सुलटं लिहील तर चामडी काढीन त्याची.” सीनियरने मान वाकवून हुकमाचे जू उचलले नि तो चालू लागला.

*

ऑफिस टाइमिंग संपले. बत्तीखान्यात चार-सहा डझन कंदील पुसत स्वच्छ होऊन पेटू लागले. यार्डा-यार्डात बंदीची धावपळ चालू झाली नि मेन गेटमधून दोन वॉर्डर डोक्यावर टेबल, खुर्ची, स्टूल टाकून फाशी गेटकडे चालू लागले. एका हवालदाराने खांद्यावर टाइपरायटर टाकीत त्यांची पाठ धरली.

बंदीचे टोल पडले नि फाशी गेटचा जेलर, सीनियर जेलर, दोन हवालदार, चार वॉर्डर, एक टायपिस्ट अशी पलटण घेऊन ग्लाडसाहेब फाशी गेटकडे चालू लागला. साहेबाने फाशी गेटमध्ये पाऊल टाकले नि वेंधळा जमादार त्याची काहीही चुकी नसताना घाबरून गेला. कधी न घडणारा कसला तरी अघोर प्रसंग फाशी गेटमध्ये घडतोय असे त्याला वाटू लागले.

साहेब नक्षलवाद्याच्या कोठडीसमोर येऊन उभा राहताच त्याने गडबडीने ताला खोलला. फाशी गेटच्या जेलरने हुकूम केला नि वॉर्डरांनी टेबल, स्टूल, खुर्ची कोठडीत नेऊन ठेवली. टायपिस्टने चार लेजरपेपर टाइपरायटरमध्ये घातले नि बोटे रेडी करीत स्टुलावर बैठक मारली.

“हॅव ए सीट मिस्टर ग्लाड." नक्षलवाद्याने साहेबाला खुर्चीत बसण्याची विनंती केली. पण साहेबाने मानेनेच नकार दिला नि तो दरवाजासमोरच उभा राहिला...
“कॅन आय डिक्टेट नाउ ?” नक्षलवाद्याने प्रश्न केला.
“याऽ !” साहेब तोंडातल्या तोंडात पुटपुटला.

मग नक्षलवादी गुडघे जवळ घेऊन भिंतीला टेकून बसला, आणि छताच्या पिवळा प्रकाश प्रकाशणाऱ्या दिव्याकडे नजर लावून सांगू लागला...
टायपिस्टची बोटे चालू लागली…

“भारताच्या आजच्या भांडवलदारी सरकारच्या नामधारी राष्ट्रप्रमुखास, राष्ट्रपतीस देण्यासाठी--

महोदय,

राजमहेंद्री मध्यवर्ती कारागृहात तुमच्या शासनाने दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेची वाट पाहा असलेला मी कैदी नंबर आठसो बयालीस वीरभूषण पटनाईक पुन्हा एकवार अभिमानाने जाहीर करतो की,

मी कम्युनिस्ट आहे. मार्क्सवाद, लेनिनवाद आणि चेअरमन माओच्या शिकवणुकीवर माझी दृढ निष्ठा आहे. आणि माझ्या जनतेची, तुमच्या अन्याय्य आणि शोषित शासनाच्या जुवाखालून, केवळ सशस्त्र क्रांती करून, तुमचे सरकार उलथून पाडण्यानेच मुक्तता होईल याची मला खात्री आहे. आणि याचकरिता श्रीकाकुलमच्या आदिवासी विभागात मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी जो क्रांतिकारक संघर्षाचा अयशस्वी प्रयत्न केला त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो.

तुमच्या शस्त्रसज्ज सेनादलांनी आमच्या लाल क्रांतिकारकांच्या छोट्या गनिमी तुकड्यांचा केलेला पराजय हा नव्या इतिहासाला जन्माला घालीत आहे. झालेल्या पराभवाने मी किंवा माझे कॉम्रेडस् यांचे नीतिधैर्य बिलकुल खचलेले नाही. कारण, माणसाचा इतिहास केवळ उद्दाम विजयांनी नव्हे, तर समर्पित पराजयानेही सुरू झाला आहे... घडला आहे; हे आम्हांस ठाऊक आहे.

या क्रांतीच्या दशकाच्या अखेर माझ्या देशातील तुमची शासनसत्ता उलथून पडून कामगार वर्गाच्या अधिनायकत्वाखाली कष्टकरी जनतेची नवी लोकशाही प्रस्थापित होईल याचा मला दृढ विश्वास आहे. आणि म्हणूनच जनतेच्या विजयी लढाऊ विभागाचा एक घटक असलेला मी तुमच्याकडे प्राणांची याचना करीत नाही, करणार नाही. तसे करणे म्हणजे कष्टकरी जनतेच्या लढाऊ सामर्थ्याचा अपमान, आणि तुमच्या शोषित, जुलुमी शासनसत्तेचा सन्मान केल्यासारखे होईल. तरी पण, तुमच्या न्यायालयाने दिलेली शिक्षाच तेवढी तुम्ही अंमलात आणावी... त्यापेक्षा अधिक म्हणजे माझी संपत्ती तुम्ही हिरावून घेऊ नये अशी मी तुमच्याकडे मागणी करतो..."

जेलचा टायपिस्ट टकाटका बोलका मजकूर टाइप करीत होता. आपण काही वेगळा मजकूर टाइप करीत आहोत याची त्याला जाणीवही नव्हती. पण ग्लाडसाहेब मात्र कोठडीत गेला आणि खुर्चीत रेलून बसला. नक्षलवाद्याचे ते मृत्युपत्र त्याला सारखे खुणावत होते, हाका मारीत होते, - बघ, बघ, क्रांतिकारक असा असतो - असा असतो.

फाशी गेटच्या कोठडीतील मंद पिवळ्या प्रकाशात नक्षलवादी मात्र स्थितप्रज्ञपणे आपले मृत्युपत्र डिक्टेट करीत होता.

“मी कम्युनिस्ट आहे. आणि कम्युनिस्ट तत्त्वाप्रमाणे फक्त श्रमातूनच संपत्ती निर्माण होते यावर माझी विश्वास आहे. आणि म्हणूनच, श्रम करण्याचे साधन जे शरीर तेही माणसाच्या व्यक्तिगत संपत्तीचाच भाग आहे असे मी मानतो आणि म्हणूनच शरीर-संपदा ही माणसाची संपत्ती आहे व तिचा वारसा आपल्या वारसदारांना देणे हा तुमच्या कायद्याप्रमाणेही प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, याकडे मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो. आणि तेवढाच अधिकार तुम्ही मला द्यावा अशी मी मागणी करतो.”

टायपिस्ट निर्विकार टकाटका टायपिंग करीत होता. पण ग्लाडसाहेब मात्र नक्षलवाद्याच्या त्या जगावेगळ्या मृत्युपत्रात हरवून गेला होता.

“तुमच्या शासनसत्तेला केवळ माझे प्राण हवे आहेत. माझ्या जीवनाचे अस्तित्व तुम्हास पुसायचे आहे. माझी संपत्ती हिरावून घ्यायची नाहीय. मग मला फासावर टांगून आणि वर पुन्हा पोस्ट मॉर्टम करून माझ्या शरीराची नासाडी तुमचे सरकार का व कशासाठी करते? अशा रीतीने माझ्या शरीराचा नाश झाल्यास मी माझी शरीरसंपदा कोणाच्याही उपयोगासाठी देऊ शकत नाही. आणि मी तर या समाजाचे, माझ्या कष्टकरी देशबांधवांचे काही देणे लागतो; व त्या देण्यातून मुक्त होण्यासाठी माझ्या शरीराचा प्रत्येक भाग त्यांच्या कामी यावा अशी इच्छा धरतो. म्हणून तुमच्या शासनाला मी विनंती करतो की...”

ग्लाडसाहेबाची वैरभावना मृत्युपत्रातील प्रत्येक अक्षरागणिक नष्ट होऊ लागली होती. नक्षलवादी सांगतच होता--

“मला फाशी देऊन व नंतर माझ्या मृत देहाचे पोस्ट मॉर्टम करून माझे शरीर निकामी करू नये. मी जिवंत असतानाच वैद्यकीय सल्लागारांच्या सल्ल्याप्रमाणे माझ्या शरीरातून जास्तीत जास्त रक्त काढून घ्यावे, नंतर डोळे काढून घ्यावेत, व मग असा प्रत्येक अवयव काढून घ्यावा-- जो माझ्या जिवंत शरीरातून काढला असतानाच कामी येऊ शकेल. त्यानंतर आवश्यक व शक्य ते सर्व अवयव आतडी, फफ्फसे. जठर, हृदय आदी भाग काढून घेतले जावेत: आणि या प्रक्रियेत जेव्हा माझा प्राण जाईल तेव्हा मी मेलो असे जाहीर करावे.”

ग्लाडसाहेबाने खिशातून व्हिस्कीचा पाइंट काढला व स्वत:च्या नकळत नक्षलवाद्याच्या समोर धरला. नक्षलवाद्याने मानेनेच नकार दिला तेव्हा साहेबाने व्हिस्की ओठांना लावली आणि नक्षलवाद्याच्या मृत्युपत्राकडे पुन्हा लक्ष एकाग्र केले.

“ माणसाच्या कामी येऊ शकतील असे माझ्या शरीराचे सर्व भाग काढून झाल्यावर माझ्या उरलेल्या निकामी शरीराची, कोणाला काही त्रास होणार नाही अशा कोणत्याही मार्गाने विल्हेवाट लावावी. पण त्यावर कसलाही धार्मिक विधी अथवा उपचार होऊ नये."

“माझ्या शरीरातून काढून घेतले गेलेले अवयव, जिथे ते माणसांच्या उपयोगात आणले जाऊ शकतील अशा या देशातील कोणत्याही प्रांतातील-- शहरातील हॉस्पिटलात पाठवले जावेत; व ते कोणाही गरजू व्यक्तीला विनामूल्य देण्यात यावेत. परंतु जर माझ्या शरीराच्या एखाद्याच भागाची अनेकांना किंवा एकापेक्षा अधिकांना एकाच वेळी गरज भासली तर खालील उपक्रमाच्या यादीप्रमाणे वर्गवारी करून क्रम लावावा...

“ माझ्या शरीरावर सर्वांत प्रथम अधिकार भूमिहीन शेतमजूर, आदिवासी किंवा अकुशल कामगाराचा असेल. त्यानंतर कुशल कामगार किंवा छोटा शेतकरी किंवा स्वतंत्र कारागीर किंवा छोटे उद्योगधंदेवाले यांचा असेल. वरीलपैकी दोघांनाही माझ्या शरीराच्या भागाची गरज न लागल्यास प्राध्यापक, डॉक्टर, कलावंत किंवा कोणीही मध्यमवर्गीय बद्धिजीवी यांच्या उपयोगात माझे अवयव आणावेत. त्यांनाही गरज नसल्यास या देशातील कोणाही गरीब माणसाच्या कामी माझे अवयव यावेत. मात्र कोणत्याही कारणाखातर बडे भांडवलदार, जमीनदार, नोकरशहा किवा सत्तापदस्थ मंत्री यांच्यासाठी माझ्या शरीराचा कोणताही अवयव उपयोगात आणला जाऊ नये.”

“ तुमचे सरकार माझ्या या इच्छेचा आणि मागणीचा गांभीर्याने विचार करील आणि मला फासावर टांगून व पोस्ट मॅर्टिम करून माझ्या शरीरसंपत्तीचा नाश न करता ती मला माझ्या देशबांधवांच्या उपयोगासाठी आणू देईल याची मी अपेक्षा करतो.” 

“कृपया, राष्ट्रपती महोदयांनी स्वत: जातीने लक्ष घालून योग्य ती सर्व कारवाई करावी... आवश्यक असल्यास कायद्यात दुरुस्ती करावी; परंतु माझा रास्त अधिकार मला बजावू द्यावा अशी मी मागणी करतो. माझ्या या मागणीवरील निर्णयाची वाट पाहात आहे..."

टायपिस्ट थांबला तसा सीनियर जेलर पुढे झाला. त्याने सर्व कागद नीट जुळवले. टाचण्या लावल्या आणि वारी प्रती नक्षलवाद्याच्या हातात दिल्या. नक्षलवाद्याने काळजीपूर्वक सर्व मजकूर वाचला नि सही केली. मग सीनियर जेलरने कागद ग्लाडसाहेबासमोर ठेवले. ग्लाडसाहेबाने शेरा मारला... 'कैद्याने माझ्या समक्ष कोणाच्याही दडपणाशिवाय लिहून दिले.' आणि लफ्फेबाज सही ठोकून साहेब जायला उठला.

फाशी गेटचा वेंधळा जमादार तेवढ्यात पुढे धावला आणि त्याने खुर्ची काढून नेली. जाताजाता एकवार कोठडीच्या दरवाजाशी थबकून ग्लाडसाहेबानेवाद्याला आपादमस्तक न्याहाळले, आणि हातातला कॅप्स्टनचा टिन नक्षलवाद्यापुढे केला.

"डू यू लाउक इट?" ग्लाडसाहेबाने विचारले.
--नक्षलवादी पुटपुटला आणि त्याने एक सिगरेट काढली. तेव्हा अख्खा टिनच नक्षलवाद्याच्या हाती कोंबीत ग्लाडसाहेब पुटपुटला, "कीप इट वुउथ यू. "

आणि ग्लाडसाहेब फाशी गेटच्या बाहेर पडला. मग थेट जेलच्या बाहेर - मेन गेटसमोरील वडा-पिंपळाची झाडे सळसळत होती. पहिला पाऊस नुकताच पडून गेला होता. मातीचा मंद सुवास दरवळत होता. दिवेलागण झाली होती. त्या कातरवेळी ग्लाडसाहेबाचे मन उदास झाले, पण दु:खी नाही. आणि खालच्या मानेने ग्लाडसाहेब बंगल्याकडे चालू लागला !

- oOo -

पुस्तक: ’थॅंक यू, मिस्टर ग्लाड’
लेखक: अनिल बर्वे
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती सहावी, दुसरे पुनर्मुद्रण (२०२०)
आवृत्ती पहिली: १९७५
पृ. २३-२७.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा