शनिवार, १ मे, २०२१

वेचताना... : थॅंक यू, मिस्टर ग्लाड

--काही झाले तरी ग्लाडसाहेबांची राजनिष्ठा मोठी कडवी होती हे खरे. प्राण गेला तरी साहेब खाल्ल्या मिठाला जागल्याशिवाय राहिला नसता. बेचाळीसच्या चळवळीत हाती सापडलेल्या सत्याग्रह्यांना कारणे शोधून शोधून ग्लाडसाहेबाने गुरासारखे बडवून काढले होते. पण युनियन जॅक उतरून तिरंगा वर चढला, तेव्हा ग्लाडसाहेबाने दु:ख आवरून एक कडक सॅल्यूट ठोकला नि आपली सेवा तिरंग्याला रुजू केली. ग्लाडसाहेबांची जेवढी निष्ठा फिरंग्याला होती तेवढीच आता तिरंग्याला होती...(पान ७)

... नक्षलवादी चळवळीचा वाढता जोर पाहून साहेबाच्या उरात धडकी भरे. भारतात खरेच ‘कम्युनिस्ट रेव्होल्यूशन’ होणार असे त्याला वाटू लागे. अर्थात जरी भारतात कम्युनिस्ट रेव्होल्यूशन झाले असते, तरी फारसे काही बिघडले नसते. तिरंगा उतरून लाल बावटा वर चढल्यावर ग्लाडसाहेबाने दु:ख आवरून एक कडकडीत सॅल्यूट ठोकला असता, नि आपली सेवा लाल बावट्यालाही रुजू केली असती." (पान १४)
---
थँक यू, मिस्टर ग्लाड

निष्ठेचे सातत्य, निष्ठाविषय मात्र बदलता हे वरवर पाहता परस्परविसंगत वाटते. पण थोडा विचार करुन जाऊन पाहिले, तर असे दिसते की हे शक्य आहे– नव्हे हे फारच सार्वत्रिक आहे. राजकारणातील एखाद्या एखाद्या नेत्याने पक्ष बदलला की त्याच्या कार्यकर्त्यांच्या निष्ठाही त्याला अनुसरून बदलतात. नव्या पक्षाशी त्यांच्या निष्ठा जुन्या पक्षावर होत्या तितक्याच तीव्र असतात. आणि सध्याचे राजकारण पाहिले तर राजकारणातली गणितं बदलली की सर्वसामान्यांच्या निष्ठाही त्यानुसार हेलकावे खाताना दिसतात. काल ज्याचे गुणगान गाताना थकत नव्हती; परिस्थिती बदलताच, आज त्याच्या नावे शंख करणारी माणसे दिसतात. त्यामुळे ग्लाडच्या प्रवृत्तीचे हे वर्णन वाचल्यावर हा ग्लाड सर्वसामान्यांच्या प्रवृत्तीचे एक रूपच वाटू लागला.

एकीकडे ‘आपला महान देश...’ वगैरे जपमाळ ओढणारी जमात दुसरीकडे ब्रिटिशांनी आणलेल्या नोकरशाहीची कास धरुन आपले पोट भरत होती. त्यावेळी तिला ब्रिटिश सत्ता ही उत्थानकारी वाटत होती. देश बिटिश सत्तेच्या अंमलाखालून मुक्त झाल्यावर निर्माण झालेल्या संधींचा सर्वाधिक लाभही याच जमातीने घेतला.

एका बाजूने हा फायदा घेत असतानाच आता ब्रिटिश सत्तेच्या विरोधातील लढ्याच्या धुरिणांना बदनाम करुन ते ही श्रेय आपल्या खाती ओढून आणण्याचा त्यांचा आटापिटा सुरु झाला. थोडक्यात आता ते स्वत:ला ब्रिटिशविरोधी लढ्याचे वारसदार म्हणून सिद्ध करण्याची खटपट करु लागले.

वर ग्लाडबाबत म्हटल्याप्रमाणे उद्या जर खरोखरच कम्युनिस्ट क्रांती झाली नि देश लोकशाहीकडून तथाकथित श्रमिकांच्या एकाधिकारशाहीकडे सरकला, तर आज विरोधी मताच्या व्यक्तीला तुच्छतेने ‘अर्बन नक्षलवादी’ संबोधणारी ही जमात एकमेकाला कॉम्रेड म्हणून संबोधू लागेल यात शंका नाही.

’जे आपले आहे ते– नव्हे फक्त तेच – श्रेष्ठ आहे’ हा दुराग्रह असणारी ही जमात कोणत्याही समाजात बहुसंख्येनेच असते. ‘आपण नेमके श्रेष्ठ जातीमध्ये, धर्मामध्ये, देशामध्ये, सत्तेच्या मॉडेलमध्ये कसे काय जन्माला आलो बुवा?’ असा प्रश्न तिला पडत नसतो. न निवडलेल्या, अनायासे मिळालेल्या आपल्या गटाचे निर्विवाद श्रेष्ठत्व ती अत्यंत आक्रमकपणे प्रतिपादित असते.

या जमातीमधील प्रत्येक जण एका बाजूने शोषित असतो, तर दुसर्‍या बाजूने शोषकाच्या भूमिकेत जाऊन आपल्या शोषकांचा सूड आपल्याहून दुबळ्या, आपल्या अधीन व्यक्तींवर उगवत असतो. फेसबुकवर सुनील कांबळे यांनी एक सुरेख लघुकथा लिहिली होती. अडचणीत आलेल्या, वैतागलेल्या मुख्यमंत्र्यांपासून सुरु झालेली साखळी मंत्री, त्यांचा सचिव, वरिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता, त्याच्या हाताखाली काम करणारा तात्यापर्यंत पोचते. घरी पोचलेला तात्या तिथला राग/वैताग बायकोवर काढतो, मग ती त्यांच्या मुलावर आणि तो एका भटक्या कुत्र्यावर. त्याने पेकाटात हाणल्याने केकाटलेले कुत्रे, ते धडकल्यामुळे पडलेला भय्या, त्याच्या धक्क्याने हेलपाटलेली बुरख्यातली बाई आणि त्यातून निर्माण झालेला हिंदू-मुस्लिम तणाव पुन्हा मुख्यमंत्र्यांसमोर नवी समस्या उभी करतो. प्रत्येक टप्प्यावरचा शोषित हा शोषक बनून शोषणाला खालच्या टप्प्याकडे टोलवत जातो आणि मागच्या समस्येच्या निराकरणाऐवजी नव्या समस्येला जन्म देत जातो.

जेलर ग्लाड हा असाच एका एका टप्प्यावरचा शोषित आहे. जर्मनीत असताना त्याच्यादेखत त्याच्या ज्यू पत्नीला– ‘मारा’ला गेस्टापो ओढून घेऊन गेले. आडदांड प्रकृतीचा ग्लाड त्यांच्यासमोर पार हतबल ठरला होता. प्रतिकार तर सोडाच, पण माराला सोडावे म्हणून तो त्यांच्यासमोर गयावया करत लीन झाला होता. इतके पुरेसे नव्हते म्हणून माराने त्याच्या भेकड लाचारीचा अधिक्षेप केला होता. यातून एक प्रकारे त्याच्यातल्या पौरुषाचा निर्णायक पराभव झालेला होता. त्याने त्याचा अहंकार दुखावला गेला.

ती खदखद घेऊनच तो भारतात आला आहे. मनातून सूडाने पेटलेला आहे. त्याच्या लाडक्या माराला ठार मारणार्‍या नाझींचा त्याला सूड घ्यायचा आहे. पण त्या वेळी नाझींशी दोन हात करणे त्याच्या कुवतीचा भाग नव्हते. तिथे शोषित असलेला ग्लाड आता शोषकाच्या भूमिकेत जाऊन त्याच्या हाती सापडलेल्या कैद्यांवर सूड उगवून आपल्या गमावलेल्या पौरुषाला पुन्हा पुन्हा आळवत राहातो. त्यातून माराची हत्या करणार्‍या नाझींचाच जणू आपण सूड घेत आहोत अशी काहीशी भावना त्याच्या नेणिवेमध्ये निर्माण होत असावी.

एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामधील क्रौर्य हे अनेकदा त्याच्या मनाच्या तळाशी असलेल्या वैफल्याचा, न्यूनगंडाचा अवतार असते. भाषिक संवादामध्ये कमकुवत बाजू असलेला ज्याप्रमाणे आवाज वाढवून वा समोरच्याची मुस्कटदाबी करुन आपले म्हणणे सिद्ध करण्याचा आटापिटा करतो. त्याचप्रमाणे हा क्रूरपणा म्हणजे वास्तविक न्यूनगंडावर या तथाकथित शौर्याचे ढिगारे चढवून त्याला गाडून टाकण्याचा प्रयत्न असतो.

सर्वसामान्य माणसेही ग्लाडसारखीच असतात. कुठे तरी झालेल्या अन्यायाचा कुठे तरी सूड घेतला याचे समाधान त्यांना पुरेसे असते. कुणीतरी केलेल्या गुन्ह्याची कुणाला तरी वा कुठे तरी शिक्षा मिळाली की ते आनंदी होतात. कुठल्याशा दुबळ्या धाग्याने का होईना, मूळ गुन्हेगाराशी ज्याचा संबंध लागतो, अशा कुणाला शिक्षा देता आली तरी ते पुरेसे समजले जाते. ‘नाझी हे गुन्हेगार होते नि आपल्या हाती सापडलेलेही गुन्हेगारच आहेत’, हा धागा ग्लाडला पुरेसा वाटत असतो.

हीच वृत्ती सामान्य नागरिकाचीही असते, मग ते अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातले असोत की भारतासारख्या देशातले. बहुसंख्या ही ‘अमुक गुन्ह्याचा गुन्हेगार अमुक जात वा धर्माचा आहे म्हणून त्या गटातील कुणालाही त्याची शिक्षा झाली तरी ते न्याय्य आहे’ असे मानणारी असते.

नऊ सप्टेंबरला अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूड तेथील जनतेला हवा होता. पण अशा प्रकारच्या संघटित आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कृत्यामधले मुख्य सूत्रधार सापडणे जवळजवळ अशक्यच असते. त्यामुळे मग ते नाही, निदान त्यांच्या गटाची माणसे मारून सूड घेतल्याचे समाधान तेथील जनतेला हवे होते. अध्यक्ष बुश यांनी ‘वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन’ची भुमका उठवून इराकचा– एका मुस्लिम राष्ट्राचा विध्वंस केला आणि जनतेला ते समाधान दिले. गुन्हा कुणी केला नि त्याची शिक्षा कुणाला मिळाली. पण लोकक्षोभ शांत झाला. (आणि बुश पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले.)

भारतातही अशा तात्कालिक सूडाच्या कथा भरपूर सापडतात. यातूनच एन्काउंटर स्पेशलिस्ट नावाची जमात निर्माण होते. लोकांना हा झटपट न्याय आवडतो... अर्थात जोवर तो आपल्या अंगाशी येत नाही तोवर! म्हणून मग हैदराबादमधील नृशंस बलात्काराने उठलेल्या जनक्षोभाला शांत करण्यासाठी पोलिस चार फाटक्या जिवांना संशयित म्हणून समोर आणतात, त्यांना आरोपी म्हणून घोषित करतात आणि नंतर तथाकथित एन्काउंटरमध्ये त्यांचा निकालही लावतात. सर्वसामान्य तर सोडाच सेलेब्रिटी मंडळीही पोलिसांची स्तुती करताना थकत नाहीत. त्या पोलिसांवर पुष्पवृष्टी केली जाते.

हे संशयित अद्याप आरोपीही नव्हते. मग खरेच गुन्हेगार होते का? असा प्रश्नही फारसा कुणाला पडत नाही. असले तरी त्यांना न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून शिक्षा व्हायला हवी असा आग्रह कुणी धरला नाही. पोलिस म्हणाले म्हणजे ते गुन्हेगार होतेच असे समजणार्‍यांनी सर्वच केसेसमध्ये आपण असे मान्य करतो का असा प्रश्न स्वत:ला विचारून पाहिला नाही.

ज्या गटाने हैदराबादचे तथाकथित एन्काउंटर ‘पोलिस म्हणतात म्हणजे ते गुन्हेगार होते’ असा दावा केला होता त्याच गटाने ‘त्यांच्यावर’ सूड घेतला गेला या आनंदात, आठ वर्षांच्या चिमुरडीवर अनेकांनी अनेकवार केलेला बलात्कार अप्रत्यक्षरित्या समर्थनीय ठरवला होता. त्यावेळी मात्र पोलिसांनी जाहीर केलेल्या आरोपींना गुन्हेगार मानायची त्यांची तयारी नव्हती. उलट आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चे काढले गेले.

जनता ही अशी स्वार्थी नि नीच वृत्तीची असते. बहुसंख्य प्रत्यक्ष कृती करत नसले, तरी त्यांच्यात ती प्रवृत्ती जिवंत असते. म्हणून असिफावर केलेल्या बलात्काराने ती तिला विकृत आनंद होतो, चार फाटक्या जिवांच्या एन्काउंटरने तिला कृतकृत्य झाल्यासारखे वाटते, एखाद्या मद्यधुंद हिंदी हीरोने गाडीखाली चिरडलेल्या पाच जिवांना न्याय मिळावा यापेक्षा, त्याची सुखरूप सुटका व्हावी यासाठी देव पाण्यात घालून बसते...

... आणि हीच जनता जेलर ग्लाडने क्षुल्लक कारणाने बडवून काढलेल्या कैद्यांबद्दल काडीची सहानुभूती न राखता, ‘मग काय गुन्हेगारच तर आहेत’ म्हणत निर्लज्ज समर्थन करते! पण नेमक्या त्याच वेळी नक्षलवाद्याने केलेल्या तशाच प्रकारच्या कृतीला ती भयंकर समजते, त्याला तातडीने फाशी दिली पाहिजे असे म्हणते. आणि आता हे एकदा सोयीचे झाले की गैरसोयीची मते मांडणार्‍या कुणालाही ’अर्बन नक्षलवादी’ असल्याचा शिक्का मारुन तुरुंगात घालू पाहाते... कारण ‘सध्या’ नक्षलवादी सत्ताधारी नाहीत ! असते, तर त्यांचे मूल्यमापन वेगळे झाले असते !

दुसरीकडे वीरभूषण पटनाईक हा पोलिस चौकी उडवून सात पोलिस आणि एक सब-इन्स्पेक्टरची हत्या केल्याबद्दल फाशीची शिक्षा झालेला नक्षलवादी. मार्क्सवादाचा हा अतिआक्रमक अवतार नक्षलवाद मध्यपूर्व भारतात अजूनही मूळ धरुन आहे. नक्षलवादी लोकशाही व्यवस्था आपापत:च भांडवलशाहीची बटीक आणि म्हणून शोषक मानतात. या व्यवस्थेचे सर्व घटक हे शोषकांचे हस्तक आहेत असे ते मानतात. लोकशाही व्यवस्थेची उपव्यवस्था असलेल्या दंडव्यवस्थेचे नि न्यायव्यवस्थेचे प्रतिनिधी असलेले पोलिस आणि अन्य सशस्त्र दले त्यांचे शत्रू आहेत. इतकेच नव्हे तर लोकनियुक्त प्रतिनिधी, प्रशासनातील लोक, त्यांच्या वतीने लोकाभिमुख कार्य करणारेही अप्रत्यक्षरित्या या ‘शोषक’ व्यवस्थेचे आधार असल्याने क्रांतीचे शत्रू आहेत असा त्यांचा दावा असतो.

ती लोकशाही व्यवस्था उलथून टाकून नवी लोकाभिमुख व्यवस्था उभी करण्याचा उद्देश असल्याचा दावा करतात. सर्वात महत्वाचा मुद्दा हा की या त्यांच्या तथाकथित ‘स्वातंत्र्यलढ्यात’ हिंसेचा वापर ते त्याज्य मानत नाहीत. किंबहुना तेच त्यांचे मुख्य हत्यार आहे. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेला समांतर अशा ‘पीपल्स कोर्ट’ नामक व्यवस्थेकरवी त्यांचा निवाडा करण्याचा त्यांचा प्रघात आहे. आणि अशा क्रांतिशत्रूंना त्यांच्याकडे एकच शिक्षा आहे, देहदंड !

थोडक्यात आजच्या लोकशाहीमध्येही ‘कॉल द डॉग मॅड अ‍ॅंड शूट हिम’ मानसिकतेच्या बहुसंख्येला अभिप्रेत असलेली व्यवस्थाच नक्षलवादालाही अभिप्रेत आहे. आणि म्हणून उद्या नक्षलवादी व्यवस्था प्रस्थापित झाली, तर ग्लाडप्रमाणेच देशभक्तीची जपमाळ पेटीत ठेवून, देशभक्तीचा झगा उतरवून, बहुसंख्य लोक लाल कफनी चढवतील आणि न पटणारी मते मांडणार्‍याला ‘देशद्रोही’ वा ‘अर्बन नक्षलवादी’ म्हणण्याऐवजी ‘क्रांतिशत्रू’ किंवा ‘प्रतिक्रांतिवादी’ म्हणून हिणवू लागतील. त्यांच्या दृष्टीने फरक झाला तर इतकाच होईल. आणि म्हणून मि. ग्लाड अशा जनतेचा डार्लिंग असतो.

मि. ग्लाड हा ही आपल्या व्यवस्थेच्या अंतर्गत गुन्हेगारांविरोधात हिंसेचा सढळपणे वापर करणारा आहे. त्याअर्थी हे दोघे दोन विरोधी व्यवस्थांमधले एकमेकांचे प्रतिबिंबच म्हणावेत असे. तो तुरुंग म्हणजे ग्लाडसाहेबाचे साम्राज्य. तिथले कर्मचारीच काय पण त्या आसमंतातले सजीव-निर्जीव सारेच साहेबासमोर चळचळा कापणारे. नक्षलवादी प्रमुख तुरुंगाधिकारी असलेल्या ग्लाडला ‘साहेब’ या उपाधीने न संबोधता सरळ ‘मि. ग्लाड’ म्हणून संबोधतो आहे. एक प्रकारे त्याच्या सत्तास्थानाला, अधिकाराला आणि पर्यायाने तो ज्या व्यवस्थेचा भाग आहे तिच्या सार्वभौमत्वाला आपण नाकारतो असा स्पष्ट संकेत देतो आहे.

ग्लाडची ख्याती पाहता सुरुवातीला एकतर्फी होईल असा सामान्य तर्क असलेला दोघांचा सामना पाहता-पाहता तुल्यबलांचा होऊन जातो. बाहुबळ, हिंसा ही प्रमुख हत्यार मानणार्‍या दोघांचा हा सामना मात्र मनोबलाचा सामना होऊन राहतो. आणि या कादंबरीचे तेच वैशिष्ट्य आहे. यात कुठेही लोकशाही आणि नक्षलवादाला अभिप्रेत असलेल्या व्यवस्थांचा, दष्टिकोनाचा संघर्ष नाही. संघर्ष आहे तो दोन व्यक्तिंमधला. ताठ मानेचा ग्लाड आणि ताठ कण्याचा वीरभूषण यांच्यातला !

संघर्षाच्या अखेरीस ग्लाडची मान किंचित झुकते. ब्रिटिशांची चाकरी करत असताना भारतीय स्वातंत्र्यसैनिकांना त्याने गुन्हेगारांप्रमाणे निष्ठुरपणे वागवले होते. पण वीरभूषणला तो निव्वळ गुन्हेगार न मानता क्रांतिकारक म्हणून मान्यता देतो. अर्थात याचा अर्थ त्याला नक्षलवाद्याची विचारधारा पटली आहे असा नाही. व्हॉल्टेअरच्या उक्तीला अनुसरून आपल्याला न पटणार्‍या विचारधारेचा निष्ठावान पाईक म्हणून त्याला तो क्रांतिकारक म्हणतो आहे. आणि याला त्या नक्षलवाद्यामधल्या माणसाचे त्याला झालेले दर्शन अधिक कारणीभूत आहे. दुसरीकडे लोकशाही धिक्कारुन पर्यायी व्यवस्थेच्या निर्मितीसाठी शस्त्र उचलणार्‍या नक्षलवाद्याचा स्वत:च्या स्थानाबद्दलचा भ्रमनिरासही ग्लाडमुळे होतो. त्याअर्थी त्याचा कणाही झुकतो आहे.

या सार्‍या संघर्षात उल्लेखनीय आहे ते वीरभूषण पटनाईकचे मृत्युपत्र. हा एक दखलपात्र ऐवज आहे. ‘फक्त श्रमातूनच संपत्ती निर्माण होते’ (यातील ‘फक्त’ या शब्दाला माझा आक्षेप आहे, पण ते असो.) या मूलभूत सिद्धांताच्या आधारे मार्क्सचे विवेचन उभे आहे. आणि त्याच्या विचारव्यूहातून पुढे निर्माण झालेले नक्षलवादासारखे वेगळे प्रवाहदेखील त्यावर निष्ठा असलेलेच आहेत.

पण यामुळे मानवी शरीर ही वैय्यक्तिक संपत्ती मानली जावी आणि फाशीच्या कैद्याच्या मृत्यूनंतर त्याची भौतिक संपत्ती ज्याप्रमाणे वारसांना वा त्याने इच्छा व्यक्त केल्यास अन्य कुणाला हस्तांतरित केली जाते त्याप्रमाणॆ आपल्या शरीराचेही व्हावे अशी अभिनव मागणी तो करतो आहे. त्याच्या मते त्याची शिक्षा ही त्याचा जीव घेण्याची आहे, आणि त्यात तो आडकाठी आणू इच्छित नाही. पण त्याचबरोबर आपल्या मालकीच्या संपत्तीची विल्हेवाट लावण्याची मुभा तो मागतो आहे.

पण आणखी एक मुद्दा असा, की त्याच्या तत्त्वज्ञानामध्ये सर्वकल्याणकारी शासन हे सार्वभौम नि सर्वहक्कधारक असणे अपेक्षित आहे, वैय्यक्तिक अधिकाराला त्यात फारसे स्थान नाही. राष्ट्रहिताच्या, समाजहिताच्या दृष्टीने व्यक्तीच्या भवितव्यासंबंधी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार सत्ताधार्‍यांना दिलेले असतात. त्या अर्थी खरेतर आपल्या मृत्युनंतर – संपत्ती असलेल्या – आपल्या शरीररूपी मत्तेचे काय करावे हे सांगण्याचा अधिकार त्याला नाही. त्याच्या उदात्त विचारांतही असा गंमतीशीर विरोधाभास प्रकटतो आहे.

हे मृत्युपत्र वास्तवाशी संबंध जोडणारे आहे. अनिल बर्वे ‘रणांगण’ नावाचे डाव्या विचाराचे पाक्षिक चालवत असताना नागभूषण पटनाइक नावाच्या एका नक्षलवाद्याचे मृत्युपत्र त्यांच्या वाचनात आले. त्यात त्याने नेत्रदान, मूत्रपिंडदान करुन नंतर आपले देहदान करावे अशी इच्छा व्यक्त केली होती. हे मृत्युपत्र त्यांनी ‘रणांगण’मध्ये ‘वधस्तंभावरील जाहिरनामा’ म्हणून प्रसिद्ध केले होते.

डाव्या वा नक्षलवादी विचारधारा पटो अथवा न पटो, या मृत्युपत्रातील भावनेशी बहुतेक विचारी माणसे सहमत असावीत. याच मृत्युपत्राच्या आधारे त्यांनी पुढे ‘थॅंक यू, मिस्टर ग्लाड’ ही कादंबरी लिहिली, पुढे त्यावर त्याच नावाचे नाटकही लिहिले. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या दिग्दर्शनाखाली रंगभूमीवर ते सादर झाले आणि प्रभाकर पणशीकर यांनी त्यातील जेलर ग्लाड साकारला होता.

असाच मनोबलाचा, डावपेचाचा सामना गो. पु. देशपांडे यांच्या ‘उध्वस्त धर्मशाळा’ या नाटकात रंगवला गेला आहे. अतिडाव्या विचारांचा प्रसार केल्याबद्दल वा त्या विचारांवर निष्ठा असणार्‍या संघटनांशी संबंध असल्याचा आरोप असलेले प्रा. श्रीधर कुलकर्णी आणि त्यांच्या चौकशी समितीचे प्रमुख असलेले शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष आणि मंत्री पी.वाय. पाटील यांच्यात हा सामना होतो आहे. पी.वाय. हा कधीकाळीचा कुलकर्णींचा मित्र नि सहप्रवासी; काळाची पावले ओळखून व्यवहारवादाची कास पकडून त्यांच्यापासून दूर गेलेला.

असेच आणखी एक नाटक म्हणजे पु.ल. देशपांडे यांचे ‘एक झुंज वार्‍याशी’. त्यात तत्व म्हणून, सामाजिक बांधिलकी म्हणून संघर्ष करणारा ‘माणूस’ आणि उपमंत्री डॉ. देशमुख यांचा परस्परांच्या मनात घुसून समोरच्याला नमवण्याचा प्रयत्न आहे.

एक जरा वेगळे उदाहरण सापडले ते कन्नड लेखक ‘अग्नी’ श्रीधर यांच्या ‘एदेगरिके’ या कादंबरीमध्ये. गुन्हेगारी विश्वातील शह-काटशहाच्या राजकारणात मृत्यू अपरिहार्य झाल्यावर ‘...ग्लाड’मधील नक्षलवाद्याप्रमाणे ताठ मानेने त्याला सामोरा जाणारा ‘तो’ मला सापडला. तोही नक्षलवाद्याप्रमाणे किंवा ‘माणसा’प्रमाणेच मानसिक डावपेचांतून आपल्या हत्येची जबाबदारी दिलेल्या शूटरकडून ते वदवून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याला हे ठाऊक आहे हे ठाऊक असूनही ते स्पष्टपणे चर्चेत येऊ देणे शूटर टाळतो आहे. एक योगायोग असा की ‘एक झुंज वार्‍याशी’ मधील माणूस आणि हा ‘तो’ या दोघांनाही नावे नाहीत. त्यांचा उल्लेख सामान्यनामाने अथवा सर्वनामानेच होतो.

‘...ग्लाड’मध्ये वीरभूषणने जेनीची प्रसूती करण्याच्या आणि ताठ कण्याच्या कैद्याप्रती जेलरच्या मनात सहानुभूती निर्माण होण्याच्या प्रसंगांच्या आवृत्या पुढे नाटक-चित्रपटांत पुन्हा पुन्हा येत राहिल्या. ‘थ्री इडियट्स’ या लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटामधील प्रि. सहस्रबुद्धेंच्या मुलीच्या प्रसूतीचा क्लायमॅक्स आठवून पाहा. तशीच धुवांधर पावसाळी रात्र, तसेच तुंबलेले रस्ते, तसाच तुटलेला संपर्क आणि प्रिन्सिपलच्या नावडत्या विद्यार्थ्यानेच केलेली त्याच्या मुलीची प्रसूती ! ‘मी नथुराम गोडसे बोलतोय...’ मध्ये वैचारिकदृष्ट्या दुसर्‍या अक्षावर असलेल्या– पण नक्षलवाद्याप्रमाणेच हिंसा हे हत्यार समर्थनीय मानणार्‍या नथुरामच्या व्यक्तिमत्वामध्ये नाटककाराने वीरभूषण पटनाईकचे बरेच रंग मिसळून दिलेले दिसतात. त्यातील जेलर शेखची तर वाक्येच्या वाक्ये ग्लाडची आठवण करुन देतात.

- oOo -

‘थँक यू, मिस्टर ग्लाड’ या कादंबरीतील दोन वेचे इथे ‘वेचित चाललो...’ वर समाविष्ट केले आहेत.

नो थँक्यू, मि. ग्लाड >>
शरीरम् धनसंपदा >>

संबंधित लेखन:
वीरभूषण, ग्लाड आणि आपण >>
---

लेखनाविषयी:
अनिल बर्वे यांची बराच काळ डाव्या विचारांना आणि नक्षलवादाला सहानुभूती होती. अतिडाव्या विचारांचा प्रसार करणारे लेखन केल्याबद्दल त्यांना दीड वर्षे तुरुंगवासही भोगावा लागला. पुढे न्यायालयाने सरकारवर ताशेरे झोडून त्यांना मुक्त केले असले, तरी या दरम्यान ‘कमराडरी’ (बांधिलकी) पासून तयार झालेला कॉम्रेड हा शब्द श्रीयुत या संबोधनाऐवजी वापरणार्‍या त्यांच्या डाव्या मित्रांची तकलादू बांधिलकी त्यांना अनुभवायला मिळाली. त्यानंतर त्यांनी बव्हंशी लेखनाकडेच लक्ष केंद्रित केले.

‘हमिदाबाईची कोठी’सारखे अतिशय गाजलेले नाटक पुढे त्यांनी लिहिले. याशिवाय ‘डोंगर म्हातारा झाला’ ही लघुकादंबरीही बरीच गाजली. माझ्या वाचनात आलेली त्यांची आणखी दोन नाटके ‘पुत्रकामेष्टी’ आणि दुसरे ‘मी स्वामी या देहाचा’. पैकी पहिल्यामध्ये त्यांनी सरोगेट मदरहूड या संकल्पनेच्या शक्यतांभोवती नाट्य रचले आहे तर ‘मी स्वामी...’ मध्ये पुन्हा वीरभूषणच्या मृत्युपत्रातील मूळ तत्वाशी नाते सांगणार्‍या इच्छामरणाच्या संकल्पनेभोवती कथानक उभे केले आहे. ही दोन नाटके बर्वे यांनी चाळीस वर्षांपूर्वी लिहिली. पुत्रकामेष्टीचा पहिला प्रयोग १९८० मध्ये तर ‘मी स्वामी...’ १९८२ मध्ये रंगभूमीवर आले. हे दोन विषय आपल्या समाजात आजही फारसे चर्चिले जात नाहीत ! त्या तुलनेत ‘हमिदाबाईची कोठी’ने मांडलेला विषय पुढे बराच चर्चेत आणि कलाकृतींमध्ये सापडत राहिला. अद्यापही पुरेसे नसले, तरी शासकीय, बिगरशासकीय पातळीवर त्या अनुषंगाने सतत काम होत आले आहे.

लेखकाविषयी:
अनिल बर्वे हे शाहीर अमरशेख यांचे जावई आणि ‘दलित पँथर’चे अध्वर्यू नामदेव ढसाळ यांचे साडू. त्यांची मुलगी फुलवा खामकर या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका आहेत. त्यांचे चिरंजीव राही अनिल बर्वे हे अलिकडे गाजलेल्या ‘तुंबाड’ या भयपटाचे सहलेखक आणि सहदिग्दर्शक. त्यांचा ‘मांझा’ हा लघुपटही गाजला आहे. ‘पूर्णविरामानंतर’, ‘आदिमायेचे’ हे दोन कथासंग्रहदेखील प्रकाशित झाले आहेत.

---


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा