मिरानशाह हे आरएएफचं(१) हिंदुस्तानातलं सर्वांत लहान ठाणं अफगाण सीमेपासून दहा मैलांवर होतं. पठाणांचे तिथं वारंवार हल्ले होत असत. काटेरी तारांच्या कुंपणानं वेढलेल्या भूभागावर विटा आणि माती यांनी उभारलेल्या गढीवजा वास्तूला मिरानशाह फोर्ट म्हणत. आजूबाजूचा प्रदेश डोंगराळ होता.
मिरानशाह इथं आरएएफचे सव्वीसजण आणि पाचशे हिंदुस्तानी जवान राहत. मात्र हे दोन्ही गट गढीत वेगवेगळ्या कक्षांत राहत असल्यानं त्यांचा एकमेकांशी क्वचितच संबंध येई.
आरएएफच्या लोकांचं काम म्हणजे विमानाच्या धावपट्टीची देखभाल करणं. दिवसा त्यांना काटेरी कुंपणाच्या बाहेर जाण्यास मज्जाव होता, तसाच रात्री गढीबाहेर जाण्यास. रोज रात्री कडक पहारा आणि सर्चलाइटच्या झोतांची अविरत दिवाळी असे.
लॉरेन्सनंच म्हटल्याप्रमाणे, आरएएफचे लोक आणि हिंदुस्तानी यांचा संपर्क नसल्यानं मिरानशाहमध्ये माणसांचा आवाज नसे, पक्ष्यांचा नसे आणि जनावरांचाही नसे. अपवाद एकच. रोज रात्री सर्चलाइट्स सुरू झाल्यावर दहाच्या सुमारास कोल्ह्यांची मात्र पाचेक मिनिटं ‘कुई-मैफल’ चाले.
मिरानशाहमधली नीरव शांतता खूपच गूढ आणि काहीशी अभद्रानं सावटलेली वाटे.
लॉरेन्सला इथलं जवळजवळ एकांतवासाचं वातावरण मानवण्यासारखं होतं. त्यानं ट्रेंचार्डना धाडलेल्या पत्रात आपला सेवाकाल आणखी पाच वर्षांनी वाढवून देण्याची विनंती केली आणि ती मान्यही झाली. परंतु इंग्लंडमधल्या त्याच्या कित्येक मित्रांना ही गोष्ट मुळीच रुचली नाही. ते बिचारे त्याला इंग्लंडमध्ये परत आणण्याचा सारखा प्रयत्न करत होते.
अफवाच अफवा चोहीकडे...
कराचीतल्या नोकरीत लॉरेन्स रुळत चालला होता. पण वर्ष उलटण्याच्या आतच एकाएकी त्याच्यावरून एक वादळ निर्माण झालं. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर ते किती प्रचंड स्वरूप धारण करणार आणि त्यात फॉरेन ऑफिस, इंडिया ऑफिस, हिंदुस्तानचे व्हाइसरॉय, काबूलमधले ब्रिटिश मंत्री, चीफ ऑफ एअर स्टाफ, आरएएफची परदेशातली तीन ठाणी, शाही नौदल तसंच दोन ब्रिटिश संसद सदस्य गुंतले जाणार, याची त्या वेळी कुणालाच कल्पना नव्हती.
हे वादळ निर्माण केलं होतं, वृत्तपत्रांनी. त्यामुळं ब्रिटिश सरकारची फारच मोठी पंचाईत होऊन बसली.
पण या साऱ्याचा केंद्रबिंदू असलेल्या लॉरेन्सला मात्र त्याची काहीच गंधवार्ता नव्हती.
काही दिवसांपासून त्याच्याविषयी अनेक अफवा पसरू लागल्या होत्या. त्याला लांबच्या आणि जवळजवळ एकाकी ठिकाणी पाठवण्यात आलं आहे, त्यामागं नक्कीच काहीतरी राजकीय हेतू असल्याच्या या वावड्या होत्या. इराकमधल्या परिस्थितीच्या संदर्भातील लॉरेन्स आणि ट्रेंचार्ड यांच्यातल्या पत्रव्यवहाराची कुणाला तरी कुणकुण लागली असण्याची शक्यता होती.
लॉरेन्स पश्चिम आशियातला गुंता सोडवण्याच्या कामात गढला आहे, अशा आशयाची एक वृत्तकथा जुलैमध्ये ‘न्यू यॉर्क सन’ या वृत्तपत्रानं छापून एकूण प्रकरणाची नांदी केली. सध्या तो येमेनमध्ये असल्याचाही त्यानं हवाला दिला. वस्तुतः तो मिरानशाहच्या कुंपणाबाहेरही पडला नव्हता.
सप्टेंबरमध्ये ‘न्यू यॉर्क वर्ल्ड’नं तर वेगळाच सनसनाटी जावईशोध लावला. त्यानं छापलं, की लॉरेन्स मुसलमान फकिराचा वेश धारण करून हेरगिरी करत वावरतो आणि एतद्देशीय बायका दृष्टनिवारणार्थ आपल्या मुलांना त्याच्याकडे घेऊन येतात.
अशाच प्रकारचं एक वृत्त त्याच महिन्यात लंडनच्या ‘ईव्हनिंग न्यूज’मध्ये झळकलं. त्यात पुढं आणखी पुस्ती जोडली होती, की लॉरेन्स अमृतसरमध्ये एका अज्ञात ठिकाणी राहत असून तिथल्या कम्युनिस्टांच्या हालचालींचा वेध घेत आहे.
अफवांचं नुसतं पेवच फुटलं. कुणी म्हणत, की तो अफगाणिस्तानात राहून ब्रिटिश सरकारसाठी अफगाण जीवनशैलीचा अभ्यास करत आहे(२); तिथल्या लोकांची मतं, विचार जाणून घेत आहे. कुणी छातीठोकपणे लिहिलं, की अफगाणिस्तानात जाण्याआधी सध्या लॉरेन्स पुश्तू भाषेचे धडे गिरवण्यात व्यस्त आहे. ‘न्यू यॉर्क हेरल्ड ट्रिब्यून’नं दावा केला, की लॉरेन्स सरहद्द ओलांडून अरब वेशात अफगाणिस्तानात गेला आहे. तिथं तो म्हणे, ग्रेट ब्रिटन आणि अमीर अमानुल्ला यांच्यातल्या तहाबाबतची बोलणी करणार आहे.
हिंदुस्तानी वर्तमानपत्रंही आता इंग्लिश वृत्तपत्रांच्या सुरात सूर मिळवू लागली. हिंदुस्तानी राष्ट्रीय चळवळीचे एक नेते लाला लजपत राय यांच्या अंत्यसंस्कारांच्या वेळी लॉरेन्स फकिराच्या वेशात उपस्थित होता, असं एका पत्रानं छापलं. त्यामुळं तो वास्तवात हिंदुस्तानी स्वातंत्र्य चळवळीतल्या लोकांवर नजर ठेवण्याची हेरगिरी करत असल्याचा आरोप करण्याची सोव्हिएत श्रेष्ठींना आयतीच संधी मिळाली.
नोव्हेंबर १९२७ मध्ये अफगाणिस्तानात शिनवारी जमातीच्या लोकांनी बंड पुकारलं. तिथं जवळजवळ यादवी युद्धाचीच परिस्थिती निर्माण झाली. लॉरेन्सचं अर्थातच याच्याशी काहीच देणंघेणं नव्हतं. पण १६ डिसेंबर १९२८ च्या ‘एम्पायर न्यूज’ या ब्रिटिश साप्ताहिकात एक वृत्तकथा प्रसिद्ध झाली आणि तिनं खळबळ उडवून दिली.
या वृत्तकथेचा लेखक होता, कुणी डॉ. फ्रान्सिस हॅवलॉक. त्याच्याबद्दल संपादकीय टिपेत दिलेल्या माहितीनुसार तो वैद्यकीय सेवाव्रती (मेडिकल मिशनरी) असून नुकताच अफगाणिस्तानातून लंडनला परतला होता. त्याच्या वृत्तकथेचा एकूण सारांश असा—
“नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात कर्नल लॉरेन्स याचं अफगाणिस्तानात आगमन झालं. या मुक्कामात त्याचं राजेसाहेब, पोलीस-प्रमुख आणि युद्धमंत्री यांच्याशी खलबत झालं. त्यानंतर तो लागलीच जसा आला, तसाच निघून गेला... इथल्या पर्वतामधल्या कुठल्यातरी अज्ञात गुहेत एक हाडकुळा माणूस वावरताना दिसतो. त्याच्या एकूण वेशावरून तो फकीर वाटतो. पण तो आहे कर्नल लॉरेन्स. ब्रिटिश साम्राज्यातला सर्वांत गूढ, रहस्यमय माणूस. पूर्वेकडला ब्रिटिशांचा अग्रदूत... सध्याची लढाई द्वेषप्रसारक आणि शांतताप्रसारक यांच्यातली आहे... ट्रेबिट्स्क लिंकनपाशी (माजी हेर, माजी ब्रिटिश खासदार, चीनमधला सोव्हिएत सरकारचा हस्तक) सोनं आणि रायफली आहेत. डोंगरी लोकांना दोन्ही आवडतात. लॉरेन्सकडे काय आहे, ते ठाऊक नाही. मात्र रुपेरी जिव्हेची त्याला जन्मजात देणगी आहे.”
ही वृत्तकथा म्हणजे मुद्दाम रचलेली एक भाकडकथाच होती. हिंदुस्तान सरकारनं डॉ. फ्रान्सिस हॅवलॉक याचा शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण अशी कुणीही व्यक्ती अस्तित्वात असल्याचं आढळून आलं नाही. शेवटी ‘एम्पायर न्यूज’ला त्या वृत्तकथेत काहीच तथ्य नसल्याचं जाहीर करणं भाग पडलं. पण तिनं निर्माण केलेला हाहाकार थांबवण्यास आता बराच उशीर होऊन गेला होता.
डॉ. हॅवलॉकची वृत्तकथा ‘फ्री प्रेस मेल सर्व्हिस’ नामक यंत्रणेद्वारा तारेनं हिंदुस्तानात येऊन पोचली. तिथं ती मोठ्या प्रमाणात प्रसृत झाली. लॉरेन्स हिंदुस्तानी राष्ट्रीय चळवळीतल्या लोकांवर नजर ठेवून हेरगिरी करत असल्याच्या संशयाला अधिकच बळकटी आली. लोकांत प्रक्षोभ माजला. लाहोरमध्ये एका खऱ्याखुऱ्या फकिराला तो लॉरेन्सच असल्याच्या संशयावरून संतप्त जमावानं बेदम मारहाण केली.
अफगाण सरकारला संशय
आणखी एक गंभीर गोष्ट म्हणजे काबूलमधल्या ब्रिटिश प्रतिनिधीमंडळाच्या प्रमुखाचा एकूण प्रकरणातला हस्तक्षेप. त्यानं ३ जानेवारी १९२९ रोजी या संदर्भात हिंदुस्तान सरकारला सविस्तर तार केली. तारेचा गोषवारा असा—
“लॉरेन्स ‘शॉ’ या नावानं अफगाण सरहद्दीलगतच्या एका तळावर कारकून म्हणून काम करत असल्याच्या माहितीनं त्याच्याविषयीच्या अफवांना अधिक बळ मिळालं. त्यामुळं तर अफगाण सरकारचा संशय अधिकच दृढ झाला आहे. त्या सरकारला वाटतं, की तो आपल्याविरुद्ध काहीतरी गुप्त कटकारस्थान करतो आहे. या संशयाबाबत आगीत तेल ओतण्याचं काम तुर्की, रशियन आणि अर्थातच फ्रेंच राजदूतांनी चालवलं आहे(३). अफवांचा आता कितीही इन्कार केला, तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. प्राप्त परिस्थितीत एकच मार्ग दिसतो. तो म्हणजे आरएएफला विनंती करून लॉरेन्सला लवकरात लवकर सरहद्दीपासून लांब कुठेतरी पाठवण्यात यावं.”
हिंदुस्तान सरकारचं या संदर्भात हिंदुस्तानातल्या आरएएफचा प्रमुख जॉफ्री सामंड याच्याशी बोलणं झालं. दुसऱ्याच दिवशी सामंडनं एकूण प्रकरण ट्रेंचार्डना कळवलं. त्याच्या तारेचा आशय असा–
“हिंदुस्तानातल्या शांतताभंगाच्या, दहशतवादी घटनांशी गेल्या काही दिवसांपासून लॉरेन्सचं नाव जोडलं जात आहे. देशी वर्तमानपत्रांत तर अलीकडे म्हटलं गेलं आहे, की लाहोरमधल्या बॉम्बस्फोटाच्या मागं लॉरेन्सच आहे... अफगाणिस्तानात कटकटी सुरू झाल्यापासून ही पत्रं रशियन प्रचारमोहिमेच्या आहारी जाऊन सांगू लागली आहेत, की शिनवारींच्या बंडामागंही लॉरेन्सच असून त्यासाठीच तो मिरानशाह इथं मुक्काम ठोकून आहे. आपण अर्थातच एका अधिकृत निवेदनाद्वारे या साऱ्याचा स्पष्ट इन्कार केला आहे...
“परराष्ट्र कार्यालयाशी झालेल्या चर्चेत त्यांनी लॉरेन्सला परत मायदेशी पाठवून देण्यावर भर दिला. मला हे वेडेपणाचं वाटतं. मी माझी हरकत नोंदवली. लॉरेन्सला शाही हवाई दलात राहण्याचा पूर्ण हक्क आहे... ते काहीही असलं, तरी परराष्ट्र सचिवांनी मला कळवलं आहे, की अफगाणिस्तानातल्या बंडामागं आपणच (ब्रिटिश) असून लॉरेन्स त्याचं नियोजन करतो आहे, अशी जोरदार प्रचारमोहीम काबूलमध्ये उघडण्यात आली आहे. त्यामुळं परराष्ट्र सचिवांना वाटतं, की अशा एकूण परिस्थितीत लॉरेन्सनं हिंदुस्तानात कुठंही राहणं आपल्याला गैरसोयीचं, अडचणीत आणणारं ठरेल. आपण या बाबतीतले आपले विचार कृपया कळवावेत.”
एकंदरीत अरबस्तानात लॉरेन्सनं जो काही लौकिक संपादन केला होता, त्याचं जणू भूतच परत त्याच्या मानगुटीवर बसू पाहत होतं. दूरान्वयानंही त्याचा ज्याच्याशी सुतराम संबंध नव्हता, अशा गोष्टींत तो नाहक ओढला गेला होता आणि त्याचा काहीही दोष नसताना त्याला हिंदुस्तानबाहेर घालवून देण्याचा घाट घातला जात होता.
हिंदुस्तानातून उचलबांगडी
बाहेरच्या जगात आपल्यावरून चाललेल्या या एकंदर घटनांची लॉरेन्सला अर्थात काहीच कल्पना नव्हती. मिरानशाहमधला त्याचा जीवनक्रम सुशेगाद चालला होता. फावल्या वेळात (आणि तो भरपूरच होता.) होमरच्या ‘ओडिसी’च्या भाषांतराचं त्याचं काम चालूच होतं. मनात फक्त एकच धाकधूक होती. आर्थिक काटकसरीच्या कारणावरून हिंदुस्तान सरकार १९२९ च्या वसंतात मिरानशाहचं ठाणं बंद करण्याचं ठरवत होतं.
सामंडची तार मिळताच ट्रेंचार्डनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि लागलीच हालचालींना सुरुवात केली. त्यांनी सामंडला उत्तर पाठवलं–
“लॉरेन्सला आपण हिंदुस्तानबाहेर हलवलं काय किंवा न हलवलं काय किंवा काहीही केलं, तरी त्याच्याविषयीचा प्रचार हा चालूच राहणार आणि लोक काही आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत. हिंदुस्तानातून त्याची बदली करण्यास मी मान्यता देतो. तेव्हा तुम्ही जरा लॉरेन्सला एक गोष्ट विचारून पाहाल काय? त्याला एडनला जायला आवडेल काय? का सोमालीलँडला दोघातिघांच्या छोट्या गटात काम करायला आवडेल? का सिंगापुरात वर्षभरासाठी? का लंडनलाच परतायला? माझ्याकडून शक्य होईल, तेवढी मदत त्याला करायची आहे.”
८ जानेवारीस लॉरेन्सला तातडीनं विमानानं मिरानशाहहून प्रथम लाहोरला नेण्यात आलं. तिथं त्याला सामंडचं पत्र मिळालं. त्यात मध्यंतरीच्या सर्व घडामोडींची थोडक्यात माहिती देऊन ट्रेंचार्डचे पर्याय त्याच्यापुढं ठेवण्यात आले होते. लॉरेन्सनं इंग्लंडला परतणं पसंत केलं. त्याप्रमाणे त्याच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. १२ जानेवारी रोजी लॉरेन्स मुंबईहून ‘एस. एस. राजपुताना’ या बोटीनं हिंदुस्तान सोडून निघाला.
त्यानं हिंदुस्तान सोडला, तरीही अफगाणिस्तानातील त्याच्या तथाकथित कारवायांविषयीच्या वृत्तपत्रीय बातम्या-चर्चाची गुर्हाळं काही थांबली नव्हती. इतकंच नव्हे, तर मुंबईहून बोटीनं इंग्लंडला रवाना झाला, तो लॉरेन्स नसून त्याच्यासारखाच दिसणारा त्याचा डमी असल्याचीही अफवा उठवण्यात आली. एकानं तर त्याहीपुढं जाऊन लॉरेन्सच्या पुढच्या पुस्तकाचं नाव ‘रिव्होल्ट इन अफगाणिस्तान’(४) असल्याचं जाहीर करून टाकलं. एका जर्मन वृत्तपत्राच्या प्रतिभाशाली वार्ताहरानं ‘आतली बातमी’ म्हणून सांगून टाकलं, की अफगाणिस्तानात लॉरेन्स ही एकूणच कथा बनावट असून लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘रिव्होल्ट इन द डेझर्ट’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी निर्माण केलेला एक स्टंट आहे(५).
भर समुद्रातलं नाट्य
‘एस. एस. राजपुताना’वर फारसे उतारू नव्हते. लॉरेन्सला दुसऱ्या वर्गाची स्वतंत्र केबिन देण्यात आली होती. तिच्यातून तो क्वचितच बाहेर पडे. बराचसा वेळ तो ‘ओडिसी’च्या भाषांतराच्या कामातच घालवी. त्याचा वेळ छान मजेत जात होता.
वाटेत पोर्ट सैदला त्याची बोट कोळसा भरण्यासाठी थांबली. लॉरेन्सला बोट सोडून किनाऱ्यावर जाण्याची परवानगी नव्हती. मात्र आरएएफचा एक अधिकारी बोटीवर चढला आणि त्यानं त्याला ट्रेंचार्ड यांचं एक पत्र दिलं. पत्रात लॉरेन्ससाठी काही सूचना होत्या–
“तुझ्या आगमनासरशी वर्तमानपत्रांचे लोक तुला गाठून तुझी मुलाखत तसंच तुझी छायाचित्रं घेण्याचा प्रयत्न करतील, अशी मला भीती वाटते. तू त्यांना मुलाखत देण्याचं शक्य तेवढं टाळ. प्लायमाउथला तू बोटीतून उतर. तुझी भेट घेण्यासाठी मी कुणाला तरी पाठवत आहे. तो माणूस साध्या कपड्यातला असेल. प्लायमाउथपासून तू रजेवर जाऊ शकतोस. मात्र लवकरात लवकर मला येऊन भेट.”
लॉरेन्स इंग्लंडला पोचताक्षणीच टपून बसलेले वार्ताहर त्याला हेरून त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्याशिवाय राहणार नाहीत, हे आधीच हेरून हवाई मंत्रालयानं त्याला वाटेत प्लायमाउथलाच उतरवून एका नौदल अधिकाऱ्यानं लाँचमधून किनाऱ्यावर न्यायचं, अशी योजना आखली.
२ फेब्रुवारीला बोट प्लायमाउथला आल्यावर विंग कमांडर सिडनी स्मिथनं तिच्यात प्रवेश केला. त्याला मिळालेला आदेश अगदी साधासरळ होता. “लॉरेन्सला लवकरात लवकर आणि गुपचूप लंडनला घेऊन ये.”
स्मिथ आणि लॉरेन्स यांचा पूर्वपरिचय होता. स्मिथनं लॉरेन्सला ट्रेंचार्ड यांचं पत्र दिलं. त्याचप्रमाणे त्याच्यासाठी दिलेले दोन पौंडही. पत्रात ट्रेंचार्डनी त्याबद्दल लिहिलं होतं, “नवी घडी बसवताना तुला याची गरज असेल, नसेल. पण मी देत आहे. तुला वाटेल, तेव्हा तू ते परत करू शकतोस.”
स्मिथच्या संदर्भात त्यांनी लिहिलं होतं, “वार्ताहरांपासून मी तुझा बचाव करू शकत नाही. ते काम स्मिथ करील. तो तुला ‘राजपुताना’पासून रेल्वेपर्यंत बिनबोभाट घेऊन जाईल आणि तुझी इच्छा असल्यास या दोन टप्प्यांत कुठंही असलेल्या वार्ताहरांना तो हुलकावणी देईल.”
पण सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे सुशेगाद व्हायच्या नव्हत्या. प्लायमाउथ बंदरात ‘राजपुताना’ थांबली असताना तिच्या दुसऱ्या बाजूनं लॉरेन्सला दोरखंडाच्या शिडीवरून खाली उतरवून आधीच बोटीपाशी आणून ठेवलेल्या मोटर-बोटीतून गुपचूप स्टेशनकडे घेऊन जायचं, असा बेत होता. पण कसा कुणास ठाऊक, काहीतरी शिजतंय, असा वार्ताहरांना वास लागला होता. हवाई मंत्रालय एकूण ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळत होतं, त्यामुळं वार्ताहरांचं कुतूहल एकदम चाळवलं गेलं होतं.
हिंदुस्तानात जे काही घडत होतं, त्याच्याशी जर का लॉरेन्सचा संबंध नाही, तर मग त्याच्या पुनरागमनाबाबत एवढी गुप्तता का, असा प्रश्न साहजिकच वार्ताहरांच्या मनात निर्माण झाला. तेही मग सर्वतोपरी मागावर राहून प्लायमाउथला छोट्या नावांतून समुद्रात घुटमळत होते. लॉरेन्स शिडीवरून खाली उतरताना एका नावेतल्या ‘डेली मिरर’च्या छायाचित्रकाराला दिसला. लॉरेन्सच्या अंगावरच्या आरएएफच्या निळ्या गणवेशावरून त्यानं त्याला लागलीच ओळखलं. तो कॅमेरा सज्ज करेपर्यंत लॉरेन्स मोटर-बोटीत बसला होता. छायाचित्रकाराला तो तिथून वेगानं निघून जातानाची छायाचित्रं मिळाली.
फार्सिकल पाठलाग
इथून तडक प्लायमाऊथ स्टेशनवर जाऊन लंडनची ट्रेन पकडायची घाई करण्यापेक्षा आधी कॅटवॉटरला जाऊन शांतपणे न्याहारी उरकून घ्यावी, या विंग कमांडर स्मिथच्या सूचनेस लॉरेन्सनं संमती दिली. त्याप्रमाणे पोटपूजा आटोपून दोघे न्यूटन अॅबट स्टेशनवर गेले आणि तिथून लंडनला निघणारी पहिलीच गाडी त्यांनी पकडली. इथपर्यंत ठीक होतं.
पण तेवढ्यातच प्लायमाउथवरून लंडनला निघालेली ट्रेन स्टेशनात आली. स्मिथ आणि लॉरेन्स बसले होते, तो डबा वेगळा करण्यात येऊन प्लायमाउथच्या गाडीला जोडण्यात आला. नेमक्या त्याच गाडीत प्लायमाउथहून लंडनला परतणारे काही वार्ताहर होते. निळ्या गणवेशातली लॉरेन्सची छोटी मूर्ती त्यांनी लागलीच ओळखली.
पुढचं स्टेशन येताच या वार्ताहरांनी पटापट गाडीतून उड्या मारून आधी तिथलं तार ऑफिस गाठलं आणि लंडनमधल्या आपापल्या कार्यालयांना अखेर लॉरेन्स सापडल्याचं ‘सनसनाटी’ वृत्त देऊन टाकलं. पुढं काय वाढून ठेवलं आहे, याची स्मिथला चांगलीच कल्पना आली.
पॅडिंग्टनला पोहोचल्यावर तो आपल्या परीनं लॉरेन्सला वार्ताहरांच्या ससेमिऱ्यापासून दूर राखण्याचा प्रयत्न करू लागला. पण दस्तुरखुद्द लॉरेन्समहाशयांची मात्र एकूण प्रकारानं चांगलीच करमणूक होत असल्याचं त्याला दिसून आलं.
एका वार्ताहरानं लॉरेन्सला गाठून विचारलं, “तुमचं नाव शॉ आहे काय?”
“अर्थातच नाही!” लॉरेन्स जोरजोरात मान हलवून म्हणाला, “आपलं तर नाव स्मिथ आहे!”
वैतागलेल्या स्मिथनं मग खट्याळ लॉरेन्सला सरळ टॅक्सीत घातलं आणि ते निघाले. पण वार्ताहर एकदा गवसलेल्या सावजाला आता सहजासहजी थोडंच सोडणार! मग एखाद्या फार्सिकल कॉमेडीत शोभावा असा पाठलाग सुरू झाला. त्यात आणखी विशेष म्हणजे लॉरेन्सचा टॅक्सी ड्रायव्हर गाडी इतकी हळू चालवत होता, की वार्ताहरांच्या टॅक्सीला पाठलागात काहीच अडचण आली नाही. आपल्या ड्रायव्हरला लाच दिली गेल्याचा स्मिथनं मागाहून निष्कर्ष काढला.
लॉरेन्सला आधी सगळीच गंमत वाटत होती. पण मग लवकरच त्याला चिंताही वाटू लागली... या असल्या अतिशयोक्त प्रसिद्धीनं आरएएफमधल्या आपल्या नोकरीवर तर गदा येणार नाही ना?
वार्ताहरांपासून सुटका करून घेणं अशक्य असल्याचं लक्षात आल्यावर विंग कमांडर स्मिथनं ठरवलं, की क्रॉम्वेल स्ट्रीटवर असलेल्या आपल्या मेहुणीच्या फ्लॅटचा तात्पुरता आसरा घ्यायचा. लॉरेन्सही कबूल झाला. पण फ्लॅटपाशी टॅक्सी थांबताच स्मिथची घाई करण्याची सूचना दुर्लक्षून तो अगदी वेळ काढत काढत खाली उतरला. तोवर मागच्या टॅक्सीतले वार्ताहर उतरून त्याच्याभोवती गोळा झाले. लॉरेन्सला सगळी मौजच मौज वाटत होती. स्मिथनं मग काहीसं खेचतच त्याला फ्लॅटवर नेलं.
राजकीय क्षेत्रात खळबळ
दरम्यानच्या काळात लंडनच्या राजकीय क्षेत्रात लॉरेन्सच्या परदेशातील एकूण ‘प्रतापां’वरून बरीच खळबळ माजली होती. कुणालाही त्या संदर्भात नेमकी काहीच माहिती नसल्यानं तर गोंधळ अधिकच वाढला होता. मजूर पक्षानं लॉरेन्सविषयक अफवांचा राजकीय लाभ उठवणं, आगीत तेल ओतणं चालूच ठेवलं होतं. अफवांवर विश्वास ठेवून बेफाम झालेल्या जमावानं लॉरेन्सच्या प्रतिमेचं दहन केलं. २८ जानेवारी रोजी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मजूर पक्षाचे खासदार अर्नेस्ट थर्टल यांनी आरएएफमधल्या लॉरेन्सच्या खोट्या नावाखाली झालेल्या भरतीचा प्रश्न उपस्थित केला. हवाई खात्याचे मंत्री सर सॅम्युएल हॉर यांना त्यास तोंड द्यावं लागलं. त्याबद्दलचा त्यांचा वैताग समजण्यासारखा होता. कारण हवाई दलातल्या लॉरेन्सच्या पुनर्नियुक्तीबद्दल ते सतत विरोधच दर्शवत आले होते आणि आता त्यांनाच या वादंगात ओढलं जात होतं. सदनात लॉरेन्सविषयी अनेक प्रश्नांचा भडिमार होत होता. हे प्रकरण लवकर निवण्याची चिन्हं दिसत नव्हती.
दुसऱ्या दिवशी सॅम्युएल हॉरनी या प्रश्नांना उत्तर म्हणून पुढील आशयाचं एक निवेदन केलं–
“कर्नल लॉरेन्स याची लष्करातून हवाई दलात शॉ या नावानं बदली झाली असली, तरी त्याची खरी ओळख ठाऊक होती. आपल्याला याच नव्या नावानं ओळखलं जावं असं त्याला वाटलं आणि त्या नावानं हवाई दलाच्या सेवेत त्याला स्वीकारताना काहीही आक्षेपार्ह वाटलं नाही.”
शापुरजी सकलातवालांची प्रश्नावली
लंडनला येऊन दाखल झाल्यावर लॉरेन्स दुसऱ्या दिवशी, रविवारी विंग कमांडर स्मिथ याच्यासह ट्रेंचार्ड यांच्या घरी त्यांना भेटायला गेला. आपण पुढं काय करायचं, याची त्याला चर्चा करायची होती. कॅटवॉटर इथं विंग कमांडर सिडनी स्मिथ याच्या हाताखाली आपली कायमची नेमणूक केली जावी, ही लॉरेन्सची सूचना चीफ ऑफ एअर स्टाफ ट्रेंचार्ड यांनी लागलीच मान्य केली.
त्याच दिवशीच्या ‘संडे पिक्टोरिअल’च्या अंकात लॉरेन्सची आदल्या दिवशी प्लायमाउथ इथं घेतली गेलेली छायाचित्रं झळकली.
दुसऱ्या दिवशी, सोमवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी लॉरेन्सनं अर्नेस्ट थर्टल यांची भेट घ्यायचं ठरवलं.
संसदेत थर्टल विचारत असलेल्या प्रश्नांचं एकूण स्वरूप पाहून त्याला थोडी चिंता वाटू लागली होती. आपण हेर असल्यानंच आपण वेगळं नाव धारण करत आहोत, असं सूचित होईल की काय, याची त्याला मुळीच चिंता नव्हती. चिंता होती, ती आपल्या जन्मरहस्याची. थर्टलनी नावाबाबत जोर लावून अधिक खोलात जाण्याचा प्रयत्न केल्यास आपला अनौरसपणा षट्कर्णी होईल, अशी त्याला भीती वाटत होती.
लॉरेन्सनं थर्टलना काहीही न लपवता आपलं जन्मरहस्य सांगून टाकलं. लॉरेन्सच्या प्रामाणिकपणानं थर्टल चांगलेच प्रभावित झाले आणि इतःपर या संदर्भात संसदेत अधिक प्रश्न न विचारण्याचं त्यांनी मान्य केलं. पण थर्टल आणि पक्षीय सहकारी गप्प बसले, तरी शापुरजी सकलातवाला नामक एक पारशी कम्युनिस्ट खासदार काही गप्प बसायला तयार नव्हते. दोनच दिवसांनी त्यांनी परराष्ट्र सचिव सर ऑस्टिन चेम्बरलेन यांच्याकडे लॉरेन्ससंबंधित एक प्रश्नावलीच दिली.
हिंदुस्तानच्या वायव्य सरहद्दीवर अजूनही लॉरेन्सच्या गुप्त कारवाया चालूच असून एअरक्राफ्टमन शॉचा वेश धारण केलेला दुसराच कुणीतरी डमी इंग्लंडला पाठवण्यात आला आहे, असं सूचित करणारा सकलातवालांचा प्रश्न उपस्थित झाल्यावर सारं हाऊस ऑफ कॉमन्स हास्यकल्लोळात बुडून गेलं. बिनबुडाच्या अफवा पसरवण्यात आपली शक्ती वाया घालवण्यापेक्षा त्या गाडून टाकण्याकडेच अधिक ध्यान दिल्यास जागतिक शांततेसाठी ते अधिक उपकारक ठरेल, असं चेंबरलेननी सकलातवालांना सुनावलं.
हा सारा वृत्तांत ‘न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये छापून आला. त्यानंतर मात्र लॉरेन्सच्या ‘हिंदुस्तान आणि अफगाणिस्तान पर्वा'वरची जाहीर चर्चा थांबली.
लॉरेन्सभोवती निर्माण झालेलं एकूण गूढतेचं वलय हे जसं या अफवांना कारणीभूत आहे, तशीच त्या वेळची एकंदर राजकीय अस्थिर परिस्थितीही. लॉरेन्सविषयीच्या गोष्टी अतिशयोक्त करून पसरवण्यात ब्रिटनच्या शत्रूचा जितका वाटा होता, तितकाच धंदेवाईक तसंच विशिष्ट राजकीय दृष्टिकोन असणाऱ्या वृत्तपत्रांचाही. त्यातही खास करून ‘डेली न्यूज’अधिक कुत्सित आणि खोडसाळ होतं. त्यानं अफवांची टाकसाळच उघडली होती. बहुतांश त्याच्यामुळेच सरकारला लॉरेन्सची गुपचूप बदली करणं भाग पडलं.
मात्र आपला काहीही अपराध नसताना हिंदुस्तानातून आपली उचलबांगडी करण्यात आली, ही गोष्ट नाही म्हटलं तरी लॉरेन्सच्या मनाला लागलीच!
(‘हिंदुस्तानी वादळ’ या प्रकरणातून )
- oOo -
पुस्तक: लॉरेन्स ऑफ अरेबिया
लेखक: यशवंत रांजणकर
प्रकाशक: राजहंस प्रकाशन
आवृत्ती: दुसरी
वर्ष: २०१३.
पृ: २४५- २५४.
---
पोस्टकर्त्याच्या टीपा:
(१). RAF : Royal Air-Force
(२). ब्रिटिशांसाठी नव्हे तर स्वत:च्या अभ्यासाचा भाग म्हणून आणि अंगभूत जिज्ञासेची परिणती म्हणून त्याने अरब जीवनपद्धतीचा केलेला अभ्यास नि त्यांचे त्या जीवनशैलीशी नि तेथील जनतेशी समरस होणे यातून त्याचे अरब उठावातील नेतृत्व उभे राहिले होते. यात ब्रिटिश धोरणांचा थेट संबंध नव्हता. परंतु त्याच धर्तीवर आता लॉरेन्सचा अन्यत्र वापर होत असल्याचा समज बळावत चालला होता. त्यातून अशा समजांना खतपाणी मिळत होते. त्याचबरोबर महायुद्धाच्या अखेरीस त्याचा तेथील सहभाग संपल्यानंतर तो नाव बदलून खुद्द ब्रिटिश हवाई दलातच कनिष्ठ श्रेणी अधिकारी म्हणून काम करत राहिल्याचे उघड झाल्यावर या सार्या दंतकथांना मोकाट रान मिळाले.
(३). पहिल्या महायुद्धाअखेरीस विजेत्या दोस्त राष्ट्रांच्या ‘शांतता परिषदे’मध्ये युद्धोत्तर सीमा आखणीदरम्यान लॉरेन्सने अरबांनी जिंकलेला प्रदेश त्यांच्याच ताब्यात राहायला हवा असे जोरदार प्रतिपादन केले. त्यासाठी ब्रिटन, अमेरिका यांचा पाठिंबाही मिळवला होता. यातून सीरिया, लेबनॉनवर हक्क सांगू लागलेल्या फ्रेंचांचा त्याच्यावर मोठा रोष निर्माण झालेला होता. अरब उठाव हा ऑटोमन साम्राज्याच्या– म्हणजे तुर्कांच्या विरोधात असल्याने ते अरबांचे आणि पर्यायाने लॉरेन्सचे शत्रू होतेच. या महायुद्धाखेरीस नव्यानेच उदयाला आलेल्या ‘सोव्हिएत रशिया’ या महासत्तेला ब्रिटिश-फ्रेंच युतीच्या विरोधात युरपमध्ये हातपाय पसरायचे असल्याने तेही तुर्कांच्या सुरात सूर मिसळू लागले होते.
(४). ‘Revolt in Desert’ या शीर्षकाखाली आपल्या अरेबियातील वास्तव्य आणि अरब उठावातील सहभाग यावर लॉरेन्स त्यावेळी पुस्तक लिहित होता.
(५). वास्तविक १९३१ मध्ये प्रसारित झालेला या नावाचा चित्रपट नि लॉरेन्सची कथा वा पुस्तक यांचा काहीही संबंध नाही असे दिसते.