RamataramMarquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६

यू आर वेलकम, मि. चिप्स

  • प्रिय चिप्स,

    आमच्याकडच्या शिक्षकांचे काही खास नमुने आहेत. पैशाने दरिद्री अन् कदाचित म्हणूनच मनानेही दरिद्री. पहिला बहुधा याचमुळे, कळकटून आंबलेला किंवा निवांत, अन्‌ आपलं काम नुसतं ढकलत रहाणारा ! दुसऱ्या नमुन्याची परंपरा थेट उपनिषदापासूनची. ‘उषा अन् अरुण’– तमसा नदीकाठच्या समिधा, आश्रमातलं गुरुकुल अन् त्यांतील यज्ञकुंड– ‘समानी आकूतानि’ हे मंत्र अन व्यास-वाल्मीकी, धौम्य ! अशा एका दीर्घ परंपरेची प्रतीके–अन फक्त प्रतीकेच– या नमुन्यामागे आहेत. या शाखेचीच पालवी नसलेली उपशाखा म्हणजे आचार्य अन् गुरुजी असा 'डबल बॅरल 'वाला मास्तर ! ही प्रतीके वंद्य मानून आणि तुमच्याच भाषेच्या वाघिणीचे दूध घेऊन ते पचविलेला स्वातंत्र्यपूर्व काळातला टिळक-आगरकरांच्या पुण्याईतून निर्माण झालेला त्यागी, ध्येयवादी शिक्षक. तसा हा नमुना विरळाच, पण एखाद्या दुसर्‍या पीळाच्या शिक्षकाच्या रूपाने तो महाराष्ट्रीय जीवनात अजूनही टिकून आहे. शुद्ध ज्ञानाची उपासना कसलीही व्यावहारिक तडजोड इथे नाही. कृतबुद्धी, त्याग अन् कष्ट यावाचून सारे व्यर्थ आहे– अशी सूत्रे या गुरु-घराण्यात एकाचवेळी पवित्र अन् गंभीर मानली जातात. छिन्नी-हातोडा घेऊन आपल्याच प्रतिमेसारखी विद्यार्थ्यांची मूस तयार करणे हा या शिक्षकाचा आवडता शिल्पी धर्म असतो !

    चिप्स, या सगळ्याच प्रवृत्ती अन् नमुने कमीअधिक प्रमाणात पाश्चात्य शिक्षकांतही असतील. पण त्याचे साचे इतके पक्के घट्टही नसावेत. काहीही म्हणा, स्वातंत्र्य, खेळकरपणा, विद्यार्थ्यांशी सहभागित्व, शिस्त, कामाची बांधिलकी, प्रयोगशीलता, लवचिकपणा, एकंदरच परिवर्तन आणि नवता याबद्दलची उत्सुकता– यांची प्रमाणं पाश्चात्य मातीत निर्विवादपणे जास्तच आहेत.

    शाश्वताचे रंग

    पण हा काथ्याकूट आता कशाला? मला इतकंच म्हणायचंय, की एकाच बंदिस्त साच्यात तुम्ही काही बसत नाही. तुमच्या व्यक्तित्वाच्या छटा वेगळ्या आहेत. वेषही तसाच. काळा सूट, कडक कॉलरचा पांढरा शर्ट, काळा पण लटकत नेकटाय, चहा गाळणाऱ्या मिशा पण झुबकेबाज ! तुमचा विनोद, तुमचं प्रेम, श्रीमंत पब्लिक स्कूलमधले तुमचे उच्च सामाजिक थरातले विद्यार्थी– अन् तुमचे त्यांचे संबंध– या सर्वांत एक स्वतंत्रपणाही आहे अन् एक खास खानदानी इंग्लिश-परंपराही आहे.

    मुख्य म्हणजे चिप्स, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचा वैचारिक किंवा मानसिक पिंड बनवायला बसला नाहीत. (माझा एक मित्र अशा शिक्षकांना ‘पिंडकार’ म्हणतो ! ) तुमच्या हातात छिन्नी अन् हातोडा नाही. विद्यार्थ्यांना असे आकार देण्यासी एक व्रतस्थ जिद्द, एक निश्चिततेचा आत्मविश्वास अन् एक सुप्त अहंकार लागतो. अशा गुणांना लागणारी धारदार, सखोल बुद्धिमत्ता तुमच्या अंगी नाही. ‘हा मार्ग– त्यावरचे हे टप्पे– हं उचल पावले’– अशा थाटात, तुम्ही विद्यार्थ्यांशी बोलणार नाही. (तुमच्या कॅथीने तुम्हाला दिलेले समाजवादाचे, प्रागतिकतेचे धडे हास्यास्पद वाटतात. तुम्ही तिची यासाठी टिंगल कशी करीत नाही कुणास ठाऊक ? आता प्रेमविवाह म्हणून आम्ही तुम्हाला क्षमा करू हा भाग वेगळा!) तुम्ही फक्त विशाल समुद्राचा एक लांब अन् भव्य किनारा विद्यार्थ्यांना दाखवणार. तुम्ही प्रेमळ आहात, पण मऊमऊ किंवा बुळबुळीत नाहीत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे सर्व सहलीच्या किंवा जत्रेच्या आनंद भावनेने कराल.

    जाताजाता तुम्ही विनोद करणार-थट्टा करणार. पण हा विनोद, ही थट्टा साधी, नेहमीची वाटूनही त्याची आंबटगोड चव, वर्षानुवर्षे राहाणारी, कमालीचा सूक्ष्म अन् गमतीदार. ‘मास्तरांना छळणं ही विद्यार्थ्यांची एक सुंदर कला आहे’ exciting खेळ आहे आणि तो शिक्षण परंपरेचा एक भागही आहे. ! ‘कॉली, मी तुझ्या थोर वडलांना प्रथमच छड्या मारल्या होत्या. तेव्हा, त्यांना तो मार हवा होता. आता तुलाही तो हवाच आहे !’ ‘ग्रेगसन’ म्हणून एक विद्यार्थी आहे. ही वल्ली कधीही कुठे वेळेवर येत नाही, जात नाही. उशीर हा त्याचा स्थायीभाव! या विद्यार्थ्याला तुम्ही आशीर्वाद देता– “हे पहा ग्रेगसन, तुला नोकरीसुद्धा ‘लीग ऑफ नेशन्स’ सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेत मिळू दे. तुझा हा उशीर अन् चालढकल लक्षातसुद्धा येणार नाही अशी ती एकच जागा आहे ! माझी दुसरी इच्छा अशी आहे की म्हातारपण यायलाही तुला असाच उशीर होवो !” उशीर आणि वेळेवर न येणे याबाबत माझा लौकिकही या ‘ग्रेगसन’सारखाच असल्यामुळे मला या विनोदाची खास लज्जत वाटते. उशीर करणे आणि वेळ लावणे या गुणांचे चीज म्हातारपण लांबविण्यात होते– हा तुमचा गमतीदार अर्थ, नियमितपणाबद्दल विनाकारण माथेफिरू असणारी समस्त व्यवस्थित मंडळी ध्यानात घेतील काय ?

    विद्यार्थ्यांचे एका सांकेतिक अर्थाने, तुम्ही शिल्पकार नाही. तशाच सांकेतिक अर्थाने, तुम्ही नायकही नाही. आमच्या इकडे मराठी साहित्यात शिक्षक अन् प्राध्यापक यांना स्कॉलरशिपसारखीच कित्येक वर्षे ‘हीरोशिप’ मिळत होती ! (अजूनही हे ‘वतन’ पूर्णपणे नष्ट झाले नाही!) त्यामुळे तर, तुम्ही आमच्या साहित्यातल्या शिक्षकपरंपरेहून आणखीनच वेगळे उठून दिसता! पहिले महायुद्ध. तुमचे अन् जर्मनीचे. तुमची माणसे शूरपणे लढत आहेत. तुम्ही या गौरव गाथेत सहभागी होता. पण त्याचबरोबर तुमच्या शाळेतल्या एका जर्मन सहकाऱ्याला श्रद्धांजलीही अर्पण करता.

    रणांगणावरील कट्टर शत्रूला श्रद्धांजली ! सारा वर्ग अन् शाळेचा शिक्षकवर्ग अन् अधिकारी चपापतात. तुम्ही फक्त मिस्किलपणे डोळे मिचकावता ! ‘तुमच्या पिढीने तरुणपणी फ्रान्सशी केलेल्या संग्रामाची आठवण’ देऊन तुम्ही एका सहकाऱ्याला म्हणता– ‘एका पिढीचा त्याग, दुसर्‍या पिढीच्या त्यागाने रद्द होता कामा नये !’– यामागची कळ, अन् तिची बोच किती सूक्ष्म आहे ! पण तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण त्या संध्याकाळचाच. तुमच्या ‘बुकफील्ड’पर्यंत अचानक जर्मन विमाने झेपावली होती. त्यांचा बाँबवर्षाव चालू होता. तुम्ही खालच्या मजल्यावर लॅटिनचा वर्ग घेत होता. बाहेर जाऊन निवारा घेणं अशक्य होतं. तुम्ही तुमचं शिकवण चालूच ठेवलं. पण त्यात रणगाजीपण काहीच नव्हतं. तुम्ही फक्त एवढेच म्हटलं– “ एखाद्या गोष्टीचे मोठेपण ती जो आवाज करते त्यावरून ठरवता येणं शक्य नाही !” बस्स ! युद्धाची निरर्थकता, waste– हत्या इत्यादीबाबत भल्या भल्या लेखकांनी अतिशय समर्थपणे लिहिले आहे. पण युद्धसंस्थेवर एका शालेय शिक्षकाने केलेला हा छडीचा प्रहारही कमी ‘मर्मभेदी’ नाही!

    तुमचा विनोदही सांकेतिक नाही. मिसेस विकेट अन् मुले विचारतात... चिप्स विनोद करतात, गंमत करतात अन् नंतर हसतातही– पण त्यांच्या डोळ्यात पाणी का येते अशा वेळी ? ते हसतात की रडतात ! तुमची आसवंसुद्धा अशी थोडी बुचकळ्यात पाडणारी ! लॉईड जॉर्ज म्हणजे साक्षात तुमचे पंतप्रधान ! ते तुमच्या शाळेला भेट देतात. ओळख झाल्यावर, तुम्ही हस्तांदोलन करता करता चक्क एक विनोद टाकता ! मिस्टर प्राइम मिनिस्टर ! तुम्ही आमच्या शाळेचे विद्यार्थी नाहीत म्हणून, नाहीतर भी चटकन सवयीनं म्हटलं असतं तुमच्यात खूपच सुधारणा झाली आहे की ! ‘रिव्हिएरा’ला जाऊन या एकदा मिस्टर चिप्स, काय गुलाबी थंडी असते या दिवसांत !” असा आग्रह करणा-यांना ‘थंडी-पडसं झालंच तर ते माझ्या या प्रिय देशातच झालेलं मला आवडेल '— हे तुमचे उत्तर ! असा तुमचा विनोद– कोट्या, कल्पना-विलास, टीका-उपहास यापेक्षा उनोक्तीवर आणि प्रमाणाच्या जाणिवेने तोललेला.

    प्रमाणाची जाणीव ! बरोबर. साहेबाच्या राष्ट्रीय चारित्र्याचे सारे सामर्थ्य यातच असावे ! चिप्स, तेच तुमच्यात आहे. इंग्रजांचे अन् आमचे एकेकाळी हाडवैर असूनही आम्ही त्यांचा कधी द्वेष करत नाही, याचे श्रेय जितके आमच्या सहिष्णुतेला आहे तितकेच तुमच्या या प्रमाणाच्या जाणिवेलाही आहे !


    प्रिय चिप्स,

    परवा तुमचाच एक जातभाई भेटला, तो वाङ्‌मयाचा, मला वाटतं– लंडन विद्यापीठातला वाङ्‌मयाचा तरुण प्राध्यापक. मी त्याला विचारले– “ तुम्हा लोकांना तुमच्या चिप्सबद्दल काय वाटते?” तेव्हा “चिप्स कोण ?” इथूनच त्याने सुरवात कली. माझा पडलेला चेहरा सावरून मी तुमचे थोडं वर्णन केल्यावर तो म्हणाला–

    “Oh! You mean that old sentimental fool! The public school in England was an unimaginable horror! No, we have thrwon him out ! चिप्स याच ब्रिटिश पब्लिक स्कूलच्या अधिकारी वर्गातला. ही परंपरा प्रस्थापितांची-उच्चभ्रू अन खानदानी इंग्लिश समाजाची ! त्याविरुद्ध प्रतिक्रिया म्हणूनच आमच्याकडे संतप्त तरुण निर्माण झाले! ब्रिटिश शिक्षण, राजकारण, समाजकारण, कुटुंब या सगळ्यांतच तुम्हाला आता ‘चिप्स’सारखा कुणी आढळायचा नाही! मला आश्चर्य वाटतं ते हे की तुम्हाला आमच्या जुन्या समाजाच्या स्मशानभूमीत शांतपणे पहुडलेल्या या म्हाताऱ्याची एवढी आठवण अजून का राहिली आहे ?”

    “त्याची कारणं मागून सांगेन. पण मला प्रथम सांगा– हा तुमचा संताप- वैताग- वैफल्य, वगैरे वगैरे आरडा-ओरडा तुम्हाला मुळातच इतका सखोल का वाढतो ? अन् समजा तो सखोल असला तरी त्याची मक्तेदारी आपल्याकडेच आहे अशा थाटात तुम्ही मंडळी का बोलता ?”

    पुढे काही फार बोलणं झालं नाही.

    पण त्याचा तो प्रश्न राहिलाच !

    ‘मला तुमची का आठवण आहे?’

    उत्तर अगदी साधं आहे. तुमच्या जीवनात जी एक शांत, संथ लय आहे त्यामुळे !

    किती गोष्टींतून ही लय टकटकते आहे! संध्याकाळ आहे. दिवसाचं शेवटचं ऊन पडलं आहे. धुळीच्या असंख्य कणांतून ते सावकाश गाळले जाते आहे. शाळेच्या घंटेचा टोल पडला आहे. त्या घंटेच्या वाजण्यातही कसली उतावळी घाई नाही. घरासमोरचा गॅसचा दिवा पेटवणारा मुलगा येतो आहे. तो जरा धावत धावतच येतो आहे. पण त्याने लावलेला फिकट हिरव्या जाळीचा दिवा थेंबाप्रमाणे थरथरून लुकलुकतो आहे. मिसेस विकेटने तुमचा चहा आणला आहे. तोही तुम्हाला घटघट पिऊन टाकायचा नाही आहे. सावकाश घोटाघोटाने, त्याचा स्वाद चाखीत चाखीत घ्यायचा आहे. स्त्री स्वातंत्र्याचा जयजयकार होतो आहे– पण तोही घराच्या अंगणातूनच चालला आहे. ३११-वी बेकर स्ट्रीटवरील ‘शेरलॉक होम्स’ शांतपणे व्हायोलीनची धून वाजवीतच खुनाची रहस्ये सोडवतो आहे! शॉ आणि ‘वेब’ दांपत्याचा फेबियन समाजवाद इंग्लिश पाईपसारखाच संथपणे पेटला आहे. एक दाट धुके सायऱ्या ‘ब्रुकफिल्ड’वर संथपणे तरंगत आहे आणि त्यात “राडाराचा किरण सलत जात नाही आहे! ”

    तुमच्या जीवनातील अगदी शेवटच्या क्षणीही ही लय आहे. कुणीतरी शय्येजवळून म्हणते– “बिचारा म्हातारा ! लग्न नाही. मुलं नाहीत. एकटा जातोय!” उत्तर म्हणून तुम्ही किंचित खिन्नपणे हसता, हजेरीपटावरून घेत होता, तशीच तुमच्या हाताखालून गेलेल्या अनेक मुलांची नावे घेता– ‘वेटिफर-पोरसन-रॅडलेड्, रीड्‌, हार्पर - हॅजलिर्...’ एन्सवर्थ, अॅटवुल बेबॉक्-बर्नार्ड-केवळ शिक्षकालाच जाणवते अशी शाळेमधून वा कॉलेजमधून येणाऱ्या-जाणाऱ्या पिढीच्या मिरवणुकीच्या वाटचालीची लय ही अखेर तुमच्या मृत्यूच्या लयीशी येऊन बिलगते !

    ही लय मला आवडते. कारण यीट्स म्हणतो तसं– “पुढे भरपूर, गाढ झोपेनं आणि छान स्वप्नांनी भरलेलं म्हातारपण येण्यासाठी आधीच्या जीवनात मला पूर्ण शांती हवी आहे.” अशी शांती एका लयबद्ध जीवनातच मिळू शकते. त्रितालातला तबल्याचा शुद्ध धीम्मा ठेका जसा घुमत रहावा तसा एका विशिष्ट परिस्थितीत, सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भातच या लयीला अर्थ होता असे कुणा समाजशास्त्रज्ञाने खांदे उडवून सांगण्याची गरज नाही. ते उघडच आहे. गतिमान उद्योगप्रधान समाजाने या शतकाला आणि उद्योगपूर्व समाजातील ती लय निष्ठेने जपणाऱ्या लोकांना कॉम्प्यूटरच्या सिग्नल्सच्या सहाय्याने केव्हाच निरोप दिला गेला आहे.

    (‘गुड बाय्‌ मिस्टर चिप्स!’ या लेखातून )

    -oOo-

    पुस्तकः शाश्वताचे रंग
    लेखकः विद्याधर पुंडलिक
    प्रकाशकः सुपर्ण प्रकाशन
    आवृत्ती पहिली (मार्च १९८६)
    पृ. ७६-८१

    ---
    संबंधित लेखन:
    वेचताना... : शाश्वताचे रंग >>
    ---

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा