'मुजरिम हाजिर'चा नायक सदानंद चौधरीभोवती वर उल्लेख केलेली पात्रे फिरत असतात. घटनांचे केंद्रस्थान व लेखकाचे लक्ष्यही तेच आहे. ह्या सदानंदचे व्यक्तिमत्त्व कसे विकसित होत जाते हा या कादंबरीचा अत्यंत महत्त्वाचा गुण-विशेष आहे. ज्या घटना घडतात, त्यांना महत्त्व आहे ते सदानंदाच्या संदर्भात. कारण शेवटी घटनांना सामोरे जाणारा माणूस, त्याच्यात होणारे परिवर्तन हे लेखकाच्या व वाचकाच्या दृष्टीने मोलाचे असते. सदानंदच्या आयुष्यात एका मागोमाग एक घडणार्या घटना पाहिल्या की त्यांच्यामधून सदानंदचे अत्यंत व्यामिश्र असे व्यक्तिमत्व आपल्यासमोर उभे राहते. अगदी लहानपणापासून हा मुलगा इतरांपेक्षा वेगळा आहे. खेळात त्याला रस नाही. नाटकाबिटकात तो रमत नाही. त्याला फारसे मित्र नाहीत. एकटे फिरणे त्याला आवडते. आत्मकेंद्रित व्यक्तिमत्वाच्या या सार्या पाऊलखुणा. बाह्य अशी काहीच व्यवधाने नसल्यामुळे हा मुलगा मनाशीच विचार करू लागतो. आपल्याभोवती घडणार्या घटनांचा अर्थ जाणून घेण्याची त्याला गरज भासते आणि त्याला वेगळीच अशी बाजू दिसते. कपिल पायरापोडोने आत्महत्या का केली? 'कालीगंज की बहू' आपल्याकडे सारख्या चकरा का मारते? गरीबांना आपले वडील, आजोबा का छळतात? असे प्रश्न त्याच्या बालमनाला पडतात. आपण श्रीमंत व इतर गरीब का? माणसामाणसांत असा फरक का? तो कोणी केला? एक ना दोन. ह्या प्रश्नांचे ओझे त्याला सहन होत नाही. अत्यंत लाडात सुखवैभवात वाढणार्या मुलाच्या मनात हे असमाधानाचे बीज कोठून आले? आयुष्य अशा प्रश्नांचे उत्तर देत नाही. पण एवढे मात्र खरे की असे बीज ज्याच्या मनात पडते तो जगापासून तांदळातल्या खड्याप्रमाणे बाजूला पडतो. त्याची एकाकीपणापासून सुटका नाही, असमाधानापासून सुटका नाही. वाडवडिलांच्या संपत्तीच्या पाठीमागे असलेल्या गुन्ह्यांची, पापांची जाणीव सदानंदला लहानपणीच होते व त्याचे बाल्य कोमेजते. ऐश्वर्यामुळे त्याचे डोळे बंद होत नाहीत; तर पुरते उघडतात. ह्या पापात आपणही सहभागी आहोत ही भावना त्याच्या मनात जन्म घेते. आयुष्य जसे आहे तसे निमूटपणे स्वीकारुन जगत राहणार्या माणसांच्या कळपात त्याला स्थान राहात नाही. एकदा प्रश्न मनात उमटू लागले की सतत नवनवे प्रश्न येतच राहतात आणि त्यांची उत्तरे शोधता शोधताच आयुष्य संपून जाते. हे अटळ भविष्य लहानपणीच सदानंदच्या भाळी लिहिले गेले आहे.
लहानपणी मनावर ज्या गोष्टी कोरल्या जातात त्यांच्या खुणा मोठेपणीही मिटत नाहीत. उत्कटपणे जगणार्या माणसाच्या मनात तर त्या सतत जाग्याच असतात. सदानंद तरुण होतो तरी त्याच्या मनातले प्रश्न त्याचा पिच्छा सोडत नाहीत. त्यांच्यापैकी काहींची ठाम उत्तरे उलट आता मिळालेली आहेत. पूर्वजांच्या जगातील अन्याय मानवनिर्मित आहे हे त्याला कळले आहे. पूर्वजांच्या पापात आपण सहभागी आहो हा त्याचा ठाम निष्कर्ष आहे. त्यामुळे संपत्तीबद्दलची त्याच्या मनातील आसक्ती हळूहळू कमी होत जाते. स्वतःजवळ सारे काही असल्यामुळेच व अधिक काही नको असल्यामुळे एक स्वार्थरहित अशी त्याची मनोवृत्ती तयार होते. जे आहे त्याचेच ओझे झाल्यामुळे आणखी काही मागण्याचा प्रश्नच नसतो. जगाविषयीची त्याची भूमिका आता पक्की होते. माणसाबद्दल त्याच्या मनात खोल सहानुभूती आहे. करुणा आहे, प्रेम आहे. माणुसकी व दया या मूल्यांवर त्याचा विश्वास आहे. केवळ स्वतःचा स्वार्थ न पाहता कुणासाठी काहीतरी करावे, इतरांची दु:खे दूर करावीत, त्यांना सुख मिळवून द्यावे अशा इच्छा त्याच्या मनात निर्माण होतात व येथेच त्याचे डॉन क्विक्झोटशी नाते जुळते.
सदानंदचे डॉन क्विक्झोटशी असलेले नाते थोडे विस्ताराने पाहण्यासारखे आहे. सर्वांतिसच्या ह्या झपाटलेल्या शिलेदारासारखेच सदानंदच्या हृदयात माणसाबद्दल प्रेम आहे. मनात एक स्वप्न आहे. डोक्यात एक वेड आहे. ह्या संदर्भात पहिला प्रश्न असा की आपला नायक डॉन क्विक्झोटवर बेतावा अशी बिमल मित्र यांची इच्छा होती का? कादंबरीतील सदानंदच्या संदर्भातील लेखकाचे भाष्य काळजीपूर्वक तपासले तर दिसून येते की त्यांनी एकदा गौतम बुद्धाचा व एकदा येशूचा उल्लेख केला आहे. 'ढाई हजार साल पहले दूसरे एक सदानंदका जन्म हुआ था | लेकिन इस सदानंद की तरह उस सदानंद का भी ऐश्वर्यसे जी नही भरा था | उसके भी मनमे यही प्रश्न जगा था, यह अन्याय है, यह पाप है| इस अन्याय, इस पाप का प्रतिकार होना चाहिए |
"आजसे एक हजार नौसो तिहत्तर साल पहले तब के मनुष्य की धरतीने जैसे दूसरे एक सदानंद को समसामायिक समाज ने बिल्कुल खत्म करके अपने आपको खतरे से खाली समझा था, उसके उतने दिनोंके बाद आज के मनुष्य की धरती भी उसके एक अन्य उत्तरसूरी मुजरिम को दंड देकर अपने को खतरेसे खाली समझकर निश्चिंत हो गयी|
गौतम बुद्धाप्रमाणेच आपले सारे वैभव, आपली पत्नी यांचा त्याग करुन सदानंद घराबाहेर पडला. येशू ख्रिस्ताप्रमाणेच त्याला अपराधी ठरवून मानवावर केलेल्या प्रेमाचे प्रायश्चित्त समाजाने भोगण्यास लावले. पण त्या महामानवांशी असलेले सदानंदचे साम्य तेथेच संपते. ते फारसे ताणता येत नाही. याची लेखकालाही जाणीव आहे. महामानवाचे चित्रण करणे हा या कादंबरीचा हेतू नाही. सामान्य माणसातून वर उठू पाहणार्या एका उत्कट जीवाची शोकांतिका लेखकाला रंगवायची आहे. आणि ह्या शोकांतिकेला भव्य पार्श्वभूमी आहे ती समाजाच्या रसातळाकडे जाणार्या महायात्रेची. सामाजिक अधःपतनाच्या काळ्या पार्श्वभूमीवर कुठेतरी चमकणारी क्षीण प्रकाशरेषा लेखकाला पकडावयाची आहे. म्हणून आपला नायक त्यांनी दैवी गुण वा सामर्थ्य असलेला निवडलेला नाही. त्याला न पेलणारे वर त्यांनी दिलेले नाहीत. सदानंद बुद्ध नाही, येशू नाही, कारण त्याच्याजवळ भक्कम असे तत्त्वज्ञान नाही. भोवतालच्या दु:खाने तो व्याकुळ होतो. सर्वांनी सुखी व्हावे ही शुभेच्छा त्याच्या ओठावर आहे. पण मानवजातीला दु:खातून सोडवण्याचा मार्ग त्याला सापडत नाही. (अर्थात तो तसा बुद्धाला वा येशूला सापडला की नाही हा वादाचा प्रश्न आहेच.) असा सदानंद महामानव बनू शकत नाही याची कारणे त्याच्या स्वभावातच आहेत. हा माणूस ज्या वैभवात वाढला आहे त्या वैभवाचे गुण याचा त्याला तिटकारा आहे. त्याचा बाप म्हणतो, "लडकेमे यह भी क्षमता नही की खुद कमाकर गुजारा चलाएगा!" एक खानदानी रक्त त्याच्या धमन्यांतून वाहते आहे#. तो आपल्यासाठी पाणीदेखील शोधून पिऊ शकत नाही. त्याचा नोकर एकदा त्याला म्हणतोच, "आप ढूँढकर गिलास कैसे पाएंगे| आपने क्या कभी हातसे डालकर पानी लिया है?" हा माणूस घरून बाहेर पडतो, पण पुन्हा पुन्हा कुणाच्या तरी आश्रयालाच जातो, जेथे खाण्यापिण्याची तरी कमीत कमी सोय होईल. अन्यायाविरुद्ध तो बोलतो, त्याला चीड आहे, पण त्याविरुद्धच्या लढाईत तो स्वतःला झोकून देऊ शकत नाही. लढाईपासून तो हमेशा दूरच आहे. पण त्याचबरोबर हेही खरे की लढाई त्याच्या मनातच आहे. हा माणूस महामानव नाही म्हणूनच तो आपल्याला जवळचा वाटतो, त्याची सुखदु:खे जवळची वाटतात, आपली वाटतात.
सबंध मानवजातीच्या कल्याणाचे लक्ष्य सदानंदसमोर नाही. त्याला मानवाचे दु:ख दिसते. त्याच्या वेदना दिसतात. पण त्याची दृष्टी मर्यादित आहे. आपल्या वर्तुळापुरती सीमित आहे. आपल्या पूर्वजांचे पाप आपल्या शिरावर आहे हे तो मानतो व त्या पापाचे प्रायश्चित्त त्याला पुरेसे आहे. "मैं तुम्हारे पाप का भागीदार नहीं हूँ | सिर्फ मुझे तुम लोग छुटकारा दो |" असे तो म्हणतो. पण ह्या जीवनाच्या चक्रव्यूहात अडकल्यावर सुटणे एवढे सोपे नसते. सुटून जाणार कोठे? सर्वत्र तर हीच माणसे आहेत. चेहरे बदललेले पण आत्मे तेच. सर्वत्र हेच तर जीवन आहे. किडलेले, भ्रष्ट! ह्यापासून सुटका नाही. ह्या अशुभाशी टक्कर देण्याचे सामर्थ्य सदानंदजवळ नाही
त्याच्याजवळ आहे ती फक्त शुभेच्छा, सर्वांचे भले व्हावे, सर्व सुखी व्हावे, ही. या संदर्भात मला डी. एच. लॉरेन्स'चे एक वाक्य आठवते. त्याने लिहिले आहे, "General goodwill is a form of egoism. It is always felt as insult by the mere object* of it."
- oOo -
*हा मुद्रणदोष असावा. बहुधा हा शब्द subject असा असावा.
---
पुस्तकः मृगजळाची तळी
लेखक: विजय पाडळकर
प्रकाशकः मॅजेस्टिक प्रकाशन
आवृत्ती पहिली (१९९९)
पृष्ठे: ६१-६४
---
संबंधित लेखन:
वेचताना... : मृगजळाची तळी >>
---
Object असाच मूळ शब्द आहे. त्यात मुद्रणदोष नाही.
उत्तर द्याहटवा