सोमवार, १० फेब्रुवारी, २०२५

पाखरा जा, त्यजुनिया...

  • प्रास्ताविक:रमतारामाच्या विश्रांतीस्थळी काल ‘परतुनि ये घरा...’ मालिकेतील एक भाग प्रसिद्ध केला. त्यात मोहन राकेश यांच्या ‘आषाढ का एक दिन’ मधील कालिदासाच्या परतून येण्याच्या प्रसंगाच्या आधारे आकलन मांडले आहे. सुदैवाने या नाटकाचा मराठी अनुवाद माझ्याकडे आहे. त्यातून कालिदासाने मल्लिकेचा निरोप घेऊन कीर्ति-संपदेच्या वाटे चालू लागण्याचा आणि सारे भौतिक यश गमावून परतून येण्याचा असे दोन प्रसंग निवडून इथे देतो आहे. ‘परतुनि ये घरा...’ मध्ये केवळ त्या संगतीच्या संदर्भामध्ये कालिदासाचे मूल्यमापन तेवढे आले आहे. एकुण नाटकाबाबतचे, या वेच्यांबाबतचे विश्लेषण स्वतंत्रपणे ‘वेचताना...’ मालिकेमध्ये लवकरच मांडेन.
    ---

    (अंबिका डोळे मिटून काही क्षण स्थिर उभी. मग उदासपणे सर्वत्र पाहाते व खचून गेल्यासारखी पाटावर बसते. थाळ्यातील तांदूळ चोळता चोळता डोळे भरून येतात. ती डोळ्यांना पदर लावते. अस्फुट हुंदका, “भावना,... ओह ! " पदरात तोंड लपवते. प्रकाश मंदावत जातो. जराशाने हातात मशाल घेतलेला विलोम दारात उभा. अंबिकेकडे पाहून काही क्षण थबकतो. मग तिच्याजवळ जातो.)

    आषाढातील एक दिवस

    विलोम : भरून आलेल्या मेघांनी आज अवेळी अंधार केलाय की तुला काळ वेळाचं भानच राहिलं नाहीए अंबिका ! (अंबिका त्याच्याकडे बघते. मशालीच्या प्रकाशात तिचा व्यथित चेहेरा दिसतो.) आश्चर्य आहे; तू दिवे सुद्धा लावले नाहीस ?

    अंबिका : तू का आलास इथं विलोम ?

    विलोम : (दिव्याजवळ जाऊन ) हा दिवा लावू का आधी ? (मशालीने दिवा लावतो. रंगमंचावर प्रकाश येतो.) विलोमचं इथं येणं ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. (दुसरा दिवा लावतो.)

    अंबिका : तू इथून निघून जा विलोम, तुला माहीत आहे ना, तुझं इथं येणं...

    विलोम : मल्लिकेला आवडत नाही, माहीत आहे मला. मल्लिका ! एक भाबडी निष्पाप पोर. जिथं आपण जगतोय त्या जगाची तिला जाण नाही की स्वतःच्या जगण्याचं भान नाही. (भिंतीला असलेल्या आधारावर मशाल तिरपी ठेवतो.) मी इथे येऊ नये अशी तिची इच्छा ! का ? तर म्हणे कालिदासाला आवडत नाही. (अंबिकेजवळ येत...) आणि कालिदासाला का आवडत नाही ? तर माझ्या डोळ्यात त्याला त्याच्या हृदयाचं प्रतिबिंब दिसतं, आणि त्याची त्रेधातिरपीट उडते पार. पण तुला तर ठाऊक आहे अंबिका, माझा एकच दोष आहे. जे मला दिसतं ते मी स्पष्ट बोलून मोकळा होतो.

    अंबिका : मी यावेळी तुझ्या गुणदोषांची चर्चा करू इच्छीत नाही. तू इथून...

    विलोम : तू फार दुःखी दिसतेस अंबिका. आणि तू नव्हतीस कधी म्हणा दुःखी ! तुझे जीवन म्हणजे एका चिरंतन दुःखाचाच इतिहास आहे. किती वाळली आहेस तू (काही क्षण थांबून) अरे हो, कालिदास उज्जैनीला जाणारसं ऐकतोय !

    अंबिका : मला माहीत नाही. (विलोम न ऐकल्यासारखे करून गवाक्षाकडे जातो.)

    विलोम : सम्राटाकडून त्याचा सत्कार होणार. राजकवी म्हणून तो उज्जैनीच्या राजसभेत बसणार. मला चाटतं... उज्जैनीला जाण्यापूवींच त्याचा आणि मल्लिकेचा विवाह उरकून घ्यावा. नाहीतर... या बाबतीत तू काय ठरवलंयस ?

    अंबिका : (गच्च डोके दाबून) मी यावेळी कसलाही विचार करू इच्छीत नाही.

    विलोम : तू मल्लिकेची आई, या बाबतीत काहीच विचार करू इच्छीत नाहीस ? आश्चर्य आहे.

    अंबिका : मी तुला सांगितलंय विलोम, तू इथून निघून जा.

    विलोम : (गवाक्षाकडे पाठ करून) कालिदास उज्जैनीला जाणार, आणि मल्लिका ? त्याच्यामुळे दुर्लौकिक झालेली मल्लिका, इथेच राहणार ? काय अंबिका ? (अंबिका डोळ्यांना पदर लावते. तिच्यासमोर येऊन...) यासाठीच का हे सगळं तू इतकी वर्ष सोसलंस? तू कसे दिवस काढलेस ते ज्याने तुला जवळून पाहिलंय त्यालाच समजेल. नियतीने तुझ्या देहाची अन् मनाची किती ओढाताण केली आहे. कणाकणाने तू झिजलीस तिच्यासाठी. तिला काही कमी पडू नये, कशाची उणीव राहू नये म्हणून आणि आज तिचं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त व्हायची वेळ आली आहे तरी तुला तिच्याबद्दल विचार करायची इच्छा नाही म्हणून सांगतेस ?

    अंबिका : हे सगळं ऐकवून तू माझे दुःख कमी करतोयस असं का वाटतंय तुला ? कृपा करून मला आत्ता एकटी राहू दे.

    विलोम : नाही अंबिका, यावेळी तर मी तुझ्याजवळ राहणं फार आवश्यक आहे. हे सगळं मी तुला ऐकवायला नाही आलो. कालिदासाला याचं उत्तर विचारणार आहे मी. केव्हापासून त्यालाच तर शोधतोय. ठीक आहे. थोडा वेळ इथेच वाट पाहात बसतो त्याची. (देवडीकडून कालिदास व मल्लिका येतात.)

    कालिदास : फार वाट नाही ना पाहावी लागली तुला विलोम ? (विलोमला पाहून मल्लिकेच्या कपाळाला आठ्या पडतात.) अशावेळी माझ्या भेटीसाठी आतुर असणार हे मला माहीतच होतं. बोला काय उद्योग चाललाय सध्या ?

    विलोम : सम्राटांकडून सन्मान व्हावा असे उद्योग आम्हांला कुठून जमणार ? राजधानीहून तुला सम्राटांचं आमंत्रण आलंय म्हणून ऐकतो.

    कालिदास : होय, असं ऐकलंय खरं, तुला वाईट वाटतंय का ?

    विलोम : वाईट... हां... हां...! फार फाऽर वाईट वाटतंय. अरे आपल्या मित्राच्या वियोगाचं दुःख कुणाला नाही होणार?... उद्या... ब्राह्म मुहूर्तावरच निघणार आहेस ?

    कालिदास : ते मलाही माहीत नाही.

    विलोम : मला माहीत आहे ना, आचार्य उद्या ब्राह्म मुहूर्तावरच प्रस्थान ठेवायचं म्हणताहेत. (काही क्षण थांबून...) राजधानीच्या झगमगाटात— वैभवात जाऊन या आपल्या गावाला, इथल्या आप्तमित्रांना विसरणार तर नाहीस ना ? (मल्लिकेवर दृष्टी...) अनेक मोह, अनेक आकर्षणं असणार तिथे. नृत्यशाला, नाट्यशाला, मंदिरालय, आणि कित्येक गोष्टी! माणूस पार गुरफटून जातो म्हणे. (हसत सुटतो)

    मल्लिका : आर्य विलोम, ही जागा आणि वेळ या असल्या गोष्टी बोलायची नव्हे. आपण आत्ता इथे असाल अशी कल्पना नव्हती.

    विलोम : मला आत्ता इथे पाहून तुझा जळफळाट झालाय हे कळतंय मला. पण मी अंबिकेला भेटायला आलोय. फार दिवसांत भेटलो नव्हतो तिला तेव्हा माझी उपस्थिती ही काही फारशी अनपेक्षित गोष्ट नव्हे. काय कालिदास ?

    कालिदास : हो तर विलोमचं कुठलंही कृत्य अनपेक्षित नसतंच. उलट त्याने काही न करणं हेच अनपेक्षित.

    विलोम : आपण परस्परांना इतके चांगले ओळखतो ही वास्तविक आनंदाची गोष्ट आहे. तुझ्यापासून लपून राहील असं माझ्या स्वभावात काहीच नाही. (कालिदासाच्या दृष्टीला दृष्टी भिडवीत.) अरे विलोम म्हणजे तरी काय आहे? एक असफल कालिदास आणि कालिदास ? एक सफल विलोम ! (क्षीण हसतो) कुठे तरी आपण एकमेकांच्या फार जवळ आहोत.

    कालिदास : निश्चितच ! परस्परविरोधी गोष्टींतसुद्धा असा काहीतरी बादरायण संबंध असतोच.

    विलोम : हे सत्य तू स्वीकारतोयस हे फार चांगलं आहे. त्या जवळिकेतूनच तुला एक प्रश्न विचारू? न जाणो, परत तुझ्याशी बोलण्याचा योग येतो, न येतो...

    कालिदास : वा, वा, अवश्य ! काय विचारायचंय ते विचार.

    विलोम : म्हणजे मला एक सांग, (कालिदासाच्या खांद्यावर हात ठेवीत) की तू अजून तोच कालिदास आहेस ?

    कालिदास : ( त्याचा हात दूर करीत) मला तुझ्या बोलण्याचा अर्थ नाही समजला.

    विलोम : माझ्या बोलण्याचा अर्थ असा की कालपर्यंत तू जो होतास तोच आज आहेस की...

    मल्लिका : आर्य विलोम, असला बाष्कळपणा मला सहन होणार नाही.

    विलोम : यात बाष्कळपणा काय आहे ? मी अत्यंत योग्य असाच प्रश्न विचारतोय. काय कालिदासा, माझा प्रश्न तुला अयोग्य वाटतोय ? काय अंबिका ?

    अंबिका : (अस्वस्थपणे उठत...) मला काही माहीत नाही अन् काही माहीत करून घ्यायचं नाही.

    विलोम : (आत जाणाऱ्या अंबिकेला) थांब अंबिका, (अंबिका थबकून त्याच्याकडे पाहाते.) या गावच्या परिसरात कालपर्यंत मल्लिका आणि कालिदास यांच्या संबंधात अनेक प्रवाद होते, अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या...

    मल्लिका : आर्य विलोम, आपण...

    विलोम : (तिच्याकडे दुर्लक्ष करून...) ही गोष्ट लक्षात घेता कालिदासाने एकदा स्पष्ट सांगून टाकणे योग्य ठरेल, की उज्जैनीला तो एकटाच जाणार की बरोबर...

    मल्लिका : तुमच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देण्याचं कालिदासावर बंधन नाही.

    विलोम : मी कुठं म्हणतोय बंधन आहे म्हणून? पण कदाचित त्याचं हृदय त्याला उत्तर द्यायला भाग पाडील. काय कालिदास ?

    कालिदास : सध्या तुझे कौतुक करणं मात्र मला भाग आहे. तू इतरांच्या व्यक्तिगत आयुष्यांतही उत्तम प्रकारे नाक खुपसू शकतोस.

    विलोम : मी...मी नाक खुपसले ? कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यात ? काय अंबिका, कालिदासाचा हा आरोप तुला योग्य वाटतो ?

    अंबिका : या बाबतीत मला काही सांगायचं नाहीए. ऐकायचं नाहीए. मी सांगितलंय तुला. (जाते.)

    विलोम : गेली निघून. ठीक आहे; कालिदास तूच सांग, या तुझ्या आरोपात कितपत तथ्य आहे ? कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यात मी नाक खुपसले ? चल गावात जाऊन कुणालाही विचारू या ? (धूर्तपणे कालिदासाकडे पाहात राहातो. मग जाऊन मशाल हातात घेतो. क्षणभर वाट पाहिल्यासारखे करून...) अस्सं म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचे तुझ्या मनातच नाही तर, (छद्मीपणे हसत) कदाचित तुझ्या दृष्टीने प्रश्नच तसा अवघड असावा.

    कालिदास : तुला हवं ते समज. मला मात्र राजधानीला जाण्याचा अजिबात मोह नाही.

    विलोम : (मशाल उंचावीत) निश्चितच ! असा मोह तुला होणं शक्यच नाही. सामान्य माणसालाच असे मोह होतात. पण तू असामान्य, अलौकिक. आता मला फक्त एकच सांग. समजा, उज्जैनीला जाण्याचा तुझा निश्चय झालाच– समजा हं,.. तर अशा परिस्थितीत मल्लिकेलाही बरोबर...

    मल्लिका : आर्य विलोम, आपण आपली मर्यादा सोडून बोलत आहात. मी कुक्कुलं बाळ नाहीए, माझं हित-अहित मला चांगलं कळतं. खरं म्हणजे तुमच्या लक्षात यायला हवं की तुम्ही एक आगंतुक म्हणून इथं...

    विलोम : या गोष्टीची दखल घ्यायची मला गरज वाटली नाही. तू माझा तिरस्कार करतेस. माहीत आहे मला. पण मी तुझा तिरस्कार करू शकत नाही. मी इथे उपस्थित असण्याचं हे एकच तर्कशुद्ध कारण आहे. आणखी एक गोष्ट. तू कालिदासाच्या फार जवळ असतेस, सदैव सान्निध्यात असतेस, पण कालिदासाला तुझ्यापेक्षा मी जास्त ओळखतो. (दोघांकडे आळीपाळीने पाहातो. मग जाता जाता दारापाशी थांबून एकदम वळतो.) तुझा प्रवास सुखाचा होवो कालिदासा, शुभास्ते पंथानः सन्तु ! तू जाणतोसच, विलोम तुझा हितचिंतकच आहे.

    कालिदास : ते माझ्याशिवाय जास्त कुणाला माहीत असणार ?

    विलोम : (तिरस्कारपूर्ण हुंकार, मग मल्लिकेकडे पाहून) हा आगंतुक पाहुणा इथून पुढेही येईलच. तेव्हा त्यावेळेसाठी आत्ताच क्षमायाचना करून आत्ता निरोप घेतो. (व्यंगपूर्ण हसत निघून जातो. काहीक्षण कालिदास मल्लिकेकडे पाहात राहातो. मग गवाक्षाकडे जाऊन बाहेर पाहात राहातो. मल्लिका त्याच्या जवळ जाते.)

    - oOo -

    पुस्तक: आषाढातील एक दिवस
    लेखक: मोहन राकेश/ विश्वनाथ राजपाठक
    प्रकाशक: कॉन्टिनेन्टल प्रकाशन
    आवृत्ती पहिली (१९७७)
    पृ.: १६-२१.

    ---

    दूरदर्शन वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या ‘भारत एक खोज’ या हिंदी मालिकेमध्ये सादर झालेला हा प्रसंग.


हे वाचले का?