पक्षातली आणि यनियनमधली डी-कास्टाची पातळी वाढू लागली तसे त्याला या दोन्ही संघटनांमधले दोष लक्षात येऊ लागले. स्वार्थीपणा ध्यानात येऊ लागला. पक्षाची भोंगळ धोरणं खटकू लागली. पक्षातल्या काही पुढाऱ्यांचा भोंदूपणा जाणवू लागला. पक्षाच्या इज्जतीसाठी संप करणं त्याला पसंत नव्हतं. संपासाठी तसंच कारण असायला हवं आणि न्याय्य कारणासाठी केलेला संप मिनिस्टरनं आश्वासन दिलं म्हणून मागं घ्यायचा? पुढच्या निवडणुकीत त्यावेळच्या युनियनचा सेक्रेटरी काँग्रेस आमदार बनला तेव्हा त्याला त्या घटनेतलं रहस्य कळलं.
पक्षाच्या आणि युनियनच्या पुढाऱ्यांचे शानदार फ्लॅटस् त्याला खटकू लागले. आणि त्यांची लफडीही. रिट्झमधून यथेच्छ मेजवानी झोडून आल्यावर यांना झोपडपट्टीतल्या कामगारांसमोर समाजवादाच्या नावाखाली शपथा घेणं जमतं तरी कसं याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. त्याचा संताप वाढत होता. पक्षाची धोरणं अस्पष्ट, संदिग्ध आहेत याची त्याला खात्री वाटू लागली होती. आजच्या दुर्दशेला कारणीभूत ठरलेला प्रस्थापित समाज मोडून काढून नवा समाज निर्माण करण्याची पक्षाची आण होती. पण ही शपथ फक्त पुढाऱ्यांच्या भाषणापुरतीच मर्यादित आहे असं कास्टाला वाटू लागलं होतं. काही पुढारी प्रामाणिक होते. नाही असं नाही. पण नकळत आपण प्रस्थापित हितसंबंधांचेच रक्षणकर्ते बनत आहोत हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं. आणि त्यांच्या या भोळ्या भोंदूगिरीचाच कास्टाला राग येत होता.
आणि पक्षाची कामगार चळवळ म्हणजे केवळ फसवाफसवीचाच प्रकार असल्याचं त्याच्या जेव्हा लक्षात येऊ लागलं तेव्हा तो भयंकर अस्वस्थ झाला. कामगार युनियनचा उपयोग केवळ पक्षहितासाठीच केला जातो हे बघून त्याच्या तळपायाची आग मस्तकात जात होती. एका कारखान्यातला संपलढा ऐन रंगात आला असताना तो मागे घेण्याचा एकाएकी पक्षाने आदेश दिला. डी-कास्टाला राग आला. कामगारांची मागणी न्याय्य असताना आणि लढा यशस्वीपणे चालू असताना काहीही कारण नसताना तो मागे का म्हणून घ्यायचा? केवळ मालकाशी नंतर बोलणी करण्याच्या आश्वासनावर? त्यानं खोलवर चौकशी केली तेव्हा त्याला कळलं की मालकानं पक्षाला निवडणूक निधीसाठी मोठी देणगी नुकतीच दिली आहे.
तेव्हापासून कास्टाचे पक्षातल्या पुढाऱ्यांशी जोराचे खटके उडू लागले. अशाच एका संपाच्या प्रकरणी त्याचे युनियनच्या सेक्रेटरीशी जोरदार मतभेद झाले. तो सेक्रेटरी उघड उघड मालकाच्या हिताच्या अटी करारामध्ये मान्य करीत होता. कास्टानं त्याला त्याची चूक समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण सेक्रेटरीला समजूनच घ्यायचे नव्हते. कास्टा भडकला आणि सरळ युनियनमधून बाहेर पडून त्यानं आपली स्वतंत्र युनियन उभारली. कास्टाच्या लोकप्रियतेमुळे जुन्या युनियनमधले पंच्याहत्तर टक्के कामगार कास्टाकडे आले.
त्या दिवसापासून कास्टा झपाट्याने वर आला. स्वतंत्र आणि शुद्ध कामगार चळवळ चालविण्याचा त्याने निर्धार केला. कुठल्याही पक्षाशी पक्के संबंध ठेवायचे नाहीत आणि केवळ कामगारांच्या हितासाठी चळवळ चालवायची हे त्याने ध्येय ठरविले होते. अनेक प्रलोभनं होती. धोके होते. पण कास्टा आपल्या परीनं आपल्या ध्येयाला चिकटून होता. त्याच्या युनियन्स वाढत होत्या. नवनवी क्षेत्रं तो आणि त्याच्या यनियन्स काबीज करीत होत्या. त्याच्या युनियन्स आपले लढे यशस्वीपणे चालवीत होत्या. कास्टा तुरुंगात जात होता. पोलिसांच्या लाठ्या झेलत होता. आणि अधिकच लोकप्रिय होत होता. एक स्वतंत्र बुद्धिमत्तेचा चांगला कामगार नेता म्हणून त्याचा लौकिक वाढत होता. युनियनच्या कामगारांकरवी तो अनेक माहोमा हाती घेत होता. ’स्वच्छता मोहीम’, ’अधिक काम मोहीम’ , ’स्वावलंबन मोहिम’, भ्रष्टाचारविरोधी मोहीम , ’स्मगलिंगविरोधी मोहीम’, अशी कामं धडाक्याने हाती घेऊन अख्खी मुंबई हादरवून टाकीत होता.
कास्टा कामगार चळवळीत एवढा गुरफटला गेला होता की खाजगी आयुष्याचा विचार करायला त्याला वेळच नव्हता. पण त्याचं व्यक्तिमत्त्व रुबाबदार होतं. आणि त्याच्यासारख्या हुषार, तरुण आणि तडफदार कामगार नेत्यावर जीव ओवाळणाऱ्या मुलींचा मुंबईत मुळीच तोटा नव्हता. तो पक्षात असताना तर पक्षातल्या यच्चयावत तरुण मुलींचे तो साक्षात दैवत बनला होता. पक्षाबाहेर पडल्यावर अधिकच. कास्टा सोवळा नव्हता. तो म्हणेल ती मुलगी त्याच्यावर जीव ओतायला तयार असताना कोरडा कसा राहील? किती धर्मांच्या, किती भाषा बोलणाऱ्या आणि उच्च कुळातल्या बड्या बापांच्या बेट्या त्याच्या पस्तीस वषांच्या आयष्यात येऊन गेल्या याची त्यानं गणती ठेवली नाही. पण कुणात त्याने स्वतःला गुंतवूनही घेतलं नाही.
अलीकडे मात्र आपण बऱ्याच गोष्टीत गुंतत चाललो असल्याचं त्याच्या ध्यानी येऊ लागलं होतं. भायखळ्याच्या ब्लॉकमध्ये तो नकळत गुंतला. नवीन युनियन थाटताना रजिस्ट्रेशनच्या आधी त्याला ऑफिस थाटावं लागलं. भायखळ्याचा ब्लॉक मिळाला. रजिस्ट्रेशन नव्हतं म्हणून तो स्वतःच्या नावावर घ्यावा लागला. पुढं गिरणगावात मोक्याची जागा मिळाली तेव्हा ऑफीस तिकडं नेलं. पण मग ब्लॉक तसाच नावावर राहून गेला. तशीच ती सिल्व्हिया. बिचारी एकनिष्ठ नोकराणीसारखी सेवा करते. कास्टाचा सगळा ब्लॉक गृहिणीसारखी तीच बघते. तिच्याशी कास्टाला लग्न करायचं नाहीय. तिचाही तसा इरादा नाही. पण जीव गुंतलेला आहे. युनियन्सचे पगार, जीप, मिळणाऱ्या भेटी, अशा कितीतरी गोष्टी-त्यांमध्ये कास्टा गुंतत चालला होता. नीलाला स्टेनो म्हणून लावून घेतलं तेव्हा तिच्यात आपण एवढे गुरफटन जाऊ अशी कल्पना त्याला कुठे होती? आणि विनीता? डॅशिंग, रॅव्हिशिंग, ब्रिलीयन्ट! विनीता पहिलीच अशी मुलगी की जिच्यासाठी कास्टा आपणहून तळमळला. शिवाय आँटी पेगीनं शिवाजी पार्कच्या बंगल्याची लालूच दाखविली आहे. मेथा आपल्याशी एवढा गोड बोलतो ते आपण कसं खपवून घेतो. त्याचे कुठल्या कारखान्यात कसे शेअर्स आहेत, कोणत्या पेट्रोल पंपाचा कुठल्या कामासाठी तो आपला वापर करतो हे आपणास माहीत नाही काय? की त्यानं जीप आपल्याला अगदी स्वस्तात विकली म्हणून आपण त्याच्याकडे काणाडोळा करतो?
पण कामगार चळवळीत आठ वर्षे स्वतंत्रपणे काढल्यावरही एक गोष्ट मात्र अद्याप कास्टाच्या ध्यानात येत नव्हती. किंवा कळूनही उमगत नव्हती. पक्षातल्या पुढा-यांना, युनियनच्या लोकांना ज्यासाठी तो पूर्वी शिव्या देत होता तेच सारं आता तो स्वतः करू लागला होता. भायखळ्याचा त्याचा ब्लॉक जरी अगदी अद्ययावत नसला तरी चांगलाच भपकेबाज होता. उंची हॉटेलांमध्ये जेवण्याची सवय त्याला लागली होती. आजच एका गेट-मीटिंगनंतर विनीताला भेटायला तो ’हॉटेल फरियास’ मध्ये रात्री जाणार होता. पूर्वी त्याला मोठ्या हॉटेलमध्ये जेवणं म्हणजे कामगारांची फसवणूक करण्यासारखं वाटत होतं. आता खूप काम केलं की रात्री झोपताना थकवा घालवण्यासाठी उंची मद्याचे एक-दोन पेगस् घेण्यात त्याला काहीच वावगं वाटत नव्हतं. आणि आता त्याला घामाचा भयंकर त्रास होऊ लागला होता. पंख्यानं त्याचं डोकं दुखायचं. डॉक्टरने त्याला बेडरूम एअर-कंडिशन्ड करूनघेण्याचा सल्ला दिला होता. पूर्वी तो पक्षाच्या एका पुढाऱ्याच्या घरी जायचा. त्याची पुढची खोली अगदी साधी, जुनाट फर्निचर असलेली अशी होती. याच खोलीत तो पुढारी सर्वांच्या भेटी घेत असे. एकदा त्याने कास्टाला आतल्या खोलीत बोलावलं. कास्टा एकदम चक्रावून गेला. मऊ मऊ गालिचे, खुसखुशीत सोफासेट्स एअर-कंडिशनरमधून येणारा एक उंची सुगंध. त्या पुढाऱ्याच्या ढोंगीपणाचं त्याला तेव्हा हसू आलं होतं. आणि पुढं राग यायचा. आता तो त्याच मार्गाने जाणार होता. पण आपली जुनी कर्मठ मते त्याला आठवत नव्हती. आपला दृष्टिकोण विशाल झाल्याचं मात्र त्याला जाणवत होतं. एवढे कष्ट आपण कशाला घेतो कामगारांठीच ना? सकाळी सहापासून रात्री बारापर्यंत आपण त्यांच्यासाठी राबतो. मग आपण प्रकृतीची काळजी घ्यायला नको? असं त्याला वाटत होतं. म्हणजे उघडपणे तो या गोष्टींचा विचार देखील करीत नव्हता. पण कधी छुपेपणानं हे विचार उसळी मारून वर यायला निघाले की त्यांना अशी उत्तरं देऊन तो गप्प बसवीत होता.
पण कास्टा खरा अस्वस्थ होत होता तो वेगळ्याच विचारांनी. एवढा भयंकर भ्रष्टाचार तो आजूबाजूला अगदी जवळून उघड्या डोळ्यांनी पाहत होता. कामगारांवर आणि सामान्य माणसांवर किती घोर अन्याय होतात हे त्याला फार चांगलं ठाऊक होतं. कितीही बोनस मिळाले आणि पगारवाढी मिळाल्या तरी कामगारांची परिस्थिती काही सुधारत नव्हती. काही खाजगी कंपन्यांचे कामगार गबर होते खरे. पण शहरातलं दारिद्र्य कमी होण्याऐवजी सतत वाढतच चाललेलं दिसत होतं. आणि या प्रस्थापित समाजाचा भाग म्हणून ही प्रक्रिया तो मुकाटपणे पाहात होता. कास्टाला हे अगदी मनोमन पटत होतं की केवळ काही कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देऊन त्यांचं जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करणं हे आजच्या समाजव्यवस्थेत अशक्य आहे. ती कामगारांची फसवणूक आहे. खरा बदल घडवून आणायचा असेल तर हा समाज तळापासून ढवळणारी क्रांतीच आवश्यक आहे. पण पटत असूनही अशा क्रांतीसाठी सर्वस्व सोडण्याची जिद्द आपल्यात राहिली नाही हे त्याला कळत होतं आणि तो खजील होत होता. दहा वर्षांपूर्वी त्याला ही समज आली असती तर त्याने मागचा पुढचा विचार न करता स्वतःला त्या कार्यासाठी झोकून दिलं असतं. आता वेळ गेल्यासारखं वाटत होतं. जमिनीत पाय गाडले गेल्यासारखं वाटत होतं. त्याच्या दोन्ही बाजूंनी तणाव होते. अनेक जहाल क्रांतिकारी कार्यकर्ते त्याचा पिच्छा परवून त्याला आपल्यात खेचण्याचा प्रयत्न करीत होते. त्याचप्रमाणे अनेक बडे हितसंबंध देखील त्याच्यापुढे मोठी प्रलोभने धरून होते. आणि या प्रचंड ताणाखाली तो स्वतः मात्र काहीच निर्णय घेत नव्हता. त्याचे काम त्याच तडफदार गतीनं चाल होतं. कामात खंड नव्हता. गतीही कमी होत नव्हती. उलट सारखी वाढतच होती. कामाचा व्यापही वाढत होता. पण अगदी तळाशी हे विचार मुंग्यासारखे चावून चावून त्याला अस्वस्थ करीत. इतके की कधी कधी हे विचार गाडून टाकण्यासाठी तो सबंध दिवसभर- सकाळपासून रात्रीपर्यंत सिनेमे पाहात राही. एखादा दिवस घालवला की मग त्याला बरे वाटे. आणि पुन्हा स्वत:ला तो कामात झोकून देई.
- oOo -
पुस्तक: 'मुंबई दिनांक'
लेखक: अरुण साधू
प्रकाशक: मॅजेस्टिक प्रकाशन
आवृत्ती सातवी (२००७)
पृ. १०८ - ११२.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा