मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०१९

तिढा

रात्री बाराच्या नंतर यशीत धुराळा उडाला. कर्कश्श आवाज करीत पोलिसांच्या गाड्या आल्या. कुत्री भुंकायला लागली. सगळा कल्लोळ मातला. भर्रर्र करीत गाड्या मारोतीच्या पाराजवळ थांबल्या. पुढच्या गाडीला पिवळा दिवा. ज्याला सुगावा लागला, त्यांनी आपली दारं अधिक गच्च केली. पोलिसांनी पटापटा उड्या मारल्या. फुंकलेल्या शिट्यांनी कुत्र्यांना अधिकच चेव आला. मारोतीच्या पुढे मन्मथ वाण्याचं घर. पोलिसांनी दारावर काठी आपटली. दार उघडण्याच्या तयारीत कोणीच दिसंना. आवाज आणखी वाढला. पोलिसांच्या गाडीचा आवाज ऐकला तरीही मन्मथनं धीट मन करून विचारलं.

इडा पीडा टळो
"कोणंय?"
"दार उघड आधी, मग सांगतो.”
आवाजात बेदरकारपणा, मन्मथनं दार उघडलं. नाव विचारल्यानंतर पोलीस म्हणाले,
“अप्पा, जरा बाहेरच या तुम्ही.”
मन्मथ बाहेर आला. पोलिसांनी विचारलं, “गावातल्या पुतळ्याचा चबुतरा कोणी उखडला?"
“काय की बा, मी भाईरगावाहून आजच आलो.”
मन्मथनं गावाहून आल्याचं एसटीचं तिकीटही दाखवलं.
नंतर पोलिसांनी विचारलं, “बरं मग आम्हाला सरपंचाच्या घरी घेऊन चल, पोलीस पाटलाचं घर किती दूरंय इथून?"
"चला, मी येतो तुमच्यासंग. दोघांचीबी घरं दाखवितो.”
मन्मथ पोलिसांबरोबर निघाला.
पोलीस गिरीधरच्या घरी आले. तेवढ्या रात्री गिरीधरनं चहा केला. पोलिसांनी विचारलं,
“काय सरपंच, चबुतरा कोणी उखळला.”
"मी आज कृषी विद्यापीठात शेतकरी मेळाव्यासाठी गेल्तो. आता एका घंट्याआधी दोस्तानं मला जीपमधी आणून सोडलं. मला काही माहीत नाही गडे.” गिरीधरनं उडवलं.
त्या रात्री पोलीस गावात खूप फिरले, पोलीस पाटलाकडे गेले. पोलीस पाटलांनी तर जागेवर चबुतराच नव्हता, असं सांगितलं.
"सायेब, आता जरी तिथं जाऊन पाह्यलं, तरी तिथं वाळूचा कण नाही अन् कोण कशाला चबुतरा उखळीन हो?"

भाऊराव पोलीस पाटलाच्या बेरकी सवालानं पोलीसच अर्धे गार झाले.खूप फिरूनही हाती काहीच आलं नाही. शेवटी सरपंच अन् पोलीस पाटलाला घेऊन पोलीस बुधवाड्यात गेले. यशीत जिपा थांबल्या. यशीत फक्त पावलांचेच ठसे. काहीच कळायला मार्ग नाही.  पोलिसांनी यशीपढच्या पटांगणात बुधवाड्यातल्या माणसांना बोलावलं. पटांगणात सगळी बाया-पोरं, माणसं धरून आणल्यागत बसली. पोलिसांसाठी, गिरीधरसाठी, पोलीस पाटलासाठी हारीनं पटांगणात दोन बाजा आणल्या. हारीची अन् त्यातल्या एक-दोन पोलिसांची ओळख होती. निवेदन, कागदपत्राच्या निमित्तानं अनेक वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्यामुळं असंल कदाचित.

"काय झालं लीडर? काय काय घडलं, ते सरळ सांगायचं?” पोलिसांनी विचारलं
"मी काय सांगणार सायेब. सरपंच, पोलीस पाटील हायतं की इथंच." हारी बोलला.
"लक्षात घ्या. मी तुम्हाला विचारतोय. अगदी मोकळ्या मनानं सांगा काय घडलं ते?"

पोलीस आणखी विचारू लागले. गिरीधर खाली पाहत होता, पण भाऊराव पोलीस पाटलाची नजर मात्र हारीवर होती. भाऊच्या बेरकी नजरेनं हारीची जीभ अडखळत होती.

"सायेब, बाबासाह्यबांचा पुतळा बांधायचं आम्ही ठरविलं. त्याच्यासाठी काल चबुतरा बांधला व्हता. पुतळाबी घरात आणून ठिवलाय. पण काही गावातले लोक रात्री आले अन् सगळा वटा उकरून टाकला. सम्दं पाणी फेरलं बघा.”
"मग ते दगड कुठयंत?" पोलिसांनी विचारलं.
"यशीत सगळा गर्दा दिसला की, जिवाच्या आकांतानं आम्ही पळालोत. माणसायच्या जवळ काठ्याकुदळी व्हत्या. त्येच्यानं जिवाचंच भ्येव पडलं आम्हाला. ह्या येळापस्तोर उसातच लपलो व्हतो. त्येच्यानं दगड कुठं टाकले लोकायनं ते काही माहीत नाही.” हारीनं सांगितलं.
“पूर्वी इथं काही होतं असंसुद्धा वाटत नाही आता. काही तरी ठोस पुरावा पाह्यजे ना तुमच्याजवळ.” पोलीस म्हणाले.

हारीजवळ पुरावा काहीच नव्हता. सगळेच समोर दुचित मनानं बसले. काय बोलावा, काहीच सुचंना. उरात धडकी भरलीय. इतक्यात एका बाईनं जरा घसा खाकरला. लेकरू हातानंच आपल्या पुढं घेतलं.तळमळून बोलली,
"सायेब, ह्या लेकराची आन. इथं आम्ही वटा बांधला होता. गावकऱ्यानं सगळं झाडून-पुसून नेलं, त्याला आम्ही तरी काय करावात?"

"मी तरी काय करू बाई? इथं काहीच पुरावा नाही." असं म्हणून पोलीस अधिकारी उठला. "तुम्हाला काही निवेदन द्यायचं आसंल तर उद्या द्या. तालुक्याला दिलं तरी चालेल." हारीला उद्देशन तो अधिकारी बोलला. पन्हा कर्कश्श आवाज करीत गाड्या वेगानं निघून गेल्या. गाड्या गेल्याबरोबर तशा रात्री पुन्हा गावात चिवचिवाट सुरू झाला.

कवळं उन. मारोतीच्या पारावरुन खाली रस्त्यापस्तोर रांगत आलं. पाया पडायला येणार्‍या-जाणाऱ्यांची गर्दी वाढतीय. आलेला माणूस सरळ जात नाही. मारोतीच्या देवळातून पाया पडून खाली रस्त्यावर आला का थबकतो. रात्रीच्या घटनेचं हलकंफुलकं ओझं अजूनही मनावर आहे. उनाच्या तिरंबीला एकेकजण कालच्या घटनेला उजाळा देऊ लागलाय.

"आरं, ती पोलीस तालुक्याची नव्हता, दोन-तीन गाड्या पार जिल्ह्याहूनच आल्त्या."
"त्यायला कसं कळालं?”
"ह्येच. महारवाड्यातलं कुणी तरी गेल्तं म्हणं इथून. तालुक्याहूनच परभणीला फोन लावला. पोलीस चवकशीला आले."
"मायला. पण काम लय झकास झालं. अर्ध्या घट्यात तर सम्दा बुकणाच वाजविला"
"मला वाटलं, पोलीस धरून नेत्यात काय की एखांद्याला."
“मजा आली गडे, दोन पोलिसायची. आपला गहजबच पाह्यला की नीट पळ काढला त्यायनं."
"काय करतेनं, न पळून जिवाचंच पडलं होतं की.”
“पण सगळं बाबरी मशिदीवानी झालं गड्या. आपुन म्हणू लागलो, तिथं पुतळा नगं. त्यायचं आपलं, आम्हाला तिथंच बांधायचा."
पारावर लोकांच्या जमलेल्या गर्दीत एकेकजण एकेक बोलू लागला. कुणाचाच कुणाला मेळ नाही.

नाना दर्शनाला आले. लोक काय बोलतात, इकडंच नानाचं लक्ष. गर्दीत गप्पा चालूचयत.नाना मारोतीच्या मंदिराच्या दारात उभे.
“मनोजवं मारूत तुल्य वेगं.”
“पण पोरंहो, पोलिसायला कशी खबर लागलीय की?"
“जितेंद्रीयं बुद्धिमत्तां वरिष्ठं.”
"मी तर उभ्या धडकीनचं पुढं झाल्तो. अंगुठ्याला चांगलाच दगडाचा मार बसला.”
“श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये.”
"पण झालं ते बरं झालं. खटखट मिटली."

नाना हनुमान स्तोत्रातली एक एक ओळ म्हणीत होते. मधूनच पोरायला बोलत होते. नानांना त्याचं काही वाटलं नाही. ते मंदिराच्या पायऱ्या उतरले. इकडच्या-तिकडच्या गोष्टी त्यानी केल्या. मग सरळ हळूहळू घरचा रस्ता धरला. लोकांचा आपल्याबद्दल काही गैरसमज होऊ नये, म्हणून आपण दर्शनाला आल्यानंतर चार गोष्टी बोललो, नाना समाधानातच घरी चालले. पारावरची गर्दीही पांगलीय. लोकं कामाला निघालीत. ठसठसणार बेंड एकदाचं फुटल्यागत वाटायलंय सगळ्यांनाच.

वरचेवर ऊन वाढायलंय तरी सगळ्या बुधवाड्यावर अवकळा पसरल्यासारखंच. घरादारावरून गाढवाचे नांगर फिरल्यागत झालंय., चांगल्या चालत्या गाडीला खीळ बसलीय... दिसंत काहीच नाही पण आपला लयच मोठा घात झाल्यागत वाटायलंय. ह्या पांढरीत राहूच वाटंना. जागा कशी फेकून द्यायल्यागत व्हायलंय, आपल्या जिनगानीलाच कुणाची तरी दिष्ठ लागलीय, दोन महिन्यांपासून काहीच काम देईनात. गावातल्या पाटलांचे गावोगावचे सोयरेबी एक झालेत. सगळ्यायनंच तसं ठरविल्यावर करावा तरी काय? आता तर राहणं मुश्कील होऊन बसलंय, काल आपला वटा उखळला. उद्या आपल्या अंगावर काठी पडंन. कोणाचा काय भरवसा सांगा!

आपापल्या परी सगळेच दुचित बसलेत. कुठं कटं घोळक्यानं बसलेत. पण एकमेकांच्या नजरेला नजरसुद्धा भिडवू वाटंना, परवाच्या दिशी रात्री पोटात तांदूळ पडलेत, त्याच्यावर कालचा दिवस कोल्डाच गेलाय, निस्तं पाणी पेऊ पेऊ पोट ढवळून निघतंय, पोटाला कळा लागल्यात. लहान लेकरंबी रात्री रडूनरडून गप्प बसली. आता सगळी समजदार माणसासारखं न बोलता, न चालता एक्या ठिकाणी गप्प बसूनयंत. ऊन वाढत चाललंय. चबुतऱ्याच्या ठिकाणी कुठे-कुठं वाळू दिसतीय, पावलायचे ठसे अजूनबी मोडले नाहीत. पोटात निस्ती आग पडलीय, कोर भर भाकरीशिवाय ह्या जगात कुणीच मोठं नाही असं वाटू लागलंय. हारी उठला, हातापायाची हाडं कडाकडा वाजली उठताना. “नानांकडून येतो" म्हणाला. “सोय करतो पोटाची काहीतरी, आणतो काहीतरी मागून, भाकरीला तर नाना नाही म्हणायचे नाहीत, याची खात्रीय आपल्याला.”

हारी गेल्यावर सगळ्यायलाच जरा बरं वाटलं. त्यानं आणावात काहीतरी शिळ-इटकं का आसंना. पण आतडी खरकटी व्हतीन.

गावातून कशाला जायचं? जाऊ तरी वाटंन का? हारी गावाबाहेरून गेला. एक रस्ता गावाबाहेरून जातो, थेट नानांच्या तिथं जाताना कोणी बघुनीसुद्धा असं वाटलं त्याला. गायवाड्याचा भला मोठा लोखंडी दरवाजा. त्याला भाल्यासारखे टोकदार गज. त्या दरवाजाचीसुद्धा हारीला कसली तरी भीती वाटली. दरवाजा ओलांडून हारी आत गेला. त्याला नानाच्या बहिणीनं पाहिलं. रांडव झालेल्या ताई. हारीला पाहिल्याबरोबर त्यांनी नाना घरी नाहीत, म्हणून सांगितलं. कालचं ते तसं घडलं, हारी आज नानाला भेटायला आलाय. गावकरी काय म्हणतेनं, ताई पुन्हा म्हणाल्या.
"हारीभाऊ, नाना घरी न्हाईत.”
“कुठं गेलेत?" हारीनं विचारलं.
"घरी काय तसं सांगितलं नाही. पण फवारायचं औषिध आणायचं म्हणून तालुक्याला जायचं म्हण्ले व्हते.” ताई.
"ताई, एक काम करा. दोन दिवसापासन आमच्या कोणाच्या आतड्याला आन लागलं नाही. काहीबी करा, पण पोटाचा जाळ इझवायला काही तरी द्या."
हारी तळमळून बोलला. डोळ्यांत पाणी खळाळलं.
"काहीच नाही रे हारी. शिळ्या भाकरी व्हत्या दोन-चार दिसांच्या, सकाळीच मांगणीला दिल्यात."
ताई बोलल्या, तरी हारीला काहीतरी घेतल्याशिवाय निघायचं नव्हतं.खायला पाचपन्नास माणूसय बुधवाड्यात. कोर-कोर भाकर तरी पाह्यजी सगळ्यायला.
"ताई, तुम्हाला ऐकावाच लागंन.” हारी बोलला.
“भाकरी नसल्या, तर जेवारी देऊ का?" ताई म्हणाली
"जेवारी कव्हा दळून आणावात. ताई, आम्हाला गिरणीत तोंड दाखवायला जागा नाही. भाकरीच बघा असल्या तर, जरा अंदाज्यानं द्या." हारी पुन्हा कळवळून बोलला.
ताई बराच वेळ वाड्यात थांबल्या. भावाचं घर आसलं, तरीही वाड्यात ताईची सत्ताही चालते. ताईंनी दहा-बारा भाकरीची चवड घेतली. घरातल्यांचे जेवण राहायलेत, तरीही सकाळी सगळ्यांनीच काहीतरी खाल्लेलं. ताईंनी हारीच्या धोतरात भाकरी टाकल्या. “आणखी थांब" म्हणून सांगितलं. मध्ये गेल्यानंतर एक मापात तांदूळ आणले. ताईनं दिलेले तांदूळ हारीनं रुमालात बांधले. ताईंच्या पाया पडण्यासाठी हारी वाकला, पण ताईच मागं सरकल्या. गायवाड्यातून बाहेर निघतानिघता हारीन गोठ्याकडं पाहिलं भिंतीला बाज उभी करून ठेवलीय. कसली तरी आठवण झाली. कानशिलं पोळू लागली. हारीनं गायवाड्याच्या बाहेर पाऊल टाकलं, तेव्हा ताईची पुन्हा एकदा हाक आली,
"हारीऽ."
“काय?"
“जातानं गावाच्या भाईरून जाय. नाहीतर गावातून जाशीन.” ।
“भायरून जातो ताई” हारी बोलला.
हारीनं नानाच्या घरून आलेल्या भाकरीत पोटचा जाळ इझता इझला नाही. भातानं पोटात ढवळतंय. पण पोटात ढकलल्याशिवाय उपाय नव्हता. मोठ्या माणसांनी कळ सोसली, पण लहान लेकरं परात-वाट्या जमिनीवर आपटू लागले. चाळीसेक माणूस जेवायचं म्हणल्यावर कमी लागंन का? होतं नव्हतं, पोटात ढकलंल, तरी भस्म्या राक्षस थंड झाला नाही. आजचं मोठ्या मुश्किलीनं भागलं. आता उद्याचं कसं?
पुतळ्याचे अठरा हजार रुपये गेले. त्यातलं काहीच नाही उरलं. पुतळा उभाही राह्यला नाही, उलट दुसरेच वांधे झाले. आता हे असे कुठवर आचके द्यायचे? कुठंवर दावे तोडावात. काहीतरी मार्ग पाहावा लागंल. जगण्यावर इरजन पडल्यासारखं झालंय. आता उद्या कुणापुढं पदर पसरायचा, याचंच कोडं सगळ्यांना पडलंय.

रात चढाला लागलीय. लेकरंबाळं बायाजवळ झोपलेत.खाली रोजच्यासारखं आथरून नाही काही नाही. जिथं जागा गवसंन तिथं अंग टाकलंय, बुधवाड्यातली सगळी कर्तीधर्ती माणसं मात्र हारीच्या खोलीत आलीत. खोलीतल्या एका कोपऱ्यात बाबासाहेबांचा पुतळा. निश्चल गंभीर...

"कस करायचं आता सांग बाबा तूच." हारीला सगळ्यांनी विचारल.
"हे बघ, पोटाचं म्हणशील, तर उद्याचीबी सोय नाही. आपुन असं मेटं मोडल्यावानी बुधवाड्या कव्हरत झुरत बसायचं. कामाचं काहीतरी बघावा लागंन का नाही." धोंडिबानं विचारलं.
"काय बघावात? मला तर काहीच सुचना झालंय. नाना आपल्याला काम देईन,याचा तर काडीचाबी भरूसा नाही. जवळच्या गावायला कामाला जावात, तर तिथंबी तीच बोंब. सगळ्यायला सांगून ठिवल्यालं, आपल्याला काम द्यायचं नाही म्हून.” हारी.
"एर्‍ही पाटलाईत इस्तू आडवा जात नाही. पण अशा येळंला सगळे शहान्नव कुळी, अक्करमाशी. बारामाशी एक व्हतेत मायला.” धोंडिबा बोलला.
भगवान अन् नारायणचं म्हणणं येगळं पडायलंय.
“आपन गावकऱ्यावर खटला भरूत. नाहीतर ते जास्तच माताळतेनं."
बारी ही माहिती सगळ्यांना सांगितली. बाजूलाच भगवान अन् नारायण दोघंबी बसलेत. बाकीचे काय म्हणतात, याची त्यांनाही उत्सुकता.
"आपल्याला पुतळा तर कव्हाबी बांधायचाय. आपुन त्यायच्या संगं खेटुत पण सध्या आपल्याजवळ काय? उद्याची चूल पेटण्याचा भरवसा नाही." घोळक्यातलाच एक जण बोलला. सगळ्यांनाच जवळपास ते पटलंय.

गावातल्यांचा माजोरीपणा पाहिला की, भगवान अन् नारायणचं टकुरं भडकतं. दोघंही दिवसभर इकडंतिकडं फिरतात. पोटाच्या वढीनं घरी आले की, भडकलेल्या टकऱ्याची निस्ती राख होते. पुतळा आपल्याला बांधायचाय. जीव गेला तरी हरकत नाही. पण आज आपल्याजवळ ताठ मानानं उभं राह्यला काय? काहीच नाही. मनानं किती ठरविलं, तरी पोट मजबूर करतंय. नारायण अन् भगवान तसेच बसलेले. काहीच बोलत नाहीत. सगळं खरंय, पण मन मानायलाच तयार होत नाही. फक्त चुळबुळ होतीय. बोलताही काहीच येत नाही.

"आखरीचं आता कसं करायचंय, ते ठरवा” धोंडिबानं शेवटचं विचारलं.

“काय ठरवायचं? काम पाहायला नाशकाला जायचं. मव्हा मेव्हना तिथंचंय. मोठा गुत्तेदारंय. नेहमी म्हणीत आस्तूय कितीबी माणसं घेऊन यी. तुला काम देतो. आता आपल्याला तिथं गेल्याबिगर काय पर्याय?" हारी सांगत होता.
नारायण मध्येच उसळला.
"आसं कसं म्हणतस हारी ती? तूच हे पतळ्याचं काढलंस अन् आता तूच हे काम सोडून भाईर गावाला जायचं म्हणतूस?" :
'आरं बाबा, पुतळा आपन गावकऱ्यायच्या नाकावर टिच्चून बांधू. पण आता पोट जगवायला काहीतरी हातपाय हलवावा लागंन का नाही? दीड-दोन महिना का होईना पण भाईर काम करू अन् मंग येऊ पुतळ्यासाठी." हारीनं सांगितल्यावर नारायण थोडा गप्प बसला.
" आपल्याजवळ तर एक नया पैसा नाही अन भाईरगावाला जायचं म्हणतूस?" धोंडिबानं विचारलं.

“करावा लागंन काही तरी." हारी बोलला.
"काहीतरी म्हणजी?"
तालुक्यापस्तोर पायी जायचं. तिथं गेल्यावर मोडावा लागंन काही तरी.पण गेल्याबिगर जमायच नाही. उद्या दिवस निघायच्या आत गाव सुटलं पाह्यजी. परवादिशी आपुन कामाला लागलोत तरच काहीतरी खरंय."
"ठरलं मग.”
"नक्की. त्याच्याशिवाय इलाजच काय? हे आस ढारावानी कव्हरक राहावात? अंगाला पानी न्हाई. पोटात घालायला शिळा तुकडा न्हाई. दातावर हानायला फुटकी कवडी न्हाई. दोन दिवसापासून अंग निस्तं मेनचटल्यावानी झालय. ढोरात अन् आपल्यात फरक काय? ते मुके अन् आपल्याला तोंड, एवढाच की.”

धोंडिबाचं बोलणं कुठं तरी मातीत मुळ्या पसराव्यात, तसं हळूहळू मनाला पटत चाललंय. रात गडद झालीय. डोळे जड पडलेत. आता फक्त एक झोप घ्यायची.

मोठी चांदणी वर आलीय. पटांगणात माणसं तयार. बायालेकर उठून बसलेले. लेकरायला कुठं जायचं, तेबी माहीत नाही. सामानाची आवराआवर चाललेली. गठुडे बांधून तयार व्हायलेत. एवढा दुष्काळ पडला त्याला पाच-पंचवीस वर्ष झाली. पण कव्हा गाव सोडलं नाही. आज गाव सोडावा लागतंय. घशाला कारड पडलीय. पाणी प्यायला तांब्या हातात घेतलाय. पण पाणीच पिऊ वाटना. वाटतंय तहानच नाही. उगीच तांब्या हातात घेतलाय. आतल्या आत कसं भडभडून यायल्यासारखं व्हायलंय. गावाभाईर गेल्यावर दिवस निघाला तरी जमंल पण फटफट व्हायच्या आधी गाव सोडायला पाह्यजी. गावातल्या कोणाचंच तोंड पाहणं नको.

हारीच्या खोलीत एकेकजण जातोय. पुतळ्याच्या पाया पडतोय. बाहेर येतोय. चौकटीतून बाहेर येताना डोळे कधी भरून येतात कळतच नाही. धोंडिबा तर ऊर फोडून रडला. “काय झालं हे.” याच्याशिवाय त्याला दुसरं काहीच येईना. बायांच्या अंगावर फाटक्या चिंध्या लोंबायल्यात कामानं रापून गेलेले चेहरे. गरीब गाईगत चेहऱ्यावरील भाव.

तालुक्यापस्तोर पायी जायचंय सगळ्या घरांना कुलपं लागले एकापाठोपाठ एक माणसं निघू लागली. गड्यांनी लेकरं खांद्यावर घेतलेत. बायांच्या डोक्यावर बांधलेले गाठोडे. उचलताना मातीत पाय रुतल्यासारखं होतंय. अन् पायाला मनामनाचे दगड पाऊल जड पडतंय. अशा लहानमोठ्या जड पावलांची एक रांगच पांदीतून तयार झाली.

तांबडं फुटायला अजून बराच वेळ बाकी होता.

- oOo -

पुस्तक: ’इडा पीडा टळो’
लेखक: आसाराम लोमटे
प्रकाशक: शब्द पब्लिकेशन
आवृत्ती तिसरी (२०१०)
पृ. १७२-१७८.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा