रविवार, १३ ऑक्टोबर, २०१९

दुसरा रस्ता

५ नोव्हेंबर १९९० ची मध्यरात्र असावी. आईने झाकच्या अंगावरची चादर खसकन् ओढली.

झेड उठ पटदिशी. तुझी बॅग भर. आपल्याला हे घर सोडून ताबडतोब निघायचंय... त्या सात वर्षाच्या लहानग्याला काहीच कळेना अचानक मध्यरात्री कुठं जायचंय ? आई काहीच सांगायला तयार नव्हती. कुठं जायचं, किती दिवसाकरिता काहीच माहीत नाही. फक्त बॅग भर. दिवाणखान्यातील टीव्ही सुरूच होता. त्यात कुणीतरी एकजण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसत होता. नीट दिसेपर्यंत आईने टीव्ही बंद केला.

अडीच अक्षरांची गोष्ट

नंतर त्याला कळलं, त्याच्या वडिलांनी 'ज्युईश डिफेन्स लीग' या ज्यूंच्या कट्टर संघटनेच्या संस्थापकाचा खून केला होता. अल सय्यद नोसेरनी मॅनहटनच्या हॉटेल मेरियटमध्ये रब्बा मिर कहान यांना गोळ्या घालून मारले होते. अल सय्यद नोसेरला या खुनाबद्दल अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या पकडा-पकडीत सय्यद नोसेरलाही गोळी लागली होती. टीव्हीवर कोणतातरी वेगळा शो पाहणाऱ्या झाकच्या आईला हे लगेच समजले, कारण शो मध्येच थांबवून ही ब्रेकिंग न्यूज दाखविण्यात आली. तिला तिच्या शेजारणीचाही फोन आला, 'अगं तुझ्या नवऱ्याची बातमी येतेय टीव्हीवर, काय केलंय त्यानं हे?' आणि आता पोलिसांचा ससेमिरा सुरू होणार, हे लक्षात येऊन तिने पोरांना घेऊन पोबारा केला.

आणि नंतर असे पळत राहणे, हेच त्यांचे जगणे बनले. हसरा खेळता, पोरांवर प्रेम करणारा, कुटुंबवत्सल असणारा आपला नवरा असा धर्मांध कट्टरतावादी कधी बनला, हे तिच्या लक्षातच येईना. तो असे काही करेल, हे खरेच वाटेना. तोही स्वतःच्या निरपराधी असण्याबद्दल सांगत होता. पण २६ फेब्रुवारी १९९३ ला अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या तळमजल्यावर भरलेल्या ट्रकमध्ये बॉम्बस्फोट झाला, उत्तरेकडील टॉवरला मोठे खिंडार पडले, एका गरोदर महिलेसह सहा माणसं मेली आणि हजारभर माणसं जखमी झाली. या बॉम्बस्फोटाचा कट अल सय्यद नोसेरनं तुरुंगात बसून तयार केला होता, हा आरोप सिद्ध झाला आणि नोसेरला जन्मठेपेची शिक्षा झाली. पुढं तर क्रूरकर्मा ओसामा बिन लादेनने आपल्या एका भाषणात अल सय्यद नोसेरला विसरु नका. अशा शब्दात त्याच्या या मर्दुमकीची(?) दखल घेतली.

झाक, त्याची आई. सावत्र भावंडं अशीच पळत होती. एकोणीस वर्षाचा होईपर्यंत झाकनं वीस शहरं बदलली होती. झाक त्याच्या बापाच्या सावलीपासून पळत होता. ’अतिरेक्याचा मुलगा' हे शब्द तेजाबासारखे त्याची कातडी जाळत अंत:करण होरपळून काढत होते. त्यानं त्याचं नाव बदललं. झेड या त्याच्या टोपणनावावर धारित त्यानं स्वतःचं नाव झाक इब्राहिम ठेवलं. आईनं तर दुसरं लग्न केलंच होतं. पण तरीही अतिरेकी बापाची सावली त्याचा पाठलाग करत होती. कोणी त्याच्याकडे कुत्सित नजरेनं पाहत होतं, कुणी दमबाजी करत होतं, तर कुणी छद्मी हसत होतं. त्याला बापासोबत ऐकलेली आंधळ्या शेखची आक्रमक प्रवचन आठवत होती. अरबी कळत नसतानाही त्या देहबोलीतील जळजळीत विखार त्याच्या बालमनावर कोरला होता. तुरुंगात बापाला भेटायला गेला. तेव्हा बापाच्या गळ्यावर बंदुकीच्या गोळीने झालेल्या भल्या मोठ्या जखमेचा व्रण त्याला अजून दिसत होता. लॉन्ग आयलन्डवर केलेली नेमबाजी आठवत होती.

झाक टीन एज मध्ये होता. टीन एज, दारु, कार, गर्ल फ्रेण्डस् आणि असा व्हायोलंट भूतकाळ! त्याच्या समोर दोन रस्ते आ वासून उभे होते. एक बापाने दाखविलेला हिंसेचा, द्वेषाचा रक्तरंजित रस्ता आणि दुसरा प्रेमाचा, मानवतेचा, अहिंसेचा आणि शांततेचा रस्ता. 'कोणत्या रस्त्यानं जायचं?' हा चॉईस माझ्या हातात आहे का? झाक विचार करत होता आणि त्याला त्याच्या चुलत्याचे शब्द आठवायचे, ‘इब्न अबू'-बाप तसा मुलगा. एका अतिरेकी बापाचे रक्त माझ्या धमन्यातून वाहते आहे. त्या रक्ताने माझे भवितव्य लिहून ठेवले आहे की मी ते लिहू शकतो ? झाक बापाच्या नजरेनं जग पाहत होता. वयाच्या सातव्या वर्षापासून तो पळत होता, एका शहरापासून दुसऱ्या शहराकडे! त्यामुळं त्याचं सोशलायझेशनही पुरेसे झाले नव्हते. पण त्याच वेळी त्याला एका थीम पार्कमध्ये नोकरी मिळाली आणि बापानं सांगितलेलं सारं तत्त्वज्ञान त्यानं पडताळून पहायला सुरुवात केली. बाप सांगायचा, मुस्लिम सोडून सगळे विशेषतः ज्यू लोक हे शत्रू. होमोसेक्शुअल लोक निंदनीय. झाकची दोन गे मित्रांशी मैत्री झाली. लैंगिक प्रेरणा वेगळ्या असूनही त्यांची छान गट्टी जमली. 'डेली शो'चा अ‍ॅंकर जॉन स्टिवर्ट हा त्याचा पहिला रोल मॉडेल बनला. तो त्याचा प्रचंड फॅन बनला. आणि नंतर झाकला कळले की. जॉन ज्यू आहे. देश, धर्म, लैंगिक कल या बाबतीत सनातनी मंडळी जे सांगतात ती प्रत्येक गोष्ट तो आपल्या जगण्यावर घासून पाहत होता आणि त्याला वेगळेच सत्य गवसत होते. धर्म, जात, लैंगिक कल, देश या साऱ्या गोष्टी माणसाचे खरे मूल्यमापन करू शकत नाहीत. माणूस या सगळ्या पलिकडे असतो. ही तकलादू लेबलं त्याची शकत नाहीत. त्याला आता जगण्याकरिता कोणत्याही धर्माची गरज वाटेना. तो नास्तिक झाला होता. तो आता मुस्लिम तर नाहीच, पण कोणत्याच धर्माचा उरला नाही. 'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अपवि,' हे त्याला आतून पटू लागले होते. आपले बदलणारे विचार तो आईजवळ बोलून दाखवत होता. आईचे डोळे पाणावले होते. तिने आयुष्यभर सनातनी नवऱ्याचा जाच सोसला होता. ती फक्त एवढंच म्हणाली, 'बेटा झाक, मला द्वेष करायचा प्रचंड थकवा आलाय रे!' झाकने आईचे हात हातात घेतले तेव्हा ती म्हणाली, 'इतरांनी तुला जसं वागवावं असं तुला वाटतं ना, तसंच तूही इतरांशी वाग.'

आईच्या या बोलण्याने झाकला हरुप आला. त्याने आपली कहाणी जगाला सांगावयाची ठरवली. त्याला जगाला सांगावयाचे होते, 'तुम्ही जग तुमच्या नजरेनं पहा. सनातनी आणि हिंसक लोक प्रत्येक धर्मात, प्रत्येक देशात असतात. तुम्हांला काहीही मिळाले तरी तुम्ही कोणता मार्ग निवडायचा, हे अखेरीस तुम्हालाच ठरवावे लागते. माझा बाप अतिरेकी होता, पण मी शांततेचा मार्ग निवडला आहे कारण द्वेषातून केवळ द्वेषच जन्माला येतो.' पण हे कोण ऐकणार? आपण आपली कहाणी सांगितली, तर लोकांची प्रतिक्रिया काय असेल? त्यानं एका मित्राला आपली कथा सांगितली, तर तो चाकू घेऊन त्याच्या अंगावर धावला. 'तुला मारून मी साऱ्या अमेरिकेवर उपकार करतो आहे', असं काहीतरी बरळला. मोठ्या प्रयत्नाने झाक वाचला.

ऐन विशीत त्याला शेरॉन भेटली आणि आपल्या या मैत्रिणीला त्यानं आपली कर्मकहाणी ऐकवली. तिनं ती अत्यंत संवेदनशीलतेनं समजावून घेतली. आणि झाकने ती सगळ्यांना सांगितली पाहिजे म्हणून त्याला प्रेरित केले. तुझे जगणे जगाला कळल्यामुळे लोकांच्या मनात विशिष्ट धर्माच्या लोकांबद्दल ज्या धारणा, जे स्टिारआटाईप्स घर करून बसले आहेत ते मोडण्यास तर मदत होईलच; पण प्रेम की द्वेष, अहिंसा की हिंसा, शांती की युद्ध हा निर्णय अखेरीस आपला असतो, तो दैवाधीन नसतो, हे ही लोकांना कळेल. आजच्या वातावरणात तुझी गोष्ट आपल्या जगण्यातील निरपेक्ष प्रेमाचे गाणे गाईल.

आणि झाक बोलू लागला... निर्भयपणे आपली गोष्ट तो जगाला सांगू लागला. 'द टेररिस्टस् सन -अ स्टोरी ऑफ चॉईस' नावानं त्याचं पुस्तक आलं. तो नव्या जगाचा शांतीदूत बनला. त्याला पहिलेच निमंत्रण आले ते एफ.बी.आय. कडून. एफ.बी.आय. म्हणजे आपल्या कडील सी.बी.आय सारखी गुन्ह्याचा तपास करणारी संस्था. त्याचे भाषण झाले आणि कोणी काहीच बोलले नाही. श्रोत्यांमध्ये बसलेल्या एक बाई पुढे आल्या आणि त्याला म्हणाल्या, 'तू मला ओळखलं नाहीस? कसं ओळखणार? खूप लहान होतास तू. तुझ्या बापाची केस माझ्याकडे होती. मला नेहमी वाटायचं सय्यद नोसेरचा तो लहानगा गोड पोर आता काय करत असेल ? आणि आज तुला ऐकलं! तू आज आमचा शांतीदूत झाला आहेस. खूप बरं वाटलं रे पाहून..!'

आणि त्या रडू लागल्या.

या अश्रूत नव्या जगाची अवघी आशा सामावली आहे, असं झाक इब्राहिमला वाटत राहीलं.

- oOo -

पुस्तक: ’अडीच अक्षरांची गोष्ट’
लेखक: प्रदीप आवटे
प्रकाशक: वॉटरमार्क पब्लिकेशन
आवृत्ती पहिली (१४ फ्रेब्रुवारी २०१८)
पृ. ५४-५७.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा