’Every man for himself’ ही माणसाने फार पुढे, म्हणजे भाषेच्या उगमानंतर प्रचलित केलेली उक्ती, नैसर्गिक न्याय म्हणून जीवसृष्टीच्या बाल्यावस्थेतच प्रस्थापित झालेली होती. एका जातीचे प्राणी, एकेकटे वा कळपाने जगत असताना अन्य जातीय प्राण्यांशी फार जवळीक साधत नसत.
शेतीचा शोध हा माणसाला अन्य प्राण्यांपासून सर्वस्वी वेगळ्या वाटेने घेऊन गेला असला, तरी त्यापूर्वी माणूसही अनेक प्राण्यांपैकी एक होता, आणि अन्य वानरकुलातील प्राण्यांप्रमाणेच मिश्राहारी होता. मांसाहाराची गरज भागवण्यासाठी त्याला शिकार करण्याची गरज भासे.
पण माणूस हा मुळात दुबळा जीव आहे. त्याला वाघसिंहादि शिकारी प्राण्यांची मजबूत ताकद वा जबडा नाही, शिकारी पक्ष्यांप्रमाणे भक्ष्यावर घट्ट पकड मिळवता येईल अशा नख्याही नाहीत, की भक्ष्याचा शरीराचा भेद करुन त्याचे मांस खाण्यास साहाय्यक होईल अशी भक्कम चोचही नाही.
मानवी समाजात दुबळी आणि त्या दुर्बलतेने सतत मागे राहावी लागणारी माणसे कुढी होतात, कडवट होतात. अशी माणसे थेट वर्चस्व प्रस्थापित करता न आल्याने, आपले महत्त्व वाढवण्यासाठी कटकारस्थानांचा आधार घेतात. कदाचित म्हणूनच प्राचीन काळी माणसाच्या मनात छद्मविचाराचा प्रादुर्भाव अधिक झाला असावा. त्यातून त्याने थेट शिकारीपेक्षा सापळे लावणे, जनावराला फसवून खड्ड्यात पाडून शिकार करणे वगैरे मार्ग अवलंबले असावेत.
याशिवाय दुसर्या प्राण्याने केलेली शिकार परस्पर हिसकावून घेण्याचे तंत्र बहुधा तरसाकडून वा गिधाडांकडून आत्मसात केले असेल. एड्रियन बोशिअर या भटक्याच्या आफ्रिका सफारीमध्ये त्याने स्वत: हा प्रयोग करुन चित्त्याकडून शिकारीचा एक तुकडा हस्तगत केल्याचे लायल् वॉटसन यांची त्याच्यावर लिहिलेल्या ‘लायटनिंग बर्ड’ या पुस्तकात नमूद केले आहे. (निरंजन घाटे यांनी या पुस्तकाचा ‘निसर्गपुत्र’ नावाने मराठी अनुवाद केला आहे.)
माणसाला पुढील दोन पायांचा उपयोग अधिक कार्यक्षमतेने करता येऊ लागल्यावर, धारदार वा अणकुचीदार दगड, हाडे यांचा हत्यारासारखा वापर करण्याचे तंत्र अवगत झाल्यावर, अन्नासाठी तो शिकारीवर अधिक अवलंबून राहू लागला असेल. पुढे भाल्यांसारखी, बाणांसारखी बाह्य आयुधे विकसित केल्यावर तो हळूहळू परोपजीवी (gatherer) पासून शिकारी(hunter) म्हणून अधिक वावरु लागला असेल. यादरम्यानच एकट्या-दुकट्याला पाडाव करता येत नाही अशा मोठ्या जनावराची शिकार सामूहिकपणे करण्याचे तंत्र माणसाने लांडगे, कोळसुंदे यांच्यासारख्या झुंडीने शिकार करणार्या प्राण्यांकडून आत्मसात केले असेल.
कॉनरॅड लोरेन्झ नावाच्या एका वर्तनवैज्ञानिकाने (ethologist) ‘Man Meets Dog’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. या प्रसिद्ध पुस्तकाच्या ‘How It May Have Started’ या पहिल्या प्रकरणात त्याने माणूस आणि कुत्रा यांच्या सहजीवनाच्या वाटचालीची एक काल्पनिक गोष्ट लिहिली आहे. त्या त्याने एका मानवी टोळीने केलेल्या शिकारीच्या उच्छिष्टांवर जगत त्यांच्या मागे मागे फिरणार्या कोल्ह्यांच्या टोळीचा उल्लेख केला आहे. या कोल्ह्यांच्या टोळीमुळे पुढे चाललेल्या माणसांच्या टोळीचे मागील बाजूच्या संभाव्य धोक्यांपासून एक प्रकारे संरक्षण होत होते. एखादा शिकारी प्राणी दिसला, की या ‘राखणदार’ टोळीमध्ये जो हलकल्लोळ होई, त्यामुळे पुढे असलेली माणसे आधीच सावध होत.
काही कारणाने ही टोळी दूर गेल्यानंतर हा मागचा 'पहारा’ गायब झाला. त्यामुळे धोक्याची जाणीव वाढलेल्या माणसांच्या टोळीचा नायक अखेर आपल्या मांसाच्या साठ्यातील एक तुकडा कोल्ह्यांसाठी मागे सोडतो, त्यांना आपल्या पाठीमागे येण्यास उद्युक्त करतो. मानवी जीवनाच्या त्या टप्प्यावर, आपल्या शिकारीचा वाटा टोळीबाहेरच्या माणसालाच नव्हे, तर एका जनावराला देण्याचा हा प्रसंग- काल्पनिक म्हटला तरी, अभूतपूर्वच म्हणावा लागेल.
यातून हळूहळू या दोन टोळ्यांत देवाणघेवाण सुरु होते. जखमी शिकारीचा माग काढण्यासाठी केवळ नजरेवर अवलंबून असलेल्या माणसाला कोल्ह्यांच्या तीव्र घ्राणेंद्रियांची साथ मिळाल्यामुळे निसटून गेलेल्या अनेक शिकारींचा माग यशस्वी होण्याचे प्रमाण कमालीचे वाढते. माणसाळलेल्या या कोल्ह्यांचे- म्हणजे कुत्र्यांचे, शिकारी माणसाच्या आयुष्यात साहाय्यक म्हणून स्थान निश्चित होत गेले.
कुत्र्याशी युती केल्यानंतर माणसाची ही शिकारक्षमता आणखी सुधारली. कारण आता या शिकारींमध्ये कुत्र्यांच्या माग काढण्याच्या क्षमतेचा वापर करुन घेता येऊ लागला. माणसाचे घ्राणेंद्रिय बरेच दुबळे असते. सोबत असलेला कुत्रा ही कमतरता भरून काढतो. याशिवाय त्यांच्या भुंकण्यातून, आवाजाच्या त्या कल्लोळातून शिकार होऊ घातलेल्या प्राण्याची गती नि विचारशक्ती कुंठित करण्याचा, त्याला ‘स्तंभित’ करण्याचा डाव साधता येतो.
बदल्यात कुत्र्याचे रानटी, अनिश्चित आयुष्य संपून त्याला आहाराची शाश्वती आणि मोठ्या शिकारी जनावरांपासून संरक्षण माणसाकडून मिळू लागले. नैसर्गिक न्यायापलिकडे जाऊन झालेली ही पहिली आंतर’जातीय’ युती म्हणता येईल. या युतीने इतर प्राणिजगतावर अधिराज्य प्रस्थापित केले.
तसे पाहिले तर, उंच झाडावर असल्याने वाढलेल्या नजरेच्या पल्ल्याचा फायदा मिळाल्याने जमिनीवरील प्राण्यांपेक्षा शिकारी जनावर आधी पाहणारी, किचकिच करुन पठारावरील हरणांना सावध करणारी माकडे आहेत. अगदी शहरात, मर्यादित प्राणिजीवनातही येणारा अनुभव म्हणजे, मांजर दिसताच कल्लोळ माजवणार्या खारी किंवा साळुंक्या ऊर्फ इंडियन मैनाही आहेत. पण हा ‘बाहेरुन दिलेला पाठिंबा’ म्हणता येईल, ही युती नव्हे.
लोरेन्झच्या गोष्टीमध्ये जरी केवळ कोल्ह्यांचा उल्लेख असला, तरी आजच्या कुत्र्यांच्या प्रजातीमध्ये कोल्ह्यांबरोबरच लांडग्यांचा वंशही प्रकर्षाने दिसतो. एकुणात कुत्र्यांचे कोल्ह्यांपासून उत्क्रांत झालेले नि लांडग्यांपासून उत्क्रांत झालेले, असे दोन वंश मानले जातात.
योगायोग म्हणजे जॅक लंडनच्या ‘व्हाईट फँग’या या पुस्तकाच्या पहिल्याच प्रसंगात लोरेन्झच्या कोल्ह्यांच्या टोळीप्रमाणेच लांडग्यांची एक टोळी दोन माणसांच्या प्रवासात त्यांच्या पाठोपाठ प्रवास करताना दिसते. हा प्रसंग दीर्घ आहे, पुस्तकाचा जवळजवळ सहावा हिस्सा त्याने व्यापला आहे. यातही अन्नासाठी हे लांडगे माणसांपाठोपाठ फिरत आहेत. फरक इतकाच की ही माणसे शिकारी नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या उरलेल्या अन्नाचा वाटा या लांडग्यांना मिळण्याची आशा नाही. दुष्काळाच्या परिस्थितीमुळे रानात अन्नाचा प्रचंड तुटवडा आहे. आणि म्हणून शिकारीसाठी ‘सावज’ असणारे चार कुत्रे नि दोन माणसे यांच्या या ‘टोळी’चा अथवा कळपाचा ते पाठलाग करत आहेत. भूक भागवण्यासाठी प्रसंगी दोन पायाच्या त्या माकडांची शिकार करण्याचा त्यांचा निर्धार झाला आहे !
हा प्रसंग इतका प्रत्ययकारी आहे की, संवेदना किंचितही जिवंत असलेल्या वाचकाला तो मुळापासून हादरवून सोडतो, माणसाचे दुबळेपण अधोरेखित करतो. जिवावर उदार झालेले प्राणी माणसाच्या बंदुका नि तत्सम प्रगत आयुधांनाही न जुमानता, आपल्या संख्याबळाच्या आधारे त्याच्यावर सहज मात करु शकतात, याची जाणीव वाचकाला अस्वस्थ करुन सोडते. आर्थिक, तांत्रिक प्रगती माणसाचे जीवित अधिक सुरक्षित करते या भ्रमातून बाहेर येण्यास उद्युक्त करते. अप्रगत, रानटी जमातीचे संख्याबळ हे मूठभर प्रगत जमातीचे अस्तित्व सहज पुसून टाकू शकते, याचे भान माणसाने ठेवावे याची आठवण हा प्रसंग करुन देतो. प्रगतीपेक्षाही वर्चस्व अथवा सत्तेला अधिक महत्व देणारे धर्माधिकारी वा धर्माधिष्ठित संघटना माणसाला कायम अज्ञ, असंस्कृतच ठेवून त्यांना टोळीच्याच मानसिकतेमध्ये का ठेवू इच्छितात याचे इंगित इथे सापडते.
स्वत:ला ‘श्रीमंतांचा पक्षपाती’ म्हणवून घेणार्या एका कट्टर भांडवलशाही समर्थक मित्राशी वादविवाद झाला होता. त्यात ‘श्रीमंतांना गरीबांची गरज नाही’, ‘अधिकच नव्हे, तर जास्तीतजास्त पैसे मिळवणे हा श्रीमंतांचा हक्क आहे’, ‘गरीबांना सगळे फुकट मिळते’ वगैरे मुद्दे तो रेटत होता. मग मीही लोरेन्झप्रमाणे अद्याप टोकाची वाटणारी, पण त्याच्या मतानुसार व्यवस्था चालली, तर माझ्या मते अपरिहार्य असलेल्या भविष्याची कथा मांडली होती.
श्रीमंत अधिक श्रीमंत होत गेले, अक्षरश: मूठभरांकडे प्रचंड पैसा नि उरलेल्यांच्या किमान गरजाही भागत नाहीत अशी परिस्थिती उद्भवली, तर ही सामान्य माणसे सरळ टोळी करुन श्रीमंतावर चाल करुन त्यांची हत्या करतील, नि त्याची चीजवस्तू लुटून नेतील. बहुसंख्या जर दरिद्री असेल तर, ‘पैसे मिळवण्याचा हक्क’ श्रीमंतांना देणारी व्यवस्थाच कोलमडलेली असेल. त्या श्रीमंताला लुटणार्या, त्यांची हत्या करणार्यांवर कायद्याचा बडगा उगारणारी यंत्रणाच नसेल. कारण ही यंत्रणा प्रामुख्याने गरजेइतके वा त्याहून थोडे जास्त मिळवणार्या सामान्यांकडूनच राबवली जात असते. श्रीमंताने संरक्षणासाठी ठेवलेले हत्यारी संरक्षकही आर्थिकदृष्ट्या खालच्या गटातीलच असतील. जमाव त्यांना त्यांच्या उत्पन्नापेक्षा कैकपट अधिक धन लुटलेल्या धनातून एकरकमी देऊ करुन त्यांना सहजपणे आपल्याकडे फितवून घेऊ शकेल.
‘तुझी हत्या किंवा तुला जिवंत सोडून वर अधिक धन’ या पर्यायामध्ये त्यांची निवड साहजिक जिवंत राहण्याच्या पर्यायाची असेल. तांत्रिक प्रगती नि प्रचंड पैसा वगैरे असलेल्या या मूठभरांचा जगण्याचा हक्क व्यवस्थेबरोबरच लयाला जाऊन ‘बळी तो कान पिळी’ या नैसर्गिक न्यायाकडे माणसांचे जगही झुकलेले असेल. या पुस्तकातील पहिल्या प्रसंगातील लांडग्यांची दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये माणसाचीही शिकार करण्याची तयारी झाली होती ती याच मानसिकतेमधून.
थोडक्यात व्यवस्था टिकायची असेल तर सामान्यांना, अप्रगत जीवांनाही त्यांच्या गरजेइतका वाटा मिळण्याची तरतूद तिच्यात शिल्लक राहायला हवी. अन्यथा त्यांचा उद्रेक होऊन अशी त्यांना गैरसोयीची व्यवस्था ते मोडून टाकतील. आणि व्यवस्था टिकली तरच अभिजनांचे अभिजन म्हणून जगण्याचे हक्क शाबूत राहतात, कारण हक्क नि कर्तव्ये ही दोन्ही नेहमीच व्यवस्थेशी संलग्न असतात.
निसर्गात ना हक्क असतात ना कर्तव्ये. तिथे फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी शिकार नि पुनरुत्पादनासाठी जोडीदार शोधणे ही दोनच कार्ये शिल्लक राहतात. त्यांना हक्क म्हणावे की कर्तव्य याचा भाषिक निवाडा करण्यासाठी संदर्भ म्हणून कोणतीही व्यवस्थाच अस्तित्वात नसते... ‘व्हाईट फँग’च्या सुरुवातीलाच घडलेल्या या प्रसंगात भुकेल्या लांडग्यांनी माणसांचा केलेला पाठलाग मला आमच्या या चर्चेची आठवण देऊन गेला होता.
या प्रसंगात लांडग्यांच्या टोळीची ‘मार्गदर्शक’ असते एक लांडगी, खरेतर कुत्री. ही दुष्काळामुळे खाद्याच्या शोधात जंगलात परागंदा झालेली, पूर्वी माणसांसोबत राहिल्याने त्यांना न बुजणारी आणि त्यांच्या सवयींशी चांगली परिचित असणारी. या रानातच एका बछड्याला ती जन्म देते. या बछड्याचा जीवनप्रवास, त्याच्याच नजरेतून उलगडणारी ही ‘व्हाईट फँग’ ही कादंबरी ‘एमटी आयवा मारू’ या पिसाट कादंबरीचे लेखक अनंत सामंत यांनी ’लांडगा’ या शीर्षकाखाली मराठीत अनुवादित केली आहे.
अनुवाद इतका यथातथ्य उतरला आहे की प्रथम वाचनात ही कादंबरी अनुवादित आहे मला समजलेही नव्हते. सध्याच्या ‘मोले घातले अनुवादाया’च्या (किंवा ‘गुगल बसले अनुवादाया’च्या) काळात काही दशकांपूर्वीचे मोजके अनुवाद, अगदी प्राचीन मानावेत इतके अविश्वसनीय वाटतात. राम पटवर्धनांनी केलेला मार्जोरी किनन रॉलिंगच्या ‘यर्लिंग’चा ‘पाडस' हा अनुवाद हे आणखी एक उदाहरण.
’लांडगा’ची कथनशैली अनोखी आहे. सार्या घटना, प्रसंग, सारे तपशील त्या लांडग्या-कुत्र्याच्या दृष्टिकोनातून मांडले आहेत. पण तरीही निवेदन प्रथमपुरुषी नाही. कथानिवेदक त्या बछड्याला अथवा लांडग्याला काय वाटले, त्याने काय वा कसा विचार केला हे तुम्हाला सांगत जातो. या सरमिसळ पद्धतीने लेखकाला प्रथमपुरुषी निवेदनातून येणारी दृष्टीकोनाची मर्यादाही राहात नाही. कारण त्या लांडग्याच्या मनात डोकावून पाहात असताना, मध्येच त्यातून बाहेर येऊन निवेदक कथानक पुढे सरकवू शकतो. यातून आवश्यक तिथे इतर पात्रांचे संवादही अंतर्भूत करता येतात.
केवळ प्रथमपुरुषी निवेदन केले असते, तर त्यात लांडग्याच्या ग्रहणशक्तीच्या मर्यादा पाळाव्या लागल्या असत्या. उदाहरणार्थ, त्याच्या निवेदनात पैसा कुठे येऊ शकत नाही. कारण पैसा ही संकल्पनाच त्याच्या जाणिवेत नाही. दुसरे असे की माणसाची भाषाही त्याला अवगत नाही. त्यामुळे प्रथमपुरुषी निवेदनात माणसांचे संवाद अंतर्भूत करता आले नसते. किंबहुना माणसांच्या विविध कृतींचे त्याने त्याच्या बुद्धीच्या मर्यादेत त्याने केलेले आकलन हेच तर त्या कादंबरीचे वैशिष्ट्य अथवा U.S.P. आहे. त्यामुळेच आपण माणसाच्या नजरेने पाहात असलेले हे जग लांडग्याच्या बछड्याच्या, पुढे लांडग्याच्या नजरेतून अनुभवण्याची ही संधी चोखंदळ वाचकाने घ्यायलाच हवी. जी पुस्तके वाचल्याखेरीज वाचकाला मरायला परवानगी नाही असे मी गंमतीने म्हणतो त्या पुस्तकांच्या यादीत ‘लांडगा’चा समावेश आहे.
या बछड्याचा जन्म त्याची आई जंगलात परागंदा असताना झालेला. त्याने पहिली काही पावले टाकली, जगण्याचे पहिले संघर्ष पाहिले/अनुभवले ते तिथेच. मग आईचे शेपूट धरून तो माणसाच्या जगात परतून येतो, तेव्हा जगण्यातील दुसर्या टप्प्याला सामोरा जातो. जंगलात रानमांजरीशी, ससाण्याशी झालेल्या संघर्षातून त्याला जगण्यातील धोके समजले होते. पुढे माणसाच्या टोळीसोबत राहताना आपले स्थान मिळवण्यासाठी, राखण्यासाठी सजातीयांशी संघर्ष करावा लागतो याचे भान त्याला येत जाते. माणसांमध्येही सरसकट शत्रू वा मित्र नसतात, त्यांतही काळे-गोरे निवडावे लागतात हे स्वानुभवातून तो शिकत जातो.
पुढे शरीरातील लांडग्याचे रक्त, जंगलातील जगण्याने दिलेला सावधपणा यातून आत्मसात केलेल्या ज्ञान आणि कौशल्य यांच्या आधारे झुंजींच्या खेळातील अजेय कुत्रा म्हणून नावलौकिक मिळवून जातो. तर त्या शिखरावर असतानाच अक्षरश: क्षुद्र भासणार्या एका प्रतिस्पर्ध्याच्या अनपेक्षित डावापुढे हतबल होऊन पडण्याची शरणागत अवस्थाही अनुभवतो...
त्या लांडग्याच्या दृष्टीने जग पाहताना आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती एकांगी असतो, नि जगण्यातील आपल्या क्षुद्र समस्यांपेक्षा कितीतरी अधिक पटीने खडतर आयुष्य सामोरे जाणार्या प्राण्यांपेक्षा आपले जगणे किती सुसह्य आहे, हे वाचेवरून जाणिवेत उतरत जाते.
एरवी पुस्तक वा चित्रपटाबद्दल लिहिताना लेखकाची माहिती, चित्रपटातील अभिनेत्यांची, दिग्दर्शकाची माहिती वा इतिहास वगैरे फोलपटमसाला देणे मी टाळतो. त्याने पुस्तक वा चित्रपटाच्या आकलनात काही भर पडते असे मला वाटत नाही. उलट त्यावर इतिहासाचा एक अनावश्यक दबाव निर्माण होतो नि वाईटाला बरे वा चांगले किंवा उलट म्हणण्याचे अदृश्य बंधन जाणवू लागते. पण इथे मात्र त्याचा मोह अजिबात आवरत नाही. कारण या पुस्तकाची मोहिनी इतकी जबरदस्त आहे की याचा एक वंशच तयार झाला आहे.
या ‘व्हाईट फँग’च्या जगण्याचे बोट धरुन जवळजवळ सतरा-अठरा चित्रपट तयार झालेले मला सापडले. पहिला चित्रपट १९२५ साली प्रदर्शित झाला, तर imdb.com सांगते की White Fang: At the Edge of the World नावाचा एक चित्रपट सध्या हॉलिवूडमध्ये तयार होतो आहे.
देशांचा विचार केला तर हॉलिवूडमुळे अमेरिका; त्याशिवाय इटली, ऑस्ट्रेलिया, रशिया, जपान, न्यूझीलंड, कॅनडा आदि देशांमध्ये हे चित्रपट तयार झाले आहेत. अनेक भाषांतून ते डब म्हणजे अनुवादितही केले गेले आहेत. व्हाईट फँगच्या आयुष्यातील चार टप्पे (जंगल, इंडियन टोळीतील जीवन, झुंजीचा कुत्रा आणि अखेरीस नागरी आयुष्य) विचारात घेतले तर त्यातील वेगवेगळ्या टप्प्यांच्या आधारे पटकथा लिहून हे चित्रपट उभे आहेत.
यात सर्वात मोठा वाटा अर्थातच इंडियन टोळीसोबत असतानाचा आहे. कारण त्याला ‘गोल्ड रश’शी जोडून घेता आले नि त्यातून ‘वेस्टर्न’ प्रकारचे चित्रपट तयार करणे शक्य झाले. यात चार इटालियन वेस्टर्न अथवा ज्यांना ‘स्पागेती वेस्टर्न’ म्हणतात अशा चित्रपटांचा समावेश आहे.
या चित्रपटांमधून मुख्य पात्र कायम असले तरी लेखन/पटकथालेखनाने आपले स्वातंत्र्य घेतले आहे. मूळ कादंबरीशी तंतोतंत प्रामाणिक राहिलेले दोनच चित्रपट आहेत. पहिला १९४६ मध्ये रशियामध्ये तयार झालेला The White Fang आणि दुसरा जपानमध्ये तयार झालेला White Fang Story हा चलच्चित्रपट. या दोघांनीही कादंबरीच्या सुरुवातीचा लांडग्यांनी माणसांच्या केलेल्या पाठलागाचा प्रसंगही वगळलेला नाही. यात प्रसंगात खुद्द व्हाईट फॅंग नसल्यामुळे इतर बहुतेक चित्रपटांनी तो वगळला आहे.
जॅक लंडनने ‘कॉल ऑफ द वाईल्ड’ नावाचे आणखी एक पुस्तक लिहिले आहे. ते पुस्तक याच्या नेमक्या उलट प्रवासाचे आहे. बक नावाच्या एका कुत्र्याचा नागरी समाजाकडून जंगलाकडे झालेला प्रवास त्यात मांडला आहे. दुर्दैवाने त्याचा मराठी अनुवाद उपलब्ध नाही. ही दोन पुस्तके नि जॅकचे आत्मचरित्र यांची सरमिसळ करत त्याला ‘गोल्ड रश’ची जोड देणार्या पटकथेआधारे ‘व्हाईट फँग’ याच नावाचा चित्रपट १९९१ चित्रपट प्रदर्शित झाला. या दुसर्या पुस्तकातील ‘बक’ या कुत्र्याच्या आयुष्याभोवतीही सुमारे दहा चित्रपट उभे राहिले आहेत.
व्हाईट फँग आणि बक या जोडगोळीने चित्रपटक्षेत्रात श्वान-वंशाला भक्कम स्थान निर्माण करुन दिले. पुढे सिल्व्हर वुल्फ, बाल्टो वगैरे अनेक कुत्र्यांनी ते बळकट करत नेले आहे..
- oOo -
‘लांडगा’मधील एक वेचा: करड्या बछड्याचे जग.
‘व्हाईट फँग’च्या कथेवर आधारित चित्रपटांची यादी:
(यातील काही चित्रपट यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत.)
1. White Fang (1925)
2. White Fang (1936)
3. The White Fang (Belyy Klyk) (Russia) (1946): (True to book adaptation)
https://www.youtube.com/watch?v=oENiIrmZiaA (Russian)
https://www.youtube.com/watch?v=NzOPZIf7SFo (Russian)
4. White Fang (Zanna Bianca) (Italy) (1973)
https://www.youtube.com/watch?v=GYBuoluCIGs
5. Challenge to White Fang (Il ritorno di Zanna Bianca)(1974)(Italy)
https://www.youtube.com/watch?v=1pafYsxcTLg
6. White Fang to the Rescue (Zanna Bianca alla riscossa)(1975)(Italy)
https://www.youtube.com/watch?v=M2ajoF_Dgbk
7. White Fang and the Hunter (Zanna Bianca e il cacciatore solitario)(1975)(Italy)
https://www.youtube.com/watch?v=HmkAfMcVgNY
8. White Fang and the Gold Diggers (La spacconata)(1975)
https://www.youtube.com/watch?v=X20sNs0McIM(Italy)
9. White Fang Story (Shiroi kiba howaito fangu monogatari)(1982)(Japan)(Animation)(True to book adaptation)
https://www.youtube.com/watch?v=Aj6rQajdAGA (Russian)
10. (Run,) White Wolf (Hashire! Shiroi Õkami)(1990) (Japan)(Animation)
https://www.youtube.com/watch?v=rpuYG7XALJo
11. White Fang (1991) (Australia)(Animation)
12. White Fang 1991 Movie (Disney, USA)
https://www.youtube.com/watch?v=80euiba7uns(Spanish)
13. The Legend of White Fang (1992-94)(Canada)(Animation Series)
https://www.youtube.com/playlist?list=PLl4VRRDOhElNe2Bq0PXauDRwGZkqQHNzp (Blocked in India)
https://www.youtube.com/playlist?list=PLL1VjyxIslixZOngCWJE-pz9REivqreaa (Blocked in India)
14. White Fang 1993 TV Serial(Canada, France, New Zealand)
https://www.youtube.com/playlist?list=PLCiuBdaSY8ss0jM0uBuDD6oAGqMfTDb6i
https://www.youtube.com/playlist?list=PLC1xfqrHTOY7UEpEGNPiZmBluhUaeGo45
15. White Fang 2: Myth of the White Wolf (1994) (Disney, USA)
16. White Fang (1997)(Animation) (USA)
https://www.youtube.com/watch?v=lmy4dayV5vc
17. White Fang (2018) (Netflix, USA)(Animation)
18. White Fang: At the Edge of the World (Pre-production)
19. Zanna Bianca e il grande Kid (White Fang and the Big Kid), 1977.
---
Audio Book: White Fang: https://www.youtube.com/watch?v=-odw4i_381w