गुहेची नवी जागा लांडग्यांना कितीही सोयीची असली तरी मला सोयीची नव्हती. दगडांच्या ढिगाऱ्यामुळे धड काही दिसायचं नाही. शिवाय कॅरिबूनी दक्षिणेकडे स्थलांतर करायला सुरुवात केल्याने लांडग्यांचे लक्ष शिकारीकडे असायचे. दिवसभर ते थकूनभागून झोपायचे. त्यामुळे विशेष काही घडायचं नाही. थोडक्यात मी भयंकर बोअर व्हायला लागलो होतो.
एवढ्यात एक मजा झाली- चाचा अल्बर्ट चक्क प्रेमात पडला !
आमच्या पहिल्या भेटीनंतर माइक आपले सर्व कुत्रे घेऊन उत्तरेकडे चालता झाला होता. एकही कुत्रा मागे न ठेवण्याचं कारण, माझ्यावरचा अविश्वास असावं. शिवाय कुत्र्यांची पोटं भरायला त्यांना कॅरिबूमागे उत्तरेकडे नेणं भाग असावं. आता कॅरिबूच्या मागे तेही दक्षिणेकडे परतले होते.
एस्किमो लोकांकडचे कुत्रे लांडग्यांचीच धेडगुजरी अवलाद असते अशी एक सर्वसाधारण समजूत आहे. पण ती चुकीची आहे. कदाचित दोघांचे वंशज एकच असले तरी ठेंगण्या, रुंद छातीच्या हस्कीमध्ये (एस्किमो कुत्रे) व लांडग्यांमध्ये दिसण्यात ठळक फरक आहे. मुख्य म्हणजे या हस्की कुत्र्यांच्या माद्या वर्षभरात केव्हाही माजावर येतात. माइककडचे कुत्रे तर अस्सल खानदानी कुत्रे होते.
माइक परतला तेव्हा त्याच्याकडची एक कुत्री माजावर आली होती आणि नेहमीप्रमाणे तमाम कुत्रेमंडळी तिच्याभोवती गोंडे घोळत होती. आपापसात भांडत होती. माइकचं डोकं त्यांनी अगदी फिरवून टाकलं होतं.
माझ्या डोक्यात सहज एक कल्पना आली. लांडग्यांच्या माद्या साधारणपणे मार्चमध्ये माजावर येतात. त्यामुळे मला अजूनपर्यंत लांडग्यांच्या लैंगिक जीवनाबद्दल माहिती मिळाली नव्हती. मात्र लांडगा - कुत्रे यांचा आपापसात संबंध येऊ शकतो आणि कोणतीच पार्टी त्याचा विधिनिषेध मानत नाही ही अमोल माहिती माइक- उटेककडून समजली होती. कुत्रे बहुतांश वेळ बांधलेले असतात म्हणून हे घडत नाही एवढंच.
मी माइकला माझी कल्पना सांगितली आणि त्यालाही ती पसंत पडली. संकरातून निर्माण झालेला कुत्रा गाडी ओढायच्या कामाला किती उपयोगी पडत हे त्यालाही बघायचं होतं.
आता माझ्या शास्त्रीय संशोधनाच्या दृष्टिकोणातून प्रयोग कसा आखायचा हाच एक प्रश्न होता, आम्ही टप्प्याटप्प्याने प्रयोग करायचं ठरवलं. पहिल्या प्रथम एका कुत्रीला लांडग्याच्या गुहेकडे नुसतं फिरायला घेऊन जायचं- तिची खबर लागावी म्हणून.
कुआ ( त्या कुत्रीचे नाव ) एका पायावर तयारी होती ! एका जागी लांडग्यांचा जरा वास लागल्यावर तर तिने लाजलज्जा सोडून मला साखळीसकट जवळजवळ फरपटत नेलं. जेमतेम मी तिला खोपटाकडे परत आणलं आणि साखळीने बांधून ठेवलं. आपली नाराजी तिने रात्रभर बोंबलून व्यक्त केली. हे ओरडणं केवळ नाराजी व्यक्त करण्यासाठी नसावं तर सादही असावी. कारण दुसऱ्या दिवशी अगदी खोपटापर्यंत, एका मोठ्या लांडग्याच्या पाऊलखुणा आढळल्या. केवळ मत्सरी कुत्रे-कंपनीशी हाणामारी व्हायला नको म्हणून त्याने प्रणयाचा मोह आवरून सन्माननीय माघार घेतली असावी.
लांडग्यांच्या गोटापर्यंत कुआची खबर इतक्या झटपट लागेल याची मलाही कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी आम्ही कुआला गुहेच्या दिशेने घेऊन गेलो. आम्ही घेऊन गेलो म्हणण्यापेक्षा, तीच आम्हाला त्या दिशेने फरफटत घेऊन गेली असं म्हणणं अधिक योग्य होईल. तंबूतून नीट दिसेल किंवा काही बरंवाईट झालं तर मदतीला जाता येईल, अशा बेताने आम्ही तिला लांबलचक दोरीने खडकाला बांधून ठेवलं. बांधली असली तरी तिला सर्व हालचाल करता येत होती.
कुआने आल्या आल्या झकासपैकी ताणून दिली. गुहेच्या अंगाला पिल्लं अधून-मधून दिसत असली तरी मोठ्या लांडग्याचा मागमूस नव्हता. साधारणतः रात्री साडेआठच्या सुमाराला लांडग्यांचे शिकारपूर्व समूहगान सुरू झालं. आवाज़ ऐकताक्षणीच कुआ ताडकन उठली आणि तिने आपला आवाज लावला. व्वा! काय सूर होते! आता लांडग्या-कुत्र्याचं रक्त माझ्या धमनीतून वाहात नसले तरी कुआच्या त्या मादक सुरांनी मलाही कसल्या कसल्या गुलाबी आठवणी यायला लागल्या !
लांडगे-मंडळींनी ताबडतोब या हाकेची दखल घेतली. आपलं गायन अर्ध्यावर थांबवून तिघेही टेकाडमाथ्यावर आले. कुआ आणि त्यांच्यामध्ये पावभर मैलाचं अंतर असलं तरी कुआ त्यांना स्पष्ट दिसली असावी.
जॉर्ज आणि अल्बर्ट दोघेही धावत निघाले.
जॉर्जची धाव मात्र जास्त टिकली नाही. कारण अँजेलिन त्याला मागे टाकून पुढे धावली आणि धावता धावता तिने जॉर्जला टांग मारली, असा मला संशय आला. कारण जॉर्ज जो कोलमडला, तो उठेपर्यंत त्याची कुआमधली दिलचस्पी पार उडून गेली होती ! जॉर्जच्या मनात काही पाप नसेलही. केवळ कलेसाठी कला किंवा आपल्या सरहद्दीमध्ये हा कोण आक्रमक आला म्हणून कदाचित तो पाहणी करायला निघाला असेल. काय असेल ते असो; तो आणि अँजेलिन, अल्बर्ट चाच्यावर सर्व जबाबदारी सोपवून माघारी फिरले आणि काय घडते ते पाहत राहिले.
हा अल्बर्ट चाचा किती काळ ब्रह्मचारी होता, मला नेमकं माहीत नव्हतं. पण प्रचंड काळ असावा असं त्याच्या एकंदरीत हालचालीवरून वाटत होतं. कारण पठ्ठ्या एवढा सुसाट निघाला की, आम्हालाच प्रतिस्पर्धी समजून तो थेट आमच्यावर तुटून पडतो की काय, असं क्षणभर वाटून गेलं.
कुआ आतुरतेने त्याचा इंतजार करत होतीच. तो तिच्या जवळपास पोचला आणि त्याचा अवतारच बदलला.
तो चक्क माकडच बनला ! आपले कान भुईसपाट करून शेपटीचा गोंडा घोळवत तो लहान पिल्लांसारखा वाकड्या-तिकड्या उड्या मारू लागला. कसले तरी चित्रविचित्र आवाज काढू लागला.
छे: ! स्वतः च्या इज्जतीचा त्याने पार फालुदा करून टाकला !
कुआही बिचारी गोंधळली. सिनेमे बघायची सवय नसल्याने असला प्रणय कधी तिने बघितला नव्हता. त्यामुळे आताचा नायक जवळ आला की, ती खेकसत दूर पळायची. कुआच्या नकाराने अल्बर्ट अजूनच पेटायचा, चेकाळायचा. जमिनीलगत सरपटत आणखी येडेपणा करायचा.
आता मात्र मला कुआसारखीच काळजी वाटायला लागली.
हा लांडगा पार पागल झाला की काय ? मी बंदूक उचलून कुआच्या मदतीला जाणार तोच उटेकने माझा हात धरला. तो मिश्किल हसत होता. 'घाबरू नकोस, लांडग्यांच्या दृष्टीने झकास प्रणय चाललाय.' त्याने दिलासा दिला.
मग अल्बर्टचा नूर परत झपाट्याने बदलला. सर्व पागलपण सोडून तो पूर्ववत झाला. मानेभोवतीची चंदेरी आयाळ फुलली. सफेद पोलादासारखे त्याचे शरीर ताठ झाले. कुत्र्याप्रमाणे त्याने शेपूट गुंडाळून घेतली. हळूवार पावले टाकत तो तिच्याजवळ सरकला.
कुआचा गोंधळ संपला असावा. आताचं वागणं तिच्या परिचयाचं असावं. अल्बर्ट जवळ येताच तिने प्रेमाने त्याच्या गालाचा चावा घेतला आणि त्याला पाठीशी घेतला...
-पुढचा सर्व तपशील मी सांगत नाही. कारण तो फारच तांत्रिक आणि शास्त्रीय आहे! एक मात्र सांगू शकतो अल्बर्टचाचा रतीक्रीडेत पूर्ण पारंगत होता ! असो.
माझी शास्त्रीय संशोधनाची भूक भागली असली तरी अल्बर्ट-चाच्याची खाज शमली नसल्याने मात्र वांधा झाला. कारण आम्ही तास-दोन तास वाट पाहिली तरी त्याची हटायची तयारी दिसेना आणि आम्हाला कुआला सोडून द्यायचं नव्हतं. शेवटी आम्ही प्रेमी युगुलांची ताटातूट करायचं ठरवलं.
आम्ही प्रेमिकांच्या अगदी बवळ पोहोचलो तरी अल्बर्टपठ्ठा हलला नाही. काही वेळ त्याने आमच्याकडे दुर्लक्ष केलं. आता आली पंचाईत ! आम्ही हस्तक्षेप केला तर अल्बर्टची काय प्रतिक्रिया होईल हे उटेकलाही सांगता येईना. शेवटी मीच, अल्बर्ट उभा होता त्याच्याजवळ जमिनीत गोळी घातली.
बंदुकीच्या आवाजासरशी अल्बर्टची प्रणय-धुंदी खाडकन उतरली. एक छलांग मारून तो दूर सरकला. पण परत त्याने आगेकूच सुरू केली. शेवटी विरही कुआला साखळीने ओढत उटेक पुढे आणि बंदुकीच्या धाकावर पिछाडी सांभाळत मी मागे अशा थाटात आम्ही परतलो. अल्बर्टने आगे-मागे, या बाजूला, त्या बाजूला जात आमचा पिच्छा पुरवलाच.
खोपटाजवळ आल्यावर परत एकवार मी बंदुकीची फैर झाडली. पण अल्बर्टवर विशेष परिणाम झाला नाही. आता कुआला आत खोपटात बांधण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. कारण बाहेर कुत्र्यांमध्ये बांधली असती तर शाही लढाया झाल्या असत्या.
ती रात्र भयानक गेली. खोपटाचा दरवाजा लावला होता. अल्बर्टने ओरडून ओरडून आमची आय माय उद्धरायला सुरुवात केली. त्याने आमची आणि तमाम कुत्रेमंडळींनी अल्बर्टची ! त्यातच कुआने आपला आर्त विरही सूर त्यांच्यात मिळवला. व्वा, काय मैफिल होती !
सकाळी-सकाळी माइक फारच भडकला होता. शेवटी उटेकने परिस्थिती काबूत आणली. 'कुआला सोडून द्या, माज गेला की ती परत येईल. काही पळून-बिळून जाणार नाही. त्याने शहाणपणाचा सल्ला दिला.
नेहमीप्रमाणे उटेकचं खरं निघालं.
पुढचा आठवडाभर आम्ही सात स्वर्गात विहरणाऱ्या युगुलाला दुरून बघत होतो. ते खोपटाजवळ आले नाहीत की, गुहेजवळ गेले नाहीत. त्यांना आमची खबरबात नव्हती. पण नाही म्हटलं तरी मला थोडी काळजी होतीच. त्यामुळे एक दिवस कुआ बाहेरून परतली तेव्हा सुस्कारा सोडला.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अल्बर्टही शिकारपूर्व समूहगानात सामील झाला. आता मात्र त्याचा आवाज शांत-तृप्त-आरपार समाधानी वाटत होता.
तृप्ती-बिप्ती ठीक आहे, पण लांडग्यात काय म्हणून?
नाही म्हटलं तरी माणसांच्या जिवाला काहीतरी वाटतंच; निदान माझ्यासारख्याच्या तरी !
- oOo -
पुस्तक: लांडगा आला रेऽ आला
लेखक/अनुवादक: फर्ले मोवॅट/जगदीश गोडबोले
प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन
आवृत्ती दुसरी (१९९८)
पृ. ८२-८६.
---
संबंधित लेखन:
वेचताना... : लांडगा आला रेऽ आला >>
---
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा