शुक्रवार, २१ मे, २०२१

वेचताना... : जैत रे जैत

माणूस प्रथम निसर्गजीवी होता, तो निसर्गाच्या सोबतीने राहात होता. जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी तो निसर्गाकडून घेई. तेव्हा जगण्यासाठी आवश्यक गोष्टी निसर्गातून घेताना हा आपला हक्क नाही याचे त्याला भान होते. केवळ जगण्याची गरज म्हणून आपण ते काढून नेतो, हे तो विसरत नसे. म्हणून त्याबद्दल निसर्गाकडे आपली कृतज्ञता रुजू करत असे.

जैत रे जैत

गो. नी. दाण्डेकरांच्या ’जैत रे जैत’मधला ठाकरांचा नाग्या जळणासाठी फांदी तोडण्यासाठी झाडदेवाची अनुमती मागतो, केवळ वाळलेलीच फांदी तोडेन, ओली तोडणार नाही असे वचन देतो. त्या झाडावरच्या पोळ्यातील माश्यांची माफी मागतो. नागदेवाच्या पाया पडतो. वाघदेवाला त्याचे देणे देत जातो. पावसाला सुरुवात झाल्यावर अन्नाचा तुटवडा असतानाही ठाकर गडी निसर्गाला ओरबाडण्याची घाई करत नाहीत. पावसाचा पहिला भर ओसरल्यावर, भादव्यातच भारंगी, कुर्डू, तरोटा वगैरे भाज्यांना हात घालतात. आणि ती खाण्यापूर्वी देवांच्या, पितरांच्या नावे घास सोडतात नि मगच तिला तोंड लावतात.

नाग्याच्या वाडीत उंदीर फार झाले म्हणून त्यांना मारतानाही एखादा वृद्ध तरुणांना सबुरीचा सल्ला देतो. ’धाईस उंद्र र्‍हाऊ द्या जिते. पार बेणं काढून टाकू नका.’ हे अनुभवजन्य शहाणपण आहे. ’तोही देवाघरचा जीव. भाताचा एकेक दाणा वेचून आणतात. रानातल्या बिळांमधून साठवतात. त्यांचा मागोवा घेत बिळं खोदली की पायलीपसा धान्य मिळतं. त्यासाठी कष्ट कसलेच करायचे नाहीत. तेवढं बीळ उकरलं की झालं” अशी पुस्ती तो जोडतो. यात स्वार्थाबरोबरच तो ही देवाघरचा जीव म्हणजे त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शिकार केवळ त्रास कमी करण्यापुरती वा अन्न गोळा करण्यापुरती करावी अशी त्याची धारणा आहे.

गॉड्स मस्ट बी क्रेझी’ नावाच्या सुरेख चित्रपटातील बुशमेन आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी हरणाची शिकार करतो. ते पडल्यावर प्रथम हात जोडून त्याची माफी मागतो. ’माझ्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी मांसाची गरज म्हणून मला तुला मारावे लागते आहे. एरवी माझे तुझ्याशी कोणतेही शत्रुत्व नाही.’ असे त्याला सांगतो.

आफ्रिकेतील जंगलवासींमध्ये प्रत्येक टोळीचे एक आराध्य दैवत असते. हे दैवत निसर्गातील एखादा प्राणी, पक्षी वा सजीव असतो. त्यातून त्या त्या टोळीकडून त्या एका प्राण्याची शिकार केली जात नाही, त्याला संरक्षण दिले जाते. यातून त्या प्राण्याचा निर्वंश होणे टळते. विविध प्राण्यांना, पक्ष्यांना वेगवेगळ्या टोळ्यांकडून संरक्षण मिळाल्याने निसर्गाचा तोल राखला जातो. ही खरी संस्कृती म्हणायची! इथून पुढे मानव-समाजाचा जो ’विकास’ झाला किंवा जी ’प्रगती’ झाली त्यातून जे रसायन तयार झाले त्यात हा संस्कृतीचा अंश लयाला गेला.

जोवर सर्व उत्पादन माणूस केवळ शारीरबळ नि कौशल्याआधारे करत होता, तोवर निसर्गातून तो किती घेईल याला मर्यादा होत्या. हाताने होईल तितकेच काम तो करु शकत होता, आणि त्या कामाला आवश्यक तितकेच निसर्गातून काढून आणत होता. आणि माणूस काढून नेईल त्याहून कैकपट अधिक निसर्ग पुन्हा निर्माण करत होता. स्वयंचलित अथवा वेगवान यांत्रिक उत्पादन सुरू झाल्यावर उत्पादनक्षमता अफाट वाढली, त्याला लागणार्‍या कच्च्या मालाची गरज वाढली आणि त्याच्या पूर्ततेसाठी निसर्गाला ओरबाडण्याचा वेगही वाढला. या अफाट वेगवान आयुष्यात माणसाला निसर्गाची माफी मागून, मागणी करुन सामुग्री जमा करण्याची फुरसद आणि इच्छा दोन्ही उरली नाही. आणि त्या विनाशाच्या वेगाने पुनर्भरण करण्याची शक्तीही निसर्गात नव्हती.

वेगवान आणि यांत्रिक उत्पादकतेने समाजात आणखी एक बदल घडवला तो म्हणजे माणूस नागरी आयुष्याकडे- आणि म्हणून निसर्गापासून दूर सरकला. निसर्गापासून दूर वा त्याचा विध्वंस करुन उत्पादनकेंद्रे, व्यवस्थापनकेंद्रे आदींची उभारणी करून त्याभोवती मानवी समाजाची वस्ती आकाराला येऊ लागली. या नागर, पांढरपेशा आयुष्याची नाळ निसर्गातील फारच थोड्या मनुष्येतर सजीवांशी जोडली गेली होती. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील देव-संकल्पनांचा संदर्भही निसटत गेला आणि देवत्व हे निसर्गाकडून अध्याहृताकडे सरकले. जगण्याशी त्याची नाळ तुटली आणि स्वर्ग-नरक, मृत्यूपूर्व नि पश्चात जीवन, पूर्वजन्माचे ओझे वगैरे संकल्पनांच्या आधारे त्याचा विस्तार होत गेला.

देव-संकल्पना निसर्गापासून दुरावली नि माणसाच्या मनातील तिचा धाकही नाहीसा झाला. निसर्गातील नागाचा नि वाघाचा, नागदेव नि वाघदेव होऊन त्याची पूजा करणे, त्याला मान देणे, त्याच्या वाटेस जाणे टाळणे हा ’जगा नि जगू द्या’ दृष्टीकोन मागे पडून वर्चस्ववादी वृत्ती वाढली. नागापासून दूर राहण्यापेक्षा त्याला ठार मारण्याचे उपाय सहजपणे योजले जाऊ लागले. वाघनखे गळ्यात घालून शौर्याचा आव आणला जाऊ लागला. औद्योगिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि त्यातील उत्पादनांसाठी आवश्यक कच्च्या मालासाठी कोणत्याही माणूस निसर्गाची अनिर्बंध लांडगेतोड करु लागला.

'गरजेनुसार उत्पादन ऐवजी उत्पादनानुसार गरज' निर्माण करण्याची उफराटी युगत सापडलेल्या भांडवलशाहीने तर आपल्या मांडणीतून, जमाखर्चातून, ताळेबंदातून निसर्गाच्या नावे काही शिल्लक टाकणेही सोडून दिले. देवत्व देणे तर सोडा, ’निसर्ग आपल्या हक्काचा आहे, हवे तितके नि हवे तेव्हा ओरबाडून घेणे हा आपला हक्कच असल्याचे’ माणूस आता समजू लागला. ’माणसाचे हित... नव्हे स्वार्थ सर्वोच्च. त्यासाठी निसर्गाला वाटेल तसे ओरबाडले तरी चालेल. 'कंपनीचा नफा वाढला पाहिजे, क्वार्टरली टार्गेटस अचिव व्हायला हवीत’ ही मानसिकता आकाराला येऊ लागली.

देवत्व हे निसर्गाकडून अध्याहृताकडे सरकले आणि ब्राह्मणांच्या इंद्र, ब्रह्मा, शिव, विष्णू, त्यांचे अवतार वगैरे संकल्पनारूप देवांचे महत्व वाढू लागले. हे सर्व देव मानवी तोंडावळा असणारे आहेत. पुढे निसर्गाशी निगडित देवांचे या देवांशी वा त्यांच्या अवताराशी अभिन्नत्व प्रतिपादन करत त्यांचे स्वतंत्र अस्तित्व नाहीसे करण्यात आले. उदा. पावसाचा देव असलेल्या वरुणाचे कार्य यथावकाश इंद्राच्या झोळीत टाकून त्याचे महत्व कमी करण्यात आले. 

धनगरांचा कल्याणकारी राजा, बहुजनांचा देव असलेला विठोबाला विष्णूचा अवतार घोषित करून पदुबाई(पद्मावती), तुळसा यांना मागे सारून विठोबा-रखुमाईचा घोष होऊ लागला. इतकेच काय तुळशीच्या लग्नात विष्णूला वर करुन त्यांचे अभिन्नत्व आणखी अधोरेखित केले गेले. माध्यमांचे महत्व फार प्राचीन काळी ओळखणार्‍या ब्राह्मणांनी त्याचा चोख वापर करुन आपली देव-संकल्पना रुजवली, विस्तारत नेली. 'पुन्येवंत' होऊ पाहणार्‍या नाग्याच्या मनात जोशीभटाने सरकवली तशीच इतरांच्या मनात अलगद सरकवून दिली.

ठाकराच्या जमातीत जन्माला आलेला नाग्या पुन्येवंत होण्याच्या इर्षेने ’बाम्हून’ होऊ पाहतो आहे. (पुढे चिंधी त्याला समजावून सांगताना पुन्येवान होण्याचा ब्राह्मणाचा मार्ग हा एकच नाही असे सांगते. तिला जे उमगले ते त्याला समजलेले नाही.) नाग्या पुन्येवंत होण्याच्या ध्यासाने ब्राह्मणाला मार्ग विचारतो, तेव्हा ब्राह्मणाचे हे देव त्या ठाकराच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करू लागतात. प्रथिनांचा हुकमी साठा असणारे आणि ज्यांना मारण्याने अन्नधान्याची नासाडीही टाळता येते असे उंदीर ’गणपतीचे वाहन’ म्हणून आहारातून वर्ज्य करावेत असे ब्राह्मण सांगतो. चविष्ट मांसासाठी सठीसहामासी खाल्ले जाणारे मोरही ’सरस्वतीचे वाहन’ म्हणून नाग्याला वर्ज्य करावे लागतात.

इथे मेख अशी आहे की तर ब्राह्मणांच्या देव-संकल्पनेत यांना देवांचे साहाय्यक म्हणून दुय्यम स्थान दिले जाते. ’देवाचे वाहन ही संकल्पनाच निसर्गातील काही जीवांचे आणि पर्यायाने त्यांना देवत्व देणार्‍या समाजगटांचे दुय्यमत्व अधोरेखित करण्यासाठी जन्मली असावी का?’ असा प्रश्न मला पडलेला आहे. या वर्चस्ववादी प्रवृत्तीचा पुढचा टप्पा अस्पृश्यता, गुलामगिरीमध्ये रूपांतरित झाला असावा.

’पुन्येवंत’ होण्याच्या कल्पनेच्या आहारी जाऊन नाग्या ब्राह्मणी आचाराविचारांना स्वीकारु पाहतो आहे. मुळात पाप-पुण्य ही संकल्पनाच नागर माणसाने मानवी तोंडवळ्याचे देव स्वीकारल्यानंतर, संघटित धर्मांचा उदय झाल्यानंतर निर्माण झाली आहे. ब्राह्मणी व्यवस्था ही भारतातील तिची आधार व्यवस्था आहे. 

पण दुसरीकडे निसर्गाबद्दल चौकसवृत्ती त्याच्यात ठासून भरली आहे. त्यामुळे त्याला निसर्गाशी निगडित अनेक प्रश्न पडतात. सुरुवातीलाच दहा-बारा वर्षांचा नाग्या बाला प्रश्न विचारुन भंडावून सोडतो. लिंगोबाच्या डोंगरानं बोट का उचललं असेल असा प्रश्न त्याला पडतो. मग तो डोंगर नाही महादेव आहे, ध्यानस्थ बसलेला असं बानं सांगताच त्यावर त्याचे आणखी प्रश्न सुरु होतात. 

पुढे पुनवेच्या राती डोंगरारूपी महादेव जागा होऊन फेरफटका मारून येतो हे ऐकताच, ’पण परत ध्यानस्थ बसताना त्याचा तो ढवळा बईल, त्याच्या गळ्यातील ती पोळ्यांची माळ पुन्हा सगळं नेमकं जागच्याजागी कसं बसतं’ याचं कुतूहल त्याला घेरुन राहतं. ते कुतूहल शमवण्यासाठी आपण पुन्येवंत व्हावं नि पुनवेच्या राती ते आचीर स्वत:च्या नजरेनं पाहावं असा ध्यास तो घेतो. पुढेही प्रत्येक टप्प्यावर तो अशा विविध प्रश्नांना सामोरा जातो, त्यातून उद्भवणारा संभ्रम त्याला वेटाळून राहतो. निसर्गजीवी ठाकर आणि अनुत्पादक कार्य करणारे असल्याने सर्वस्वी परोपजीवी ब्राह्मण अशा दोन संस्कृतींच्या या टकरीमध्ये दामटी वळली गेलेला नाग्या सदैव द्विधा मनस्थितीमध्ये जगतो.

आधी पुन्येवंत होण्याच्या ईर्षेने जपलेली श्रद्धा; मग त्या श्रद्धेचा मान राखला न गेल्याने केलेला विद्रोह, त्यातून केलेला सूडाचा निर्धार... मग पुन्हा चौकस बुद्धीने लहान्या माश्यांच्या पोळ्याशी तद्रूप होत असतानाच त्यांच्यामध्ये आतडे गुंतून गेल्याने दुसर्‍या दिशेने घेतलेला हेलकावा... पण ’लहान असो वा आगमाशी शेवटी एकाच जातीची असल्याने आपल्या शत्रूच’ असा सर्वंकष सूडाचा मानवी स्वभाव पुन्हा उफाळून येणं... नवे प्रश्न, नवे संभ्रम यातून नाग्याचा प्रवास होत राहातो. त्याचा सूड एकरेषीय अथवा एकदिश प्रवास करत नाही. नागमोडी चालीने, दोन पावले पुढे एक पाऊल मागे असाच त्याचा प्रवास आहे

या संभ्रमाचा उगम त्याच्या पुन्येवंत होण्याच्या ध्यासामध्ये आणि त्या ध्यासादरम्यान त्याने स्वीकारलेल्या ब्राह्मणी मूल्यांच्या त्याच्या मूळ जन्मदत्त मूल्यांशी झालेल्या संघर्षामध्ये आहे. त्यातून त्याचे प्रश्न त्याच्या जगण्याशी निगडित असलेल्या वस्तू, व्यक्ती, सजीव-निर्जीवापासून निसटून पाहतापाहता श्रद्धेसारख्या, देवासारख्या अध्याहृताकडे सरकू लागतात. पुन्येवंत होण्याच्या प्रयत्नात तो अधिकाधिक जीवनविन्मुख होत जातो. अध्यात्माच्या, अध्याहृताच्या, देवाच्या, श्रद्धेच्या अधीन झालेले कृतीची प्रेरणा आणि निर्णयाचा भार त्या देव नावाच्या संकल्पनेवर टाकून निश्चिंत आणि म्हणून बरेचदा कृतिशून्य होतात. उलट त्यापासून दूर, जगण्याशी एकरुप झालेले त्यातील झगड्यांची तोड काढण्याची जबाबदारी स्वीकारून अधिक कृतिप्रवण होऊ शकतात, चिंधीसारखे!

सतत जीवनसंमुख असणारी चिंधी नाग्याला आपलेसे करण्याच्या ध्यासाने अधिकच क्रियाशील होते. ती जोडीदार स्वत: निवडते, त्याला मिळवण्यासाठी सर्वस्व झोकून देते. आपल्याहून लहान असलेल्या नाग्याला ’बाला’ म्हणत असताना ती त्याची आई होते, प्रेयसी होते. त्याचबरोबर ती त्याच्या देवीमाशीवरील सूडाच्या कामातील बरोबरीची साथीदार आहे. गावात जेव्हा लोक नाग्याविरोधात बोलतात, तेव्हा त्याची बाजू भक्कमपणे मांडणारी त्याची सहकारी/वकील/सचिवही आहे. अगदी ’ललितेकलाविधौ’ नसली तरी ’गृहिणी,सचिव, मिता, प्रियशिष्या... नव्हे माताच आहे. उलट नाग्याच तिचा शिष्य म्हणावा लागेल. 

पुन्येवंत होण्यासाठी ब्राह्मणाप्रमाणे वागू पाहणार्‍या नाग्याला "बांम्हून पुन्येवंत हुतो, त्याची रीत येगली. आपली रीत येगली, सूर्याचा चालना येगला. चांदव्याचा येगला. चांदनीचा येगला. गिर्‍या*चा वेगला. समदा येक कसा आसंल ?" असे समजावणारीही तीच आहे. 

वाचता वाचता असं ध्यानात येतं की कादंबरीत नाग्याच्या मित्रांचा उल्लेख आहे पण चिंधीच्या मैत्रिणींचा नाही (हे हेतुत: की पुरुष लेखकाचे कल्पनादारिद्र्य?). तिला आई नाही. एकुणात तिच्या आयुष्यात स्त्रीसहवास फारसा नाही. कदाचित सदैव दारुच्या नशेत राहणार्‍या बापासोबत राहिल्यानेच ती स्वत:च्या बळावर जगण्यास शिकली असावी.

चिंधी हे भारतीय साहित्यातील एक दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे. इतके स्वयंपूर्ण, कणखर स्त्री व्यक्तिमत्व- ते ही कथानकाच्या दृष्टीने मध्यवर्ती, क्वचितच पाहायला मिळते. गंमत अशी असते की असे व्यक्तिमत्व बहुधा समाजाच्या मुख्य प्रवाहातील, धुरिण समाजातील नसते. चिंधी ठाकरांची लेक, तर शरत्‌चंद्रांच्या ’शेषप्रश्न’मधील कमल ही अ‍ॅंग्लो-इंडियन आहे. विस्तारभयास्तव दोघींची सविस्तर तुलना करण्याचा मोह टाळतो आहे. पण एक उदाहरण पुरेसे होईल. 

चिंधी नकोसे लग्न ठामपणे नाकारते. ते मोडण्यासाठी त्यासाठी तिच्या बाने घेतलेले वधूशुल्क परत करावे लागणार म्हणून राब राब राबते. पै-पैसा जोडून नवर्‍याचे देणे फेडून टाकते नि मग ज्याच्यावर जीव जडला त्या नाग्याकडे जाते. 

’शेषप्रश्न’मध्ये शिवनाथ कमलशी कुठल्याशा अगम्य पद्धतीने लग्न करतो. काळजीत पडलेले आशुबाबू ’असल्या लग्नातून तो सहजपणे निसटून जाऊ शकेल’ अशी धोक्याची जाणीव करुन देऊ पाहतात. पण ’त्याचा जायचा निर्णय झालाच असेलच, तर मी तरी त्याला जबरदस्तीने रोखण्याचा प्रयत्न का करेन?’ असा रोकठोक प्रश्न कमल विचारते. नाते हे दोघांना हवे असते तेव्हाच अर्थपूर्ण असते. ज्याक्षणी एकाकडून त्यातील सहभाग संपतो, तेव्हाच ते संपते हे उमजलेली नि खंत, दु:ख वा अकांडतांडव न करता त्या तुटल्या नात्याला मागे सोडून ताठ मानेने पुढे जाणारी कमल चिंधीच्याच जातकुळीची.

ज्याप्रमाणे नाग्या अनुभवाच्या आधारे देवाला आव्हान देऊ पाहतो त्याचप्रमाणे चिंधीही. 'सर्व देवांचा-देवीमाशीचाही, मान राखूनही नाग्याचा डोळा तिने का फोडला?' या प्रश्नावर भुत्या म्हणतो, "देवानी मारला, तो साह्यला पायजे !" (देवसंकल्पनेला कर्मसिद्धांताची पळवाट इथेच येऊन मिळते.) पण चिंधी उसळून म्हणते, "वाईट वकटा केला नही, तरी मारनार, असा कसा हा देव ? देव कसला, हा तर खईस !"  

देव जर कल्याणकारी आहे तर खरेतर त्याने चूकही पोटात घ्यायला हवी. इथे तर त्यांचा सार्‍यांना मान राखूनही नाग्याच्या वाट्याला दु:ख आले आहे. आपली सर्वकल्याणकारी देवाच्या संकल्पनेची वास्तवाशी सांगड बसत नाही हे नाग्या नि चिंधी दोघेही मान्य करत आहेत. याचा अर्थ ते अश्रद्ध आहेत असा नाही. देवाने केलेल्या अन्यायाबद्दल ते त्याला जाब विचारु पाहात आहेत, त्याच्या न्यायबुद्धीला आव्हान देत आहेत इतकेच.

या कादंबरीची ओळख झाली ती त्यावर निर्माण केल्या गेलेल्या चित्रपटामुळे. पण मला चित्रपटापासून कादंबरीपर्यंत पोचण्यास दोन दशके जावी लागली. दृश्य बाजू असल्याचा फायदा मिरवणार्‍या चित्रपटानंतर वाचूनही कादंबरी काकणभर नव्हे तर मणभर सरस असल्याची भावना निर्माण झाली. प्रेक्षकांच्या मागास भावनांशी तडजोड करण्याच्या नादात चित्रपटाने काही महत्वाचे तपशील पातळ केले हे जाणवले. त्याबद्दल रमतारामाच्या विश्रांतीस्थळी थोडे लिहिले आहे.

’गोनीदां’ची ’जैत रे जैत’ एका संभ्रमित पण निर्धार जपणार्‍या पुरुषाची नि त्याच्या पाठीशी ठाम उभ्या असलेल्या त्याच्या अस्तुरीची कथा आहे. यात नाग्याचा सूड जरी सूत्र म्हणून येत असला, तरी दोघांच्या आयुष्यातील काही हळवे, काही कोवळे क्षणही गोनीदांनी सुरेख रंगवले आहेत. सूडाचे नियोजन करण्यासाठी महादेवाच्या डोंगरावरील पठारावर हे दोघे प्रथम पोचतात तो प्रसंग त्यांनी अतिशय तरलतेने रंगवला आहे. चिंधीनेही तो अलगद पकडून ठेवला आहे.

- oOo -

*विमान

---

या कादंबरीचा प्रतिनिधी म्हणून वेचा निवडणे हे सर्वाधिक दुष्कर काम होते. विविध टप्प्यांवर येणारी वळणे, दिसणारी व्यक्तिमत्वे, घडणार्‍या घटना यांत कुणाला प्राधान्य द्यावे याचा निवाडा अवघड होता. नाग्याचे निसर्गाशी एकरुप होणे असेल, चिंधीने त्याला एकटा गाठून रोकठोकपणे ’तू पायजेस’ म्हणणे असेल, नाग्याचे मोहोळावर जीव जडवून बसणे असेल, लिंगोबाच्या डोंगरावरील पठारावरच्या मोहक निसर्गसौंदर्यावर लुब्ध झालेले नाग्या-चिंधीचे जोडपे असो, की बाच्या मृत्यूनंतर नाग्याच्या श्रद्धेला गेलेला पहिला तडा असेल... असे अनेक प्रसंग नि टप्पे उल्लेखनीय आहेत.

दोन संस्कृतींच्या टकरीत सापडलेल्या, स्वत:ची सूडभावना नि नैसर्गिक असलेली आपुलकीची भावना यांच्या संघर्षात संभ्रमित झालेला नाग्या हाच प्रातिनिधिक मानून द्विधा हा वेचा निवडला आहे.

दुसरा वेचा कथानकातील नाग्याच्या मनातील प्रश्नांचे काहूर, त्याची अस्वस्थता मांडणारा. या प्रसंगाअखेर त्याच्या श्रद्धेला पहिला ’तडा’ गेला आहे.


संबंधित लेखन

३ टिप्पण्या: