बुधवार, १९ मे, २०२१

द्विधा

एका कड्यालगतच्या पिंपुर्णीवर एक नाजुकसं पोळं लोंबत होतं. मात्र ते आग्यामाश्यांचं नव्हतं. बारक्या मधमाश्यांचं. ते पाहताच नाग्या भानावर आला. निरखून निरखून त्याकडे पाहू लागला.

एका बारक्या फांदीवर पोळं लटकलेलं होतं. भुरक्या तांबूस रंगाचं. माझ्या लांबून लांबून येत होत्या. थोडा वेळ बाहेर थांबून अलगद पोळ्यावर बसत होत्या. मग त्या हळूच छिद्रांमध्ये शिरत होत्या. छिद्रातल्या माश्या ढुंगणाकडून बाहेर निघून क्षणभर आपले पंख साफ करीत होत्या. मग त्या उडून जात होत्या. असा सारखा त्यांचा उद्योग चालला होता.

पोळं मोठं सुबक होतं. असं बसक्या गाडग्याएवढं. काना नव्हता की कोपरा नव्हता. दो अंगांनी ते गोल होतं. किंचित लोंबतं. माश्यांच्या येण्याजाण्यानं ते जिवंत झालं होतं.

जैत रे जैत

त्या इवल्या इवल्या मेहेनती माश्यांचं ते घर होतं. त्या रानभर हिंडून मध आणीत होत्या. कुठून कुठून कसला कसला. हिरडीचा अन् कारवीचा. मोहाचा अन् घाणेरीचा. बेहड्याचा अन् कुड्याचा. तो पोळ्याच्या वरच्या भागात असलेल्या कांद्यांत साठवीत होत्या. सारखे त्यांचे परिश्रम चालले होते. उसंत नव्हती. जणू कुणी त्यांना रोजानं घातलं होतं.

नाग्या अलगद पिंपुर्णीवर चढला. पोळं चार सहा हातांवर राहिलं. तिथून तो पोळ्याकडे निरखून पाहू लागला. सारखी धांदल सुरू होती. कुणाला क्षणाचीही फुरसत नव्हती.

नाग्याला मोठं आश्चर्य वाटलं. त्यानं चारदहादा पोळी काढली होती. चुडीत पेटवून खाली धरायचं. मधमाश्या कंदरावून निघून जातात. खालचा भाग तोडून टाकून द्यायचा. कांदा तेवढा मुठीत धरून तांब्यात पिळायचा. गोळा राहील तो मेण म्हणून वापरण्यासाठी घरी न्यायचा. बोटं चाटून टाकायची. कधी तांब्यातला मध नागलीच्या भाकरीसंग खायचा. जास्त गोळा झाला, तर वर फडकं बांधून पेठेत विकायला घेऊन जायचा. एवढाच ठाकरांचा अन् पोळ्यांचा संबंध.

जो जो नाग्या जवळून न्याहाळू लागला, तो तो त्याला मोठं आश्चर्य वाटलं. अचंब्यानं त्याच मन अगदी भरून गेलं. या माश्या इतकी धावाधाव का करतात? कोण त्यांना कामाला धाडतं? पोळ्यावर कुणाची मालकी ? कोण मजुरी देत ? अन्‌ या गप्पा टप्पा करायला का थांबत नाहीत ?

माणसं पायांवर पाय टाकून गोष्टी सांगत बसतात. तास‍न्‌ तास. विड्या फुंकीत. सूर काढकाढून ती कधीकाळीच्या कथा आठवून आठवून सांगतात. दोघं बसली. की तिसरं तिथं खिळतं. चौथं चिकटतं. अशी गप्पांची अंडी घालीत माणसं पहरच्या प्रहर एका जागी बसतात.

माश्या का बसत नाहीत ? की त्यांना थकवा येत नाही ? त्यांचे हातपाय दुखत नाहीत ? की कधी त्यांना दुखणंबाणं होत नाही ?

तो मोठा अचंबा करीत राहिला. तो त्याला दिसलं, की फांदीवर हळू हळू एक सरडा पुढे सरतो आहे. आता हा सरडा पोळ्याजवळ कशासाठी येतो आहे ? मध खाण्यासाठी? की गंमत पाहण्यासाठी? आपल्यासारखं त्याच्याही मनी पोळ्याविषयी कौतुक दाटलं आहे ?

सरड्याचा वेग कमी होत होत थांबला. पोळ्यापासून हाता दीड हातावर ति तो निचळ, चौपायांवर चिकटून बसला. जणू त्याला झोप लागली आहे. सरडा नाहीच तो. एक दगड आहे. किंवा फांदीचाच एक भाग आहे.

माश्या बुजणं बंद झाले. त्या त्याच्या अंगावरून पलीकडे जाऊ लागल्या. असं सगळं निवांत झालं. नुसती सरड्याच्या डोळ्यांची उघडझाप तेवढी सुरू होती. दिसे न दिसे अशी.

एक माशी पोळ्यावरून उडाली. सरड्याच्या जवळ आली. क्षणभर ती घोटाळली. पण मग ती निर्धास्त मनानं सरड्याजवळ पोचली. विजेसारखी सरड्याची जीभ बाहेर धावली, अन्‌ माशीला वेटाळून पुन्हा तोंडात गडप झाली !

"अरे चण्डाळा ! यासाठी बसला होता काय तू टप धरून?"

नाग्या रागेजला. तो खाली उतरला. एक काटूक उचलून पुन्हा वर चढला, अन् त्याने ते सरड्याच्या पोटाखाली घालून त्याला ताइदिशी उडवून दिलं. सरडा खालच्या खडकावर आपटला, अन्‌ तरतरत खबदाडीत निघून गेला. ‍नाग्यानं म्हटलं,

"मुर्दाडा, ये त खरी पुन्हा! तोडीतोच तुजा मुंडका !"

पुन्हा तो फांदीवर तसाच अवघडून पोळ्याचं कौतुक करीत राहिला. पाय दुखेपर्यंत. शेवटी पायांना कळ लागली, तेव्हा तो खाली उतरला, अन पुन्हा पुन्हा पोळ्याकडे पाहत उगवतीकडे चालला.

चालता चालता तो थबकला. कसं झालं हे? आपला तर मधमाश्यांवर लोभ जडला !

छे छे ! मधमाश्या आपल्या दावेदार. आग्या असो की गावरान असोत. त्यांच्याच भाईबंद त्या. त्यांनी आपलं अंग फोडून काढलं. डोळा कामातून गेला. त्यांचा आपला उभा दावा. अन् मग या लहानग्या पोळ्यावर प्रीत काय करून बसलो आपण ?

नाग्याला वणव्यात सापडल्यासारखं झालं. झाडोऱ्यातून तो बाहेर पडला. उघड्यावर आला. पाठीशी महादेव होता. आकाशावेरी पोचलेला. डाव्या हाताच्या कोपऱ्यात खाली दूर आपटं होतं. आकाशात दिवस पेटत होता. खाली नाग्या जळत होता.

एका धोंड्यावर बसला तो. पायातळीचे खडे वेचून उगीच लवणात भिरकावू लागला. पुन्हा जखम वाहू लागली. आपलं काय चुकलं ? माश्यांनी आपल्याला का फोडावं ? मक्याच्या ओळींमधून तण शोधून काढावं, तसं त्यानं आपलं सगळं वागणं विचरलं. समोर मांडलं. शोधशोधून पाहिलं. काही कुठं चूक दिसेना.

एकदम त्याला धक्का बसला. की कुणी देवीमाशी आहे हेच खोटं ? बानं उगीच आपल्याला थाप मारली ? तेवढ्या त्या थापेवर भरवसून आपण त्या महादेवाच्या गळ्याखालच्या पोळ्याशी वैर घेतो आहोत? अगदी भयाभया झालं. पार वेड लागायची पाळी आली. वर ऊन्ह तापत होतं. खाली नाग्या भाजून निघत होता.

ताडकन तो उठला, अन् तरातरा चालत महादेवाच्या तोंडासमोर जाऊन उभा राहिला. वर पाहिलन्, तर महादेव आपला डोळे मिटून ध्यानात मगन झालेला !

चिडून नाग्या म्हणाला,

"द्येवा रे, तुजी मज्जा !
डोला तिरका करायला नको, का उघडून बगाय नको ! कुनी कुनाला फोडून खावु का काना करू !
तुला ठावा नहीं का रे ? त्या दिशी मी तुज्या पाया पडला हुता मग तुझ्या कवतिकाच्या देवीमाशीला नमिस्कार केला हुता, असा सगल्यावरून ववालून गेला हुता. काय कुनाचा ठिवला नहीं !
तरी तुज्या देखत डोला माश्यांनी मला फोडला!
तू बी खोटा, तुझी देवीमाशीबी लबाड !
कशाला रं बसला ध्येन धरून ? इकडे जग करू काय तरी ! येकमेकाचा मला कापू का रघात शिवू ! छातीवर पाय देऊ का खापलून काढू! तुजा ध्येन काय भंगायचा नही !"

नाग्या असा मनानं रिकामा झाला, भकास. मग महादेवाकडे पाहात दोन्ही हात डोक्यावर ठेवून उभा राहिला. किती वेळ ते त्याचे त्यालाच कळलं नाही. बोटं तशीच एकमेकांत गुंतलेली. बुधल्याच्या ढोलीतून राहणार्‍या घारी त्याच्यावरनं झेपावून पलीकडे निघून गेल्या. किती पारवे उडाले. किती सातभाई. नाग्या तरच खुंटासारखा उभा.

- oOo -

पुस्तक: ’जैत रे जैत’
लेखक: गो. नी. दाण्डेकर
प्रकाशक: कॉन्टिनेन्टल प्रकाशन
आवृत्ती पहिली (१९६५) पाचवे पुनर्मुद्रण (२०११)
पृ. १०४-१०७.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : जैत रे जैत >>
तडा >>
---


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा