गुरुवार, १३ मे, २०२१

माशा मासा खाई

वन्यजीवपर्यटन म्हटले की माणसे असोशीने दोन गोष्टी पाहण्यासाठी जंगलात जातात. पहिले म्हणजे अर्थातच वाघोबाचे दर्शन घेणे... आणि त्याचे स्वकॅमेर्‍याने घेतलेले फोटो समाजमाध्यमांवर, व्हॉट्सअ‍ॅपमार्फत अनेकांना पाठवून कृतकृत्य होणे. आणि दुसरा, क्वचित सफल होत असलेला, उद्देश म्हणजे एखाद्या शिकारी प्राण्याने केलेली शिकार ’याचि देही याची कॅमेरा’ पाहणे.

शिकार म्हटले की सिंह, वाघ, कोळसुंदे या शिकारी प्राण्यांनी केलेली शिकार पाहायचा योग येतो. भारतात चित्ता नामशेष झाला आहे. बिबट्या हा सर्वात धूर्त मांजरवर्गीय प्राणी समजला जातो. तो वाघ-सिंहाप्रमाणे उघड्या जागेवर शिकार करण्यापेक्षा झाडीच्या आडोशाचा परिणामकारक रीतीने वापर करतो. त्यामुळे त्याच्या शिकारीच्या तयारीची पूर्वकल्पना येणे अवघड असल्याने, ते दृश्य पाहायला मिळणे दुष्कर. त्यासाठी अभ्यासकाची चिकाटी नि वेळ हवा. सामान्य पर्यटकाला बिबट्या तसा लाभत नाही.

शिकार म्हटले, की शिकारी आणि शिकार- म्हणजे त्यांच्ये भक्ष्य, हे दोन वर्ग बरेचसे स्पष्ट दिसतात. शिकारी जमातींमध्ये वाघ, सिंह, बिबट्या, चित्ते वगैरे मार्जारकुलातले प्राणी, तसंच लांडगे, कोल्हे, कोळसुंदे वगैरे श्वानकुलातले प्राणी, स्वत:चाच असा स्वतंत्र प्रवर्ग असलेले तरस आणि त्यांच्या शिकार अथवा भक्ष्य वर्गामध्ये काळवीट, चितळ, विल्डबीस्ट अथवा नीलगाय वगैरे सारंग-कुरंगवर्गीय प्राणी, सशांसारखे छोटे प्राणी, रानडुक्कर वगैरे प्राणी अंतर्भूत होतात. आकाशाचा अधिवास केलेल्या पक्ष्यांमध्ये ससाणे, घारी, गरूड वगैरे शिकारी तर इतर लहान पक्षी, त्यांची अंडी तसंच काही छोटे जमिनीवरचे प्राणी हे त्यांचे भक्ष्य. उभयचरांमध्ये मगर-सुसरींसारखे सर्वभक्षी शिकारी. जलचरांमध्ये ही विभागणी तेवढी काटेकोर नसावी. (शीर्षकात वापरलेली एका गाण्याची ओळ याचेच निदर्शक आहे.)

एखादा मांसाहारी प्राणी क्वचितच दुसर्‍या प्राण्याची शिकार होत असावा. बहुतेक शिकारी/मांसाहारी प्राण्यांना भक्कम दात, जबडा, नखे वगैरे शिकारीला सहाय्यभूत असणारे शारीर अवयव मिळालेले असतात. त्याचा शिकारीला जसा उपयोग होतो, तसेच एखाद्या मोठ्या शिकार्‍याने केलेला हल्ला परतवून लावण्यासाठीही होऊ शकतो. त्यामुळे बहुधा मोठे शिकारीही छोट्या शिकारी प्राण्याच्या वाटेस फारसे जात नसावेत. अपवाद पिलांचा, कारण ती शारीरदृष्ट्या दुबळी असल्याने सहज शिकार होऊ शकतात.

या सार्‍या जीव-मृत्युच्या खेळात एक बडा शिकारी दुसर्‍या बड्या शिकार्‍याची शिकार झाल्याचे क्वचितच दिसून येते. हा व्हिडिओ अशाच एका शिकारीचा आहे. समाजमाध्यमांतून प्रथम बराच फिरला. नंतर त्यांच्या मागे फरफटत जाणार्‍या तथाकथित मुख्य प्रवाहातील माध्यमांनीही आपापल्या संस्थळांवर तो प्रसिद्ध केला.

व्हिडिओच्या पहिल्या काही सेकंदातच झालेली ही शिकार तुम्हाला स्तंभित करते. अगदी पुन्हा पाहतानाही हाच अनुभव पुनरावृत्त होतो. याचे कारण शिकार्‍याचे चापल्य अलौकिक आहे. मागच्या क्षणात कुठेही नसलेला हा शिकारी, पुढच्याच क्षणात आपल्या भक्ष्याच्या नरडीवर घट्ट पकड घेतलेला दिसतो. पाहणारा या वेगाने स्तिमित होतो. त्याच्या पुढच्या क्षणी काय घडले हे ध्यानात आल्यावर झाल्या घटनेने व्यथितही होतो.

पर्यटकांना सफरीवर घेऊन आलेला गाईडही विलक्षण दु:खी झालेला दिसतो. तो म्हणतो ’ही अतिशय दुर्दैवी आणि दु:खद घटना आहे’. दोन क्षणांपूर्वी पाणी पीत असलेला पूर्ण वाढ झालेला चित्त्याचा नर पाण्याखाली दिसेनासा होताच सर्वसामान्य पर्यटक नि व्हिडिओचे प्रेक्षक हळहळतात. माझी प्रतिक्रियाही नेमकी तशीच झाली. पण...

...'आपण बहुसंख्येच्या बाजूला आहोत म्हणजे आपले वर्तन बरोबर आहे' असे समजणार्‍यांपैकी मी नाही. आपल्याच विचारांना, दृष्टीकोनाला, निर्णयांना चिकित्सेच्या दगडावर घासून पाहण्याची सवय असल्याने, विचाराचा लंबक चटकन मध्यभागी येऊन स्वत:लाच आव्हान देऊ लागला. पुढच्याच क्षणी माझ्या या प्रतिक्रियेचे माझे मलाच आश्चर्य वाटले. आश्चर्य यासाठी, की याच चित्त्याने एखाद्या हरणाच्या पाडसाची शिकार केलेला व्हिडिओ मी पाहिला असता, किंवा प्रत्यक्ष भेटीत ती घटना पाहिली असती, तर मला इतकाच तीव्र धक्का बसला असता का?

व्हिडिओमधील गाईडही त्या चित्त्याच्या मृत्यूबद्दलचा आपला शोक लपवू शकलेला नाही. त्याने तर वाघ-सिंहांसारख्या बड्या शिकार्‍याने केलेल्या अनेक शिकारी यापूर्वी पाहिल्या असतील. त्यातून त्याचे मन बरेचसे निर्ढावले असेल. असे असूनही त्या चित्त्याच्या मृत्यूचा त्याला चांगलाच धक्का बसलेला आहे. एका अर्थी त्याच्या संवेदना जिवंत आहेत हे चांगले लक्षण आहे. पण त्याच्या... नि माझ्याही संवेदना अशा पक्षपाती (selective) का आहेत हा प्रश्न मला छळतो आहे.

जुन्या नराला हुसकावून देऊन सिंहिणींच्या टोळीवर वर्चस्व प्रस्थापित केल्यावर, त्या लवकर मीलनोत्सुक व्हाव्यात म्हणून नव्या सिंहाने त्यांच्या बछड्यांना ठार मारलेले पाहून जितकी हळहळ होते, तितकीच हळहळ एखाद्या हरणाच्या टोळीच्या मागे लागलेल्या चित्त्याने मागे पडलेल्या एखाद्या लहान पाडसाचे नरडे पकडल्यावर होते का? पर्यटकांप्रमाणे ती शिकार मी एन्जॉय करणार नाही हे खरे, पण नव्या सिंहाने हत्या करुन टाकलेले बछड्याचे शव पाहून मला जितके वाईट वाटेल, त्याच्या दशांशाने त्या पाडसाबद्दल का वाटत नसावे? 

अगदी शाकाहाराला संघटित धर्माचे रूप देऊ पाहणार्‍यांनीही आपल्या मनात डोकावून पाहात या प्रश्नाचे उत्तर द्यायला हरकत नाही. तोंडाने काहीही म्हणोत, पण माझी खात्री आहे माझ्या उत्तराहून त्यांचे उत्तरही वेगळे नसेल. काही जीव हे इतर जिवांची शिकार होण्यासाठीच जन्मले आहेत, हा निवाडा आपल्या नेणिवेत सहज रुजलेला असल्याचे हे लक्षण आहे. ’अजापुत्रो बलिं दद्द्यात, देवो दुर्बल घातक:’ हे सु(?)भाषित तंतोतंत खरे आहे. एकदा हे रुजले, की माणसांमधलेही 'काही गट, काही जमाती या मूलत:च दुय्यम आहेत, श्रेष्ठ जमातींची सेवा करण्यासाठीच जन्मलेल्या आहेत' हा समजही हळूहळू रुजवता येतो. आपल्या शोषक अजेंड्याला धूर्त माणसे निसर्गातून समर्थन शोधतात ते असे.

अलिकडेच एका लेखात मी नागरी समाजातील व्यक्तींचा, माध्यमांचा हा उच्चवर्गीयधार्जिणेपणा अधोरेखित केला होता. एखाद्या मोठ्या कलाकाराच्या, खेळाडूच्या उतारवयात आलेल्या विपन्नावस्थेची बातमी होते, त्याच्यासाठी निधी जमा करण्याचे आवाहन केले जाते. लोकांना त्याच्यावर गुदरलेल्या त्या प्रसंगाचे अतिशय वाईट वाटते, नि ते मदतीस धावून जातात. 

वास्तविक पाहता जर ती व्यक्ती प्रसिद्ध असेल, यशस्वी असेल, तर वृद्धावस्थेत आलेल्या विपन्नावस्थेला बव्हंशी तीच जबाबदार असते. त्यात समाजाचा दोष नसतो, त्यामुळे समाजाने ती निवारावी असे बंधन समाजावर असण्याचे कारण नाही. त्याच्या कार्यक्षम आणि यशस्वी काळात समाजाने त्याला/तिला यथायोग्य मोबदला आधीच दिलेला असतो. त्याचे नियोजन आणि वापर यात गफलत करुन जर ती यशस्वी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या कोलमडली, तर ते दुर्दैवी आहे हे खरेच. त्यासाठी मानवतेच्या दृष्टीकोनातून तिला साहाय्य करावे हे ही चूक नाहीच. पण तो तिचा हक्क नाही, हे मात्र विसरता कामा नये.

माझा आणखी एक मुद्दा असा आहे, की अशा बातम्या चालवणारी चॅनेल माध्यमे, वृत्तपत्रे, व्हॉट्सअ‍ॅप-सैनिक, फेसबुक नि ट्विटर-योद्धे अशीच मोहिम आर्थिक अडचणीत सापडलेल्या एखाद्या मजुरासाठी चालवतात का? चित्त्याची शिकार अति-दु:खदायक, पण हरणाच्या पाडसाची शिकार फेसबुक वा इन्स्टाग्रामवरच्या स्वप्रसिद्धीचे साधन, असे का? बिस्मिल्लांची आर्थिक अडचण राष्ट्रीय माध्यमांची बातमी होते. पैसे नाहीत म्हणून भलीमोठी जखम बरी करण्यासाठी केवळ हळद किंवा चुन्यावर भरवसा ठेवून बसलेल्या मजुराकडे त्याचा ठेकेदारही ढुंकून बघत नाही. मोडल्या पायाने रोजगार बुडून घरी बसलेल्या त्याला एकवेळचे जेवणही हे सारे जागरुक नागरिक पोचते करत नाहीत.

त्याचप्रमाणे या आज बळी गेलेल्या चित्त्याने याआधी काही इतर प्राण्यांची शिकार केली असेल, जिवंत राहता तर आणखी काही शिकारी केल्या असत्या. जिवंत राहण्यासाठी अन्न हवे, आणि अन्न हवे तर शिकार करायला हवी, या नियमाने तो बाध्य होताच. मी जर हे समजू शकतो, तर मगरीलाही मी तोच न्याय लागू केला पाहिजे. या मगरीने या चित्त्याऐवजी याच चापल्याने एखाद्या नीलगायीची वा काळवीटाची शिकार केली असती, तर मी जितक्या संवेदनशीलतेने वा तटस्थपणे मी ती पाहू शकतो, तितक्याच संवेदनशीलतेने वा तटस्थपणे मी या चित्त्याचा मृत्यूही पाहायला हवा. पण तसे घडत नाही.

भागवतामध्ये गजेंद्रमोक्षाची प्रसिद्ध कथा आहे. अगस्ति-शापाने गजेंद्र नावाच्या हत्तीमध्ये रुपांतरित झालेला राजा इंद्रदुम्न आणि देवल ऋषींच्या शापाने मगर झालेला हुहू हा गंधर्व यांच्यात सरोवराकाठी झालेला संघर्ष हजारो वर्षे चालल्याचा उल्लेख आहे. (हीच कथा- बहुधा पं. महादेवशास्त्री जोशींनी लिहिलेल्या पुस्तकात, विष्णूचे द्वारपाल असलेल्या जय-विजयांच्या संदर्भातही वाचली होती.) सरोवरात राहणारी ही मगर पाणी पिण्यास आलेल्या या हत्तीचा पाय पकडते आणि (वरील व्हिडिओतील चित्त्याप्रमाणे) त्याला पाण्यात खेचून नेऊ पाहते. पाण्यामध्ये मगरीचे बळ वाढते तर हत्ती जमिनीवर बलवान. त्यामुळे तो तिला पाण्याबाहेर खेचू पाहतो. दोघांचा हा संघर्ष हा तुल्यबळांचा असल्याने हजारो वर्षे चालतो.

अखेर दुबळ्या पडू लागलेल्या गजेंद्राला विष्णू साहाय्य करतो. (कथा भागवतात असल्याने हे अपेक्षितच.) फक्त तिथेही गंमत पाहा. गजेन्द्राचा उ:शाप म्हणजे मगरीची हत्या... चुकलो, निर्दालन करुन विष्णू त्याचे संरक्षण करतो. हुहूलाही उ:शाप असतो की विष्णूच्या हातूनच त्याला नक्ररूपातून मुक्ती मिळेल.

चमत्कार नि भक्तीचे आवरण दूर करुन पाहिले तर हत्तीचे संरक्षण आणि मगरीची हत्या एवढेच वास्तव शिल्लक राहते. दोन प्राण्यांच्या उ:शाप-क्रियेतील फरक ध्यानात घेण्याजोगा. माणसाच्या मनात असलेले हत्तीबद्दलचे ममत्व आणि मगरीबद्दलची भीती याचाच हा आविष्कार म्हणता येईल. विष्णू हा माणसाचाच देव असल्याने माणसाने त्यालाही आपलेच गुण चिकटवले तर नवल नाही.

या कथेमधला शेवटचा विष्णूचा सहकार्याचा भाग वगळला, तर पुराणकथालेखकाने कोणत्याही एका प्राण्याला धार्जिणे न होता रंगवलेला मगर आणि हत्ती या तुल्यबळांचा संघर्ष हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याने वास्तवाचे हे भान राखले, समतोल राखला. तसाच समतोल हरीण-पाडस नि चित्ता प्राण्यांची शिकार होताना पाहणार्‍या प्रेक्षकांना आणि पर्यटकांना राखता यायला हवा. अन्यथा आपली संवेदनशीलताही केवळ बलवंताची बटीक आहे हे मान्य करावे लागेल.

- oOo -

१. ’सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ या चित्रपटातील पहिला प्रसंग एक मानदंड बनला आहे. युद्धाची विफलता, दिशाहीनता आणि क्रौर्य याचे स्तिमित करणारे दर्शन घडवणारा, एक प्रकारे शांततावादी दृष्टिकोन रुजवू पाहणारा हा दीर्घ प्रसंग पुढील कथानकाला एक उत्तम पूर्वरंगही देऊन जातो. (आपल्याकडे रोरावत येणार्‍या रणगाड्यावर कोर्‍या चेहर्‍याने, आपल्या लहानशा पिस्तुलातून एक एक गोळी झाडत संभाव्य मृत्यूला शांतपणे सामोरा जाणारा कॅप्टन मिलर, हा दुसरा उल्लेखनीय प्रसंग.)

पण हा प्रसंग पडद्यावर साकार होत असताना, एका सैनिकाने दुसर्‍यावर केलेला वार, एकमेकांची केलेली हत्या, रक्तमांसाच्या चिखलात पडलेली भर, हे पाहात असताना दिङ्मूढ होण्याऐवजी, प्रत्येक वाराबरोबर, प्रत्येक हत्येसरशी ’अरे उडवला बघ’, ’हाण तेच्यायला’ वगैरे उद्गार काढत मृत्यूचे ते तांडव ’एन्जॉय’ करणारा शेजार मला चित्रपटगृहात लाभला होता. असल्या संवेदनाहीन समाजात आपण जन्मलो याची त्यावेळी प्रथमच शरम वाटली होती. पुढे अशा घटनांची वारंवारता वाढत गेल्यावर, आपणही निर्ढावण्याऐवजी त्या समाजापासून दूर राहणेच श्रेयस्कर असते यावर शिक्कामोर्तब करत गेलो.

२. यावरुन मला सावंतांच्या 'मृत्युंजय'मधील एक प्रसंग आठवतो. कादंबरी असल्याने मूळ महाभारत कथेमध्ये आपल्या कल्पनाविस्ताराने लेखकाने घातलेली ही भर आहे. (तसेही महाभारत हा मूठभर इतिहासाचा(?) अनेक लेखकांनी केलेला कल्पनाविस्तारच आहे.) कौरव नि पांडव द्रोणाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत असताना एका यज्ञासाठी बळी म्हणून प्राणी आणण्याचे काम ते आपल्या विद्यार्थ्यांवर सोपवतात. त्यात कर्ण एका वाघालाच पकडून घेऊन येतो. द्रोणाचार्य वाघ हा 'यज्ञीय पशू' नसल्याचे सांगून त्याला पुन्हा सोडून येण्यास भाग पाडतात. त्याचवेळी इतर शिष्यांनी पकडून आणलेले बोकड, हरीण, ससे, रानडुक्कर वगैरे प्राणी मात्र बळींच्या यादीत समाविष्ट केले जातात. अशा प्रसंगातूनच ’अजापुत्रो बलिं दद्द्यात, देवो दुर्बल घातक:’ ही म्हण प्रचलित झाली आहे.


संबंधित लेखन

२ टिप्पण्या:

  1. समतोल संवेदनशीलता,
    खरं याबाबत लिहायला माझ्याकडे एवढेच शब्द.
    मी त्या सगळया विचारात गुंतले आहे.शिकार,हिंसा याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन या लेखातून जाणवतो आहे.
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा