बुधवार, १२ मे, २०२१

पुन्हा लांडगा...

( वेचित चाललो... वर नुकतेच ’लांडगा आला रेऽ आला’ आणि ’लांडगा’ या अनुक्रमे जगदीश गोडबोले आणि अनंत सामंत अनुवादित पुस्तकांवरचे दोन लेख प्रसिद्ध केले आहेत. ’इजा झाला, बिजा झाला, आता तिजाही पुरा करु’ असं म्हणून बराच काळ बाजूला ठेवलेल्या या लघुपटाबद्दलही लिहून मोकळा झालो.) 

 ’जीवो जीवस्य जीवनम्’ या एकमेव नैसर्गिक नियमानुसार प्राणी आपली भूक भागवण्यासाठी एखाद्या भक्ष्य प्राण्याला वा पुनरुत्पादनासाठी जोडीदार मिळवताना एखाद्या स्पर्धकाला ठार मारत असतात. या पलिकडे अन्य कोणत्याही कारणासाठी ते एकमेकांची हत्या करीत नाहीत. पण तांत्रिक आणि बौद्धिकदृष्ट्या प्रगत झाल्यावर माणूस स्वत:ला प्राणिजगतातील अजेय सम्राट समजू लागला. ट्रम्पकाकांच्या ’अमेरिका फर्स्ट’ या अलिकडील घोषणेचा पूर्वावतार म्हणजे ’ह्यूमन फर्स्ट’ अशी अलिखित घोषणाच त्याने केली.

पण माणसाच्या बौद्धिक विकासदरम्यान त्याच्या डोक्यात जे अनेक बिघाडही उत्पन्न झाले, त्यात ’शौर्य दाखवण्याची खाज’ हा एक अतिशय प्रबळ असा बिघाड निर्माण झाला. या बिघाडाला व्यापक हितासाठी वापरुन अवगुणाचे सद्गुणात रूपांतर करणारे फारच थोडे. उरलेले सारे आपल्याहून दुबळा जीव शोधून त्याच्यावर रुबाब गाजवून आपले तथाकथित शौर्य मिरवतात. पतीने पत्नीवर, कारकुनाने शिपायावर, बापाने मुलावर, दांडगटाने दुबळ्या वर्गमित्र वा मैत्रिणीवर दाखवलेला रुबाब हा ’दुबळ्याचे शौर्य’ प्रवर्गातलाच. कारण पतीला/बापाला बाहेर त्याच्या रोजगाराठिकाणी फटकावले जात असता तो कुत्र्याने मागील पायात शेपूट दडवून शरणागती पत्करावी तसे वागत असतो. कारकुनाला चुकीच्या कारणाने वा आकसाने त्याचा साहेब मेमो देतो, तेव्हा बहुतेक वेळा त्याविरुद्ध ब्र काढत नसतो. शाळेतला ’दादा’ म्हणवून घेणारा, बाहेर वयाने मोठ्या दांडगटासमोर चड्डी ओली करत असतो. त्याचप्रमाणे कुत्रे, हाकारे, मचाण, बंदुका वगैरे बाह्य आयुधांनी सुरक्षित करुन घेऊन माणसे आपले तथाकथित शौर्य जनावराच्या डोक्यावर पाय देऊन काढलेला फोटो किंवा शिकार केलेल्या प्राण्याचे पेंढा भरलेले डोके घरात टांगून ठेवून साजरे करत असतात. एरवी या शूरवीरांपैकी बहुतेक सर्व प्रत्यक्ष जंगलात जाऊन स्वबळावर शिकार करण्याची हिंमत दाखवत नसतात.

बंदुकांसारखे हत्यार मदतीला आल्यामुळे सुरक्षित अंतरावरुन कोणत्याही प्राण्याची शिकार करणे शक्य झाल्याने माणसाने चवबदल म्हणून अनेक प्रकारच्या प्राण्यांची आपल्या भक्ष्यांच्या यादीत भर घातली. यामुळे आणि शिकार हा खेळ झाल्यापासून माणसाने अनेक प्राण्यांना आयुष्यातून उठवले आहे. केवळ भुकेसाठी अन्यजातीय प्राण्याची शिकार करणार्‍या प्राण्यांना पाऽर मागे टाकून, माणसाने केलेल्या अनिर्बंध शिकारीतून अनेक जाती, अस्तंगत झाल्या अथवा होऊ घातल्या आहेत. अमेरिकेत स्थानिक माणसांची भरपूर शिकार करुन वरवर ’हक्काची भूमी’ म्हणत त्यांना अप्रत्यक्षरित्या खुल्या तुरुंगात डांबल्यावर, गोर्‍या अमेरिकनांनी आपला मोर्चा प्राण्यांकडे वळवला. आपला शिकारीचा कंड जिरवण्यासाठी एकेकाळी आपल्याकडील पारव्यांसारखे अक्षरश: प्रचंड संख्येने असलेल्या ’पॅसेंजर पिजन’ या पक्ष्याचा वंशविच्छेद घडवून आणला. भारतातही वीत-दीडवीत लांबीरुंदीच्या संस्थानांच्या ’राजां’च्या शिकार आणि कुत्र्याप्रमाणे गळ्यात पट्टा टाकून पाळण्याच्या हौसेने चित्त्यांचा निर्वंश घडवून आणला. लांडग्याची शेपूट आणून देणार्‍यास या संस्थानिक-राजांनी देऊ केलेले रोख बक्षीस मिळवण्यासाठी शिकार्‍यांनी अनेक जंगलातून लांडगा पार नाहीसा करुन टाकला.

योगायोगाने कालच गोनीदांची ’जैत रे जैत’ वाचत होतो. एका प्रसंगी ठाकरवाडीत उंदरांचा उच्छाद सुरु होतो. मग ढोलिया नाग्याला पुढे घालून उंदरांना घरातून ढोलाच्या दणदणाटाने हुसकावून त्यांची शिकार केली जाते. जोशात आलेल्या तरुणांना एक वृद्ध सबुरीचा सल्ला देतो. ’धाईस उंद्र र्‍हाऊ द्या जिते. पार बेणं काढून टाकू नका.’ हे अनुभवजन्य  शहाणपण आहे.  दुष्काळाच्या परिस्थितीत धान्याचे विखुरलेले कण वेचून वाढणारे हे जीव एकरकमी मूठभर तयार अन्न म्हणून उपलब्ध होतात. अन्नाची जरी नासाडी करत असले, तरी दुसरीकडे तो हक्काचा प्रथिनांचा स्रोत असतो. पण हे शहाणपण बंदुकीच्या जोरावर शौर्य दाखवणार्‍यांकडे क्वचितच दिसते. त्या बंदुकीने दिलेली सुरक्षिततेची भावना शौर्याला बहुतेकवेळा क्रौर्याच्या सीमारेषा ओलांडून जाण्यास उद्युक्त करते.

मांसाहारासाठी माणसाला असलेली मांसाची गरज पशुपालनातून सहजपणे भागवली जाऊ लागल्यावर, शिकार ही आता केवळ हौस म्हणूनच शिल्लक राहिली आहे. पुढे स्वातंत्र्य, समता, बंधुता वगैरे मूल्यांचा बोलबाला सुरु झाला, माणसाच्या जगात नैतिकतेचा प्रभाव वाढला, तेव्हा या रक्तपिपासूंची परिस्थिती थोडी अवघड झाली.

पण माणूस आणि जनावरात एक महत्वाचा फरक आहे. ’तू नाही तुझ्या बापाने उष्टावले असेल माझे पाणी’ म्हणत कोकराची हत्या करणार्‍या लांडग्याची गोष्ट माणसांमध्येच सांगितली जाते. कारण ही खरेतर लांडग्याची नव्हे तर माणसाचीच गोष्ट आहे. नकोशा झालेल्या आपल्याच जातीच्या लोकांना माणूस कम्युनिस्ट, जिहादी, काफीर, राष्ट्रद्रोही, प्रतिक्रांतिवादी, भांडवलशाहीचा हस्तक, पाकिस्तानी, अर्बन नक्षलवादी वगैरे जाहीर करुन त्यांचे निर्दालन करतो नि आपली सत्तेची वाट सुकर करतो. 

त्याच धर्तीवर बिबटे, कोल्हे, लांडगे आदिंना हरणासारख्या भक्ष्य प्राण्यांच्या वेगाने घटत्या संख्येचे कारण, नरभक्षक वगैरे असल्याची भुमका उठवून त्यांना नेस्तनाबूद करण्यासाठी उजळमाथ्याने आपला शिकारीचा षौक पुरा करुन घेतो. प्रत्यक्षात माणसाच्या अनिर्बंध कत्तलीने झपाट्याने रोडावलेल्या कॅरिबूंच्या रोडावल्या संख्येचे खापर लांडग्यांवर फोडून त्या निमित्ताने त्यांचीच लांडगेतोड कॅनडामध्ये केली गेली हे फर्ले मोवॅटने त्याच्या ’नेव्हर क्राय वुल्फ’ मध्ये नोंदवून ठेवले आहे. शिकारीची परवानगी मिळावी, म्हणून सरकारवर या ना त्या प्रकारे खर्‍याखोट्या माहितीचा भडिमार केला जातो. रोगट अथवा वृद्ध झालेल्या पाळीव जनावराची स्वत:च हत्या करुन, त्याचे खापर वाघ, बिबट्या अथवा कोळसुंद्यावर फोडून, सरकारी नुकसानभरपाई पदरात पाडून घेण्याचे प्रकार आपल्या देशात भरपूर होतात. यातून वन्यजीवांबद्दलची माणसांच्या मनातील प्रतिमा अधिकाधिक नृशंस होत जाते.

लांडग्यांबद्दल तर आदिम काळापासून माणसाच्या मनात प्रचंड भीती आहे. वाघ-सिंहांना घाबरत नाही इतका माणूस लांडग्यांना घाबरतो. याची एकाहुन अधिक कारणे आहेत. वाघ-सिंहादि मोठी जनावरे जितकी मोठी शिकार करु शकतात तितकी शिकार संख्याबळाच्या आधारे लांडगेही करु शकतात. वाघ-सिंहांपासून दूर राहणे तुलनेने सोपे आहे, कारण माणसाच्या बाबतीत हे प्राणी तसे भिडस्त आहेत. त्या तुलनेत- कदाचित संख्याबळाच्या आधारे राहात असल्याने, लांडगे त्या तुलनेत निर्भीड आहेत. संख्येने अधिक असल्यानेही वाघ-सिंहापेक्षा धोका होण्याची शक्यता त्यांच्याकडूनच अधिक असतो. बहुतेक शिकारी प्राणी या अंधाराचा फायदा घेऊन शिकार करत असले, तरी लांडग्यांमध्ये आणि इतर शिकारी प्राण्यांत असलेला एक महत्वाचा फरक आहे. शिकारीला सज्ज झालेले लांडगे जो सामूहिक स्वर लावतात त्याने आसपासच्या भक्ष्यांप्रमाणे माणसांच्या मनातही धडकी भरते. माणूस नागरी झाला तरी कुत्र्यांचे रडणे- त्यातही रात्रीचे अधिक- त्याला अजूनही भेसूर, अपशकुनी वाटते त्यामागे नेणिवेत रुजलेली ही आदिम भीतीच असते.

हे कमी म्हणून की काय, अनेक ललित लेखकांनी आपल्या कलाकृतींमधून रक्तपिपासू माणसांना (व्हॅंपायर) लांडग्याच्या रूपात रंगवल्याने त्यांच्याबद्दलची भीती अधिकच गडद होत गेली. त्यामुळे विविध संस्थानातून, राज्यांतून, राष्ट्रांतून लांडग्याची शिकार बक्षीसपात्र ठरत होती. यातून झाले इतकेच की अनेक भूभागातून लांडगे नामशेष होत गेले. आणि त्याचा त्या त्या परिसंस्थेवर काय परिणाम झाला याची फिकीर करण्याची रक्तपिपासू माणसाला कधी गरज वाटली नाही. ज्यांना वाटली, आणि त्यातील धोके ज्यांनी सांगायला सुरुवात केले त्यांना ’अर्बन नक्षलवादी’प्रमाणेच रक्तपिपासूंचे सभ्य समर्थक असे म्हणून खोडून टाकले गेले. लांडग्यांचे नैसर्गिक परिसंस्थेतील स्थान, त्यांच्या नाहीसे होण्याने झालेले नुकसान, याचा शास्त्रशुद्ध अभ्यासच न झाल्याने त्यांच्या निर्दालनाच्या धोरणाविरोधातील आवाज क्षीणच राहिले होते.

पण निसर्गअभ्यासक आणि संरक्षकांनी लांडगा ही प्रजाती देखील आता अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे, हे आकडेवारीनिशी पटवून द्यायला सुरुवात केल्यावर त्यांच्या रक्षणाचे प्रयत्न सुरु झाले. अमेरिकेतील पहिले अभयारण्य असलेल्या ’यलोस्टोन नॅशनल पार्क’मधून अस्तंगत झालेल्या लांडग्यांच्या प्रजातीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी तिथे चौदा लांडगे बाहेरुन आणून सोडले गेले. असला अगोचरपणाचा प्रयोग करणारे मूर्खच असणार असे सामान्यांचे मत होते हे उघड आहे. पण या एका बदलाने त्या अभयारण्याचा झालेला कायापालट खुद्द जीवशास्त्रज्ञांनाही अनपेक्षित होता. लांडग्यांसारख्या शिकारी प्राण्याच्या आगमनामुळे झडून चाललेली तेथील परिसंस्था (Ecosystem) कशी वेगाने पुनर्जात झाली यावर अनेक अभ्यासकांनी लिहिले आहे. त्याबद्दल एकाहुन अनेक लघुपट तयार केले आहेत.
 


भारतात ’वन्यजीव संरक्षण कायदा’ झाला नि अभयारण्यांमध्ये ’प्रोजेक्ट टायगर’ची उभारणी झाली. ’वाघासारखा रक्तपिपासू प्राणी का वाचवायचा?’ असा प्रश्न सामान्यांना पडला होता. तेव्हा 'वाघ वाचवणे याचा अर्थ अन्न-साखळीत सर्वात वर असलेल्या या वाघोबाला वाचवायचे तर खालची सारी उतरंडच वाचवावी लागते. यामुळे एक परिपूर्ण जीवसृष्टी त्या अभयाण्यांमध्ये जपता येईल' याबाबत जनजागृती करण्यात आली होती. आजवर वन्यजीवशास्त्रज्ञांनी ही केवळ तर्कसंगती मांडून दाखवली होती. यलोस्टोनमध्ये सोडलेले लांडगे आणि तेथील परिसंस्थेचा झपाट्याने झालेला विकास यात हा परस्परसंबंध प्रत्यक्षात अनुभवता आला.  

या प्रयोगाच्या यशानंतर अन्यत्रही तो राबवण्यात आला. अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील आइल-रोयाल या बेटावरील प्राणिजीवनात लांडग्यांचा पुन्हा समावेश करण्याच्या प्रक्रियेवरील हा एक लघुपट.केवळ वाघ अथवा लांडगा यांच्यामुळे एक नैसर्गिक परिसंस्था उभी असते वा त्यांच्या अस्तंगत होण्याचे तिचा तोल बिघडून तेथील जीव-जिवाराचे आयुष्यही धोक्यात येते असे नाही. बीव्हर, व्हेल आणि वॉर्नर ब्रदर्सच्या लूनी-टून्स या प्रसिद्ध कार्टून मालिकेने प्रसिद्ध केलेल्या 'टास्मानियन डेव्हिल' या प्राण्यामुळेही जैविक परिसंस्था कशा उभारी घेतात यावरील व्हिडिओही उपलब्ध आहेत.विज्ञानाच्या अभ्यासात शक्यतांचा विचार करावा लागतो तसाच आक्षेपांचाही. राजकारणात घडते त्याप्रमाणे आक्षेप घेणार्‍यावर हेत्वारोप करुन त्याला धुडकावून लावता येत नसते. त्यामुळे लांडगे अस्तंगत झाल्यामुळे यलोस्टोनच्या जीवसृष्टीवर झालेला प्रतिकूल परिणाम त्यांना पुन्हा त्या अधिवासात सोडल्याने दूर झाला असला, तरी उद्या त्यातून त्यांची संख्या अमाप वाढली तर होणार्‍या प्रतिकूल परिणामांची शक्यताही विचारात घ्यावी लागणारच आहे. याशिवाय या गोळाबेरीज प्रगतीसोबतच काही विशिष्ट जीवांवर लांडग्यांचे आगमन प्रमाणाबाहेर धोकादायक परिणाम घडवणारे नाही यावरही लक्ष ठेवावे लागते. कारण लांडगे जसे जीवसृष्टीचा भाग आहेत तसेच इतर प्राणीही. कितीही क्षुद्र असला तरी त्याचे जीवसृष्टीतील साखळीमध्ये काही एक स्थान असते. आणि एखाद्या जीवाचा निर्वंश केल्याने ती साखळी कशी तुटत जाईल याचे पूर्वानुमान नेहमीच लावता येते असे नाही. 

पण एकुणात जीवसृष्टी शिकारी-भक्ष्य संख्येचा तोल नैसर्गिकरित्या साधते यावर शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. विपुल भक्ष्यामुळे लांडग्यांची संख्या वाढली, की भक्ष्य प्राण्यांची संख्या रोडावते, नि पुन्हा अन्नाचा तुटवडा होऊन लांडग्यांच्या संख्येवर नियंत्रण येते. नेव्हर क्राय वुल्फ या पुस्तकात सुकाळाच्या काळात लांडग्यांची वीण अधिक पिलांची असते, तर अन्नाच्या तुटवड्याच्या काळात त्यात कमी पिले जन्माला येतात, असे निरीक्षण फर्ले मोवॅटने नोंदवलेले आहे. आपल्याहून दुबळ्यांची निरर्थक वा स्वार्थप्रेरित हत्या करण्यारा माणूस बंदुकीच्या जोरावर तिथले शिकारी-भक्ष्य गुणोत्तर बिघडवत नाही, किंवा एखादी सर्वव्यापी मोठी नैसर्गिक आपत्ती येत नाही, तोवर यलोस्टोनमधील लांडगे आणि इतर जीवसृष्टी अशीच बहरत राहील अशी आशा करायला हरकत नाही.

- oOo -

आणखी काही संबंधित व्हिडिओ: 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा