रविवार, २३ मे, २०२१

तडा

जैत रे जैत
जैत रे जैत

उन्हाळा सुरू झाला.

डोंगरावरला महादेव पुन्हा म्हातारा झाला. त्याच्या अंगावरलं लांबलांब गवत सगळं वाळून गेलं. भरारा वारा सुटे. त्याच्या लाटांबरोबर ते ठिकच्या ठिकाणी आपटू लागलं. महादेवाच्या डुईवरल्या झाडाची पानं गळून पडली. नाग्या उसासून म्हणाला,

'अरं माज्या देवा ! कशी रं तुजी दशा !'

नागलीवरीच्या कणग्या पार मोकळ्या झाल्या. आढ्याच्या लगीला टांगून ठेवलेल्या, क्वचित कुठं दिसणाऱ्या मकईच्या माळाही दिसेनाश्या झाल्या. भात कधीच गुप्त झालं होतं. जेमतेम बी बियाणाची डालगी शेणानं लिंपून ठेवलेली शिल्लक राहिली. कुठं कुणाकडं तर तीही फुटली. जगू वाचू तर वाढीदिढीनं आणून पेरू. पोटाला अन्न तर पाहिजे !

ठाकर जवानांच्या छातीच्या फासळ्या दिसायला लागल्या. गालफडं बसली. मोसमात तीनतीनदा भाताची भुगणी सफै केलेल्या ठाकरांच्या मुखी एका वेळी पेज लागणंही कठीण झालं. मग त्यांनी फासे अन् वाघुरा बाहेर काढल्या. शेतातली कामं जेमतेम उरकली, की ठाकरगडी पाखरांच्या अन सशांच्या मागे धावू लागले. त्यांनी मारलेले फेकलेले धोंडे जाळ्याजाळ्यांतून अडकू लागले. जाळ्यात बसलेले ससे बावरे होऊन पळू लागले. आरडाओरड्यानं रानं गर्जून गेली.

थोरल्या भगताचं ठीक चाललं होतं. उन्हाळा लागला असला, तरी भुताखेतांची काही काशीयात्रेसाठी प्रस्थान ठेवलं नव्हतं. ती झाडांना धरीत होती. झाडं घुमत होती. भगताच्या हातच्या छड्या खात होती. कोंबड्या अंड्यांची निवदबोणी देत होती. भुतं तेवढ्यावर संतुष्ट होऊन झाडं सोडून मुक्कामावर जात होती. भगताच्या घरी सुपं भरभरून कोंडाकणी पोचत होती. नाग्या पेज पीत होता. रात्रंदिवस ढोल घेऊन बसत होता. कधी नानापरीचे चमत्कारिक परण काढीत होता. कधी ढोलाच्या खोडावर डोकं टेकून रितेपणात बुडून जात होता.

तो सशाघोरपडींच्या शिकारीला जात नव्हता. पाखरांमागे धावत नव्हता. मासळीसाठी ओढाखोड्यातली डबकी उपशीत नव्हता. असा तो बामणावाणी पुन्येवंत व्हायला धडपडत होता, तरी ठाकरांच्या गळ्यातला तन्मणी होता. त्याला हजार अपराध माफ होते. त्याच्या ढोल वाजवण्यावरून अवघा राहाळ ओवाळून जात होता.

भुत्या अन् चौघेजण तीन ससे अन् दोनतीन पाखरं मारून परतले. भुत्या एकदम थांबून म्हणाला,

"काय रं? लई दिसात नाच झाला नही !"
"गडी शिकारीमागं पांगलेले !"
"नाग्याचा ढोल आइकला का सगळे जमा होत्याल."
"आज हूंद्या !"
"हूंद्या आज !"

परतता परतता भुत्यानं नाग्याला निरोप दिला. नाग्या थरारला. सांज होताच तो ढोल घेऊन भुत्याच्या अंगणात जाऊन बसला. अंगणाच्या मधुमध बसून त्यान ढोलावर कांडकं टाकलं, तशी ठाकरवाडी सजग झाली.

आज नाग्यानं निराळंच वाजवणं काढलं होतं.

उन्हाळी वाहुटळी रहाळभर हिंडू लागल्या, अन् त्यांनी नाग्याला झपाटलं. वाहुटळी गरगरत निघून जात. रितेपण मागं ठेवून. एक पोकळी. एक उदासी. ती उदासी बाणासारखी नाग्याच्या हिरद्यात शिरे. त्याला वाटे. काही करू नये. हात वर उचलावेत. मोकळं व्हावं. वाहुटळीमागं धावत सुटावं. धाडकन जाऊन लिंगोबाच्या डोंगरावर आदळावं. देवाला विचारावं, असं का? हे भकासपण का? ही चहूबाजूंनी दाटलेली, भाजू घातलेल्या शेतातल्या धुराची काळोखी का? ही वाहुटळीतली पानं गरगरत वर का चढतात? पुन्हा पंख तुटल्या पाखरांसारखी खाली का गळतात ? वेळूच्या बेटातून भिरभिरणारा वारा काय बोलतो ? पानझड झालेल्या सागाच्या धुडांशी तो का झुंजतो ? ठिपक्या एवढ्या दिसणाऱ्या घारी या दिवसात काय निरखतात ? गगन दिवसा उंच का जातं ? रातचं खाली का येतं ?

अशा मनीच्या वाहुटळीनं तो अगदी गांगरून गेला होता. नाचाचं आवतण मिळताच त्याची जाडी बोटं फुरफुरू लागली. भुत्याच्या अंगणात त्यानं ढोलावर कांडकं टाकलं अन् काही चमत्कारिक वाजवलं.

कांडक्यानं धुमपुडावर संथ लयीत एकेक दमदार ठोका. उजव्या हातानं घुमित्कार. ढोल गंभीरवाणा बोलू लागला. डाव्या हाताचे ठोके तसेच सुरू. उजवीकडलं पूड शोकगीतं गाऊ लागलं. कळ थेट मनाला भिडू लागली. अस्वस्थ ठाकर गोळा झाले. त्यांनी घुंगरांच्या माळांच्या ढिगातली एकेक माळ उचलली. पायाभवती गुंडाळली, अन् मुकाट्यानं डाव्या ठोक्याबरोबर पाऊल टाकीत ढोलाभवती फिरू लागले. दोन्ही हात सैल सोडून.

काय नाचावं ते उमगेना. तोंडातून शब्द फुटेना. एरवी ठाकरगीत अन् ढोल असं दोघांचं राज्य चाले. आज एकटाच ढोल उदासवाणा घुमू लागला. गाणं सुचेना झालं. भुत्या अगदी गोंधळून गेला. काठीच्या आधारानं उभा असलेला सुंभा कातावून म्हणाला,

"तसं गप गप रं का?"

पावलं टाकणं न थांबवता भुत्या म्हणाला,
"सुसत न्हाई गानं!"
"गा की कुंचंबी !"
ढोलाकडे हात करून भुत्यानं म्हटलं,
" हा वाजविना ! थांबूबी द्येत नहीं- गाऊंबी देत नहीं-"

नाचियांनी धरलेल्या रांगेतून आत शिरून संभा नाग्याजवळ बसत म्हणाला,
"ए नया भगत ! का रे तसलं ते वाजविनं ?

नाग्यानं डोळे उघडून एकदा केवळ सुंभाकडे बघितलं, अन्‌ पुन्हा ते मिटून घेतले.

वाजवण्यातली आर्त वाढली. जणू वाजवणारा सगळ्या सृष्टीशी एकाकार झालाय़्‌. उन्हाळ्यामुळं तिचं हृदय फुटतंय. उकलतंय. दोन शकलं होताहेत. तो आर्त भाव याच्या उरी उमटला आहे. उजव्या हातावाटे तो पुडावर वाजतो आहे. बारीक, सुक्षम होऊन. नाचियांची मनं कलबलताहेत. खच्चून आरडावंस वाटत पण शब्द काही फुटत नाही. चेतना केवळ पायात उरली आहे. ते गतिमंत झाले आहेत. डाव्या पुडाच्या ठोक्याबरोबर भुईवर पडताहेत. पुन्हा आपोआप उचलले जाताहेत. ठोका वाजताक्षणी भुईखाली उतरताहेत.

सगळे ठाकर गप्प. नाचियेही, बघियेही. निवळ ढोलाचा वा घुंगरांचा. अशी जादू होऊन गेली. जणू कुणी मंतर घातला आहे.

रात्रीचं पाऊल पुढं पडत चाललं. नाच मात्र होता तिथंच थबकला. स्वतःभोवती फिरणाऱ्या भोवऱ्यासारखा. काही गावं, हा भावही मनीच्या मनी मुरला. जणू दारू खाल्ल्यासारखे झुलत ठाकर नाचिये नुसते गोल गोल फिरत राहिले-

ती आरोळी फुटली-
“ धावा रे ! भगताला सरपानं खाल्ला !"

थोरला भगत औशीद द्यायला शेजारच्या पाड्यावर गेला होता. तिथून परतताना अंधारात त्याचा नागावर पाय पडला. नागानं करायचं ते केलं. फणा उंच करून पिंडरीला दोन ठिकाणी कडाडून डसला. भगतानं बोंब ठोकली. ढोलाचं वाजवणं ऐकून वाडीकडे निघालेल्या चारदोन ठाकरांनी ती ऐकली. त्यांनी भगताला खांद्यावर उचललं. धावत वाडीकडे निघाले. नाग्याजवळ पोचले, तंवर भगत काळानिळा पडला होता.

नाग्याचं वाजवणं हादरलं. त्यानं डोळे उघडले. क्षणभर त्याला अर्थबोध झालाच नाही. पण कुणी मारलेली हाक त्यानं ऐकली-
" नांग्या ! तुजा बा !"

तसा तो उठून एकदम उडालाच. ठाकरांनी घेरलेल्या बावर कोसळला. थोरल्या भगताला झंडू फुटला होता. अंग थरथरत होते. दातांच्या फटीतून रक्त वाहात होतं. कुणी धरून नाग्याला मागं ओढलं. म्हणालं,
"आरं, त्याला नांगानं खाल्ला रे !"

नाही नाही ! नाग्या पुण्यवंत होतोय. तो पडवळ खात नाही. उंदीर खात नाही. मोराला तोंड लावीत नाही. खोटं बोलत नाही. कुण्या बाईबापडीकडे ढुंकूनही पाहात नाही. कडक साधना चालली आहे त्याची. त्याच्या बाला नाग चावणार नाही. तो चावू शकत नाही.

पिसाटासारखा नाग्या उठला. उधळत तो दरड उतरून निघाला. खाली लवणात हिरडीखाली नागदेवाचा धोंडा होता. त्याच्यासमोर जाऊन बसला. धोंड्यावर डोस्कं आदळू लागला. आक्रंदू लागला,

"अरे नांगदेवा, कंदी तुज्यासंबूरून नमिस्कार केल्याबिना गेला नहीं ! तुजी सम्दी पालना केली. माज्या बानंबी ! मींबी ! तू बाला डसू नको !"

नाग्यानं त्या धोंड्याला गच्च मिठी मारली. धोंडाछाती एक केली. अगदी श्वास कोंडू आला, तरी धोंडा सोडला नाही. जणू तो त्या धोंड्याशी एक होणार. दगड छातीत रुतवून घेणार-

तोवर रडू फुटलं. सगळा कालवा झाला. ठाकरांनी धावू धावू झाडपाल्याचं औषध आणलं. भगताला चाटवलं. पण तो काहीही उपाय करण्यापलीकडे पोचला होता. त्यानं एकदा चहूदिशांना नाग्याला शोधलं, अन् आयशीच्या मांडीत मान कलथी केली. तिनं हंबरडा फोडला.

तो हंबरडा नाग्याची छाती चरचरा चिरीत गेला. त्याच्या विश्वासाला एक बारीकसा तडा गेला. धोंड्यापासून दूर सरून तो आक्रंदला,

"नागद्येवा रे ! त्वा माजा बा खाल्ला चण्डाळा !"

- oOo -

पुस्तक: ’जैत रे जैत’
लेखक: गो. नी. दाण्डेकर
प्रकाशक: कॉन्टिनेन्टल प्रकाशन
आवृत्ती पहिली (१९६५) पाचवे पुनर्मुद्रण (२०११)
पृ. ५९-६३.

.

हे वाचले का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा