शुक्रवार, ७ मे, २०२१

वेचताना... : लांडगा आला रेऽ आला

(हा सुईदोर्‍याचा खेळ मोठा मजेशीर असतो. लहानपणी हा खेळ खेळताना एकाचा पाठलाग करत असताना दुसरा दोघांच्या मधून गेला की पहिल्याचा नाद सोडून त्याचा पाठलाग सुरु करावा लागे. ‘वेचित चाललो...’ वर अलिकडे असेच होऊ लागले आहे. ‘थँक यू, मि. ग्लाड’चा पाठलाग करत असताना ‘एक झुंज वार्‍याशी’ मध्ये घुसले नि आधी नंबर लावून गेले. आता अनंत सामंतांच्या ‘लांडगा’वर लिहिता लिहिता हा गोडबोलेंचा लांडगा मध्ये घुसला. तो लांडगाही येतोच आहे मागून.)

लांडगा आला रेऽ आला

संशोधनाचे काम रुक्ष असते, संशोधक म्हणजे अस्ताव्यस्त दाढी वाढलेला, केस न विंचरलेला, जाड चष्मा लावून आपल्याच जगात हरवलेला असा प्राणी असतो, असा सार्वत्रिक समज आहे. त्यात वैज्ञानिक म्हटले की, आपल्या मनात रसायनशास्त्रज्ञच येतो. आणि तो कायम चित्रविचित्र आकाराच्या काचेच्या भांड्यातून ठेवलेल्या रंगीबेरंगी रसायनांसोबत, ‘कशात तरी काहीतरी घालावे, काहीतरी होईल’ अशा प्रवृत्तीचा मनुष्य असतो, हा समज चित्रपटांनी आपल्या मनात रुजवलेला असतो. या एका विज्ञानशाखेखेरीज इतर विज्ञानशाखा असतात, हे आपल्या गावीही नसते. फारतर भौतिकशास्त्र (की पदार्थविज्ञान?) आणि जीवशास्त्र हे दोन शालेय विषय तेवढे अंधुकसे आठवत असतात.

जीवशास्त्र म्हणजे वर्गीकरण, पृथक्करण, आकृत्या नि प्रयोगशाळेतील निरीक्षणे इतकाच आपला समज असतो. अप्रायोगिक निरीक्षणांचाही जीवशास्त्राच्या विकासात मोठा वाटा असतो, याचा शालेय विद्यार्थ्यांना सोडा, त्यांच्या शिक्षकांनाही पत्ता नसतो.

डार्विनच्या उत्क्रांतिवादाबद्दल आपण थोडेफार ऐकलेले असते. (‘तो खोटा आहे’, ‘देव/धर्मद्रोही आहे’ किंवा ‘आमचे दशावतार हीच उत्क्रांती’ वगैरे व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठातले शिक्षणही आपण घेतलेले असते. ) पण त्याबद्दल साधकबाधक विचार करायचा तर पुस्तकी अभ्यासाला किमान अनुभवाची तरी जोड द्यायला हवी, हे आपल्या गावीही नसते. हजारो वर्षांपूर्वीच्या समजांना आजही ब्रह्मवाक्य समजून त्यानुसार वर्तन करणार्‍या बहुसंख्येच्या समाजात अनुभवसिद्धतेला फारसे महत्व नसते.

डार्विनचा उत्क्रांतिवाद शिकताना, त्याच्या ‘ओरिजिन ऑफ स्पीसीज...’ या पुस्तकाचा ओझरता उल्लेख आपण ऐकलेला असतो. त्याच्या ‘व्हॉयेज ऑफ द बीगल’चे नाव मात्र काही लाखांत एखाद्यालाच ठाऊक असेल. आपल्या उत्क्रांतिवादाची मांडणी ज्या निरीक्षणांच्या आधारे डार्विनने केली, ती सारी निरीक्षणे, ते अनुभव ज्या बीगल जहाजाच्या सफरीदरम्यान त्याने घेतले, त्याचा दस्तऐवज म्हणून त्या पुस्तकाचे महत्व अनन्यसाधारण आहे.

डार्विनप्रमाणेच जीवशास्त्रातील निरीक्षण-अभ्यासाला वाहून घेतलेल्या अनेकांनी आपले अनुभव ग्रथित केले आहेत. यात ठळकपणे नाव घ्यावे लागते ते जेन गुडाल, डायान फॉसी आणि बिरुटे गल्डिकास या तीन स्त्रियांचे. प्रायमेट्स अथवा वानरकुलातील अनुक्रमे चिंपांझी, गोरिला आणि ओरांग-उटान या तीन जमातींच्या अभ्यासाला वाहून घेतलेल्या या तिघींचे जीवन हे निरीक्षण-शास्त्रज्ञांच्या दृष्टीने मार्गदर्शक आहे.

पैकी चिंपांझी हे वानर जैविकदृष्ट्या मनुष्यप्राण्याला अधिक जवळचे असल्याने, आणि तिच्या निरीक्षणांतून त्या जमातीबरोबरच मानवी जीवनाबद्दललच्या जैविक अभ्यासाला आधार मिळाला म्हणून, जेन गुडालला तुलनेने बरीच प्रसिद्धी मिळाली. डायान फॉसीवर एक चित्रपट (माहितीपट नव्हे) निर्माण झालेला आहे. गोरिलाच्या शिकार्‍यांनी केलेल्या हत्येमुळे तिच्या आयुष्याला थोडे नाट्यमय शैलीत सादर करणे शक्य झाले असावे. बिरुटे मात्र तुलनेने (ती ब्रिटिश वा अमेरिकन नसल्याने आणि तिचे कार्यक्षेत्रही आशिया असल्याने?) दुर्लक्षित राहिली आहे. या नि अशा अनेक व्यक्तींच्या अथक परिश्रमामुळे आणि चिकाटीमुळे वर्तनविज्ञान (ethology) नावाची जीवशास्त्राची एक स्वतंत्र शाखाच उदयाला आली आहे.

दुर्दैवाने मराठीमध्ये सुनीताबाई देशपांडे यांनी या तिघींवर लिहिलेला लेख वगळता, यांच्यावर फारसे लिहिले गेलेले नाही. यांच्यापैकी कुणाचे लेखन अनुवादितही झालेले नाही. त्या तुलनेत लांडग्यांच्या अभ्यासासाठी गेलेल्या फर्ले मोवॅट सुदैवी म्हणावा लागेल.

फर्लेच्या लांडग्यांच्या अभ्यासाचे निमित्तकारण हे रोचक म्हणावे लागेल. कॅनडात शासकीय रोजगार करत असलेल्या या जीवशास्त्रज्ञाला ध्रुवीय लांडग्यांच्या अभ्यासासाठी पाठवले गेले, तेच मुळी त्या लांडग्यांनी केलेल्या कॅरिबूंच्या (ध्रुवीय हरणांच्या) लांडगेतोडीबद्दल प्रचंड गहजब झाला म्हणून. एका अर्थी हा सरकारी कारभार होता. पण फर्लेची प्रवृत्तीच खर्डेघाशी करण्याची नव्हती. त्याने आपल्या निरीक्षण-प्रवासाकडे निव्वळ नोंदींसाठी केलेला प्रवास म्हणून न पाहता, लांडग्यांच्या जगण्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले. त्यातून नागरी समाजातील समजांना छेद देणारी अनेक निरीक्षणे त्याने नोंदवली.

लांडग्यांपेक्षा कैकपट हत्या- त्याही अनेकदा शिकारीच्या षौकासाठी, करणार्‍या माणसांनाच कॅरिबूंच्या वेगाने घटत्या संख्येसाठी जबाबदार धरले गेले पाहिजे असा निष्कर्ष त्याच्या निरीक्षणातून निघत होता. अपेक्षेप्रमाणे नागरी समाजाच्या हिताच्या नि समजांच्या आड येणारे त्याचे निष्कर्ष काहींनी दुर्लक्षिले, तर काहींनी त्यांना ‘फेक न्यूज’ म्हटले.

तरीही त्याचे काही महत्वाचे निष्कर्ष पुढे रुजले. उदाहरणार्थ कॅरिबूंच्या उत्तरायणाच्या काळात, शिकार उपलब्ध नसताना, हे लांडगे जगतात कसे याचे त्याने शोधून काढलेले उत्तर धक्कादायक होते. या काळात लांडगे उंदरांवर ताव मारतात. यांना केवळ गुजराण करणे म्हणता येत नाही. कारण त्या काळात ते पूर्णपणे सुदृढ असतात. म्हणजे त्यांचे पोषण व्यवस्थित होत असले पाहिजे असा त्याने निष्कर्ष काढला. इतकेच नव्हे तर स्वत: काही काळ असा व्यतीत करुन त्याची खात्रीही करुन घेतली.

पुढे या ध्रुवीय लांडग्यांचे, कोल्ह्यांचे जमिनीखालील उंदीर तसंच बर्फाच्या थराखालील ससे वा तत्सम जिवांची शिकार करण्याचे व्हिडिओच तयार झाले. ज्यांनी फर्लेने नोंदवलेल्या उंदीर-शिकारीच्या पद्धतीवर शिक्कामोर्तब केले.

पुस्तकी शिक्षणातून तयार झालेल्या तज्ञांनी फर्लेचा अधिक्षेप केला. त्याचे एक कारण म्हणजे त्याच्या नोंदी कदाचित शास्त्रीय चौकटीत बसणार्‍या नाहीत. ती शिस्त त्याने पाळलेली नाही. त्याची मोहिम शासकीय असल्याने, एकुणातच शासकीय मोहिमांबद्दलच्या विश्वासार्हतेबद्दल जगभर असलेला अविश्वासही त्याचे दुसरे कारण असू शकेल. तिसरे, आणि महत्वाचे कारण म्हणजे, फर्लेने आपले सारे लेखन हे ललित शैलीमध्ये केले आहे. रुक्ष शास्त्रीय मांडणीला झुगारून केलेले हे लेखन सामान्यांपर्यंत पोचल्यामुळे, लांडग्यासारख्या भीती असलेल्या प्राण्याबद्दल बरीच जागृती झाली असली, तरी शास्त्रीय बैठक नसल्याने त्याला वर्तनवैज्ञानिकांनी सुरुवातीला फार महत्व दिले नाही.

आणखी एक महत्वाची बाब अधोरेखित करायची म्हणजे फर्लेची विनोदबुद्धी. ज्याचे नावच ‘बॅरन लॅंड’ आहे अशा भकास प्रदेशात लांडग्यांच्या मागे एखाद्या भुतासारखे भटकताना, मानसिक संतुलन राखणे हीच जिथे मोठी कसरत आहे. त्याहीपुढे जाऊन विनोदबुद्धी शाबूत राखणे ही तर थोर गोष्ट आहे. त्याच्या लेखनातील या विनोदबुद्धीमुळेच त्याचे ‘नेव्हर क्राय वुल्फ’ वाचता वाचता आपण गुंगून जातो.

पुस्तक वाचून संपल्यावरच कदाचित आपल्या ध्यानात येते की, आपल्या नर्मविनोदी शैलीच्या आधारे फर्लेने लांडग्यांसंबंधी अनेक निरीक्षणे आपल्या गळी उतरवली आहेत. एरवी एखाद्या वैज्ञानिक निबंधातून ती वाचताना आपण कंटाळून गेलो असतो, ती सहजपणे आपण आत्मसात केली आहेत.

प्रत्यक्षातही लांडग्यांच्या एका कळपाजवळ राहात असताना त्याने थोडासा वात्रटपणा केला आहे. मूत्रपिचकारीने आपली हद्द आखणार्‍या लांडग्याला डिवचण्यासाठी त्यानेही तोच प्रयोग करुन पाहिला. पण ‘कमीत कमी श्रमात’ आपला प्रदेश पुन्हा मिळवून लांडगा-नायकाने त्याचे नाक कसे कापले, याचे वर्णन मजेशीर आहे. या ‘नेव्हर क्राय वुल्फ’चा ‘लांडगा आला रेऽ आला’ नावाने केलेला अनुवाद जगदीश गोडबोलेंनी त्या नर्मविनोदासहित यथातथ्य उतरवला आहे.

लांडग्यांच्या कुटुंबांचा एकच प्रकार नसतो असे फर्लेला त्याच्या निरीक्षणातून आढळून आले. कुठे केवळ एकटी जोडी, कुठे एकाहुन अधिक जोड्या, वृद्ध लांडगे आणि पिले असे मोठे बारदान, अशी अनेक प्रकारची लांडगा-कुटुंबे असतात असे त्याला दिसून आले. त्याने दीर्घकाळ निरीक्षण केलेल्या त्याच्या लांडगा-कुटुंबात जॉर्ज आणि अ‍ॅंजेलिन हे जोडपं, त्यांची चार पिल्ले आणि अल्बर्ट नावाचा एकटा लांडगा असे सात सदस्य होते.

यातील अल्बर्टला मादी जोडीदार नाही. मधमाश्यांमध्ये वा मुंग्यांमध्ये ज्याप्रमाणे राणीच्या पिलांचे संगोपन हेच जीवनकार्य असलेल्या कामकरी माश्या वा मुंग्या असतात, तद्वत हा अल्बर्टचाचा कुटुंबातला पोशिंदा आहे आणि पिलांची काळजी घेणाराही. अखेर एकदाचे जोडीदार मिळवण्याचे तो मनावर घेतो म्हणा, पण त्यासाठी फर्लेलाच थोडे प्रयत्न करावे लागतात. हा धमाल किस्सा ’वृकमंगल सावधाऽन’ इथे वाचता येईल. (Culture-vultures ऊर्फ संस्कृतीरक्षकांनो कृपया दूर राहा.)

१९८३ मध्ये या पुस्तकावर त्याच नावाचा एक चित्रपटही तयार करण्यात आला. पण त्यात फर्लेची भूमिका करणार्‍या चार्ल्स मार्टिन स्मिथला त्याचा नर्मविनोदी स्वभाव अजिबातच पकडता आलेला नाही.

- oOo -


संबंधित लेखन

२ टिप्पण्या: