सोमवार, २४ मे, २०२१

स्त्री-सबलतेचा जाहिरनामा

  • गोनीदांच्या ’जैत रे जैत’ मधील वेचा शेअर करताना चिंधीबद्दल म्हटलं होतं की भारतीय साहित्यात अशी कणखर नि स्वयंपूर्ण स्त्री व्यक्तिरेखा क्वचितच आढळते. जगभरातील बहुतेक नागर संस्कृतींनी आणि त्यांना वेटाळून राहिलेल्या संघटित धर्मांनी स्त्रीला दुय्यम स्थान देऊन तिला जखडून टाकले आहे. अनागर संस्कृतीचा वारसा सांगणारी चिंधी आणि जिला कोणत्या एका संस्कृतीचा वारसाच नाही अशी शरत्‌चंद्रांच्या ’शेषप्रश्न’मधील कमल, या दोघी या परिघाबाहेर असल्यामुळेच तथाकथित नागर संस्कृतीच्या जाचातून सुटू शकल्या असाव्यात.

    डिस्ने स्टुडिओजच्या प्रिन्सेसची- नायिकांची मांदियाळी पाहिली, तर त्यातही कॉकेशन अथवा गोर्‍या वंशाच्या स्नो-व्हाईट, सिंडरेला, अथवा स्लीपिंग ब्यूटी सारख्या नाजूक-साजुक बाहुल्या वा पुरुषांकरवी होणार्‍या उद्धाराची वाट पाहणार्‍या, परंपरेने स्त्रीला दिलेले परावलंबी स्थानच अधोरेखित करणार्‍या असतात.

    तथाकथित संस्कृतींनी आखून दिलेल्या रेषेला ओलांडून पुरुषी एकाधिकारशाही असलेल्या क्षेत्रात पाऊल टाकणार्‍या त्यांच्या नायिका मात्र अन्य वंशाच्या आहेत. चिनी वंशाची मूलान अवघड प्रसंगी शस्त्र परजून रणमैदानात उडी घेते. समोअन-पॉलिनेशिअन वंशाची मो’आना समुद्राचे उधाण बेगुमानपणे अंगावर घेत हरवलेल्या जीवनदृष्टीला अंधश्रद्धेच्या जाचातून मोकळी करते. पोकहोन्ताससारखी नेटिव अमेरिकन एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्यास आसुसलेल्या दोन जमातींमध्ये समेट घडवणारी शांतिदूत ठरते आणि अरेबियन वंशाची जॅस्मिन युवराज्ञी असून रस्त्यावरच्या फाटक्या पोराला जोडीदार म्हणून निवडण्याइतके स्वातंत्र्य घेते आहे.

    जॅस्मिन-अलादिनच्या कथेवर डिस्ने स्टुडिओने यापूर्वी चलच्चित्र- म्हणजे अ‍ॅनिमेशन स्वरूपात ’अलादिन’(१९९२), ’रिटर्न ऑफ जफ़र’ (१९९४), ’अलादिन अ‍ॅंड द किंग ऑफ थीव्ज’(१९९६) हे चित्रपट आणि अलादिन (१९४-९५) ही मालिका सादर केली आहे. दोन वर्षांपूर्वी (२०१९) त्यांनी विल स्मिथ या प्रसिद्ध अभिनेत्याला सोबत घेऊन त्याच कथेवर ’अलादिन’ हा चित्रपट तयार केला होता. चित्रपट जरी मागच्या चलच्चित्रपटांपेक्षा (माझ्या मते) बराच डावा उतरला असला तरी त्यातील जॅस्मिनचे हे गाणे मात्र चांगलेच लक्षात राहिले.

    [Verse 1]
    Here comes a wave meant to wash me away
    A tide that is taking me under
    Swallowing sand, left with nothing to say
    My voice drowned out in the thunder
    
    [Pre-Chorus]
    But I can't cry
    And I can't start to crumble
    Whenever they try
    To shut me or cut me down
    
    [Chorus]
    I can't stay silenced
    Though They  want keep me quiet
    And I tremble when you try it
    All I know is I won't go speechless
    
    [Verse 2]
    Written in stone
    Every rule, every word
    Centuries old and unbending
    "Stay in your place
    Better seen and not heard"
    Well, now that story is ending
    
    [Pre-Chorus]
    'Cause I
    I cannot start to crumble
    So come on and try
    Try to shut me, cut me down
    
    [Chorus]
    I won't be silenced
    You can't keep me quiet
    Won't tremble when you try it
    All I know is I won't go speechless, speechless
    
    Let the storm in
    I cannot be broken
    No, I won't live unspoken
    'Cause I know that I won't go speechless
    
    [Bridge]
    Try to lock me in this cage
    I won't just lay me down and die
    I will take these broken wings
    And watch me burn across the sky
    Hear the echo saying:
    
    [Chorus]
    I won't be silenced
    Though you wanna see me tremble when you try it
    All I know is I won't go speechless, speechless
    
    'Cause I'll breathe
    When they try to suffocate me
    Don't you underestimate me
    'Cause I know that I won't go speechless
    
    [Outro]
    All I know is I won't go speechless, speechless 
    	

    पूर्वी Family Reunion नावाची एक विनोदी मालिका पाहात होतो. त्यातील नको तिथे बोलणार्‍या आपल्या नातवाला दम देताना आजी म्हणते, 'In my days, children were seen but not heard. And those which are heard are not seen.' त्या गर्भित धमकीवरची त्या नातवाची प्रतिक्रिया पाहून त्यावर खळखळून हसलो होतो. पण इथे संदर्भ बदलताच तेच वाक्य... "Better seen and not heard" किती भेदक भासते. अनेक शतकांच्या नि अनेक समाज/संस्कृतींमधील स्त्रियांचे स्थान त्या एका वाक्यातून व्यक्त होते आहे.

    हे गाणे म्हणजे सर्वच समाजात शोषित असलेल्या स्त्रीच्या सबलतेचा जाहीरनामाच आहे. चिंधी आणि कमलच्या पावलावर पाऊल टाकत यातील जॅस्मिन पुरुषप्रधान समाजाला ’मी मूक राहणार नाही’ असे ठणकावून सांगते आहे. तुमच्या दबावाखाली मी ढासळणार नाही, कोसळणार नाही असा आत्मविश्वास ती व्यक्त करते आहे. स्वत:च्या ताकदीचे भान तिला असल्याचे ती स्पष्टपणे सांगते आहे.

    ’आपली पायरी सांभाळ’ म्हणत दुय्यम स्थान देणार्‍या संस्कृतीला मी आता जुमानणार नाही असा निर्धार तिने केला आहे. संस्कृतीचे ठेकेदार मला मागे खेचण्याचा, गाडून टाकण्याचा प्रयत्न करतील, पण ते अयशस्वीच होतील, असा विश्वास तिला आहे. माझी मुस्कटदाबी ते करु शकत नाहीत; निर्भयपणे, मोकळेपणाने जगण्याचा माझा हक्क ते हिरावून घेऊ शकत नाहीत, असा उद्घोष तिने केला आहे.

    ’उतणार नाही, मातणार नाही. घेतला वसा टाकणार नाही.’ मध्ये गुरफटलेल्या भारतीय स्त्रीलाही जॅस्मिनप्रमाणे ’मूक राहणार नाही, भिणार नाही, ढासळणार नाही की मोडणार नाही.’ हा नवा वसा घेण्याची गरज आहे.

    - oOo -

    मूळ चित्रपटातील वर शेअर केलेले गाणे दृश्य बाजूने जरा आक्रस्ताळे भासते.गाण्याच्या शब्दातील ठामपणा, निग्रह, आत्मविश्वास उलगडण्याऐवजी एखाद्या लाडावलेल्या मुलीचा आक्रस्ताळा हट्ट पाहिल्याचा भास होतो. पण चित्रपटाच्या पूर्व-जाहिरातीसाठी अधिकृतरित्या प्रसिद्ध केला गेलेला व्हिडिओ त्यामानाने बराच सुसह्य आहे. तो इथे जोडतो आहे.

    पहिला व्हिडिओ आणि हा व्हिडिओ यांतील गाण्याच्या शब्दरचनेत थोडा फरक आहे. चित्रपटातील गाण्यात पहिल्या कडव्याच्या प्री-कोरसमध्ये दोनदा can't असा शब्द आहे तर या दुसर्‍या व्हिडिओमध्ये तो won't अस बदलून घेतला आहे, जो अधिक सयुक्तिक आहे.

    Can't मध्ये असलेली शरणागत, हताशेच्या भावनेची छटा Won't मुळे निर्धारात रूपांतरित होते. याशिवाय शेवटच्या कडव्यातील ’'Cause I'll breathe...’ ने सुरु होणार्‍या प्री-कोरसच्या चार ओळी इथे पहिल्या कडव्यालाही जोडून घेतल्या आहेत.

    व्हिडिओ एडिटिंगचे तंत्र अगदी सुलभ झाल्यापासून वेगवेगळ्या व्हिडिओज्‌ची सरमिसळ करुन नवा व्हिडिओ तयार करण्याचा प्रघात पडला आहे. इन्स्टाग्राम,टिकटॉक यांच्यासारख्या माध्यमांतून पाहायला मिळणार्‍या अतिलघुपटांमध्ये प्रामुख्याने विनोदनिर्मितीसाठी हा कारभार केला जातो. पण क्वचित याचा एखादा सर्जनशील अवतारही पाहायला मिळतो.

    या नव्या अलादिन (२०१९) मधील नओमी स्कॉटच्या या गाण्यातील शब्द नि त्यातील भावांना अनुसरून १९९२ मध्ये आलेल्या त्याच नावाच्या चलच्चित्रपटातील (Animation film) प्रसंगांची साखळी तयार करुन 'Unofficially Regal' या यूट्यूब चॅनेलवर हा नवा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यातील कौशल्य दाद देण्याजोगे आहे.


संबंधित लेखन

३ टिप्पण्या: