सोमवार, ३ मे, २०२१

गुलमोहराआडची अबोली

आयुष्यात सर्वात प्रथम थिएटरला जाऊन पाहिलेला चित्रपट म्हणजे शोले, बॉलिवूडमधील एक मैलाचा दगड मानला गेलेला. तेव्हा अक्षरश: अंड्यात असल्याने डोक्यात कितपत शिरला आठवत नाही. पुढे अनेक वर्षे त्याची मोहिनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होती. नंतर त्यातील लक्षवेधी संवाद गल्लोगल्ली पोरंटोरं ऐकवू लागल्याने बरेचसे पाठ झाले. त्यापूर्वीच्या सामाजिक, कौटुंबिक वगैरे चित्रपटांची सद्दी खर्‍या अर्थाने संपवून बॉलिवूडला हिंसाचार आणि त्राताप्रधान चित्रपटांकडे नेणारे निर्णायक वळण त्याने दिले.

या चित्रपटात काय नव्हते...

'कुत्ते कमीने, मै तेरा खून पी जाऊंगा’, 'एक एकको चुन चुनके मारुंगा' हे धर्मेंद्रचे ट्रेडमार्क झालेले डॉयलॉग, ’तेरे लिए तो मेरे पैर ही काफी है’, ’ये हाथ मुझे दे दे ठाकूर’, ’तुम्हाला नाम क्या है बसंती?’, 'आधे इधर जाव, आधे उधर जाव, और बाकी मेरे पीछे आव', ’कितने आदमी थे’, ’अरे ओऽ सांभा’, ’सरदार मैंने आपका नमक खाया है।... अब गोली खा। ’, ’किसी जेल की दीवार इतनी मजबूत नहीं जो गब्बर को बीस साल अंदर रख सके.’ ’रामगढवालोंने पागल कुत्तोंके सामने रोटी डालना बंद कर दिया है’, ’ये हाथ नहीं, फॉंसीका फंदा है गब्बर’ वगैरे जोरदार संवाद...

दारू प्यालेला वीरु टाकीवर चढून आत्महत्येची धमकी देतो... जय वीरुच्या वतीने लग्नाचा प्रस्ताव घेऊन जातो तो प्रसंग. असे उठावदार पण तरीही कथानकाला फारसा आधार न देणारे प्रसंग...

तसेच दे-मार ढ्वांय ढ्वांय बंदुकबाजी, डोंगराळ नि उंचसखल प्रदेशातून केलेली जोरदार घोडेस्वारी, नायिकेचा पाठलाग करणारे डाकू, टांग्याची बेफाम दौड...

ठाकूरने गब्बरच्या डोक्याला दोन्ही हातांनी घातलेला त्रिकोणी पेच, इन्स्पेक्टर असलेल्या ठाकूरने डोक्यावरच्या टोपीसह एक हात आडवा धरुन त्याखालच्या पिस्तुलने उंचावरील डाकूला टिपताना दिलेली टिपिकल 'वेस्टर्न' पोज, दारू पिऊन टाकीवर चढलेला नि त्याच्या कठड्यावरुन अर्धा बाहेर लटकणारा वीरु... अशा अनेक दिलखेचक फ्रेम्स...

वीरु-बसंतीचा सफल रोमान्स, जय-राधाचे असफल प्रेम, बसंतीचा डान्स, सूरमा भोपाली आणि 'अंग्रेज के जमाने का जेलर’ची कमेडी, ठाकूरच्या कुटुंबाच्या हत्येतून साकारलेले क्रौर्य, अहमदच्या मृत्यूचे कारुण्य, सहृदयी आणि स्वत:चा हाताशी आलेला मुलगा गमावूनही गावाला प्रेरणा देणारा इमामचाचा, तो मुस्लिम असल्याने धार्मिक एकोप्याचा दिलेला संदेश, आणि अर्थातच जय-वीरूची ’हम नहीं छोडेंगे’ वाली दोस्ती...

एकुणात छोट्या किराणामालाच्या दुकानाइतकी माफक व्याप्ती असलेल्या तोवरच्या हिंदी चित्रपटाला ’आंब्यापासून तांब्यापर्यंत सर्व काही मिळेल’ असे मोठे रिटेल स्टोअर बनवणारा, नि तो फॉर्म्युला बॉलिवूड-प्रेक्षकाच्या कायमचा बोकांडी बसवणारा चित्रपट म्हणजे शोले.

'फॉर ओल्ड टाईम्स सेक' असे चित्रपट कधीकधी पुन्हा पाहिले जातात. नवे काही डोक्यात घुसण्यास मेंदूने एखाद्या दुकानासारखा ’We are closed' चा बोर्ड लावला, की एरवी ’Down with Nostalgia’ म्हणणारे आमच्यासारखेही, हल्ली काय म्हणतात ते... हां, थ्रोबॅक मोड मध्ये जातात.

चित्रपटाबद्दलचे आकलन तो पाहात असताना असलेल्या वय, बुद्धी, मानसिक नि आसपासची स्थिती यावर अवलंबून असते. थिएटरमध्ये पॉपकॉर्न खात बकबक करणारी कॉलेजकुमारांची टोळी, नि त्यातील पोरींवर इम्प्रेशन मारण्यासाठी बेअक्कल टवाळ कमेंट करुन स्वत:च फिदीफिदी असणारे तरुण, अतिशय सुरेख तरल चित्रपटांनी दिलेल्या अनुभवांची श्राद्धे घालताना अनुभवले आहेत. (त्यामुळे थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे मी फार वर्षांपूर्वी सोडून दिले.) या नि अशा परिसर-घटकांच्या परिणामांमुळे उणावलेला अनुभव चित्रपट पुन्हा पाहताना कदाचित सापडू शकतो, आणि आकलनात थोडी भरही घालू शकतो.

शोले हा बॉलिवूडमधील मारधाड चित्रपटांचा मूळपुरूष मानला जात असला, तरी पलिकडेही त्यात काही तपशील पाहता येतात. ते कुणाला दिसतात, कुणाला दिसतही नाहीत. कदाचित ते टिपण्यासाठी आपण तेव्हा तयार नसतो, असेही असेल. उदाहरण द्यायचे तर मालगाडीचा घोड्यावरुन पाठलाग करणारे डाकू हा हॉलिवूडच्या वेस्टर्न चित्रपटांकडून उसना आणलेला प्रसंग आहे. पुढे शोले हे प्रसिद्ध जपानी दिग्दर्शक ’अकिरा कुरोसावा’च्या ’सेवन सामुराई’चे वेस्टर्नायजेशन आहे असे लक्षात येते.

असरानीचा ’अंग्रेज के जमाने का जेलर’ म्हणजे चार्ली चॅप्लीनच्या ’द ग्रेट डिक्टेटर’मधील डिक्टेटरची आवृत्ती (जे मुळात हिटलरचे व्यंगचित्र आहे) आहे हे लक्षात येते. चार्लीचा डिक्टेटर पृथ्वीचा गोल हात नि पायावर नाचवत असतो, हा जेलर टेबलवर ठेवलेला गोलही दोन वेळा खाली पाडतो. आपण किती कडक शिस्तीचे आहोत असा दावा करणार्‍या या जेलरच्या पहिल्या दर्शनाच्या पार्श्वभूमीवर नेमकी ’ही इज अ जॉली गुड फेलो’ची धून वाजते...

...पण यापेक्षाही अधिक परिणामकारक एक धून शोलेमध्ये ऐकायला मिळते आणि ती जवळजवळ चित्रपट व्यापून राहते, आणि तरीही बहुतेक प्रेक्षकांच्या दृष्टीने अदखलपात्रच राहते !

जय सर्वप्रथम ठाकूरच्या हवेलीतील गेस्ट-हाऊसबाहेर बसून आपल्या हार्मोनिका अथवा माऊथ ऑर्गनवर जी धून वाजवतो ती ही याच धूनशी नाते सांगणारी आहे, फक्त तिचा पोत आणि भावना वेगळी आहे. इथेच आजवर न जाणवलेला, किंवा दिसूनही इतर उठावदार गोष्टींच्या प्रसिद्धीच्या रेट्यात तसा बिनमहत्वाचा मानला गेलेला कथानकाचा धागा हलकेच वर येतो.

राधा विधवा आहे नि जय तिच्याकडे आकर्षित झाला आहे. जय हवेलीसमोर असलेल्या गेस्टहाऊसच्या ओसरीवर बसून ही जी धून वाजवतो त्यात कारुण्य आहे, वेदना आहे. ती राधाची आहे नि कदाचित जयचीही.

पण आणखी एक तपशील नोंदवून ठेवण्याजोगा आहे. तो म्हणजे जेव्हा जय हार्मोनिकावर ती धून वाजवतो तेव्हा ती वेळ नेहमीच रात्रीची आहे. आणि दोन प्रसंगात त्याची धून ऐकवताना सज्जातील एक एक दिवा राधा मालवत जाते आहे. एका प्रसंगात तर ती स्वत:च्या खोलीत जाते नि दार लावताना त्याच्याकडे वळून नव्हे, तर स्वत:च्या पाठीमागेच ते लोटून देते. थोडक्यात जय-राधा यांची ही निशब्द प्रेमकहाणी सुफल संपूर्ण होणार नाही याचे संकेत त्यांच्या प्रत्येक भेटीतच मिळत जातात.

अखेर जयच्या अंत्यसंस्काराच्या वेळीही राधा हवेलीच्या खिडकीतून पाहते आणि एक पाऊल मागे सरते नि दोन्ही हातांनी खिडकी लावून घेते. पण आता खिडकीची दारे लोटताना ती पाठीकडे लोटत नाही, वास्तवाला सामोरे जाते, तोंड देते. बाहेरुन तिच्याकडे पाहणार्‍याला राधा खिडकीच्या चौकटीमध्ये बंदिवान होताना दिसते. जयच्या आगमनाने तिच्या बंदिस्त आयुष्यात एक खिडकी उघडली गेलेली होती, ती आता कायमची बंद झालेली आहे.

संपूर्ण चित्रपटात जय आणि राधा परस्परांशी प्रत्येकी एक वाक्य बोलले आहेत. आणि ती दोनही वाक्ये त्यांच्या मनात एकमेकांबद्दल काही भावना निर्माण होण्यापूर्वीची करकरीत व्यवहारी वाक्ये आहेत. ते दोघे परस्परांसमोर आहेत असा एकुण वेळ जेमतेम पाच ते सहा मिनिटांचाच असेल. तीन तासांहून अधिक पसारा असलेल्या चित्रपटात हा नगण्यच म्हटला पाहिजे. एरवी स्वप्नदृश्याची पळवाट काढून दाखवले जाणारे प्रेमगीतही इथे नाही, इतका त्या नात्याचा पोत लेखक-दिग्दर्शकाने काळजीपूर्वक जपला आहे. 

त्यांचे नाते फक्त हार्मोनिकाच्या स्वरांनी आणि विझत्या कंदिलांच्या उजेडातील तिच्या नजरेतूनच उलगडत जाते आहे. दोघांमधले जे चार-पाचच प्रसंग आहेत त्याबद्दल तपशीलाने लिहिताही येईल, पण ते अस्थानी प्रवचन ठरेल. ज्याची उमज पडायला हवी तिथे समजावून सांगण्याने मूळ हेतूच बाधित होईल.

शोलेला उपमा द्यायची झाली तर आपला ऐसपैस विस्तार आणि लालभडक पसार्‍याने भगभगीत उन्हाळा अधिकच दाहक बनवणार्‍या, आणि नजरबंदी केल्यासारखी आपली नजर पकडून ठेवणार्‍या गुलमोहराची देता येईल. आणि त्या तुलनेत जय-राधाची प्रेमकहाणी जेमतेम एखाद्या अबोलीच्या फुलाच्या आकाराइतकाच अवकाश व्यापणारी. अबोलीचे फूलही गुलमोहराप्रमाणे लालच असते, फक्त त्याचा लालिमा गुलमोहरासारखा दाहक नसतो. सौम्य असतो. शृंगाराच्या क्षेत्रातही मोगर्‍याच्या राज्यात तिला एका कोपर्‍यातली जागा मिळत असेल, पण स्वतंत्र रंगच्छटेचा मान जसा अबोलीला मिळाला तसा या दोघांना मिळालेला नाही.

उन्माद, उत्तेजना, सनसनाटीपणा मुख्य पाया असलेल्या चित्रपटाच्या कथानकामध्ये जय-राधाची अबोल प्रेमकहाणीही एका कोपर्‍यात उभी असेल, पण ती अदखलपात्र नाही. हिंसेच्या पातळीवर फिरणार्‍या चढाओढीच्या जीवनात तिचे हक्काचे स्थान हिरावून घेता येणार नाही. इतकी अबोल आणि तरल प्रेमकहाणी बॉलिवूडवाल्यांना क्वचितच साधली असेल.

- oOo -

बॉलिवूड चित्रपटक्षेत्राला एक नवे वळण देणारा हा चित्रपट यू-ट्यूबवर उपलब्ध आहे.


संबंधित लेखन

९ टिप्पण्या:

  1. आवडलं. मलाही या चित्रपटातील ही तरल आणि निशब्द प्रेमकहाणी खूपच आवडलेली. तुम्ही ते शब्दात छान मांडलंय.

    उत्तर द्याहटवा
  2. शोले कडे इतक्या तरल भावनेने पण बघता येतं हे लक्षातच आलं नव्हतं.

    उत्तर द्याहटवा