RamataramMarquee

सूची: अनुक्रमे ▶ वेचे ▶ वेचताना ▶ दृक-श्राव्य ▶

शनिवार, ६ जानेवारी, २०२४

लॉरेन्स आला रेऽऽ आलाऽ (अर्थात माध्यम-कुंई)


  • मिरानशाह हे आरएएफचं (१) हिंदुस्तानातलं सर्वांत लहान ठाणं अफगाण सीमेपासून दहा मैलांवर होतं. पठाणांचे तिथं वारंवार हल्ले होत असत. काटेरी तारांच्या कुंपणानं वेढलेल्या भूभागावर विटा आणि माती यांनी उभारलेल्या गढीवजा वास्तूला मिरानशाह फोर्ट म्हणत. आजूबाजूचा प्रदेश डोंगराळ होता. मिरानशाह इथं आरएएफचे सव्वीसजण आणि पाचशे हिंदुस्तानी जवान राहत. मात्र हे दोन्ही गट गढीत वेगवेगळ्या कक्षांत राहत असल्यानं त्यांचा एकमेकांशी क्वचितच संबंध येई. आरएएफच्या लोकांचं काम म्हणजे विमानाच्या धावपट्टीची देखभाल करणं. दिवसा त्यांना काटेरी कुंपणाच्या बाहेर जाण्यास मज्जाव होता, तसाच रात्री गढीबाहेर जाण्यास. रोज रात्री कडक पहारा आणि सर्चलाइटच्या झोतांची अविरत दिवाळी असे. लॉरेन्सनंच म्हटल्याप्रमाणे, आरएएफचे लोक आणि हिंदुस्तानी यांचा संपर्क नसल्यानं मिरानशाहमध्ये माणसांचा आवाज नसे, पक्ष्यांचा नसे आणि जनावरांचाही नसे. अपवाद एकच. रोज रात्री सर्चलाइट्स सुरू झाल्यावर दहाच्या सुमारास कोल्ह्यांची मात्र पाचेक मिनिटं ‘कुई-मैफल’ चाले. मिरानशाहमधली नीरव शांतता खूपच गूढ आणि काहीशी अभद्रानं सावटलेली वाटे. लॉरेन्सला इथलं ...

    पुढे वाचा »

रविवार, २४ डिसेंबर, २०२३

अबोला


  • वैशाखातील दुपार खंजिरासारखी तळपत होती. उन्हाच्या सणक्यानं सगळं गाव निपचित पडलं होतं. वारा वाहत नव्हता. झाडं हलत नव्हती. कुठंच हालचाल नव्हती, गजबज नव्हती. छपरांच्या सावलीला गुरं निवांत होती. भिंतीच्या कडेशी माती उकरून कोंबड्या गपचीप बसल्या होत्या, पाय पोटाशी घेऊन आणि गोल डोळ्यांवर पापण्यांचे पांढरे पडदे ओढून डुलक्या घेत होत्या. डालपाट्याखाली कोंडलेल्या कोकराची धडपड थांबली होती. लिंबाच्या डहाळ्यात बसलेल्या साळुंक्या बोलत नव्हत्या. कावळ्यांची जोडपीही एकमेकांना बिलगून निश्चल बसली होती. कुत्री राडीत बसून ल्हा-ल्हा करीत होती. कुंभाराची गाढवं झाडाच्या सावलीला दिडक्या पायावर उभी होती. सारं खेडं उन्हाच्या तापानं मरगळून गेलं होतं. आपल्या घरात सोप्यात मिरी एकटीच गजग्यांनी खेळत होती. रंगीत बांगड्यांचे तुकडे मोजीत होती. गालावर येणारे भुरे केस सावरीत होती. आपल्याशीच काही बडबडत होती. पण तिला करमत नव्हतं. तिचं मन रंगीत काचात, गजग्यांत रमत नव्हतं. परटाची सुबा चार-सहा दिवस घरी येण्याची बंद झाली होती. त्या दोघींचं भांडण झालं नव्हतं. गट्टी फू झाली नव्हती, तरी...

    पुढे वाचा »

सोमवार, १८ डिसेंबर, २०२३

देवकथा बोलतात तेव्हा...


  • कांचीपुरम् किंवा कांची हे नाव आपण अनेकदा ऐकले आहे. कधी तिथल्या बालमजुरांच्या शोषणाबद्दलच्या हकिकती वाचून आपण हळहळलो आहोत, तर कधी तिथून आलेल्या शंकराचार्यांच्या आगमनाच्या, वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झालेल्या वार्ता आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. कधी तिथल्या रेशमी साड्यांचं प्राचीन, सुलक्षणी वैभव पाहताना आपण हरखलो आहोत, तर एखाद्या प्रवाशानं तिथल्या बाजारपेठेबरोबरच तिथल्या मंदिरांचं महत्त्वही आपल्याला ऐकवलं आहे. जर दक्षिणेत गेलात तर कांचीला एकदा जरूर जा. प्रवासी माणसांचं प्रांजळ कुतूहल आणि उत्सुकता बरोबर घेऊन जा. मदुरा आणि कुंभकोणम्‌सारखंच हे देवळांचं गाव तुम्हाला दिसेल. हे कामाक्षीचं गाव. सारीपाट खेळताना शिवावर पार्वतीनं मात केली आणि आनंदाच्या भरात ती आदिमाया असं काही तरी बोलली की शिवमहेश्वराला ते बोलणं फारच लागलं, मुळातला तो साधाभोळा देव, पण रागावला की पहायला नको. त्यानं गौरीला म्हटलं, ‘कुरूप होशील आणि पृथ्वीवर जाऊन पडशील.’ शाप खरा ठरला आणि पार्वती कांचीला आली. इथं तिनं शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी मोठे तप मांडलं. शिव मोठा अहंकारी नवरा निघाला. लहानशा थट्टेतल्या बोलण्यावरून तो इतका राग...

    पुढे वाचा »

शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

एका गोष्टीची गोष्ट


  • “ता-त्या” “काय बाबा?” “मला गोष्ट सांगा की!” “कशाची सांगू?” अंधारात माझ्याशेजारी झोपलेल्या पाच वर्षाच्या बाबानं विचार केला. मी म्हणालो, ‘आता आपली परीक्षा आहे. गोष्टी लिहिणं हा जन्माचा उद्योग आहे, पण पोरांना गोष्ट सांगणं हे काम भलतंच कठीण! त्यांना कसली गोष्ट आवडेल ह्याचा अंदाज कधीच येत नाही. सांगून परिणाम पाहावा म्हटलं, तर अपेक्षेपेक्षा वेगळाच परिणाम दिसतो.’ पुष्कळ गोष्टी माहीत नसतात, शब्द ओळखीचे नसतात. पंचतंत्रातल्या काही कथा सांगून पाहिल्या, त्या बाबाला रंजक वाटल्या नाहीत. सिंह जाळ्यात सापडला. जाळ्यात म्हणजे कशात? (आम्ही खेड्यात जन्माला आलो आणि वाढलो, त्यामुळे ही अडचण आली नाही.) गाढवानं वाघाचं कातडं पांघरलं. कसं? त्याला हात कुठं असतात पांघरून घ्यायला? रंगाच्या भांड्यात पडलेला कोल्हा जनावरांना म्हणाला कसा? कोल्ह्याला बोलता कसं येईल? त्या तळ्यात खूप मासे होते. तळं म्हणजे काय? तात्पर्य– पंचतंत्राचा उपयोग नाही. “वासराची सांगता?” “तू वासरू कुठं बघितलंस?” “आहे की जगतापाच्याकडं. गाय आणि तिचं छान लहान वासरू आहे.” ‘बरं, म्हणजे कथानायकाचा परिचय आहे.’ “सांगा वासराची.” प्रसंग ब...

    पुढे वाचा »

सोमवार, ६ नोव्हेंबर, २०२३

मूल्य


  • आता अंधारू लागले होते, पण खरी रात्र पडली नव्हती. कोठे काही तरी खावे असे तीव्रपणे वाटण्याइतकी भूक त्याला अद्याप लागली नव्हती. तेव्हा आणखी थोडा वेळ कोठे घालवावा याचा त्याला विचार पडला. पण मद्यागारांच्या बाजूलाच सुर्‍या-कट्यारींचे एक दुकान पाहताच त्याला बरे वाटले. तो सहजपणे तिथे गेला व बाहेर रुंद, मोठ्या खिडकीत टांगलेल्या कट्यारींकडे पाहू लागला. “तुला कट्यार हवी का ? मग आत ये. आत पुष्कळ नमुने आहेत.” कोणीतरी त्याला जाड भरदार स्वरात म्हणाले. दारात एक धिप्पाड माणूस उभा होता. त्याने उघड्या अंगावर अरुंद पाळ्यांचे नुसते एक कातडी जाकीट अडकवल्याने त्यांची रुंद केसाळ छाती पूर्णपणे उघडी होती व तिच्यावर पावशेराएवढा अजस्र ताईत होता. “छे, खरे म्हणजे मला काहीच विकत घ्यायचे नाही.” तो किंचित विरमून म्हणाला. “ मी पुष्कळ भटकलो आहे. प्रत्येक देशाचे अन्न निराळे, त्याप्रमाणे त्याची हत्यारे देखील निराळी असतात. म्हणून मी पाहत होतो इतकेच.” माणूस मोठ्याने हसला व आत येण्याची खूण करून दारातून बाजूला झाला. “ आमचे खरे शौकीन गिर्‍हाईक असेच असते. आमची हत्यारे ही दररोजच्या उपयोगाची नाहीतच. घरी काकडी चिरायची अडचण प...

    पुढे वाचा »

गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०२३

दोन गुलमोहर


  • ग्रेसचे ‘चर्चबेल’ वाचून बराच काळ लोटला. त्यातील काही अनुभव अधूनमधून मनाच्या तळातून पृष्ठभागावर येत असतात. अलीकडे विशिष्ट हेतूने व्यंकटेश माडगूळकरांची बरीच पुस्तके आणली. त्यातील ‘वाटा’मध्ये त्यांनी गुलमोहरावर एक सुरेख लेख लिहिला आहे. तो वाचून चर्चबेलमधला ग्रेसचा गुलमोहर आठवला. रोचक बाब म्हणजे या दोन लेखकांच्या मूलभूत प्रवृत्तीचे प्रतिबिंब या दोन लेखांत उमटलेले आहे. ग्रेस अंतर्मुख, त्यांच्या मनाच्या तळाशी जे रसायन मंदपणे उकळते त्याला वाट पुसतु जाणारे; तर माडगूळकर जगण्यातील अनुभवांकडे चालत जाणारे, त्यांना वेचून आपली पोतडी भरत जाणारे. ग्रेसचा गुलमोहर त्यांनी साक्षीभावाने अनुभवलेला, नेणिवेत मुळे रोवणारा; गाडगूळकरांचा क्रियाशील आमंत्रणानंतरही निसटून जाणारा. एकापाठोपाठ वाचण्यासाठी हे दोनही लेख इथे एकाच पोस्टमध्ये समाविष्ट केले आहेत. लहानपणी दहा-बारा वर्षांचा असताना मी कांचनवाडीला गेलो होतो. कांचनवाडीला नदी नाही आणि डोंगरही नाही. मला आवडणाऱ्या खेड्याच्या चित्रात किमानपक्षी एखादी नदी, नाहीतर पाण्याचा नदीसदृश प्रवाह, डोंगर आणि देऊळ असावय...

    पुढे वाचा »

शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३

माकडे, माऊली आणि मुली


  • गुडालबाईची ही माकडं सर्वांत जास्त हुशार, चिंपॅन्झी जातीची. दिसायला भीतिदायक आणि शक्तीनं दांडगी (एकेका पूर्ण वाढलेल्या माकडाला तीन पुरुषांचं बळ असतं.), तीही वर्षानुवर्षं जंगलात स्वैर राहिलेली. माणसांचा वारा त्यांना माहीत नाही. आपण म्हणतो, माकडं शाकाहारी असतात. फळं, कोवळा पाला, कोंब, धान्यधुन्य– असलं काहीबाही खातात. शाखामृगच ते! पण ही समजूत निदान चिपॅन्झीच्या बाबतीत तरी खोटी. ती केवळ शाकाहारी नाहीत; अधून-मधून त्यांना कच्चं मांस खायला आवडतं. गोम्बे स्ट्रीम ह्या भागातही चिंपॅन्झी माकडं दंगाधोपा करून एखादं हरिण किंवा रानडुकराचं पोर अचानकपणे पकडत आणि बोल-बोल म्हणता त्याचा फन्ना उडवत. बाबून माकडं, तांबडी कोलोबस माकडं, निळी माकडं, तांबड्या शेपटीची माकडं– ही लहान जातीची माकडंसुद्धा त्यांचा घास होत. गोम्बे स्ट्रीम भागात गुडालबाई जाण्याच्या आधीच दोन आफ्रिकन बाळं ह्या माकडांनी पळवली होती. एका पोराची सुटका झाल्यावर दिसून आलं की, त्यांचं थोडंसं अंग माकडांनी खाऊन टाकलं आहे. म्हणजे, नरमांसही त्यांना वर्ज्य नव्हतं. बाईंना मात्र ही गोष्ट आश्चर्याची वाटलेल...

    पुढे वाचा »