शिलरकडे जाऊन त्यांचे काम बघत बसणे मला फार आवडे. त्यांच्या दुकानाला येणारा कातड्याचा, खळीचा वास आवडे. दुकानातले शेल्फ लाकडी साच्यांनी भरलेले असत. प्रत्येक साच्याला गिऱ्हाइकाच्या नावाची चिठ्ठी दोऱ्याने बांधलेली असे. खिळे, हातोडे, पावलांच्या आकृत्यांनी भरलेली खतावणी-बुके, हे सगळे मला आवडे. स्वतः शिलर आवडत. तासन् तास त्यांचे कसब बघत मी बसून राही.
ते म्हणत, “मी चांभार नाही. बूट तयार करणारा कारागीर आहे.”
त्यांचे शिक्षण युरोपमध्ये झाले होते. आपल्या धंद्याचा त्यांना फार अभिमान होता. पण काळानुसार त्यांचा धंदा खालावला होता; आता पुष्कळसे काम येई ते दुरुस्तीचेच. शिलरना त्यात कमीपणा वाटे; पण जे थोडेफार चांगले काम मिळे त्यात ते आनंद मानत.
कधी-कधी बेढब पायाचा माणूस तळघराच्या पायऱ्या उतरून येई आणि बूटजोडी बांधा म्हणे. अशा गिऱ्हाइकाचे काम करण्यात शिलरना आनंद होई. एकीकडे हात चालत, दुसरीकडे तोंड चाले. जर्मनीमधल्या आपल्या बाळपणीच्या कितीतरी आठवणी त्यांनी मला सांगितल्या. या आठवणी सांगता-सांगता ते हसत, मीही हसे.
एके दिवशी त्यांनी मला कैसरच्या वेळी आपल्याला मिलिटरीत नोकरी कशी करावी लागली ते सांगितले, “मी एकटाच नव्हतो. सगळ्यांनाच भरती व्हावे लागे. तुम्हा अमेरिकेतल्या लोकांना ते माहीत नाही. जर्मनीतच काय युरोपमधल्या सगळ्या झार देशात मुलगा ठरावीक वयाचा झाला की, त्यानं मिलिटरीत भरती झालंच पाहिजे.”
“किती वर्ष?”
“तीन.”
“मग तुम्हाला पसंत नव्हतं?”
“हॅट.” शिलर ओरडले.
आणि हातांतला हातोडा त्यांनी असा जोराने आदळला की, त्याचा दांडाच मोडला.
हळूहळू मला कळले की, मिलिटरीच्या नोकरीचा त्यांच्या मनावर फार परिणाम झाला आहे. सैनिकांची सगळी जात आणि सैन्यातले अधिकारी यांच्याबद्दल ते फार तिटकाऱ्याने बोलत. पुनःपुन्हा म्हणत, “साध्या शिपायांना तिथे डुकरापेक्षा जास्त वाईट वागवितात.”
“बरं मग ही नोकरी पुरी झाल्यावर तुम्ही काय केलं?”
“मग मी स्वतंत्र होतो. जवळ होते नव्हते ते सगळे पैसे खर्चून, हॅम्बर्गला गेलो आणि अमेरिकेचं तिकीट काढलं. जातो म्हणून सांगायला घरीसुद्धा गेलो नाही. म्हणालो, तुम्ही आणि तुमचा कैसर."
मिस्टर शिलर भलतेच रागाने बोलत. कैसरबद्दलसुद्धा. का ते मला कळावयाचे नाही. मी म्हणे, “पण कैसर भला माणूस आहे.”
“भला माणूस! हे वर्तमानपत्रांत वाचावं. डुक्कर आहे डुक्कर.”
मला धक्काच बसला. एखाद्या राज्यकर्त्याविषयी इतक्या अनादराने कोणी बोलताना मी प्रथमच ऐकत होतो. एखादा बूट बनविणारा आपल्या धंद्यात चांगला वाकबगार असला, तरी त्याला मुकुटधारी राज्यकर्त्याला अशा शिव्या देण्याचा हक्क असतो का, हे मला ठाऊक नव्हते.
“तुला ते कळायचे नाही. तू अमेरिकन मुलगा आहेस. माझ्या देशात कुणाला स्वातंत्र्य नाही; वाटतं ते बोलता येत नाही तिथे. प्रत्येकाची नोंद असते, मोजदाद असते. पोलिसांना, मिलिटरीला तुमच्याबद्दल सगळी माहिती असते. आणि तुमचा बाप अमुक होता, म्हणून तुम्ही अमुक असलं पाहिजे. शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलात ना, शेतकरी व्हा. तुमची आहे ही स्थिती कायम; तिच्यात सुधारणा अशक्य. आणि तुमची स्थिती कशीही असली तरी तुमच्यावर मालकी कैसरची. स्वातंत्र्य मुळीच नाही.”
राग नाहीसा झाला तसे मिस्टर शिलर अमेरिकेसंबंधी बोलू लागले. काम खूप करावं लागत असलं तरी त्यांना इथे मनासारखे वागता येत होते. पाहिजे तिथे जावे, वाटेल ते बोलावे. कुणी त्रास दिला नव्हता. योग्य वेळी त्यांना इथे लहानसे दुकानही थाटता आले होते, चांगले गिऱ्हाईक मिळाले होते. मिस्टर शिलरनी बांधलेले बूट सगळ्या न्यूयॉर्कमध्ये उत्तम होते.
मिस्टर शिलर असे एखादे दिवशीच बोलत. एरवी वेगवेगळ्या विषयांवर बोलत. कधी माणूस आणि जीवनमूल्ये यावर बोलत. रोजच्या जीवनासंबंधी बोलत, माणसामाणसांतल्या नात्यासंबंधी बोलत. फार अवघड विषयांवर ते अगदी सोप्या शब्दांत बोलत. अशिक्षित असूनही त्यांना पुष्कळ समजत होते. फक्त एक गोष्ट त्यांना समजत नव्हती, मलाही त्यांच्या प्रश्नाचे उत्तर माहीत नव्हते. त्यांना समजत नव्हते की, त्यांच्यासारख्या कसबी कामसू माणसाची पिळवणूक बोस्टनमधल्या फॅक्टऱ्या का करतात? आपल्याला या असल्या एकच खिडकी असलेल्या तळघरात का राहावे लागते?
“शिक्षा झालेला कैदी असल्यासारखे वाटतं मला, पण तरीही मी स्वतंत्र आहे.”
तळघरातच दुकान घालून असलेल्या आणखी एका कसबी माणसाची ओळख होईपर्यंत मी शिलरकडे जात होतो. हा माणूस इंग्लिश होता, आणि त्याचे नाव होते मिस्टर कॉर्बेट.
शिलर आणि कॉर्बेट या दोघा दुकानदारांच्यामध्ये पुष्कळ साम्य होते आणि तरीही ते वेगवेगळे होते. दोघेही तरुणवयात अमेरिकेस आले होते. एके काळी या दोघा कसबी कारागिरांना भाव होता आणि आता मात्र ते बाजूला पडले होते. शिलरना यंत्रामुळे बाजूला पडावे लागले होते आणि कॉर्बेटना आपल्या वयामुळे. शिलरची जागा यंत्राने घेतली होती. आणि ‘स्टाइनवे पियानो फॅक्टरी’त अनेक वर्षे काम केल्यानंतर वयाला पन्नास वर्षे झाली, म्हणून कॉर्बेटना काढून टाकून त्यांची जागा एका तरुण माणसाला देण्यात आली होती.
शिलरप्रमाणे कॉर्बेट बोलके नव्हते. जेव्हा बोलत तेव्हाही कल्पकता, तत्त्वज्ञान अशा गोष्टींचा त्यांना गंध नाही असे दिसे. पण माणूस दयाळू होता; मैत्रीला चांगला होता. लाकडाच्या वेगवेगळ्या जाती आणि त्यांचे उपयोग याविषयी त्यांनी मला कितीतरी माहिती दिली. केवळ वासावरून नवे तोडलेले लाकूड कसे ओळखावे हे शिकविले. आपली सगळी हत्यारे आणि त्यांचा उपयोग मला समजावून दिला. रंधा मारताना, तक्ते तयार करताना, जोडकाम करताना मला तासन् तास बघत बसू दिले. कॉर्बेटच्या रंध्याचा, हातोडीचा आवाज ऐकताना सुख होई; पण हे आवाज नेहमी नेहमी ऐकायला मिळत नसत.
कॉर्बेटना फार थोडे काम मिळे. कॉर्बेटच्या दुकानात बसून मला सुतारकामाबद्दल बरेच कळले. मिस्टर शिलरप्रमाणेच कॉर्बेटही बदलत्या काळाचे बळी आहेत, हेही कळले. ही केवळ दोन माणसे होती. असे इतर अनेक जण अमेरिकेत आले असतील. जिच्या शोधासाठी ते इथे आले, ती संधी त्यांना दिसली न दिसली तोवर काढून घेतली गेली असेल.
आपोआप संपण्याच्या अगोदरच ज्यांचे प्राण विझविले गेलेत, स्मशानभूमी नेमस्त न होताच ज्यांना आपली प्रेते उचलून चालावे लागत आहे, अशा या लोकांचा विचार येताच माझे मन व्यथित होई.
पण मिस्टर शिलर, कॉर्बेट आणि इतर हजारो लोक यांची ही स्थिती कुणाच्याच ध्यानात येत नव्हती असे नाही. वॉशिंग्टनमध्ये थिओडोर रुझवेल्ट प्रेसिडेन्ट होते. हे गृहस्थ बुद्धिमान होते. अमेरिकेपुढील समस्या त्यांना माहीत होत्या; ते काही इलाज करीत होते.
रुझवेल्ट प्रेसिडेन्ट झाले ते योगायोगाने. स्पॅनिश-अमेरिकन युद्ध गाजवून परत आल्यावर १८९८ साली न्यूयॉर्क स्टेटचे ते गव्हर्नर म्हणून निवडले गेले; पण सहा महिनेच त्यांनी काम केले. राजकारणातील बड्या धेंडांना रुझवेल्ट हे प्रामाणिक आणि हट्टी वाटले. ते कुणाकडून हुकूम घेत नसत; आपण काम करणार ते लोककल्याणासाठीच असा त्यांचा आग्रह होता. साहजिकच बड्या धेंडांनी ठरविले की, त्यांचा ‘राजकीय खून’ करायचा. मग त्यांनी व्हाइस प्रेसिडेन्ट म्हणून रुझवेल्टना मॅकिन्लेबरोबर नेमून घेतले. व्हाइस प्रेसिडेन्ट केल्यामुळे रुझवेल्टच्या हाती काही अधिकार राहणार नाही आणि आपल्याला हवे ते कायदेकानून पास करून घेण्यात त्यांचा अडथळाही येणार नाही, असा त्यांचा डाव होता.
अशा तर्हेने एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला थिओडोर रुझवेल्ट व्हाइस प्रेसिडेन्ट झाले, पण नंतर सहा महिन्यांनी बफेलो येथे प्रेसिडेन्ट मॅकिन्लेचा खून झाला आणि रुझवेल्ट युनायटेड स्टेट्सचे प्रेसिडेन्ट झाले. या वेळी त्यांचे वय बेचाळीस वर्षांचे होते.
प्रेसिडेन्ट रुझवेल्ट हे मोहक व्यक्तिमत्वाचे आणि उदंड ताकदीचे गृहस्थ होते. त्यांच्यापाशी उत्साह होता. लढा देण्याची त्यांना आवडच होती. सर्वसामान्य अमेरिकन माणसाच्या हक्कासाठी सुरुवातीपासून त्यांनी लढा दिला. ते लहान लोकांचे ‘उस्ताद’ बनले. लोकांनी अगदी सुरुवातीपासून त्यांच्यावर विश्वास टाकला; हा माणूस आपला आहे, हे त्यांना माहीत होते.
सामाजिक सुधारणा ही अमेरिकेची वाढती गरज आहे, हे थिओडोर रुझवेल्टनी पुरेपूर ओळखले. मोठे उद्योगधंदे, उद्योगपती आणि इतर करोडपती गुन्हेगार यांच्यावर दोषारोप करताना ते अगदी तुटून पडत.
काँग्रेसला दिलेल्या आपल्या पहिल्या संदेशात त्यांनी कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांना हक्क मिळावेत या गोष्टीचा कैवार घेतला आणि जनहिताविरुद्ध असलेल्या कॉर्पोरेशनना जोरदार तंबी दिली. हा पहिला सलामीचा तडाखा होता आणि त्या क्षणापासून सुधारणेविषयीची त्यांची जिद्द मंद झाली नाही, अमेरिकेतील मोठे उद्योगधंदे नामशेष व्हावेत, करावेत असा त्यांचा हेतू नव्हता; तर सर्व देशाला त्यांना फायद्यासाठी फक्त शिस्तीत आणावयाचे होते. कारण रुझवेल्टना स्वच्छ दिसत होते की, हे जर झाले नाही, तर उद्योगधंदे स्वतः नामशेष होतीलच, पण आपल्याबरोबर अमेरिकेलाही नामशेष करतील.
बेंड फोडणारे वाङ्मय प्रसिद्ध होण्याची जी लाट उसळली होती, तिने प्रेसिडेन्ट रुझवेल्टना राजकीय सुधारणेची प्रेरणा दिली. यू.एस. स्टील कॉर्पोरेशन, दि युनायटेड स्टॅन्डर्ड ऑइल कंपनी, कोळसा खाणी, रेल्वे-रस्ते, मांसधंदे आणि इतर भानगडखोर यांच्यावर रुझवेल्टने खटले भरले, चौकशा केल्या. एकटी स्टॅन्डर्ड ऑइल कंपनी घेतली, तर तिला २९,०००,००० डॉलर्स दंड झाला.
प्रेसिडेन्टनी आहुती टाकून प्रदीप्त केलेला हा ‘दंडयज्ञ’ पुरा पेटला आणि देशातले अनेक जण अस्वस्थ झाले. वाममार्गाने मिळालेल्या सत्तेपैकी एक तनसडीसुद्धा देण्याची या लोकांची तयारी नव्हती, पावलापावलांवर त्यांनी रुझवेल्टशी लढा दिला, त्यांची बदनामी केली, पण अमेरिकन जनतेचे ते ‘टेढी रुझवेल्ट’च राहिले आणि १९०४मध्ये पुन्हा प्रचंड बहुमताने प्रेसिडेन्ट म्हणून निवडले गेले.
प्रेसिडेन्ट रुझवेल्ट यांच्या कारकिर्दीत देशाची नीतिमत्ता बळावली. लोकांना ते हवे होते. उद्योगधंदेवाले फार मोकळे सुटले होते. लोकांचे हित पाहण्यासाठी सरकारला हस्तक्षेप करणे भाग पडले, ‘दि शेरमन अॅन्टीट्रस्ट अॅक्ट’ अमलात आला. निर्भेळ खाद्यपदार्थ आणि औषधे यासंबंधीचा कायदा पास झाला. फसवी लेबले डकवून भेसळयुक्त खाद्यपदार्थाचे बंद डबे विकण्यास कंपन्यांना आता मुभा नव्हती. मांसविक्रेते, औषधे तयार करणारे कारखाने यांनाही सक्त कायदेकानून लागू करण्यात आले. वाईट मांस आणि खोटी औषधे बाजारपेठेत येणार नाहीत, असा बंदोबस्त झाला, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती छापणे, हा गुन्हा मानला गेला.
एकूण हा काळ मोठा उलाढालीचा होता. काय चालले आहे, हे समजण्याइतपत मी कळता झालेलो होतो. सत्य काय हे बऱ्याच प्रमाणात मला समजले.
पण घडत असलेल्या गोष्टीचा खराखुरा अर्थ आणि महत्त्व कळून येण्यास आणखी काही काळ जावा लागला, इतिहास निकोप करणाऱ्या या घटना घडत असताना त्यांचे महत्व आम्हाला कळले नाही, आपल्या काव्यात घडून येणाऱ्या बदलाचा अर्थ समजण्यासाठी द्रष्टेपणा लागतो. आमच्यापैकी बहुतेक जणांना या बदलाची पुरेशी जाणीवच नव्हती.
हा काळ किती महत्त्वाचा होता, हे पुढे कळून आले. सर्वसामान्य अमेरिकन माणसाचे पाऊल पुढे पडले होते, ते याच काळात. त्यांच्यावतीने सरकार धावून आले. संरक्षक कायदेकानून झाले; हक्कांचे संरक्षण झाले ते याच काळात. सर्वसामान्य माणूस खरा स्वतंत्र झाला. हे मिळालेले स्वातंत्र्य पुन्हा त्याने कधीही गमावले नाही आणि लोकशाही बळकट बनली.
- oOo -
पुस्तक: रानमेवा.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
चवथी आवृत्ती, चवथे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२३.
पृ. ९३-९८.
---
संबंधित लेखन:
वेचताना... : स्वातंत्र्य आले घरा >>
न स्त्री स्वातंत्र्यमर्हती>>
---
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा