... अनीशाने थोड्या वेळाने डोळे उघडले तर समोरच ती भव्य मूर्ती आणि बाजूलाच शांत बसलेला नैसर. अनीशाच्या मनात एक प्रचंड खळबळ निर्माण झाली आणि ती म्हणाली,
'एक विचारू?'
'विचार.'
असे प्रत्युत्तर करून नैसर पुन्हा शांत. अनीशाही शांतच. बराच वेळ झाला तरी अनीशा काहीच बोलत नाही असे पाहून नैसर उगीचच अस्वस्थ झाला. आणि तरीही तो इतकंच शांतपणे पुन्हा म्हणाला,
'विचार, काहीही विचार.'
मग अनीशाने सगळी ताकद एकवटली आणि बोलायला सुरुवात केली.
"... या मूर्तीतील माणसाविषयी ... पूर्ण माणसाविषयी तू आता जी कथा सांगितलीस ती खोटी असली पाहिजे. म्हणजे असे बघ, त्याने आपले राज्यही सोडून दिले तेव्हा जर तो तरुण होता तर त्याचे माता-पिता म्हातारेच असणार की! मग त्याच दिवशी त्याने प्रथम एक म्हातारा पाहिला असे कसे म्हणता येईल? तसेच इतक्या दिवसांत त्याच्या राज्यात एकही मृत्यू झाला नसेल हेही संभवत नाही, किंवा एकही रोगी नसणे हे ही संभवत नाही किंवा एकही दरिद्री नसणे हे ही संभवत नाही. मग त्या एकाच दिवशी ही चारही दृश्ये प्रथमच पाहिली आणि म्हणून तो मानवाच्या या रूपाने इतका व्यथित झाला की त्याने सगळ्याचाच त्याग केला हे सारेच अतार्किक वाटते. आणि म्हणून तू सांगितलेली सगळी कथाच खोटी वाटते."
नैसरने एक क्षणभर अनीशाकडे पाहिले आणि म्हटले,
"खरोखरीच तू फार हुशार आहेस, खरोखरच तुझी शंका बरोबर आहे. पण सत्य हे केवळ तर्कानेच बांधून ठेवण्याइतकं दुबळं आणि मर्यादित असत नाही. मी तुला प्रथम सांगून टाकतो की मी सांगितलेली कथा खोटी नाही, ती खरीच आहे. हे बघ, तुला माहीत असेल की अलिकडेच सर्व जाणत्या जगाने जो एक नियम स्वीकारला तो एका चिंतकाला कसा सुचला? तर... तर त्याने एकदा एका झाडाचे एक फळ जमिनीवर खाली पडताना पाहिले, आणि पटकन त्याला शंका आली की ते फळ वर का गेले नाही, खालीच कसे आले? या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्याने जो सिद्धांत मांडला तो सर्व जगाने स्वीकारला. ... मात्र तेव्हा कोणी शंका घेतली नाही की, त्याने यापूर्वी झाडावरची फळे खाली पडताना पाहिली नव्हती का? का त्यापूर्वी सगळ्या झाडांची फळे आकाशात वर जात होती?"
नैसरच्या स्पष्टीकरणाने अनीशाचे समाधान झाल्यासारखे वाटले तरी तसे तिचे डोळे कबूल करेनात. तेव्हा नैसर म्हणाला,
"अनीशा, आणखी एक गोष्ट लक्षात ठेव. दिसतं खूप आपणाला, पण आपण ते सारेच पाहात नाही. अनेक म्हातारे, अनेक रोगी आणि अनेक प्रेतं, अनेक दरिद्री आज आपल्याला दिसतात. त्यापैकी आपण एकही पाहात नाही. आणि आपण यापैकी आजही जर म्हातारा / रोगी / प्रेत / दरिद्री पाहिला तर घर सोडून जाऊ."
नैसर दुसर्याच कोणत्या अपरिचित भाषेत बोलत आहे असे वाटून अनीशा फक्त त्याच्याकडे पाहात होती. नैसर आणखी खुलासा म्हणून सांगत होता.
"दिसणं आणि पाहाणं यात खूप अंतर आहे. एखादा म्हातारा पाहिल्यावर आपण तरुण आहोत याचा अभिमान शिल्लक राहणं म्हणजे त्या म्हातार्याच्या म्हातारपणाला न पाहणं होय. येथे तो म्हातारा फक्त आपणाला दिसला एवढाच त्याचा अर्थ. किंवा एखादा रोगी पाहिल्यावर आपण निरोगी आहोत याबद्दलचा गर्व शिल्लक राहात असेल तर तो रोगी फक्त दिसणंच म्हणता येईल, पाहाणं म्हणता येणार नाही. आणि एखादं प्रेत पाहूनही आपण जिवंत आहोत याबद्दलचा अहंकारच केवळ शिल्लक असेल तर ते प्रेतही दिसले असाच अर्थ होईल, पाहिले असे होणार नाही. आणि दरिद्री पाहून आपण धनवान असल्याचा आपणास गर्व होत असेल तर तो दरिद्रीही दिसला असा अर्थ होईल, पाहिला असा होणार नाही."
अनीशा मूक होती. ती नि:शब्द झाली. तिच्या अंगावर झर्रकन काटा उभा राहिला. दुसर्या रात्री* नैसरने सांगायला सुरुवात केली की,
"या राजपुत्राने राज्यत्याग केला त्याला आणखी एक कारण घडलं. ते कारणही तितकंच महत्त्वपूर्ण आहे."
नैसर सांगू लागला...
"तर राजपुत्राच्या राज्याच्या शेजारी आणखी एक राज्य होतं. या दोन्ही राज्यांच्या सीमा सतत वाहणार्या नदीने निश्चित केल्या होत्या. पण तरीही नदीला उन्हाळ्यात जरा पाणी कमी असे. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या शेतीला पाणी देण्यावरून कधी कधी या दोन्ही राज्यात भांडणे होत.
एकदा उन्हाळ्याच्या दिवसात अशीच खूप भांडणे झाली. आणि शेजारच्या राजाने निर्णय घेतला की या समस्येचा कायमचा निकाल लावायचा. पण समस्येचा निकाल लावणे म्हणजे दुसर्या बाजूचा निकाल लावणे असाच अर्थ त्यांनी घेतला, आणि शस्त्रांनिशी तयार झाले. राजपुत्राच्या राज्यातही तीच भावना होती, किंबहुना दोन्हीही राज्यांची ही पाण्याची समस्या सोडविण्याची पद्धत एकच होती. आणि ती म्हणजे समस्येला धक्का न लावता दोन्ही बाजूचे लोक एकमेकांना संपविण्यास सिद्ध झालेले... "
राजपुत्राला ही पद्धत मान्य नव्हती. तो आपल्या राज्यातील लोकांना, सैनिकांना पुन्हा पुन्हा समजावून सांगत होता की, ही पाण्याची समस्या सोडवण्याचा हा मार्ग नव्हे, यामुळे समस्या सुटणार नाही. उलट तिचे स्वरूप अधिक उग्र आणि जटिल बनेल. शस्त्राचा मार्ग बाजूला ठेवा. दोन्ही राज्यातील प्रमुखांनी एकत्र बसावे, चर्चा करावी. त्यातून दोघांनाही हितकारक मार्ग निघेल. तेव्हा सैनिकांचा प्रमुख हा प्रश्न लढूनच सुटू शकेल असं मानणारा होता. तो म्हणाला,
" हे बघ, तुला आमच्याबरोबर शस्त्र घेऊन लढलं पाहिजे. आता आम्ही सहन करणार नाही. मारू किंवा मरु."
"ते शक्य नाही. शस्त्राचा मार्ग मला पटत नाही."
'तो भित्रा, दुबळा आणि शस्त्र चालविता न येणारा होता काय?' अनीशाने मधेच विचारले. त्यावर नैसर पुढे सांगू लागला,
"नाही, तो निर्भय होता, सशक्त होता आणि विविध प्रकारच्या शस्त्रकलेत तो पारंगत होता. विशेषतः त्याचा विवाह ठरवण्याच्या वेळी त्याने दाखवलेले शस्त्रनैपुण्य श्रेष्ठ दर्जाचे होते."
"... तर सैनिकांचा प्रमुखही पुन्हा पुन्हा राजपुत्राला आपण लढलंच पाहिजे हे पटवून देत होता आणि राजपुत्रही आपली भूमिका सोडून द्यायला तयार नव्हता. "
मतभेद विकोपाला गेले आणि बैठक भरली. राजपुत्राला पुन्हा एकदा सर्वांनी सांगितले की,"
"तुला आमच्याबरोबर शस्त्र धारण केलं पाहिजे. आणि या समस्येच्या कायमस्वरूपी उपायासाठी तुला मारू किंवा मरू या जिद्दीने लढलंच पाहिजे."
त्या समूहाला उद्देशून मग राजपुत्र बोलला,
"मला तुमचा निर्णय अमान्य आहे, हे मी तुम्हाला पुन्हा एकदा निक्षून सांगतो. अरे, तुम्ही जरा डोळे उघडून पाहा तरी! मुळात प्रत्येक मनुष्य दु:खी आहे, शिवाय मृत्यू तर सर्वांनाच आहे. असे असूनही तुम्ही एकमेकांना नष्ट करण्यासाठी एकमेकांच्या विरुद्ध उभे राहू कसे शकता?"
यावर सैनिकांचा प्रमुख शेवटी रागानेच म्हणाला,
"तुला आमच्याबरोबर शस्त्र घेऊन लढण्यास सज्ज झालेच पाहिजे, नाही तर हे राज्य सोडून तुला जावे लागेल."
काही वेळ अत्यंत शांतता पसरली. कोणीच काही बोलत नव्हते. आता राजपुत्रापुढे सरळ सरळ दोन पर्याय होते. एक म्हणजे शस्त्र हातात घेणे आणि माणसांच्याच विरुद्ध लढणे आणि हे शक्य नसेल तर हे राज्य सोडून निघून जाणे.
राजपुत्राने राज्य सोडून जाण्याचा निर्णय घेतला. पत्नीशी विचारविनिमय केला आणि एकट्यानेच गृहत्यागाचा, राज्यत्यागाचा निर्णय घेतला. आणि त्याबरोबर हाही निर्णय घेतला की,
'अपुर्या पाण्यात मासे जसे तडफडतात त्याप्रमाणे माणसे दु:खात तडफडत असतानाही एकमेकांशी अगदी मृत्यूच्या दारातही वैर का करतात याचा शोध घेईन आणि त्यावर उपायही शोधीन.'
यावर अनीशा म्हणाली,
"अशाच एका राजाने आपले कर्तव्य म्हणून आपल्या पत्नीला एकटीलाच वनवासासाठी म्हणून अरण्यात सोडून दिल्याचे ऐकले होते. आता या तुझ्या राजपुत्राने आपल्या पत्नीला घरीच सोडले. आणि स्वतः अरण्यात निघून गेला. एकूण काय दोघांनीही आपापल्या पत्नींना सोडून दिले की!"
आज प्रथमच अनीशाच्या रूपाने स्त्री बोलत होती. नैसर शांतपणे म्हणाला,
"चुकतेस तू अनीशा. त्या दोघांची वरवर पाहता एकसारखी कृती वाटत असली तरी फरक आहेच. एक तर एक राजा राज्याच्या कर्तव्यापोटी पत्नीला अरण्यात सोडतो. आणि दुसरा एकूण मानवाच्या दु:खमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी राज्य सोडतो."
"... खरंतर राजपुत्रानं गृहत्याग केल्यानंतर खूप दिवस चिंतन केलं आणि माणसंच माणसांशी वैर करून दु:खी का बनतात याचे कारण शोधले. ते कारण नष्ट कसे करता येईल त्यासाठी निश्चित असा मार्ग शोधला. त्यानंतर असंख्य माणसं त्या मार्गानं चालू लागली. कोणत्याही राज्याच्या सीमा या मार्गाला अडवू नाही शकल्या. या मार्गाने चालणार्यांना कधीच नाही फुटले पाय, ना वासनेचे ना तृष्णेचे. म्हणूनच या राजपुत्राने सांगितलेल्या मार्गानं जाणार्या प्रत्येकालाच तो दोनच पाय असलेले पाहशील."
इच्छा होऊनही तिनं नैसरच्या डोळ्यात नाही पाहिलं. पण पुन्हा एकदा प्रचंड ताकदीनं तिनं विचारलं,
"मग मला सांग, तुझ्या राजपुत्रानं गृहत्याग करण्याचं खरं कारण कोणतं? ते पहिलं सांगितलंस ते की एक म्हातारा, रोगी, प्रेत आणि दरिद्री पाहिला म्हणून गृहत्याग केला की आता नंतर सांगितलंस ते की पाण्याच्या वादातून त्याला घर नि राज्यही सोडावं लागलं ते?"
नैसरने शांतपणे डोळे मिटले. एक सुस्कारा टाकला आणि हळूहळू डोळे उघडून त्या भव्य मूर्तीत स्वतःचे डोळे हरवून बसला. आणि अनीशाला उद्देशून म्हणाला,
"अनीशा, खरं सांगायचं तर त्या राजपुत्रानं घर आणि राज्य का सोडलं केवळ ते महत्त्वाचं नाहीच. महत्त्वाचं आहे ते घर सोडून त्यानं काय केलं ते. नाहीतर घर सोडणारे सगळेच... डोंगराच्या पोटात जिवंत दगड होऊन बसले असते, अगदी तू आणि मी सुद्धा!"
- oOo -
* क्षणी?
---
पुस्तकः 'परिव्राजक'
लेखकः गौतमीपुत्र कांबळे
प्रकाशकः सेक्युलर पब्लिकेशन
दुसरी आवृत्ती (२००९)
(पहिली आवृत्ती: एक्स्प्रेस पब्लिशिंग हाऊस,२००४)
पृ. ५७ - ६१.
---
संबंधित लेखन:
वेचताना... : परिव्राजक >>
नातं>>
---