रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

स्वातंत्र्यदिनाची वेचणी : देशासाठी चार गीते

  • भक्ती असा शब्द आला की तिच्यासोबत कर्मकांडे आणि अवडंबर ओघाने येतेच. मग ती देवभक्ती असो, राष्ट्रभक्ती असो की व्यक्तिभक्ती. भक्तीला, श्रद्धेला निखळ स्वरूपात न ठेवता त्यावर शेंदराची पुटे चढवून तिची विक्रयवस्तू केल्याखेरीज बहुतेक स्वयंघोषित भक्तांना चैन पडत नाही. एकामागून एक अशा चित्रविचित्र कल्पनांचे आणि पूर्वग्रहांचे कपडे तिच्यावर चढवून तिला पाऽर बुजगावण्याचे स्वरूप दिल्यावरच माणसे कृतकृत्य होत असतात.

    गद्य शब्दांपेक्षा अनेकदा गीत-संगीताने भावनांचा रसपरिपोष अधिक नेमका आणि निखळ होत असतो. देशभक्तिपर भावनांचे कढ तर सोडा, कढी उतू जात असताना अनलंकृत देशभक्तीला मुजरा करणारी ही चार गाणी. यांची निवडही अगदी छातीबडवू स्वयंघोषित देशभक्तांपासून त्या भावनेशी प्रामाणिक असणार्‍यांपर्यंत सार्‍यांनाच भावतील अशी केली आहे.

    पहिले गीत आहे राष्ट्रसेवादलाचे अध्वर्यू साने गुरुजी आणि सावरकरांच्या हिंदुत्ववादी मुशीतले बाबूजी सुधीर फडके यांच्या जोडीला प्रसिद्धिपराङ्मुख गुणी संगीतकार वसंत देसाई यांच्या युतीचे (किंवा आघाडीचे) अविस्मरणीय लेणे

    बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो ||ध्रु.||
    
    हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले |
    राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो ||
    
    वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन |
    तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो ||
    
    हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून |
    ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो ||
    
    करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ |
    विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो ||
    
    या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ |
    हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो ||
    
    ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल |
    जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो ||
    
    - oOo -

    दुसरे गीत आहे ते मराठी गीत-संगीताच्या क्षेत्रातील दिग्गज जोडगोळी असलेल्या गदिमा-बाबूजींचे. ग.दि. माडगूळकर हे पुन्हा राष्ट्रसेवादलाच्या पठडीतले. त्यांनी सुधीर फडके यांच्या सोबतीने अनेक अजरामर गीते दिली. गीतरामायणासारखे चिरंजीव गीतवैभव तर माझ्यासारख्या नास्तिकाच्याही काळजातील ठेवा बनून राहिले आहे.

    वेदमंत्रांहून आम्हा वंद्य 'वंदे मातरम्' 
    वंद्य वंदे मातरम्
    
    माउलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती 
    त्यात लाखो वीर देती जीविताच्या आहुती 
    आहुतींनी सिद्ध केला मंत्र 'वंदे मातरम्'
    
    याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले 
    शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले 
    शस्त्रहीना एक लाभे शस्त्र 'वंदे मातरम्'
    
    निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंजुनी 
    ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाउनी 
    गा तयांच्या आरतीचे गीत 'वंदे मातरम्' !
    
    - oOo - 

    संघटनभाव हा अनेकदा विभाजकही असतो. आपल्या गटाचे संवर्धन हे अनेकदा अन्य गटाबद्दल द्वेषपेरणी करुनच होत असते. लहान मुलाला जसे बागुलबुवाची, पोलिसाची भीती घातली जाते त्याचप्रमाणॆ आपल्या गटातील चळवळ्या सुरांना खर्‍या-खोट्या बाह्य धोक्याची, शत्रूच्या भीतीची वेसण घालून गटाच्या तबेल्यात बंद केले जाते. त्याचप्रमाणे राष्ट्रभक्तीची व्याख्याही अनेकदा नकारात्मक होऊन बसते, आणि बहुतेकांना ते ध्यानातही येत नाही. काहींच्या आले तरी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यातच आपले हित आहे असे ते मानतात. राष्ट्रभक्तीच्या भावनेला व्यापक बांधिलकीच्या भावनेमध्ये रूपांतरित करण्याची त्यांची इच्छा नसते. माणुसकीची व्यापक बांधिलकीची भावना सतत पराभूत होताना दिसते त्याचे कारण ही खुजी माणसेच असतात.

     माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू 
    जिंकू किंवा मरू
    
    लढती सैनिक, लढू नागरिक 
    लढतील महिला, लढतील बालक 
    शर्थ लढ्याची करू
    
    देश आमुचा शिवरायाचा 
    झाशीवाल्या रणराणीचा 
    शिर तळहाती धरू
    
    शस्त्राघाता शस्त्रच उत्तर 
    भुई न देऊ एक तसूभर 
    मरू पुन्हा अवतरू
    
    हानी होवो कितीही भयंकर 
    पिढ्यापिढ्या हे चालो संगर 
    अंती विजयी ठरू 
    
    - oOo 

    शेवटचे गीत आहे ते आज बव्हंशी विस्मरणात गेलेल्या आणि कधीकाळी राष्ट्रसंत या पदवीने (जेव्हा राष्ट्रभक्त, राष्ट्रसंत या पदव्या चार आण्याला आठ भावाने मिळत नव्हत्या तेव्हा!) ओळखल्या गेलेल्या तुकडोजी महाराजांची. शालेय पुस्तकांत असलेल्या ’राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली’ या एकमेव कवितेने यांची ओळख मागील पिढीला होती. आजच्या पिढीत हे नावही माहित नसल्याची शक्यता आहे.

     या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे
    हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे
    
    नांदोत सुखे गरीब-अमीर एक मतांनी
    मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी
    स्वातंत्र्य-सुखा या सकलांमाजि वसू दे
    दे वरचि असा दे
    
    सकळांस कळो मानवता, राष्ट्रभावना
    हो सर्व स्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना
    उद्योगी तरुण शीलवान येथ असू दे
    दे वरचि असा दे
    
    जातिभाव विसरूनिया एक हो आम्ही
    अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी
    खलनिंदका मनीही सत्य न्याय वसू दे
    दे वरचि असा दे
    
    सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीयापरी
    ही नष्ट हो‍उ दे विपत्ती भीती बावरी
    तुकड्यास सदा या सेवेमाजी वसू दे
    दे वरचि असा दे
    
    - oOo - 

संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा