पुल्देसपांड्यांना बहुतेक मराठी माणसे 'हशिवनारा बाबा' म्हणून ओळखतात, आमच्यासारखा एखादा त्यांना बोरकर-मर्ढेकरांच्या कविता जिवंत करणारा रसिक म्हणून ओळखतो. आपल्या आसपास बाकीबाब-आरती प्रभू-मर्ढेकर यांसारखे कवी आणि भीमण्णा-मन्सूरअण्णा-कुमार गंधर्व आणि प्रिय मित्र वश्या देशपांडे ऊर्फ वसंतखाँ अशा व्यक्ती आणि वल्लींना जमा करून आयुष्याचा काव्यशास्त्रविनोदाचा महोत्सव जगणारा अवलिया म्हणून ओळखतो. कुणी त्यांना आणीबाणीच्या काळातला साहित्यिकांचा एक आवाज म्हणून ओळखतो, परंतु त्या तुलनेत त्यांना नाटककार म्हणून तितकेसे ओळखले जात नाही. खरे तर हे अनाकलनीय आहे.
कदाचित याचे एक कारण म्हणजे त्यांची बहुतेक नाटके ही अनुवादित वा रूपांतरित आहेत हे असू शकते. 'इन्स्पेक्टर जनरल' वरून अंमलदार, ’थ्री पेनी ऑपेरा'वर बेतलेले 'तीन पैशाचा तमाशा', ’पिग्मॅलियन'चे अस्सले देशी रूप 'फुलराणी' यांसारखी नाटके गाजली. पण 'तुझे आहे तुजपाशी' सारखे स्वतंत्रपणे (अनुवादित नसलेले) नाटकही लोकांनी डोक्यावर घेतले गेले. ’एक झुंज वार्याशी’ तर नाट्यस्पर्धांमधून वीट यावा इतक्या वेळा सादर केले गेले.
याशिवाय 'वार्यावरची वरात', 'एका रविवारची कहाणी' आणि त्यांचा एकपात्री प्रयोग 'बटाट्याची चाळ' हे ही स्वतंत्रपणे गाजले. या जोडीला ’गुळाचा गणपती' सारखा ’सबकुछ पुलं' हा सुपरहिट चित्रपट करून चित्रपटसृष्टीतही मुलूखगिरी केली, जी थेट 'एक होता विदूषक' पर्यंत अधे-मध्ये चालू होती. असे असूनही सर्वसामान्यांना त्यांची मुख्य ओळख होती ती 'हशिवनारा बाबा' आणि स्वत:ला अभिजन म्हणवणार्या एका छोट्या गटाला संगीतप्रेमी म्हणून.
या सार्या गदारोळात दुर्लक्षले गेलेले एक अस्सल नाटक म्हणजे 'सुंदर मी होणार'. यात प्रथमच कुठेतरी थेट भावनिकतेचा सूर पुलंनी पकडला आहे. कदाचित याच कारणासाठी डॉ. लागूंना 'हे अजिबात आवडलेले नाही' असे स्पष्ट सांगावे लागले असे नाटक. रॉबर्ट आणि एलिझबेथ ब्राउनिंग यांच्या 'इम्मॉर्टल लव' या आत्मचरित्राचा गाभा पकडून उभे राहिलेले हे नाटक रंगभूमीशी संबंधित लोकांना आणि रसिकांनाही नेहेमीच 'व्हेरी अनपुलिश' म्हणून अनुल्लेखाने मारावेसे वाटले आहे.
परंतु यात असलेली स्वातंत्र्याची आस, काही लहान लहान संकेतातून मांडले गेलेले त्याचे सूचन, संस्थानिकाच्या आधारे मांडलेले सत्तेचे रूपक, त्या सत्तेच्या दबावाखाली विकसित झालेली विविध व्यक्तिमत्त्वे, लोकशाहीच्या आगमनानंतर व्यावसायिकांच्या रुपाने तयार झालेली नवी संस्थाने, त्या चोख व्यवहारवादाच्या रेट्याखाली दबलेले स्वातंत्र्याची वैयक्तिक अनुभूती असणारे गाणे... असे छोटे- छोटे पदर घेऊन बहुपेडी वीण असलेले हे नाटक उभे राहते आहे.
मी पाहिलेल्या प्रयोगात 'न आवडलेले नाटक' असूनही त्यातील संस्थानिकाची मध्यवर्ती भूमिका नाकारून, वरवर पाहता दुय्यम दिसणारी भूमिका मागून घेऊन ती जीव ओतून सादर करणारे डॉ. लागू हे एक विलक्षण रसायन यातून सापडले. दीदी पहिल्याने आपली खोली सोडून आपल्या पायाने चालत बाहेर पडल्याच्या ’परिपूर्ती’च्या आनंदाने गहिवरुन आलेले डॉक्टर उभे करताना लागूंनी त्यांच्या डोळ्यातील पाणी प्रेक्षकांच्या डोळ्यातही आणून सोडले.
केवळ ’धनाढ्य बापाचा मुलगा’ एवढीच ओळख असल्याने ’आपण नक्की काय करतो?’ असा न्यूनगंड असलेल्या व्यक्तीचे, ’तुम्ही काय करता?' या प्रश्नाला 'मी गातो!' हे उत्तर न कचरता, पुर्या आत्मविश्वासाने देण्याइतका प्रवास झालेला ’सुरेश', एरवी फक्त लोकानुरंजनात्मक भूमिका करणार्या प्रशांत दामलेने अचूक पकडला. सर्वात धाकटी, वरकरणी फुलपाखरी मनोवृत्तीची वाटणारी, पण भावांप्रमाणे आपली जाण गाडून न ठेवता तिला बंडखोरीपर्यंत कणखरपणे घेऊन जाणारी बेबी कविता मेढेकरांनीही यथातथ्य उभी केली. दोन प्रमुख पात्रांनी मात्र साफ निराशा केली. रवि पटवर्धन यांनी साकारलेली ’संस्थानिका'ची भूमिका आणि नाटकाचा केंद्रबिंदू असलेली दीदीची वंदना गुप्ते यांनी साकारलेली भूमिका अतिशय सामान्य होत्या.
सरासरीपेक्षा अधिक शारीरिक उंची असलेल्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात अधिकाराची एक उपजत अशी धार अनाहुतपणे मिसळलेली असते हे खरे. तसेच आवाजावर हुकमत असलेली व्यक्ती त्याचा वास्तवात आपल्या आसपासच्या व्यक्तींवर एक प्रभाव पाडून वर्चस्व राखू शकते हे ही खरे. पण हे दोन्ही अंगभूत गुण असूनही त्या व्यक्तीला अधिकाराचा सूर अचूक सापडतोच असे नाही याची पुरेपूर जाणीव पटवर्धनांच्या संस्थानिकाने दिली. घरातील करड्या स्वभावाचा, हेकट नि एककल्ली बाप आणि अधिकाराची निव्वळ जाण असणाराच नव्हे तर तो निर्ममपणे, निष्ठुरपणे राबवणारा संस्थानिक यातील फरक त्यांना सापडला नाही. संस्थानिकाच्या अधिकार गाजवण्यात जी जरब असायला हवी ती अजिबात नव्हती. एक त्रागा करणारा बापच फक्त उभा राहिला. दुसरीकडे इतरांबाबत कठोर असणारा पण दीदीबद्दल मनात विशेष ममत्व असलेला बाप, हे त्याने मनात खोल दडवून ठेवलेले रूप त्यांना अजिबातच दाखवता आले नाही. पण कदाचित त्यांच्या मूळ व्यक्तिमत्वात, त्यांच्या अभिनयक्षमतेतच ते न्यून आहे असा माझा समज आहे.
दारव्हेकरांच्या ’कट्यार काळजात घुसली’ मध्ये सदाशिवचे एक अलवार स्वप्न आहे. आपली महत्वाकांक्षा काय हे सांगताना तो स्वत:मध्ये हरवून जात ते स्वप्न झरीनाला सांगतो. तितकेच हृद्य नि तसेच स्वत:पाशी हळुवारपणे जपलेले काही दीदीराजेंकडे आहे. करकरीत व्यवहारी व्यक्तिमत्वाच्या बापाला ते उलगडून सांगत असताना दीदी स्वत:च्या त्या आतल्या जगात हरवून जाताना दिसायला हवी. पण गुप्तेंनी टाईपरायटरवर शब्द टाईप करावेत तसे खाडखाड म्हटले. (नशीब शेवटी उठून कमांडिंग ऑफिसरला सॅल्युट ठोकला नाही.)
आत्मविश्वास हरवल्याने व्हीलचेअरला खिळलेली दीदीराजे ही कवयित्री आहे. कल्पनेच्या भरार्यांनी तिचे जग तिने निर्माण केले आहे. शारीरिक अवस्थेमुळे येऊ शकणार्या कडवटपणाचा लवलेशही तिच्यात नाही. उलट बापाने जरबेत ठेवलेल्या भावा-बहिणींचे आश्रयस्थान म्हणून ती त्या आईवेगळ्या मुलांच्या आईचीच भूमिका पार पाडते आहे. धनाढ्य बापाच्या व्यवहाराचे गम्य नसलेल्या; संगीताशी सलगीच नव्हे, तर त्यात आतडे गुंतवून बसलेल्या सुरेशला त्याच्या न्यूनगंडातून बाहेर पडण्यास ती प्रोत्साहित करते आहे. आणि त्याचवेळी त्याच्या सर्वस्वी विपरीत- बेबीपेक्षाही दोन पावले पुढेच असलेल्या, आपल्या चुलत बहिणीच्या अगोचरपणाच्या वर्तनाला सहजपणे सांभाळून घेते आहे. या सार्या जबाबदार्या सर्वांत मोठी बहीण म्हणून परिपक्वपणे पार पाडताना दिसते.
पण संजय भेटायला येणार म्हटल्यावर मात्र ती प्रथमच स्वत:साठी काही मिळावे म्हणून एकीकडे फुलून येते तर दुसरीकडे त्याबद्दल साशंक होऊन तिचा गोंधळ उडतो. इथे दीदीराजेचे प्रथमच मीलनोत्सुक स्त्रीमध्ये रुपांतर होते. गुप्तेंना हे रुपांतर साधले नाही. काहीसे स्वप्नाळू, काही धांदलीचे असे प्रश्न ती स्वत:च्या रुपाबद्दल विचारते त्यात मीलनोत्सुक स्त्रीचे कोवळेपण न दिसता पुन्हा एकवार टाईपरायटरचा खडखडाटच ऐकू आला. एकुण गुप्तेंच्या दीदीराजे एकसुरी, एकवाणीच उभ्या राहिल्या. इतक्या व्यामिश्र व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू उभे करण्यात त्या साफ अयशस्वी ठरल्या.
निवडलेला वेचा हा कथानकाच्या मूळ प्रवाहाचा एक संहत आविष्कार अथवा साररुपाने त्याला समोर ठेवणारा. संस्थानिकाचा भव्य वाडा, त्यात उपलब्ध असणारे सारे उपभोग, सुबत्ता पण तो तुरुंगासमान काचणारी त्याची पुढची पिढी. स्वातंत्र्याचा अभाव म्हणजे काय हे जाणवणारी संस्थानिकाची पिढी तर दुसरीकडे व्यावसायिक साम्राज्याच्या रूपाने लोकशाहीतील एक संस्थान उभे केलेल्या कोण्या सरसाहेबांच्या घरात जवळजवळ तीच स्थिती अनुभवणारा सुरेश.
अशा परिस्थितीमध्ये ’व्हीलचेअर'वर बसलेली, वरकरणी पाहता परावलंबी भासणारी एक व्यक्ती केवळ जड पातळीवरच पाठीचा कणा ताठ असलेल्या इतरांच्या आयुष्याचा आधार बनून राहते, जगण्यातले सौंदर्य स्वच्छ दृष्टीने आणि मनाच्या सार्या खिडक्या उघड्या टाकून पाहते. आज भावनिकता म्हणजे मेलोड्रामा, आणि मेलोड्रामा म्हणजे निकस कला अशा अजब तर्कटाला चिकटून बसलेल्या स्वयंघोषित तज्ज्ञांचा सुळसुळाट झालेल्या काळात असे नाटक फक्त तुम्हा-आम्हा सामान्य प्रेक्षकासाठीच उरते. पण जिवंत मनात ते खोलवर उतरते, जगण्यावरील श्रद्धा बळकट करत नेते.
आज ८ नोव्हेंबरला भाईंचा जन्मदिवस. या निमित्ताने भाईंचे हे दुर्लक्षित नाटक पुन्हा एकदा पाहतोय. इच्छा असेल तर तुम्हीही सामील होऊ शकता. ’हशिवनारा बाबा’ कधी-कधी डोळ्यात पाणीही आणतो हा अनुभव पदरी पडतो का पाहा.
- oOo -
या पुस्तकातील एक वेचा: लोकशाही आणि स्वातंत्र्य