वैशाखातील दुपार खंजिरासारखी तळपत होती. उन्हाच्या सणक्यानं सगळं गाव निपचित पडलं होतं. वारा वाहत नव्हता. झाडं हलत नव्हती. कुठंच हालचाल नव्हती, गजबज नव्हती. छपरांच्या सावलीला गुरं निवांत होती. भिंतीच्या कडेशी माती उकरून कोंबड्या गपचीप बसल्या होत्या, पाय पोटाशी घेऊन आणि गोल डोळ्यांवर पापण्यांचे पांढरे पडदे ओढून डुलक्या घेत होत्या. डालपाट्याखाली कोंडलेल्या कोकराची धडपड थांबली होती. लिंबाच्या डहाळ्यात बसलेल्या साळुंक्या बोलत नव्हत्या. कावळ्यांची जोडपीही एकमेकांना बिलगून निश्चल बसली होती. कुत्री राडीत बसून ल्हा-ल्हा करीत होती. कुंभाराची गाढवं झाडाच्या सावलीला दिडक्या पायावर उभी होती. सारं खेडं उन्हाच्या तापानं मरगळून गेलं होतं.
आपल्या घरात सोप्यात मिरी एकटीच गजग्यांनी खेळत होती. रंगीत बांगड्यांचे तुकडे मोजीत होती. गालावर येणारे भुरे केस सावरीत होती. आपल्याशीच काही बडबडत होती. पण तिला करमत नव्हतं. तिचं मन रंगीत काचात, गजग्यांत रमत नव्हतं. परटाची सुबा चार-सहा दिवस घरी येण्याची बंद झाली होती. त्या दोघींचं भांडण झालं नव्हतं. गट्टी फू झाली नव्हती, तरीही सुबा घरी येत नव्हती. कुठं भेटली तर बोलत नव्हती. हसत नव्हती. त्या पोरी एकमेकींपासून का तुटल्या होत्या? त्या जिवलग मैत्रिणी एकमेकींशी का बोलत नव्हत्या? चार-सहा दिवसांपूर्वी मिराच्या आईनं मिरीला बजावलं होतं, “मिरे, परटाच्या पोरीशी खेळू नकोस, तिच्या घरी जाऊ नकोस.”
“का आई?”
“का आणि कशासाठी! खेळत जाऊ नकोस म्हणून सांगितलं ना?”
“पण तिनं काय केलंय?”
“तिनं नाही, तिच्या आईनं केलंय!”
“काय?”
“तुला नाही समजायचं ते सांगून. पण यापुढं तिच्या घरी जाऊ नकोस, समजलं?”
मिरीला मुळीच समजलं नाही. आई कामाला लागली तेव्हा तिच्या ओल्या पदराशी झटत तिनं सारखी भुणभुण लावली.
“सांग ना गं आई–”
ओचा हिसकून रागानं आई विचारी, “काय गं, कार्टे, काय सांगू तुला?”
“सुबाच्या घरी का जायचं नाही?”
“नाही जायचं. तिची आई चांगली नाही.”
“काय करते ती?”
“काय सांगू तुला, माझं कपाळ!”
“सांग ना गं!”
मिरीनं खंदूस घातला, तेव्हा आई चिडली. दात-ओठ खाऊन बोलली, “अगं, कार्टे, नवऱ्याच्या मागं चांगली राहिली नाही तिची आई.”
“म्हणजे काय केलं तिनं?”
“बावा केलान. समजलं?”
तरीही मिरीला काही समजलं नाही. एवढाच अर्थबोध झाला की, सुबाच्या आईनं अशी गोष्ट केली की, जी चांगली समजली जात नाही. एवढ्या बोधानं पूर्णतः नाही तरी तिचं थोडकं समाधान झालं आणि त्याच दिवशी काचकवड्यानं खेळायला आलेल्या सुबाला गाल फुगवून तिनं सांगितलं, “सुबा, तुझ्याशी खेळू नको म्हणून सांगितलंय आपल्या आईनं!”
सुबा परकर चघळत म्हणाली, “का गं, मी का भांडलीया तुझ्याशी?”
“नाही. पण तुझी आई चांगली नाही. तिनं बावा केलाय.”
म्हणजे काय केलं? सुबालाही काही कळलं नाही. पण बामणाच्या मिरीनं आपल्याशी खेळू नये असं काहीतरी आपल्या आईनं केलंय, हे तिला उमगलं आणि त्यामुळं तिचा अपमान झाला. एकाएकी ती रडू लागली. आणि रडतरडतच आपल्या घरी आली.
सुबा रडली म्हणून मिरीही रडली. चिंध्यांची बाहुली उराशी धरून रडली आणि रडता रडताच सोप्यात झोपी गेली.
सुबा घरी गेली आणि तिनं आपल्या आईला विचारलं, “आये, तू बावा का केलास?”
तेव्हा उत्तर देण्याऐवजी तिच्या आईनं फुकणीनं तिची पाठ सडकली. जेवू न घालता उपाशी ठेवली. तिला घरात कोंडून ती बाहेर निघून गेली.
बंद दारावर लाथाबुक्क्या मारून सुबा ओरड-ओरड ओरडली. थुकली, ओकली आणि दमून दाराशेजारी झोपी गेली. चार-सहा दिवसांपूर्वी असा प्रकार घडला आणि त्या मैत्रिणी एकमेकींशी बोलेनाशा झाल्या.
म्हणून मिरी आज एकटीच खेळत होती. तिला करमत नव्हतं. परटाच्या सुबाच्या घरी जावं, असं तिला सारखं वाटत होतं. पण आईच्या माराचं भय जबर होतं. तिनं सांगितलं होतं की, पुन्हा त्या पोरीशी खेळशील तर उलटी टांगून मारीन. अंधाऱ्या खोलीत डांबून घालीन! परटाच्या सुबानं असं काय केलं होतं? तिच्या आईच्या हातून अशी कोणती चूक झाली होती? मिरीला काही कळत नव्हतं. तिला सुबावाचून करमत नव्हतं. एकटीनंच काय खेळायचं?
गजगे गोळा करून मिरी उगीच बसली. बाहेर उन्हाकडे बघवत नव्हतं. डोळे दिपत होते. सगळीकडे उदास शांतता पसरली होती.
मग स्वयंपाकघरातून आई ओरडली, “मिरे, इकडे ये जरा!”
परकर उचलून धरून मिरी आत गेली.
“काय आई?”
फडक्यात बांधलेली थाळी उचलून देत आई म्हणाली, “तुझ्या वडिलांना जेवण देऊन ये जा मळ्यात!”
ओढ्याच्या पलीकडे मळा होता. मिरीचे वडील आंब्याची झाडं राखीत तिथं बसले होते. त्यांना दुपारचं जेवण पोहोचवण्याचं काम मिरीकडं आलं होतं.
उन्ह लागू नये म्हणून आईनं धोतराची घडी पोरीच्या डोक्यावर ठेवली. पायात घालण्यासाठी आपल्या वहाणा दिल्या. आणि ती म्हणाली, “जा, चटकन देऊन ये जा. उशीर झाला आज. भुकेलेले असतील!”
डोक्यावरची थाळी दोन्ही हातांनी घट्ट पकडून मिरी घराबाहेर पडली. पायातल्या मोठ्या वहाणा ओढीत चालू लागली.
वाट सुबाच्या घरावरून गेली होती. ती आत्ता काय करत असेल? कुणाशी खेळत असेल? पण आपण तिच्या घरी जायचं नाही. तिकडं बघायचंसुद्धा नाही. सुबाची आई वाईट आहे. वाईट आईच्या मुलीशी बोललं की, पाप लागतं. उन्हानं लाल झालेले गोरे गाल फुगवून मिरी सुबाच्या घरासमोरून पुढं गेली. तिनं तिकडे वळूनसुद्धा बघितलं नाही!
आपल्या घराच्या उंबऱ्यात खेळ मांडून सुबा बसली होती. तिनं डोळे मोठे करून मिरीला जाताना बघितलं. असल्या उन्हात आपली मैत्रीण एकटीच कुठं गेली? डोक्यावर थाळी घेऊन मळ्यात जेवण पोहोचवायला गेली असावी! तिला भीती नाही का वाटायची एकटीला ? ओढ्यातल्या कवठीखाली भूत आहे. ते तिला खाऊन टाकील, मग आपल्याला मैत्रीण कोण? तिच्या सोबतीला गेलं पाहिजे. पण ती आपल्याशी बोलत नाही. न का बोलेना. आपण न बोलता तिला सोबत जाऊ.
खेळाचा पसारा तसाच टाकून सुबा उठली आणि बाहेर पडली. मिरीच्या मागोमाग जाऊ लागली.
उन्हाच्या सणाक्यानं खालचा फुपोटा तापला होता. त्याचे चटके बसू लागले, तेव्हा पायात काटे मोडल्यासारखी चालू लागली. तोंडानं हाशऽ हूशऽ करू लागली.
मिरीचं तोंड उन्हानं तांबडंलाल झालं. घामाचे ओघळ गालांवर उतरले. डोक्यावरची थाळी दोन्ही हातांनी धरून, पायापेक्षा दुप्पट मोठ्या वहाणा ओढीत ती चालली होती.
आता त्या दोघींमध्ये केवळ चार-सहा पावलांचं अंतर राहिलं. पावलांचा आवाज, चटके बसल्यामुळे तोंडातून निघालेला आवाज यामुळे मिरीची खात्री झाली की सुबा आपल्यामागून येत आहे. डोळ्याच्या कोपऱ्यातून हळूच तिनं मागं पाहिलंही.
दोघीही न बोलता चालू लागल्या.
गावाबाहेरचं खंडोबाचं देऊळ आलं, मागं पडलं. ओढ्याचा खडकाळ उतार उतरून दोघीही वाळूत शिरल्या. रुंद पात्र असलेल्या ओढ्यात पाण्याचा टिपूस नव्हता. सगळीकडे वैराण वाळू, ती तापलेली.
तापलेल्या हवेचे थर वाळूवरून सळसळत होते. त्याच्याकडे बघत मिरी जात होती. वाळूतून गेलेल्या गाडीची लांबच लांब चाकोरी उठली होती. तिच्यातून मळ्याकडे जात होती.
सुबाचे पाय फार भाजू लागले. तिच्या कानातून कळा येऊ लागल्या. तरी ती ओठावर ओठ दाबून चालतच होती. मैत्रिणीमागून जातच होती.
सुबा आपल्यामागून येत आहे, ही जाणीव मिरीला होती. पलीकडच्या काठावर असलेल्या कवठीच्या झाडावर भूत आहे, त्यानं आपल्याला खाऊ नये म्हणून ती सोबतीला आली आहे, हेही तिला कळलं. कारण आजपर्यंत त्याच कारणासाठी तिनं अनेकदा सुबाला आपल्याबरोबर मळ्यात नेलं होतं.
दोघीही मैत्रिणी ओढ्याच्या मध्यापर्यंत आल्या आणि पुढं चालणारी मिरी एकाएकी थांबली. त्याबरोबर मागून चालणारी सुबाही थांबली. कधी टाचेवर तर कधी चवड्यावर, कधी डावा पाय उचल तर कधी उजवा उचल, असं करीत उभी राहिली. मिरीनं वहाणा काढल्या आणि उघड्या पायानं ती वाळूत उभी राहिली. आणि तिला कळून चुकलं की, वाळू फार तापली आहे. पायात वहाणा असल्याशिवाय अर्धेअधिक चालून येणंदेखील कठीण आहे! मग पायातल्या वहाणा तिनं तिथंच ठेवल्या आणि ती मुकाट्यानं पुढं चालू लागली.
सुबा वहाणांपाशी आली. चटकन तिनं त्या घातल्या. पोळलेले पाय थोडेफार थंड झाले. मोठ्या वहाणा ओढीत ती चालू लागली. अनवाणी चालणाऱ्या मिरीमागोमाग जाऊ लागली. वाळवंट संपलं. कवठीचं मोठं झाड आलं. उंचच्या उंच झाड. त्याच्या एका फांदीवर लाल मानेचं काळं गिधाड बसलं होतं.
दोघींनीही डोळे गच्च मिटून घेतले. तोंडानं राम-राम-राम-राम म्हणणं आवश्यक आहे, असं मिरीला वाटलं. सुवाला तसं सांगणं जरुरीचं होतं. पण हिच्याशी बोलायचं नाही! मग? सुबाऐवजीसुद्धा ती आपणच रामराम म्हणू लागली. कवठीचं झाड मार्ग पडलं. माळरान आलं. वाटेकडेला झाडं-झुडपं होती. त्या सावलीतून दोघी चालू लागल्या. न बोलता, न हसता.
मग मळ्याची हद्द लागली तशी मिरी थांबली. सुबा पुढं झाली. तिच्या पायापाशी आपल्या पायातील वहाणा काढून ठेवून, पुन्हा झाडाच्या सावलीला गेली. आत्ता मळा मिरीचा होता आणि भांडणाच्या नियमाप्रमाणे सुबाला त्याच्यात पाय टाकायचा नव्हता. सावली असल्यामुळे वहाणांची जरुरी नव्हती. मिरीला रानातून जायचं होतं. काटेकुटे बोचण्याचा संभव होता. पुढं ठेवलेल्या वहाणा पायात घालून मिरी मुकाट्यानं बांधावरून जाऊ लागली.
पुढं हिरवीगार आंब्याची झाडं होती. फळांचे घोस लोंबत होते. त्यांची राखण करीत मिरीचे वडील बसले होते. आंब्याच्या खोडाशी पटका उशाला घेऊन टेकले होते.
उन्हाच्या भगभगीतून त्या थंडगार सावलीत येताच, मिरीच्या नाकपुड्या फुगल्या. पाडाला आलेल्या आंब्यांचा सुरेख वास. गार आणि गोड वास आला तो हुंगून वनातल्या परीसारखी ती वडिलांपाशी गेली आणि त्यांना गुंगीतून जागं करीत म्हणाली, “अप्पा, अप्पा, तुमचं जेवण आणलं मी!”
अप्पा डुलकीतून जागे झाले. शेंडी गोंजारीत उठून बसले. पोरीच्या तोंडावरचा धाम धोतरानं पुशीत म्हणाले, “उन लागलं गं माझ्या बाईला. एकटा आलास तू राजा?”
त्यांच्या छातीवर डोकं घुसमडत मिरी म्हणाली, “हो अप्पा!”
खरं तर तिला सुबा आल्याचं सांगायचं होतं. तिच्या आईनं काय वाईट केलंय, तेही विचारायचं होतं. पण अप्पांच्या मिशांची, खाकी रंगाच्या शिकारी कोटाची, जाड आणि केसाळ बोटांची तिला फार भीती होती. फारच. मग ती एकाएकी उठली आणि म्हणाली, “अप्पा, आम्ही जातो!”
“बरं, जा हं!”
मग अप्पांनी धोतराखाली ठेवलेला एक पाडाचा आंबा काढून, मुलीला दिला. हिरव्यापिवळ्या रंगाचा मोठा आंबा, तो ओच्यात घेऊन मिरी परत घरी निघाली. मोठ्या वहाणा ओढत आणि डोक्यावर धोतराची घडी घेऊन.
झाडाच्या सावलीत सुबा उभी राहिली होती. खारोट्यांकडे बघत आणि परकर चोखत. मिरी येताच ती निमूट तिच्यामागं जाऊ लागली. न बोलता, न हसता.
मिरीनं ओच्यातील आंबा काढला आणि तो चोखत-चोखत जाऊ लागली. तिच्यामागोमाग सुबा.
ओढ्याच्या अलीकडे येईतो मिरीनं आंबा चोखला. तो निम्मा राहिला तेव्हा एका दगडावर ठेवला आणि ती सुबाला काहीही न सांगता, वाळूत उतरली.
सुबानं तो आंबा निमूटपणे घेतला आणि चोखत-चोखत ती मिरीच्या मागोमाग जाऊ लागली. पायाला चटके बसत होते आणि तोंडात गोड रस जात होता. कपाळावर घाम येत होता आणि गाल पिवळ्या रसानं माखत होते.
अर्धे वाळवंट संपताच मिरीनं वहाणा काढून ठेवल्या आणि ती पुढं गेली. सुबानं त्या घातल्या आणि मिरीच्या मागोमाग गेली.
दरड संपली. खंडोबाचं देऊळ मागं पडलं. घर आलं. आंब्याची बाठ आणि साल फेकून सुबानं तोंड पुसलं, वहाणा काढून मिरीपुढं ठेवल्या आणि आपल्या घराच्या उंबऱ्यात उभी राहून, ती मैत्रिणीकडे बघत राहिली.
मिरी पाठमोरी चालली होती. तिला वाटत होतं की, सुबाच्या घरी जावं. पण सुबाची आई वाईट होती. वाईट आईच्या मुलीशी बोललं की, पाप लागतं! उन्हानं लाल झालेले गोरे गाल फुगवून मिरी पुढं निघून गेली. तिनं मागं वळूनसुद्धा बघितलं नाही.
(‘विवेक’, विजयादशमी विशेषांक, १९५०.)
- oOo -
पुस्तक: रानमेवा.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती दुसरी, चवथे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२२.
पृ. ४५-५०.
(पहिली आवृत्ती: २०१०. अन्य प्रकाशन)
---
(पुस्तकामध्ये ही कथा ‘बावा’ या शीर्षकाखाली समाविष्ट केलेली आहे.)
यांसारखे आणखी:
वाळूचा किल्ला
एका गोष्टीची गोष्ट